सेटिंग

Submitted by यतिन-जाधव on 22 March, 2015 - 01:21

मिलिंद, सुमती आणि राज एक छान छोटंसं कुटुंब, मिलिंद एका खाजगी कंपनीत मोठ्या पदावर काम करतो, खुप जबाबदारीचं काम असल्यामुळे कामानिमित्त मुंबई पेक्षा नासिक, पुणे, नागपूर या कंपनीच ब्रान्च ऑफिस असलेल्या शहरामध्येच त्याचं वास्तव्य अधिक असत, त्यामुळे मनात असूनही सुमती आणि राज यांना आपण फार वेळ देऊ शकत नसल्याची त्याला नेहमीच खंत वाटते, पण जेव्हा केव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा तो फोनवरून संपर्कात असतोच, सुमतीही एका सरकारी बँकेत कामाला आहे, घरची परिस्थितीही आता बऱ्यापैकी सुधारलीय, राजचं शिक्षणही व्यवस्थित चाललंय, पण राजला शिक्षणासाठी पुण्यात रहाव लागत असल्यामुळे हल्ली तीला एकटीला घर खायला येतं, त्यामुळे नोकरी सोडण्याचा विचार तूर्तास तरी तिने पुढे ढकललाय, राजचं शिक्षण पूर्ण होऊन त्याच करियर एकदा मार्गी लागावं एवढीच त्यांची इच्छा आणि त्यासाठी मिलिंदसुद्धा खूप मेहनत घेतोय, त्यामुळे त्याच्या दूर असण्यामुळे तिचा त्याच्याबद्दलच प्रेम आणि विश्वास अधिकच दृढ झालाय.

इंजिनियरिंगच्या शिक्षणासाठी पुण्यात आलेला राज कॉलेजच्या होस्टेलवरचं राहतो, पुण्यात नवीनच असल्यामुळे त्याची इतर फारशी कोणाशी ओळख नाहीय, कॉलेजमधले दोन चार मित्र आणि रुममेट सोडता पूजाशी मात्र त्याची चांगलीच मैत्री झालीय, तीही त्याच्याच वर्गात शिकते, पूजाच बालपण आणि शिक्षण पुण्यातलच असल्यामुळे तिला तिथली सगळी माहिती आहे त्यामुळे तिने राजला जवळची चांगली दुकानं, मंदिर, हॉटेलं अशा बऱ्याच ठिकाणांची ओळख करून दिली आहे, कॉलेज सुटल्यानंतर नेहमी निरनिराळ्या हॉटेलमध्ये जाऊन कॉफी विथ केक आणि गप्पा मारणं हा दोघांचाही विक पॉइन्ट, अगदी खाजगी गोष्टी देखील ते एकमेकांशी शेअर करतात.

असेच एक दिवस एका रेस्टौरंटमध्ये बसले असताना नेहमीप्रमाणे पटकन कॉफी आणि केकची ऑर्डर न देता पूजा आज मला काही खायची इच्छाचं नसल्याचं राजला सांगते, त्यालाही जाणवत कि पूजा आज नेहमीच्या मूडमध्ये नाहिय, खुप गप्पगप्प आहे, राज तिला त्याचं कारण विचारतो, प्रथम ती सांगण्याचं टाळते पण अगदीच खोदुन विचारल्यावर नाईलाजाने ती त्याला सांगते की

" आज जवळजवळ पाच सहा महिने झाले माझ्या पपांना जाऊन, एका भरधाव गाडीखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला, पण पपांच्या मृत्यूनंतर माझ्या ममाच्या वागण्यात एक विचित्र फरक पडलाय, पप्पा गेल्याचं दुःख तिच्या वागण्यातुन अजिबात जाणवत नाही उलट ती नव्यानेच प्रेमात पडलेल्या एखाद्या तरुणीसारखी वागु लागलीय, मला तरी त्याचाच संशय येतोय. "

" त्याचा म्हणजे नक्की कोणाचा? "

" त्याचा म्हणजे पप्पांना आपल्या भरधाव गाडीखाली चिडून मारणाऱ्या त्या माणसाचा. "

" पण तू अस कसं म्हणतेस जर तुझ्या पप्पांचा मृत्यू त्या माणसाच्या गाडीखाली सापडून झाला असेल तर तुझी ममा त्याचा रागचं करेल ना ?”

" खर म्हणजे तसंच व्हायला हवंय पण इथे परीस्थिती वेगळीच दिसतेय."

" असही घडू शकत ? … स्ट्रेंज !"

" पप्पा गेल्यापासून त्या माणसाचं आमच्या घरी येण-जाण खूप वाढलंय आणि इतर वेळीही ममा सारखी त्याच्याबरोबर बाहेर जाते येते "

" अगं तसं नसेलही मे बी तो माणूस तुझ्या ममाला मदत देखील करत असू शकतो, आता पप्पांच्या अचानक जाण्याने बाहेरचे इतर व्यवहार कदाचित तुझ्या ममाला माहित नसतील. "

इतक्यात पूजा राजचं बोलण अचानक थांबवून त्याला तोंडावर बोट ठेऊन शांत राहण्यास सांगते आणि इथेच याच रेस्टोरंटमध्ये तिची ममा आणि तो माणूस त्या शेवटच्या कोपऱ्यातल्या टेबलावर बसल्याचं हळु आवाजात सांगते, राज मान वळवून तिकडे पाहण्याचा प्रयत्न करतो, त्याला ती बाई दिसते पण पाठमोरा बसल्यामुळे त्या माणसाचा चेहरा त्याला नीट दिसत नाही, पूजा आता हळूच राजला आपण इथुन निघूया म्हणुन सांगते, पण राज तिला तुझी हरकत नसेल तर आपण त्या दोघांवर पाळत ठेऊया असं सुचवतो, तीही तयार होते, राज आणि पूजा आता दोघेही रेस्टोरंटच्या बाहेर येउन एका गाडीच्या मागे लपतात व पूजाच्या ममाची आणि त्या माणसाची बाहेर येण्याची वाट पाहतात.

थोड्या वेळाने पुजाची ममा आणि तो माणूस बाहेर येउन त्या माणसाच्या गाडीत बसून निघून जातात पण त्या माणसाला पाहिल्यावर राजची बोलतीच बंद होते, तो पूजाला तसं काहीच जाणवू देत नाही, दोघे गाडीच्या मागुन बाहेर येतात, पूजा नाराज असते ती निमूट आपल्या घरी निघून जाते, राजही अस्वस्थ मनाने होस्टेलवर येतो आणि मुंबईला आपल्या आईला फोन लावतो, तिचा फोन सारखा एंन्गेज येतो, जवळपास पाच-सात वेळा ट्राय केल्यावर कसाबसा एकदा आईला फोन लागतो तेव्हा वैतागून आईला म्हणतो

" ए आई आज मी इकडे पुण्यात पप्पांना पाहिलं."

" अरे पण ते तर नासिकला आहेत, पुण्यात कसे असतील तुझ्या पाहण्यात काहीतरी चूक झाली असेल. "

" नाही आई खरंच पाहिलं आणि त्याच्याबरोबर एक बाईसुद्धा होती. "

आई आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवत नसल्याचं पाहून राज आता थोडी चिडचिड करतो .

" अरे तू त्यांना पाहिलंस मग तू त्यांना हाक का नाही मारलीस? तुला भास झाला असेल. "

आईला आपलं बोलण पटतच नसल्याचं पाहून राजची चिडचिड वाढते आणि उगाचच संशयाने आपल्या आईला विचारतो.

" पण तू इतका वेळ कोणाशी बोलत होतीस गं, किती वेळ तुझा फोन एंगेज येत होता." तेव्हा सुमती राजला सांगते.

" अरे माझ्या कॉलेजच्या मैत्रिणीचा कालिंदीचा फोन आला होता, तिच्याशी गप्पा मारत होते, तिच्या पतीच्या अचानक जाण्याने तिच्यावर इतका मोठा दुःखाचा डोंगर कोसळला, पण जगात माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा अनेकदा प्रत्यय येतो, अशीच एक व्यक्ती अतिशय मनापासून तिची मदत करतेय, अगदी निस्वार्थ हेतूने, तिच्या पतीचे इन्शुरन्सचे पैसे मिळवून देण्यापासून, त्याची इतर इन्व्हेस्टमेन्ट, प्रॉपर्टि , शेअर्स, बँकेचे व्यवहार, अगदी पैशाचीही मदत त्यांनी तिला केली आणि त्याही पलीकडे जाऊन वर त्यांच्याच कंपनीत फिक्स नोकरी त्याने देऊ केलीय, आजकाल कोण कोणासाठी इतकं करत? वेळेला अगदी सख्खा भाऊ देखील पाठ फिरवतो पण हा तिचा मानलेला भाऊ आज आपल्या बहिणीसाठी इतक करतोय, तिने त्याचं नाव मला नाही सांगितलं पण लवकरच ती मला त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटवणार आहे, मला तर त्या देवमाणसाचं दर्शन करण्याची प्रचंड इच्छा होतेय, तेव्हा तू आता जास्त विचार करू नकोस आणि तू इतक खात्रीने सांगतोयस तर मी मिलिंदला फोन करून विचारून घेईन." अस म्हणून सुमती फोन ठेवते पण राजच्या फोनमुळे मनातून थोडी अस्वस्थच होते आणि मिलिंदला फोन लावते आणि बोलण्या बोलण्यातून तु नासिकमध्येच आहेस ना असं विचारून घेते, पण तो तिला सांगतो.

“ मी ऑफिसच्या कामानिमित्त पुण्याला आलोय आणि माझ्याबरोबर माझी एक कलीग सुद्धा आहे इथल काम आटोपलं कि पुन्हा लगेचच नासिकला निघणार.”

हे ऐकून सुमती चिडत तर नाहीच उलट मिलिंद आपल्यापासून काहीही न लपवता किती खर आणि स्पष्ट बोलतो याचा अभिमान वाटतो

“ आज तुला राजने पुण्यात पाहिलं ” तेव्हा मिलिंद लगेच आनंदाने म्हणतो

“ अरे मग त्याने मला हाक का मारली नाही, निदान फोन तरी करायचा, आम्ही प्रत्यक्ष भेटलो असतो, कॉलेजमध्ये त्याला डिस्टर्ब नको म्हणून मी मुद्दामच त्याला फोन नाही केला.”

हे ऐकल्यावर सुमतीला आपण राजच्या बोलण्यात येउन उगाचच मिलिंदवर संशय घेतला याचं वाईट वाटत आणि इतर जुजबी गप्पा मारून ती फोन ठेवते, तीन-चार दिवसांनंतर सुमतीला कालिंदीचा पुन्हा फोन येतो, ती तिला आपल्या भावाला म्हणजेच त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटण्यासाठी तिला पुण्याला येण्याचा आग्रह करते, कालिंदीच्या आग्रहाला मान देऊन सुमती दोन दिवसांनी दुपारची वेळ ठरवुन बसने पुण्याला येते, डेपोमध्ये कालिंदी आधीच सुमतीला घ्यायला आलेली असते, सुमती उत्सुकतेने पुन्हा एकदा त्या माणसाचं नाव विचारते पण कालिंदी नाव न सांगताच आपण थेट त्याच्या ऑफिसमध्येच चाललो असल्याच सुमतीला सांगते आणि समोरच्याच बिल्डींगमधील एका ऑफिसात सुमतीला घेऊन येते आणि सरळ आपल्या बॉसच्या केबिनमध्येच नेते, बॉस पाठमोरा उभा राहून हातातील फाईल उघडून डिस्प्लेबोर्डवरचा चार्ट पाहत उभा असतो, दरवाजा उघडल्याची चाहूल लागल्याने बॉस मागे वळून पाहतो आणि अतिशय आश्चर्याने आणि आनंदाने म्हणतो, “ अरे सुमती तू आणि इथे !”

आता आश्चर्याचा धक्का बसण्याची पाळी कालिंदीची असते, “ म्हणजे तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता ? ”

कालिंदीच्या चेहऱ्यावरील उत्सुकता अधिक ताणण्यासाठी मिलिंद कालिंदीलाच विचारतो ओळख बरं हि कोण असेल?

“ हि माझी कॉलेजची मैत्रीण सुमती, आम्ही दोघी एकाच वर्गात शिकत होतो पण सर तुमचं आणि हिचं नातं काय? ”

मिलिंद सुमतीकडे पाहत नुसतंच हसतो पण सुमतीच आता जास्त ताणून न धरता ती आणि मिलिंद पती-पत्नी असल्याचं कालिंदीला सांगते, कालिंदी आश्चर्याने सुमतीला म्हणते,

“ म्हणजे मी तुला एक सरप्राईज द्यायचं ठरवलं होत पण तुम्ही दोघांनी तर मलाच एक मोठ सरप्राईज दिलंय, आज मी इतकी आनंदात आहे म्हणून सांगू, मला भाऊ तर आधीच मिळाला होता पण आज माझी मैत्रीणच मला माझी वहिनी म्हणुन मिळालीय, खरंच सुमती तू खुप नशिबवान आहेस, असा दुसऱ्याची काळजी घेणारा, मनमिळाऊ, परोपकारी दुसऱ्याच्या दुखःत स्वतःला झोकून देऊन मदत करणारा जोडीदार तुला मिळाला, अशी माणसं फार दुर्मिळ असतात, नाहीतर आजकालच्या या स्वार्थी जगात इतकी माणुसकी शोधूनही सापडणार नाही, मी तर सरांची आयुष्यभर ऋणी राहीन, त्यांनी आज माझ्यासाठी जे काही केलंय ते मी मरेपर्यंत विसरु शकणार नाही.”

इतक्यात सुमती काहीतरी आठवून राजला फोन करते व ती स्वतः पुण्याला आल्याचं सांगते आणि मिलिंदच्या ऑफिसचा पत्ता देऊन त्याला तिकडेच भेटायला बोलावते आणि म्हणते तू जे मला फोनवरती सांगितलस त्याचा सगळा खुलासा इकडे होईल.

थोड्या वेळाने राज आपली मैत्रिण पुजासह ऑफिसमध्ये येतो, राज आणि पूजाला आपल्या आई-वडिलांचं नातं हे एक पवित्र भावा-बहिणीच असल्याची खात्री पटते, पूजा कालिंदीची सॉरी म्हणून माफी मागते, राज ही गैरसमजुतीतून घेतलेल्या संशायाबद्दल मिलिंद आणि कालिंदीची माफी मागतो, आता मुलांचे गैरसमज दूर झाल्याच्या निमित्ताने मिलिंद सर्वांसाठी पिझ्झा आणि आईसक्रीमची ओर्डर देतो, इतक्यात त्याची सेक्रेटरी जुली नॉक करून आत येते.

“ सॉरी तू डिस्टर्ब यु सर पण आज संध्याकाळी साडेसातची जर्मन कंपनी बरोबरची मिटिंग कन्फर्म झालीय, तेव्हा तुम्हाला अर्ध्या तासात नासिकला निघायला हवं.”

असं म्हणून एक फाईल कालिंदीच्या हातात देते, पार्टी संपते पूजा राज घरी होस्टेलवर निघून जातात, सुमतीही निघायची तयारी करते, मिलिंदही आता मिटींगची फाईल चाळत सुमतीला म्हणतो.

“ फक्त दहा मिनिटं थांब, जरा एकदा फाईलवरून शेवटची नजर फिरवतो, मिटिंगमध्ये आयत्यावेळी काही गडबड व्हायला नको आणि कालिंदी बाकीच्या फाईल्स आणि मेल सगळ चेक केलंय ना, आपण सगळे एकदमच निघू वाटेतच बसडेपो आहे, सुमतीला बसमध्ये बसवूनच आपण पुढे नासिकला निघू.”

असं म्हणून तिघेही ऑफिसबाहेर पडतात, सुमतीला मुंबईच्या बसमध्ये बसवून देतात, मुंबईला पोहोचल्यावर आठवणीने मला फोन कर असं मिलिंद आग्रहाने सुमतीला सांगतो, टाटा - बाय करून बस निघते.

आता मिलिंद आणि कालिंदी कारमध्ये येउन बसतात, मिलिंद कार सुरु करतो, कालिंदीकडे पाहतो, एक गोड स्माईल देतो, कालिंदीही स्माईल देत हात पुढे करते, मिलिंद हातावर टाळी देतो आणि तसाच तिचा हात घट्ट पकडतो, तिच्याकडे प्रेमाने पाहतो आणि तिला जवळ ओढतो, कालिंदी मिलिंदच्या खांद्यावर डोकं ठेवते, तोही तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि कार जागची हलते, एक मोठं वळण घेऊन गाडी एका गेटपाशी येउन थांबते, वॉचमन येउन दरवाजा उघडतो, कार आत जाते, गेटवरच्या मोठ्या कमानीवर लिहिलेली पाटी दिसते.

‘ हॉटेल हनिमून ’

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानयं, पण प्रत्यक्ष आयुष्यात अश्या प्रकारची सेटींग म्हणजे आपल्याच पायावर धोंडा. बायका काही नसते तिथेही संशय घेतात आणि जिथे खरोखरच आहे तिथे संशयाचे भूत त्यांच्या डोक्यात सोडणे आणि ते काढून आता कायमचे गेले समजून निश्वास सोडणे हे धोकादायक.

छानयं, पण प्रत्यक्ष आयुष्यात अश्या प्रकारची सेटींग म्हणजे आपल्याच पायावर धोंडा. बायका काही नसते तिथेही संशय घेतात आणि जिथे खरोखरच आहे तिथे संशयाचे भूत त्यांच्या डोक्यात सोडणे आणि ते काढून आता कायमचे गेले समजून निश्वास सोडणे हे धोकादायक.>>> ऋ, पतेकी बात. Lol

solid आहे

सरळ मित्र मैत्रीण म्हणावं. उगीच भाउबहीण कशाला. >>> तेच तर , म्हणूनच अज्जिबात आवडली नाही.>>
घाबरु नका....माझ्या बरोबरीचा एक जण होता तो ४ वर्ष आम्हाला सांगत होता की बहिण आहे म्हणून....आणि नंतर त्या दोघांनी लग्न केलं Wink

दादाभाई नवरोजी, असे चिडवतात अशा लोकांना मित्रमंडळींमधे, अजून एक आहे पण ते ईथे सांगण्यासारखे नाहीये तेव्हा असो....