नशीब - भाग १

Submitted by कविता१९७८ on 28 April, 2015 - 06:06

कावेरी एक खेडेगावात राहणारी सामान्य मुलगी, वयात आलेली, गहुवर्णी, मैत्रीणीसारखा कुणी राजकुमार शहरातुन यावा आणि आपल्याला त्याच्या राजमहालात घेउन जावा अशी स्वप्न बाळगणारी. मागे तीन बहीणींचा गोतावळा असलेली. कावेरीचं शिक्षण दहावीपर्यंत झालं होतं, त्यानंतर ती आईला घरकामात मदत करत होती. वडील शेती करत होते तसेच त्यांनी थोड्या जागेत पालेभाज्या लावल्या होत्या, ते गावात विकण्याचे काम कावेरी बरेचदा करत असे. आत्याने तिच्या मुलासाठी कावरीचा हात भावाकडे मागितला होता पण कावेरीला ते मंजुर नव्हते, तिला शहरात जायचे आहे असे तिने आत्याच्या मुलाला सांगितले तेव्हा तो
म्हणाला की मी तुला शहरात नेईन आपण तिथेच राहुया, त्यावर कावेरी म्हणाली " तु पाचवी शिकलेला , शहरात तुला काय काम धंदा मिळेल, मिळुन मिळुन मजुर होशील आणि झोपडात ठेवशील , मला चांगल्या घरात राहायचंय , गरीबीत दिवस काढायचे नाहीत म्हणुन तुच मला नकार दे. बिचारा विकास काय म्हणणार यावर, कावेरीचे ही खरे होते, शहरात जाउन मी काय नोकरी करणार? त्याला वाईट तर खुप वाटले पण
कावेरीच्या हट्टापायी विकास ने तिला नकार दिला. पण त्यावरुन कावेरीची आई तिच्या आत्याशी बोलेनाशी झाली, "माझी पोरगी दहावी शिकलेली आहे, विकासला अशी मुलगी मिळाली असती का? आमच्या मुलीला आम्ही काही कमी केलं नाही आणि हा तुमचा मुलगा तिला लग्नाला नकार देतो म्हणजे काय?" आत्यानेही विकासलाच बोल लावला, " तुझ्या मनात तरी काय आहे रे? तु कमी शिकलेला, कावेरी तुझ्याहुन जास्त शिकलेली तरी मामा लग्न लावुन द्यायला तयार झाला होता आणि तु नाही म्हणालास? तुझं दुसरीकडे कुठे लफडं तर नाही ना? सांग रे बाबा, कावेरीत अशी काय कमी होती की तु तिला नकार दिलास?" . विकासने आईच्या बडबडीकडे दुर्लक्ष केले, आईला जर खरे सांगितले असते तर ती तडक मामाकडे गेली असती आणि
त्याच्याशी भांडली असती , मामाने कावेरीला जबरदस्तीने लग्नाला उभे केले असते आणि ते विकासला नको होते.

मुंबईला कावेरीच्या मामाच्या मुलीचे वंदनाचे लग्न होते तिथे सगळे गेले होते, लग्नात कावेरीचे बाबा कावेरीसाठी चांगले स्थळ शोधत होते, बरीच मंडळी असल्याने कावेरी खोलीच्या दारामागुन सर्वांना न्याहाळत होती तेव्हढ्यात तिची नजर एका देखण्या मुलावर पडली, चेहरा तर तिला ओळखीचाच वाटला , अरे हा तर राजेश ! मामीच्या बहीणीचा मुलगा, लहानपणी आपण इथे यायचो तेव्हा कावेरी, वंदना आणि वंदनाच्या मामाची मुले राजेश आणि भावना एकत्र खेळत असत. पण खुप वर्षात त्यांची भेट झाली नव्हती. राजेश आता मोठा झालाय आणि देखणा ही, कावेरी त्याला एकटक पाहत उभी होती तेवढ्यात राजेशचे लक्ष कावेरीकडे गेले.
राजेशनेही कावेरीला ओळखले, तो कावरीजवळ गेला व त्याने तिची विचारपुस केली, बोलता बोलता कावेरी त्याला न्याहाळु लागली, गोरापान चेहरा , भरलेली शरीरयष्टी, पाहताक्षणी राजेश अगदी मोठ्या घरातला वाटत होता, मामीच्या बहीणीची परीस्थीती आधी इतकी चांगली नव्हती असे तिला आठवले, झाली असेल आता ,
नशिब कधीही बदलु शकतं यावर तिचा विश्वास होता. राजेशनेही त्याच्या कामाबद्द्ल सांगितले, डायमेकींगची कामे करतो असे कावेरीला समजले, तिने राजेशकडे त्याच्या आईबाबांची चौकशी केली. "आणखी कोण कोण असतं घरात?" कावेरीने त्याचे लग्न झाले आहे हे जाणण्याचा प्रयत्न केला, आईवडील, भावना आणि मी अजुन तर इतकेच आहोत, आई बाबांना घाई झालीये नवीन मेम्बर घरात आणण्याची हे म्हणत तो एकटक कावेरी कडे पाहत होता, कावेरी लाजुन घरात पळाली.

वंदनाच्या लग्नानंतर लगेचच कावेरी गावी परत आली. आठेक दिवसातच मामाकडुन निरोप आला आणि बाबा एकदम खुष झाले, राजेशचे स्थळ कावेरीला सांगुन आले होते, घरातले वातावरण आनंदी झाले होते, कावेरी तर खुप खुष झाली होती, तिचे शहरात सुखाने राहायचे स्वप्न पुर्ण होणार होते, राजेशला नकार देण्याचा प्रश्नच
नव्हता, बाबांनी लगेचच होकार कळवला. राजेश हा मामाच्या मेव्हणीचाच मुलगा असल्याने व त्याला लहानपणापासुनच ओळखत असल्याने बाकीची विचारपुस करण्याची गरजच कुणाला वाटली नव्हती. कावेरीला आधीच पाहिले असल्याने राजेशच्या आईवडीलांनी आठ दिवसांतच साखरपुडा करायचे सुचवले. कावेरीच्या बाबांनी अत्यावश्यक तयारी करुन नातेवाईकांना आमंत्रण दिले, ठरल्या दिवशी राजेश त्याचे आईवडील , कावेरीचे मामा मामी आणि जवळचे नातेवाईक आले आणि साखरपुडा व्यवस्थित पार पडला, कावेरीच्या बाबांनी सर्वांचे मानपान सांभाळले, कावेरी तर साखरपुड्यात मिळालेली महागडी साडी पाहुन भारावुन गेली. राजेशचा थाट पाहुन तर कावेरी हुरळुनच गेली. लग्नानंतर राजेश गाडी घेणारे असे राजेशचे वडील कुणाला तरी सांगताना तिच्या कानावर पडले होते. गावातली मोठी मंडळी सर्वांना भेटुन अगदी खुश झाली, कावेरीच्या बाबांचे अभिनंदन होउ लागले. कावेरीच्या आत्याला कावेरी आपलीच सुन झाली असती तर कीती बरे झाले असते असे वाटत होते पण भावाच्या आनंदात तीही आनंदी झाली.

६ महीन्यांनंतरची लग्नाची तारीख पक्की करुन मंडळी परतली. इथे कावेरीच्या आनंदाला उधाण आले होते, तिला आपल्या नशीबावर विश्वासच बसत नव्हता. राजेशबरोबर लहानपण खेळता खेळता आपण त्याची सहचारीणी होउ हे तिला कधी वाटले देखील नव्हते. कावेरीचे आईबाबा लग्नाच्या तयारीला लागले,. कावेरीचे
राजेशशी रोज फोनवर बोलणे व्हायचे तेव्हा बर्‍याचदा राजेश तो वेगवेगळ्या ठीकाणी असल्याचे सांगे, बर्‍याचदा त्याच्याबरोबर कुणी असल्याचा भास होई. कावेरी विचारी "नेहमी कसे हो तुम्ही वेगवेगळ्या ठीकाणी असता?" तेव्हा तो म्हणे "अगं बिझिनेसच्या निमित्ताने फीरावं लागतं." कावेरीला वाटलं असेल, डाय मेकींगची डीलीव्हरी द्यायला राजेशला फिरावं लागत असेल. बोलता बोलता दिवस सरले , लग्नाची तारीख जवळ आली . ठरल्या वेळेवर लग्न पार पडले, कावेरीच्या वडीलांनी त्यांच्य ऐपतीप्रमाणे मानपान संभाळले. राजेशकडुन लग्नात कावेरीला, सोन्याचे मंगळसुत्र, हार, बांगड्या मिळाल्याने तिच्या बाकीच्या मैत्रीणी अवाक झाल्या. कावेरीतर आनंदाने हरखुन गेली. चांगले स्थळ मिळाल्याचा आनंद कावेरीच्या आईवडीलांच्या तोंडावर ओसंडुन वाहत होता. "आपल्या कावेरीचे चांगले झाले आता बाकीच्या मुलींची कार्येही पटापट होतात की नाही बघ" असे कावेरीचे बाबा तिच्या आईला सांगु लागले. कावेरीचा मैत्रीणींनाही कावेरीसारख आपलं नशीब निघावं असं मनोमन वाटु लागले.

(क्रमशः)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users