पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/53518
माली, आफ्रिका
डोगोन जमातीचा एक कबिला
अचूक स्थळ व काळ : अज्ञात
तो दिवस! उत्सवाचा दिवस! डोगोन जमातीचा तो कबिला आजचा दिवस दरवर्षी आनंदाने साजरा करतो. उत्सव हाच शब्द योग्य आहे या दिवसासाठी. उत् म्हणजे काढून टाकणे, दूर करणे; तर सव म्हणजे दु:ख, त्रास, अडचणी. जणू आजच्या दिवशी त्यांची सर्व दु:खे दूर होतात. आणि का नाही? आजच्या दिवशीच तर अम्माने युरुगुला पृथ्वीवरून हाकलून दिले होते. युरुगुच्या रुपाने जणू सैतानच अम्माने जन्माला घातला होता. त्याला हाकलून अम्माने संपूर्ण मानवजातीवर अनंत उपकार केले. मग असा आनंदाचा दिवस साजरा करणे योग्यच नव्हे का?
"तर मग भरु द्या प्याले. मनसोक्त खा, प्या, मजा करा आणि अम्माची भक्ति अशीच करत राहू हे मनोमन तिला सांगून टाका." - कबिल्याचा प्रमुख.
प्रमुख बराच म्हातारा होता. पण तरीही तो उत्साहाने या सर्वात सहभागी होत होता. रीतिरिवाजाप्रमाणे त्यांनी सर्व विधि पार पाडले होते. त्यांच्यापासून थोडे दूर उभे राहून तो उमदळून आलेले कमीत कमी आवाज होईल अशा बेताने बाहेर टाकीत होता. गंगाधर एक इतिहास संशोधक होता. अफ्रिकन जमातींचा इतिहास हा विषय घेऊन तो पीएचडी करीत होता. त्यातही त्याला डोगोन जमातीने भुरळ घातली होती. त्यांच्या पो टोलो आणि सेगुईचा तारा (*)[१] च्या कथेने प्रेरित होऊन तो आता माली मध्ये आला होता. आल्यावर त्याला कळले होते कि त्यांच्यात अजुन एक प्रथा आहे जी हळू हळू लुप्त होत आहे. पण अजूनही काही कबिले ती पाळतात असे त्याला कळले. ती का लुप्त होत आहे हे त्याला पाहिल्यावर कळले होते.
एका मुलीला अम्माच्या जागी कल्पून तिच्यावर सर्व सोपस्कार केले होते. आधी तिला माती खायला लावून मग उलटी करायला लावली होती. त्यानंतर तिला पाणी प्यायला लावून ते ओकायला लावले होते. यानंतर याच प्रमाणे झाडपाला, प्राण्यांचे मांस खाऊन तिला ओकायला लावले. मग समोर एका कोल्ह्याला मृत ठेवले होते. त्याला जाऊन तिने लाथाडत लाथाडत एका खड्ड्यात ढकलले. नंतर तोच कोल्हा शिजलेला बाहेर आला म्हणजे त्यात निखारे असणार. शेवटी तिला काहीतरी सूपसारखे प्यायला दिले आणि मग झिंगलेल्या अवस्थेतल्या त्या तरुणीला एका खुर्चीवर बसवण्यात आले. मग तिची बरीच पूजा-अर्चना केल्यावर तिला परत एक ओकारी काढायला लावली व तसेच खुर्चीत ठेवून तिच्या पोटाला धारदार शस्त्राने फाडण्यात आले. मग तिला तसेच मिरवित मिरवित ते जंगलात कुठेतरी सोडून आले. हे सर्व पाहून कोणाचे पोट ढवळणार नाही? बरं हे करताना कोणाच्याही चेहर्यावर जरासे देखील किल्मिष, अपराधीपणाची भावना नव्हती. मानवी जीवनाची काही किंमत आहे का नाही?
पण हे सर्व काहीच नाही असे काहीतरी तो अनुभवणार होता. तो निघणार इतक्यात त्याला थोडी दूरवर काही हालचाल जाणवली. त्याच्या लक्षात आले कि धुंद होऊन नाचणार्या या समूहाला घेराव घातला जात आहे. झाडीत लपून कोणीतरी त्यांच्या जवळ जात आहे. तो श्वास रोखून बघत होता. अनेक कोल्हे झाडीतून दोन पायांवर उभे राहिले. अधिक निरखून पाहिल्यावर कळत होते कि ती कोल्ह्याची कातडी पांघरलेली माणसे होती. त्या सर्वांच्या हातात भाले होते. त्यांनी कोणालाही कसलीही संधी न देता हल्ला चढवला. जेमतेम १५-२० मिनिटात ते कोल्हा दल वगळता फक्त गंगाधर हा एकमेव जिवंत मानव त्या परिसरात होता. त्यानंतर त्या कोल्ह्यांनी काहीतरी साधना, साधना म्हाणावे का तिला?, बराच वेळ केली. गंगाधरची आता त्या दिशेला बघण्याची हिंमत देखील होत नव्हती. त्याची शुद्ध हरपली.
जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा उजाडून बराच वेळ झाला होता. त्याने लगेच आजूबाजूला चाचपून पाहिले. त्याचे सर्व सामान तसेच होते. स्वतःलाच चिमटा काढून आपण अजूनही जिवंत आहोत याची त्याने खात्री करून घेतली. मग हात जोडून देवाचे आभार मानत तो उठला आणि हादरून त्याच्या तोंडातून अस्पष्ट किंकाळी बाहेर पडली. एक कोल्हा!!
******
"पण तुम्ही तर जिवंत आहात?"
डॉक्टर गंगाधरांची ही कहाणी ऐकणार्या त्या विद्यार्थ्याने आपली शंका प्रस्तुत केली. डॉक्टरांनी एक स्मित केले. चष्मा काढून त्याची काच पुसत ते पुढे सांगू लागले.
"तेव्हा मला खरेच तो जिवंत कोल्हा वाटला होता. पण ते फक्त कोल्ह्याचे कातडे होते. ग्रे फॉक्स जातीच्या कोल्ह्याचे कातडे. तशीच कातडी त्या हल्लेखोरांनी पांघरली होती. आता ते आदिवासी नक्की काय करीत होते, हे हल्लेखोर कोण होते आणि या विध्वंसामागे त्यांचा काय हेतु होता हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत. माझ्या काही पुस्तकांमध्ये मी याचा त्रोटक उल्लेख आणि कारणमीमांसा केली आहे. पण खरे सांगायचे तर अजूनही मी या प्रकाराला समजू शकलो नाही. निदान तुला तरी यश लाभो. बाकी काहीही मदत लागली तर मला नि:संकोचपणे माग. पण हे काय आहे ते शोधून काढ!"
~*~*~*~*~*~
इन्स्पेक्टर महेश जाधवांपुढे आता प्रज्ञा आणि मानसी होत्या. ते एका रेस्तरांमध्ये बसले होते. जाधव साध्या वेषात असल्याने ते पोलिस असतील असे कोणाला वाटले नसते. ३ कॉफी ठेवून वेटर निघून गेला. प्रज्ञा व मानसी अजूनही थोड्या घाबरलेल्याच होत्या. आता शांत भासणारा चेहरा आणि थोड्या वेळापूर्वी प्रचंड कठोर दिसत असलेला चेहरा एकच आहे यावर त्यांना विश्वास ठेवणे कठीण जात होते.
"घ्या कॉफी घ्या. मी इथे अनेकदा येतो, विश्वास ठेवा तुम्हाला आवडेल."
कॉफी खरंच चांगली होती. एक दोन घुटके घेतल्यावर जाधव शांतपणे बोलू लागले.
"तुम्हाला लक्षात येतंय का कि तुम्ही काय करत होतात?"
त्या दोघी मान खाली बसल्या होत्या. आधीच त्यांना ऑन लोकेशन बराच ओरडा बसला होता. नशीब जाधव सर काही कारणाने मर्डर लोकेशन बघायला आले होते आणि ते मानसीला ओळखत असल्याने प्रकरण चिघळले नव्हते. मग तिथे बोलण्यापेक्षा ते त्या दोघींना घेऊन या रेस्तरांमध्ये आले होते.
प्रज्ञाने चॅलेंज स्वीकारून हे प्रकरण अंगावर घेतले खरे; पण ती पडली हौशी डिटेक्टिव. इकडे प्रोफेशनलला देखील डायरेक्ट क्राईम सीन पाहू देत नाहीत तर हिला कुठून देणार? तिच्याकडे हेरगिरीचा परवाना पण नाही. मग अशा नवशिक्या डिटेक्टिवला तिथून हाकलले नसते तरच नवल! मग तिने मानसीसोबत हिकमतीने किल्ल्याच्या त्या पार्टमध्ये घुसून तपासणी करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्या दोघी पकडल्या गेल्या आणि आता जाधवांसमोर बसल्या होत्या. जाधव त्यांच्यापेक्षा जेमतेम १५ वर्षांनीच मोठे होते. त्यामुळे राग निवळल्यावर त्यांना त्यांच्या कृतीमागचा हेतु समजल्यावर हे प्रकरण थोडक्यात आटपायचे ठरवले होते.
"तुमचा हेतु कितीही चांगला असला तरी देखील तुम्ही जे काही करत होता ते संपूर्णपणे चुकीचे होते. मी तुमच्यावर गुन्हा दाखल करू शकतो, क्राईम सीनवर येऊन ढवळाढवळ केली. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न म्हणून तुम्हाला अटक देखील करू शकलो असतो. पण मी असे करत नाहीये हा माझा चांगुलपणा समजा आणि ही थेरं पुन्हा करू नका. समज देऊन सोडतोय. हे लक्षात ठेवा."
दोघींनी मान डोलावली. मानसीने प्रज्ञाला कोपराने ढोसून कळलं ना असा इशारा केला. प्रज्ञा गप्प राहिली.
कॉफी संपवता संपवता जाधवांनी त्यांच्या डोक्यात चालू असलेले काही विचार मांडले.
"तू" ते प्रज्ञाला उद्देशून बोलत होते. "तुला डिटेक्टिवगिरीत रस दिसतोय. पण हे सगळं इतकं सोप्प नसते. जर होम्सच्या गोष्टी वाचून डिटेक्टिव तयार व्हायचे असते तर मग पोलिसांची गरजच पडली नसती. कोणती रहस्य सोडविली आहेस तू? स्वयंपाकीण बाईंनी बदामांची चोरी कशी केली का अजून काही?"
गेस काही वाईट नाही आहे, मानसी कुजबुजली.
"हं कुजबुजू नका आपापसात. काय पाहिले मग तिकडे? काही लावला का शेरलॉक सारखा छडा?"
त्या दोघी अचानक या करड्या पोलिसाच्या टोनमध्ये झालेला बदल पाहून काही क्षण नुसत्या जाधवांकडे बघतच राहिल्या. इन्स्पेक्टर जाधवांचा हेतु मात्र काही वेगळाच होता. त्यांची पक्की खात्री होती कि हे भावनेच्या भरात केलेले साहस होते. या दोघींकडून त्यांना काहीही अपेक्षा नव्हत्या. पण अनेकदा मोठ्यांच्या नजरेतून निसटलेल्या बाबी छोटे हेरतात. यांच्या नजरेत काही वेगळे आले असले तर ते काढून घ्यावे हा त्यांचा इरादा होता.
" हं बोला आता घडाघडा. तुम्हाला सोडतोय म्हणजे तुम्ही काय दिवे लावले ते सगळे माहित पाहिजे ना? जे काही पाहिलं, जाणवलं, सुचलं; काहीही असेल ते सांगा."
एक आवंढा गिळून प्रज्ञा सुरु झाली.
"सर फ्रॅन्कली सांगायचं तर आम्ही जेमतेम सुरुवात केली असेल आणि पकडलो गेलो. पण तरी काही गोष्टी जाणवल्या. एक म्हणजे ..........
तिथे भूत आहे हो.."
जाधवांना हे ऐकून ठसका लागला. मानसीने लगोलग तिच्या पाठीत धपाटा घातला.
"आता तरी तुझी नको तिथे गंमत करायची सवय बदल."
हे ऐकल्यावर जाधवांचे टाळकं फिरले. "ही गंमत वाटतीये? मला अपेक्षा नव्हतीच फारशी. तरी म्हटलं बघू काय केलं यांनी. मीच वेडा आहे. चला निघा आता."
"एक मिनिट सर. सॉरी पण प्लीज ऐकून घ्या."
"पटकन!!"
"सर तुम्ही पावलांचे ठसे घेतले असतीलच? मग त्यात काही वेगळे आढळले का?"
"अं, मला आठवतंय त्यानुसार नाही. यात काही विशेष नाही पण तिथे धुळीत ठसे कितपत टिकतील हा प्रश्नच असतो. तसेही पावसाचे दिवस नाहीत म्हणून हा क्लू काही उत्तर देणार नाही."
"सर पावसाचे दिवस नाहीत हे एक प्रकारे चांगलेच आहे. अनिदादा जिथे सापडला तुम्ही त्याच्या आसपास अधिक बारकाईने पाहिले असणार. पण खूनी जर निसटला याचा अर्थ तो किल्ल्याच्या बाहेर पडण्याच्या दरवाज्यापर्यंत वावरला. मग त्या वावराचा काहीतरी मागमूस हवा ना?"
"तुला म्हणायचंय काय?"
"सर म्हणजे आम्हाला काहीतरी वेगळं दिसलंय. प्रज्ञा आता पाल्हाळ नको लावूस. दाखव ते"
प्रज्ञाने तिच्या मोबाईलमध्ये काढलेला एक फोटो दाखवला.
"सर हा फोटो नीट बघा. हा किल्ल्यातून बाहेर पडण्याच्या वाटेवर जरा आडबाजूला आहे. इथे आसपास काहीतरी पाण्याचा स्त्रोत आहे बहुधा त्यामुळे चिखल तसाच असतो. आम्ही चौकशी केली तर इकडे फारसे कोणीच येत नाही. त्यामुळे याचा काहीतरी संबंध आहे असे आम्हाला वाटते."
तो ठसा एखाद्या प्राण्याचा होता. पंजा अंडाकृती होता. नख्यांच्या खुणा दिसून येत होत्या. तसेच पुढची दोन बोटे जरा जवळ होती. फक्त मागच्या मांसल भागात आणि पुढच्या बोटांमध्ये जरा जास्तीच अंतर होते.
"यात काय विशेष आहे, कुत्र्याचा ठसा आहे. आता मुंबईत कुत्रे नसतात का?"
"सर आम्ही कधीकाळी कुत्रा पाळला होता. मी कुत्र्यांचे ठसे पाहिले आहेत. पहिल्यांदा तर हा साधारण कुत्र्यापेक्षा मोठा आहे. दुसरे म्हणजे कुत्र्याच्या पंजाच्या मांसल भागात आणि पुढच्या बोटांमध्ये इतके अंतर नसते. हा कुठला तरी वेगळ्या जातीचा कुत्रा आहे."
"तुला म्हणायचे काय आहे?"
"सर मला म्हणायचंय अनिदादाच्या गळ्यावरची जखम ही या कुत्र्याने केली आहे. जर एवढा मोठा कुत्रा असेल तर हे सहज शक्य आहे ना? खुन्याने कुत्र्याचा वापर केला असणार हा माझा अंदाज आहे."
इन्स्पेक्टर जाधवांनी बोलणे फारसे लांबवले नाही. असले वेडे प्रयत्न पुन्हा करू नका ही सक्त ताकीद देऊन त्यांनी या दोघींचा निरोप घेतला. तत्पूर्वी तो फोटो आपल्या फोनमध्ये ट्रान्सफर करून घेतला. त्या रात्री ते तो फोटो बघत विचार करत होते. अगदीच काही वाईट तर्क नाही आहे. पोरीचे स्किल पण स्लाईटली अबॉव अॅवेरेज म्हणावे लागेल. ती दुर्लक्षित जागा व्यवस्थित शोधून काढली. पण या तर्कात एक त्रुटी आहे. अनिरुद्धच्या गळ्यात पाच ठिकाणी तीक्ष्ण वस्तुच्या जखमेच्या खुणा आहेत. कुत्र्याला चारच नख्या असतात!!
~*~*~*~*~*~
त्या दिवशी त्याला पुन्हा गरज भासली. संपूर्ण अंगाला थरथर सुटली होती. त्याने आरशात स्वत:ला पाहिले. किती पांढराफटक पडला आहेस तू. आता जायलाच हवे. तो आपल्या फ्लॅट मधून बाहेर पडला. वॉचमनला सकाळी येणार असे सांगून बाहेर पडला. वॉचमनला त्याची अशी रात्रीबेरात्री अचानक बाहेर पडून मग सकाळी परत यायची सवय माहित होती. तो वेगाने गाडी चालवत होता. पोलिसांच्या गस्तीला टाळत, कोणाच्या नजरेला न पडता तो मढ एरियात घुसला. तिथे वेडावाकडा रस्ता काढत तो एका सुनसान भागात घुसला. तिथे इतका मोठा बंगला आहे हे कोणालाही सांगूनही पटले नसते. अर्थातच तो त्याच्या नावावर होता, दुसर्या नकली नावावर. आत घुसल्यावर त्याने सरळ दिवाणखान्यातले बंद पडलेले जुने घड्याळ गाठले. त्याचे काटे फिरवून त्याने दोन्ही काटे सहावर आणले आणि मग ते घड्याळ डाव्या बाजूने दरवाज्यासारखे उघडले. आतल्या पायर्या उतरत तो तळघरात आला. आता वातावरण एकदम थंड जाणवत होते. आज कोणता फ्रीजर उघडावा बरे? मग त्याने समोर असलेल्या दारांपैकी नं २ चे दार उघडले. आतमध्ये तापमान अजूनच कमी होते. उंउंउंउं....... हा जिवंत आहे तर. पण मग असा...... ओह येस गेल्यावेळी जीभ वापरली होती नाही का? त्याने शेजारच्या कोनाड्यात ठेवलेली सिरिंज घेतली. मग साखळ्यांनी बांधलेल्या त्याच्याकडे भेसूर हासत ती सिरिंज मानेजवळच्या शिरेत खुपसली.
********
आता तो किचन मध्ये होता. समोर एका भांड्यात गुलाबी रंगाचे काही तुकडे होते. तो त्यांना मॅरिनेट करण्यासाठी मसाला लावत होता. आज हळद पण वापरू यात का? असे काहीबाही तो स्वतःशीच बोलत होता. त्याचा विचार रोस्ट करण्याचा होता. त्यासाठी ओव्हन प्रीहिटींगला लावला होता. तो खुशीत एक विशिष्ट धून गुणगुणत होता. आता त्याचे अंग थरथर करत नव्हते. एवढा डोस निदान ३-४ दिवसांसाठी पुरेसा होता. आणि येस्स, तो मधूनच म्हणाला. फ्रीजर २ ला रिस्टॉक करायचे आहे. टू-डू लिस्ट मध्ये अॅड केले पाहिजे.
~*~*~*~*~*~
नॉमली एसीपी साहेब आपल्याला बोलावून घेत नाहीत. आज काय विशेष काम असावे अस विचार करीतच जाधव केबिन मध्ये गेले.
"ये महेश बैस. काय घेणार? चहा, कॉफी, ज्यूस वगैरे"
"कॉफी चालेल."
"ओके. दोन कॉफी पाठवून दे. माझी ब्लॅक!"
सीआयडी मध्ये काम करायला लागून आता काही काळ लोटला होता. पण अजूनही महेश यांच्या मनात त्यांना सीआयडी मध्ये आणणार्या एसीपी परीक्षित करमरकरांबद्दल तेवढीच कृतज्ञता होती जेवढी आज होती. नाहीतर नेहमीच्या गुंडाच्या टिपिकल मुंबई केसेसमध्ये अडकून पडण्यापेक्षा जरा बर्या केसेस त्यांना हाताळायला मिळत.
"तर महेश मी ऐकली तू एक मर्डर केस हँडल करत आहेस सध्या."
"होय सर. पण अजून फार काही प्रगती केलेली नाही सर मी. तपास चालू आहे."
"आय नो दॅट. मी तुला इथे बोलावण्याचे कारण वेगळंच आहे. ती केस कोणा दुसर्याला सोपवू. मे बी शिंदेला देऊ. मला तुला दुसरी केस सोपवायची आहे"
"पण सर?"
"ऐकून घे. ही केस महत्त्वाची आहे आणि लवकरात लवकर हिचा छडा लागणे गरजेचे आहे नाहीतर मुंबईत काय होईल सांगता येणार नाही."
"सर?"
"मी तुला थोडक्यात सांगतो काय घडतंय. डिटेल्स तू फाईलमध्ये नंतर वाच. गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईतल्या गॅंग्ज मध्ये घबराट माजली आहे. त्यांची माणसे मेलेली सापडत आहेत, काही जण वेड लागलेल्या अवस्थेत मिळत आहेत, तर काही जण सापडतच नाही आहेत. अॅज इफ हवेत गायब! यामागे कोण आहे, त्याचा हेतु काय याविषयी काही कल्पना नाही. त्यामुळे सर्व गँग्ज एकमेकांकडे संशयाने बघत आहेत. आपल्यावर देखील एक संशयाचा धागा आहेच. थोडक्यात....."
"इंधन भरपूर आहे. आता शेजारी बसून कोणीतरी काडेपेटीतून एक एक काडी काढून ओढून पाहतोय."
"बरोबर! म्हणून ठिणगी पडायच्या आत आपल्या सिचुएशन कंट्रोल मध्ये आणायची आहे. वी माईट नॉट बी एबल टू हँडल द केऑस. खासकरून सामान्य जनांना झळ न पोहोचू देता तर मुळीच नाही. त्यामुळे वी मस्ट प्रीवेंट धिस अॅन्ड फॉर दॅट आय वॉन्ट माय बेस्ट मॅन ऑन इट. मला माहित आहे तू हातातली केस कधीच अर्धवट सोडत नाहीस. पण सध्या हिला प्रेफरन्स दे. जर शिंदे तोवर ती केस सोडवू शकला नाही तर यू कॅन रिझ्युम व्हेअर यू लेफ्ट."
बाहेर पडल्यावर जाधव आपल्या खुर्चीत बसून सिगारेट ओढता ओढता विचार करत होते. ऑफकोर्स ही नवीन केस महत्त्वाची आहे. पण ते विचित्र मर्डर वेपन........ अनिरुद्ध मर्डर केस इंटरेस्टिंग होती यात वाद नाही. खुन्याने अजून तरी कुठलाच ठोस पुरावा सोडला नव्हता. नाही म्हटलं तरी बेस्ट पर्सनेल या मिसिंग गँगस्टर्स वर लावायला लागणार. आणि त्याच वेळी त्यांच्या डोक्यात एक कल्पना चमकून गेली. रिस्की आहे पण वर्थ ट्रायिंग. या प्रकारे आपल्याला त्या आळशी शिंदेवर विसंबून राहायला लागणार नाही. किमान काही विचार तरी होत राहिल. बाकी तपासाचे काम, अॅक्चुअल फील्डवर्क आपण इतर सब इन्स्पेक्टर्स करवी करवून घेऊ शकतो. अॅन्ड जस्ट मे बी धिस विल वर्क लाईक अ मिरॅकल! त्यांनी फोनमध्ये तो नंबर शोधून कॉल लावला ........ प्रज्ञा देसाई.
~*~*~*~*~*~
जॉनी एक पत्यांचा कॅट काढून पिसत बसला होता. त्याला हे करणे आवडायचे. पण तो जाणून बुजून कॅट लावायचा प्रयत्न करायचा नाही. याचा अर्थ असा नाही कि तो कॅट लावू शकत नसे. पण तो प्रॅक्टिस देखील करत नसे. हे तो आवडते म्हणून नेहमी नेहमी करायचा असे पण नाही. त्याच्या वागण्याला, जगण्याला एकच शब्द योग्य होता - रँडम!! त्याने पत्ते पिसून मग उलगडून ठेवले. ३ सत्ते, दोन तिर्री - फुल हाऊस. नॉट बॅड फॉर स्टार्ट.
कुई कुई
त्याने शेजारी पाहिले. ते करडे जनावर हलक्या आवाजात गुरगुरत त्याच्या मांडीला आपली मान घासत होते.
"काय दोस्ता? आज कुठे फिरून आलास?"
त्या कोल्ह्याने काहीच उत्तर दिले नाही.
"हेहे. बरं नको सांगूस. रात्री पुस्तकात लिहून ठेव. गुगल ट्रान्सलेटचा बाप आहे ना ते. तेच करेल तुझी भाषा ट्रान्सलेट!!"
त्याला हे माहित नव्हते कि समोरच्या गच्चीवरून कोणी त्यांच्यावर नजर ठेवून आहे.
"होय मला तो दिसतोय. हो मी सर्व काळजी घेतली आहे रसूलभाई. पण जरा सरकिटच आहे. एकटाच बडबडतोय पण आव असा जणू शेजारी कोणी बसले आहे आणि तो त्याच्याशी गप्पा छाटतोय."
(हा या खबरीचा शेवटचाच कॉल होता. त्यानंतर तो रसूलला परत कधीच सापडला नाही.)
~*~*~*~*~*~
क्रमशः
पुढील कथासूत्र येथे - http://www.maayboli.com/node/53754
हैराण!! यावेळी फुल्ल हैराण
हैराण!! यावेळी फुल्ल हैराण केलं आहे तुमच्या कथेने, पायस! प्लीज पटापट पुढचे भाग टाका. आता उत्सुकता स्वस्थ बसू देत नाहीये आणि शिवाय आधीच्या भागांचा ट्रॅक ठेवताना गडबडगुंडा होतोय.
इंटरेस्टिंग ! पुलेशु.
इंटरेस्टिंग ! पुलेशु.
मस्तच
मस्तच
पार्ट बाय पार्ट वाचून काही
पार्ट बाय पार्ट वाचून काही उपयोग होणार नाहीये.. सगळे भाग आल्यावर एकदमच वाचावी झालं..
पायस! प्लीज पटापट पुढचे भाग
पायस! प्लीज पटापट पुढचे भाग टाका. आता उत्सुकता स्वस्थ बसू देत नाहीये+ १
super interesting!
super interesting!
super interesting! +१००१
super interesting! +१००१
खुप वेळ लावला पायस .. भराभर
खुप वेळ लावला पायस .. भराभर येउद्या भाग पुढचे.. हा भाब पण क्लास जमलाय
सर्वांना धन्स आधीच स्पष्ट
सर्वांना धन्स
आधीच स्पष्ट करतो कि यावेळेस भाग लेट होतील. प्रयत्न हाच राहिल कि लवकरात लवकर ही कथा संपवायची आहे, पण जरा अवघड आहे. कामांतून टंकण्यासाठी वेळ काढणे हा मुद्दा आहेच आणि ही कथा कॉम्प्लिकेटेड आहे. त्यामुळे मला लिंक्स कुठे चुकत नाही आहेत ना हे वारसापेक्षा जास्ती वेळा तपासावे लागत आहे. जसे हिम्सकूल म्हणत आहेत तसे एकत्र वाचली तर कदाचित तितकी क्लिष्ट वाटणार नाही आणि पटकन समजेल सुद्धा; पण पार्ट बाय पार्ट वाचण्याचा फायदा आहे कि दर भागात subtle hints आहेत. त्यामुळे एक वेगळा अनुभव राहिल. असो तुम्हा सर्वांना कथा आवडत आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचे, त्यामुळे पुन्हा एकदा धन्स!
एक्स्ट्रॉ फीचर
[१] - http://en.wikipedia.org/wiki/Dogon_people#Dogon_and_Sirius
डोगोन जमात मुळात त्यांच्या पो टोलो आणि सेगुईच्या तार्याच्या सणामुळे प्रसिद्ध आहे. त्यांना कित्येक वर्षांपासून हे माहित आहे कि मुळात व्याधाचा तारा (Sirius) हा एक तारा नसून तीन तार्यांची सिस्टीम आहे. त्याविषयी इत्थंभूत माहिती त्यांना आहे, कशी कोणाला माहिती नाही. याशिवाय त्यांचे खगोलशास्त्रीय ज्ञान (दंतकथांमध्ये विखुरलेले) जबरदस्त आहे.
वर लिहिलेला समारोह काल्पनिक आहे. असा कोठलाही सण ते साजरा करीत नाहीत. पण युरुगु हा त्यांच्या देवतांपैकी खरेच एक देवता आहे आणि ती त्रासदायक देवता आहे. त्यांच्या इथे सैतानाची संकल्पना नाही पण युरुगु एकंदरीत तसला देव आहे; fallen angel ल्युसिफरचा equivalent! हिंट अशी आहे कि युरुगु = god of chaos!!
हा भागही मस्तच! आधीच्या
हा भागही मस्तच!
आधीच्या भागांचा ट्रॅक ठेवताना गडबडगुंडा होतोय.>>+१
त्यामुळे जास्त लेट करु नका प्लीज.
तुमचा रिसर्च भारी असतो.
तुमचा रिसर्च भारी असतो. ग्रेट!
आधीच्या भागांचा ट्रॅक ठेवताना
आधीच्या भागांचा ट्रॅक ठेवताना गडबडगुंडा होतोय.>>+१
त्यामुळे जास्त लेट करु नका प्लीज.>>>+१११
तुम्ही
तुम्ही म्हटल्यप्रमाणहेप्रत्येक भागाला वेळ लागणार हे मान्य.
पण तरीही विचारावंसं वाटतंच "पुढचा भाग कधी?"
पुढचा भाग ल्हिवा कि राव .
पुढचा भाग ल्हिवा कि राव . किती दिवस झाले . आधीचे भाग विसरायला पण सुरवात झाली