युरुगुचे पुस्तक : भाग ३

Submitted by पायस on 1 May, 2015 - 09:11

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/53576

स्थळ : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ

तो आफ्रिकन माणूस विमानतळावरचे सोपस्कार पार पाडत होता. त्याच्या सामानात कपडे, जरुरी कागदपत्रे वगळता काहीच नव्हते, त्यामुळे त्याला कस्टम्सला काहीच अडचण आली नाही. बाहेर पडून त्याने प्रथम एक फोन केला. त्या विशिष्ट जागेचा पत्ता नीट नोंदवून तो टॅक्सी शोधू लागला.
****

कुई कुई कुई कुई
जॉनीने वैतागून शेजारची उशी फेकली. त्याला ती उशी लागणे शक्यच नव्हते पण तरी जॉनीची झोपमोड झालीच होती त्यामुळे निदान तेवढी कृती त्रागा व्यक्त करायला गरजेची होती.
"काय झालंय रे? खालीपिली उठवत नको जाऊस." असे म्हणत तो कूस बदलून परत झोपला.
ती कोल्हेकुई इतर कोणाला तेवढ्या प्रमाणात ऐकू जात नव्हती. तरी आजूबाजूचे लोक थोडे त्रस्त झालेच होते. आधीच शहरात कोल्हा दिसतोय या स्कूपमुळे थोडी अस्वस्थता होतीच. पण आता तर मधून मधून आपल्या एरियात आवाज ऐकू येत आहेत म्हटल्यावर सगळे थोडेसे तरी घाबरले होते.
त्या कोल्ह्याला मात्र स्पष्ट माहित होते. आणि म्हणूनच तो जोरजोरात ओरडत होता.
"तो आलाय!"
****

नोम्मोलाही आज जाणीव झाली. अजूनही ला पूर्णपणे बरी झाली नव्हती. त्यामुळे तो फारशी हालचाल करू शकत नव्हता. केवळ पुस्तक असून फायदा नव्हता. त्याने शेजारी पाहिले. ती टीव्ही पाहत होती. तिने त्याच्याकडे पाहून स्माईल दिली. तोही असहायपणे हसला. युरुगु सापडत नाहीये आणि आता त्यांनी त्यांचा सर्वोत्कृष्ट माणूस पाठवला आहे.
बुसुली!
****

बुसुलीने टॅक्सीचे पैसे चुकते केले आणि तो पिकअपची वाट पाहू लागला. लवकरच एकजण त्याला अ‍ॅक्टिवावर न्यायला आला. त्याला तो वरळीच्या बीचजवळ एका निर्जनस्थळी सोडून गेला. तिथून बुसुली फोनवर सांगितल्या दिशेने चालू लागला. लवकरच त्याला एक झोपडे लागले. बाहेर उभ्या असलेल्या माणसाला ओळख पटवल्यावर तो आत गेला. आत बसलेल्या म्हातारीने त्याचे स्वागत केले.
"अखेरीस तू आलासच. परिस्थिती अजूनही हाताबाहेर गेलेली नाही. लवकर पुस्तक शोध किंवा नोम्मोला तरी शोध म्हणजे हे सगळे नीट होईल."
"मोदिबो, तुला जे काही सापडलंय ते मला सांग. बाकी मी बघून घेतो."
~*~*~*~*~*~

जेव्हा ते वेष बदलून बाहेर पडले तेव्हा कोणीही त्यांना सीआयडी इन्स्पेक्टर म्हणून ओळखले नसते. एखादा डिस्को बार मधील रेग्युलर कस्टमर म्हणून ते सहज खपले असते. अशाच एका डिस्को मध्ये ते त्याची वाट पाहत होते. त्याचे खरे नाव त्यांनाही ठाऊक नव्हते. पण तो सर्वात भरवशाचा खबरी होता. त्याचे नाव त्यांनी रिपोर्टर असेच ठेवले होते. रिपोर्टरला माहित नाही अशी एकही घटना मुंबईत घडत नसे.
पिनाकोलाडा, एका कॉलेजवयीन तरुणाने जाधवांशेजारी बसत आपली ऑर्डर दिली. बारमन त्याच्या कामात व्यस्त झाला तसा तो तरुण म्हणाला "हाय महेश"
रिपोर्टर आला होता.
****

ते आता एका रूममध्ये बसले होते. या बारचा मालक जाधवांच्या ओळखीचा असल्याने ही एकदम सेफ जागा होती. आता ते दोघे शांतपणे बोलू लागले, नव्हे महेश तपशील सांगू लागला
"केस म्हणावी अशी केस नाहिए ही; सुरुवात हिची कधी झाली नक्की सांगता येत नाही पण एका कचरा गोळा करणार्‍या बाईच्या मुलाला जेव्हा कचर्‍यात खेळताना हाडके मिळाली तेव्हा हे लक्षात आले. ती सर्व हाडे माणसांची होती आणि विविध वयोगटातील होती."
"करेक्शन, यात तरुणांची त्यातही ८-१५ वर्षांच्या मुलांची हाडे जास्त प्रमाणात असली पाहिजेत."
"येस! सो तुला हेही माहित असेल कि गँग्ज मध्ये सध्या काय चालू आहे."
"हम्म सगळे एकमेकांना संशयाने बघत आहेत. गँगवॉर अजून चालू पण नाही झाले आणि मुडदे आधीच सापडत आहेत. अर्थात हे तसे नेहमीचेच आहे पण यावेळेस मुडद्यांचे प्रमाण जरा जास्त आहे."
"करेक्ट! पण आता गंमत अशी आहे कि त्या हाडांपैकी एकात स्टीलची रॉड होती. या रॉडच्या नंबरवरून आम्ही जिथे ही रॉड बसवली त्या हॉस्पिटल पर्यंत गेलो. तर ते हाड लंगडा बिरजूचे होते."
"लंगडा बिरजू म्हणजे तो शार्पशूटर? तो मध्ये गायब झाला होता हे खरे आहे. वेल आत्ता माझ्याकडेही फार माहिती नाही. बट आय विल टेल यू वन थिंग, हे सर्व सुरु झाले तेव्हा पासून भिकारी मुले गायब होत आहेत. एखाद दुसरा पळून जातो तसे नाही; नियमितपणे महिन्याला २-३ गायब होत आहेत. हे लक्षात आता येत आहे पण हे सुरू याच्याही आधी झाले असणार आहे. त्यानंतर भिकार्‍यांना कंट्रोल करणार्‍या गँग्जमध्ये काही चकमकी उडाल्या पण त्यांची काही माणसे रहस्यमयरीत्या गायब झाली. गेल्या २ आठवड्यांपासून मात्र ट्रेंडमध्ये बदल आहे. आता माणसे नुसती गायब होत नाहीत तर त्यांची प्रेते मिळतात."
"पण मग काय आहे? याला आगा ना पिछा. माझे डोके काही काम करत नाहीये. कोण असू शकेल याच्यामागे?"
रिपोर्टरने मान हलविली.
"मला थोडा वेळ दे. या नवीन ट्रेंडमुळे गोष्टी कॉम्प्लिकेटेड झाल्या आहेत."
भेट संपवून ते दोघे बाहेर पडले तेव्हा त्या दोघांच्याही मनात एकच प्रश्न होता, हे सर्व करून कोणाचा फायदा होणार आहे?
~*~*~*~*~*~

प्रज्ञाला जेव्हा इन्स्पेक्टर जाधवांचा फोन आला तेव्हा तिला आधी आश्चर्य वाटले. नंतर त्यांचा खुलासा ऐकून तिला देखील हे धाडस करून पाहावेसे वाटू लागले. अर्थातच हे प्रकरण इतर प्रकरणांसारखेच, वरवर पाहता नेहमीचे असल्याने डिपार्टमेंट त्याला इतर कुठल्याही प्रकरणाप्रमाणेच बघणार होते. त्यात इन्स्पेक्टर शिंदे हा मनुष्य आपल्या कामात दिरंगाई करणारा असल्याचे जाधव सांगत होते. जाधवांना खात्री होती कि जरी त्याने अगदी मन लावून प्रयत्न केले तरी हे प्रकरण सोडवायला लागणारी विचारक्षमता त्याच्यात नाही असेही त्यांचे मत होते. त्यामुळे प्रज्ञाला ते एक लायसेन्स मिळवून देत होते जेणेकरून प्रज्ञा एक डिटेक्टिव बनून या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहू शकेल आणि किमान हे प्रकरण गुंडाळू देणार नाही.

ती डिटेक्टिव म्हणून शिंदेंना भेटली. इन्स्पेक्टर प्रकाश शिंदे हे वयाने जाधवांना सीनियर होते. पण एक डिटेक्टिव म्हणून त्यांचे स्किल यथातथाच असल्याचे प्रज्ञाला त्यांच्या छोट्याशा भेटीत जाणवले. पोलिसी पद्धती मात्र त्यांच्या अंगात मुरलेल्या वाटत होत्या. आपण हे प्रकरण पुन्हा पहिल्यापासून अभ्यासणार असल्याचे त्यांनी प्रज्ञाला सांगितले. तिला जोवर ती तपासाच्या मध्ये मध्ये करत नाही तोवर मर्यादित सहकार्य मिळणार होते आणि अर्थातच तिला काहीही माहिती सापडली कि तिने ती पोलिसांना कळवायची होती. फेअर इनफ, अगदी प्रॉपर प्रोफेशनलला सुद्धा साधारण अशाच अटी घातल्या गेल्या असत्या. त्यात तिला या सर्व परवानग्या जाधवांमुळे मिळत होत्या.

बाहेर पडून गाडी चालवता चालवता ती विचार करत होती. बाकी वर्क इफिशियन्सी विषयी माहिती नाही, पण माणूस म्हणून शिंदे वाईट वाटत नव्हते. जाधवांना या प्रकरणावर लक्ष ठेवायला माणूस हवा हे जरी ध्यानात घेतले तरी आपल्यावर जबाबदारी सोपवणे थोडा अविचारी निर्णय वाटत होता. काहीतरी बिनसत होते हे खरे. एवढ्यात तिचे आजूबाजूला लक्ष गेले आणि तिने करकचून ब्रेक दाबला. त्या रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती आणि ती कडेकडेने गाडी चालवत होती म्हणून निभावले. आणि हे काय? मी फिरून भांडूपमध्ये कशी आले? जस्ट मी पवई लेक क्रॉस करून पार्ल्यात चालले होते ना? तिने सावकाश दोन मिनिटे दम खाल्ला. मग गाडी वळवून घेत ती पुन्हा पार्ल्याच्या दिशेने निघाली. पण राहून राहून तिच्या मनात विचार येत होता, मी डेफिनेटली रस्ता चुकले नव्हते. मग मुंबईचा रोडमॅप कधी पासून बदलला?
~*~*~*~*~*~

तिकडे शिंदे विचारात पडले होते. जाधवला ही केस हवी होती असे ऐकले होते. मग त्याच्याकडून अशी अचानक ही केस का बरे काढून घेतली असेल? त्याला दुसर्‍या केसवर हालवले म्हणजे ती नक्कीच काहीतरी तगडी केस असणार कारण हा थोडक्या काळात करमरकरचा खास झाला आहे. पण जर जाधव ही केस धरून बसला होता म्हणजे हिच्यात काहीतरी चॅलेंज असणार. मग नक्की काय चॅलेंज आहे? मर्डर वेपन सोडले तर बाकी काहीच चॅलेंजिंग वाटत नाहीये. मयत नक्की आडबाजूला भटकला असणार. शेवटी मुंबई आहे, काहीतरी पाहायचे नाही ते पाहिले असेल आणि ...... असो या विचित्र मर्डर वेपनला शोधण्यापेक्षा त्या एरियात झालेल्या व्यवहारांच्या बातम्या काढल्या तरी काम भागेल. सध्या तसेही रसूलभाई जोरात आहे तिकडे म्हणजे त्याच्या गॅंगने काहीतरी केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बास मग हीच तपासाची दिशा ठेवावी. च्यायला काय आहे या केसमध्ये? साधी गँगवाल्यांकडून झालेल्या खूनाची केस आहे. हे सोडवायला सीआयडी आणि वर ती पोरगी डिटेक्टिव एवढं लागतं का?
~*~*~*~*~*~

"चीयर्स!!"

आज पार्टीचा दिवस होता. डॉक्टर सायरस दावर आणि टीमच्या यशाबद्दल ही पार्टी आयोजित केली होती. सायरस यांच्याबद्दल पेपरात पण बरेच काही छापून आले होते. जगातील सर्वोत्कृष्ट सर्जन्स पैकी एक म्हणून सायरस ओळखले जात होते. नुकतेच एका अत्यंत घातक अशा ट्यूमर सर्जरीला यशस्वी रीत्या पार पाडल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता. अशा अनेक यशस्वी सर्जरीज त्यांच्या नावे जमा होत्या.
"डॉक इज सिम्पली ग्रेट. नॉट येट फोर्टी अ‍ॅन्ड स्टिल सच अ स्किल......."
"कमाल आहेत डॉक्टर. मस्ट बी कॉल्ड अ‍ॅन एंजल. येट ही इज सो हम्बल"
स्वतः डॉक्टर सायरस प्रसन्न चेहर्‍याने वावरत होते. अविवाहित असल्याने आणि खर्‍या वयाच्या ५-७ वर्षे कमीच दिसत असल्याने अजूनही तरुणींना त्यांचे हास्य घायाळ करीत असे. त्यांच्या त्या ऑपरेशन मध्ये सहभागी झालेले इतर ज्युनिअर देखील भाव खाऊन होते.
"प्लीज काहीतरी सांगा. काय अनुभव होता तुमचा?"
ओह मॅन, अल्बर्ट आता कंटाळला होता. यार ही रेश्मा अजूनही न कंटाळता कशी काय बोलू शकते रे, त्याने शेजारीच उभ्या असलेल्या आलोकला विचारले. आलोक या सर्वात ज्युनियर होता, इंटर्न. पण तो स्वतःला खूप भाग्यवान समजत होता कि त्याला डॉ. सायरसच्या हाताखाली राहून शिकता येत होते. त्यांने फक्त खांदे हालवले. प्रज्ञाला एकदा डॉकना भेटवले पाहिजे, तो मनाशीच म्हणाला. म्हणजे कळेल कि हुशारी कशी कॅरी करतात ते!

इकडे सायरसना त्यांच्या डीन डॉ. परांजप्यांनी हटकले. "डॉक तुमची ओळख करून देतो. परीक्षित करमरकर, एसीपी आणि माझे खास मित्र."
"प्लीज्ड टू मेक युवर अ‍ॅक्वेंटन्स" - सायरस
"ओह, मला परीक्षित म्हणालास तरी चालेल. अरे-तुरे करतोय मी कारण वयाने मोठा आहे, चालेल ना?"
"हाहा नो प्रॉब्लेम. तसेही मला डॉक पेक्षा सायरस म्हणलेले जास्त आवडते पण इथे ज्युनियर्स समोर थोडा भाव खावा लागतो. " डोळे मिचकवत सायरस उत्तरला.
"बाय द वे, तू कुठल्याही प्रकारे पारशी वाटत नाहीस. नक्की काय घोळ आहे हं?"
"ओफ्फो, पर्‍या तू इथे सुरु नको होऊस. नाहीतर सायरसला वाटेल कोणा-कोणाला बोलावलंय परांजप्यांनी पार्टीत"
"हे हे, नाऊ डोन्ट क्वारल. मी पारशी वाटत नाही हे मात्र अगदी बरोबर आहे. माझे अंकल आंटीज मला कायम याबाबतीत पारश्यांच्या नावाला कलंक म्हणूनच चिडवतात. आय नो आय लूक मोअर लाईक अ साऊथ इंडियन. पण कारण अर्थात लव्ह मॅरेज! आईवर गेलोय"
"ओह के. बाकी तुमच्या ब्रेनचा आणि आमचा संबंध क्रिमिनल माईंड्स पुरताच."
"येस. दोघेही बिघडलेली डोकी तपासतो. आम्ही त्यांना आतून सुधारतो, तुम्ही बाहेरून." हसत हसत ते म्हणाले.
लेट्स मीट रेस्ट ऑफ माय टीम म्हणत सायरसने उरलेल्या टीमबरोबर त्यांची ओळख करून दिली.

ते गेल्यावर रेश्माने आपल्या ताटात चिकन कबाबचे तुकडे घेत सुस्कारा सोडला. अल्बर्टने तिला विचारले
"काय झाले? इतक्या वेळ तर तूच सर्वांशी व्यवस्थित बोलत फिरत होती ना?"
"हू. त्यात काय? सोशल बुरखा! सगळं डॉकच कौतुक! डॉक ग्रेट आहेत पण या लोकांना त्यांच्या कामातलं ओ का ठो कळत नाही. आणि ही शो-बिझ मधली लोकं, हे उद्योगपती, राजकारणी कशाला पाहिजेत इथे?"
"अगं ते आपल्या रिसर्च इन्स्टिट्युटला डोनेशन्स देतात. नाहीतर सर्जन बनून ट्यूमर काढणे एवढंच काम राहिले असतं. इट्स बिझनेस रेश्मा"
"ओह कट द क्रॅप अल्बर्ट. तुला पण माहिती आहे कि मला एकदा हा बुरखा उतरवला कि एक्स्ट्रीम बोलायची सवय आहे. आणि नाही सहन होत मला यांच्या फालतू खोट्या खोट्या कमेंट्स. असं वाटतं स्कालपेल घेऊन यांच्या मेंदूची सर्जरी केल्याशिवाय ही लोकं सुधारणार नाहीत."
हातातल्या चिकन टोचलेल्या काट्याला स्कालपेल प्रमाणे धरत रेश्मा म्हणाली आणि नंतर ते चिकन चावत आपली चिडचिड अल्बर्टला ऐकवू लागली. आलोक मख्खपणे बसून राहिला होता.
~*~*~*~*~*~

आज अखेर नोम्मोला बाहेर जायची संधी मिळाली होती. त्याला पक्की खात्री होती कि याच भागात कोठेतरी युरुगु आहे. रात्र बरीच झाली होती. गर्दी हळूहळू पांगायला सुरुवात झाली होती. भाई लोक, दारुडे, जुगारी आणि तसल्या मुली वगळता पब्लिक कोणी दिसत नव्हते. तेवढ्यात त्याला काहीतरी विशेष दिसले. त्या तरुणाचा त्याने पाठलाग सुरु केला.
श्या!! किलरला त्याच टेबलावर खेळायचे होते. तरी कमाई बरी झाली आहे. स्वतःशीच बोलत तो निर्जन गल्ल्यांमधून चालला होता. "अरे भाई सुनना......"
तो मागे वळला. "क्या चाहिये?"
"ये जो किताब हात मे है, उसके बारे मे पुछना था."
"ये? ये मुझे आज क्लब आते टाईम पडी मिली. तुझे चाहिये, सिर्फ ५० रुपये."
त्याने मान हलविली. "चल ४०, ३०, २५ से एक पैसा कम नही."
तेवढ्यात त्याला छातीवर दंडाचा रेटा जाणवला. त्याने त्याला हाताने भिंतीवर दाबून धरले होते.
"सुन. मेरे को तेरी ये किताब नही चाहिये. इस किताब के पास तुने किसी लोमडी को देखा?"
"लोमडी?" "हां लोमडी"
"नही बाप! कसम से"
त्याने त्याच्या डोळ्यात पाहिले. हा खरे बोलत असला पाहिजे. त्याला सोडून देत तो म्हणाला.
"और एक बात. अगर मै तेरी जगह होता, तो इस किताब को फेंक देता. अगर बेचना चाहता है तो बेच मगर गलतीसे भी इसको खोल के पढने कि कोशीश भी मत करना!"
असे म्हणून जणू तो त्या निर्जन गल्लीत हरवून गेला.
*****

थोड्या वेळानंतर

*****

माणसाच्या डोक्यात ना एक मस्त केमिकल लोचा आहे. आणि तो कायमस्वरुपी आहे. एखादी गोष्ट नाही करायची म्हणून सांगितली कि हटकून ती गोष्ट केलीच पाहिजे. आता तो त्या जुगार्‍याची निरीक्षण करत होता.
हाहाहाहा वाचलंच त्याने शेवटी पुस्तक, युरुगुचे पुस्तक!!
"मी आहे गॅम्बल मॅन! माझ्या सुपरपॉवर्स आहेत गॅम्बल करणे. मी रात्री जुगार खेळणार्‍यांना वाचवतो."
तो मोठमोठ्यांदा ओरडत त्या अरुंद गल्ल्यांमधून धावत होता.
"साला, कोणाला रात्रीचा किडा चावलाय रे?" अशा टिप्पण्या मधून होत होत्या. पण त्याला तमा नव्हती.
नोम्मो त्याचा पाठलाग करता करता त्याने जे पाहिले होते ते आठवत होता. त्याने पुस्तक वाचायला सुरुवात केली. त्याच्या चेहर्‍यावरचे भाव हळू हळू नाहीसे होऊ लागले. मग त्याने कसेही उलटे-पुलटे धरत पुस्तक पुढे वाचायला सुरुवात केली. मग मधूनच त्याच्या चेहर्‍यावर वेडगळ हसू आले. मध्येच तो रडू लागला. त्याच्या डोक्यावर जणू युरुगुच उभा होता. तो हसत होता, तो रडत होता, गोंधळत होता. आणि मुख्य म्हणजे तो काही तरी शोधत होता.
तीच धून
शोधतोय शोधतोय
युरुगु शोधतोय.........

जणू त्याच्या हातात एक भला मोठा फासा होता. घनाकृती? छे छे. त्याला लाखो पृष्ठभाग असावेत. त्याने तो हवेत भिरकावला. खाली स्थिर झाल्यावर जो पृष्ठभाग वर होता तो जणू मोठा झाला -------- सुपरहीरो!!
नोम्मो मनातल्या मनात म्हणाला - हाही प्रयोग अपयशी!!
त्याबरोबर पुस्तकाने पेट घेतला. आणि गॅम्बल मॅन धावत सुटला. नोम्मो आता धावता धावता विचार करत होता. म्हणजे परिणाम तोच होत असला तरी याचा वापर एकदाच होतो, फक्त मूळ प्रतीचाच वापर कितीही वेळा केला जाऊ शकतो.

एवढ्यात धावता धावता गॅम्बल मॅन कोणाला तरी धडकला. ती व्यक्ती हडबडली. "मी याला वाचवणार आहे. चीटर किलर, प्रीपेअर!!!!!"
******

तो आपली खुराक न्याहळत होता. नुकतेच त्याने त्याला बेशुद्ध केले होते. आता याला नेऊय....
हा कोण? गॅम्बल मॅन??? ओये, हा तर मला मारू बघतोय. एक मिनिट, हा माझा आहे. तू याला उचलून कुठे चालला आहेस? शिट.
त्या बेशुद्ध पडलेल्या मध्यमवयीन युवकाला उचलून तो पळत सुटला. जवळच झोपडपट्टी होती. तिथे हा घुसला तर याला शोधणे असंभव आहे. शिट शिट शिट!!!
त्या दोघांचा पाठशिवणीचा खेळ सुरु झाला. पण दोघांनाही कल्पना नव्हती कि एक तिसरा कोणी प्रेक्षकरुपाने हजर आहे. नोम्मो ही गंमत बघत होता. हे कल्पना केली होती त्यापेक्षाही रंगतदार होते. युरुगु देव कधीच निराश करत नाहीत. अव्वल दर्जाचे मनोरंजन!!
या नादात इतक्या वेळ बेशुद्ध असलेला तो युवक अर्धवट शुद्धीत आला होता. आता तो या धटिंगणाच्या तावडीतून सुटू पाहत होता. ही वरात कमाल होती हे मात्र खरेच. रात्रीचे अडीच वाजून गेले होते. हे सर्व निर्मनुष्य भागात चालू होते म्हणून अन्यथा कधीच बघे जमले असते. झोपडपट्टीची वस्ती जवळ येत चालली होती. आता धोका पत्करण्यात काही अर्थ नव्हता. त्याने गॅम्बल मॅन वर झेप घेत त्याच्या पायांच्या नसा कापल्या. याचा फायदा घेऊन त्या युवकाने पळण्याचा प्रयत्न केला. लगेच दोन तीक्ष्ण वस्तु हवेत आल्या आणि त्याच्या डोळ्यात घुसल्या. तरी वेदनांकडे दुर्लक्ष करीत त्याने पळ काढलाच.
हरकत नाही, हा आंधळा माझे काही बिघडवू शकत नाही. पण तू वाचणार नाहीस. खाली पडलेल्या गॅम्बल मॅनच्या छातीवर तो बसला. हातातले धारदार शस्त्र त्याने सपकन गळ्यावर फिरवले.
दूरवर पडलेल्या, जळत असलेल्या युरुगुच्या पुस्तकाचे अखेरचे तुकडे जळून हवेत विरून गेले.

नोम्मो देखील थोडा शहारला. इतका खुनशीपणा त्याने कोणाकडून अनुभवला नव्हता. पण त्याला आता कळले होते. युरुगु इथेच होता. त्याच्याकडे असलेल्या अस्त्राची शक्ती याच भागात कुठेतरी होती. आणि त्याला या खुन्याचे शत्रुत्व ओढवून घेण्याची अजिबात इच्छा नव्हती. त्याने तिथून गुपचूप पळ काढला.
~*~*~*~*~*~

दुसर्‍या दिवशी सकाळी

बुसुली आणि मोदिबो आपल्यासमोर मुंबई शहराचा मेणाचा नमुना घेऊन बसले होते. त्यावर त्यांनी काल रात्रभर एक पिशवी टांगून ठेवली होती. आता त्यात काय होते ते मात्र विचारू नका. काल रात्रीत नकाशावर त्या पिशवीतून बरेच ठिपक्याच्या आकाराचे डाग पडले होते. त्या ठिपक्यांचा आकार बघून मोदिबो उद्गारली.
"हा आणि हा. पण दोघांमध्ये थोडा थोडा फरक आहे."
बुसुलीच्या कपाळाला आठ्या पडल्या.
"काहीतरी घोळ आहे म्हातारे. नोम्मो आणि ला ने काहीतरी घोळ घातला आहे. या दोन्हींमध्ये फरकच नाहीतर खूप अंतर देखील आहे. तसेच हा मधले बारकावे थोडे थोडे बदल्यासारखे वाटत आहेत."
"हे तर तेव्हाच शक्य आहे जेव्हा युरुगुला ते सापडेल."
"नाही. मग तर हे बदल अनाकलनीय झाले असते. काम अशक्य बनले असते. काहीतरी वेगळा घोळ आहे. किंवा नोम्मो आणि ला कडून काहीतरी असे झाले आहे कि ज्यामुळे एकाच वेळी...........
........................
अनेक युरुगुची पुस्तके शहरभर पसरली आहेत!!!!"

क्रमशः

पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/53815

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Khup chan hot challye goshta... pudhachya bhagachya pratikshet...

पायस!

तुम्ही कैच्याकै भारी आणि रहस्यमय लिहिता, राव!

पुढचा भाग लौकर लिहा हो!

आणि गुंतागुंत अशीच ठेवा, मज्जा येतेय!

आला नविन भाग ..
कशाला कयच तंत्र जुळत नै आहे माझ्या डोक्यात.. कठिणे..
लवकर गुंता सोडवा पायस..

नवीन प्रतिसादांचे आभार! आधीच कान पकडून जाहीर करतो
१)नवीन भागाला अजून काही दिवस वेळ लागेल
२) गुंता इतक्यात सुटणार नाहीये, वाढतच जाणार आहे.
पण टेंशन नही लेने का, युरुगु देव इज हिअर. नोम्मोने म्हटल्याप्रमाणे "युरुगु देव कधीच निराश करत नाहीत. अव्वल दर्जाचे मनोरंजन!!" Lol
पुढच्या भागात एखादा पात्रपरिचय/रिकॅप टाकेन म्हणजे गोंधळ होणार नाहीत.

फारच गोंधळ आहे..गोष्ट संपली की पुन्हा एकदा वाचावी लागणार आहे! पण अव्वल दर्जाचे मनोरंजन हे निश्चित Happy