गण्या

Submitted by बेफ़िकीर on 3 May, 2015 - 06:43

'शो अबाऊट नथिंग' म्हणून प्रख्यात असलेल्या साईनफिल्ड्सचे एपिसोड्स पाहताना मला माझ्या भूतकाळातील अनेक व्यक्तीमत्त्वे आठवत राहतात. ती व्यक्तीमत्त्वेही 'अबाऊट नथिंग' असायची आणि तरीही एकेकाळी ती 'एव्हरीथिंग'ही असायची. अश्या व्यक्तीमत्त्वांपैकी एक ठळक व्यक्तीमत्त्व म्हणजे 'गण्या'!

गण्याचा आणि माझा बालपण, पौगंडावस्था, खुल्या जगात स्वतंत्रपणे वावरणे आणि नोकरीचा आरंभ हा प्रवास बरोबरच झाला. आमच्यासहितच सोसायटीतील इतर दहा, बारा मुलेही ह्या प्रवासात सोबतीला होती. प्रत्येकाबरोबर माझे एक वेगळे नाते जडले. त्यातील काही मुले सहा, आठ वर्षांनी मोठी होती तर काही तीन, चार वर्षांनी लहान! माझ्याहून गण्या दोन वर्षांनी मोठा! आमच्या ह्या दोन वर्षांच्या अंतरात बसणारीच मी व गण्या सोडून चार मुले होती. माझ्यात आणि गण्यामध्ये काहीही साम्य नव्हते. माझ्यात आणि गण्यामध्ये काही नाते असण्याचा खरे तर प्रश्नही उद्भवत नव्हता इतकी आमच्यात तफावत होती. पण वर म्हंटल्याप्रमाणे ह्या सगळ्या मुलांबरोबर माझे 'प्रत्येकी एक वेगळे' असे नाते असल्यामुळे गण्याबरोबरही माझे नाते निर्माण झाले. इतर प्रत्येकावर तितकेच लिहिता येईल जितके गण्यावर! पण श्री गणेशा करण्यासाठी 'गणेश'पेक्षा कोण अधिक योग्य ठरणार?

'भूषण' हे नांव सार्थ होईल असे माझे त्याकाळातील वर्तन असे. शाळेत पहिल्या तीन क्रमांकात! कला, स्पर्धा ह्या गोष्टींंमध्ये अग्रेसर! पालकांनी आपल्या मुलाला येताजाता उदाहरण द्यावे असा मी होतो तेव्हा! द्यावे काय, द्यायचेच पालक माझे उदाहरण!

पण त्याला जमाना झाला आता! गण्या माझ्यामुळे सुधारला नाही. मी गण्यामुळे बिघडलो नाही. फक्त दोन रेषा मधेमधे एकमेकांना भिडत राहिल्या. आपापले स्वत्व जपत राहिल्या. काहीवेळा ते भिडणे इतके तीव्र झाले की स्वत्व काही काळासाठी हरवून गेले. पश्चात्ताप झाला. पुन्हा स्वत्व प्राप्त केले. पुन्हा भिडणे होत राहिले. शेवटी एक असे अंतर पडले की आता बावीस वर्षे झाली पण ही व्यक्ती मला दिसलेलीही नाही. माझ्या लग्नात असलेला सोसायटीतील सर्व मुलांच्या ग्रूपमधील त्याचा फोटो ही एकमेव आठवण आता माझ्याकडे आहे.

मला वाटते की खरे नाते ते जे अस्तित्त्वात असते तेव्हा अत्यंत तीव्र असते आणि अस्तित्त्वहीन होते तेव्हा कोणीही कोणाला मिस करत नाही.

माझे आणि गण्याचे नाते तसेच!

आम्ही दोघेही कधीही एकमेकांचे जिवाभावाचे मित्र नव्हतो. आम्ही फक्त एकमेकांची सोय होतो. कॉलेजमध्ये असताना मला मिळत असलेला बराचसा रिकामा वेळ आणि फक्त रिकामा वेळ हे एकच भांडवल असलेला गण्या हा त्या सोयीचा पाया होता. इतर मित्र उद्योगात असत तेव्हा आम्ही दोघे संध्याकाळी तीन, तीन तास एकत्र भटकत असू. कधी सोसायटीत तर कधी बाहेर. आमची सोसायटीच अजस्त्र होती, सहा इमारती होत्या. म्हणजे आहेत अजूनही!

गण्याची पहिली ओळख अगदीच लहानपणी झाली. मी असेन तेव्हा दुसरी तिसरीत! गण्या कोणाच्या खिजगणतीतही नसे तेव्हा! त्याच्या वडिलांचा कसलासा व्यवसाय होता, बहुधा वखार असावी. दोन मोठ्या बहिणी, आई आणि वडील असे ते राहात असत. गण्याचे अभ्यासात लक्ष नसे व बहुधा त्याचे लक्ष आहे की नाही ह्याकडे त्याच्या घरातल्यांचेही! माणूस नापास होऊच कसा शकतो असे निरागस प्रश्न जेव्हा मला पडत असत तेव्हा गण्या निवांत त्याच यत्तेत पुन्हा बसत असे. बहुतांशी वेळ गण्या सोसायटीत एकटाच फिरत असे. त्या वयातही! कायम दोन्ही हात कोपरात पूर्ण वाकवून दोन्ही पंजे स्वतःच्या छातीवर रेललेले! एका भित्र्या मुलाची अचूक देहबोली होती ती! 'गण्या रडला' ही बातमी नसे. गण्या नाही रडला, अशी बातमी असू शकत असे. गण्याला कोणीही छळायचे. त्याला टप्पल मारणे, त्याच्यावर जोरात ओरडणे असे काहीही केले की तो रडू लागायचा. नजरेत बावळटपणाची झाक असायची त्याच्या! कायम असुरक्षित वाटत असे बहुधा त्याला.

घरातील एकमेव पुरुष व्यवसायानिमित्त बहुतांशी काळ घराबाहेर काढत असेल आणि इतर सर्व सदस्य जर स्त्रिया असतील तर लहान मूलही अनेकदा मुलींचेच मॅनरिझम्स उचलते, तसे काहीसे गण्याचे झालेले होते.

गण्याचे रडणे अगदी मनापासून असायचे. मला तो रडताना पाहताना फार आवडायचा. म्हणजे त्याच्या नशिबात रडणे यावे असली माझी अमानवी इच्छा नव्हती. पण गण्या अगदी साग्रसंगीत रडत असे. पुतळ्यासारखा उभा राही. दोन्ही हात कोपरात वाकवून पंजे स्वतःच्या छातीवर रेललेले असत. मान थोडीशी खाली झुकलेली! डोळ्यातून अश्रू वाहात आहेत. आणि सुरेल भोकाड पसरलेले आहे. प्रत्येक हुंदक्याबरोबर मान नर्तिकेसारखी डुलत असे.

रडायलाही हिम्मत लागते. इतकेच नाही तर अगदी मनमोकळेपणाने आणि देहबोली रडण्यासाठी समर्पक करून सर्वांसमक्ष रडायला तर फारच हिम्मत लागते. मी रडणार्‍या गण्याकडे रिकाम्या नजरेने पाहात बसत असे. मला त्याची कीवही येत नसे आणि रागही! कारण मला असे वाटत असे की तो किती छान रडतो. त्याकाळी रडू येणे मला अपमानास्पद वाटत असे. हल्ली हसू येणे अपमानास्पद वाटते. पण गण्या त्याच्या दु:खाचा अगदी स्वच्छ निचरा होईस्तोवर रडत असे. एखादा राग आळवल्यासारखा!

एकदा आई बाहेर गेली होती. ती घरी आल्यावर म्हणाली की आज मी गणेशला बोलले. गणेश रस्त्यावर पडलेले एक अर्धवट सफरचंद उचलून खाऊ लागला. ते खराबही झालेले होते आणि रस्त्यावर पडलेले असल्याने धूळही लागलेली होती. मी त्याला सांगितले की गणेश सफरचंद ताबडतोब खाली टाक. त्याने आईची दरडावणी दोन तीनदा ऐकल्यानंतर मगच ते खाली टाकले. आई म्हणाली की तो ते टाकत नव्हता म्हणून मी त्याला ओरडले तेव्हा त्याने ते टाकले.

मी आणि गणेश दोघेही लहान होतो. आईने सांगितलेला हा प्रसंग ऐकून माझ्या मनात अनेक विचार आले. आपली आई त्याला कशी बोलली? ते त्याने का ऐकले? आपण तर आपली आई काही म्हणाली की ते न ऐकण्याची हिम्मतही करू शकत नाही. मग गणेशने ते सफरचंद टाकायला इतका वेळ कसा काय लावला असेल? त्याला अशी भीती वाटली नसेल का की आपली आई त्याच्या आईकडे तक्रार करेल? त्याला त्याची आई का अश्या गोष्टी सांगत नसेल? सांगत असली आणि गण्या ऐकत नसला तर गण्याकडे ही हिम्मत कशी काय असेल? की त्याला न ऐकण्याची काहीच शिक्षा मिळत नसेल म्हणून तो हिम्मतीने वागू शकत असेल?

हे सगळे तेव्हाचे भाबडे प्रश्न खरे तर संस्कार आणि शिक्षणाबाबतची आस्था ह्या संदर्भातील होते. हे आता समजते. पण तेव्हा मला गणेशबद्दल तिरस्कार वाटला होता. घरात खायला मिळत नाही की काय ह्याला? असा रस्त्यावरच्या गोष्टी का खातो हा? घाणेरडा! नंतर मला वाईटही वाटले. कसेही असले तरी गण्याला एक फळ मिळालेले होते. आपल्या आईमुळे त्याला ते खाता आले नाही. कदाचित त्याला भूक लागली असेल. कदाचित ते खूप गरीब असतील आणि गण्याला खायला मिळत नसेल.

क्रिकेट खेळायला गण्या आला की गपचूप मिळेल ती भूमिका निभावायचा. त्याला बॅटिंग जमायची नाही. एक दोन बॉलमध्ये आऊट व्हायचा. इमानदारीत फिल्डिंगला उभा राहायचा.

पण हा गण्या फार टिकला नाही.

आयुष्याच्या वास्तवाने, वाढत्या वयाबरोबर होऊ लागलेल्या इच्छांमुळे आणि घरदार असूनही रानटी रोपाप्रमाणे मानसिक वाढ होत असल्यामुळे गण्या अचानक झपाट्याने बदलू लागला. अगदी अचानक! हा झपाटा विलक्षणच होता.

हा एक असा टप्पा होता ज्यावर माझ्यामते गण्या वाया जाऊ लागलेला होता. आता त्याच्यात आणि माझ्यात काहीही कॉमन राहिलेले नव्हते. आमच्या रेषा एकमेकांना भिडणे तर राहोच, एकमेकांच्या जणू गोलार्धातही नव्हत्या.

कुठूनतरी गण्याकडे पैसे आलेले असत आणि तो वयाच्या बाराव्या वगैरे वर्षीच पिक्चर पाहू लागला होता. पिक्चर कुठले? तर कातिलोंके कातिल, धरमवीर, बच्चनचे एकापाठोपाठ येणारे पिक्चर्स!

गण्या पिक्चर पाहू लागला आणि सोसायटीतील मुलांच्या ग्रूपमध्ये अचानक त्याची पॉप्युलॅरिटी वाढली. कारण? कारण फार मजेशीर होते. गण्या पिक्चरची स्टोरी सगळ्यांना सांगत असे. जिन्यातल्या पायर्‍यांवर सहा सात जण बसत. गण्या एकदम ट्रान्समध्ये जाई! 'पहिल्या स्टार्टिंगलाच' अशी तो सुरुवात करत असे.

पिक्चर पाहणे आणि हॉटेलमध्ये जाणे ही दोन महापापे आहेत ह्या विचारांचे थर आमच्या मनावर जेव्हा घट्ट बसलेले होते तेव्हा गण्याने सर्व नवे पिक्चर पाहिलेले असत. गण्याच्या त्या स्टोरी सांगण्यात नायिकेबाबत काहीही नसे. म्हणजे फार तर इतकेच की 'परवीन बाबीला तो व्हीलन धरतो, की लागलीच मागून बच्चन' ढ्ह्रँठ्रँ!

त्या बिचार्‍या नायिकेला पिक्चरच्या दिग्दर्शकानेही थोडासा तरी वाव दिला असेल पण गण्या तिला सर्व हक्क नाकारायचा. केवळ बच्चन, धर्मेंद्र, विनोद खन्ना ह्यांना आणखीन एक मारामारी करता यावी म्हणून ह्या नटमोगर्‍या चित्रपटात भरलेल्या असत्यात असे त्याचे गृहीतक असावे बहुधा!

तसेही ह्या नायिकांना व्हीलन का धरतात असे प्रश्न पडण्याचे माझ्यासकट आमच्यातील काहींचे वयच नव्हते. मला स्वतःलाही परवीन बाबी, झीनत अमान व इतर कित्येकींमधील फरकही समजायचा नाही.

ह्या वेळपर्यंत गण्याचे सुरेल व हुकुमी रडणे पूर्ण थांबलेले होते. आता त्याला त्याच्यातील सुप्त कलेची जाणीव झाली होती. आपण इतरांचे मनोरंजन करू शकतो हे त्याला समजलेले होते. गण्यामध्ये एक जन्मजात व्यावसायिक होता. हा व्यावसायिक त्याच्यात निर्माण होण्याचे कारणही बहुधा हेच होते की गण्याला सरळपणे काहीच मिळालेले नव्हते. संस्कार, प्रेम, शिक्षा, जेवण वगैरे काहीच! त्यामुळे आपल्याकडे आहे ते जगाला देऊन त्या बदल्यात जगाकडून आपल्या गरजा भागवून घ्यायच्या हे गणित त्याच्या मनात पक्के भिनलेले होते.

आता गण्या सोसायटीतून फिरताना किंचित तोर्‍यात फिरत असे. छातीवर रेलणारे पंजे आता चड्डीच्या खिशांत राहात होते. शोधक नजर पाताळ आणि सगळंच धुंडाळत भिरभिरत असे. गण्याला कोणत्याही गोष्टीतून आपला काय फायदा होऊ शकेल ह्याचे बाळकडू ह्या त्याच्यातील सुप्त कलेच्या आविष्काराने पाजले बहुधा!

'चड्डीच्या खिशात हात घालून काय करतोस रे गण्या' ह्या मोठ्या मुलांनी विचारलेल्या प्रश्नावर किंचित लाजरे पण बहुतांशी खोखो असे हसत गण्या तात्पुरते हात बाहेर काढत असे. मग मुलेही हसत. एक दिवस एका मोठ्या मुलाने गण्याला विचारले. घरात काय घालतोस खाली? त्यावर गण्या म्हणाला लेंगा! तो मुलगा म्हणाला, लुंगी नेसत जा, लुंगीत मजा असते. गण्या खो खो हसला.

सोसायटीच्या मागे ग्राऊंड होते. तेथे आधी फारच मोठी असलेली मुले खेळत. त्यांचे संसार सुरू होऊन त्यांच्या खेळांचे प्रकार बदलल्यानंतर ते ग्राऊंड आम्ही खेळण्यासाठी वापरायला सुरुवात केली. हे ग्राऊंड म्हणजे माझ्या आयुष्यातील एक पात्र आहे. काय नाही शिकलो मी त्या ग्राऊंडवर! आता तिथे एक इमारत आहे. आता म्हणजे, ती इमारत बांधूनही आता पंचवीस एक वर्षे झाली आहेत.

त्या ग्राऊंडवर क्रिकेटच्या मॅचेस संपण्याची एक ठरलेली वेळ होती. दगडी बॉल अंधारामुळे दिसेनासा झाला की थांबायचे. ह्या नियमाला एक अपवादही होता. आजूबाजूच्या सोसायट्यांपैकी एखादी काच त्या बॉलने फुटली तर क्रिकेट तात्काळ थांबायचे. पण अंधार झाल्यावर एका झाडाखाली गण्याचे कथाकथन सुरू होत असे. ह्या कथाकथनाला मात्र आता आमच्यापेक्षा मोठी मुलेही बसत असत. ते गण्याची खेचत असत. कोणत्या तरी अनामिक सुखद उस्तुकतेच्या हव्यासापायी गण्या ते पिळून घेणे आवडून घेत असे. त्या मोठ्या मुलांच्या गप्पांमध्ये एकदाही सोसायटीतील एकाही मुलीचा विषय निघाला नाही हे मी शपथेवर सांगू शकतो. पण प्रत्येकाच्या वर्गातील किंवा आजूबाजूच्या सोसायट्यांमधील काही चिकण्या मुलींचे विषय हमखास निघायचे. इतकेच काय तर सोसायटीतील काही अश्या बायकांचाही विषय निघायचा ज्यांची मुले अगदीच कुकुली होती किंवा ज्यांचा सोसायटीतील कोणाशीही काहीही संबंध नव्हता. तर आम्ही लहान मुले एकमेकांकडे हसून बघत आणि गप्प राहून त्या गप्पा ऐकत असू. पण गण्या? गण्या म्हणजे गण्याच!

आमच्याच वयाचा असूनही गण्या अचानकच जरा पुढे पोचला होता. कसा काय ते माहीत नाही. त्याने एकदा त्याचे कातरवेळेचे कथाकथन संपल्यानंतर 'फक्त प्रौढांसाठी' सुरू असलेल्या व बाळगोपाळांची झुंबड उडालेल्या गप्पांमध्ये डायरेक्ट एका मोठ्या मुलाला सांगितले.

"ती राठी बाई कुंड्यांना पाणी घालायला खाली वाकली ना, की हे एवढाल्ले गोळे दिसतात तिचे"

एकच सन्नाटा! राठीबाईचे कुठून, कोणत्या वेळी, काय करताना, काय दिसते हे तेथील सर्व मोठ्या मुलांना माहीत होते. पण हे वाक्य गण्या बकला होता. अचानक मोठा हशा झाला. आम्ही काही समवयस्क मुले गण्याकडे नवलाने पाहात जोरजोरात हासलो. एकंदरीत आम्हीही मोठे झालेलो होतो हे लक्षात आले.

आता गण्याच्या कारकीर्दीला पंख फुटले. भरारीची तयारी सुरू झाली. अचानकच गण्या आता नित्यनेमाने मोठ्या मुलांमध्ये वावरू लागला. आम्ही अगदी सहज, अलगदपणे मोठ्या मुलांमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलो.

आता सगळ्या गप्पाच वेगळ्या असत. बो डेरेक हा विषय अनंतवेळा चर्चेत येत असे. मिसरूडही न फुटल्यामुळे आम्ही तो टारझन पिक्चर नुसता पोस्टर्स पाहून कसा असेल ह्याची कल्पना करत असू. पण गण्याने तो तीनदा पाहिला होता. कसा? तर त्याने थेटरच्या तिकीट तपासनीसाला दरवेळी एक चहा पाजला होता.

सोसायटीतील गणेशोत्सव, खरे तर एकुणच गणेशोत्सव म्हणजे रात्रभर भटकण्याची सुवर्णसंधी! सगळाच ग्रूप रात्री जेवून खाऊन नऊ वाजता खाली भेटत असे. मग तंगडतोड करत पुण्यातील नाही नाही ते भाग बघून यायचे. मात्र गण्या आता धीट झाला होता. नेम धरून एखाद्या मुलीला किंवा महिलेला धक्का मारू लागला होता. पुढे आल्यावर हसत हसत इतरांना ते सांगू लागला होता. मोठी मुले हसत असत. आम्ही 'हे ऐकलंच नाही' असे चेहरे करून पुढे जात राहू. गण्या दिसायला लहानग्यातच मोडत असल्यामुळे त्या बायकापोरी नुसते भडकून त्याच्याकडे बघण्याशिवाय काही करत नसत. पण हे सगळे होत असताना गण्याचे व्यक्तीमत्त्व विचित्र बनत चालले होते. मी एकदा त्याला विचारलेही! काय रे, एखाद्या पोरीने तुला खडसावले तर काय करशील? तर म्हणाला 'आई घाल म्हणून सांगेन! इतक्या गर्दीत धक्का लागणारच की? अन् वर म्हणणार तुझ्या अंगाला काय सोनं लागलंय काय?'! त्याची ती बदललेली भाषा मला डिस्टर्ब करत नव्हती तर त्याने समर्थन तयार ठेवलेले आहे हे अधिक डिस्टर्ब करत होते.

शाळेतून बसने येताना गण्या बायकांना स्पर्श करू लागला. त्याबद्दलही विचारले तेव्हा म्हणाला. 'कोणी विचारलं तर म्हणायचं, एवढं असेल तर रिक्षा करून जात जा, बसच्या गर्दीत यायचं कशाला?'

गण्याच्या ह्या अश्या वर्तनामुळे पुन्हा एकदा आमच्या रेषा एकमेकांपासून लांब गेल्या. आता माझ्यामते तो वयाला न शोभणारी कृत्ये करून वाया गेलेला होता.

पण गण्याच्या आयुष्याने किती वेळा करवट बदलली हे पुढे येणारच आहे. थक्क करणारे व्यक्तीमत्त्व होते ते!

गोट्या खेळण्याची क्रेझ आली सोसायटीत! प्रत्येकाकडे चाळीस चाळीस गोट्या! क्रिकेट आणि व्हॉलीबॉल सोडून मुलं आता गोट्या खेळू लागली. मला आणि माझ्या काही समवयस्क व समसंस्कारितांना काही तो खेळ रुचेना! आम्ही मग एकमेकांशी खेळू लागलो किंवा नुसतेच इतरांचे निरिक्षण करू लागलो.

गण्या नापास होत राहिलेला होता. तो आता मनोरंजन करणारा म्हणून असलेल्या त्याच्या ख्यातीपासूनही ढळला होता. आता मोठ्या मुलांच्या मतेही तो वाया जाऊ लागला होता. काहीच कामाचा नव्हता. पण गण्या गोट्या खेळायला आला. मी डोळ्यांनी हा प्रसंग तीन वेळा पाहिलेला आहे. सगळ्यांच्या सगळ्याच्या सगळ्या गोट्या जमीनीवर इतस्ततः विखुरलेल्या आहेत. 'बच्चा' की काय म्हणतात तोही सापडलेला आहे. शेवटची गोटी गण्याने टाकायची आहे. गण्याने नियमाप्रमाणे सगळ्यांना 'तो कोणती गोटी उडवणार' हे सांगितलेले आहे. जमीनीवरच्या साठ सत्तर गोट्यांपैकी एकाच गोटीवर गण्याने नेम धरलेला आहे. आणि सुनसान शांतता प्रस्थापित झालेली आहे. किमान चोवीस डोळे त्या गोटीवर केंद्रीत झालेले आहेत. आणि गण्याच्या हातातून सुटलेली गोटी? ती गोटी ठरलेल्या गोटीवर थेट जाऊन पडलेली आहे.

डोक्याला हात लावून पोरे बाजूला होत असत. जुगारात सर्वस्व हरावे तसे सगळेजण भकासपणे त्या गोट्यांच्या अद्भुत साठ्याकडे बघत बसत. बैल उधळावा तसा गण्या त्या परिसरात उधळत प्रत्येकाला त्या गोट्यांपासून दूर करत असे. चड्डीचे तीनही आणि शर्टचा एक असे सगळे खिसे गोट्यांनी भरून घेत असे. वर पुन्हा दोन्ही मुठीत गोट्या असतच. आणि अश्या आवेशातील गण्या 'आपल्यावर आता हल्ला होऊ शकेल' असे काहीतरी वाटल्याप्रमाणे तेथून धावत घरी निघून जात असे.

गण्याने 'गोट्या' ह्या एका खेळात सोसायटीतील तमाम पब्लिकला किमान तीनवेळा कफल्लक, कंगाल बनवलेले होते.

ह्या गण्यातही आणखी फरक पडला. ह्यावेळचा फरक तर महाभीषण होता. आत्तापर्यंत एक वाया जात असलेला, बारकुडा आणि निरुद्योगी पोरगा आता आमुलाग्र बदलला. गण्या सुट्टीत कोणत्यातरी गावी गेला. तिथे त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला कोणीतरी तालमीत घातले. प्रचंड वैतागलेल्या पण घाबरलेल्या गण्याने व्यायामाला सुरुवात केली. जोर आणि बैठका! वर ग्रामस्थांकडे कुठे ना कुठे मटण असले तर ह्यालाही थोडे दिले जात असे. मग ह्याला चटकच लागली. व्यायामामुळे पडत असलेला फरक बहुधा त्याच्या लक्षात आला.

सुमारे चार महिन्यांनी गण्याचे पुनरागमन झाले तेव्हा गण्याला पाहून आमची शुद्ध हरपायची वेळ आली. हे असले भरलेले खांदे, टणक छाती, सुदृढतेमुळे चेहर्‍यावर आलेला एक उद्दाम आत्मविश्वास किंवा खुन्नस! आणि गण्या तर प्रत्येकाला अगदी गळामिठी मारत होता.

गण्याच्या अंगात अमानुष ताकद आली होती. एकदा ट्रॅफीक ब्लॉकमध्ये गण्या अडकला तेव्हा त्याने दोन्ही हातात आपली सायकल डोक्यावर उचलली आणि ट्रॅफीकमधून वाट काढून घरी आला. तस्सा! पब्लिक बघतच बसले. पण गण्याची ताकद त्याहीपेक्षा कितीतरी अधिक होती.

आता आमच्या ग्रूपमध्ये एक वेगळी क्रेझ निर्माण झाली. कोणाच्यातरी घरी व्हीसीआर आणायचा. दोन बरे हिंदी पिक्चर आणायचे. सामसूम झाली की ते ठेवायचे बाजूला आणि तीन खास ब्ल्यू फिल्म्स लावायच्या. घरी कोणी असले तर हे असे! घरचे कोणीच घरात नसले तर सुरुवातच ब्ल्यू फिल्मने! आम्ही सगळेजण ह्या फिल्म्स बघताना प्रथम अचंबीत होणे, मग कुतुहल शमणे, मग स्वारस्यही संपणे, मग गप्पा सुरू होणे ह्याच पातळ्यांमधून जात होतो. पण गण्या? तो एकटक त्या फिल्म्स अबोलपणे बघत असे. गप्पांमध्ये तो सहभागी होत नसे. ते कोणाच्या धड लक्षातही येत नसे. हे सगळे करत असताना बीअर आणि व्हिस्कीचीही चटक ग्रूपला लागली होती. ब्ल्यू फिल्मसारखा तद्दन फालतू प्रकार दुसरा नाही हे फार लवकरच लक्षात आले. तोही छंद मागे पडला.

आता नवीनच प्रकार सुरू झाला. शिक्षणात काहीही गती नसलेला, नववीपलीकडे पोचू शकत नसलेला गण्या आता चांगला अठरा एक वर्षांचा झाला होता. तसाच सोसायटीत आणि बाहेर भटक असे. त्याचे आणि त्याच्या वडिलांचे पटणे शक्यच नव्हते. हौसानवसाने झालेला मुलगा वाया गेला आणि व्यवसायही धड चालत नसला तर वडिलांनी तरी काय करावे? मोठ्या बहिणीचे लग्न झालेले होते. दोन नंबरची बहिण आता लग्नाची होती. लहान गण्याही आता मोठा झालेला होता. पण घराला आर्थिक आधार देणे दूरच, पैसे काढता कसे येतील हे बघत होता.

शेवटी गण्याला एक अत्यंत नवखा मार्ग सापडला. त्यावेळी म्हात्रे पूल नवा नवा होता. दोन सलग वर्षे तो पूल खचल्यानंतर तिसर्‍या वर्षापासून त्यावर तुरळक वाहतून सुरू झाली होती. पण १९८८ च्या सुमारास मात्र त्यावरून तुडुंब वाहतूक वाहू लागली. आमच्या घराची गॅलरी रस्त्यावरच येत असे. रोज, अक्षरशः रोज सायंकाळी पाच ते साडे सात त्या रस्त्यावर ट्रॅफीक ब्लॉक होऊ लागले. म्हात्रे पूल ते नळस्टॉप आणि पटवर्धन बाग ते नदी असे सर्वत्र नुसते ब्लॉकच ब्लॉक! काहीही हलत नसे. दोन दोन पोलिस येऊनही काही फरक पडत नसे. एकदा गण्या असाच सोसायटीच्या गेटपाशी उभा राहून तो वाहतुक मुरंबा अनुभवून मजा लुटत होता. अचानक त्याने कोणालातरी 'ओ, इकडून जाऊ द्या, लवकर निघाल' असा सल्ला दिला आणि ऐकणार्‍यानेही तो ऐकला. ऐकणार्‍यानेच नव्हे तर मागच्या दहावीस जणांनी तो सल्ला ऐकला. गण्याला स्वतःतील आणखी एका पैलूचा साक्षात्कार झाला. गण्याने चक्क गर्दीत मुसंडी मारून गर्दीचे एक अंगच खिळखिळे केले. अनेक बसलेली बुचे सोडवली गेली. गण्याची बॉडी खणखणीत झालेली होती. हेअरकटही अगदी जेमतेम केस असणारा होता. नजर करारी होती. देहबोली भन्नाट होती. तो अगदी लहानसा पण साध्या वेषातील पोलिस वाटू लागला लोकांना! परिणाम असा झाला की लोक त्याचे ऐकू लागले. लोक कोणत्यातरी कारणाने आपले ऐकतात ह्याचे अप्रूप वाटून गण्याने ते स्वतःचे जीवितकार्यच बनवून टाकले.

आता दररोज संध्याकाळी चार वाजता गण्या गेटपाशी येऊ लागला. वाहतुक खोळंबेपर्यंत थांबू लागला. एकदा का सगळीकडून बुचे बसली की बाजीप्रभूच्या आवेशात गण्या गर्दीत घुसायचा. कुठूनशी त्याने एक शिट्टीही पैदा केलेली होती. गण्या युद्धाचा शंख फुंकल्यासारखा शिट्टी फुंकत आणि हातवारे करत गर्दीतून नुसता बेभानपणे थडाथड उडत राहायचा. ह्या कामासाठी तो नळस्टॉप ते म्हात्रे पूल ह्या पट्ट्यात कुठेही पोचायचा. त्याला ते काम दारूसारखे चढायचे अक्षरशः! लोक गण्या म्हणेल तिकडे वाहन घेऊन धावत सुटायचे. तो थांब म्हणाला की थांबायचे. गण्याच्या अंगात एखादा सैतान घुसलेला असायचा. गण्याचे डोळे आग ओकत असायचे. छातीचा भाता शिट्टी फुंकून फुंकून वरखाली होत असायचा. साडे सात वाजता गण्या निपचीत व्हायचा. तेव्हा आलेल्या ट्रॅफीक पोलिसाबरोबर मग तो अर्धा पाऊण तास गप्पा मारायचा.

आम्हाला वाटायचे की गण्या बावळटासारखे हे काय करतो. नंतर त्याचे कौतुकही वाटायचे. असेही वाटायचे की ही एक प्रकारची समाजसेवाच आहे. पण एक दिवस गण्यानेच मला सांगितले. हे काम करण्याचे पोलिसांकडून थोडे पैसे मिळतात. पैसे मिळतात ही बातमी पसरली तशी झोपडपट्टीतील मुले शिट्ट्या घेऊन गर्दीत अवतरली. चार दिवस त्याही मुलांनी पराक्रम केला आणि पाचव्या दिवशी गण्याची गचांडी धरली.

"भडव्या, आम्ही ट्रॅफिक सोडवतो अन् पैसे तू एकटाच घेणार होय?"

इतका भयानक गण्या, पण तोही घाबरला. त्याने थोडे पैसे वाटले. दुसर्‍या दिवसापासून मात्र ती मुले येईनाशी झाली. बहुधा त्यांना 'श्रम टू मोबदला' हा रेशिओ मान्य नसावा. पण गण्याने काम सोडले नाही.

मात्र एक झाले. ह्या दरम्यान माझी आणि त्याची रेष एकमेकींना पुन्हा भिडल्या. ह्यावेळी मात्र जबरदस्त भिडल्या. माझे कॉलेज सकाळचे असल्याने मला प्रचंड वेळ मिळत असे. सोसायटीतील आम्ही दोघे तिघेच इंजिनिअरिंगला असल्यामुळे आमच्या सुट्ट्यांचा कालावधीही इतरांपेक्षा वेगळा असे. मोठी मुले नोकरीला लागलेली होती. त्यामुळे मला गण्या आणि गण्याला मी असे समीकरण जवळपास दिड वर्षे पक्के झाले होते.

काय नाही झाले त्या दिड वर्षात!

एकदा वीर्यपतन झाले की पुन्हा वीर्य निर्माण होत नाही हा गैरसमज असल्याचे उभयपक्षी मान्य झाले. सोसायटीच्या वॉचमनच्या सगळ्यात धाकट्या मुलाला सोसायटीतील काही मोठी मुले घरी बोलावून दोन दोन रुपये देऊन त्याच्याशी विकृत संभोग करतात हे ज्ञान मिळाले. एक दोन मुले दररोज चार चार वेळा हस्तमैथुन करतात हे समजले. ताक प्यायल्याने कामेच्छा वाढते हे ज्ञानामृत मिळाले. मल्याळी पिक्चरमध्ये काहीही दाखवत नाहीत हे समजले. गण्याकडे कोण कोण आंटी 'त्या' अर्थाने बघतात हे लक्षात आले.

वगैरे वगैरे!

द मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स!

ह्या उक्तीनुसार गण्याची प्रतिमा सुधारण्याऐवजी माझी बिघडू लागली. आम्ही दोघे बरेचदा इकडेतिकडे दिसत असल्यामुळे सोसायटीतील लोकांना आता मीही वाया गेलो असणार ह्याची खात्री वाटू लागली.

त्या कालावधीत गण्याच्या खाजगी आयुष्याशी मात्र भलताच परिचय झाला माझा. गण्याचे आणि त्याच्या वडिलांचे पारच फाटलेले होते. आता तेही व्यवसाय सोडून घरी बसत होते. मधल्या बहिणीचे लग्नही झालेले होते. त्यांच्याकडे एकेकाळची एक लुना होती. त्या लुनामध्ये काहीही ओरिजिनल राहिलेले नसावे.

गण्या रोज संध्याकाळी दहा वेळा तरी 'माझा बाप चांगला असता ना भुषण्या तर मी लय काय काय केलं असतं' असं म्हणायचा! गण्या आता अगदी मोठ्या माणसासारखा वागू लागला होता. पोलिसांशी येताजाता गप्पा मारू लागला होता. पोलिस कोणत्याही बसला एक विशिष्ट खुण करून थांबवतात व तशी खुण पाहिली की बस ड्रायव्हर बस थांबवतोच हे गण्याला माहीत झालेले होते. त्याने ती खुण शिकून घेतली. एके रात्री दहा वाजता त्याने मला तो प्रयोग चक्क चक्क करून दाखवला. टेल्कोची एक सेकंड शिफ्टची बस आमच्या घरासमोरून जात असताना गण्याने ती खुण करून ती बस थांबवली. नंतर त्याने ड्रायव्हरला काहीतरी खोटे सांगितले की 'मला इकडे जायचंय, तिकडे नाही' वगैरे! ड्रायव्हर ओके म्हणून सलाम करून निघून गेला. मी थक्क झालो. हे असे तर कोणीही कुठेही जाऊ शकेल म्हणालो. गण्या 'अभी तुने देखा क्या है बच्चे' स्टाईलमध्ये हसला.

एक दिवस गण्या म्हणाला की तो आता बुधवारात जाऊ लागला आहे. मी त्याला अनुभव विचारला. तर म्हणाला की त्या बायका फार लुटू पाहतात. वर पुन्हा हवे तसे करत नाहीत. अश्या बायकांशी गुळमुळीत वागून चालत नाही. त्यांना जरा दमात घ्यावे लागते. मऊपणा दाखवलात तर गेलातच बाराच्या भावात!

माझ्यासाठी हे सगळे अद्भुत होते. पण गण्या खोटे मात्र बोलत नव्हता. एकदा तिथली एक बाई त्याच्या मागेमागे चालत मंडईपर्यंत आली होती. मग गण्याने म्हणे तिला सगळ्यांदेखत धमकावले वगैरे होते. तो हे सगळे खरे सांगत होता हे मला इतर मोठी मुले सांगत असत. त्यांनी त्याला असे काही करू नकोस असेही सांगितले होते आणि तिकडे जाताना पाहिलेलेही होते.

एक दिवस गण्याने मला संध्याकाळी दोन समोसे खिलवले. मी विचारले काय रे, आज एकदम खिसा गरम?

म्हणाला, "लुना विकली"!

मी चाट पडलो.

"विकली म्हणजे?"

"एक जण गाठला आणि त्याला विकली"

"अरे पण कागदपत्रे?"

"कसली घंट्याची कागदपत्रे?"

"केवढ्याला विकलीस?"

"आठशे"

"पण आता तुझ्या बापाला काय सांगणारेस? सॉरी, बाप म्हणालो चुकून"

"अरे बापच म्हण! तो मादरचोद मला एक सायकल घेऊन देत नाही, त्याला कशाला ढुंगणाखाली लुना हवी मग?"

"अरे पण त्यांना सांगणार काय तू?"

"सांगितलं! चोरीला गेली म्हणून"

"मग?"

"मग काय? तो काय बोलतोय मला?"

फार वाईट वाटले. गण्याने असे करायला नको होते. गण्याने ते आठशे रुपये मनाला येतील तसे उधळले. सिग्नल वगैरे झाल्यामुळे आता ट्रॅफीक ब्लॉकही होत नव्हते. गण्याला आता पैसे कुठून मिळत असत काय माहीत.

अश्यातच त्याचे प्रेम बसले. कोणावर प्रेम बसावे? तर एका नवीन राहायला आलेल्या विवाहितेवर! ती आमच्यापेक्षा आठ दहा वर्षांनी मोठी होती. हा पागलच झाला. मला सल्ले विचारू लागला. मी एक मूर्ख! त्याला एकदोनदा सांगितले की असले काहीतरी विचार करू नकोस. पण नंतर थट्टेथट्टेत त्याला म्हणू लागलो, आज काय झालं रे, दिसली का, बोलली का वगैरे! तिला गण्याचा काहीही अंदाज नसल्याने ती आपली आरामात त्याच्याशी बोलायची वगैरे! तो निराळेच अर्थ काढून रात्र रात्र जागायचा. तिला बघण्यासाठी समोरच्या बिल्डिंगच्या गच्चीवर चढून बसायचा. आमच्या त्या सोसायटीच्या एकाही इमारतीच्या गच्चीला कठडाच नव्हता. पण प्रेमवीर गण्या अंधारात गच्चीवर बसून राहायचा.

हळूहळू तो मला सांगायला लागला. 'तिलाही वाटते रे माझ्याबद्दल! सारखी बघते आणि हसते. नवरा काही तिला खुष करत नसणार' वगैरे! मी एक बिनडोक, ह्या कश्यावरही अजिबात विश्वास नसतानाही गण्याशी त्या विषयावर बोलत राहायचो. गण्याला एक विश्वासू मित्र मिळाला होता एकतर्फी प्रेमाबाबत चर्चा करायला. अर्थात त्याच्यामते ते प्रेम दुतर्फी होते. मला निव्वळ वेळ असल्यामुळे मी गण्याचे ऐकत असे.

त्यातच गणेशोत्सव आला. संगीतखुर्ची स्पर्धा होणार म्हंटल्यावर आणि अख्खा गणेशोत्सव माझ्या आदेशानुसार चालणार हे समजल्यावर गण्याने माझी गचांडी धरली अन म्हणाला......

"भुषण्या, जेन्ट्समध्ये मी आणि लेडिजमध्ये ती जिंकायला पाहिजे संगीतखुर्चीत! ती रेकॉर्ड तुझ्या हातात ठेव स्पर्धेच्यावेळी"

इतके करणे मला नक्कीच शक्य होते. मी ते चक्क सत्यात उतरवले. पुरुषांमध्ये गण्या जिंकला, बायकांमध्ये ती!

नोटिस बोर्डवर लावे लागली.

'संगीतखुर्चीचे विजेते - गणेश आणि अलका'

आता कोणाचेही आडनांव नाही की काही नाही. प्रेमी युगुलांचे नांव लिहावे तसे लिहिले गेले होते. ती बया बहुधा भडकली. तिने ते कोणालातरी पुसायला लावले. मग हे प्रेमवीर संतापले. त्या दिवशी मात्र गण्याने डेंजर स्टेप घेतली.

डायरेक्ट तिच्या दारावर गेला भर दुपारी आणि बेल वाजवून उभा राहिला. तिने दार उघडल्यावर तिला म्हणाला......

"नोटिस का पुसली? आवडत नाही का माझ्या नावाबरोबर नांव लागणे? मग रोज बघते कशाला हसून?"

ती होती एक विवाहिता! ती वयाने गण्यापेक्षा किमान आठ वर्षांनी मोठी होती. असल्या मूर्ख अडचणी तिने आधीही सहजरीत्या पेललेल्या असाव्यात! ती अजिबात न घाबरता त्याला म्हणाली......

"शाळा नाहीये का तुला? असे एकदम कुणाचीही बेल वाजवत नाहीत. जा आई हाक मारेल"

गण्याचा पोपट झाला. त्यानेच संध्याकाळी सांगितले मला ते! कैक दिवस आमची घनघोर चर्चा झाली त्या विषयावर! पण गण्याने तो प्रेमभंग कसाबसा स्वीकारला. ती विवाहिताही नंतर जागा सोडून निघून गेली.

आणि मग, गण्याचे वडील गेले! थोरली बहिण गावाहून येणार म्हणून प्रेत ठेवले होते. ती उशीरा आली. गण्याच्या घरी भीषण आकांत चालला होता. बापाला मादरचोद, थेरडा, मढं असं काहीही बोलणारा गण्या गपचूप प्रेताजवळ बसला होता. त्याची नजर जिकडे लागली होती त्याला शून्य म्हणणे म्हणजेसुद्धा काहीतरी भरीव म्हंटल्यासारखे वाटावे. गण्याची ती नजर मला अनोळखी होती.

माझी कायमस्वरुपी नोकरी सुरू झाली. गण्याने दहावीचा एक शेवटचा पण यशस्वी अटेंप्ट केला. एक दोन वर्षांत त्यालाही एका बँकेत हलकी नोकरी लागली. आजही तो तिथेच आहे.

त्याचे वडील गेल्यानंतर आमच्या रेषा कशीच भिडल्या नाहीत. आजपर्यंत! पण कानावर बातम्या येत राहिल्या. गण्या खूप खूप सुधारला. लायनीवर आला. घरातल्या सगळ्यांना प्रेमाने वागवतो. त्याचे लग्न झाले. बायकोवर खूप प्रेम करतो. नोकरीत प्रगती होत आहे. एकही व्यसन नाही. म्हणजे 'राहिलेले' नाही.

आज हे लिहिताना असे वाटते की गण्यामध्ये तसे लिहिण्यासारखे काही नव्हतेच. व्यक्तीमत्त्व अबाऊट नथिंग!

पण तरीही काहीतरी नकळतपणे जाणवत राहते. कित्येकांच्या व्यावसायिक आयुष्याची सुरुवात अशी तकलादू होण्यामागे घरच्यांनी मनापासून संस्कार न करणे कारणीभूत असते. शिक्षणाबाबत आस्था जागृत करण्यातील अपयश आहे. जबाबदारीची जाणीव झाल्यावर माणूस कदाचित योग्य रस्त्यावर येतो असेही वाटते. माणूस ज्या कुटुंबियाचा सर्वाधिक रागराग करतो, कदाचित त्याच्यावरच त्याचे सर्वाधिक प्रेमही असते.

एकेकाळच्या सुरेल रडणार्‍या गण्याचा ह्या अफाट कायापालटाचा मी एक साक्षीदार!

गणेश कायम मनापासून जगला. मी कायम धाकात जगलो. त्याने सगळ्या वाईट गोष्टी त्या वयात केल्या ज्या वयात मी फक्त आणि फक्त करिअर पाहिले. पण आज तोही समाधानी आणि मीही! पण कोणत्यातरी अनामिक धाकाचे सावट मात्र माझ्या मनावर अजूनही आहे आणि गण्यासारखे मनापासून जगणे आपल्याला कधी जमलेच नाही ही एक खंतही!

मला रस्त्यावर पडलेले सफरचंद खायला मिळावे असे वाटत नाही. लुना विकून ऐष करावी असे वाटत नाही. पण मला असे वाटते की होत नसलेले संस्कार आणि जमत नसलेले शिक्षण ह्या भांडवलावर गण्याने जो काही प्रवास केला त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रवास मला जमायला हवा होता. किंवा मग, गण्याकडचे भांडवल माझ्याकडे असते तर मी गण्याइतका प्रवास करूच शकलो नसतो. केव्हाच समाजाच्या सर्वात तळाच्या स्तराला पोचलो असतो.

कोणत्यातरी अर्थाने, गण्या मला माझ्यापेक्षा सरसच वाटतो.

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर,

गण्याचा शब्दबद्ध केलेला प्रवास आवडला.

लेखातली ही वाक्ये महत्त्वाची वाटली.

>> पण तरीही काहीतरी नकळतपणे जाणवत राहते. कित्येकांच्या व्यावसायिक आयुष्याची सुरुवात अशी तकलादू
>> होण्यामागे घरच्यांनी मनापासून संस्कार न करणे कारणीभूत असते. शिक्षणाबाबत आस्था जागृत करण्यातील
>> अपयश आहे.

शिक्षण म्हणजे तरी काय असतं? व्यावसायिक जगात आत्मविश्वासाने पदार्पण करण्यासाठी पाया खणण्याची संधी? की माणसातल्या अनेकविध क्षमतांचा विकास करण्याचा सराव? उदरभरण म्हणा किंवा व्यक्तिमत्वविकास म्हणा दोन्ही कसोट्यांवर आजचं शिक्षण उतरत नाही. गण्याला शिक्षणाबद्दल त्यावेळी जितकी आस्था होती तितकीच तुम्हाला आत्ता आहे.

तुम्ही ज्याला अनामिक धाक म्हणता तो तुमच्या आयुष्याला वळण देणारा काठ आहे. असा काठ गण्याला सापडलाच नाही. स्वत:चं वळण स्वत:लाच द्यावं लागलं. याबाबत कदाचित तो तुम्हाला भाग्यवान समजत असेलही. जी तुमची खंत आहे ती त्याची हुकलेली संधी असू शकते, आणि जी त्याची खंत आहे ती तुमची संधी असू शकते.

आ.न.,
-गा.पै.

>>>उदरभरण म्हणा किंवा व्यक्तिमत्वविकास म्हणा दोन्ही कसोट्यांवर आजचं शिक्षण उतरत नाही.<<<

Sad खरे आहे गामा

>>>जी तुमची खंत आहे ती त्याची हुकलेली संधी असू शकते, आणि जी त्याची खंत आहे ती तुमची संधी असू शकते.<<<

सुंदर!

गामा, माझ्या कथा - कविता - ललितांकडे तटस्थपणे व अभ्यासूपणे पाहण्याच्या तुमच्या सवयीमुळे जरा लाजल्यासारखे होते.

धन्यवाद!

गण्याचा वाईटाकडुन चांगल्याकडे झालेला प्रवास छान मांडलाय.

एकाद्या वाममार्गाला लागलेल्या व्यक्तीला ताळ्यावर आणायला, एका जबरदस्त 'किकची' गरज असते असे म्हणतात, गण्याच्या बाबतीत म्हणायचे तर, त्याच्या वडिलांचा 'मृत्यु' हिच घटना त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी होती असे मला वाटते.

सोसायटीच्या वॉचमनच्या सगळ्यात धाकट्या मुलाला सोसायटीतील काही मोठी मुले घरी बोलावून दोन दोन रुपये देऊन त्याच्याशी विकृत संभोग करतात हे ज्ञान मिळाले. >>> फ़ारच बाळबोध प्रश्न - हे अस खरच होत?? धक्का बसलेली बाहुली)\
बाकी लेख छान झालय.

गण्याला जे काय धक्क्यावर धक्के द्यायचे ते त्याने त्याच्या आईला आणि २ बहिणींना देत बसावं .स्वताच्या घरात स्वताची आई घालावी . लोकांच्या आया बहिणी त्याची personal property आहे का ?
बेफ़िकीर , मला तुमचं लिखाण नेहमीच आवडत आलंय . पण आता मात्र तुमच्याबद्दल चा respect नाहीसा झाला . एके काळी तुम्ही गण्याचे साथीदार राहिले आहात

हे अस खरच होत>>हो होतं . जगात काय लायकीची माणसं असतात हे जर डोळे उघडे ठेवून आजूबाजूला बघितलं , कि कळतं

हे अस खरच होत>>हो होतं . जगात काय लायकीची माणसं असतात हे जर डोळे उघडे ठेवून आजूबाजूला बघितलं , जरा पेपर वाचून , बातम्या बघून स्वताचं नॉलेज update ठेवलं कि कळतं>>> सारिका, या प्रकार बद्द्ल नीट डोळे उघडे ठेवुन वाचले आहे, पण असे प्रकार मध्यम वर्गीय सोसायटित होतात, हे वाचुन आश्चर्य वाटले.

जरा पेपर वाचून , बातम्या बघून स्वताचं नॉलेज update ठेवलं कि कळतं >>> या टोल्याची गरज नव्हती.

मस्त Happy

या टोल्याची गरज नव्हती Proud Proud . संपादित केलाय टोला . अहो आजूबाजूला इतकी माणसं बघण्यात येतात जे फालतू गोष्टीत तासंतास घालवतील पण थोडा वेळ सुधा पेपर चाळायला , बातम्या बघायला देणार नाहीत . ह्या माठ्यांना जगात काय चाललंय ह्याची थोडीसुद्धा जाणीव नसते .

गण्याचे सुंदर व्यक्तिचित्रण......आजवर असे गणेश शोकांतिकेच्या दिशेने प्रवास करताना पाहिले आहेत. पण तुमचा गणेश मात्र काबिले तारिफच म्हणायला हवा. असे भरकटलेले वारु नियंत्रणात आणणे खूप कठिण नव्हे काही प्रमाणात अशक्यही असते. सलाम गण्याला आणि तुमच्या लिखाणाला सुद्धा.

सर्वांचे आभार मानतो.
================

>>> सारिका३३३ | 6 May, 2015 - 17:31

गण्याला जे काय धक्क्यावर धक्के द्यायचे ते त्याने त्याच्या आईला आणि २ बहिणींना देत बसावं .स्वताच्या घरात स्वताची आई घालावी . लोकांच्या आया बहिणी त्याची personal property आहे का ?<<<

सारिका,

हा प्रतिसाद अर्वाच्य आहे.
==================

अभिरुप,

>>>सलाम गण्याला <<< होय, माझाही सलाम गण्याला!

खूपच छान लिहलय.
गण्यासारखे लोक खूप कमी पाहायला मिळतात.
परिस्थिती जगणे आणि आहे त्या परिस्थिती वर मात करून वर जाणे हे कोणालाही जमनारी गोष्ट नाही आहे.
कथा वाचतांना चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.
बालपणी अनुभवलेल्या आठवणी ताज्या झाल्या.

गण्यासारखे मनापासून जगणे आपल्याला कधी जमलेच नाही ही एक खंतही!
असे बरेच लोक आहेत की ज्यांना भविष्यासाठी वर्तमान हवा तसा जगता येत नाही.

ते एक वय असतं अनोळखी स्त्री स्पर्श उद्दीपित करतो ,कानशीलं गरम होतात. परत परत तसं करणं काहींची अनावर इच्छा होते. साळसुद लोक असले उद्योग कधीच कबुल करणार नसतात.