सुगंधा - भाग ३ (अंतिम)

Submitted by कविता१९७८ on 9 April, 2015 - 05:51

अमोघला आपल्या कानावर विश्वासच बसेना, "अपंग मुल दत्तक घ्यायची काय गरज आहे? आपल्याला मुल होणार नाहीये का? " रागातच तो तीच्यावर ओरडला, त्याने कधी या गोष्टीचा विचारच केला नव्हता. अपंग मुल तर सोडाच पण कधी नॉर्मल अनाथ मुल दत्तक घेण्याचा विचारही त्याच्या मनात आला नव्हता. "हे काय ऐकतोय मी? आपण दुसर्‍याचं मुल दत्तक घ्यायचं, त्या मुलाची काही माहीती नाही, कोण , कुठलं, कोण त्याचे आईवडील काही माहीत नसताना? आणि मुळात आपण ते मुल दत्तक घ्यायचंच का?" ती पार गोंधळुन गेली, "अमोघ माझं ऐकुन तर घ्या .. " अमोघ इतका संतापला होता की तो काय बोलतोय याचे त्याला भान राहीले नाही, पुढे ती काही बोलणार इतक्यात अमोघच तावातावाने बोलु लागला , "आधी तु माझं ऐक, असले भलते सलते विचार मनातुन काढुन टाक, मला कुठल्याही परीस्थीतीत ही गोष्ट मान्य नाही, तुला काय वाटतं , माझ्या नशीबात काय व्यंग, टाकाउ व्यक्तीच दिल्या आहेत का देवाने? प्रत्येक वेळेस माझ्या मनात नसताना बाकीच्यांनी माझ्यावर कुणा ना कुणा व्यंग व्यक्तिला लादावं का? आधी आईबाबांनी तुला माझ्यावर लादलं , हो तु नव्हतीस माझ्या मनात, मला काय कुणाला आवडशील तु तुझं हे रुप पाहुन ? सांग ना, पण तरीही तुझ्या स्वभावाने , वागण्याने तु मला जिंकलस , मी तुला स्वीकारलं पण अपंग दत्तक मुल मला स्वीकारता येणार नाही, अज्जिबात नाही, तु एन. जी. ओ. बरोबर काम करतेस, अशा मुलांबरोबर राहतेस ते सगळं ठीक, पण ते बाहेरच राहु दे , घरात आणण्याचा प्रयत्न करु नकोस, गरीब, लाचार , अपंग माणसांना मदत करावी, त्यांच्या वर दया यावी इतपर्यंत ठीकाय पण त्यांना आपल्या घरात आणावे , आपल्या जीवनाचा हिस्सा बनवावे असे विचार करु नये. आता एन. जी. ओ. मधे जायची काही एक गरज नाहीये. घरी बस, आपल्या मुलाला जन्म दे."

तीला तर विश्वासच बसेना , "अमोघ??? काय बोलताय तुम्ही हे? तुमच्या सारखा सुशिक्षित माणुस असा विचार करतो? " अपंग आणि अनाथ असणं कुणाच्या हातात असतं का? असं असतं तर कुणीच अपंग राहीलं नसतं. जन्मदाते इवल्याशा कोवळ्या जीवाला उकीरड्यावर टाकुन निघुन जातात त्यात त्या निष्पाप जीवाची काय चुक असते? समाज ही त्याची जबाबदारी झटकतो अशा मुलांनी काय करायचं, कुठे जायचं? आणि त्यांच्या अपेक्षा ही काय असतात , कुणीतरी त्यांच्या कडे प्रेमाने पहावं, त्यांना आपलं म्हणाव , त्यांनीही सामान्य माणसाप्रमाणे त्यांचं आयुष्य जगावं तर यात बिघडलं कुठे? आणि त्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवेत, आपल्याला देवाने चांगली संधी दिलीये अशा मुलांना आपलेसे करण्याची, त्यांना माणुस म्हणुन स्वाभिमानाने जगु देण्याची. त्यांना गरज आहे अशा अश्वासक हातांची जे त्यांना असे वार्‍यावर सोडुन जाणार नाहीत. अनाथ आश्रमातही अपंग मुलांना कुणीच दत्तक घेत नाही, ती बिचारी आपण टाकाउ आहोत या भावनेने हताश होतात. मी जगलीये असलं असं आयुष्य, आईबाबां विना, मामाने पोटच्या पोरी प्रमाणे वाढवलं पण तरीही प्रत्येक ठीकाणी मला अनाथच समजले जायचे कारण जन्मदाते आईवडील नव्हते त्यात मला हे व्यंग, त्यामुळे माझ्याशी कुणी मैत्री करण्यास तयार नव्हते, पण मी माझं व्यंग मान्य करुन पुढे गेले, मामाने माझ्या शिक्षणासाठी योग्य ते प्रयत्न केले, पण बाहेरच्या जगात मलाच माझे स्थान निर्माण करायचे होते. मला पाहुन लोकांना हसु यायचे, कीव यायची , त्यांच्या तोंडावरुन ते दिसायचे ही, पण मी हळुहळु त्यांच्या मतानुसार स्वतः मधे बदल करत गेले आणि मग त्यांनी मला त्यांच्यात समाविष्ट केले. शारीरीक व्यंगावर मात करता येते पण मानसिक व्यंगाचं काय? माणसे फार फार तर अशांवर दया दाखवु शकतात पण त्यांना आपल्या जीवनाचा भाग बनवणारी खुप कमी माणसे असतात, पण तुम्ही मला स्वतःच्या जीवनाचा भाग बनवलंत तेव्हा जाणवलं की तुम्ही म्हणजे एक वेगळा विचार करणारी व्यक्ती आहात पण आत्ता समजतय की तुम्ही पर्यायाअभावी फक्त परीस्थीतीशी जुळवुन घेतलय.

घरी पोहोचल्यावर दोघांचे चेहरे पाहुन अमोघच्या आईवडीलांन काही बिनसल्याची जाणीव झाली. अमोघने तीच्या इच्छा आईवडीलांना ऐकवल्या आणि घरात वादळ सुरु झाले. अमोघच्या आईने थैमान घातले, "१०० एकर जमीन दान करायची ? वेड लागलंय का? आपली लक्ष्मी अशी दुसर्‍याना देउन टाकायची? अगं त्या १०० एकरच्या जमीनी मुळेच तर तुला माझ्या मुलासाठी आणलं इथे नाहीतर होतं काय तुझ्यात? ना रंग ना रुप आणि हे व्यंग , लायकी काय होती की तुझी या माझ्या राजकुमारासमोर? तुझ्यापेक्षा जास्त सुंदर आणि शिकलेल्या मुली सांगुन आल्या होत्या माझ्या मुलाला पण पानसे भाउंनी तुझी थोडी स्तुती केली आणि आम्ही बळी पडलो हो , म्ह्ंटल तुला आईवडील नाहीत आणि आम्हाला ही मुलगी नाही त्यामुळे तुलाही आईवडीलांचं प्रेम मिळेल आणि तु आमच्याशी मुलीप्रमाणे वागशील आणि काय गं माझ्या मुलामधे काही कमी आहे का? त्याच्यात आहे धम्मक स्वतःचं मुल जन्माला घालण्याची, का म्हणुन त्याने दुसर्‍याच्या मुलाला आपलं मुल मानावं , ही असली थेरं कशी सुचतात गं तुला??" तीला काय बोलावे ते कळेना, " अहो आई, असे बोलु नका, मला तुमच्या शिवाय कोण आहे , मी तुम्हाला माझ्या आईवडीलांच्या जागीच मानते हो, पैशाचं काय आहे आज आहे उद्या नाही, त्या १०० एकर जमिनीमधुन अनाथांना , अपंगाना आधार मिळु शकतो. आणि मुला दत्तक घेण्याविषयी म्हणाल तर स्वतःच मुल नसेल तरच अनाथ मुलाला दत्तक घ्यावं असं काही नाही." त्यावर अमोघची आई उसळली, " काय गं सारखं सारखं मुल दत्तक घेउ , मुल दत्तक घेउ, काय आहे नक्की तुझ्या मनात ? हे तुझंच अनौरस मुल तर नाही ज्याला तु अधिकृत रित्या आपलं बनवण्याचा प्रयत्न करत आहेस? लग्नाआधीही जात होतीस की एका एन.जी. ओ. मधे, भलतीच दया दाखवलेली दिसते."

अमोघच्या वडीलांनी त्याच्या आईला आवरले, "बास झालं, आता हा विषय इथेच बंद करा" त्यामुळे घरात शांतता पसरली . तिला मानसिक धक्काच बसला. प्रकरण या थराला जाईल याची तीला कल्पनाही नव्हती, काय होईल फार फार तर सर्व नकार देतील पण असं घालुन पाडुन बोलतील असं तीला वाटलंही नव्हतं आज घरच्यांचे असली चेहरे तिच्या समोर आले होते, आपल्या विरुद्ध इतकं विष या लोकांच्या मनात आहे , आज पर्यंत ही लोकं मुखवटे घालुन आपल्या समोर वावरत होती आणि आपण त्याला प्रेम आणि वात्सल्य समजलो? आपलीच चुक म्हणा आपणच माणसं ओळखण्यात चुकलो. इथे आपल्याला नाही तर आपल्या पैशाला किंमत आहे हे समजल्यावर ती खुप कळवळली, खर्‍या प्रेमाच्या शोधात निघालेल्या तीला नियतीने असा दगा दिला होता. आजपर्यंत आपण फक्त प्रेमच दिले आणि त्याबद्द्ल फक्त प्रेमाचीच अपेक्षा केली. आपला नवरा ज्याला आपण पुर्णपणे ओळखलेच नाही, त्याने आपल्याला स्वीकारले पण आपल्या विचारांना त्याच्या विश्वात काहीच कींमत नाही. आज यांनी आपल्या चारीत्र्यावर संशय घेतला ? विचार करता करता तिला गरगरु लागले, डोकं खुप दुखु लागलं आणि तोंडातुन फेस येउ लागला, काही कळायच्या आत ती धाडकन जमिनीवर पडली आणि तिची शुद्ध हरपली.

अमोघ धावतच रुम मधे आला , तीला फीट आली होती ,त्याने तिला उचलुन पलंगावर ठेवले , डोक्याला जबरदस्त मार लागुन रक्त वाहत होते, अमोघच्या वडीलांनी तातडीने अ‍ॅम्बुलन्स बोलावली व तीला इस्पितळात नेण्यात आले. मेंदुत रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन करण्याचे सुचवले व आम्ही आमचे प्रयत्न करतोय पण आता सर्व काही देवाच्या हातात असेही सांगितले. तिला वेंटीलेटर वर ठेवण्यात आले होते, अमोघ तिचा हात आपल्या हातात घेउन बसला होता तेवढ्यात दुरुन त्याला गाणे ऐकु आले, "तुने साथ जो मेरा छोडा दिवाना तेरा मर जायेगा..........." दुरवर संध्याकाळच्या कातरवेळेत अमोघचा कानावर हे सुर पडत होते आणि तो आणखीनच भावनात्मक झाला. खरंच माझे चुकले, मी तुला वाट्टेल ते बोलायला नको होते, तु निस्वार्थ पणे आपले नाते जोपासत गेलीस आणि मी मात्र तुला समजुनच घेतले नाही . मी न विचार करता तुझ्यावर संतापलो, धीराने , सामोपचाराने यातुन काही मार्ग निघालाच असता. तुझ्या नसण्याने मला फरक पडतोय, मला तुझी सवय लागलीये. लवकर शुद्धीवर ये, बरी हो , तुझ्या वात्सल्याचा अन प्रेमाचा सुगंध तु माझ्या आयुष्यात पुन्हा दरवळव, हो सुगंधा , परत ये.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छाने.. पण फक्त उभ्या उभ्या जमिनीवर पडल्यानं रक्त वाहू लागत.. कैतरी टोकदार वस्तुवर पडलो असा विचार केलातरी मेंदूत रक्तस्त्राव हे नै पटल.. शेवट जरा गंडलेला वाटला मलातरी .. बाकी पुलेशु Happy

ओ.के. तिला आकडी आल्याने ती कोसळली आणि तिला मार लागला, मी आकडी हा शब्द न वापरता फक्त तोंडातुन फेस येउ लागला असं लिहिलंय म्हणुन असं वाटतय का वाचताना?

आकडी हा शब्द
न वापरता फक्त तोंडातुन फेस येउ लागला असं
लिहिलंय म्हणुन असं वाटतय का वाचताना?...... Ho nakki.... baki katha chan aahe...

कथा चांगली आहे पण सुगंधाचे व्यक्तिचित्रण पटले नाही. खूपच गुडी गुडी दाखवलीय. आणि मूल दत्तक घेणं हा निर्णय दोघांचा असतो पण तीच अपंग मूल दत्तक घ्यायचं असं एकतर्फी कसं ठरवू शकते? बहुतेक ती शुद्धीवर आल्यावर अमोघ विरघळून त्याला मान्यता देईल Sad

कथा छान आहे, परंतु नायिकेचे व्यक्तिमत्व वास्तवदर्शी वाटले नाही....
एवढी समाजसेवेची आवड असलेले लोक बंधनांपासुन दूर जाऊ पाहतात, सुगंधा तर अगोदरच बंधनमुक्त होती, ती मस्तपैकी जमीन दान करून त्यावरच एक अनाथालय बांधून सर्वच मुलांना दत्तकून राहू शकली असती नाही का .?
तिने लग्न कशाला केल.? अर्थात हेमावैम आणि यामुळे कथेची वाचनीयता कमी झालीये असे मुळीच नाही..
कथा छानच आहे , पू.ले.शु.