वारसा भाग १६

Submitted by पायस on 2 March, 2015 - 17:48

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/52893

"खंजर माझ्याकडे आहे." अग्रज अत्यंत शांतपणे बोलला. सर्वजण अवाक होऊन त्याच्याकडे बघू लागले. सर्वात विचित्र अवस्था हणमंतरावांची झाली. त्यांना काय बोलावे हेच सुचेना. बळवंत आवेगाने जागीच उठून उभा राहिला. प्रताप काहीशा खिन्नतेने नजर झुकवून बसून राहिला.
पमाण्णाच्या चेहर्‍यावर आता मिश्किल हसू खेळू लागले. "मग दाखव खंजर"
"अंह. मला वेडा समजलात का? बल्लु किंवा राव बघता बघता खंजर हातातून काढून घेतील. मला शक्य तितक्या सामोपचाराने हे सर्व सोडवायचे आहे. म्हणून हे सर्व फोडतोय. पमाण्णा तुम्हाला आणखी पुरावा पाहिजे का? मला सतत स्वप्नांमध्ये एक साधू सारखा दिसणारा माणूस दिसतो. त्याचा चेहरा धूसर असल्याने मी नीट वर्णन करू शकत नाही. पण मी त्याच्याबरोबर स्वप्नात पालेम्बंग, आदित्यवर्मन् ने खंजरासाठी दिलेला बळी इ. पाहिले आहे. कालद्वीप सुद्धा पाहिले आहे. कालद्वीपावर संपूर्णपणे गवताळ, मऊ जमीन आहे ना? आता तरी बसतोय का विश्वास माझा?"
"मग तू जी स्वप्ने मालकांना सांगितली?" पमाण्णाने प्रतापला विचारले.
"मी आजोबांना सांगायचा प्रयत्न केला होता कि अशी स्वप्ने मला नाही पडत पण अग्रजला पडतात. पण ते माझे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत ते नव्हते. त्यांना कसली घाई झाली होती कोणास ठाऊक? त्यांना फक्त लवकरात लवकर खंजर हवा होता आणि त्यासाठी खजिना शोधणे गरजेचे होते."
"अर्थात त्या खंजरासाठीच तर हे सर्व चालू आहे अनुज प्रताप. आता हणमंतराव आहेतच तर मी त्यांना विश्वासात घेऊन सर्व खुलासा करेन. मला आशा आहे तुम्ही सर्व मला साथ द्याल."
"काय बोलतो आहेस तू? आणि मायकपाळचे काय?" - शाम
"शाम तुला का एवढी चिंता वाटते आहे? या गावात आपले कोणी नाही. तसेही पमाण्णाला काही काळ का होईना निष्प्रभ करू शकणारी साधने त्या डाकूंकडे आहेत. दुर्जनचे आपल्याशी व्यक्तिशः काही वैर नाही त्यामुळे तो आपल्या पाठलागावर पण येणार नाही. मग बाकी तो काय करतोय आपल्याला काय पडलंय? तसेही इंग्रज सरकार यांच्या थेरांपासून फार दिवस अनभिज्ञ राहणार नाही. हे कितीही ताकदवान असू देत, जेव्हा हजारोंच्या संख्येने इंग्रज सोल्जर्स चाल करून येतील तेव्हा त्यांचे किमान न भरून येण्यासारखे नुकसान तर निश्चित होईल."
बल्लुने चवताळून त्याचे बखोट धरले आणि कानशीलात लगावली.
"आरं कसा जहागीरदार हायेस तू? मायकपाळ तुज्या बापजादांची दौलत तिला असा वार्‍यावर सोडून द्यायला निघालास? ते एक तांत्रिक आहेत सोड त्यांचे; तुलापण माणसांच्या जीवाची काही किंमत वाटत नाही?"
प्रताप त्या फटक्याने कोलमडला. ओठांना हात लावत आलेले थोडेसे रक्त त्याने पुसले. मग तो मोठ्याने हसत म्हणाला
"माणसाची किंमत? आणि जहागीरदारांना? या पमाण्णाला विचार. सगळा इतिहास आहे गढीत. किती माणसे मारली काही गणतीच नाही. निव्वळ खजिना लपवायला ५४ जण ठार केले गेले. माणसाचा जीव म्हणे. असं करणार काय रे ते जगून? रोज पहाटे उठणार, लिंबाची काडी चावत शेतावर जाणार, गप्पा छाटत दुपारचे आणून दिलेले जेवण आणि मग वामकुक्षी, दिवेलागणीच्या आत परत येऊन मग पारावरच्या कुचाळक्या! रात्रीच आली झोप तर देणार ताणून किंवा मानवजातीत आणखी एका किंमती जीवाची भर घालण्याचा उद्योग! ना कसली महत्त्वाकांक्षा, ना स्वप्ने! ध्येयशून्य जगणे नुसते! केवळ त्यांची काही चूक नाही म्हणून त्यांनी जीव गमावता नये असे तुला वाटते ना? मग पुण्यात प्लेगने आज कित्येकजण मरत आहेत, इंग्रज सरकार त्याच्यावर कुठलीही जबाबदार उपाययोजना करीत नाही आहे. त्याच्याविरूद्ध का नाही तू आवाज उठवत? का पुणेकरांची काही चूक झाली आहे ज्यामुळे त्यांनी उपचार/खबरदारीच्या सूचना न मिळाल्याने प्लेगने अकाली मरणे योग्य ठरते? जर असेल हिंमत तर लढ पमाण्णाशिवाय."
अग्रज त्वेषाने त्याचे म्हणणे मांडत होता. बळवंत रागाने धुसफुसत होता. तो हे सर्व ऐकून अजून एक ठोसा देणार तेवढ्यात मागून रावांनी त्याला धरले. इतका वेळ तटस्थपणे हे सर्व पाहणारा पमाण्णा जोरात ओरडला. "शांतता!!!"
सर्वजण काही क्षण थांबले. पमाण्णाने हीच संधी साधून सूत्रे हातात घेतली.
"अग्रज तू भलेही खंजर बाळगून असशील पण मला तरी तुझी रक्ताची चाचणी करायची आहे. तू जर विधि वाचला असशील तर तुला माहिती आहेच कि कधी ना कधी तुला माझी खात्री पटवून द्यावी लागणार आहे मग आत्ताच का नाही? आणि दुसरे म्हणजे हा नव्याने करार करण्याचा विधि विशिष्ट ठिकाणी करावा लागतो. मायकपाळ एक असे ठिकाण आहे पण तसे दुसरे ठिकाण तुला मिळेल का? तुझ्याकडे फारसा वेळ नाही हे लक्षात ठेव. १०० वर्षे पूर्ण होत आली आहेत."
अग्रज विचारात पडला. हा विधि संपूर्णपणे आदित्यवर्म्याच्या कल्पनेतून निघाला होता जो योगायोगाने अश्वक-पमाण्णाच्या विधिंबरोबर मॅच होत होता. आता जर हे सांगावे तर पमाण्णा निघूनच जाईल. तशी त्याची त्वरित गरज नसली तरी तो एक उपयुक्त सेवक होता हे निश्चित. दुसरी जागा शोधणे तर पर्यायच गेला कारण ती कशी पाहिजे याविषयी आदित्यवर्मन् ने काहीच लिहिले नव्हते. आता आली का पंचाईत.
इतरांना या करार प्रकरणाबद्दल काहीच ठाऊक नसल्याने ते गोंधळून या दोघांकडे पाहू लागले. शेवटी पमाण्णाच बोलला.
"लगेच उत्तर द्यायची गरज नाही. मी तुझी रक्ततपासणी करेपर्यंत वेळ घे. राव, मी याला इथून थोडे दूर घेऊन जातो जेणेकरून आणखी वातावरण पेटायला नको. प्रताप, अग्रज तुझ्याहून मोठा आहे. जर तो वारस सिद्ध झाला तर जहागीरदारांचा वारसा, म्हणजे मी पमाण्णा त्याच्या आज्ञेने वागण्यास बद्ध आहे. त्यामुळे इतरांना, खास करून रावांनी या घोळाची शक्य तितकी माहिती दे."
पमाण्णाचा आकार वाढू लागला. त्याच्या पाठीतून रात्री मंजूने पाहिलेले तेच पंख बाहेर आले. मग त्याने अग्रजला एका बखोटीस धरले आणि एका झेपेत उड्डाण केले. अग्रज त्याच्या विचारचक्रात गुंग होता. बळवंत डोळ्यात आलेले पाणी पुशीत स्वतःशीच मोठ्याने बडबडला "सीतामाता, रामप्रभु; अग्रजला योग्य निर्णय घेण्याची बुद्धि द्या."
~*~*~*~*~*~

प्रताप पमाण्णा गेल्यानंतर अखंड बोलत होता. हणमंतराव विस्मयकारक नजरेने त्याच्याकडे बघत होते. बळवंत अस्वस्थपणे येरझार्‍या घालत होता तर शाम विचारांच्या भाऊगर्दीत हरवून गेला होता.
"मला याची अंधूक कल्पना होती राव." हे ऐकताच सर्वजण त्याच्याकडे बघू लागले.
"काय बोलतो आहेस प्रताप? अग्रज तुझा भाऊ आहे याची तुला कल्पना कशी?"
प्रतापने क्षणभर आकाशाकडे बघितले. मग तो पुन्हा बोलू लागला
"राव आठवते, मला बाबांची पेटी दिली गेली होती ज्यात सोन्याचे तुकडे मिळाले होते. त्यात अजूनपण काही होते. सांकेतिक भाषा अग्रजला इतक्या चांगल्या रीतिने येते कारण बाबांना यात रस निर्माण झाला होता. त्यांनी त्यांचे स्वतःचे आत्मवृत्त गढीत लपवून ठेवले होते. आत्मवृत्त कसले एक पत्रच होते ते, मला आणि आईला उद्देशून लिहिलेले. त्यात त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला कि त्यांचा आणखी एक घरोबा पुण्यास आहे. बाबा जेव्हा मोहिमेच्या दरम्यान पुण्यात मुक्काम करीत ही तेव्हाची करतूत. अग्रजची आई बाळंतपणात गेली. बाबांनी मग त्यांच्या कोणा जोशी नावाच्या मित्राकडे अग्रजचे सोय लावली. माझ्या माहितीनुसार बाबांनी त्याला भरपूर पैसा दिला होता पण अर्थात संततीसुख हे त्या मित्राच्या होकारामागचे मुख्य कारण असावे."
"वीराजीने अजून एक संसार थाटला होता आणि कोणाला कळले पण नाही? वीराजीने हे घडवून कसे आणले असेल?"
"पैसा बोलतो राव. बाबा पुढे लिहितात कि त्यांनी कोडी सोडवत खजिना शोधण्याऐवजी दुसरा मार्ग अवलंबिला. त्यांनी ज्याने ही तिलिस्मे रचली त्या गणितीलाच शोधायचा चंग बांधला."
"मग तो सापडला?" - बल्लु
"तो सापडला म्हणणे पूर्णपणे बरोबर नाही असे बाबांचे म्हणणे आहे. पमाण्णापेक्षाही काहीतरी विस्मयजनक आहे त्या मनुष्यात. तो मनुष्य आहे हे मात्र निश्चित तो पमाण्णाप्रमाणे कोणी प्राणी नक्की नाही, खुद्द पमाण्णाकडून याचा हवाला बाबांनी मिळविल्याचा उल्लेख आहे. पण बाबांना तिलिस्मघाती सापडली हे मात्र खरे?"
"तिलिस्मघाती?" - शाम
"तो कितीही मोठा गणिती असला तरी या सर्व तिलिस्मांना तोडण्याची काही हमखास युक्ती हवीच ना? एक चावीप्रमाणे जी सर्व तिजोर्‍या उघडेल. या चावीमुळे बाबा खजिन्यापर्यंत पोहोचू शकले. त्यांनी त्यातील काही संपत्ती परत आणली. म्हणून बाबांना त्यातील काही कोडी माहित होती. म्हणून अग्रजला अंधूक अंधूक आठवते कि त्याचे बाबा गणितासंबंधी काही बोलायचे. त्यामुळे त्याला गणिताविषयक आकर्षण निर्माण झाले. म्हणून तो खजिना शोधू शकला कारण वीराजींची तशी योजना होती."
"पण मग अग्रजच तुझा भाऊ आहे हे तुला कसे कळले?"
प्रताप खिन्नपणे हसला. "बाबांनी शेवटी लिहिले आहे. तुझा थोरला भाऊ तुला मदत करेल प्रताप, त्याचा शोध घे. कोणीतरी जोशी तुला असा सापडेलच ज्याचे नाव त्याच्या थोरलेपणाला साजेसे असेल."
"अग्रे जायति सः अग्रजः!" संस्कृत चांगले असलेला शाम उद्गारला.
एवढ्यात धप्प असा आवाज झाला. चंद्र केव्हाच मावळला असल्याने त्या काळोख्या रात्रीत दूरचे काहीच दिसत नव्हते. लवकरच दोन आकृत्या चालत येताना दिसू लागल्या. अग्रज हातात पुढे खंजर घेऊन चालत होता. पमाण्णा त्याच्या मागून येत होता. रावांनी त्याला खुणेनेच चाचणीचा निकाल विचारला. पमाण्णाने होकारार्थी मान हलविली. अग्रज तसाच पुढे चालत प्रताप पाशी आला.
"मी वारस आहे. पमाण्णाची खात्री पटली."
"मला त्याच्याही आधीच हे मान्य झाले होते."
"मग आता तू मला दादा म्हणणार नसशील तर मी त्या तांत्रिकाचा नायनाट करायला तयार आहे."
काय??? प्रतापला धक्काच बसला. तांत्रिकाचा नायनाट? एवढ्यात अग्रजने प्रतापचा हात ओढून घेत खसकन् तळव्यावरून तो खंजर फिरवला. बळवंत आवेशात काही करणार एवढ्यात रावांनी त्याला थोपवले. पमाण्णा जीभ लांब करीत त्यातले रक्त चाटून घेत होता.
"मी थोरला आहे याचा अर्थ असा होत नाही कि तू पमाण्णाला आदेश देऊ शकत नाहीस. तुझे रक्त पिऊन आता तो तुझा दास आहे. माझ्याखालोखाल त्याच्यावर तुझी सत्ता चालेल. आणि आपण दोघे बरोबरीचे राहावेत म्हणून..."
त्याने तो खंजर प्रतापला देऊन टाकला. प्रताप अग्रजकडे बघतच राहिला.
"हे सगळं..........कसं, म्हणजे का, म्हणजे......." प्रताप अडखळला.
"आता कसं आणि का या प्रश्नांची उत्तरे खूप कठीण आहेत. मी शांतपणे विचार केला, कि मी पमाण्णाचा काय उपयोग करू शकतो. उत्तर आले काहीच नाही. पमाण्णा खूप काही करू शकतो पण तो काही निर्माण करू शकत नाही. मी एक शास्त्रज्ञ, गणिती होऊ इच्छितो. शास्त्रज्ञ नवीन ज्ञाननिर्मिती करतात, काहीतरी शोधून काढतात. पमाण्णासारखे विनाशाचे अस्त्र आमच्या कामाचे नाही. ते तुझ्यासारख्या भू-रक्षकाला जास्ती कामी येईल. आणि राहता राहिला गावाचा प्रश्न तर मला त्यांच्याविषयी अजूनही कसलीही काळजी अथवा सहानुभूती नाही. पण मी माझ्या धाकट्या भावाला आणि दोन मित्रांना संकटात एकटं सोडून जाऊ शकत नाही."
शेवटचे वाक्य ऐकताच सर्वांचे चेहरे खुलले. पमाण्णा हे चित्र पाहून मनातल्या मनात विचार करू लागला. हे माझ्या छातीत काय होतंय. मला अचानक खूप ....... छे दुसरा शब्दही नाही सुचत.....चांगले वाटत आहे. यालाच आनंद म्हणतात का? मी माणसांसारखा तर नाही होत चाललो. पण हे सर्व विचार क्षणात विरले आणि बाह्यशरीरावर हसु चिकटवून तोही यांच्यात मिसळला.
"आता एकच लक्ष्य मायाकापालिक पंथाचा कायमचा नायनाट."
~*~*~*~*~*~

लाखन जंगलात खोलवर शिरला होता. त्याने रावांच्या ठिकाणाला जाणूनबुजून टाळले होते, भले त्याला मानवी वास गावला होता. त्याच्याबरोबरच्या डाकूंची मात्र पाचावर धारण बसली होती. केवळ शिपायांशी लढायचे असते तर वेगळी गोष्ट होती. पण सरदारला पळून गेलेल्या शिपायांशी फार काही घेणे नव्हते. लाखनवर वेगळीच कामगिरी टाकली गेली होती ज्यासाठी हे शिपाई त्याच्याबरोबर मदत म्हणून पाठवले होते. एका वाघाला मारून आणायचे!
लाखन वाघाची शिकार एकट्याने करण्यास उत्सुक होता. पण ही कुमक पाठवायची सूचना मंजूची. त्याच्यावर मंजूचा अजिबात विश्वास नसल्यानेच तिने ही खबरदारी घेतली होती. कारण लाखन हा लढाईच्या नशेसाठी लढतो आणि म्हणूनच चुकून जर त्याला जंगलात गावातून पळालेले, गनिमी काव्याने लढणारे लोक सापडले तर तो त्यांना पुढे अजून झिंग आणणारे युद्ध खेळायला मिळेल या आशेपायी सोडून द्यायची शक्यता होती. लाखनला कमीतकमी एकजण जिवंत परत आणायची सक्त ताकीद होती. चडफडत शिव्या घालत लाखन त्या झाडापाशी थांबून पाचोळ्याचे निरीक्षण करू लागला. जवळच एक तळे होते. नजीकची झाडी तुडवल्या सारखी वाटत होती. काळजीपूर्वक पाहल्यावर त्याला वाघाचा पंजा दिसला. वाघ इथे येऊन जात होता.
त्याने एक मजबूत झाड निवडून तिथे मचाण बांधण्याची आज्ञा दिली. स्वतः तो तंबाखू मळत बसला. संध्याकाळ होताच त्याने त्या ३-४ जणांना मचाणावर जायला सांगितले.
"पण सरकार आपण?"
"सूअर के बच्चो. अगर मै भी उपर आऊंगा तो शेर को कौन मारेगा? तुम सिर्फ अपनी हिफाजत करो. और खबरदार किसने गोली चलाई तो. ए भीमू, ये ले मेरी बंदूक और तलवार. सम्हाल के रखियो."
सर्व चढल्याची खात्री होताच तो आधीच हेरलेल्या एका ढोलीत दबा धरून बसला. रात्रीचे सर्व पहारेकरी जागे झाले होते. मधूनच एखाद्या घुबडाचा घूत्कार ऐकू येत होता. वरती बसलेल्यांनी आता एवीतेवी सर्व लाखनच करणार आहे तर झोपलेले काय वाईट असा विचार सुरु केला होता. वाघ झाडावर चढू शकत नसला तरी सापाची भीति असल्याने ते सावधपणे आळीपाळीने झोपावे या निर्णयाप्रत आले होते. लाखनची नजर मात्र आता तळ्यावर केंद्रित झाली होती. मधूनच एखादा नाग सळसळत जात होता. कोणी कोल्हा पाणी पिण्यासाठी येऊन जात होता. लाखनच्या संयमाची इथे परीक्षा होती. आणि अखेर तो आला.....
ते पिवळे जनावर रात्रीचे कमालीचे सुंदर दिसत होते. चंद्र नुकताच उगवला होता. त्या दुधट चांदण्यात जंगलाचा अनभिषिक्त राजा मोठ्या ऐटीत पाणी पिऊ लागला. असे म्हणतात कि प्राण्यांची संवेदना ग्रहण करण्याची क्षमता जास्त असते. पण इतक्या वेळ वाघाला कसलाही आवाज तर सोडाच पण वासात बदलही जाणवला नव्हता. त्याला प्रथम जाणवली ती लाखनची क्रूरता. कोणालातरी मारण्याची तीव्र भावना (किलिंग इंटेट. पर्यायी शब्द सुचला नाही, क्षमस्व). मग त्याची इतर ज्ञानेंद्रियेही धोक्याचा इशारा देऊ लागली. पण उशीर झाला होता लाखनने त्याच्यावर मागून झेप घेतली.
पण वाघदेखील वाघच. त्याने महत्प्रयासाने लाखनला झुगारून दिले. त्याला त्याच्या पाठीवर जखमा जाणवल्या. लाखनने अर्धवट रूप बदलले होते. त्याच्या हातांची नखे वाढली होती तर त्याचे दात एखाद्या मांसाहारी पशुप्रमाणे, सुळे लांब, झाले होते. दोघेही काही काळ एकमेकांना आजमावत गोलगोल फिरू लागले. ते एकमेकांच्या डोळ्यात रोखून बघत होते. वाघाच्या नजरेत राग होता, तू जंगलाचे नियम मोडणारा कोण? माझी शिकार ती देखील अशाप्रकारे करणारा तू कोण? तर लाखनच्या नजरेत एक थंडपणा होता ज्याला हलकीशी क्रोधाची किनार होती. तू माझ्या या हल्ल्यातून कसा काय वाचलास? आता नाही वाचणार तू.
दोघे पुन्हा एकमेकांशी झोंबाझोंबी करू लागले. हा प्रकार अजून काही वेळ चालला. पण आता विजेता स्पष्ट होता. वाघ थकला होता आणि त्याच्या शरीरावर कैक जखमा झाल्या होत्या. तर लाखनला किरकोळ खरचटण्याइतपतच लागले होते. त्याच्या चेहर्‍यावर थकव्याचा मागमूसही नव्हता. वरून हे द्वंद्व पाहणार्‍या दरोडेखोरांना आता लाखनचीच अधिक भीति वाटू लागली होती. अखेरीस वाघाची झेप चुकलीच आणि लाखनला त्याचे दात वाघाच्या मानेपाशी रुतवायची संधी मिळाली. क्षणार्धात त्याचे सुळे गरजेनुसार अधिक लांब झाले आणि वाघाची श्वासनलिका फोडून थांबले. दोन क्षण वाघ आणि लाखन स्तब्ध होते. मग लाखनने आपले तोंड बाजूला घेतले. वाघ निपचित पडला. लाखनने तळ्यावर जाऊन आपले हातपाय तोंड धुऊन स्वच्छ केले. मग तो वाघापाशी जाऊन पाय पसरून बसला. त्याने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.
"तू असली मर्द निकला रे. एक अरसे बाद किसीने लाखन से टक्कर का मुकाबला किया है. सच मे तू शेर था, मान गया तुझे मै!" लाखन हात फिरवता फिरवता वाघाकडे बघत होता. का कुणास ठाऊक त्या वाघाच्या चेहर्‍यावर त्याला एक समाधानाचे हास्य दिसत होते.
~*~*~*~*~*~

"बहुत खूब लाखन. कमाल कर दिखाया तुमने" दुर्जनला आता किती कौतुक करू आणि किती नको असे झाले होते. आज रात्री व्याघ्ररुपासाठीची शेवटची क्रिया तो करणार होता आणि त्यात त्याला वाघाच्या प्रेताची गरज होती. लाखनने हे काम अगदीच सहज करून दाखवल्यामुळे दुर्जनला आपल्या निवडीचा सार्थ व रास्त अभिमान वाटत होता. लाखन त्यास मुजरा करून बाहेर पडला. त्याला मंजू त्याचीच वाट पाहत उभी असलेली दिसली.
"काय मग लखोबा वाघमारे? सरदारची शाबासकी घेऊन आलात वाटतं"
लाखनचे ओठ हसण्यापुरते विलग झाले. त्या हास्यात यत्किंचितही आपुलकी नव्हती. एक औपचारिकता म्हणून ते स्मित केले गेले होते. मंजू मात्र कुत्सित हसत त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या गालावर हलकेच तिने ओठ टेकवले.
"सरदारांचे काय बाबा, कापाकापी दिसली कि ते खुश. आता त्याच जंगलात कोण तो हणमंतराव बसलाय. नाही म्हणजे तांत्रिक नाही मेला कोणी पण आपले १२ तरी शिपाई मारले त्याने. ही चांगली गोष्ट आहे का? तो पमाण्णा आणि ती बावळट पोरं ती कुठे गेली आहेत काही पत्ता लागत नाही. बाकी लाखन मी तुला पागेपाशी पाहिले त्या रात्री. कुठे चालला होतास का?"
लाखनने मुठी वळल्या. नाही, म्हणून त्याने डोळे मिटून घेतले.
"नाही म्हणजे तू तिथून कुठेतरी पळालास लगेचच. मला काय बाई नीट कळले नाही तू काय करीत होतास नक्की. काही जाणवले असेल तर मला सांग बरं का? सरदार एकटेच नाहीत तुझ्या पराक्रमाची काळजी घेणारे, मी पण आहे बरं." असे म्हणून तिने हलकेच डोळा मारला आणि ती निघून गेली.
******* लाखनच्या तोंडातून शिव्यांची लाखोली बाहेर पडली. ढाम्म करून त्याने शेजारच्या भिंतीवर वळलेली मूठ आदळली. त्या भिंतीत एक छोटा कोनाडा तयार झाला होता.
~*~*~*~*~*~

मध्यरात्रीची वेळ होती. कपड्यांच्या चिंधीत लपेटलेले एक प्रेत मंदिराच्या तळघरातून घेऊन चारजण वर आले. त्या मुलीचे काय हाल केले गेले होते याचे वर्णन करणे अशक्य आहे. "अखेरची ग बाय तू. सुटलीस म्हणायची. उरलेल्यांचे हे माथेफिरू काय करतील देव जाणे" एक त्यातल्या त्यात डोके ठिकाणावर असलेला म्हातारा प्रेत वाहून नेता नेता पुटपुटत होता.
खाली दुर्जन त्याच्या आरक्त नेत्रांनी महाकालच्या मूर्तीकडे पाहत होता. तिथे आता लाखनने तो वाघ आणून टाकला होता. वाघ कसला, आतला सर्व माल काढल्यावर उरलेली कातडी तेवढी होती. दुर्जनने कसले तरी मंत्र पुटपुटले आणि आपल्या अंगठा त्याने कडकडून चावला. त्यातून आलेल्या रक्ताचा टिळा त्याने मूर्तीला, स्वतःला आणि त्या कातडीला लावला. मग त्याने अंगठा एका जलपात्रात बुडवला आणि त्या पाण्यात काही तांदूळ धुऊन घेतले. मग त्या तांदळाने त्याने एक वर्तुळ आखले व त्या वर्तुळातच एक पंचकोणी ताराकृती रेखाटली (टीपः येथे पेन्टाग्रॅम अपेक्षित आहे). ते कातडे त्याने मग पांघरले व मध्यभागी तो ध्यानस्थ बसला. तळघराच्या त्या भागात आता केवळ मंजू, संगारी व लाखन होते. ते विस्फारलेल्या डोळ्यांनी ते दृश्य बघत होते. जिथे आधी कातडे ठेवले होते तेथे आता वाघ दिसू लागला. त्याचे सर्वांग चमकत होते. आणि ही आकृती कोणाची? हे ओंगळवाणे स्वरुप, बटबटीत डोळे जणू कोणी राक्षसच. ती मूर्ती आता शंकराचे रुप टाकून आपले मूळ स्वरुप घेत होती. त्या तिघांनी इशार्‍याने एकमेकांस समजावण्याचा प्रयत्न केला कारण बोलण्याची मनाई होती. हाच मायाकापालिकाचा खरा देव. कदाचित शंकराच्या गणांपैकी कोणी एक असावा. लाखनची नजर मग दुर्जनवर पडली. दुर्जनच्या शरीरातून दुर्जन उठून बाहेर आला होता. तर हीच व्याघ्ररुपाची परीक्षा असणार. महाकालाच्या आशीर्वादाने युक्त, भूतयोनीतील वाघाशी द्वंद्व! त्या वाघाने तोंड उघडले व त्यातून आगीचे गोळे फेकले गेले. दुर्जनने ते हाताने दूर फेकून दिले. मग त्या वाघाने झेप घेत दुर्जनवर हल्ला केला आणि दुर्जन जागचा हलला देखील नाही. त्याने एक तुच्छतापूर्ण कटाक्ष टाकत झटा देत असलेल्या वाघाला पकडून दूर फेकले. अखेरीस वाघाने त्या आकृतीकडे पाहिले. तिने जणू संमतीपूर्वक मान हालविली. वाघाची आकृती अजूनच तेजाने चमकू लागली. दुर्जनला यावेळी धोका जाणवला. तो लगेच रक्षणात्मक मंत्र म्हणू लागला. वाघाने मग धावत धावत त्याच्यावर झडप घातली. नेमक्या त्याच्या पळभरच आधी दुर्जनचे कवच तयार झाले. पण वाघ ते कवच तोडून त्याच्या आरपार झाला. दोघे काही वेळ तसेच उभे राहिले. दुर्जन आधी त्याच्या गुडघ्यांवर बसला. मग वाघ त्याचे चारीपाय पसरून पडला. त्याचा प्रकाशा अस्थिर दिसू लागला. दुर्जनचा बचाव यशस्वी झाला होता, थोडक्यात भागले होते. मग दुर्जनने सगळी शक्ती एकवटून कसलातरी मंत्र म्हणला आणि त्याच्या डोळ्यातून कसली तरी हिरव्या रंगाची किरणे बाहेर पडली आणि व्याघ्राकृतीच्या पोटाला छेदून गेली. मग काही काळ धूरच धूर झाला. जेव्हा धूर कमी झाला तेव्हा त्या वर्तुळात एक वाघ उभा होता. त्याच्या अंगावर दुर्जनची वस्त्रे होती. तो जसा जसा त्यांच्याकडे चालू लागला तशी तशी त्या तिघांना एक अनामिक भीति, एका प्रचंड शक्तीचे दडपण जाणवू लागले. पण त्या रुपात बदल होऊ लागला आणि त्यांच्यासमोर दुर्जन उभा होता.
"आपण यशस्वी झालो. जे मायाकापालिकासही जमले नव्हते ते परिपूर्ण व्याघ्ररुप मला मिळाले. त्यावेळी तर त्या शक्तीने मायाकापालिकाची कमजोरी जाणून त्याला मात दिली पण या रुपास कसलीही कमजोरी नाही. आता या जगात पसरेल फक्त आणि फक्त दुर्जनचे व त्याच्या अनुयायांचे राज्य!"
हे बोलताच ते चौघीही जोरजोरात, पिसाटासारखे हसु लागले. रात्रीच्या अंधाराला अधिकच गडद करणारे ढग दाटून आले होते. जणू संपूर्ण विश्वावर एक सावट पसरू पाहत होते.
~*~*~*~*~*~

हणमंतराव ते सर्व बसले होते त्या कोपर्‍यात आले. तिथे जणू या मोहिमेचे मुख्यालयच तयार झाले होते. तिथे मायकपाळचा ढोबळ नकाशा काढून योजना बनवण्याचे काम चालू होते.
"मालक, धाकले मालक, पमाण्णा, बल्लु, शाम. इकडे या."
ते त्यांना ती खास खबर देण्यासाठी बाजूला घेऊन आले.
"दुर्जनने व्याघ्ररुप मिळवले. आणि पमाण्णा या रुपात परिपूर्ण रुप असे काही आहे का? माझ्या खबर्‍याला नीट कळले नाही म्हणून त्याने तिथल्या डाकूंकडून जे ऐकले तसेच्या तसे सांगितले."
"परिपूर्ण रुप? नायबा. मी आदित्य बरोबर जेव्हा त्याच्याशी लढलो तेच इतके परिपूर्ण होते. अजून काय असणार?"
"हम्म. असो याने आपले काम अवघड नक्की झाले आहे."
"हणमंत काका." अग्रज बोलू लागला. "शत्रू कितीही बलाढ्य असला तरी त्याच्याकडे असे काही नाही जे आपल्याकडे आहे."
"काय?"
"आपल्या मर्यादांची जाणीव. जेव्हा ही जाणीव नसते तेव्हा माणूस अतिआत्मविश्वासी बनतो. आणि अति सर्वत्र वर्जयेत् | नाही का?"
अजूनही काहीशा अविश्वासानेच इतरांनी त्याच्याकडे बघितले. पण त्यांना किमान काही धीर नक्की आला. मग पमाण्णाच अग्रजच्या खांद्यावर हात टाकत म्हणाला.
"तो माझा मालक आहे. जर त्याला इतकेही जमणार नसेल तर मग त्याच्या मालकपदाला काय अर्थ आहे?"
आता मात्र वातावरण निवळले. त्यांचा निर्धार झाला होता. निर्णायक युद्ध आता अटळ होते.

क्रमशः

पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/52972

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तार तुटण्याच्या आत बान्धली.... हे महत्वाचे....
धन्यवाद पुढिल भाग लव्कर दिल्यबद्दल........

एकदा पुन्हा सर्वे सुटे सुटे करुन वाचावयास लागेल निवान्त.....

अग्रजची आई बाळंतपणात गेली. बाबांनी मग त्यांच्या कोणा जोशी नावाच्या मित्राकडे अग्रजचे सोय लावली.
आणि
म्हणून अग्रजला अंधूक अंधूक आठवते कि त्याचे बाबा गणितासंबंधी काही बोलायचे. त्यामुळे त्याला गणिताविषयक आकर्षण निर्माण झाले.>> हे कसं ते कळलं नाही.

बाकी कथा वेग्वान आणि इंट्रेस्टींग आहे.

हम्म, ओके ही एक बारीकशी त्रुटी म्हणावी लागेल. वीराजी खजिना मिळविण्यासाठी गणितीला शोधत हिंडायचे आणि त्याचा उल्लेख ओझरता अग्रजने लहानपणी ऐकला असावा. हे काहीतरी महत्त्वाचे असे समजून तो गणित शिकला असे दाखवायचे होते. असा हा फारच लाँगशॉट होत होता तरी मी असा उल्लेख का केला ते सांगतो म्हणजे कदाचित तुमची शंका मिटेल.
ही एक सबटल हिंट आहे कि सुरुवातीला अग्रज जहागीरदारांचा संपूर्ण इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न का करतो. त्याचे वडील आईबरोबर नाही वारले आहेत म्हणजे अग्रजने त्यांना लहानपणी पाहिले आहे. मग वाड्यात आल्यानंतर काहीतरी खूण जुळली असणार ज्याने त्याला आपण वारस किंवा तत्सम काहीतरी आहोत याची जाणीव झाली असणार; कदाचित एखादे तैलचित्र! आता त्याच्या इतक्या हुशार मुलाला हे कळतंच आहे कि खजिना शोध झाल्यावर हैबतराव त्याला परत हा अमाप ऐतिहासिक कागदपत्रांचा संग्रह पाहू देतीलच असे नाही. म्हणून तो ती कागदपत्रेदेखील धुंडाळतो जी खजिन्याशी थेट संबंधित नाहीत.
आता वाचताना वाटते कि कदाचित हे नसते अ‍ॅड केले तरी चालले असते पण मूळ कथानकास याने फारसा धक्का लागत नसल्याने हे तसेच ठेवत आहे.