'वाका'वरील कालच्या सामन्याची नाणेफेक धोनी हरला आणि विंडीजचा कोवळा कर्णधार जेसन होल्डर मनातल्या मनात सुखावला कारण त्याला पहिली फलंदाजी करता येणार होती. ('विंडीजचा कोवळा कर्णधार' हे कदाचित उकळती बियर किंवा 'समाधानी नारायण राणे' सारखं असंबद्ध वाटू शकेल. पण मला खरोखर तो कोवळाच वाटतो. फक्त २३ वर्षे वय. केवळ ३० सामन्यांचा अनुभव. त्याच्या चेहऱ्यात एक प्रकारचा निरागस भाव दिसतो. त्यामुळे त्याच्यावर गेल, सॅम्युअल्स, स्मिथसारख्या धटिंगणांची जबाबदारी असणं म्हणजे अजूनही तीन आणि सहा लिहिताना गोंधळणाऱ्या लहानग्या बालकाला सत्तावीसचा पाढा विचारल्यासारखं वाटतं. असो.) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला मिळणं म्हणजे ख्रिस गेल नामक घोड्याच्या डोळ्यांवरची झापडं काढून त्याला मोकळं सोडता येण्याची संधी मिळणं.
ख्रिस गेल आणि ड्वेन स्मिथ ही दोन अतिज्वलनशील व विस्फोटक रसायनं खेळपट्टीवर आली. मात्र पर्थच्या ह्या खेळपट्टीने तिचा रंग पहिल्या षटकापासूनच दाखवायला सुरुवात केला. त्या रंगात कुठलंही रसायन स्वत:चा रंग दाखवू शकणार नव्हतंच ! खरं तर शमीच्या तिसऱ्याच चेंडूवर स्मिथने जेव्हा प्रहार केला होता, तेव्हा काही वेगळंच वाटलं होतं. पण डुलकी लागून मान एका बाजूला पडल्यावर खाडकन जाग येते तशी खेळपट्टी पुढच्याच चेंडूंवर जागी झाली आणि त्यानंतर चेंडू टप्प्यानंतर यष्टीरक्षकाच्या दिशेने असा झेपावत होता जसा सूर्याला पाहून बालहनुमान झेपावला असावा. शमी-यादवने पहिली काही षटकं फलंदाजांची सत्वपरीक्षाच पाहिली. त्यात स्मिथ उत्तीर्ण झाला नाहीच. शमीच्या त्या चेंडूवर त्याची बॅट खाली येईपर्यंत चेंडू स्वत:च त्याच्या बॅटला स्पर्श करून धोनीच्या हाती विसावला. इथून सुरु झालेली पडझड थांबूच शकली नाही. एकानंतर एक फलंदाज बाद होत जाताना मला मात्र 'आज पुन्हा एक एकतर्फी सामना पाहावा लागणार' अशी हुरहूर लागली होती. विंडीजच्या फलंदाजीची बेजबाबदार फटके, सुमार रनिंग बिटवीन द विकेट्स, तंत्राचा सपशेल अभाव अशी सगळी अशोभनीय अंगं काल व्यवस्थितपणे दाखवली गेली. अखेरच्या टप्प्यात 'कोवळा कर्णधार' मदतीस धावून आला म्हणून जरा तरी सन्मानजनक धावसंख्या नोंदवता आली.
ज्या खेळपट्टीवर शमी-यादव-मोहितने फलंदाजांना नाचवलं, तिथे विंडीजची गोलंदाजी काही सोपी जाणार नव्हतीच. जेरोम टेलर, आंद्रे रसेल, केमार रोच ह्यांचे खांदे आणि शमी, यादव, मोहितचे खांदे ह्यांच्यात वडाच्या झाडाचा बुंधा आणि अशोकाच्या झाडाचा बुंधा ह्यांच्याइतका फरक आहे. तर, ऑफ स्टंप बाहेरील जलदगती, उसळती गोलंदाजी आणि धवन-रोहितच्या बॅट्स ह्यांच्यात चुंबकीय आकर्षण आहे. कोहली जसा परवा पत्रकाराला ओळखताना चुकला तसाच हूकसाठी चेंडू निवडताना फसला. रहाणेच्या विकेटने हॉकआय प्रणालीच्या मर्यादा विंडीजच्या फलंदाजीप्रमाणे उघड्या पडल्या. रैना समोर आला की निर्जीव चेंडूसुद्धा स्वत:च आखूड टप्पा घेत असावा, त्याची ही उणीव इतकी सुस्पष्ट झाली आहे. जडेजाने पुन्हा एकदा हे सिद्ध केले की त्याच्या कुवतीपेक्षा मोठे रेकॉर्ड्स त्याच्या नावावर आहेत. १३४ वर ६ गडी बाद झाल्यावर फॉर्मात नसलेल्या धोनीवर सर्व मदार होती आणि त्याने संघाची डूबती नैया पार केली.
१८३ धावांचं लक्ष्य माफक होतं, पण डावाच्या पहिल्या अर्ध्या भागात विंडीज गोलंदाजांनी त्या धावसंख्येत अजून १०० धावा जोडलेल्या असाव्यात असं भासवलं. पण नंतर मात्र स्वैरपणा वाढत गेला.
भारताने अकरा षटकं राखून लक्ष्य साध्य केलं, तेव्हा निश्चितच विंडीजच्या खेळाडूंना वाटलं असेल की आपण ४५ षटकांत गाशा न गुंडाळता पूर्ण पन्नास षटकं खेळून काढली असती, तर....?? तर कदाचित पाकिस्तानसाठी पुढील फेरीचा रस्ता अधिक जास्त कठीण असता आणि स्वत: विंडीजसाठी थोडासा सोपा.
ह्या विजयामुळे भारताचा मात्र पुढील फेरीतील प्रवेश निश्चित झाला. पण त्याचबरोबरच चांगल्या गोलंदाजीसमोर मोठे लक्ष्य गाठण्यासाठी खेळताना ही फलंदाजी ढेपाळू शकते, हेही समजून आलं. इथून पुढच्या सामन्यांसाठी एकच शुभेच्छा - 'पहिली फलंदाजी मिळो आणि तसे न झाल्यास २०० च्या आतले लक्ष्य असो !'
कीपिंग माय फिंगर्स क्रॉस्ड !
- रणजित पराडकर
समाधानी नारायण राणे लेख मस्त
समाधानी नारायण राणे
लेख मस्त आहे. निष्कर्षाशी सहमत आहे. भारतीय खेळाडूंची प्रेडिक्टेबल अनप्रेडिक्टेबिलिटी वगैरे पाहता टॉसला अनन्यसाधारण महत्व आलेले आहे.