वनवास, शारदा संगीत सारखी मराठी साहित्यातील अभिजात कलाकृती लिहिणारे लेखक प्रकाश नारायण संत (भालचंद्र दिक्षित) यांच्या पश्च्यात त्यांच्या पत्नीने, सुप्रिया दीक्षित (पूर्वाश्रमीच्या सुधा नंदगडकर) यांनी लिहिलेले हे आत्मचरित्र.
अमलताश हे एका झाडाचे हिंदी नाव आहे. त्याला मराठीमध्ये बहावा असं म्हणतात.लेखिका सुप्रिया आणि त्यांचा नवर्याच्या आवडीचे हे झाड. इंदिरा संत यांची हि थोरली सून. पुस्तकात सुप्रिया यांचे बालपण, तरुणपण, डॉक्टरकीचे शिक्षण, प्रकाश नारायण संत यांच्याबरोबरचे भावविश्व, त्यांचे कौटुंबिक जीवन आणि आयुष्यात आलेले चढउतार या सर्वाचा प्रवास आहे.
मला असे वाटले होते कि या सर्वाबरोबरच पुस्तकात ‘प्रकाश नारायण संत ‘ या संवेदनशील, तरल लिखाण करणाऱ्या लेखकाबद्दल थोडीफार माहिती मिळेल. त्यांचे साहित्यिकदृष्ट्या समृद्ध असलेले आयुष्य,त्यांच्या आईचे, इंदिरा संत यांचे, त्यांच्यावर कवियत्री या नात्याने झालेले संस्कार, त्यांचे लेखन कसे आकारास येत गेले किंवा या लेखकाने लिखाणाकरता काय वेगळे परिश्रम घेतो, त्यांना रोजच्या जीवनातून काय स्फूर्ती मिळते, लेखिकेचे म्हणजेच त्यांच्या पत्नीचे यामागे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष काय योगदान होते,दोघांमधले पूरक वातावरण कसे असेल इ. इ.असे काही या पुस्तकातून समजेल अश्या अपेक्षांनी मी हे पुस्तक वाचायला घेतले. परंतु या सर्व गोष्टी बद्दल फारशी माहिती या पुस्तकात मिळत नाही.
वडिलांनी दुसरे लग्न केल्यामुळे, सुधा लहानपणी त्यांच्या आजोळी आई बरोबर राहत असे. आजोळ खूपच श्रीमंत होते. तिकडे त्यांची आणि त्यांच्या आईची, आईच्या आई वडिलांनी आणि भावांनी, खूपच प्रेमाने काळजी घेतली होती. सुधा प्रचंड लाडात वाढलेली होती. शाळेत हुशार होती. आईच्या दम्याच्या आजारामुळे तिने लहानपणीच डॉक्टर व्हायचे ठरवले. आणि मूळच्या अभ्यासूवृत्तीमुळे तसे होवूनही दाखवले.
पुस्तकातल्या अनेक प्रसंगातून असेल जाणवते कि सुधा लहानपणापासून महत्वाकांक्षी आणि व्यवहारी होत्या. प्रकाश नारायण संत मात्र होते कवीमनाचे आणि संवेदनशील. ते लहानपणी खूपच गरीब होते. वडील लहानपणीच गेलेले आणि आई एकटी नोकरी करणारी. सुअधा आणि प्रकाश दोघांचेही पिंड वेगळे होते.
प्रकाश आणि सुधा हे बालमित्र. बेळगावात एकत्र वाढलेले. दोघानाही लहानपणापासून वाचनाची प्रचंड हौस. पुढे प्रकाश पुण्याला जीओलॉजी शिकायला गेले आणि सुधा मुंबईला मेडिकल कॉलेज मध्ये. तिथे देखील पत्र व्यवहाराने दोघांची मैत्री कायम राहिली आणि कॉलेजचे एक वर्ष पूर्ण होताच, वयाच्या २१ व्या वर्षी प्रकाशने सुधाला लग्न करता मागणी घातली. मात्र सुधाला शिक्षण संपवणे जास्त गरजेचे वाटले. आणि इथपासून दोघांचे मन दुखावले जाण्याला सुरुवात झाली. पुढे चार वर्षांनी त्यांचे लग्न झाले.
इंदिरा संत या मराठी साहित्यातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवियत्री. इंदिरा संत आणि सुधाची आई या दोघी एकाच कॉलेज मध्ये शिकवत होत्या. दोघींची वर्षानुवर्षे मैत्री होती परंतु सुधा-प्रकाश यांच्या लग्नात झालेल्या मानपानामुळे ते संबंध बिघडले आणि सुधाच्या आईने रत्नागिरीला नोकरी करायला सुरुवात केली. MBBS चे शिक्षण झाल्यावर मनात असूनही, कौटुंबिक जबाबदार्यांमुळे सुधा यांना MD करता आले नाही आणि डॉक्टरकीच्या कारकिर्दीकारता आयुष्याच्या उमेदीच्या वयात हवा तसा वेळ देता आला नाही. मात्र “सुधामुळे प्रकाशचे लिहिणे, चित्र काढणे, व्हायोलीन वाजवणे थांबले” असे ताशेरे आयुष्यभर सहन करावे लागले. जरी सुधा आणि प्रकाश कऱ्हाड ला राहत असल्याने सासू सुनेचे भावविश्व स्वतंत्र राहिले तरी आयुष्यभर अनेक समज-गैरसमजांमुळे असंतोषाचेच राहिले.
लेखिकेला नेहमीच वाईट वाटत राहिले कि तिला तिच्या लेखक नवऱ्याला वेळोवेळी भावनिक आणि मानसिक साथ देता आली नाही. लेखिकेला कित्येकदा प्रकाशचा हळवा, हळुवार स्वभाव कळायचाच नाही. कलावंत फुलून यायला भावनिक साथ तितकीच महत्वाची असते. त्या तारा कधी जुळल्याच नाहीत हा दैव दुर्विलास.
तसेच त्यांच्या दोघांच्या कौटुंबिक आयुष्यात अनेक चढ उतार आले. एखादा चांगला प्रसंग घडला कि त्या पाठोपाठ एक वाईट प्रसंग घडयाचाच.जोडीला प्रकाश यांची तब्येतदेखील त्यांना साथ देत नसे. प्रकाश,सुधा आणि इंदिरा संत या सगळ्यांचीच तब्येत बिघडत असे .आणि त्यामुळे त्या तिघानाही वरचेवर हॉस्पिटल मध्ये रहायची वेळ आली. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून प्रकाश नारायण संत आयुष्यातील ३० वर्षे काहीही लिहू शकले नाहीत.
या पुस्तकातल्या काही गोष्टीनी मात्र मला भुरळ घातली. पुस्तकाचा कालखंड अंदाजे १९४० ते २००० पर्यंतचा. तेव्हाची सामाजिक आणि कौटुंबीक जीवनपद्धती कशी होती याचे फार सुंदर चित्रण केले आहे. मोबाईल ,TV , इंटरनेट या सर्वांचे जेव्हा अस्तित्व नव्हते तेव्हा माहिती मिळवण्याची आणि करमणुकीची साधने काय होती हे वाचायला छान वाटले.आजूबाजूला घडणारी छोटो मोठी घटना पण करमणुकीचा विषय बाबत असे. झाडांचे वाढणे, बहरणे, घरातल्या पाळीव प्राण्यांबरोबर खेळणे, निसर्गाची विविध रूपे पाहणे या गोष्टीनी रोजच्या जीवनात विरंगुळ्याचे क्षण येत असत. पत्रे पाठवणे आणि आलेली पत्रे वाचणे हा आयुष्यातील महत्वाचा भाग होता. तसेच प्रकाश नारायण संत यांना आवडणाऱ्या अभिजात रशिअन पुस्तकांचे संदर्भ, त्यातले उतारे,कोट्स यांच्या उल्लेखामुळे त्यांचा वाचनाचा व्यासंग समजून आला.
लेखिकेने अर्थातच त्यांच्या काळातले बोली भाषेतले कित्येक शब्द यात स्वाभाविकपणे वापरले आहेत जे आता आपल्याला माहित पण नाहीत..उदा.’ लसण्या ‘ नावाचा हातात घालवायचा बांगडी सारखा दागिना किंवा नाकातल्या मूगबटातला हिरा.
सगळ्यात महत्वाचे हे देखील समजले कि वनवास,शारदा संगीत मधला लंपन म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः प्रकाश नारायण संत याचे लहाणपणेचे रूप आहेत.त्यांनी वयाच्या २६ व्या वर्षी लंपन ला प्रथम एका कथेत शब्दबद्ध केले. आणि नंतर तब्बल ३० वर्ष्यांच्या खंडानंतर वयाच्या ५६व्या वर्षी त्यांनी उर्वरित कथा संग्रह लिहायला घेतला. ज्या तरलतेने त्यांनी लंपनची भावनिकता वयाच्या ५६ व्या वर्षी शब्दात पकडली आहे हे पाहून मन थक्क होते. प्रतिभा प्रतिभा कशाला म्हणतात तर याला.
खूप खूप वाईट वाटत राहते कि नियतीने या लेखकाला ३० वर्ष या लेखनाच्या अभिव्यक्तीपासून दूर ठेवले.आणि ही खंत काही केल्या माझ्या मनातून पुसली जात नाही.
सुरेख परिचय! अमलताश (जितका
सुरेख परिचय! अमलताश (जितका सुंदर वृक्ष तितकं सुंदर नाव!) विषयी एके ठिकाणी वाचले होते.
अर्थात ५६व्या वर्षी सुरुवात करून त्यांनी ही चार पुस्तकांची मालिका लिहिली हे आपलं भाग्यच!
३० वर्षे जर प्रकाश संत लिहीत राहिले असते तर लंपनच्या सारखे किती साहित्य निर्माण झाले असते ह्याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो
झुंबर ह्या मालिकेतल्या शेवटच्या पुस्तकाच्या blurb वर प्रकाश संत यांना लंपनच्या वडिलांचा अचानक मृत्यू होतो आणि लंपनचे भावविश्व बदलते असा शेवट करायचा मनात होते असे लिहिले आहे. हे देखिल बहुतेक त्यांच्या व्यक्तिगत अनुभवावर आधारलेले आहे का?
प्रकाश संतांची लिहिलेली चार
प्रकाश संतांची लिहिलेली चार ही पुस्तकं वाचण्याची संधी मिळाली दक्षिणा या माबोकरीण मुळे . तिने जेंव्हा
ही पुस्तकं भेट म्हणून दिली तेंव्हा मला कल्पना ही नव्हती कि या पुस्तकांतील भावविश्वात आजन्म गुंतून
पडेन . अमलताश वाचल्यावर त्यांच्या जीवनातील कटू अनुभवांचा परिचय होईल आणी म्हणूनच हे
पुस्तक वाचवणार नाही बहुतेक..
I rather let Lampan be Lampan only!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पारुबाई, छान माहिती मिळाली.
पारुबाई, छान माहिती मिळाली. धन्यवाद.
लेखिकेला प्रकाशांचा हळवा
लेखिकेला प्रकाशांचा हळवा स्वभाव कळायचा नाही असं अजिबात नाहीये. पण प्रकाश जास्त हळवे होते हे निश्चित. दोघांनाही संसारासाठी किती कश्ट घ्यायला लागले हे कळते. जरुर वाचावे असे पुस्तक.
फारच एकांगी लेख. आणि
फारच एकांगी लेख. आणि लेखिकेबद्दलचा नाराजीचा सूर अगदीच जाणवला.
मी अमलताश वाचलं नाहिये पण सुधाला शिक्षण पुर्ण करून मग लग्न करावं वाटलं तर त्यात गैर काय आहे? तुमचा नाराजीचा सुर तिथे जास्त तीव्रपणे जाणवतोय. शिवाय दोन व्यक्ती वेगळ्या असतात. एखाद्या अपेक्षेने पुस्तक वाचणे योग्य आहे पण त्यात आपल्याला हवे ते वाचायला न मिळाल्याने ताशेरे ओढणं ?
अमलताश वाचायचा प्लॅन करणार्यांनी हा लेख वाचू नये हे इथे मी नम्रपणे नमूद करू ईच्छिते. त्यामुळे पुर्वग्रहदुषित नजरेने वाचले जाऊ शकण्याची शक्यता आहे.
लेखिकेला कित्येकदा प्रकाशचा
लेखिकेला कित्येकदा प्रकाशचा हळवा, हळुवार स्वभाव कळायचाच नाही. कलावंत फुलून यायला भावनिक साथ तितकीच महत्वाची असते. त्या तारा कधी जुळल्याच नाहीत हा दैव दुर्विलास.<<< जे खरंच पटलेलं नाहीये.
सविस्तर नंतर लिहिते.
पुस्तक वाचेनच. पण लंपनला
पुस्तक वाचेनच.
पण लंपनला मात्र डोक्यातून बाजूला काढून, एक स्वतंत्र पुस्तक म्हणून वाचेन.
माझ्याकडे आहे ते पुस्तक.
माझ्याकडे आहे ते पुस्तक. (आमच्या सौ. च्या पुस्तक भिशीत त्या पुस्तकावर चर्चा झाली होती.) पण का कुणास ठाऊक; मला वाचण्याची इच्छाच होत नाहीय. म्हणजे इंदिरा संतांच्या सुनेने आपल्या घरातील व्यक्तींविषयी लिहिलेले काय वाचायचे असा किंतु मनात येतो. दक्षी म्हणते तर आता वाचेन; पण केव्हा ते सांगता येत नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वतंत्र लेखन म्हणून वाचा की
स्वतंत्र लेखन म्हणून वाचा की पण , इंदिरा संत , प्रकाश संत याना का शोधायच त्या लेखनात.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
अतिशय सुंदर कथन आहे एका
अतिशय सुंदर कथन आहे एका स्त्रीचे "अमलताश" म्हणजे. पुस्तकाची ३४४ पाने म्हणजे बाईंनी तुमच्याआमच्यासमवेत मारलेल्या आठवणींच्या गप्पा. आता ह्या आठवणी नेहमीत मधात न्हालेल्या असतील असे कधीच असत नाही. प्रत्येक स्त्री ही स्वतंत्र विचार करणारीच असली पाहिजे ही भावना प्रत्येक वाचकाने आपल्या मनी ठेवायला हवी. त्या लेखिकेला जे वाटले ते लिहिले...आणि डॉ.सुप्रिया दीक्षित यांच्या लिखाणातील जी मृदता छापील स्वरुपात समोर आली आहे ती वाचताना तर जाणवतेच शिवाय आठवणींचा तो फुलोरा किती मोहकरित्या त्यानी जपला आहे हे पानापानातून जाणवते.
पारुबाई यानी अमलताशची ओळख छान करून दिली असली तरी त्यानी आपल्या लिखाणात "..परंतु या सर्व गोष्टी बद्दल फारशी माहिती या पुस्तकात मिळत नाही...." ~ हे एक जे वाक्य वापरले आहे त्याचे कारण समजून येत नाही. अमलताश सारखे लिखाण म्हणजे "मला स्मरत असलेला माझा संसार..." असे असताना प्रकाश नारायण संत हे एकच व्यक्तिमत्व आणि त्याच्या अंगी असलेले साहित्यगुण यावर लिखाण टाकू शकणार्या सुप्रियाताई म्हणजे कुणी साहित्यसमीक्षक नव्हेत हे लक्षात घेतले पाहिजे.
पुस्तकात एके ठिकाणी ताईंनी लिखाणासंदर्भात एक अनुभव लिहिला आहे. सकाळ चे प्रमुख पत्रकार ना.वा.ढवळे यानी त्याना "नवीन सदर सुरू करीत आहे. तुमच्या लेखाने सुरुवात करायचे असं आम्ही ठरवले आहे." या प्रस्तावाला सुप्रियाताईनी लागलीच उत्तर दिले होते, "अहो, पण तुम्ही वाट चुकलाय., हा काही माझा प्रांत नाही. संतांची पत्नी असले म्हणून काय झाले ? तुमचा काहीतरी गैरसमज झाला नाहीय ना ?"..... इतक्या विनयशील स्वभावाच्या स्त्री कडून नवर्याच्या संपूर्ण साहित्य कामगिरीचे विश्लेषण होईल अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे होईल.
"अमलताश" आपल्या संग्रही असावे असे इथल्या प्रत्येक वाचक सदस्याला वाटले पाहिजे, हेच या लेखाच्या निमित्ताने मी म्हणेन.
सर्व प्रतिसाद देणाऱ्यांचे मनः
सर्व प्रतिसाद देणाऱ्यांचे मनः पूर्वक आभार..
खूप सुंदर पुस्तक आहे. विशेषतः
खूप सुंदर पुस्तक आहे. विशेषतः वाचताना त्यांनी जगलेले समृद्ध आयुष्य खूप भावतं. घराभोवतीची बाग, चित्रे, पुस्तकं, गाणं यात रमणार कुटुंब वाचून लहानपणीची आठवण येते. पण वाचताना काही काही घटना अजून स्पष्ट यायला हव्या होत्या विशेषतः इंदिरा संत व सुधाताई यांच्यातला दुरावा; तो पुस्तकभर पसरलेला असूनही जरा आच्छादित वाटतो. त्यामुळे त्याचा ताण वाचणाऱ्या वर पण येतो. पण पुस्तक अप्रतिम आहे. जरूर वाचा.
खरं तर अमलताशवरचा हा लेख
खरं तर अमलताशवरचा हा लेख पाहून मला धक्का बसला.
प्र ना संतांच्या पत्नीचे, डॉक्टर दिक्षित यांचे कितीतरी लेख , आठवणी विविध दिवाळीअंकांतून वाचले होते.
बर्यापैकी नॉर्मल, सुखदु:खाने भरलेले आयुष्य! त्यात बाईंना कधी मनासारखी डॉक्टरकी करायला मिळाली नाही हे दु:ख!
अगदी दिडखणाच्या घरापासून, तुटपुंज्या कमाईपासून मग मोठ्ठं घर कसं बांधलं इ. बरंच काही वेळोवेळी वाचलं होतं.
पण इथे परीक्षण वाचून यांचे सहजीवन म्हणजे जणू रडगाणेच असे वाटेल.
असो.
मागच्या दिवाळी अंकात आलेला हा एक लेख वाचा. सुरेख आहे. घराचे नाव अमलताश का वगैरे सुद्धा यात आले आहे. इंदिरा संत आणि त्यांची सून नेहमी भांडतच राहिल्या असे नसून कित्येकदा आनंदाने एकत्र राहिल्या, साहित्यिक चर्चा केली, अगदी विहिणी विहिणीही त्यांच्या घरात एकत्र रहात असत असे अनेक उल्लेख या लेखात आहेत.
संसारात भांडणे, हेवेदावे कुणाला चुकलेत. संसार असाच तर असतो ना, मध्येच भांडत , मध्येच प्रेमात. पण आपल्या पिलांसाठी एक मायेचे घरटे वीणत!
http://epaper.loksatta.com/103971/Loksatta-Diwali-Issue-2012/Loksatta-Di...
या लिंकमधला लेख डॉ. सुप्रिया यांनी लिहिलाय तर चित्रे प्रकाश संतांची आहेत.
'प्रत्येक यशस्वी माणसापाठी (स्वतःच्या अस्मितेचा त्याग केलेली)एक बाई असते हे आपल्या डोक्यात इतके फिट्ट बसलेय की कुठल्या यशस्वी माणसाची स्वतंत्र बाण्याची पत्नी असू शकते आणि आपल्याला 'थोर' वाटणार्या त्या व्यक्तीला ती 'संसारातला सहचर' इतक्याच नात्याने वागवते, त्याची केवळ सावली बनत नाही हे आपल्या पचनीच पडत नाही.
अमलताश एका माबोकर सुहृदाकडून
अमलताश एका माबोकर सुहृदाकडून - अशोक यांच्याकडून भेट म्हणून घरात आलं. प्रसिद्ध प्रतिभावंत साहित्यिकांचं घर, वैयक्तिक जीवन याबद्दल आपल्याला उत्सुकता असते आणि इथे शरद यांनी म्हटल्याप्रमाणे एक भयही असतं प्रतिमाभंग होईल असं. सुप्रिया दीक्षित या त्या अर्थाने साहित्यिक नाहीत. पण इंदिरा संत, प्रकाश संत या दोन मोठ्या साहित्यिक नावांशी जोडल्या गेलेल्या ( खरे तर तीन,ना.मा.संतही पार्श्वभूमीत आहेतच ) व्यक्तीला या दोन्ही अतिसंवेदनशील माणसांच्या सहवासाची अगदी अंतरंग ओळख असणारच. ही अतिसंवेदनशीलता साहित्याच्या स्वरूपात प्रकट होते ती तिची positive बाजू असते तशीच त्या संवेदनशीलतेची एक negative बाजूही असते जी घरातल्या , जवळच्या व्यक्तीलाच ठाऊक असते. सुप्रियांनी या सर्वच चढउतारांचे समृद्ध तपशील लेखनाच्या निमित्ताने कोणत्याही अभिनिवेशाशिवाय पुन: जगून पाहिले आहेत हे या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य.त्यांच्या माहेरच्या तितक्याच पण वेगळ्याच प्रकारे समृद्ध घराचं, नातेसंबंधांचं चित्रण ही त्यांच्या मर्मबंधातली खास ठेव, त्यांनी अलवारपणे वाचकांसमोर ठेवली आहे.
अशोक. यांच्या प्रतिसादाशी
अशोक. यांच्या प्रतिसादाशी अगदी सहमत.अमलताशमधे ठाम पण ॠजू व्यक्तिमत्व जाणवते .
पुस्तकातल्या अनेक प्रसंगातून असेल जाणवते कि सुधा लहानपणापासून महत्वाकांक्षी आणि व्यवहारी होत्या. प्रकाश नारायण संत मात्र होते कवीमनाचे आणि संवेदनशील. >>>>>>>>>>>>>>> वैधकीय शिक्षण घेत असताना ते पूर्ण करून नंतर लग्न करावयाचे ठरवल्यास त्यांचे अजिबातच चुकले नाही,उलट २१ व्या वर्षी प्रकाश संताना त्यांनी याबाबत थांबवले ते जास्त चांगलेच की.
अमलताश वाचताना दोन घरांतील आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असूनही पतीपत्नीच्या नात्यात सामंजस्य आढळते.मात्र इंदिरा संतांचे आश्चर्य वाटते. भारती यांनी म्हटल्याप्रमाणे ही अतिसंवेदनशीलता साहित्याच्या स्वरूपात प्रकट होते ती तिची positive बाजू असते तशीच त्या संवेदनशीलतेची एक negative बाजूही असते जी घरातल्या , जवळच्या व्यक्तीलाच ठाऊक असते. . हे लिहितानाही सुप्रिया संत, संयतपणे सांगतात.
अमलताश जरूर वाचा.
http://nandinidesai.blogspot.
http://nandinidesai.blogspot.in/2013/06/blog-post.html
अमलताशवर कित्येक दिवसांपूर्वी लिहिलेला लेख.
नंदिनी, तू लिहिलेलं परीक्षण
नंदिनी, तू लिहिलेलं परीक्षण मस्तं आहे.