वारसा भाग १९

Submitted by पायस on 12 March, 2015 - 18:46

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/53025

संपूर्ण गावात गोंधळ माजला होता. अनेक डाकू निशस्त्र होते. त्यांना आता काय करावे हेच कळत नव्हते. तर तांत्रिकसेना चिडलेल्या गावकर्‍यांना तोंड देता देता जेरीस आली होती. त्या डाकूंनी आपण गावकर्‍यांच्या बाजूचे आहोत हे दाखवण्यासाठी तांत्रिकांना मारायला सुरुवात केली. आता शस्त्रांनी लढावे का मंत्र वापरावेत का पळ काढावा अशा तिहेरी संभ्रमात तांत्रिक पडले. या सर्व प्रकारात सांख्यिक बळ, जे मिळवण्यासाठी दुर्जनाने कष्टाने योजना आखून प्रयत्न केले होते, रातोरात जंगलात हल्ला करवला होता, ते सांख्यिक बळ गावकर्‍यांच्या बाजूने झुकले. दारूगोळा नष्ट केला गेला होता. पण या सर्वांना हरवायला दारूगोळा लागतच कुठे होता?
"स्थिर भवाम"
तेवढ्या भागात सर्वजण स्थिर झाले. कोणालाही हालचाल करता येईना. फक्त एका व्यक्तीच्या पावलांचा आवाज येत होता. सुर्रर्रप. ती जिभल्या चाटत होती. ते हास्य कोणालाही मधुर वाटले असते, पण असे म्हणतात विषही चवीला मधुर असते. मंजू चालत होती हे म्हणणे चुकीचे ठरले असते. ती जणू त्या सर्वांमधून तरंगत होती. एक, दोन, तीन, चार...... ती मोठ्याने आकडे मोजत होती. मग ती एके ठिकाणी थांबली.
"मग, तुमच्यापैकी कोणाला आधी गावाचा निरोप घ्यायचा आहे? का मी म्हणू जगाचा?"
हे म्हणता म्हणता तिचे रुप पालटले. तिचे काळी मांजरीचे थरकाप उडवणारे रुप आले.
"ह्म्म कोण आधी जाणार मग? तू......... का तू? हाहाहाहा. किंवा कदाचित तू........... ह्म्म......... मियांव"
तिने पंजाच्या एका फटकार्‍यात त्या अनामिकाचा गाल सोलला. मियांव म्हणत तिने हवेत झेप घेतली आणि
धांय............ तिच्या खांद्यात गोळी लागली होती. प्रताप आणि शामने आपले लक्ष्य गाठले होते. जमीनीवर पडलेली मंजू रागाने त्यांच्याकडे बघत होती. प्रताप बंदूकीत नवीन छर्रा भरत म्हणाला.
"नाही. सर्वात आधी तू"
~*~*~*~*~*~

राव आणि बळवंत चालत होते. त्यांनी बाळगलेल्या सावधगिरीचा काहीच उपयोग झाला नव्हता. ते जिकडे पाहत तिकडे एखाद दुसरे प्रेत पडलेले होते. गोंधळ माजून जेमतेम पाव घटिका किंवा त्यापेक्षा थोडासाच अधिक काळ झाला होता. फाडलेली प्रेते का फाडल्यामुळे मेलेली माणसे? ते दोघे एकमेकांकडे पाहत आणि मान हलवित. एका बोळाशी मात्र राव थबकले. त्यांना तीव्र भावना जाणवल्या. जणू एक अजगर जबडा उघडून बसला आहे आणि ते दोघे त्या जबड्याच्या बाहेर थांबले आहेत. "बा काय झालं?" बळवंतने विचारले. श्श्श.......... त्यांनी त्याच्या तोंडावर बोट ठेवले. त्या बोळाच्या दुसर्‍या तोंडाशी जात त्यांनी अंगठयानी इशारा केला. बळवंतानेही मान हलविली. त्यांनी स्वतःशीच म्हटले १ .....२ ...........३
"हे थांबा जरा" तो हे म्हणेपर्यंत दोघांनी दोन गोळ्या झाडल्या होत्या. त्याने कोलांट्या खात त्या दोन्ही चुकवल्या.
"थांबा भाऊ जरा. मी काय तुम्हाला खातोय का?" लाखन त्याच्या सामान्य रुपात उभा होता. त्याने दोन्ही हात वर केले होते. त्याच्या चेहर्‍यावर खेळकर हसु होते. जणू 'मला शोधले तुम्ही आता माझ्यावर राज्य' असे भाव होते. ते दोघेही बुचकळ्यात पडले. याला परिस्थितीचे गांभीर्य कळतंय का?
तो काही पावले मागे गेला. मागे एक भिंत होती. त्याने भिंतीकडे पाठ तशीच ठेवून भिंतीवर उडी घेतली. तो भिंतीवर बसला आणि म्हणाला
"या अशा लढाईत मजा नाही. तुम्ही मला बंदूकीने सहज मारू शकता. पण सामना बरोबरीचा व्हायला हवा. म्हणून मी पळणार. तुम्ही जोवर मला थांबवत नाही तोवर मी पळतच राहणार. आणि वाटेत कोणीही भेटले तर ................ हेहेहेहे. मग, मला पकडताय ना?"
~*~*~*~*~*~

दुर्जन पळत होता. त्या गुहेत तो मागे लागलेल्या पमाण्णावर मंत्राचे वार करीत होता. पमाण्णाही ते वार कौशल्याने चुकवत होता. त्याच्या पाठीवर अग्रज बसला होता. त्याला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अग्रजचे प्राण महत्त्वाचे होते. अग्रजकडे मर्यादित प्रमाणात काडतुसे व बंदूक होती. त्यामुळे त्याने दुर्जनसाठी त्या जपून ठेवणेच महत्त्वाचे समजले. पळता पळता अचानक दुर्जन थांबला. थांबला म्हणण्यापेक्षा तो धडपडला. ठेचकाळत तो जमिनीवर कोसळला. अग्रज व पमाण्णा थबकले. त्यांना तो अशा रीतिने पडण्याची अपेक्षा नव्हती. दोघेही एकमेकांकडे प्रश्नार्थक दृष्टीने बघू लागले. दुर्जन आता रांगत होता. त्याला कसला तरी त्रास होत होता. तो मोठ्या कष्टाने श्वास घेत होता. त्याच्या डोक्यात एकच विचार होता "आत्ताच का?" तो रक्त ओकत होता. ओकून काही क्षण त्याने धापा टाकल्या. त्याच्या घशातून गुरगुराट ऐकू यायला लागला. "दोन वेळा झाले. तिसर्‍यांदा नाही चालणार" असे तो स्वतःशीच बडबडू लागला.
"पमाण्णा तुला काही समजतंय का? याला काय होतंय?"
"मालक, मी देखील तुमच्या इतकाच आश्चर्यचकित आहे. पण याची काहीतरी कमजोरी आहे. हा व्याघ्ररुपधारक पूर्वीइतका ताकदवान दिसत नाही. आपल्याला याचा फायदा उठवायला हवा."
"पूर्वीइतका? मी पूर्वीपेक्षा जास्ती ताकदवान आहे." असे म्हणत दुर्जन व्याघ्ररुपात आला. त्याने पमाण्णावर धाव घेत जोरात टक्कर दिली पमाण्णा त्या टकरीने लांब जाऊन पडला.
"होय हा खरेच पूर्वीपेक्षा जास्त ताकदवान आहे. याचे आभूषण लवकर शोधायला लागेल.
~*~*~*~*~*~

उफ्फ, प्रताप आता थकला होता. शाम देखील तिच्या पासून वाचता वाचता थकत चालला होता. मंजू मात्र अजूनही चांगलीच चपळाईने हालचाली करीत होती. तिला कसलाही थकवा आलेला जाणवत नव्हता. तिच्या दंडाला गोळी चाटून गेली होती. तिथून रक्त येत होते हे निश्चित. त्या दोघांना तिने दमवून दमवून जेरीस आणून मारायची योजना आखली होती म्हणा ना. ते दोघेही आता त्यांच्या सीमेवर होते. प्रतापकडे असलेले छर्रेही संपत आले होते.
मंजू हे बघून थांबली. तिने त्या दोघांकडे बघून एक लाडिक हास्य केले आणि शामला डोळा मारला. मांजर आपल्याला डोळा मारत आहे ही कल्पना सहन होण्यासारखी नव्हती.
"तिला तिच्या भक्ष्यांबरोबर खेळायला आवडते." शामच्या डोक्यात एक विचार वीजेसारखा चमकून गेला. तो उठला आणि मंजूकडे चालू लागला. अर्थातच हे तिला रुचणे शक्य नव्हते. तिने पंजाचा एक हलका फटका मारला. त्या फटक्यात त्याच्या गालावर तीन वण उमटले. पण तो थांबला नाही.
"मंजू. हे काय चालवले आहे तू? तू नक्की तीच मंजू आहेस का जी मला गावात आल्यावर भेटली होती."
हय्या तिने त्याला जोरात लाथ मारली. पण तो तसाच धडपडत उठला.
"मी अजूनही विश्वास नाही ठेवू शकत कि तू तीच आहेस. मी तुझ्यासाठी बल्लु बरोबर भांडू शकतो. तुला बल्लुबरोबर गेलेलं पाहू शकतो. पण तू तीच आहेस हे मानू शकत नाही. मंजू मला तू आवडतेस."
हे वाक्य संपता संपता तिने त्याला मारायला उचललेला पंजा तसाच हवेत राहिला.
"काय बोलला?"
"होय मी तुझ्यावर प्रेम करतो. मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो."
ती तिच्या मानव रुपात आली. ते भेदक हसु अजूनही तसेच होते. तिने आपल्या उजव्या तळव्याला जीभेने चाटत मान हलकेच गोल फिरवली.
"मियांव. किती गोड! तू काहीही करू शकतोस ना? मग ...........
...........................
माझ्यासाठी आता मर."
असे म्हणत तिने अचानक स्वतःच्या मार्जार रुपात बदलून त्याच्यावर झेप घेतली. शामने बेसावधपणा दाखवला असला तरी तो पुरेसा सावध होता. गळ्याचा वेध घेतला असला तरी तिचे दात त्याच्या डाव्या खांद्यात रुतले. त्याने तिला दाबून धरले.
"उहह्ह जाऊ दे मला."
"तुला जाऊ देईन. पण तुझ्या या बांगडीला नाही."
असे म्हणत त्याने मंजूच्या हातातून ती बांगडी हिसकाडून काढली. या नादात त्याच्या खांद्यातून मासकड निघून आले. हाडाचा तुकडा बाहेर डोकावू लागला. आणि इथे मंजू तिच्या मूळ रुपात आली होती.
"मेल्या. तुझी ही हिंमत."
"प्रताप आता........."
धांय ...................धांय.
प्रतापने दोन गोळ्या झाडल्या. एक तिच्या पोटात शिरली आणि तिची झेप शामच्या पायांपर्यंतच पोचली. तिने नखांनी त्याच्या पायांवर ओरखडे ओढले. मग दुसरी गोळी मात्र तिच्या डोक्यात पाठीमागून घुसली. तिच्या मेंदूचे तुकडे बाहेर आले. शामने तुच्छतेने तिला दूर ढकलले. सर्वजण पुन्हा हालते झाले आणि तिथला गोंधळ आणि गावकर्‍यांचे डाकूंना व तांत्रिकांना मारणे पुन्हा सुरू झाले.
"तू ठीक आहेस?" प्रतापने शामला विचारले.
"कदाचित कायमचा जायबंदी डावा हात आणि पायांवरच्या जखमा. आणि हो टूटा हुआ दिल मेरे दोस्त बाकी सब ठीक है."
प्रताप हसला. मंजूचे प्रेत त्यांच्या बाजूला पडले होते. आता तिथे थांबण्यात काहीच अर्थ नव्हता.

टू डाऊन टू टू गो.
~*~*~*~*~*~

लाखन वेड्यासारखा हसत गावात एकटाच पळत होता. जर कोणी दिसले तर त्याला फाडायचे हा क्रम त्याने ठरवला होताच. पण त्याचे आकाशात लक्ष नव्हते. पमाण्णा सोडून कोणी उडू शकत नाही पण म्हणून वर लक्ष द्यायचे नाही ही चूक त्याला महागात पडली आणि तो फार काळ पळू शकला नाही.
बळवंतने वरून उडी मारली. ती नेमकी लाखनच्या पाठुंगळीवर. समोरून राव आले आणि आता लाखनला पळणे शक्य नव्हते.
धांय...........
त्याच्या उजवा डोळा त्या गोळीने फोडला होता. लाखन वेदनेने विव्हळू लागला. त्याने जोरात आवाज करीत बळवंतला भिरकावून दिले. याला रुप बदलू देता कामा नये, हा विचार करीत हणमंतराव चपळाईने त्याच्या जवळ गेले आणि त्याचा गळा चाचपू लागले. पण हाय रे दैवा. उशीर झाला होता. लाखनने रुप बदलले आणि त्यांच्या गळ्याचा चावा घेतला.
"बा......................" बल्लु जोरात ओरडला. त्याने आवेगात लाखनला जोरात लाथ मारली. एवढा शक्तीशाली लाखन देखील त्याने हबकला. कदाचित डोळ्याच्या जखमेचा देखील परिणाम असावा. बळवंतने रावांना आपल्या मांडीवर घेतले. तो हमसून रडत होता. रावांनी त्याही अवस्थेत त्याचे डोळे पुसले.
"बेटा. तो..... आहे........तू असा.....बसून....नको राहूस..........आणि त्याच्या .....त्याच्या.....गळ्यात...........वर काही नाही.........आत आत..............."
आणि त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
"बा..........................." बळवंतने आक्रोश केला.
तो उठून उभा ठाकला. ही वेळ दु:ख करण्याची नव्हती.
"हेहेहे. दो शेर. एक का शरीर जखमी तो एक का दिल. अब इसे कहते है टक्कर का मुकाबला. अब आयेगा मजा"
~*~*~*~*~*~

धडाम्म्म........ अग्रज विस्फारून बघत होता. त्याला राहून राहून आदित्यवर्म्याची आठवण येत होती. ही ताकद मानवी क्षमतांच्या बाहेर होती. दुर्जन डरकाळ्या फोडत पमाण्णावर चालून जात होता. पमाण्णा पूर्णपणे हतबल होता. तरी तो कसाबसा त्याला लढत देत होता. दुर्जन चे कपडे फाटले होते पण त्याला एकही जखम झाली नव्हती. व्याघ्ररुपाची ताकदच ती होती. अग्रज व पमाण्णा फक्त या दालनातून त्या दालनात पळणे एवढेच करू शकत होते.
"पमाण्णा. तू पूर्वी या व्याघ्ररुपाला हरवले आहेस ना? मग हा इतका ताकदवान कसा?"
"मालक मलाही तेच समजत नाही. मायाकापालिक याच्यासमोर काहीच नाही. हा मनात आणले तर मला उद्ध्वस्त करू शकतो. आता काय करावे मालक?"
आता मरावे असे दुर्जन ओरडला आणि ते ज्या खांबामागे लपले होते त्या खांबाला त्याने तोडले. पमाण्णा परत त्याला गुंतवून ठेवण्यात व्यस्त झाला. मग अग्रजला विचार करायला वेळ मिळाला.
व्याघ्ररुप. मायाकापालिक पंथाची सर्वात गुप्त आणि शक्तिशाली ताकद. जेवढे वाघापासून बनवलेले आभूषण अधिक वाघाच्या जवळ जाणारे तेवढे रुप ताकदवान. म्हणूनच मायाकापालिकाने आभूषण छोटे बनविण्यापेक्षा ठळक असे कवटीच्या रुपात परिधान केले होते. आता मेलेल्या वाघाच्या अवशेषांपासून अधिक जवळ काय असेल? व्याघ्ररुप जिथे तुम्ही महाकालाच्या दिव्यशक्तींनी युक्त अशा वाघात बदलता. वाघ बनता....... ओह शिट.
"पमाण्णा याचे आभूषण शोधण्यात काही अर्थ नाही. कारण याला आभूषणच नाही. आपल्याला याच्याबरोबर जिंकायचे नाही आहे. याला फक्त अडकवून ठेवायचे आहे."
अग्रजचा पमाण्णाला सूचित करायचा हेतू बरोबर होता. पण तो एक चूक करून गेला. तो दुर्जनच्या मारक टप्प्यात आला. दुर्जन हसला. त्याने एक डरकाळी फोडून अग्रजवर एक हिरवा गोळा सोडला. त्याच्या तोंडातून निघालेला गोळा अग्रजला मारणार इतक्यात................
पमाण्णा मध्ये आला. "मालक तुम्हाला मी कसा मरू देईन?"
तो गोळा पमाण्णाचे शरीर भेदत त्याच्या शरीरात समावला. त्याच्या शरीरातला हृदयाच्या जवळील भाग वितळू लागला.
"मालक............" म्हणत तो कोसळला. जवळ जवळ ९ शतकांनंतर कोणीतरी पमाण्णाला मात देऊ शकला होता.
"दाद देनी पडेगी तेरे दिमाग की छोकरे. पर अब क्या करेगा तू? तुझे बचाने वाला नोकर तर गेला. आता मालकाची पाळी." त्याने झेप घेतली.
"ओह शिट" असे म्हणत अग्रजने त्याला चुकविले आणि तो दुसर्‍या दालनात शिरला.
~*~*~*~*~*~

याह्ह्ह्ह्ह.............. इकडे जबरदस्त घमासान चालू होते. लाखन आणि बल्लु एकमेकांबरोबर मल्लयुद्ध खेळत होते. पण लाखनकडे लांडग्याच्या रुपाने अ‍ॅड्व्हांटेज (मराठी शब्द नाही सुचला) होते. तो त्वेषने लढत होता. पण बळवंत त्याला पुरून उरत होता. त्याच्या डोक्यात आता खून चढला होता. वडिलांच्या हत्यार्‍याला मारायचे हा एकच हेतू आता त्याच्या समोर होता. बाकी गाव, तांत्रिक इ. गौण बाबी होत्या. तो पूर्णपणे झोकून देऊन लढत होता. असे म्हणतात कि माणूस प्रत्यक्षात त्याच्या क्षमतांचा पूर्ण वापर कधीच करू शकत नाही. त्याने स्वतःच स्वतःवर मानसिक बंधने घालून घेतलेली असतात. अशा बंधनांमुळे तो कायम क्षमतेपेक्षा शरीराचा व मेंदूचा कमी वापर करतो. पण एखादा तीव्र धक्का ही बंधने तोडून टाकतो. जर तुम्हाला विहिरीत ढकलले तर तुम्ही चडफडत का होईना पोहायला शिकताच. त्याचीच ही थोडी टोकाची आवृत्ती होती. बळवंत लाखनला तुल्यबळ लढत देत होता.
लाखनची आता थोडी टरकली होती. पण तो खूश होत होता. होय, याच योद्ध्याची मी वाट पाहत होतो. एकीकडे बल्लुच्या मनाच्या एका कोपर्‍यात थोड्या प्रमाणात विवेक जागृत होता. याच्या गळ्यात आभूषण नाही पण गळ्याच्या जवळ कोठेतरी आहे आणि त्याच्या डोळ्यांसमोरुन तो प्रसंग तरळून गेला...........
बाने एक चोर पकडला होता. त्या चोराने खूप हुशारी केली होती. एक माणिक चोरून ते गिळले होते. बा सांगत होता
"बरं का बल्लु. काही चोर गळ्याच्या इथे पिशवीसारखे बाळगून असतात. त्या पिशवीत त्याने ते माणिक लपवले होते. ते शल्यक्रिया करून काढावे लागले..........
पण या खून्यासाठी कोणतीही शल्यक्रिया करण्याची गरज नाही. काढ बल्लु.........."
लाखन काहीसा चमकला. पण बळवंतचे लक्ष नाही हीच संधी आहे असे समजून त्याने दोन्ही हातांची मूठ धरून ती बळवंतच्या डोक्यात मारण्यासाठी उंचावली आणि ...................
बळवंतने जोरात ओरडत आपली पाचही बोटे त्याच्या गळ्यात खुपसली. इतर वेळी याने फक्त गळ्यावर प्रहार झाला असता व लांडगा रुपधारक परत सावरला असता. पण आता लाखनची वेळ भरली होती. त्याचे मूळ रुप परत आले आणि तो खाली पडला. बळवंतची मूठ रक्ताळली होती. त्याने ती उघडली. तिच्यात एक दात होता.......लांडग्याचा दात.
लाखन तडफडत होता.......... त्याने अखेरच्या श्वासात विचारले........" मै कैसा लडा रे..........?"
बळवंतला त्याही अवस्थेत त्याच्या योद्ध्याच्या सम्मानाच्या कल्पनेचे हसु आले. तो म्हणाला.
"बिलकुल शेर कि तरह" लाखन याने समाधान पावला. आणि थाड..............
गळ्यावर लाथ मारत बळवंतने पुस्ती जोडली "पर मेरे बाप को मार के गलती किया."

थ्री डाऊन वन टू गो
~*~*~*~*~*~

अग्रज एवढा चपळ असेल असे दुर्जनला अजिबात वाटले नव्हते. या दालनातून त्या दालनात तो त्याला झुंजवत होता. विशेष म्हणजे तो एकही गोळी दुर्जनवर वाया घालवत नव्हता. ते दोघे त्याक्षणी ग्रंथागारात होते. दुर्जनने थोडावेळ व्याघ्ररुप त्यागले. तो लपलेल्या अग्रजशी बोलू लागला.
"अग्रज ना तुझे नाव? तुला पुस्तकं आवडतात असे कळले."
त्याने असेच एक पुस्तक उचलले आणि टराटरा फाडायला सुरुवात केली.
"हे बघ मी पुस्तक फाडतोय." फर्रर्र. आवाज येत होता. अग्रजला याचा राग आला. दुर्जनची खेळी बरोबर होती. पण अग्रज बाहेर आला नाही. तो त्याच्या वडलांना एकदाच भेटला होता पण त्यांनी दिलेला मूलमंत्र त्याच्या नसानसात भिनला होता. त्याला स्वतःचेच नवल वाटे कि त्याच्या वडलांच्या त्या एकदाच सांगितलेल्या शिकवणीचा इतका खोल परिणाम कसा झाला. अगदी साधे वाक्ये होती ती.
"अग्रज. मी तुला सांभाळले असले तरी तुझा स्वभाव मूलत:च वेगळा आहे कारण तू माझा पोटचा मुलगा नाही. तू तरीही मला वडील मानतोस तर मग माझ्याकडून एक गोष्ट शिक. तुमच्या वंशाची सर्वात मोठी कमजोरी आहे तुमचे रागावर नसलेले नियंत्रण. तुझा राग आटोक्यात ठेवायला शिक. लक्षात ठेव आगीपेक्षाही कधी कधी बर्फ धोकादायक असतो."
अग्रज रागावणार नव्हता. उलटे त्याने दुर्जनवरच त्याची खेळी उलटवायला सुरुवात केली.
"तू आभूषण घालत नाहीस. कारण तुला त्याची जरुरी नाही."
हं दुर्जन चमकला. याला नक्की कितपत कळले आहे?
"इतर तांत्रिक वाघाला त्या आभूषणात प्रवेश करायला लावतात. हे आभूषण निर्जीव असल्याने वाघाला पोषण मिळत नाही आणि तो कमी ताकदवान राहतो. पण त्याचा उलटा प्रभाव पडत नाही."
शांत राहा. दुर्जनने काही पुस्तके इकडे तिकडे भिरकावली.
"तू त्याला आपल्या शरीराशी बांधले आहेस. आभूषणाशी नाही. त्यामुळे तो तुझ्या शरीरातून पोषणद्रव्ये शोषत आहे. त्याची तुला कमी जाणवत आहे. तू स्वतःच्या शरीरात एक चालताफिरता मृत्यु घालून घेतला आहेस."
आहाआआआआ. दुर्जन संतापला होता.
"होय. आणि या पोषण द्रव्यांची कमी भरून काढायला मला माणसे खावी लागणार. मी माझ्या सीमेवर आहे हे तुला समजले असले तरी माझ्याजवळ अजूनही वेळ आहे. तुला खाऊन मी माझे मरण टाळू शकतो."
अग्रज बाहेर येऊन म्हणाला. "ते तेव्हा जेव्हा तू मला पकडशील. बघू कोणाची वेळ आधी भरतीये"
असे म्हणत तो दुसर्‍या एका दालनात पळाला.
~*~*~*~*~*~

प्रताप अग्रजला शोधण्यासाठी तळघरात घुसला होता. शामला त्याने बल्लुच्या ताब्यात दिले होते. वरती सर्व डाकू व तांत्रिक संतप्त जमावाकडून मारले गेले होते. गावकर्‍यांची देखील बरीच हानि झाली होती पण बरेच जण जीवंत राहिले होते. आता फक्त दुर्जन बाकी होता. शामची व्यवस्था लावून बल्लु देखील येतच होता. पण अग्रज व पमाण्णाच्या मदतीसाठी प्रताप पुढे गेला होता. न जाणे ते कोणत्या अवस्थेत असतील.
प्रताप चालता चालता ठेचकाळला. ते पमाण्णाचे प्रेत होते. पमाण्णा मेला? प्रताप अविश्वासाने डोळे फाडून त्याच्याकडे पाहत होता.
"छोटे मालक?"
"पमाण्णा." प्रताप सैरभैर नजरेने इकडे तिकडे पाहू लागला.
"छोटे मालक. घाबरू नका. मी मेलो नाही. पण माझे शरीर नष्ट झाले."
"मग आता पमाण्णा? आणि अग्रज?"
"मालक अजून जिवंत आहेत. पण किती वेळ राहतील याची शाश्वती नाही. मला लवकरात लवकर शरीर मिळवून त्यांची मदत करावीच लागेल."
"तू मूळ रुपात लढू शकत नाहीस?"
"शकतो. पण या रुपात दुर्जनने मला मारले तर मी कायमचा संपेन. आपण हा धोका पत्करू शकत नाही. ऐका आता. केवळ संपूर्ण मालकी असलेला मला कुठल्याही शरीरात घुसवू शकतो किंवा तसा हुकूम देऊ शकतो. करारामुळे मी हवे ते शरीर घेऊ शकत नाही. तुम्ही छोटे मालक आहात. तुम्ही मला कुठल्याही नाही पण तुमच्या ओळखीच्या माणसाच्या शरीरात घुसवू शकता. अशी कुठलीही व्यक्ती जी पंचवीस वर्षांपेक्षा वयाने छोटी आहे आणि तुम्ही तिला किमान पाच वेळा भेटला आहात."
प्रतापच्या डोळ्यांसमोर त्या बिकट परिस्थितीत एकच नाव आले.
"मंजू. पण ती......."
अखेर स्त्रीशरीर. माझी ८७२ वर्षांची तपश्चर्या फळली.
"मालक मी एकदा ताबा घेतला कि ते शरीर संपूर्णपणे माझे. आणि ती मेली ना? मग झाले तर. तुम्ही मालकांची मदत करा. मी शरीराचा ताबा घेऊन येतोच."
~*~*~*~*~*~

अग्रज आता पुरता थकला होता. या दालनात लपायलाही जागा नव्हती. ही क्रूर चेष्टा होती. दुर्जन थकलेला वाटत असला तरी त्याच्या आणि अग्रज मधील शक्तीत खूपच अंतर होते. आता नाईलाजाने अग्रजला बंदूक वापरावीच लागली.
धांय धांय धांय धांय धांय धांय
त्याने एका पाठोपाठ सहा गोळ्या दुर्जनवर चालवल्या. पण त्याने लोखंडावर आपटल्यासारखा आवाज झाला आणि दुर्जनवर काहीच परिणाम झाला नाही. दुर्जनने त्याच्या हातातून बंदूक हिसकावली आणि दातांनी चावून मोडून टाकली. अग्रज मागे मागे सरकू लागली. दुर्जनने एक डरकाळी फोडली. अग्रज मागे धडपडत पडला. दुर्जन आता त्याच्याकडे एका वाघाप्रमाणे सरकू लागला. तो जिभल्या चाटत होता. अग्रजच्या हातात एक सळई लागली. आता हाच शेवटचा प्रयत्न असणार आपला, असा विचार करीत असतानाच
धांय धांय
प्रतापने दुर्जनवर गोळ्या झाडल्या. दुर्जन कधी नव्हे तो विव्हळला. त्याची सीमा आता पार झाली होती. त्याने जबडा वासला. "प्रताप त्या गोलाला चुकव." अग्रज वेळेत ओरडला आणि प्रतापने थोडक्यात तो हिरवा गोळा चुकविला.
याह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह करून दात ओठ खात अग्रजने ती सळई त्या वाघाच्या डोक्यात मारली आणि यावेळेस डरकाळी ऐवजी तो मानवी आवाजात ओरडला. त्याही अवस्थेत त्याने अग्रज व प्रतापला पंजे मारून जखमी केले. पण तो अजून काही करणार इतक्यात..........
तो मानवी स्वरुपात आला. पळण्याच्या तयारीत असलेले अग्रज आणि प्रताप थबकले. दुर्जन परत एकदा रक्ताची उलटी करीत होता. यावेळेस त्याला पूर्वीपेक्षाही जास्त त्रास होत होता. तो उलटी थांबल्यावर पुन्हा उठला आणि व्याघ्ररुप घेतले. पण यावेळेस तो धापा टाकत गुरगुरत होता.
"असं समजू नका तुम्ही वाचले. अजून...अजूनही दुर्जनमे जान बाकी है"
पण इतक्यात असे काहीतरी झाले कि सर्वच जागच्या जागी थिजले. ती मुलीच्या लाडिक आवाजातली थरकाप उडवणारी हाक होती.
"माऽऽऽऽऽऽऽऽऽलऽऽऽऽऽऽऽऽऽक"

(पुढील भागात समाप्त)

अंतिम भाग - http://www.maayboli.com/node/53082

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या भागाला खूप वाट बघायला लावलीत हां पायस!

शेवटचा भाग प्लीज लौक्कर टाका!!!>>++१११११११११११११११११११११११११११११११११

सर्व प्रतिसादकांचे आभार Happy
<<पन स्त्रीरुप धोकादायक ना?>> हो आहे ना. पण कसला धोका हे कुठे स्पष्ट झालंय? Happy
असो, अंतिम भाग टंकायला घेतलाय. टंकून आणि एडिटून आज रात्री उशीरापर्यंत प्रकाशित होईल असं आत्ता तरी दिसतंय. अन्यथा उद्या सकाळी नक्की टाकतो.