युरुगुचे पुस्तक : भाग ०

Submitted by पायस on 11 April, 2015 - 18:57

उपोद्घात

"........... तर मी सांगितल्याप्रमाणेच देव एकच आहे आणि जीजस हा त्याचा एकमेव पुत्र! जीजसने तुमची सर्व पापे आपल्या शिरी घेतली आहेत. एकदा तुम्ही जीजसला शरण गेलात कि तुम्हाला कसलीही काळजी करावी लागत नाही. ख्रिश्चन धर्म हा म्हणूनच सर्वश्रेष्ठ आहे कारण तो साक्षात देवपुत्र जीजस ख्राईस्टच्या शिकवणुकीवर आधारला आहे. डोगोन जमातीच्या माझ्या बांधवांनो, माझे ऐका. मी फादर फ्रान्सिस, पोपने दिलेल्या अधिकारांनुसार तुम्हाला बाप्टाईज करून या पवित्र धर्माची दीक्षा देऊ इच्छितो. आणि.........."

सन १९०६, पश्चिम आफ्रिकन देश, माली.

१९व्या शतकात आफ्रिका खंडात युरोपीय वसाहतवाद पसरला. एक इथिओपियाचा अपवाद वगळता सर्व आफ्रिकन खंड विविध देशांनी वाटून घेतला. माली हा एकेकाळचा समृद्ध देशही त्याला अपवाद नव्हता. जिथे कधी एक विशाल साम्राज्यकेंद्र होते तोच देश २०वे शतक उजाडता उजाडता त्या साम्राज्याच्या क्षेत्रफळाच्या निम्म्या आकाराच्यादेखील नसलेल्या फ्रान्सची एक वसाहत होता. फ्रेंच सुदानचा गव्हर्नर आज मालीचा सर्वेसर्वा होता. अर्थात धर्मप्रसारात अग्रेसर असलेले मिशनरी यापूर्वीच आपले पाय पसरून मोकळे झाले होते. फादर फ्रान्सिस हा असाच एक मिशनरी. आपल्या कामात पक्का मुरलेला. गिनीच्या किनारी प्रदेशात त्याने हे देवाचे काम चोख बजावले होते. आता तो माली मध्ये हेच काम पुढे नेत होता.

ही त्याच्या काम करण्याच्या अनेक पद्धतींपैकी एक होती. ख्रिश्चन धर्माची महती पटवून देणारे एक अत्यंत रसाळ व्याख्यान द्यायचे. आत्ता तो डोगोन जमातीच्या एका कबिल्यात होता. हे त्याचे पहिलेच व्याख्यान होते. प्रतिसाद तर बरा दिसत होता. तो प्रसन्न चेहर्‍याने त्यांचा ऐकून घेण्याचा संयम संपण्यापूर्वी जास्तीत जास्त ब्रेनवॉशचा प्रयत्न करत होता. अचानक एका म्हातारबाने त्याला विचारले. दुभाषाही जरा गडबडला
"म्हणजे हा जीजस अम्माचा मुलगा का?"
अम्मा? हा नक्की यांचा कोणी देव असणार. फ्रान्सिसने प्रसंगावधान राखून उत्तर दिले, तसेच समजा हवे तर.
"पण अम्माला तर तीनच मुले ओगो, यासिगी आणि युरुगु. हा चौथा कुठून आला?"
आता उत्तर देणे कठीण होते. फ्रान्सिसने उगाचच पुढ्यातले बायबल चाळल्यासारखे केले आणि काहीतरी थातुरमातुर उत्तर देऊन आवरते घेतले. त्याला माहित होते कि पहिल्या फटक्यात काम होणे शक्यच नाही. पण हा कबिला पुष्कळच शांत स्वभावाचा वाटत होता. त्याच्या दुभाष्याने ज्या पद्धतीने सुरुवातीला इथे यायला आढेवेढे घेतले होते ते पाहता हा अगदीच अनपेक्षित सुखद धक्का होता. दुभाषी कबिल्याच्या प्रमुखाशी बोलून लगेच येतो असे सांगून जरा दूर गेला. आणि तेवढ्यात कोणी एकजण त्याच्या समोर उभा ठाकला. त्याला नंतर यायला सांगावे असे म्हणणार तेवढ्यात तो उद्गारला
"फ्रांसे, अन पू अन पू (Francais, un peu un peu)"
फ्रेंच येते, तोडकी मोडकी. पण आता याचा काय उपयोग? उत्तम दर्जाचा डोगोन व फ्रेंच बोलू शकणारा दुभाषा तर आहे बरोबर. बरं काय हवे हे तर विचारू?
"बोलला आवडले तुम्ही. मदत इच्छा करू. घेणे हे"
तोडक्या मोडक्या फ्रेंचमध्ये त्याने फ्रान्सिसची मदत करण्याची इच्छा दर्शवित एक पुस्तक हातात सोपवले. त्याला पुस्तक म्हणायचे का इथून प्रश्न होता. केवळ बांधणी पुस्तकासारखी म्हणून त्याला पुस्तक म्हणायचे. बाहेरून करड्या रंगाच्या केसांनी झाकलेले कातडी कवर होते. त्यावर चित्रविचित्र खुणा कोरून काढल्या होत्या. आतला कागद त्याने कधीही न पाहिलेल्या प्रकारचा होता. त्यावर निळ्या शाईने काहीतरी लिहिले होते. अरे मी याचे काय करू, हं?? तो माणूस गायब झाला होता. त्या आदिवासीला नीट बघताही आले नव्हते आणि तो हे विचित्र पुस्तक सोपवून गेला होता. मला हे वाचता तरी येणार आहे का?
हा विचार करता करता तो पुस्तक निरखून पाहू लागला आणि त्या खुणा जणू स्वतःला नव्याने मांडू लागल्या.
"लिव्ह्र दे युरुगु (book of yurugu, युरुगुचे पुस्तक)"
त्याने दचकून ते पुस्तक खाली टाकले. हे पुस्तक फ्रेंचमध्ये कसे असू शकेल? पण त्याचे कुतुहल चाळवले होते. उजव्या हाताने गळ्यातला क्रॉस घट्ट पकडून त्याने थरथरत्या हाताने ते पुस्तक उचलले.
"फादर..." दुभाषा परत आला होता. "फादर जेवणाची सोय झाली आहे."
"अं हो हो. चला चला." त्याने ते पुस्तक आपल्या पायघोळ झग्यात लपवले आणि तो चालू लागला.
****

रात्रीदेखील त्याला ते पुस्तक चैन पडू देत नव्हते. मशालीच्या उजेडात तो डोळे तारवटून ते वाचण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या चुळबुळीचा आवाज ऐकून दुभाषा आत आला.
"फादर. काय करत आहात? झोपा आता. आणि हे काय आहे? बायबल तर दिसत नाही."
फ्रान्सिसने प्रतिक्षिप्त क्रियेनेच ते पुस्तक लपवले.
"कुठे काय? काही नाही. तू जा मी झोपतो लवकरच." असे म्हणत त्याने दुभाषाला जवळपास हाकललेच. पण त्याने हे पाहिले नाही कि दुभाषा घामाने भिजला होता. करडे केस. शंकाच नको. युरुगुचे पुस्तक! त्याने आपल्या तंबूत न जाता सरळ जंगलातून बाहेर पडायच्या वाटेने धूम ठोकली. पुस्तक देणारा आदिवासी जंगलातल्या एका झाडावर बसून त्याची गंमत पाहून हसला मात्र!!

इकडे फ्रान्सिस अधिकाधिक लक्ष देऊन वाचण्याचा प्रयत्न करत होता. तो जेवढा समरसून एकाग्र होत होता तेवढे ते पुस्तक फ्रेंच बनत होते. आणि अचानक चमत्कार घडला........

".......युरुगुच खरा देवपुत्र आहे. मी इतके दिवस एका खोट्या देवाला पुजत होतो. मी पाप केले आहे. युरुगुला अम्माने हाकलून दिले. पण युरुगु परत येणार. युरुगुचे साम्राज्य पसरवणे हाच खरा धर्म. मी पाप केले. मी त्याची शिक्षा भोगणार...."
दुसर्‍या दिवशी सकाळी फ्रान्सिस एका झाडावर उभा राहून मोठमोठ्याने बोलत होता. सगळे आदिवासी त्याच्याकडे चमत्कारिक नजरेने पाहत होते. तो डोगोन भाषेत बोलत होता. युरुगुचे नाव ऐकून त्यांना नाही म्हणायला कल्पना आली होतीच. पण बहुतांश जणांची हे पाहण्याची पहिलीच वेळ होती. फ्रान्सिसने झाडावरून खाली उडी मारली. तो हवेतच लटकत राहिला. त्याने एका मजबूत वेलीचा गळफास लावून घेतला होता.
दूरवर तो विशिष्ट आदिवासी त्याच्याकडे टक लावून बघत होता. मग त्याने हातातले ते पुस्तक एकदा निरखले व निराश होऊन एक सुस्कारा सोडला.

"हा प्रयोग देखील अपयशी."

****

"......पण तुला फादर फ्रान्सिस बरोबर याचकरिता पाठवले होते ना? तू पळून कसा आलास? आणि आता ते कबिलेवाले म्हणत आहेत कि त्याने आत्महत्या केली. कशावरून त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा? कधी कोणा मिशनर्‍याने आत्महत्या केलेली ऐकली आहे का?"
त्या दुभाषा बनायला तयार झालेल्या आदिवासी तरुणाची उलटतपासणी चालू होती. सगळेच गोंधळून गेले होते. हे प्रकरण दाबले असले तरी किमान काही चौकशी होणे गरजेचे होते.
" मॉन्शर तुम्ही कोणावर विश्वास ठेवायचा तो तुमचा प्रश्न आहे. पण पुन्हा सांगतो त्या कबिल्याच्या, खरेतर त्या जंगलाच्या तुकड्याच्या वाटेला जाऊ नका. तो युरुगुचा प्रदेश आहे. युरुगुचे पुस्तक वाचत होता तो. आणि युरुगुचे पुस्तक वाचणे म्हणजे तुमचा मृत्युलेख वाचणे!!"

~*~*~*~*~*~

वर्तमान, मुंबई

माहिमच्या किल्ल्याबाहेर गाडी थांबली. इन्स्पेक्टर महेश जाधव प्राथमिक पाहणी करायला आले होते. आज सकाळी पर्यटक मंडळींना ते प्रेत मिळाले होते. त्यांनी हवालदारांना पंचनामा करायला सांगितला आणि बातमी दिलेल्या व्यक्तीशी बोलायला सुरुवात केली.
"ह्म्म. नाव काय?"
"जी. तुकाराम कोळपे."
"बरं तुकाराम, इकडे काय करत होतात?"
"जी मी गाईड म्हणून काम करतो. ही फारीनर लोक दिसत आहेत त्यांना किल्ला हिंडवायला घेऊन आलो तर मडमेला हे आक्रीत दिसलं. मी लगेच फोन लावला. हां पोलिसांना सहकार्य देण्यात आपला नेहमी पहिला नंबर असतो. तर मी लगेच फोन लावला...."
"हां कळलं मला. बाकी काय पाहिलं का? प्रेताला हात वगैरे नाही ना लावला?"
"नाही साहेब. आम्ही पाहिलं तेव्हा त्याच परिस्थितीत होतं जसं आत्ता आहे."
"बरं तुझी मड्डम. इंग्रजी बोलते का?"
"तोडकं मोडकं. स्पॅनिश आहे."
"आपलं कुठे फार फाडफाड आहे. कबुलीजबाब लिहून घ्या रे यांचा. तोवर मी तिच्याशी बोलून घेतो."
जाधवांनी त्या बाईशी शक्य तितक्या मऊपणे संवाद साधला. तसेही तिचा या सर्वाशी संबंध असणे शक्य नव्हते. तिने सांगितल्याप्रमाणे ती फोटो काढण्यासाठी विशिष्ट अँगल शोधत होती आणि इतरांपासून जरा बाजूला गेला. मग अचानक आडबाजूला भिंतीपाशी पडलेले प्रेत तिने पाहिले. मग तिची किंकाळी ऐकून तुकाराम आला आणि त्याने फोनकॉल करून पोलिसांना बोलवले होते.
जाधवांनी तुकारामाची माहिती नोंदवून घेतली आहे याची खात्री करून मग त्या पर्यटकांना जायची परवानगी दिली. त्यांची कामाची ही वेगळी तर्‍हा होती. साधारणतः आधी प्रेत पाहून मग साक्षीदारांची तपासणी होते. पण जाधवांची अशी समजूत होती कि जितक्या लवकर साक्षीदारांचा जबाब घेऊ तितकी त्यांची उत्तरे ताज्या मेमरीवर आधारित आणि अधिक उपयोगी सिद्ध होतात. मग त्यांनी प्रेताचे निरीक्षण सुरू केले.

तो एक तिशीचा युवक असावा. अंगात बॅटमॅनचे चित्र असलेला लाल टीशर्ट होता. खाली काळी शॉर्ट्स. शर्टाचा वरचा हिस्सा रक्ताने माखला होता. त्याच्या उजव्या हातावरही रक्ताचे डाग होते. त्याच्या गळ्यात काहीतरी खुपसले गेले होते. प्रेत भिंतीला व्यवस्थित टेकवलेले नव्हते उलट तो मरता मरता भेलकांडत तिथे जाऊन पडला असावा असे दिसत होते. त्याच्या खिशांमध्ये वॉलेट सापडले होते. त्यातल्या ड्रायविंग लायसेन्सवरून त्याचे नाव समजत होते - अनिरुद्ध शिंदे. आता या पत्त्यावर जाणे आले. बाकी क्रेडिट कार्ड इ. होतेच. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मोबाईल फोन सापडला नव्हता. आजूबाजूला कुठे पडला आहे का याचा शोध त्यांनी घेतला पण त्यांना तो कुठेच सापडला नाही. जाधवांना त्यांचे अंतर्मन सांगत होते - ही केस साधी नाही.

~*~*~*~*~*~

काही दिवसांपूर्वी..........

बबन एक निष्णात भिकारी होता. भीक मागण्यात आपला कोणी हात धरणार नाही यावर त्याचा पूर्ण विश्वास होता. आणि वर कडी म्हणजे तो केवळ १३ वर्षांचा होता. त्याच्या उस्तादला देखील माहित होते कि बबन इतका गल्ला कोणी कमवत नाही. तो देखील बबनला इतरांपेक्षा जरा अधिक मायेने वागवत असे. याचा अर्थ बबनचे उस्तादवर प्रेम होते असा अजिबात घ्यायचा नाही. बबन ७ वर्षांचा असताना त्याचा डावा हात कोपरापासून या उस्तादनेच तोडला होता. बबन पुढच्या ६ वर्षात अव्वल दर्जाचा भिकारी बनण्यात या तुटक्या हाताचा निश्चित वाटा होता.

आज त्याची खूपच चांगली कमाई झाली होती. उस्तादने त्याला खुश होऊन त्याचा आवडता भुर्जीपाव खाऊ घातला. त्यांचा अड्डा एकदम सुनसान जागेत होता. तिथे कोणी अनोळखी माणूस येणे शक्य नव्हते. मग हा कोण आला रातच्याला? खिडकीतून रस्त्यावर कोणीतरी चालताना दिसत होता. उस्तादला उठवावे असे बबनच्या मनात येऊन गेले पण त्याला त्या माणसाने खुणेनेच जवळ येण्याचा इशारा केला. बबनला काय वाटले कोणास ठाऊक पण तो त्या माणसाकडे चालत गेला. रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य होता ते दोघे सोडले तर. आतल्या अड्ड्यामध्ये बाकी भिकारी पोरं, उस्ताद वगैरे गाढ झोपी गेले होते. बबन आता त्या गूढ व्यक्तीच्या समोर उभा होता. त्याचे कपडे पाहता तो कोणी उच्चभ्रु, प्रतिष्ठित वगैरे वाटत होता. ३५-४५ या वयोगटात तो शोभला असता.
"कौन है बे तू? ये गली तेरे जैसों कि नही है. खाली पिली मे मारा जाएगा."
श्श्श्श. त्याने बबनच्या ओठांवर बोट ठेवले. त्याच्या चेहर्‍यावर एक मंद हास्य खेळत होते. बबन जणू त्या हास्यात हरवून गेला. इतका कि त्याला त्याच्या गळ्याला टोचलेली सुई जाणवली नाही. आजची त्याची झोप खूपच गोड होती. तो एकदा हसून बेशुद्ध पडला.
****

बबनला जाग आली तेव्हा त्याने स्वतःला साखळीने बांधलेले पाहिले. त्याचे डोके अजूनही भणभणत होते पण आता तो बराच जागेवर आला होता. तो एका कॉटवर उताणा झोपलेला होता व सर्व बाजूंनी साखळ्यांनी त्याला स्थानबद्ध केले होते. पण ती कॉट किंचित तिरकी केलेली असल्याने त्याला समोर बसलेली ती व्यक्ती दिसत होती.
"कोण ए बे तू? बबन्याशी पंगा घेऊ नकोस हां"
त्या व्यक्तीने यावर केवळ एक स्मितहास्य उत्तरादाखल केले. तो एका टेबलावर बसला होता. बाजूला एका ट्रे मध्ये काही सँडविचेस दिसत होती आणि समोर एक बाऊल होता. त्यातले सूप तो पीत होता.
"बबन का नाव तुझे? वेल गुड मॉर्निंग बबन. तुला माहित आहे का हैदराबाद मध्ये पाया सूप फार प्रसिद्ध आहे म्हणे. बकर्‍याच्या पायांच्या स्टॉकपासून बनवतात बहुधा. बाकी काही असो पाया सूप तब्येतीसाठी खूप चांगले असते. प्राण्यांचे पाय शिजायला बाकी खूप वेळ घेतात. त्यात तुझा एक हात पण नाहीये. अशाने तू काही फार दिवस टिकणार नाहीस. तरी लहान असल्याने फार वेळ लागला नाही. थँक्स टू यू आय कॅन हॅव सच अ हेल्दी ब्रेकफास्ट!"

यातले शेवटचे वाक्य बबनला कळले नाही. पण भूल उतरल्यामुळे त्याला आता वेदना जाणवू लागल्या. त्याने मान शक्य तितकी उंचावून पाहिले. त्याचा उजवा पाय जांघेतून कापला होता.

~*~*~*~*~*~

"आमचे चॅनेल तुमच्या पर्यंत पोचवत आहे ही धक्कादायक बातमी. आत्ताच आलेल्या वृत्तानुसार मुंबईत रात्रीचा दिसु लागला आहे एक कोल्हा. हा कोल्हा सामान्य कोल्हा नाही. हा एका बिल्डिंग वरून दुसर्‍या बिल्डिंगवर उडी मारताना दिसला आहे. तर कधी नुसताच रस्त्यांवरून धावताना पण दिसत आहे. काय आहे या कोल्ह्याचे रहस्य? आमच्या विशेष संवाददात्यांनी या बाबतीत पोलिसांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण ही केवळ अफवा आहे असे म्हणून उडवाउडवीचे उत्तरे दिली गेली. पण ही जर अफवा असेल तर मग इतके सगळे लोक कोल्हा बघितल्याचा दावा कसे करतील? कुठून आला आहे हा कोल्हा? रस्त्यांवर हिंडणे सुरक्षित आहे काय? का ही केवळ आणि केवळ अफवाच आहे, घबराट माजवण्याचा एक प्रयत्न! जाणून घेऊयात आमच्या विशेष रिपोर्ट मध्ये एका छोट्या ब्रेकनंतर"

त्या व्यक्तीने टिवी बंद केला. कपाळावर हात मारून घेत ती व्यक्ती जोरजोरात हसू लागली. मग समोर ठेवलेला कॉफीचा कप उचलून गॅलरीत हवा खाण्यासाठी म्हणून ती व्यक्ती उभी राहिली आणि हळू हळू घुटके घेत कॉफीचा आस्वाद घेऊ लागली. आत सोफ्यावर ती थोड्या वेळापूर्वी जिथे बसली होती तिथे शेजारीच एक कातडी बांधणीचे पुस्तक पडले होते. वरून करड्या रंगाच्या केसांचे कवर असलेले पुस्तक!!

क्रमशः

पुढील कथासूत्र येथे - http://www.maayboli.com/node/53518

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे!! थ्रिलिंग आहे कादंबरी.. उत्तरार्धात 'स्लमडॉग मिलिनेअर' ची आठवण झाली. आता पुढचा भाग वाचते..

Pages