मागील भाग -
प्रिटी वूमन - भाग १
प्रिटी वूमन - भाग २
"झाली तयारी? निघायचं?", नजमाने विचारले.
"हो झालं", कॅरी बॅग उचलत मर्जिना म्हणाली, "निघूया".
घरचा दरवाजा बंद करून दोघी जिना उतरू लागल्या.
आज मर्जिनाचा ऑफिसचा पहिला दिवस. थोडी उत्सुकता, थोडी भीती असे संमिश्र विचार तिच्या मनात येत होते. गेले काही दिवस नजमा तिची पूर्वतयारी करून घेत होती. आपले काही ड्रेस तिने टेलरकडून टाके घालून मर्जिनासाठी तयार केले होते. कालच फेशियल करण्यासाठी पार्लरमध्ये गेली तेव्हा मर्जिनालाही घेऊन गेली, आयब्रौज करून घेण्यासाठी! बाकी मेकअप तर तिला येत होताच. प्रश्न होता अंग लचकवित डान्स करण्याचा! पण ते काय ती शिकेलच बघून-बघून, असा नजमाने विचार केला. तिला तरी कुठे काय येत होते पहिल्यांदा गावाहून पळून इथे आली तेव्हा!
"नाव काय सांगायचं आठवतयं ना?", नजमाने विचारले.
"हो. मर्जि....क्...काजल..", मर्जिना म्हणाली.
"हं. काजल. नीट लक्षात ठेव. विसरू नकोस. आणि बाकीचही लक्षात आहे ना सगळे?"
मर्जिनाने मान डोलावली. नाक्यावरच नजमाने हात दाखवून रिक्षा थांबवली आणि दोघी आत शिरल्या.
मावशीचे हॉटेल मर्जिनाने अनेक वेळा बाहेरून पाहिले होते. दर वेळेस कधी त्या भागातून जायची वेळ येई तेव्हा नजमा तिला ते दूरूनच दाखवी. रिक्षा त्या भागात पोचली तशी नजमाने रिक्षाला आतल्या रस्त्याने घ्यायला लावली आणि हॉटेलच्या मागच्या बाजूच्या एका छोट्याश्या गल्लीत थांबवली.
"हे काय? इथे का रिक्षा थांबवली? हॉटेल तर पुढच्या रस्त्यावर आहे ना?", मर्जिनाने विचारले.
रिक्षावाल्याचे पैसे देऊन नजमा पुढे होत म्हणाली, "हे बघ. ते मेन डोअर आहे ना ते कस्टमर साठी. आपल्यासाठी नाही. आपल्याला जाण्या-येण्यासाठी हा मागचाच दरवाजा वापरावा लागतो. समजलं?".
"अर्थात कस्टमरनादेखील बारानंतर हाच दरवाजा वापरावा लागतो, ते सोड...", नजमा पुटपुटली.
सांडपाण्याचा एक छोटासा ओहोळ ओलांडून त्या हॉटेलच्या मागच्या दरवाजापाशी पोचल्या. "काय गलिच्छ भाग आहे", मर्जिनाच्या मनात विचार आला. पण काही न बोलता ती नजमाच्या पाठोपाठ दरवाजा ओलांडून आत शिरली.
एका अंधारलेल्या कॉरिडोरमधून त्या जात होत्या. बाहेरून कुठूनतरी दणादण गाण्याचा आवाज येत होता. अधून्-मधून काही मुली येतजात होत्या आणि वेटरांचीही लगबग दिसत होती. मर्जिना नवागतासारखी इकडे-तिकडे पाहत नजमाच्या पाठून मुकाट्याने जात होती.
एका काऊन्टरपाशी आल्यावर नजमा थांबली. मर्जिनाही तिच्या बाजूला उभी राहिली. काऊन्टरच्या पलिकडे एक किंचित गोरा, किडकिडीत इसम उभा होता आणि त्याच्या जरा मागच्या बाजूला एक काळसर, मजबूत बांध्याचा, लाल टिळा लावलेला, जरासा उग्र चेहेर्याचा माणूस उभा होता.
"कल बतायाथा ना मैने मेरे भांजी के बारे मे. ये है वो", नजमा म्हणाली.
"क्या नाम बताया?", किडकिडीत माणसाने विचारले.
"काजल", नजमा म्हणाली.
"ठीक है", एक जाडजूड रजिस्टर काढून तो म्हणाला, "बॉक्स नंबर सतरा. याद रखना"
"उमर क्या है उसका?", टिळावाल्याने विचारले.
"सतरा", नजमा म्हणाली.
"सतरा? सच बोलो. पंधरा लगती है. कोई बात नही. प्रॉब्लेम हो तो जल्दी भगाना पडेगा", टिळावाला म्हणाला, "सब समझाया ना उसको?"
"हां", नजमा म्हणाली आणि त्या तिथून निघाल्या.
वाटेत एक हाफ-पॅन्ट घातलेला पोरगा जाताना दिसला.
"ए छोटू, दो चाय लेके आना", नजमाने सांगितले अणि त्या दोघी एक जिना चढून वरच्या मजल्यावरच्या एका खोलीपाशी जाऊ लागल्या.
"रंड चा, डॉली", छोटूने किचनच्या दारातूनच दिलेली ऑर्डर दोघींनी ऐकली.
"तो जाडा, टिळा लावलेला आपला शेठ. या हॉटेलचा मॅनेजर" नजमा मर्जिनाला सांगू लागली, "आणि ही पोरं आहेत ना, हाफ पॅन्टवाली? ते सगळे छोटू".
"सगळ्यांचं नाव छोटू?", मर्जिनाला आश्चर्य वाटलं.
"त्यांची खरी नावं काय असतील ती असतील. आपल्यासाठी ते छोटूच", नजमा म्हणाली, "कस्टमरना जसे वेटर तसे आपल्याला हे छोटू. चहा-पाणी आणि इतर सटर-फटर गोष्टींसाठी. जाताना दहा-दहा रुपये टीप द्यायची सगळ्यांना".
"ही आपली मेकअप रूम", त्या खोलीपाशी आल्यावर नजमा म्हणाली, "ही फक्त मुलींसाठी. अर्थात छोटू आणि शेठ येऊ शकतात पण वेटर लोकं नाही आणि कस्टमर तर नाहीच नाही".
दार उघडून दोघी आत आल्या. मर्जिनाने सगळीकडे डोळे फिरवून पाहिले. एका आडव्या भिंतीवर एक भलामोठा आरसा लावला होता आणि त्याच्या पुढे बसण्यासाठी छोटी-छोटी प्लॅस्टीकची स्टूल! खोलीच्या दुसर्या टोकाला एक मळकट पडदा टाकून आडोसा बनवला होता - मुलींना कपडे बदलण्यासाठी. दोन-तीनचे घोळके करून दहा-बारा मुली काहीबाही बडबडत होत्या. कोणी मेकअप करीत होत्या तर कोणी चहा-ज्यूस वगैरे पीत होत्या. हवा थंडगार होती. घर-घर आवाज करीत एसी चालू होता.
"आठ-साडेआठला सगळ्या मुली तयार होऊन खाली हॉलमध्ये गेल्या ही एसी बंद!", नजमा म्हणाली.
तेवढ्यात छोटू दोन चहा घेऊन आला. आणि दोघी चहा पिऊ लागल्या.
"डॉली, हीच का ग तुझी भाची?", एका मुलीने जवळ येऊन विचारले.
"हो", नजमा म्हणाली.
"काय नाव तुझं?", तिने मर्जिनाला विचारले.
"काजल..", मर्जिना म्हणाली.
"आत्ताच सुरुवात केलेली बरी. मला नाही वाटत मी अजून दीड-दोन वर्षांपेक्षा जास्त ह्या लायनीत राहू शकेन", नजमाने तिला सांगितले.
"हं ऽऽऽ तेही खरचं. मीही विचार करतेय गावाहून धाकटीला बोलवायचा", ती मुलगी म्हणाली.
"झाला चहा? चल आता तोंड धुऊन घेऊ. मेकअप करू. कपडे बदलून खाली हॉलमध्ये जाऊ", नजमा म्हणाली.
आणि त्या दोघी उठून उजव्या कोपर्यातल्या वॉश बेसिनकडे जाऊ लागल्या.
*******
तयार होऊन हॉलमध्ये जाण्यापूर्वी मर्जिना मेकअप रूममधील आरशासमोर उभी राहिली. पायघोळ घागरा आणि पाठीवर अनेक बंद असलेली चोळी. पोट तर उघडे दिसत होतेच पण पाठही बरीचशी उघडी होती. गावात तिच्या वयाच्या मुली बुरख्याशिवाय बाहेर पडू शकत नव्ह्त्या आणि मी अशी ह्या कपड्यात?. तिच्या मनात विचार आला. पण मावशीसकट सगळ्याच जणी असल्या ड्रेसमध्ये होत्या!
तिने केसावरून एक हात फिरवला आणि मेकअप पुन्हा एकदा निरखून पाहिला. मावशीच्या हिरवट रंगाच्या लेन्सची तिने घरी घालून घालून सवय केली होतीच पण इतर मेकअपदेखील बर्यापैकी जमला होता.
नजमाच्या पाठोपाठ ती जिना उतरून हॉलच्या दिशेने जाऊ लागली.
*******
एका मोठ्या हॉलच्या एका टोकाला फूटभर उंचीचे स्टेज बनवले होते. पंचवीस-तीस मुली तिथे उभे राहून नाचत होत्या. रंगीबेरंगी दिव्यांचा प्रकाशझोत स्टेजवरून फिरत होता. कानठळ्या बसविणार्या आवाजात गाणी लागली होती. समोर टेबलांच्या रांगा आणि त्यावर बसलेले अनेक कस्टमर. प्रत्येकाच्या पुढ्यात ग्लास आणि ग्लासात दारू! टेबलांमधील मोकळ्या जागेत वेटर मंडळी उभी.
मर्जिनाने इकडेतिकडे पाहिले. स्टेजच्या तीनही बाजूला भिंत भरून आरसे लावले होते. त्यामुळे तो हॉल आणखीनच मोठा वाटत होता. चार-पाच मुलीच काय त्या व्यवस्थित नाचत होत्या बाकीच्या उगाच अंग हलवीत उभ्या होत्या. मर्जिनाला तेही करायची लाज वाटली. ती तशीच स्टेजच्या एका कोपर्यात उभी राहिली.
अधून्-मधून कस्टमरपैकी कोणी एखाद्या मुलीला जवळ बोलावित असे आणि हातात काही पैसे देत असे. तेवढ्यात एक वेटर स्टेजवर आला आणि समोर नाचणार्या एका मुलीच्या गळ्यात नोटांनी भरलेली माळ घातली! मर्जिना हा प्रकार पहिल्यांदाच पाहत होती. गाणे संपल्यावर तिने ती माळ गळ्यातून काढली आणि वेटरच्या हातात दिली. वेटरने एक छोटी चिठ्ठी तिच्या हातात दिली. काही वेळाने नोटांची थप्पी घेऊन एक वेटर आला आणि दुसर्या एका मुलीच्या अंगावर ते उधळू लागला. नोटा इतस्थत: पडू लागल्या तशे चार्-पाच इतर वेटर त्या उचलून गोळा करू लागले. सगळ्या नोटा गोळा करून झाल्यावर त्यांनी त्या त्या मुलीच्या हातात दिल्या.
मर्जिनाला हे सगळेच प्रकार नवीन होते.
असा किती वेळ गेला कुणास ठाऊक. मर्जिना नुसतीच डोळे विस्फारून पाहत होती. खांद्याला कोणाचा स्पर्श झाला म्हणून तिने चमकून मागे वळून पाहिले तो एक वेटर एका कोपर्यावरच्या टेबलाकडे बोट दाखवून तिला सांगत होता - "बुला रहा है".
मर्जिना स्टेजवरून उतरून त्यांच्या कडे गेली. तो चार-पाच जणांचा ग्रूप तिच्या कडेच पाहत होता. तिला कसेसेच वाटले. त्यातील एकाने पन्नासची एक नोट तिच्या हातात दिली आणि विचारले, "नाम क्या तेरा?"
दारू आणि सिगरेट मिश्रीत भपकार्याने तिला मळमळून आले.
"काजल", ती कशी बशी उत्तरली.
"नयी आयी है क्या?"
"हां"
"वैसाईच लगा. डान्स नही कर रही. अरे थोडा कमर लचकाऑ तो और पैसा देगा क्या?"
बाकीचा ग्रूप दात विचकत हसू लागला.
मर्जिनाला तिथे राहवेना. ती स्टेजवर परत आली. तिथे मावशी कुठे दिसेना म्हणून ती जिना चढून मेकअप रूम मध्ये आली. तिथे काही मुली गप्पा मारत होत्या.
"भावाला मलेशियात चान्स मिळतोय पण एजंट दोन लाख मागतोय. कुठून आणू? गावच्या मंडळींनी तगादा लावलाय. काय करायचं कळत नाही", एक म्हणाली.
"हो ना. त्यांना वाटत आपल्याकडे पैसेच पैसे आहेत. आपल्या गोष्टी आपल्यालाच माहित. नाही का?", दुसरी.
"नाहीतर काय? ड्रेस, मेकअप सामान, पार्लर, रिक्षा यातच अर्धे पैसे जातात. त्यातून आपला घरखर्च आणि मग गावाला पाठवायचे. हातात काय उरतात?", पहिलीने दुजोरा दिला.
"ए ऽ तेरा आदमी का क्या हुवा रे? आज पण झगडा का?"
"नाव नको काढू त्याचं xxxxxxxx", एक करकचून शिवी घालत ती मुलगी म्हणाली, "आजकाल मुलुंडच्या कुठल्याशा बार मध्ये जाऊन बसतो आणि उधळतो कोणावर तरी". असे म्हणून पुन्हा एक पुन्हा एक शिवी हाणत तिने गुटख्याचं पाकिट तोंडाला लावलं
नजमा तिथेही नव्हती.
तिची गोंधळलेली नजर पाहून जवळच उभ्या असलेल्या एका छोटूने विचारले, "आँटी को ढूंढ रही है क्या?"
मर्जिनाने मान डोलावली.
"वो VIP में है. उसका दोस्त आया है ना.."
VIP? आता हे काय नवीनच. मर्जिना विचारात पडली.
"चलो मै दिखाता हूं", छोटू म्हणाला, "किसिका दोस्त आता है तो वो हॉलमे नहे बैठता, इधर VIP मे आता है". छोटू जाता जाता माहिती पुरवित होता.
हॉलच्याच बाजूला आणखी एक छोटी खोली होती, तिथे भिंतीच्या कडेला सोफे ठेवले होते आणि समोर टीपॉय! मधोमध मोकळी जागा होती. तिथे अगदी तुरळक माणसे होती आणि मुलीही पाच-सहाच होत्या.
तिने एका कोपर्यात पाहिले. तिची मावशी एका वयस्क माणसाला खेटून हसत-खिदळत होती!
तिला तिथेही राहवेना. ती पुन्हा हॉलमध्ये गेली आणि स्टेजवर एका कोपर्यात चूपचाप उभी राहिली.
*******
आता बारा वाजून गेले होते.
"मर्जिना", नजमाने हाक मारली, "चल थोडं खाऊन घेऊ".
दोघी पुन्हा मेकअप रूम मधे आल्या. नजमाने फ्राईड राईस सांगितला होता. मर्जिनाच्या हातात आता काही नोटा जमल्या होत्या.
"अग ह्या अशा थोड्या थोड्या वेळाने काऊन्टरवर नेऊन द्यायच्या. तुझा बॉक्स नंबर काय सांगितला होता त्याने? सतरा ना? हो. सतराच. मग शेवटी ते हिशेब करतात. आणि शंभराला साठ असे आपल्याला देतात", नजमाने समजावले.
*******
पहाटेचे चार वाजले. गिर्हाहिके अगदीच तुरळक उरली तेव्हा नजमा पुन्हा मर्जिनापाशी आली आणि म्हणाली, "चल आता निघू".
त्या पुन्हा मेकअप रूम मध्ये गेल्या. कपडे बदलून पुन्हा पंजाबी सूट घातले. तोंड धूऊन मेकअप काढून टाकला. आणि बॅगा घेऊन काऊन्टरपाशी आल्या. त्याने रजिस्टरमध्ये बघून त्यांच्या हातात पैसे टेकवले. मर्जिनाने पाहिले तर चारशे रुपये होते. तिची पहिली कमाई!
"हे तुझ्याकडेच ठेव. जेव्हा तुझा जम बसेल तेव्हा घरखर्चाला वापरू तुझे पैसे", नजमाने तिला सांगितले.
*******
का कुणास ठाऊक पण मर्जिनाला राहून राहून आईची आठवण येत होती. घरी येउन जेवायचीदेखील तिची इच्छा होईना. ती तशीच पलंगावर पडली पण झोपही येईना!
तिला आईचा चेहरा आता अंधुकसा आठवत होता. आई जाण्यापूर्वी काही दिवस आधी घडलेली गोष्ट तिला अचानक आठवली.
मर्जिना चौथीत होती. शाळेत जाण्यासाठी दप्तर भरत होती पण एक पुस्तक तिला मिळत नव्हतं. ती शोध शोध शोधत होती. शेवटी तिचे लक्ष गेले तर पुस्तक आईच्या हातात. निरक्षर आईने ते पुस्तकदेखील उलटे धरले होते!
पुस्तक घ्यायला ती आईजवळ गेली. आईने पुस्तक दिले आणि तिच्या पाठीवर हात ठेवून म्हणाली, "बाबांसारखी मॅट्रीक हो बरे!"
राहून राहून तिला ती आठवण येत होती आणि त्याच बरोबर आठवत होते आज संध्याकाळी हॉटेलमध्ये घडलेले प्रसंग, कस्टमरांचे अचकट-विचकट बोलणे आणि आविर्भाव, तो दारू, सिगरेट, गुटख्याचा वास!!
तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.
तिने वळून पाहिले. काल गावाहून निरोप आला होता. त्यांना पैशाची निकड होती. मावशी उद्या मनी ऑर्डर करण्यासाठी पैसे मोजत होती .
अणि मर्जिनाच्या हातातील ते चारशे रुपये - तिची पहिली कमाई - आसवांमध्ये पूर्णपणे भिजली होती!
******* ******* *******
(क्रमशः)
सुंदर....
सुंदर.... लेखनशैली छान आहे... पण थोडी तुटक वाटली.... कदाचित तुमचे आधीचे भाग मी वाच्ले नसतील म्हणुन असेल...
छान
छान
डोळे भरुन
डोळे भरुन येताहेत्..पण पुढच्या भागाची उत्कंठाही आहे. लवकर येवु द्या ....
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
कुंद कहाँ, पयवृंद कहाँ, अरु चंद कहाँ ,
...................... सरजा जस आगे ...?
बाज कहाँ, मृगराज कहाँ, गजराज कहाँ ,
.................... तेरे साहस के आगे...?
विशाल ला
विशाल ला अनुमोदन