बदला

Submitted by यतिन-जाधव on 10 April, 2015 - 01:43

नेहमीप्रमाणे सारिका गॉगल लावून मोबाईलवर बोलत-बोलत कॉलेजला येत असते, कॉलेजच्या गेटमधून ती आत शिरणार इतक्यात एक मोटरसायकल तिच्या अगदी जवळ येते, मोटरसायकलवर दोघेजण बसलेत, दोघानीही हेल्मेट घातलेली आहेत, चालवणारा तिला हाक मारून थांबवतो, ती थांबते, मागे बसलेला तरुण अचानक खिशातली बाटली काढून तिच्या तोंडावर ज्वालाग्राही पदार्थ फेकतो, सारिका घाबरते, किंचाळते, ओरडते आणि जखमांच्या वेदनेने विव्हळत खाली कोसळते पण तिचा आवाज ऐकून कोणी तिच्या मदतीला येण्या आधीच मोटरसायकल अगदी सुसाट वेगाने निघून जाते, नाहीशी होते. गेटजवळ उभी असलेली काही मुलं-मुली धावतच तिच्या जवळ येतात, पोलिसांना फोन करतात.

पोलिस त्वरित येतात आणि रुग्णवाहिका मागवून सारिकाला इस्पितळात दाखल करतात. सारिका बेशुद्धच असते, डॉक्टरांची तिला वाचवण्याची धडपड चालूच असते, थोड्या वेळाने सारिकाचे आई-बाबा येतात, सारीकाची आई रडून गोंधळ घालते, बाबाही बोलण्याच्या बोलण्याच्या मनस्थितीत नसतात, इतक्यात तपासासाठी इन्स्पेक्टर येतात, डॉक्टरांशी चर्चा करतात, डॉक्टरानी तपासणी करून जखमेचे स्वरूप पाहता कोणत्या ज्वालाग्राही पदार्थाने हि जखम झाली असेल याच्या खात्रीसाठी नमुने आधीच प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवलेले असतात, तेवढ्यात एक नर्स रिपोर्ट घेऊन येते आणि डॉक्टरांच्या हातात देते, चेहऱ्यावरील जखमा या सल्फ्युरिक असिडमुळे झाल्याचे डॉक्टर इन्स्पेक्टरना सांगतात, इन्स्पेक्टर सारिका अजून बेशुद्ध असल्यामुळे ती पूर्ण शुदधीत आल्याशिवाय आपण तिची जबानी घेऊ शकत नसल्याचं इन्स्पेक्टरना सांगतात, इन्स्पेक्टर आता सारिकाच्या आई-बाबांशी बोलतात.

पण त्यांचा कोणावरही संशय नसतो, सारिका शुद्धीवर आली कि आम्हाला लगेचच कळवा असं सांगून इन्स्पेक्टर तिथून निघतात आणि आपल्या सहकाऱ्यांना जवळपासच्या परिसरातली सगळी साबणाची आणि साबण बनवायच्या कच्च्या मालाची दुकानं जिथेजिथे असतील त्यांच्याकडे जाऊन अगदी अलीकडेच सल्फ्युरिक असिड विकत घेण्यासही कोण कोण आल होत याची यादी मागवतात, स्वतः कॉलेजवर येतात आणि सारिकाच्या मित्रमैत्रिणीना विचारतात, पण लाल मोटरसायकलवरून हेल्मेट घालून दोघेजण आले आणि चेहऱ्यावर काहीतरी फेकून गेले इतकीच माहिती त्यांना मिळते, मोटरसायकलचा नंबर देखील कोणीच सांगू शकत नाही, इतक्यात हॉस्पिटलमधून फोन येतो सारीका शुद्धीवर आली आहे.

इन्स्पेक्टर त्वरित हॉस्पिटलमध्ये पोहोचतात आणि सारिकाला हे सगळं कसं घडल याचा घटनाक्रम विचारतात, पण ती काहीच सांगू शकत नाही, कारण हल्लेखोरांनी चेहऱ्यावर काळ्या काचा असलेले हेल्मेट घातले होते त्यामुळे त्यांचा चेहरा पाहू शकले नसल्याचं ती इन्स्पेक्टरना सांगते, तुझा कोणावर संशय आहे का विचारतात, ती नाही म्हणते पण आता तिला आठवतं कि आपल्याच कॉलेजमधला एक मुलगा राहुल आपल्याला नेहमी त्रास देत असतो, त्याच माझ्यावर खूप प्रेम असल्याचं सांगतो आणि माझी वाट नेहमी अडवतो, परवाच त्याने मी आमच्या मित्र-मैत्रिणीसोबत कट्ट्यावर बसले असताना येउन उगाचच लाल गुलाब देउन आपलं प्रेम व्यक्त केलं होतं, पण मी स्पष्ट शब्दात त्याची कान उघडणी केली असता हे तुला फार महागात पडेल, मी बघून घेईन अशी सर्वासमक्ष त्याने मला धमकी दिली आणि रागाने मोटरसायकलवरून निघून गेला, हो त्याचाच हे काम असू शकेल.

पोलिस संशयित म्हणून राहुलला अटक करण्यासाठी म्हणून त्याच्या घरी जातात, पण तो घरी नसतो, तो दोन दिवसांसाठी मित्रांबरोबर फार्महाऊसवर गेल्याचे त्याची आई सांगते, पण तेवढ्यातच आतल्या रूममधून सामानाची हलकीशी खटखट ऐकू येते पोलिस आत कोण आहे म्हणून आईला विचारतात पण ती आत कामवाली साफसफाई करतेय असं सांगते, पोलिस तिला बाहेर बोलवायला सांगतात, पण हाक मारून देखील कोणीही ओ देत नाही कि बाहेर येत नाही, पोलिस संशयाने खोलीची झडती घ्यायला जातात, आई विरोध करते, पोलिस जबरदस्तीने झडती घेतात, तेव्हा माळ्यावरच्या बॉक्सच्या मागे राहुल लपून बसलेला त्यांना सापडतो, ते त्वरित त्याला अटक करतात व पोलिस स्टेशनवर घेऊन येतात.

पोलिस स्टेशनमध्ये आल्यावर पोलीस त्यांच्या परीने चौकशी सुरु करतात, राहुल सांगतो माझं सारीकावर मनापासून प्रेम आहे, मी मान्य करतो कि मी तिचा पाठलाग करायचो, सारिका आपल्या मित्र-मैत्रिणीमध्ये बसली असता स्वतः जाऊन तिला गुलाब देऊन प्रेम व्यक्त केल्याच ही सांगतो, जेव्हा तिने माझं प्रेम नाकारलं तेव्हा मग अपमान आणि रागाच्या भरात मी तिला धमकीही दिली होती, पण हे काम मी केलेलं नाही, राहुल आपला गुन्हा कबुल करत नाही,

इन्स्पेक्टर आता आपल्या तपासाची दिशा बदलतात, ते पुन्हा कॉलेजमध्ये येउन सारिकाच्या ग्रुपमध्ये सर्वांशी बोलतात तेव्हा राहूलच नेहमी तिला त्रास देतो त्याचच हे काम असल्याचं प्रत्येकजण सागतो, ग्रुपमधला पुष्पल आता इन्स्पेक्टरना सांगतो कि परवाच आम्ही इकडे कट्ट्यावर बसलो असताना राहुलने येउन सर्वांसमोर लाल गुलाब देऊन तिला प्रपोज केलं पण तीने त्याला झिडकारल्यावर त्याने तुला महागात पडेल मी बघून घेईन अशी धमकी दिली होती इतर मित्र-मंडळीही त्याला दुजोरा देतात.

इन्स्पेक्टर पुन्हा पोलिस स्टेशनवर येतात इतक्यात एक सहकारी पोलिस आत येतो आणि त्यांना सांगतो बऱ्याच असिड विक्रेत्याची चौकशी केली असता काहीच हाती लागलेलं नाही प्रत्येकच म्हणणं एकचं, आमचा माल हा फक्त मोठ्या साबण कंपन्या किवा त्यांना कच्चा माल पुरवणारे डिस्ट्रीब्युटर यांच्याशिवाय कोणालाच विकत नाही, कारण त्यांच्याकडे रीतसर परवाना असतो, पण सर मी छेडा ट्रेडरचे मालक मगनभाईना इकडे घेऊन आलोय, त्याचं म्हणण आहे कि चार दिवसांपूर्वीच एक कॉलेज तरुण आपल्याकडे येउन किरकोळ प्रमाणात असिड मिळेल का याची चौकशी करत होता, त्याला कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी थोडं असिड पाहिजे होते पण मी त्याला ते दिलं नाही, इन्स्पेक्टर आता मगनभाईला थांबवतात, एक मिनिट तुमच्याकडे आलेल्या मुलाला तुम्ही ओळखू शकता, मगनभाई लगेच हो म्हणतात, इन्स्पेक्टर मगनभाईला घेऊन राहुलसमोर येतात, पण मगनभाई हा तो मुलगा नसल्याच सांगतात, इन्स्पेक्टर मगनभाईला म्हणतात पुन्हा एकदा नीट पहा नक्की हा तो मुलगा नाहीय, मगनभाई नाही म्हणतात, आणि तो मुलगा समोर आला तर मी त्याला नक्कीच ओळखीन अशी खात्री देतात, इन्स्पेक्टर आता मगनभाईला सांगतात ठीक आहे तुम्ही निघा आता पण गरज लागेल तेव्हा पुन्हा तुम्हाला इकडे याव लागेल.

इन्स्पेक्टर आता ओळखतात कि हे कृत्य करणारा कोणीतरी याचं कॉलेजचा विध्यार्थी आहे ते आपल्या माणसांना कामाला लावतात आणि प्रयोग शाळेची तपासणी करतात तेव्हा त्यांना असं आढळत कि इतर सर्व बाटल्यापेक्षा एका बाटलीतल असिड थोडं कमी झालेलं आहे ते रजिस्टर मधली नोंद पाहतात, नोंदीप्रमाणे शेवटची तारीख दीड महिन्या पूर्वीची असते त्यानंतरच्या १०० मिली असिडचा हिशोब लागत नाही, प्रयोगशाळेच्या इन्चार्जची चौकशी केली असता अस कळत कि प्रयोगशाळेला नेहमी कुलूप लावलेलं असत आणि गरज असेल तेव्हाच फक्त दरवाजा उघडला जातो व किल्ली ऑफीसरुममध्ये असते, म्हणजे रात्री उशिरा कोणीतरी येउन हे काम केलेलं आहे, इन्स्पेक्टर गेटवरच्या वॉचमनची चौकशी करतात तो काही माहित नसल्याचं सांगतो आणि कॉलेजला पाठीमागच्या बाजुनेही आणखी एक गेट असल्याचं सांगतो, तिथल्या वॉचमनची चौकशी केली असता तो सांगतो हा तसा शांत परिसर आहे इकडे तसं फार कोणी फिरकत नाही, मागच्या वस्तीतले बेवडे मात्र अधून मधून आरडा ओरडा करत असतात, मध्ये दोन पोर इकडे कम्पाउंडवर चढून बसली होती, पण मी त्यांना हटकलं होतं, ते निघून गेले,

ही साधारण कधीची गोष्ट आहे असं विचारल्यावर चार दिवसापुर्वीची अस तो सांगतो, इन्स्पेक्टर आता चार दिवसापुर्वीचे सीसी टीव्हीचे फुटेज तपासतात, तेव्हा त्यांना एक गोष्ट स्पष्ट दिसते कि कंपाउंडवर बसलेली दोन मुलं त्यांना हाकल्ल्यावर पुन्हा थोड्यावेळाने त्यातला एक मुलगा तोंडावर रुमाल बांधून पुन्हा कंपाउंडवरून आत आला व वॉचमनशी काहीतरी सांकेतिक भाषेत हावभाव करून बोलला, त्याला कसलीतरी बाटली दिली, आणि ती पिउन वॉचमन झोपून गेला, आता तो खुलेआम आत आला आणि सरळ चावीने ऑफिसचा दरवाजा उघडून कपाटातल्या लटकवलेल्या चाव्यांपैकी एक चावी घेऊन प्रयोगशाळेत गेला आणि थोड्या वेळाने पुन्हा कापडाच्या पिशवीतून एक काचेची बाटली घेऊन बाहेर आला आणि आल्या मार्गाने पुन्हा कंपाउंडवरून उडी मारून पसार झाला, हे पाहिल्यावर इन्स्पेक्टर त्या वॉचमनला चौकशीसाठी पोलिस स्टेशनवर बोलावून घेतात आणि चौकशी करतात सुरवातीला तो काहीच माहित नसल्याचं सांगतो पण पोलिसी खाक्या दाखवल्यावर नंतर तयार होतो तो सांगतो कि हा आपल्याच कॉलेजचा विद्ध्यार्थी आहे, तो गेले पंधरा दिवस रोज रात्री तो अभ्यासाला इकडे येतो, आजही थोडावेळ आत बसून अभ्यास करणार होता, थोड्याशा पैशांसाठी आणि दारूसाठी मी त्याला आत घेतलं, त्याचं नाव मला माहित नाही, पण मी त्याला चेहऱ्याने ओळखतो.

इन्स्पेक्टर आता सारिका शिकत असलेल्या वर्गातील सर्वाना एकत्र कट्ट्यावर बोलावतात आणि वॉचमनला बोलावून यांच्यातल्या त्या मुलाला ओळखायला सांगतात, पण तो मुलगा इकडे यांच्यात नसल्याचं सांगतो, आता इन्स्पेक्टर ग्रुपमधल कोणी गैरहजर आहे का विचारल्यावर कुणाल आणि पुष्पल दोघे गैरहजर असल्याच इन्स्पेक्टर ओळखतात, दोघांचाही पत्त्यावर वॉचमनला बरोबर घेऊन त्यांच्या घरी जातात, कुणाल आजारी आईची सेवा करत असतो, वॉचमन हा तो मुलगा नसल्याचं सांगतो, पुष्पलच्या घरी गेल्यावर पुष्पलचा मोठा भाऊ पोलिसांना पाहून घाबरतो, त त प प करतो आणि मी काही नाही केलं असं म्हणत पळायचा प्रयत्न करतो, पोलिस त्याच्या मुसक्या आवळतात, पोलिस म्हणतात आम्ही कुठे म्हणतोय कि तू काही केलयस, आम्ही तर पुष्पलला भेटायला आलोय, असं म्हणताच तो थोडा रिल्याक्स होतो आणि पोलिसांना सांगतो कि पुष्पलची तब्येत ठीक नाहीय, तो आत झोपलाय, इतक्यात आतून पुष्पलच बाहेर येतो आणि आणि पोलिसांना पाहून त्याचा चेहरा पडतो, ते पोलिसांच्या नजरेतून सुटत नाही, ते त्याला विचारतात आज कॉलेजला का गेला नाहीस, तो सांगतो माझी तब्येत ठीक नाही, ताप आलाय, पोलिस हात लाऊन पाहतात तर ताप नसतो, थोडसं दरडावून विचारल्यावर घाबरून भावाकडे पाहतो, वॉचमन सुद्धा पुष्पलला ओळखतो, पोलिस दोघांनाही चौकशीसाठी पोलिस स्टेशनवर घेऊन येतात,

पुष्पल आपण काहीही केलं नसल्याचं पोलिसांना सांगतो, इन्स्पेक्टर आपल्या सहाय्यकाला पुष्पलला आत नेउन त्याची नीट खातरदारी करायला सांगतात, इतक्यात पुष्पलचा मोठा भाऊ अश्विन पोलिसांना थांबवतो आणि खर काय घडलं ते सांगतो, तीन चार वर्षांपूर्वीची गोष्ट, आमचे वडील एका मोठ्या कारखान्यात वर्कर म्हणून कामाला होते, कामावर असतानाच मशीनमध्ये सापडून त्यांना मोठा अपघात झाला आणि त्यात ते गेले, मालकांनी आम्हाला नुकसान भरपाई म्हणून काही रक्कम दिली, पण वडिलांच्या जागेवर मला कामावर ठेऊन घेण्यास नकार दिला, वडील गेल्यानंतर घरात दुसर कोणीही कमावणार नसल्यामुळे मला काम करण्याची खुपच गरज होती, बऱ्याच हातपाया पडल्यावर त्यांनी मला त्याच कारखान्यात साघ्या हेल्परची नोकरी देऊ केली, पुढे एकदा कारखान्यात चोरी झाली, चोरी मी केली नव्हती कि त्यात माझा कुठल्याही प्रकारे सहभाग नव्हता, पण केवळ संशयावरून मालकांनी मला सगळ्या कामगारांसमोर मारहाण केली आणि कामावरून काढून टाकलं. तो अपमान मी सहन नाही करू शकलो आणि तेव्हाच ठरवलं कि याचा बदला घ्यायचा, मी मालक आणि त्याच्या कुटुंबाविषयी सगळी माहिती गोळा करत होतो, तेव्हा कळल त्याची मुलगी सारिका हि ज्या कोलेजात शिकते त्याच कोलेजात माझा लहान भाऊ पुष्पलही शिकतो, मी त्याला विश्वासात घेऊन तिच्याबद्दल सर्व माहिती गोळा करत होतो, सुरवातीला मी तिला किडन्याप करण्याचा प्लान केला होता पण अचानक मला कळल कि कॉलेजमधला एक मुलगा राहुल तिच्या खूप मागे लागलेला आहे, तिला सतावतो, एकदा सगळ्यांसमोर तिने त्याला नकार देताच त्याने तिला बघून घेण्याची धमकी दिली आणि याच गोष्टीचा फायदा मी करून घ्यायचं ठरवलं आणि पुढचं हे सगळ घडलं पण साहेब यात माझा भाऊ पुष्पलची काहीच चूक नाहीय, इन्स्पेक्टर म्हणतात नाही कशी सगळा प्लान तुझा असला तरी एक गुन्हा करताना त्याने तुला मदत केलीच ना, त्यामुळे तोही तितकाच दोषी आहे तुम्हा दोघानाही शिक्षा हि होणारच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कथा