वर्ष झालं पण शेजारच्या फ्लॅटमध्ये कोणी राहायला आलेलं नव्हतं. एका मजल्यावर दोनच फ्लॅट्स! आणि मजलेही दोनच! तळमजला आणि पहिला मजला! पहिल्या मजल्यावर गौरी राहायची. हेमु ऑफीसला गेला की हा तीन खोल्यांचा फ्लॅट आणि गौरी! हेमु ऑफीसला जाईपर्यंत घरात जरा घाईघाई असायची. तो सारखा धावपळ करत असायचा. गौरी त्याला मदत करू पाहायची. पण तो अजिबात लक्ष द्यायचा नाही. स्वतःच दोन सँडविचेस करून खायचा आणि थोडी फळे आणि एक सँडविच लंचबॉक्समध्ये भरून निघून जायचा. लग्नाला दिड वर्ष झालं होतं आणि पहिले काही महिने सोडले तर हेमुने जो प्रदीर्घ अबोला धरलेला होता तो अजून सुरूच होता. गौरी त्याला जणू नजरेसमोर नको होती. अबोल्याचे पहिले काही दिवस गौरीला अतोनात त्रास झाला होता. आता मात्र ती उलटाच विचार करत असे. कधी एकदा तो ऑफीसला जातोय असा विचार! एकदा तो ऑफीसला गेला की रान मोकळे! स्वतःपुरते करा, हवे तेव्हा गॅलरीत उभे राहून रस्ता न्याहाळा, हवा तितका टीव्ही पाहा, फोन आले तर ढुंकून बघू नका फोनकडे! हेमुला रात्री परत यायला थेट अकराच वाजायचे. लग्नाला काही अर्थच नव्हता. लग्नापूर्वी गौरीने एक गोष्ट हेमुला सांगितली नव्हती. ती लग्नानंतर अचानक समजली आणि हेमु भडकला. त्याने गौरीशी बोलणे तोडले. तुझे तू जग म्हणाला, माझे मी जगतो. पहिल्यांदा अतिशय मनस्ताप झालेल्या गौरीला आता ह्या अश्या विचित्र सहजीवनातच रस निर्माण झाला होता. पूर्ण स्वातंत्र्य! एकमेकांना एकमेकांचे अस्तित्त्व जाणवत तर आहे, पण त्यापलीकडे काहीही नाही. अजून काय पाहिजे? हेमुलाही तेच बरे पडत होते. ह्या असल्या बायकोशी बोलत बसण्यापेक्षा घराचा उपयोग फक्त एक विश्रांतीचा थांबा आणि सकाळी नाश्ता करण्यासाठीची जागा म्हणून केलेला काय वाईट? हळूहळू तोही हे लाईफ एन्जॉय करू लागला.
शेजारचा मिरर इमेज फ्लॅट बघायला सतराजण येऊन जायचे. पण कोणी पसंतच करायचे नाही तो फ्लॅट! आधी गौरीला वैताग यायचा. ती अगदी दारात उभी राहून नव्या होतकरू फ्लॅट खरेदीदाराकडे बघून हसायची वगैरे! पण कोणीच फ्लॅट पसंत करत नाही म्हंटल्यावर तिचा त्यातलाही इन्टरेस्ट संपला. आता तर तिला वाटत होते की शेजारी कोणी येऊच नये.
खाली तांबे राहायचे. दोन्ही फ्लॅट्स त्यांचेच होते. आजी आजोबा असायचे फक्त! मुलगा, सून आणि नातवंडे परदेशात! ह्या आजी आजोबांना एकांताची आणि एकटेपणाची सवय झालेलीच होती. गौरीला आजी आवडायच्या नाहीत. आजोबा बिचारे अंगणात सकाळी पेपर वाचत बसायचे आणि चहा घ्यायचे. पण आजी जरा भोचक होत्या. वरपर्यंत येऊन गौरीला काहीतरी खायला केलेले वगैरे देऊन जायच्या. घरात डोकावून कोणी दिसते का ते पाहायच्या. नाही त्या चौकश्या करायच्या. तुम्ही कुठे बाहेर का जात नाही, मिस्टरांना नेहमी उशीरच होतो का वगैरे! हिला काय करायच्यायत भानगडी, असे म्हणून गौरी वरकरणी हसून त्यांना कटवायची. संबंध अधिक वाढू नयेत म्हणून स्वतः मात्र काहीही नेऊन द्यायची नाही आजी आजोबांना! गौरीला माहीत होते, सून जवळ राहात असो अथवा नसो, ह्या असल्या म्हातार्या बायकांना दुसर्या घरातील सुनेच्या वयाच्या मुलीशी जुळवून घ्यायला आणि स्वतःच्या सुनेपेक्षा स्वतःच गोड व्हायला आवडते. तसे केल्यामुळे आपोआप सून एकटी पडते आणि आपल्यावरच बाकीचे प्रेमाचा वर्षाव करत राहतात. त्यातून सून भडकली की एक विषय मिळतोच गॉसिपिंगला! गौरीला असल्या विषयात काहीही स्वारस्य नव्हते.
पण एकदा एक विचित्र प्रकार झाला. हेमु ऑफीसला निघाला आणि जिन्यावरून अचानक पडला. मागून गौरी धावली तोवर तो वेदना सहन करत उभा राहून आणि गौरीकडे ढुंकूनही न पाहता निघून चाललेला होता. आपण हेमुला इतक्या नकोश्या झालेल्या आहोत ही जाणीव गौरीचे मन पोखरून गेली. तिने काही क्षण जिन्यात उभे राहून पाहिले तर आजी धावत वर येत होत्या. त्यांनी काय झाले म्हणून विचारले आणि गौरीने सांगितले की मिस्टर जरा पडले, पण आता ठीक आहेत, गेले ऑफीसला! मागून त्या तांबेंच्या दारात आजोबाही आले टेकत आणि त्यांनी नुसतेच ह्या दोघींकडे पाहिले आणि आत गेले. आजीही खाली उतरून निघाल्या आणि मागे वळत म्हणाल्या......
"काही लागले तर सांग हं बाळ? आपणच आहोत एकमेकांना"
पहिल्यांदाच गौरीला भडभडून आले. 'बाळ' ही ऐकायला आपण इतके तहानलेलो होतो हेच तिला माहीत नव्हते. अचानक आजींचा आधार वाटू लागला. आजोबांबाबत मात्र मनात अढी निर्माण झाली. हेमुचा तर संतापच आला आता! इतका कसला इगो? असेल फसवले मी एकदा! पण सगळे वैवाहिक आयुष्य नासवायलाच हवे आहे का? आणि इतका राग आहे तर दुसरी का नाही आणत कोणी? मी स्वतःहून निघून जाईन तिला पाहिल्यापाहिल्या! की हा दिवसभर कुणाकडेतरी असतोच? तेही माहीत नाही. एकदा लक्षच ठेवायला हवे.
पण आजींनी मात्र मन जिंकले गौरीचे!
त्याचा एक चांगला परिणाम झाला.
गौरीच्या आयुष्यात काही सुखाचे क्षण येऊ लागले.
हेमु ऑफीसला गेला की निवांत स्वतःचे आवरून गौरी गॅलरीत जरा वेळ उभी राहायची. खाली अंगणात आजोबा त्यांच्या नेहमीच्या खुर्चीवर जेवणाचे ताट घेऊन जेवायला बसलेले दिसले की गौरीला समजायचे, आजी आता रिकाम्या झाल्या असणार कामातून! मग ती हळूच जिन्यात येऊन खाली बघायची. आजी आधीच आलेल्या असल्या तर हसून तिथेच बसायची, आलेल्या नसल्या तर थोडा वेळ वाट पाहायची. थोड्या वेळाने तरी त्या यायच्याच! एकदोनदा असेही झाले की गौरीने आजींना हाकही मारली आजी म्हणून! आजींची कळी खुलली. त्या लगबगीने आल्या जिन्यात!
आता गप्पा रोजच्याच होऊ लागल्या. गप्पांचे विषय कुटुंबापासून सुरू होऊन जगभर फिरून पुन्हा कुटुंबापाशी येऊन संपायचे. दुपारी दोन वाजता सुरू झालेल्या गप्पा तिन्हीसांजेला संपायच्या आणि मग दोघी उदास होऊन आपापल्या घरी जायच्या. आजींनी गौरीशी बोलताना मूलबाळाचा विषय काढला की गौरीचा चेहरा खर्रकन् उतरायचा. पण ते जाणूनही आजी तो विषय काढायच्याच! हळूहळू गौरीलाही असे वाटू लागले की निदान ही म्हातारी तो विषय काढत आहे म्हणून तो विषय निघतोय तरी! हेमुला काय पडलंय? निदान म्हातारपणी आधार म्हणून तरी त्याने काहीतरी विचार करायला हरकत नाही.
दोघींच्या गप्पा भान हरपून ऐकणारा तो जिना म्हणजे जणू त्यांचा गप्पांचा एक साथीदारच झाला. आजी खालच्या पायरीवर, गौरी दोन पायर्या सोडून वरच्या पायरीवर! कधी गौरीच्या साडीची चौकशी, कधी परदेशी असलेल्या नातवंडांच्या बाललीलांची कौतुके, कधी हवामानाच्या गप्पा तर कधी नवर्यांच्या तक्रारी!
आता दोघी जणू जिवलग मैत्रिणीच झाल्या. वयाचे बंधन संपले. वेळेचे बंधन संपले. नात्याला नांव असावे अशी गरज उरली नाही. आता तर गौरी आजींना चक्क 'ए शुभदा' असे म्हणू लागली. आश्चर्य म्हणजे आजींना तेच अधिक आवडू लागले.
गप्पांना आता विषयांचे बंधन नव्हते. हसणे, रडणे, तावातावाने बोलणे, कुजबुजणे, सगळे त्याच जिन्यात!
जर त्या जिन्याला मेमरी कार्ड असते तर दोन समांतर चाललेल्या दु:खद कहाण्यांच्या संगमाचा अद्भुत कथाविष्कार त्याने प्रस्तूत केलाही असता.
एखाददिवशी आजी आल्या नाहीत तर गौरी फुरंगटून बसायची. मग त्याही वयात आजी लाजून म्हणायच्या, काल आमच्या लग्नाचा वाढदिवस होता ना, त्यामुळे मीच ह्यांना म्हणाले की मी आज गौराक्काबरोबर वेळ घालवणार नाही.
गौरीचे डोळे मधूनच भरून यायचे. आजींच्या प्रदीर्घ वैवाहिक जीवनात सध्या असलेला एकलकोंडेपणा आणि आजोबांचे किंचित अंतर्मुखपणे बसणे सोडले तर सगळेच आलबेल होते. तिच्या स्वतःच्या वैवाहिक आयुष्याला मात्र काहीच अर्थ नव्हता.
एकदा अश्याच दोघी जिन्यात बसलेल्या असताना अचानकच हेमु ऑफीसमधून लवकर आला. ह्या दोघी त्याला पाहून जिन्यात पटकन् सरकून बसल्या. हेमु तिरसटासारखा घरी गेला. गौरीने 'आता मात्र मला जायला हवं हं' असा खोटाच अभिनय करून आजींची परवानगी घेतली आणि ती लगबगीने वर गेली. तोवर हेमु बॅग घेऊन परतही निघालेला होता. गौरीला बायही न करता तो गेला हे पाहून गौरी हमसून हमसून रडली आणि जिन्यात पुन्हा आली तेव्हा आजी गंभीर नजरेने तिचीच वाट पाहात होत्या. त्यांनी तिच्या भावना समजून तिच्या केसांतून खूपवेळ हात फिरवला. आईला मुलगी भेटली. मैत्रिणीला मैत्रिणीने समजून घेतले.
अश्याच त्या दोघी जिन्यात बसत राहिल्या. आजी आजोबा, गौरी, हेमु आणि जिना अशी एक नात्याची विचित्र साखळी तयार झाली. जागेचे मालक अधूनमधून नवीन गिर्हाइकांना गौरीच्या शेजारचा फ्लॅट दाखवायला आणायचे तेवढ्यापुरत्या त्या जिन्यातून उठून आपापल्या घरात जायच्या. उगीच आपल्याला पाहून ह्या लोकांनी घराबद्दल मत बनवायला नको म्हणून!
आणि एक दिवस? एक दिवस चक्क शेजारचा फ्लॅट विकला गेला. हद्दच झाली. अगदी हेमु आणि गौरीसारखेच कुटुंब! फक्त त्यांना एक गोंडस मुलगी होती. मनाली तिचे नांव! मनालीची आई अनघा गौरीपेक्षा वर्षादोन वर्षाने मोठी असेल.
गौरी खुष झाली. ही बातमी आजींना सांगण्यासाठी जिन्यात आली. आजी जिन्यात होत्याच! त्यांना ते समजलेलेच होते. दोघी कित्तीतरी वेळ हुरळून एकमेकींशी बोलत होत्या. शेवटी त्यांनी नव्या मैत्रिणीची ओळख करून घेण्यासाठी तिच्या घराची बेल वाजवली. अनघाने हसतमुखाने दरवाजा उघडला. ह्या दोघींना पाहून आत या म्हणाली. पण ह्या दोघींनी तिला गप्पा मारायला जिन्यातच बोलावले. आलेच दहा मिनिटांत म्हणत ती आत गेली आणि ह्या एकमेकींकडे आनंदाने पाहात नेहमीच्या पायर्यांवर येऊन बसल्या. तीन चारच मिनिटांत एकदम मोठा आवाज झाला. ह्यांनी दचकून वर पाहिले तर अनघा तिच्या जिन्यावरून कोसळून गडगडत खाली आली होती. तिचे डोके एका भिंतीवर आपटून खूप रक्त वाहिले होते. आवाजाने आणि दिसणार्या दृश्याने ह्या दोघी थिजून पाहातच राहिल्या. खालून आजोबाही घाईघाईने वर आले. हळूहळू माणसे जमली. अनघाच्या नवर्याला, शैलेशला कोणीतरी फोन करून बोलावले. तोवर डॉक्टर आलेलेच होते. त्यांनी अनघाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याचे सांगितले. शैलेश आर्तपणे रडत राहिला. फोन आल्यामुळे हेमुही त्वरीत घरी आला होता. तो शैलेशचे सांत्वन करत राहिला. आजोबा शैलेशच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले......
"ह्या जिन्याला सवाष्ण नाही चालत घरात, माझी बायको अशीच जिन्यावरून पडूनच गेली, ह्या हेमुची गौरीही तशीच गेली, आणि आता तुझी बायकोही"
================================
-'बेफिकीर'!
मला आवडली कथा. जिन्यावरून मी
मला आवडली कथा. जिन्यावरून मी पण पडले आहे लहानपणी. लै भीती वाटते. तेव्हापासून आजतागायत प्रत्येक पायरी मोजूनच उतरते. अजून आहे तो जिना. मैं गिरी तो बिल्डिंग गिरना मंगता था वैसे तो.
अनपेक्षित शेवट.
बेफी, नावावरून मला जिना नावाच्य मुलीबद्दल किंवा जिना लोलो ब्रिजिडा नटीबद्दल काहीतरी असेल असे वाटून उघडले होते. पण ही घरगुती कथा निघाली. सो क्यूट.
अमा
अमा
बेफी, नावावरून मला जिना
बेफी, नावावरून मला जिना नावाच्य मुलीबद्दल किंवा जिना लोलो ब्रिजिडा नटीबद्दल काहीतरी असेल असे वाटून उघडले होते. डोळा मारा पण ही घरगुती कथा निघाली. सो क्यूट.>> अगदी अमा ! हो बेफि ! म्हणजे व्यक्तिचित्रणात तुमचा हातखंडाच आहे ना म्हणून !
>>>हो बेफि ! म्हणजे
>>>हो बेफि ! म्हणजे व्यक्तिचित्रणात तुमचा हातखंडाच आहे ना म्हणून !<<<
कशाला शालजोडीतले मारताय राव!
भारतात सूर्यास्त झाला की बघा मायबोलीवर कसे स्पष्टवक्ते उगवतात.
बेफि .. काहीही हं !
बेफि .. काहीही हं !
जब्ररदस्त आहे कथा. शेवट एकदम
जब्ररदस्त आहे कथा. शेवट एकदम अनपेक्षित, धक्कातंत्र मस्त जमलयं.
छान आहे कथा. पहिल्यापासून छान
छान आहे कथा. पहिल्यापासून छान खुलत गेली आहे आणि शेवटी असे काही असेल अशी शंकाही येत नाही.
आवडली कथा.
शेवट वाचुन धस्स झाल. मस्त
शेवट वाचुन धस्स झाल. मस्त कथा.
आवडली. मोबाईल वरून आधी
आवडली.
मोबाईल वरून आधी वाचलेली आणि त्यादिवसापासून उत्सुकता आहे की ती २ मिसलेली वाक्य कोणती असावीत?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/52145
हा आपला कट्टा.
हाही एक जिनाच आहे.
धागा काढला आणि सातच दिवसात मालक कागअळे मेले.
मग कागाळे १ आले. तेही मेले.
मग रमाकांत कोढा आलेत...
जोशीबुवा संभाळुन पुढचा आयडी घ्या.
खरच अगदी अनपेक्षीत शेवट.
खरच अगदी अनपेक्षीत शेवट. धक्कादायक.
मस्त.....
मस्त.....
बेफ़िकीर जी ... तुंम्हि लिहित
बेफ़िकीर जी ... तुंम्हि लिहित रहा ............. आमच्या सारखे सामान्य वाचक आहेत तुमचे लेखन वाचायला
आनि मनापासुन दाद द्यायला ........
आआइईशपथ ... शेवटचा धक्का
आआइईशपथ ... शेवटचा धक्का वाचुन पुन्हा वाचली मस्तच जमलीय
अमा, >> नावावरून मला जिना
अमा,
>> नावावरून मला जिना नावाच्य मुलीबद्दल किंवा जिना लोलो ब्रिजिडा नटीबद्दल काहीतरी असेल
मी तुमच्या जागी असतो तर महमंदअली जिना आठवला असता मला!
आ.न.,
गा.पै.
शेवट अतिशय धक्कादायक...!
शेवट अतिशय धक्कादायक...!
"ह्या जिन्याला सवाष्ण नाही
"ह्या जिन्याला सवाष्ण नाही चालत घरात, माझी बायको अशीच जिन्यावरून पडूनच गेली, ह्या हेमुची गौरीही तशीच गेली, आणि आता तुझी बायकोही"<<सही एंड आहे एकदम !!!
अनपेक्षीत शेवट .. भरलेला
अनपेक्षीत शेवट .. भरलेला मालमसाला कथेला पुरक आहे असं मात्र वाटत नाही ..
जबरदस्त अनपेक्षित शेवट.
जबरदस्त अनपेक्षित शेवट. आवडली.
कॉपीपेस्ट
क्काय????????....अनपेक्षित
क्काय????????....अनपेक्षित शेवट....
माबोवर नवीन आहे, त्या मुळे
माबोवर नवीन आहे, त्या मुळे सगळे धागे वाचत आहे. "आआइईशपथ ... शेवटचा धक्का वाचुन पुन्हा वाचली मस्तच जमलीय " +१००.
मनापासुन दाद.
लग्नापूर्वी गौरीने एक गोष्ट
लग्नापूर्वी गौरीने एक गोष्ट हेमुला सांगितली नव्हती. ती लग्नानंतर अचानक समजली आणि हेमु भडकला. >>> हे काय मग?
दोघीहि मृत? शेवट धक्कादायक..
Anek divasanni dhakka basala
Anek divasanni dhakka basala kuthalya kathecha shevaT vachun.
Jabarach!
जबरदस्त कथा. खूप आवडली.
जबरदस्त कथा. खूप आवडली.
मस्त.
मस्त.
आमचे आधीचे घर असेच होते. खाली दोन फ्लॅट्स, वर दोन फ्लॅट्स. जिना. जिन्यात बसून बायका गप्पा मारायच्या.
पण कोणी पडले नाही कधी.
खूप छान कथा...
खूप छान कथा...
अरे वा, ही वाचायची राहिलीच
अरे वा, ही वाचायची राहिलीच होती, मस्त कथा, thanks आर्किड धागा वर काढल्याबद्दल
जबरदस्त कथा... शेवट एकदम
जबरदस्त कथा... शेवट एकदम धक्कादायक...!!
मस्तच आहे जिना, शेवटपर्यंत
मस्तच आहे जिना, शेवटपर्यंत शंका पण नाही आली असं काही असेल,भारीच.
माझी फार बाळबोध शंका आहे.
माझी फार बाळबोध शंका आहे.
कथा वाचून झाल्यावर मी असा समज करून घेतला आहे की, आजी आणि गौरी या जगात नाहीत, म्हणून हेमूला गौरी दिसत नाही. याच मुळे तो गौरीकडे दुर्लक्ष करतो आहे असे कथा वाचताना वाटत रहाते.
या पार्श्वभूमीवर अनघाला बेल वाजल्यावर दार उघडल्यावर या दोघी कशा दिसतात? अनघाचा अपघात तर नंतर होतो.
कोणी मला समजावून सांगेल का?
Pages