वारसा भाग १४

Submitted by पायस on 23 February, 2015 - 17:37

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/52799

या पृथ्वीवर मानवप्राणी सर्वोच्च आहे. कमीत कमी तुमचा असा समज तरी आहे. हे कितपत खरे आहे? कोणी कधी विचार केला आहे कि केवळ मानवप्राणीच एवढा विकसित कसा झाला आणि इतर प्राणी विकासाच्या शर्यतीत इतके कसे मागे पडले? कोणी करो ना करो आदित्यवर्मन् ने असा विचार केला होता आणि म्हणूनच तो आमच्या जवळपास येऊ शकला.
- अश्वक

~*~*~*~*~

अग्रज शांतपणे तो दरवाजा आणि त्याच्या वरील ती चक्रे नीट निरखत होता. बळवंत व शाम दोघेही मंजूच्या आसपास घुटमळत होते व कोणीही एक दुसर्‍याला वरचढ होऊ देत नव्हता. प्रताप आणि पमाण्णा जीवाच्या आकांताने रांजण शोधत होते. खंजर तिथेच असल्याची त्यांना खात्री होती. या सर्वांकडे पाहून अग्रजने खांदे झटकले. मानव खरेच इतकेच करू शकतो?
त्याने दरवाज्याचे बारकाईने निरीक्षण चालवले. कोडी बनवणार्‍याने आत्तापर्यंत कधीच अशक्य कोडे टाकले नव्हते. त्याने कायम काही ना काही धागे, काही निशाण, काही मदत सोडली होती. या कोड्यात सुद्धा काहीच अशक्य असणार नव्हते. अखेरीस काय असू शकेल? सात आकडी संख्या जर उत्तर म्हणून हवी असेल तर त्याने ते उत्तर येणारे गणित द्यायला हवे पण इथे तर काहीच गणित नाहीये. काहीच प्रश्न दिलेला दिसत नाही. मग सात आकडी उत्तर का माहिती असेल? याचा एकच अर्थ असू शकतो. स्थिरांक!
"होय. स्थिरांक" अग्रज उत्साहित होत बोलला.
तिथल्या कोणालाच आता यात फारसा रस उरला नव्हता. त्याने जणू सर्वाधिकार अग्रजच्या हाती देऊन टाकले होते.
सर्वात प्रसिद्ध स्थिरांक पाय. पाय ची किंमत टाकून पाहावी काय? ३.१४१५९२ हे पहिले ७ आकडे अग्रजने झटपट फुले फिरवून त्या त्या आकड्यांवर आणून टाकले. पण काहीच हालचाल झाली नाही. याचा अर्थ हवा असलेला स्थिरांक पाय नाही. मग कोणता?
त्याने नकळत त्या चक्रांवरुन हात फिरविला. या चक्रांना फुलासारखेच का केले? एखाद्या साध्या वर्तुळाच्या आकारात पण ठेवता आले असते. ते सुद्धा सूर्यफुलाच्या आकारातच का दुसरे एखादे फूल का नाही? तसेही भारतीय संस्कृतीत कमळ हे सर्वात जास्त वापरले जाणारे पुष्प आहे. मग सूर्यफूलच का? तेही इतक्या बारकाव्यांनीशी कोरून काढले आहे. आणि दगडी कोरीव काम का नाही? सोनेरी चक्रे बनवण्याइतके सोने असले म्हणून काय झाले? जर कोणी इतका विचार करून ही सर्व व्यवस्था करीत असेल तर तो निश्चित यातली कुठलीही गोष्ट उगाचच करणार नाही. अखेरीस कोण असेल हा गणिती? इतका बारीकसारीक विचार जर तो करत असेल तर निश्चित इथेही त्याने सोने, सूर्यफूल या सर्वांमार्फत काही ना काही तरी इशारे केले आहेत. सोने, सूर्यफूल, हे सूर्यफूलातले चक्राकार वक्र, चक्र, सोने, सुवर्ण........... गोल्डन रेशो
अग्रज थक्क होऊन बघत राहिला. सुवर्ण गुणोत्तर. येस हाच स्थिरांक त्याला हवा असणार. सुवर्ण गुणोत्तर म्हणजे (१+५ चे वर्गमूळ)/२. त्याने लगोलग आकडेमोड केली. १.६१८०३३ हे आले पहिले ७ आकडे. त्याने थरथरत्या हाताने सर्व चक्रे फिरवत हवे ते आकडे आणले. सर्रर्रर्र. ती सातही चक्रे एका रेषेत पुढे आली. जणू ती त्या दाराची कडी असल्याप्रमाणे ती डावीकडे सरकली. आणि ते दार किलकिले होत उघडले. तो खजिना आता बाहेर न्यायला ते मोकळे होते.
~*~*~*~*~*~

खंजर खंड १ - आदित्यवर्मन् चे आत्मवृत्त

मला जेव्हा पहिल्यांदा माझ्या वडलांनी त्याची ओळख करून दिली तेव्हा मी अजिबात घाबरलो नाही किंवा उत्तेजितही झालो नाही. ते पाहून वडिल मलाच अधिक घाबरल्याचे अंधुक स्मरते आहे. आदित्यवर्मन् एक विचित्र मनुष्य आहे हा समज केवळ त्यांचाच नक्की नव्हता. त्यांना मी दोष देणार नाही. जेव्हा तुमची ओळख एका अशा व्यक्तीशी करून दिली जाते जी मानव नक्कीच नाही तेव्हा तुम्ही किमान काही भावना दाखवणे अपेक्षित असते. अगदी पमाण्णादेखील मला थंड डोक्याचा म्हणतो तेव्हा मला माझेच आश्चर्य वाटते. पण खरेच मानव असण्याचा अर्थ तुम्ही भावना प्रकट करणे इतकाच असतो का?
माझा जन्म कुठे झाला हे मला कधीच समजू शकले नाही. माझे वडील बहमनी राजवटीत एक सरदार होते. त्यांना त्यांच्या मोहिमांशिवाय दुसरे काही दिसत नसे. त्यांच्या बायकोचा चेहराही कदाचित त्यांना नीट लक्षात नसावा. त्यांच्याकडे जग जिंकण्याची शक्ती असतानाही त्यांनी ही सामान्य चाकरी का पत्करली हे मला तेव्हा समजू शकले नव्हते. पण मी जेव्हा थोडा अजून मोठा झालो व स्वतंत्र मोहिमा हाताळण्याच्या लायक झालो तेव्हा मला थोडे बहुत यामागची कारणमीमांसा समजू लागली.

प्रथम प्रसंग बहुतेक आमच्या पूर्वेकडे बंडाळी मोडून काढण्यासाठी घडला. परतीच्या वाटेत एका सेवकाला कुठल्या तरी क्षुल्लक कारणावरून वडीलांनी चाबकाने फोडून काढले. तो त्याच जखमी अवस्थेत तडफडत मेला. त्याच्या पुढच्या रात्री पमाण्णा येणार होता. वडलांचे काहीतरी काम होते म्हणून ते आवाहन करणार होते. त्या रात्री पहिल्यांदा मी त्यांच्या डोळ्यात भीती अशी पाहिली. जणू त्यांना कोणीतरी मरणापेक्षा भयंकर शिक्षा करणार आहे असे भाव त्यांच्या डोळ्यात तरळत होते. पमाण्णांला त्या सेवकाबद्दल काही सांगणार नाहीस हे वचन घेतल्यावरच त्यांनी मला शांत झोपू दिले. अखेरीस ते त्याला इतके का घाबरत?
नंतर मला वाटते त्यांनी कुठल्याशा निवाड्यात लाच घेऊन चुकीचा निवाडा द्यायचा प्रयत्न केला होता. दुसर्‍या दिवशी त्यांनी अचानक पलटी खात बरोबर निवाडा दिला आणि तो लाच देणारा इसम हबकून पाहतच राहिला. काही दिवसांनंतर मला तो इसम मेल्याचे समजले. वडलांच्या पाठीवर कसल्याशा जखमांचे वळ पाहिल्याचे तर बोलायलाच नको. या सर्वांमुळे मला पमाण्णाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. मग मी ते केले जे गेल्या ३००-४०० वर्षात आमच्या मूर्ख पूर्वजांपैकी कोणीही केले नव्हते. मी गुणवर्धनाने गोळा केलेले सर्व साहित्य व त्याने बुतुआन मधून आणलेली सर्व कागदपत्रे वाचली.
०००००

माझ्या अभ्यासाच्या दरम्यान कुठल्याशा निरर्थक लढाईत माझे वडील मारले गेले. सुदैवाने तेव्हाच्या वजीराचे - महमूद गावानचे माझ्याबद्दल बरे मत असल्याने आणि मी थोडका पराक्रम गाजवलेला असल्याने सुलतानाची मेहेरेनजर कायम राहिली आणि किमान मला इतर कोणत्या समस्येला तोंड द्यावे लागले नाही. गावान एक हुषार मनुष्य होता यात शंका नाही. त्याने माझ्यात काहीतरी वेगळे असल्याचे हेरले आणि इतर मोजक्याच हिंदू सरदारांपेक्षा माझा दर्जा त्याने उंचा ठेवला. त्याने माझे काही अकारण शत्रू निर्माण झाले पण पमाण्णा असल्यावर त्यांचा सफाया करणे मला फारसे कठीण गेले नाही. त्याने माझ्या आज्ञा ऐकल्यावर मला काही प्रश्न विचारले. जणू तो माझ्या हेतूची चाचपणी करत होता. पमाण्णाचे नीतिशास्त्र वेगळेच होते पण जर त्या नीतिशास्त्रात काही बसत असेल तर तो कोणतीही आज्ञा पार पाडीत असे.

तर गुणवर्धनाच्या कागदपत्रांमुळे खूप फायदा झाला हे निश्चित. तो कालद्वीपावर जेव्हा पोचला तेव्हा त्याच्या स्वागतास पमाण्णा आणि अश्वक होते. गुणवर्धन त्या दिवशी जंगलात ज्याच्याशी लढला तो तियानाक होता. तियानाकला पमाण्णा तिथून पकडून घेऊन गेला. पण गुणवर्धनाचा वार प्राणघातक होता. तियानाक काही आठवड्यांनंतर मरण पावला. अर्थात पमाण्णा किंवा अश्वकाला याचे दु:ख झालेले वाटत नव्हते. मी स्वतःशी विचारले तियानाक कसा मेला? मला वडलांनी सांगितलेल्या माहितीनुसार किंवा अगदी गुणवर्धनाच्या आकलनानुसार पमाण्णा काय, तियानाक काय हे कोणी पिशाच, भूतप्रेतादि प्रकार होते. मग गुणवर्धनाची तलवार जादुई होती काय? तियानाक मेला याचाच अर्थ पमाण्णालाही मरण चुकलेले नाही आणि त्या द्वीपात राहणार्‍या अश्वकालाही नाही. निश्चितच ते पिशाच वगैरे नाहीत ज्यांना मारण्यासाठी काही तंत्रमंत्र लागेल. मूळात भूत, पिशाच वगैरे भाकड कल्पना मानवप्राण्यांनी स्वतःला भीति ही भावना व्यक्त करता यावीत म्हणून दिलेली नावे आहेत हे माझे प्रामाणिक मत!

मग पमाण्णा होता तरी कोण? मी माझ्या त्याच्याबरोबरच्या सहवासात हे पाहिले होते कि तो मनुष्य तर नक्कीच नाही. कोणताही मनुष्य अदृश्य नसतो. पमाण्णाबरोबरच्या गप्पांमध्ये तो बोलता बोलता एक रहस्य सांगून गेला होता. त्याच्या शरीरावरचा प्रत्येक कण न कण सतत थरथरत राहतो. तो खूप काळ त्या मूळ शरीराला कालद्वीपच्या बाहेरील अशुद्ध वातावरणात ठेवू शकत नव्हता. त्या थरथरण्याला आपले डोळे सरावू शकत नसल्याने तो अदृश्य भासे. तसेच त्यामुळे त्याला कोणते ना कोणते मानव शरीर परिधान करावे लागे. माझी मुख्य चिंता होती कि मी त्याला सतत माझ्या बरोबर ठेवू शकत नव्हतो. गुणवर्धनाची गोष्ट पूर्ण वाचल्यावर मला हे कळले होते.
गुणवर्धनाने तिथे राहून लुमिखाची कडक साधना केली होती. त्यायोगे तो पमाण्णाला अंशतः दास बनवण्यात यशस्वी झाला होता. मग तो किंवा त्याचा कोणीही वंशज पमाण्णाला आवाहन करून कधीही बोलवू शकत असे. पण पमाण्णाला त्याच्या आज्ञा पूर्णपणे पाळण्याची आवश्यकता नव्हती. तसेच पमाण्णा त्याला एक चांगला मानव बनवणार ही नैतिक जबाबदारी लुमिखाकडून स्वीकारून बसला होता. फक्त एकच अट होती कि पमाण्णा नवीन मालक स्वीकारण्यालायक होत नाही तोवर जुन्या मालकास जीवे मारणार नाही. गुणवर्धन जरी 'चांगला' मानव असला तरी त्याची बायको गुणवती ही अधिकच महत्त्वाकांक्षी होती. तिने तिच्या मुलाला त्याच पद्धतीने वाढवले. गुणवर्धनाने कुलोत्तुंगाला सम्राट बनवून आपले महत्त्व वाढवले असले तरी गुणवतीची व पुढच्या वंशजांची महत्त्वाकांक्षा ही सम्राट आपल्या बाजूचा असावा इतकीच नसून तो आपल्या हातातले खेळणे व्हावा ही होती. पण पराक्रमी चोळ राजांना खेळवणे इतके सोपे थोडीच होते? त्यात पमाण्णाच्या नीतिशास्त्रात हे सर्व पूर्णपणे बसत नसल्याने तो चोळ राजांना धमकावत नव्हता. अशा परिस्थितीत त्याच्याकडून अनेकांनी शिक्षा भोगल्या. अखेरीस कटकारस्थानात कोणाचा तरी बळी गेला. तो चोळ सेनापतीचा खूनी जो होता. त्याच्या त्या वेडपटपणामुळे होयसळांनी चोळ साम्राज्य विलयास नेले आणि आमचे घराणे निर्वासित झाले. मग आम्हाला यादवांच्या राज्यात पमाण्णामुळे आसरा मिळू शकला. त्याने मालकाची शेवटची आज्ञा म्हणून आमच्या घराण्याचे या नवीन मुलखात पुनर्वसन केले. पण आम्ही पमाण्णाला अजूनही पूर्णपणे हाताळू शकत नाही.
००००००

मला गावानने दिलेला एक पाठ नेहमीच लक्षात राहिला आहे. "आदित्य हमेशा याद रखो. मालिक और गुलाम का रिश्ता जितना लगता है उतना आसान कभी नही होता. गुलाम की भी अपनी कुछ भावनाए होती है, अपने उसूल होते है और वे अक्सर मालिकसे अलग होते है. इसका मतलब ये नही कि वह मालिक कि बात नही मानेगा. पर ये जरुरी नही कि वो मालिक की हर बात मानता रहेगा. जब भी उसे मौका मिलेगा वह उलटा झपटेगा. इसलिए मालिकों के पास दोही रास्ते होते है. या तो गुलाम के साथ गुलाम कि तरह मत बर्ताव करो, उससे किसी आम इंसान कि तरह पेश आओ. ये वाला रास्ता मेरे ख्याल से सबसे वाहियात ख्याल है. अगर गुलाम से हम गुलामी ना करवाये तो और कौन करवायेगा जरा बताने कि तकल्लुफ करना मिया! दुसरा रास्ता इसलिये कारगर भी है और दुरुस्त भी है. गुलाम के मन मे डर बिठाओ. अगर रिश्ता समझने मे आसान नही है तो उससे जुडी भावना भी तो समझने मे आसान नही होनी चाहिए. डर समझने मे सबसे मुश्किल चीज है ये मेरे मानना है. पर वो सबसे असरदार भी है. गुलाम तुमसे डरना चाहिए. जरुरी नही कि वह जिस चीजसे डरे वह चीज सचमुच मे डरावनी हो. हमारा दिमाग किसी भी चीज से डर सकता है. खुदा कि इबादत भी तो कई बंदे डर कि वजह से ही करते है. उसी तरह गुलामने भी मालिक कि इबादत डर डर के करनी चाहिए........"
डर. भीति. पमाण्णाला जर काबू करायचे असेल तर त्याच्या मनात भीति निर्माण केली पाहिजे. पण कशी? खुदा! पमाण्णा फक्त एकाच गोष्टीला घाबरू शकतो - लुमिखा अर्थात त्याचा खुदा. या नव्या मोहिमेत मला संधी मिळू शकते. असे काहीतरी निर्माण करावे लागेल ज्याला तो घाबरेल. मला खात्री आहे कि मायाकापालिकांकडे तसे काहीतरी मिळेल.
~*~*~*~*~*~

मायकपाळ आता पूर्वीसारखे आनंदी गाव राहिले नव्हते. त्याच्या मध्यभागी आता खाटिकखाना उभारला गेला होता. संपूर्ण गाव आता सीतामातेच्या मंदिरात जेरबंद केलेल्या हैबतरावांना शिव्या घालत होता. त्यांची आता तहानेने वा भुकेने उपासमार होत नव्हती. पण कोण कधी मरेल याचा भरवसा राहिला नव्हता. फारसे सैनिक बाकी राहिले नव्हते. त्यानंतर त्यांची पाळी असणार होती. आज खाटिक बनण्याची पाळी संगारीची होती. संगारीने तिचा बुरखा हटविल्यामुळे गावाला आता ती ओळखू येत होती. आपण का हिला आश्रय दिला? आपल्याला हिचा एकदाही संशय का आला नाही हे आता सर्व गाव एकमेकाला विचारत होते.
संगारी या सर्वाने अजिबात विचलित होत नव्हती. तिच्या हातात नंगी तलवार होती. संपूर्ण काळ्या कपड्यात ती सावकाश चालत येत होती. समोर बलिवेदी धगधगत होती. कोणी एक सैनिक बोकडाला बांधावे तसा बांधून ठेवला होता. संगारीने तलवारीच्या पात्यावरून बोट फिरविले. तिच्या बोटाला रक्ताची धार लागली. तिने स्वतःला रक्ताचा तिलक केला. मग खसकन् त्या बळीचे बोट तलवारीने कापले. त्याच्या रक्ताचा तिलक त्यालाच केला. उरलेल्या रक्ताला एका छोट्या वाडग्यात भरून त्याच्या डोक्यावर ओतले. जणू अभिषेकच केला. मग शेजारील तबकातील विविध द्रव्ये त्याल हुंगवण्यात आली. त्याच्या चेहर्‍यावर विविध ठिकाणी त्यांचा लेप दिला गेला. त्याची तडफड काहीशी कमी झाली. जणू त्याला कसलीशी धुंदी चढली. मग त्याच्या केसांना धरून संगारी त्याला फरफटत वेदीकडे घेऊन गेली. तिने त्याचे तोंड वेदीच्यावर धरले. त्याला त्या हवनकुंडाच्या आगीची झळ लागताच तो शुद्धीवर आला. त्याचे तोंड भाजून निघत होते. त्याने किंकाळ्या फोडायला सुरुवात केली. पण फार काळ नाही. संगारीने वेगात तलवार चालवली. त्याच्या किंकाळ्या बंद झाल्या. किंकाळ्या फोडणारे ते तोंड आता हवनकुंडात स्वाहा झाले होते.
~*~*~*~*~*~

शोधपंचक आता पमाण्णासोबत गावाकडे परतत होते. पमाण्णा काहीसा अस्वस्थ होता. खंजर नाही तर लुमिखाबरोबर करार नव्याने करता येणार नाही. ज्या कामाकरिता ८७२ वर्षे खर्ची पडली ते पूर्ण झालेले नाही अजून. त्याने प्रतापकडे पाहिले. प्रताप त्याची शेवटची आशा होती. आपण खंजरचे इशारे ओळखण्यात चूक तर नाही केली. पण कुठल्याच रांजणात तो कसा काय नव्हता? अजूनही ते संकेत येत आहेत. कदाचित आपण नीट शोधले नसेल. गावात जाऊन नीट शोध घेऊ.
बळवंत व शामच्या डोक्यात मंजूविषयी विचार चालले होते. गावी गेल्यावर दुसरा विचारण्याआधीच आपल्या प्रेमाची कबुली द्यायची हे त्या दोघांनीही पक्के ठरविले होते. मंजू मात्र असामान्यपणे शांत भासत होती.
प्रताप पमाण्णाकडे बघून त्या खंजरात नक्की एवढे काय असेल याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करीत होता. त्याला खजिन्याचा दुसरा अंश मिळाल्याचा आनंद फारसा नव्हता पण पमाण्णाला चिंतेत पाहून त्याची खंजराबद्दलची उत्सुकता मात्र शिगेला पोचली होती.
अग्रज मात्र अगदी खूष होता. त्याच्या चेहर्‍यावर एक मंद हास्य विलसत होते. जणू या खेळाचे सर्व पत्ते आता मला माहित आहेत असा आविर्भाव होता त्याचा. हा आनंद खजिना मिळाल्याचा होता का अजून कशाचा तरी?
ते गावाच्या अगदी जवळ पोचले. त्यांनी सीतामातेच्या मंदिराकडे पाहिले. तिथून कसलातरी धूर येत होता. धूर? गावावर अवकळा पसरलेली दुरूनही कळत होते. सर्वांना जाणवले कि काहीतरी गडबड आहे. आणि पमाण्णाला सर्वात आधी तो वास जाणवला. पण तोवर उशीर झाला होता. त्याने त्या व्यक्तीला आपल्या तोंडावर बुरखा चढवताना पाहिले. "तू........." करत तो सर्वात आधी कोसळला.
एक एक करीत सर्वजण घोड्यांवरून खाली पडले. बळवंत सर्वात शेवटी पडला. त्याने श्वास रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. पण त्या व्यक्तीने घोड्यावरून खाली उतरून त्याच्या पोटात सणसणीत लाथ हाणली. आता त्यालाही इतरांप्रमाणे तो वास हुंगून बेशुद्ध होणे क्रमप्राप्त होते. पण बेशुद्ध होता होता त्या व्यक्तीकडे बघण्याची संधी मिळाली. ती आता बुरखा बाजूला करीत होती. "मंजू...." म्हणत तोही शुद्ध हरपून बसला. मंजू त्या सर्वांकडे बघत खदाखदा हसत होती. तिने मायकपाळकडून घोडेस्वार येण्यासाठी धूर करून इशारा केला. त्या सर्वांची वरात घेऊन ती आता मायकपाळकडे निघण्याची तयारी करू लागली.

क्रमशः

पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/52893

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. मला मागच्याच भागात वाटलं होतं जेव्हा तो खंजर कोणीतरी चुपचाप उचलल्याचा उल्लेख आला होता.
सही जाते आहे स्टोरी. मस्तच!

मंजूचा ट्विस्ट अपेक्षित होता तसच आला. एकदम इण्टरेस्टिंग मोड पे कहानी चालू.

पायस, सीरीयसली या कथानकावर अजून थोडी मेहनत केली तर हे एक बेस्ट सेलर होऊ शकेल. सॉलिड प्लॉट आहे!!

पुन्हा एकदा सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार. माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडतोय हे पाहून छान वाटतंय Happy
@नंदिनी - इतकेही कौतुक नको हो. उगाचच कॉलर ताठ करावीशी वाटते Happy
रच्याकने मंजू चा ट्वीस्ट/रहस्योद्घाटन झाले आता आणखी २ मेजर बाकी आहेत. त्यातल्या एकाच्या पुरेशा हिंट्स आल्या आहेत. पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या भागात ते क्लिअर होईल. तोवर गेसिंग गेम चालू द्या!

जबर्दस्त कथानक.
मंजुबद्दलचे तर्क खरे ठरले.
अग्रज चा तर्क खरा ठरतो का ते बघायचे.
च्यामारी माबो फेमस कथालेखकांना घेवुन शिणुमे, शिरेली कानाही बनवित. हिट्ट्ट्ट जातील.

बादशहा - अजून ६-७ भाग राहिलेत.
<<अग्रज ... सिर्फ नाम ही काफी है!>> मामी, जबरी आवडलं हे वाक्य Happy

पायस
अप्रतिम चाल्लिये गोष्ट...
मी सह्मत आहे कि हि गोष्ट एक बेस्ट्सेल्लर होवू शकते

एक विनन्ति : पुढिल भाग सारे पटापट येऊ द्यावे म्हन्जे टेम्पो विस्कळित होणार नाहि....

एक विनन्ति : पुढिल भाग सारे पटापट येऊ द्यावे म्हन्जे टेम्पो विस्कळित होणार नाहि....>>>>+++++१००००००००