घर

Submitted by रश्मी. on 22 April, 2015 - 05:35

गिरीश आज मन लावुन घराची साफसफाई करीत होता. घर आवरुन झालेय, आता बाल्कनी बघावी म्हणून तो बाल्कनीत आला. तशी तिथेही काही अडगळ नव्हतीच, तरी जुने-पाने वेचुन त्याने बाल्कनी पण स्वच्छ केली. तसा तो फार नीटनेटका होता. त्याला घरात घाण, अडगळ अजीबात आवडायचे नाही. सतत आवरासावर, साफसफाई करायचा.

आज तर काय घर पहायला प्रिया, त्याची होणारी पत्नी येणार होती ना. घरात काही स्नॅक्स आणुन ठेवले होते. मात्र चहा-ज्युस असले कार्यक्रम बाहेरच सैरसपाटा करताना उरकावेत असा त्याचा विचार होता. घराच्या खाली उतरले की की चहा-कॉफीचे छोटे हॉटेल आणी एक ज्युसबार पण होता. बाल्कनीत असतानाच त्याच्या डोक्यावर पाण्याचे थेम्ब पडले आणी तो वैतागला. या मन्गला बाईना काही दुसरे उद्योग नाहीत का? जेव्हा बघावे तेव्हा झाडाना पाणी घालतात आणी माझ्या बाल्कनीत अभिषेक करतात.

गिरीशचे घर मात्र चमकत होते, घरात लख्ख प्रकाश पडला होता. कसलीशी हालचाल जाणवल्याने त्याने मागे वळुन पाहीले, तर स्नॅक्स चे बाऊल हलत होते. त्याने दाणकन झाकण बाऊलवर आपटले. हालचाल थन्डावली.
प्रियाचा विचार करत असतानाच हवेत झाडुचा सपकारा त्याला जाणवला. "" अग्गोबाई! शारदा, अग इथे डायनिन्ग टेबलाजवळचे कोळ्याचे एवढे मोठे जाळे तुला दिसले नाही का आवरताना?":

गिरीश थरथरला आणी पुढचा फटका बसायच्या आतच त्याने जाळ्याबाहेर पळ काढला.....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages