कलियुग आले , परवा कोणी म्हटले होते

Submitted by बाळ पाटील on 19 April, 2015 - 01:06

जगणे म्हणजे मरणे आहे पटले होते
कलियुग आले , परवा कोणी म्हटले होते

त्यांची आता इवली - इवली घरटी झाली
कोणे काळी गजबजलेले खटले होते

कोयी धरण्या आधी कैर्‍या झडल्या सार्‍या
अवकाळीचे वादळ तेथे झटले होते

वठलेल्या खोडांना फुटवे आता फुटले
जाहीराती न्याहाळुन वय घटले होते

लोकांनाही स्थळकाळाची महती कळली
शवयात्रेला जाण्यासाठी नटले होते

ते वेगाने सरकत गेले पुढती - पुढती
तितके मागे क्षितिजाचे स्थळ हटले होते

सांप्रत मीही पहिल्यावानी बरळत नाही
सत्याचे केव्हा कोणाशी पटले होते !

-- बाळ पाटील

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users