वारसा भाग १७

Submitted by पायस on 5 March, 2015 - 18:02

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/52944

*वीराजी आणि गणिती*

त्या डोंगररांगा तुडवित तो घोडेस्वार एकटाच चालला होता. नुकताच त्याने 'अभिजीत' पाहिला होता. तो अजूनही त्याचे बोलणे आठवत चालला होता.
...........
तिलिस्मघाती जवळ आणताच इतकावेळ न दिसणारे चोरदरवाज्याचे कुलूप दिसू लागले. आता हा अनुभव २६ वेळा घेऊन झाल्यामुळे वीराजीला त्याचे काही विशेष वाटले नाही. त्या चोरदरवाज्यातून ते दोघे आत शिरले. हा हिस्सा खूपच छोटासा होता. आणि त्यात कोठलीही रुढार्थाने संपत्ती अशी नव्हती.
"हे काय? इथे तर फक्त पुस्तके, हे दगड-धोंडे, हे शिलालेख....... हा कसला खजिना?"
तो खोखो करीत पोट धरुन हसू लागला. वीराजीला त्याची सवय झाली असली तरी ते सहन होणे शक्य नव्हते. हा विचित्र माणूस अजून किती दिवस झेलायचा? असो आता तर सर्व कोडी पण माहित झाली आहेत मग होऊन जाऊ दे असा विचार करून वीराजी त्याचा गळ्यावर तलवारीचे पाते ठेवले.
"हसायचं काम न्हाई" वीराजीची करडी नजर त्याच्या डोळ्यांना भिडली. तोही हसण्याचे बंद झाला. त्याच्या लाल डोळ्यांकडे बघताना वीराजीला कसेसेच होत होते. लाल बाहुली असलेले डोळे कोणाचे असतात?
"तुम्ही जहागीरदार मूर्खच राहणार. केवळ गुणवर्धनाकडे असलेल्या डोळस महत्त्वाकांक्षेमुळे तुमच्या हातात काय गवसले आहे हे तुम्हाला कधी कळणार? तो मुधोजी पण तसाच. असो तुझी ती 'निवड' चांगली आहे. किमान तुझी पुढची पिढी हुशार निपजो." त्याने वर बघत जणू प्रार्थना करीत असल्याचा आव आणला.
ए...... वीराजी थोडासा चिडला. पण तो गणिती त्या तलवारीतून आरपार गेला आणि निवांत चालत जाऊन त्याने तिथे पडलेले एक पुस्तक उचलले.
"हे काय आहे माहित आहे? अश्मकतंत्राचे हस्तलिखित. आज हे पाहायला देखील मिळणार नाही. आर्यभटाने लिहिलेला अजोड ग्रंथ. हा शिलालेख काय आहे माहिती आहे? ज्या मोहिमेत तुमच्या वंशाची पमाण्णाशी गाठ पडली त्या श्रीविजय मोहिमेचा वृत्तांत! हा इतिहास आहे, हा खरा वारसा आहे जो तुम्ही तुमच्या वंशाचा म्हणून सांभाळत आहात."
आता वीराजीची तंतरली होती. त्याचे डोके पुन्हा चालू लागले. जर हा खापरपणजोबांना मदत केलेला गणिती आहे, तर याचे वय शंभरीच्या आसपास पाहिजे मग हा इतका तरुण कसा? तो चांगलाच गांगरुन गेला.
"आत्ताच्या पिढीपैकी कोणीच याचे लायक नाहीत. तुला माहित आहे कि हे हिस्से २७च का आहेत? कारण नक्षत्रे २७ आहेत. पण हा हिस्सा २८वा आहे. हा 'अभिजीत' आहे. हा कदाचित आत्ता तुमच्या नक्षत्रांमध्ये बसणार नाही. पण तो कैक वर्षांनी अभिजीताप्रमाणेच ध्रुवपदास गवसणी घालेल. अढळस्थान प्राप्त करेल."
वीराजी काही पावले मागे जात धडपडला. पण दार बंद झाले होते. आता काय करायचे?
"अरे थांब. गेल्या ४ पिढ्यांमध्ये येथपर्यंत पोचलेला तू पहिलाच! असो ऐक आता. आदित्यवर्मन् ने तुमच्यासाठी सोडलेला सर्वात महत्त्वाचा संदेश. पमाण्णा करारपद्धतीमुळे आता पूर्णवेळ तुमच्या सेवेत असतो. त्यामुळे त्याच्यासाठी नवीन शरीराचा बंदोबस्त देखील तुम्हीच करता. बरोबर?" वीराजीने उत्तरादाखल मुंडी हलविली.
"चुकूनही त्याला स्त्री शरीरात प्रवेश देऊ नका!"
हं? स्त्री शरीर नाही चालणार? पण का? वीराजीच्या मनात अनेक प्रश्न उठले.
"तुझ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर द्यायला मी बंधनकारक नाही. हे तर आदित्यचे, तुमच्या सर्वात महान पूर्वजाचे उपकार समजा कि मरण्यापूर्वी त्याला या अटीचा पत्ता लागला आणि त्याने या छोट्याशा कागदाचे, ज्यावर पमाण्णाचे हे सर्वात मोठे रहस्य लिहिले आहे, जतन केले. तू मला शोधले, त्या बदल्यात मी तुला २८ हिस्से दाखवले आणि हे रहस्य सांगितले. आता यापुढे तू आणि तुझे नशीब."
................

वीराजी मायकपाळकडे जाता जाता विचार करीत होता. खजिना कुठे आहे हे तर नीट कळले. पण स्त्री शरीराची काय भानगड आहे? पमाण्णाला स्त्रीच्या शरीरात प्रवेश का नाही करू द्यायचा? आधी कोणी करू दिले नसेल कारण जात्याच स्त्रीचे शरीर नाजुक असते. मग ते लढाईला योग्य नाही म्हणून? पण मग लढवय्या स्त्रिया असतात की. आणि हेच जर कारण असेल तर ते असे निक्षून बजावून सांगण्याचे कारण काय असावे? वीराजी विचारांच्या भाऊगर्दीत हरवला होता. अशावेळी रस्त्यावर लक्ष हटणे यासारखा धोका दुसरा कुठला नाही. त्या खाचखळग्यात एक बारीक, काचेची पूड लावलेला काळा दोरा ताणला गेला आणि घोडा जखमी होऊन अडखळला. ठेचकाळत वीराजी दूर कुठेतरी आपटला. शुद्ध हरपण्यापूर्वी त्याने एक १७-१८ वर्षांचा मुलगा त्याच्याकडे कुतुहलाने पाहत असल्याचे पाहिले.
शुद्धीवर आल्यावर त्याने स्वतःला एक खडकावर दोरखंडाने बांधलेले पाहिले. त्याच्या समोर एक पंचविशीची तरुणी बसली होती. तर त्याच्या घोड्याबरोबर तोच युवक उभा होता. तो घोड्याला गोंजारत होता.
"वीराजी, हेच तुजं नाव ना? मला संगारी म्हनतात. आणि हा दुर्जन. यानेच तुला खाली पाडले आणि जखमी केले. आम्ही मायाकापालिक आहोत."
मायाकापालिक नाव ऐकताच वीराजीच्या मुठी आवळल्या गेल्या. त्याला लक्षात आले कि त्याला का पकडण्यात आले आहे.
"तर तुला कल्पना असावी कि आम्हाला आमचे मंदिर पाहिजे. आता मला वैयक्तिक अनावश्यक रक्तपात आवडत नाही. पण दुर्जनची गोष्ट वेगळी आहे. तर तुझ्यापुढे दोनच पर्याय आहेत. यातर ते मंदिर आमच्या हवाली करण्याची व्यवस्था कर. मला कल्पना आहे तू इथे बसून ते करू शकत नाही. आम्ही तुझ्याबरोबर एक पूर्णपणे निर्धोक क्रिया करू. त्याने तू दिलेले वचन पाळले नाही तरच तुझा मृत्यु होईल. दुसरा पर्याय, दुर्जनकडून मृत्यु."
वीराजी रागाने लालबुंद झाला. तो पचकन थुंकला. संगारीने निराशेने खांदे उडवले.
"हा असा नाही ऐकणार. दुर्जन"
दुर्जन हातात कुर्‍हाड घेऊन पुढे आला. त्याने त्वेषाने वीराजीच्या उजव्या पायावर ती कुर्‍हाड चालविली. ३ वारांनंतर वीराजीचा पाय गुडघ्यातून तुटला. वीराजी गुरासारखा ओरडत होता.
"आतातरी तुला अक्कल आली असेल. बोल, काय पर्याय निवडला आहेस?"
" ******** *********. ए भवाने तुम्ही कोणाबरोबर शत्रुत्व घेताय नव्याने सांगू का आता तुला? एकदा समूळ नायनाट झाल्यानंतर अक्कल आली नाही वाटतं. याचा परिणाम चांगला नाही होणार."
"अ ओ. अक्कल कोणाला आली नाही याचे उत्तर द्यायची गरज आहे का? दुर्जन........ दुर्जन काय करतोय तू?"
दुर्जनने कुर्‍हाड फेकून धनुष्यबाण हातात घेतले होते.
"संगारी. याला इतक्या सहज मारायचे का?" असे म्हणत त्याने एक बाण सोडला तो सरळ वीराजीच्या खांद्यात जाऊन रुतून बसला.
"तू मरणार हे निश्चित, हळूहळू. ४०० वर्षात आम्ही मारू शकलेला पहिला जहागीरदार आहेस तू. तू एकटा बाहेर पडला तिथेच तू चुकला. आता ४०० वर्षांचा सूडाग्नी तुला ४०० बाण मारून पूर्ण होईल."
हे वाक्य पूर्ण करता करता त्याने दुसरा बाण वीराजीच्या मांडीत मारला. २ झाले, ३९८ बाकी.
~*~*~*~*~*~

दुर्जन त्याची वस्त्रे चढवता चढवता त्या १२ वर्षांपूर्वीच्या प्रसंगाला आठवत होता. आरशात स्वतःचे रुपडे वारंवार न्याहळत होता. खरेतर ती काही राजेशाही वस्त्रे नव्हती. नाही म्हणायला फेट्याला तेवढी सोनेरी किनार होती. पण ती आवश्यकता म्हणून लावली होती. शेवटी डाकूंच्या सरदाराला काहीतरी वेगळेपण नको? असाच १२ वर्षांपूर्वी एक जहागीरदार मेला होता. आज दुसरा मरणार होता.
०००

अग्रज आणि बळवंत अत्यंत सावधगिरीने पावले उचलत होते. ते मंदिराच्या खूप जवळून चालले होते. तळघरात प्रवेश करून त्यांना आदित्यवर्मन् च्या कागदांना आणायचे होते. अग्रजच्या योजनेतला तो सर्वात महत्त्वाचा टप्पा होता. काहीही करून त्यांना आदित्यवर्मन् ने केलेले मायाकापालिकांचे, त्यांच्या क्रियांचे विश्लेषण हुडकायचे होते. शत्रूविषयी संपूर्ण माहिती अग्रजला हातात पाहिजे होती, केवळ पमाण्णाच्या आणि त्याने स्वतः जेवढे वाचले त्याच्या स्मरणावर अवलंबून राहणे घातक होते. अखेरीस त्यांना पमाण्णाने सांगितलेले भगदाड दिसलेच. तेच छुपे भगदाड जिथून कधीकाळी पमाण्णा त्या गोर्‍या सोजिरांना त्यांच्या मृत्युस्थळी घेऊन गेला होता. बळवंतने कानोसा घेतला. त्याने लगेच एका हाताने अग्रजला गुहेच्या एका भिंतीशी दाबले. वरून दोन पहारेकरी चालत चालले होते. त्यांचे खाली काय चालू आहे याच्याकडे मुळीच लक्ष नव्हते. बल्लुने सुटकेचा निश्वास सोडला आणि त्या गुप्त तळघरात ते प्रवेशकर्ते झाले.
०००

मंजू व संगारी पहाटेच्या साधनेत मग्न होत्या. संगारीने यापूर्वी जहागीरदार मरताना पाहिले असल्याने तिला काही विशेष वाटत नव्हते. पण मंजूसाठी हा प्रथम अनुभव होता. तांत्रिकांमध्ये आढळणारी तामसी वृत्ती तिच्यात ठासून भरली होती. भैरवीनंतरची सर्वाधिक ताकदवान तांत्रिका असल्याचा तिला रास्त अभिमान होता. त्या महत्त्वपूर्ण बळीच्या कल्पनेनेच तिच्यातील शक्ती हावी होऊ लागली. "हो, माऊ. थोडी कळ काढ." संगारीने तिला वेळीच आवरले. तळव्याच्या मागचा भाग जीभेने चाटत मंजूने मान हालविली. त्या दोघी पुन्हा साधनेत लीन झाल्या.
०००

प्रताप, पमाण्णा, राव हे ५ सैनिकांसह आत घुसले होते. नदीच्या वाटेवर केवळ ३ दरोडेखोर पहारा देत होते. त्यांना मारणे काही फार अवघड काम नव्हते. प्रताप, पमाण्णा व रावांनी त्या दरोडेखोरांचा वेश घेतला. खरेतर हैबतरावांना सोडवणे हे आता मुख्य उद्दिष्ट नव्हते. पण तरीदेखील हैबतरावांना कदाचित काही ठाऊक असले तर? या एकमेव वेड्या आशेपायी त्यांना सोडवण्याच्या दृष्टीने, किमान त्यांच्याशी एकदा बोलता आले तर म्हणून हे वेडे साहस होत होते. सकाळच्या बळीच्या गोंधळाचा त्यांना फायदा घ्यायचा होता. त्यांना काय माहिती कि आज हैबतरावांची पाळी होती.
०००

लाखन त्याच्या तलवारीला पाणी लावत बसला होता. सूर्य आता उगवला होता. सरदार केव्हाही बोलावणे पाठवतील. त्याने ती तलवार बाजूला ठेवली. कपडे केले. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. बोलावणे आले. त्याने खिडकीतून दूरवर नजर टाकली. कुठे आहेस तू? त्या दिवशी तुला पळून जाऊ दिले, आता माझी निराशा नको करूस.
~*~*~*~*~*~

हैबतरावांना मागून लाथा मारत मारत गावाच्या मधोमध काहीशा उंचावर उभारलेल्या वेदीवर नेण्यात आले. नेहमी डोक्यावर मानाची पगडी, फेटा मिरवणार्‍या हैबतरावांना बोडक्या डोक्याने चालावे लागत होते. त्यांच्या चेहर्‍यावर खिन्नता स्पष्ट दिसत होती. नखे उपसून काढलेली त्यांची बोटे अजूनही वेदना देत होती. खुरडत खुरडत काही दिवसांपूर्वी या गावावर राज्य करणारी ती व्यक्ती आज गलितगात्र झाली होती. हैबतरावांनी मान उंचावून पाहिले. बरेचसे गावकरी आपापल्या घरातून तो प्रकार पाहत होते. नाही म्हटले तरी त्यांना सहानुभूती निश्चित होती. पण जे दमनचक्र त्या गावावर फिरले होते, आणि हा बळीप्रकार रोजचा झाल्यामुळे आता त्यांच्या भावना बोथट होत चालल्या होत्या. आणि पुढून दुर्जन डौलात पावले टाकत आला. मागून हैबतरावांच्या पायावर चाबकाचे फटके बसले. ते त्यांच्या गुडघ्यावर बसले. दुर्जन त्या वेदीवर चढला. संगारी, लाखन व मंजू थोडे दुरून घोड्यावर बसून हा प्रकार पाहणार होते. आता दुर्जन बोलू लागला.
"मायकपाळच्या सर्व गावकर्‍यांनो. मायकपाळ हे आमचे गाव होते आणि म्हणून आम्ही ताब्यात घेतले. या सर्व प्रकारात आमची दुश्मनी फक्त या जहागीरदारांशी. हैबत मेला कि दुश्मनी खत्म. मग तुम्ही सर्व कैद से आजाद."
यावर गावकरी अविश्वासाने बघू लागले. अनवधानाने टाळ्याही वाजल्या.
'जिंदगी कि कैद से' लाखनने मनातल्या मनात दुर्जनला अपेक्षित असलेल्या कैदेचा पुनरुच्चार केला.
दुर्जनने खास बळीसाठी बनलेली ती कुर्‍हाड उचलली. हैबतरावाला ऐकू जाईल या आवाजात तो बोलला.
"याच कुर्‍हाडीने मी तुज्या पोराचा पाय कापला होता."
हैबतरावांसाठी तो शेवटचा आघात होता. त्यांनी डोळे मिटून घेतले. आणि ............ धांय!!
गावठी पिस्तूलाची गोळी चालली होती. इतका वेळ शांत बसलेल्या प्रतापचा अखेर संयम सुटला आणि त्याने बंदूक चालवली. दुर्जनच्या तळव्याला ती चाटून गेली पण तेवढे पुरेसे होते. त्याच्या हातातून कुर्‍हाड सुटली. एकच गोंधळ माजला. या गोंधळात निम्म्याहून अधिक गावकरी आणि उरलेले कैदी सैनिक निसटणार होते. पमाण्णाने उडी मारून हैबतरावांना उचलले आणि ते तिघे वाड्याच्या दिशेने धावत सुटले. आता अग्रजला गाठणे गरजेचे होते.
~*~*~*~*~*~

"येस्स, हेच ते भेंडोळे. चल बल्लु." अग्रज त्या कागदांची गुंडाळी करीत म्हणाला.
बळवंत व ते दोघे बाहेर आले. ते कानोसा घेत बाहेर चालू लागले. तेवढ्यात बळवंतने कान टवकारले. कसलातरी आवाज येत होता. आता तर अग्रजला ही तो ऐकू येऊ लागला. तोच मागून पमाण्णा, प्रताप आणि राव धावत येत होते.
"ओह नो. काहीतरी गोंधळ झालाच तर. चल पळ."
तिकलीने त्यांना गाठले मागून सर्व तांत्रिक सेना धावत येत होती. या भुलभुलैय्यात कसे पळायचे?
"सरक" असे म्हणत पमाण्णाने भिंत फोडत एक रस्ता तयार केला. ते जंगलाच्या दिशेने पळू लागले. शाम व काही सैनिक त्यांच्यासाठी घोडे घेऊन तयार होते. मागे असलेल्या दुर्जनला हे लक्षात येताच त्याने जोरात ओरडून लाखनला आदेश दिला.
"पकडो उन्हे. जाने ना पाये."
लाखन त्याच्या लांडगा रुपात आला. तो वेगात त्यांच्या मागावर आला आणि त्याने त्यांना गाठले. एव्हाना हैबतरावांची बंधने तोडून त्यांना मुक्त केले होते. याला मी बघतो करीत पमाण्णाने त्याला थोपवले. त्यांची झोंबाझोंबी सुरु झाली. मागून इतर डाकू येऊ लागले होते.
"आता. झाडा गोळ्या." सैनिकांकडून गोळीबार सुरु झाला.
"आण इकडे करीत" हैबतरावांनी प्रतापची पिस्तूल हिसकावली. आणि अचूक नेम धरीत लाखनला जखमी केले. अर्थातच त्या जखमेचा असर प्राणघातक नव्हता पण पमाण्णाला त्याला तात्पुरते निष्प्रभ करायला तो पुरेसा होता. आता शामपर्यंत पोचले कि झाले. जंगलात धावणे सोपे नसते. त्यामुळे त्यांना वेळ लागत होता. आणि वेळच त्यांचा शत्रू होता.
मागून डरकाळी ऐकू आली.
व्याघ्ररुप घेऊन दुर्जन आला होता. त्याचा त्या जंगलातही धावण्याचा वेग अचाट होता. त्याने लवकरच त्यांना गाठले. पमाण्णाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण त्याला ध्यानात आले कि हा आपल्या टक्करीचा प्रतिस्पर्धी आहे.
"मालक लवकर पळा. मी याला फार वेळी रोखू शकणार नाही. आत्ता यशस्वी माघारीतच आपले यश आहे."
सर्वजण पळू लागले. पण हैबतरावांनी पुन्हा पिस्तूलाचा चाप ओढला.
"या तांत्रिकाची ही हिंमत! पळताय कशाला? याला मारून परत वाड्यातच जाऊ की."
दुर्जनला गोळी लागली खरी. पण त्याच्यावर कसलाही परिणाम झाला नाही. उलट त्याने हिंस्त्र नजरेने हैबतकडे पाहिले. मग त्याने नजर प्रतापकडे वळवली. त्याच्या ठसठसत्या तळव्यासाठी तोच जबाबदार होता. त्याने पमाण्णाला जोरदार हिसडा देत प्रतापकडे धाव घेतली. हैबतरावांना आता त्यांच्या कृतीचा परिणाम दिसत होता. त्यांनी निराशेने त्यांच्या आयुष्यातील अखेरची आज्ञा केली.
"पमाण्णा, वारस. वारसाला काही होता कामा नये." पमाण्णाने क्षणार्धात अग्रजला उचलले आणि शामपाशी नेऊन सोडले. हैबतरावांना याने जबर धक्का बसला. पमाण्णा अशी चूक कशी करू शकतो? पण तेवढा वेळ नव्हता. दुर्जनने प्रतापवर झेप घेतली. आणि हैबतने स्वतःच्या नातवाला अगदी थोडक्यात धक्का देत बाजूला केले. पण तो स्वतः बाजूला होऊ शकला नाही.
दुर्जनचे सुळे हैबतरावाच्या मानेत रुतले होते. एखाद्या श्वापदाच्या प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे तो ते अजूनच खोलवर रुतवण्याचा प्रयत्न करीत होता. हैबतरावांनी प्रतापकडे पाहिले. पमाण्णा त्याला उचलत होता. त्यांना अग्रजचे 'पमाण्णा प्रतापला वाचव. जल्दी कर' हे शब्द कानी पडले. पमाण्णाशी त्यांची अखेरची नजरानजर झाली. त्यांच्या डोळ्यात प्रश्नार्थक भाव होते. पमाण्णाने आपल्या जुन्या मालकाची अखेरची इच्छा पूर्ण केली होती. त्याने होकारार्थी मान हालविली. हैबतरावांनी मग समाधानाने डोळे मिटले. अखेरीस खजिना एका जहागीरदारानेच शोधला तर.
उरलेले सर्व घोड्यावर स्वार होऊन पसार झाले. प्रतापला घेऊन पमाण्णाने आकाशमार्गाचा अवलंब केला. त्याक्षणी कोणत्याही प्रकारची समजूत काढण्याचा प्रश्नच नव्हता.
तोवर संगारी आणि मंजू पण येऊन पोचल्या. लाखनने त्यांना इशार्‍यानेच थांबवले. दुर्जनच्या आपण हवे असलेले सावज न टिपल्याचे लक्षात आले होते. त्याच्या संतापाचा उद्रेक झाला होता. व्याघ्ररुपात त्याच्या डरकाळ्या जंगल हादरवत होत्या. त्याचवेळी आपण ज्या जहागीरदाराला मारायचे ठरवले होते तो मेल्याचे समाधानही होते. त्यामुळे त्या रुदनाला एक भेसूर हास्याची किनार होती.
~*~*~*~*~*~

बरेचसे गावकरी व सैनिक गावातून सुटले होते. त्यातील सैनिकांना आपल्या योजनेत सामील करून घेऊन आपली ताकद वाढवायचा प्रयत्न राव करू लागले. काहींनी असमर्थता दर्शवून पळून जाणे पसंत केले पण काही जण सामील झाले.
हैबतरावांच्या दुर्दैवी मृत्युमुळे मायाकापालिकांची इत्थंभूत माहिती देणारे कागद मिळूनही, एकप्रकारे मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट सफल होऊनही, सर्वांवर अवकळा पसरली होती. यातून सर्वात आधी सावरला तो अग्रज. त्याची तशीही हैबतरावांशी नात्याचे आजोबा म्हणून जवळीक नव्हतीच. प्रतापला मात्र जबर धक्का बसला होता. त्याचे उचित सांत्वन करूनअग्रज पमाण्णा व बळवंतला घेऊन बसला. प्रतापला सावरायला वेळ द्यायला हवा होता. शामला त्याच्याबरोबर सोडून ते व्याघ्ररुपावर चर्चा करू लागले. तोवर रावांनी मनुष्यबळ वाढवण्याचे प्रयत्न चालू ठेवले होते.
अग्रज आता बोलू लागला. "पमाण्णा, बल्लु. आपल्याकडे बंदूका व काडतुसे विपुल प्रमाणात असल्याचा फायदा आता पुराव्याने सिद्ध झाला आहे. त्यामुळे किमान इतर तांत्रिकांविरुद्ध आपल्याला काही आशा आहे. राहता राहिला दुर्जन. हे तर पक्के कि व्याघ्ररुप आपल्या रस्त्यातील सर्वात मोठी अडचण आहे. मी हा कागद सुरुवातीला हसण्यावारी नेला होता. एकतर तो गुप्त लिपित नव्हता, मोडीत होता आणि दुसरे म्हणजे हे तांत्रिक प्रकार होतील असे मला वाटले नव्हते. असो तर या कागदांमध्ये मायाकापालिकांचा विश्वकोश आहे असे म्हणू शकतो. व्याघ्ररुपाची माहिती आहे याच्यामध्ये. यानुसार व्याघ्ररुप या तांत्रिकांची सर्वोच्च शक्ती आहे. जणू साक्षात महाकालच तुमच्या अंगी संचारतो. पण यात एक अडचण आहे. ही शक्ती इतकी ताकदवान आहे कि ती सर्वकाळ मनुष्य शरीरात राहणे धोकादायक आहे. त्याने शरीरावर विपरीत परिणाम संभवतो. त्यामुळे सहसा ती कोणत्यातरी आभूषणात कैद करून त्या आभूषणाला तांत्रिक परिधान करतो."
"म्हणजे आभूषण निघाले तर व्याघ्ररुप निकामी! मग पमाण्णा तुम्ही मायाकापालिकाला हरवले तेव्हा काय आभूषण होते?" बळवंतने विचारले.
"आभूषण! कवट्यांची माळ आभूषण होईल काय? मी ती कवट्यांची माळ तोडली आणि व्याघ्ररुप निष्प्रभ झाले होते. मग आदित्यने त्याचा नाश केला होता."
"होय पमाण्णा. कवटी, एक कवटी नक्की वाघाची असणार. वाघाचा कसला तरी हिस्सा त्या आभूषणात वापरणे अनिवार्य आहे. दुर्जनच्या अंगावर कोणते आभूषण होते? नुकतेच तू त्याला जवळून पाहिले व्याघ्ररुपात. काही दिसले तुला?"
"माफ करा मालक. तुमची निराशा होईल पण दुर्जनकडे कवट्यांची माळ तर सोडाच कुठलेच तसले आभूषण मला तरी दिसले नाही. दुर्जनच्या कानात डूल आहेत आणि हातात कडे. आता त्याने त्यात वाघाचे हाड/चुरा वगैरे बसवले असेल तर आपल्याला संधी आहे."
अग्रज विचारात पडला. जेवढा जास्ती वाघाच्या शरीराचा वापर तेवढे ताकदवान व्याघ्ररुप. दुर्जनचे व्याघ्ररुप पमाण्णाच्या टक्करीचे होते. मग अखेर दुर्जन काय वापरत असावा?

क्रमशः

टीपः अश्मकतंत्र = आर्यभटीय चे कमी प्रचलित दुसरे नाव. आर्यभट अश्मक या गावचा असल्याचा समज आहे त्यामुळे अश्मकतंत्र असे त्या ग्रंथाचे दुसरे नाव.

पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/53025

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे फारच उत्कंठावर्धक वगैरे वगैरे.

पुढचाभाग लवकर टाका. होऊ द्यात एकदा काय ते धमासान.

रच्याकने दुर्जनानं वाघनखं घातली असावीत का?

रोज एक भाग यायचा होता ना.. एव्हाना सगळे भाग यायला पाहिजे होते... पण एकही आलेला दिसत नाही...

<रोज एक भाग यायचा होता ना.. एव्हाना सगळे भाग यायला पाहिजे होते... पण एकही आलेला दिसत नाही...> +१ रोज फक्त आपण यायचं आणि भाग आलाय का ते पहायचं..:)

सर्वांची निराशा केल्याबद्दल मनापासून माफी मागतो. मला खरंतर ही मालिका या वीकांतामध्ये संपवायची होती. पण कामे सांगून येत नाहीत येत हेच खरे. माबोवर जेमतेम चक्कर टाकता येत होती, टंकणार कोठून? Sad आता बूंदसे गयी वो हौदसे नही आती पण या आठवड्यात संपवायचा प्रयत्न करतो.