लोकल डायरी -- १२

Submitted by मिलिंद महांगडे on 3 May, 2015 - 09:38

अँटी व्हायरसच्या एंगेजमेंटची बातमी कोपऱ्यात लपून बसून ओरडत असलेल्या रातकिड्यासारखी माझ्या डोक्यात वाजत राहिली. त्याने मला जास्तच अस्वस्थ वाटू लागलं . डोक्यातून तिचा विचार जाता जाईना . मुश्किलीने एक मुलगी आवडली होती , पण त्याचा आता काहीच उपयोग नव्हता . आपलं म्हणून बिनधास्त शिरावं आणि ते दुसऱ्याचं घर निघावं असं झालं होतं . माझ्याच बाबतीत असं का व्हावं ? नशीबच खराब आपलं ... ! मी माझ्या नशिबाला शिव्या देत स्टेशनच्या दिशेने निघालो . चालता चालता माझ्या डोक्यात सहज विचार आला , आपण किती दिवस अँटी व्हायरसला पहात होतो ...? फार - फार तर ५ - ६ महीने झाले असतील , त्याच्या आधी तर ती मला दिसली नव्हती , किंवा माझी तिच्याशी कसलीच ओळख नव्हती . मग , जे पहिल्यापासून आपलं नव्हतच ते गेल्याचं दुःख तरी कशाला उगाळत बसा ? मरु दे च्यायला !!! मी तिचा विचार करणं सोडून दिलं . आज सावंत त्यांचा प्लॅन काय आहे ते सांगणार होते . त्याचीच उत्सुकता मनात घेऊन मी प्लॅटफॉर्मच्या पायऱ्या चढु लागलो . पाठीमागून भरतची हाक ऐकू आली .
" काय भाई , ऑल ओके ना ? " अँटी व्हायरसच्या एंगेजमेंटच्या बातमीचा माझ्यावर काय परिणाम झाला याचा अंदाज घेण्यासाठी भरत मला विचारत होता .
" ऑल ओके ... नो प्रोब्लेम ...!" मी नेहमीपेक्षा जरा जास्तच उत्साहात उत्तर दिलं .
" सॉरी यार ... कालच्याबद्दल ..." भरत म्हणाला .
" अरे त्यात काय ? .... तु कशाला सॉरी बोलतोयस ? "
" नाही , तसं नाही , पण ती नको असलेली बातमी मीच तुला सांगितली ना ...."
" सोड रे ... तुला कालच बोललो ना ,की मला हे माहित आहे म्हणून ... जाऊ दे ... बरं मला सांग शरदच्या प्लॅनिंगचं काय झालं ? सावंत आज आपल्याला प्लॅन सांगणार आहेत ना " मी विषय बदलत म्हणालो .
" हो रे .... आज प्लॅन ठरणार आहे . आले असतील ते प्लॅटफॉर्मवर …! " आम्ही दोन नंबर प्लॅटफॉर्मच्या पायऱ्या उतरत होतो . आमच्या नेहमीच्या जागी पोचलो तेव्हा सावंत , शरद , नायर अंकल , भडकमकर काहीतरी चर्चा करताना दिसले. आम्हाला पाहताच भडकमकर भडकले , " काय रे , इतक्या उशिरा येताय ? मित्राची काही काळजी वगैरे आहे की नाही ? "
" सॉरी भडकमकर साहेब , रिक्शा मिळायला उशीर झाला . शरद भावा , सॉरी यार " मी आणि भरतने दिलगीरी व्यक्त करुन टाकली. पण शरदचं आमच्याकडे लक्षच नव्हतं . पहिल्यांदाच पोहण्यासाठी पाण्यात उतरत असलेल्या नवशिक्या मुलाच्या चेहऱ्यावर असते तशी भीती त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती . कदाचित उद्या काय करायचं आहे हे सावंतांनी त्याला सांगितलं असलं पाहिजे ...
" सावंत , हे आपल्याच्याने होणार नाही ...फुल्ल तमाशा होईल ... काय फालतुगिरी आहे ही ...!!!" शरद नकरार्थी मान हलवत म्हणाला .
"अरे, फालतुगिरी काय त्याच्यात ? तु तुझ्या प्रेमासाठी हे सगळं करतोयस ..."
" पण हे कसलं फिल्मी आहे …!!! ती काय विचार करेल माझ्या बाबतीत ..."
" काही विचार करणार नाही , बरं तू आधी तिला कसा प्रपोज केला होतास ...?
" काही नाही ... ती रस्त्याने चालली होती . मी तिला मधेच थांबवून विचारलं … तर ती काही न बोलता निघुन गेली . हो पण नाही आणि नाय पण नाही .... "
" बरोबर आहे ... ह्याला काय प्रपोज करणं म्हणतात ....? चोरी केल्यासारखं ...! अरे कुसुमाग्रज म्हणतात , प्रेम कर भिल्लासारखं ... बाणावरती खोचलेलं ... मातीमधे उगवुन सुद्धा आभाळापर्यंत पोहोचलेलं ...., कदाचित तिला हे तुझं फिल्मी प्रपोज करणं आवडेलही ...
" ह्म्म्म ... बहुतेक ..." शरदच्या मनात अजूनही शंका होती .
" पटत नाही का तुला ...? बरं , मला सांग समजा तुमचं लग्न झालं तर तिच्या घरच्यांचा काही प्रॉब्लेम आहे का ? "
" नाही ... तसा काही प्रॉब्लेम त्यांना वाटणार नाही ... तसे ते आधुनिक विचारांचे आहेत ..."
" मग तुझ्या घरच्यांचा काही प्रॉब्लेम आहे का ? "
" त्यांनी तर मला ह्या बाबतीत सोडूनच दिलेलं आहे .... आमचे तीर्थरूप तर म्हणाले की फक्त एखाद्या मुलीशीच लग्न कर म्हणजे झालं …! " त्यावर आम्ही सगळे हसलो .
" अगदी बरोबर आहे तुझ्या वडिलांचं !!! ओके मग आता तुला मॅगी मनापासून आवडते ?
" होय हो ... आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का ? "
" मग मित्रा , आता राहिलं कोण ? मॅगी .... ! तिचं दुसऱ्या कुणावर प्रेम आहे का ? "
" नाही , म्हणजे मी तिला इतक्या वर्षांपासून ओळखतो पण माझ्या माहितीत तर तसं कोणी नाही . तसं काही असतं तर मी स्वतः बाजूला झालो असतो . "
" झालं तर मग ... आता तू तिच्यावर किती प्रेम करतोस हे तिला पटवून द्यायला नको का ? " ह्या बाबतीत जास्त वेळ घालवून चालत नाही बाबा , नाहीतर त्याचा सावंत होतो ...! " सावंत असं म्हणाले आणि शरदसकट सगळे त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले . ते असं का म्हणाले हे फक्त मलाच माहित होतं.
" सांगिन नंतर कधी तरी .... फुरसतीत ... आता शरदचा प्रॉब्लेम सॉल्व करु " कोणी काही विचारायच्या आत त्यांनी सगळ्यांच्या येऊ घातलेल्या प्रश्नाला शिताफिने बगल दिली .
" ओके ... ठीक आहे ... मी प्रयत्न करतो ..." शरद नाईलाजाने म्हणाला .
इतक्यात भरत ने आम्हा सगळ्यांना खुणावलं . आमच्या बाजूने मॅगी जात होती . ती कालच्याच वेळेवर आली होती . तिने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता . डोक्यावरच्या कुरळ्या केसांच्या काही बटी वाऱ्याबरोबर उडत होत्या . तिच्या खांद्याला तिची स्टायलिश निळ्या रंगाची हॅंड बॅग होती . आमच्या बाजूने जाता जाता तिने सहज आमच्या ग्रुपकड़े नजर टाकली , तिला शरद दिसला आणि तिच्या नजरेतले भाव अचानक बदलले ... पण क्षणभरच ! नक्कीच तिला शरदबद्दल काहीतरी वाटत असावं हे आमच्या लक्षात आलं . त्यानंतर ती इकडे तिकडे न बघता सरळ नाकासमोर चालत गेली . ती तशी गेली आणि शरदला काय झालं कुणास ठाऊक , तो अचानक म्हणाला , " सावंत , उद्या काय व्हायचाय तो तमाशा होऊ देत ... आता मी मागे हटणार नाही . "
" ये हुई ना बात ... चला तर मग , आपण परत एकदा आपल्या सो कॉल्ड फिल्मी प्लॅनची उजळणी करू ... तर प्लॅन असा आहे ... उद्या आपल्या ८ : २४ च्या गाडीखाली शरद आपला जीव देणार , आपण रोजच बघतो की गाडीला ट्रॅक चेंज करायचे असल्यामुळे रोजच ती हळू हळू प्लॅटफॉर्म मधे शिरते ... ट्रेनचा मोटरमन माझ्या ओळखीचा आहे. मोटरमनशी मी बोललोय, तो उद्याची गाडी आणखी हळूहळू प्लॅटफ़ॉर्म नंबर 2 वर आणेल . मॅगी स्टेशनमधे आली की शरद प्लॅटफॉर्म नंबर दोनच्या ट्रॅकवर उडी मारेल . आपल्याला शरदची काळजी घेणं महत्वाचं आहे पण त्याचबरोबर तो तिच्यासाठी जीवही देऊ शकतो हे आपल्याला तिला पटवून द्यायचं आहे .... तोपर्यंत मध्या तू मॅगीला शरद जिथे उभा असेल तिथे घेऊन यायचं . नायर अंकल आप शरद को बार बार मना करेंगे ... ' अरे ऐसा मत करो , मत करो ...' सब रिअल दिखना मांगता है । शरद तिला प्रपोज करेल , आणि जर ती नाही म्हणाली तर ह्या ट्रेन खाली जीव देईल ... , असं तो तिला सांगेल ... एवढा भयानक प्रकार बघुन तर ती नक्कीच त्याला हो म्हणेल , तिच्याकडे दूसरा पर्यायच उरणार नाही ... काय ...? कशी आहे आयडिया ...? " सावंत सगळ्यांकडे पाहत म्हणाले .
" येस ... एकदम भारी आहे आयडिया ..." मी उत्साहाच्या भरात म्हणालो . मला त्यांची आयडिया खरोखर आवडली .
" पण मला एक शंका आहे ....जर एवढं करुन पण ती नाय म्हणाली तर ? शरद खरंच गाडीखाली जीव देणार ? " भडकमकरांनी मधेच शंका काढली . हे म्हणजे शुभ बोल नाऱ्या तर घर पेटलं असं झालं .

" नाही .... त्याचा पण मी थोडा विचार केलाय ... माझा एक मित्र आहे रेल्वे सुरक्षा बलात ... त्याला सांगून ठेवलंय ... जर ती उद्या नाहीच म्हणाली आणि शरदला गाडी खाली जीव द्यायचीच पाळी आली तर लगेच तो माझा मित्र येईल , त्याला बाजूला घेईल ... आणि त्याला अटक करायचं नाटक करुन त्याला घेऊन जाईल ... त्यामुळे शरद डोंट वरी ...! तू खरंच मरणार नाहीस ... " सावंत त्याला डोळा मारत म्हणाले . सावंतांनी खरोखर सर्व बाजूंचा विचार करुन प्लॅन बनवला होता . एवढं होईपर्यंत आमची नेहमीची गाडी प्लॅटफॉर्मला लागली ... गाडी प्लॅटफॉर्मला लागत असताना मोटरमन ने सावंतांकडे बघुन हात उंचावला . सावंतांनीही त्याला प्रतिसाद दिला . सगळे मग सावंतांकडे एकदम भक्तिभावाने पाहू लागले . उद्याचा प्लॅन नक्की यशस्वी होणार ही खात्री आता आमच्या ग्रुपच्या प्रत्येकाला झाली . गाडी थांबायच्या आत सगळ्यांनी तिच्यावर हल्ला चढवला. आज गाडीत चढताना एकदम वेगळंच वाटत होतं .... उद्या ह्याच गाडीखाली शरद आपला जीव देणार होता ...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users