जंटलमन्स गेम - १ - डॉलिव्हिएरा अफेअर

Submitted by स्पार्टाकस on 18 February, 2015 - 23:45

जॉन अरलॉट गंभीरपणे आपल्या समोरील पत्रं वाचत होता.

हिरव्या शाईने लिहीलेलं ते पत्रं शेकडॉ मैलांचा प्रवास करुन त्याच्या डेस्कवर येऊन पडलं होतं. पत्रं लिहीणारा सुमारे अठ्ठावीस - तीस वर्षांचा एक तरुण होता. आपल्या अंगी असलेल्या गुणांचं चीज व्हावं यासाठी आपल्याला एक संधी मिळवून द्यावी अशी त्याने अत्यंत विनम्र सुरात अरलॉटला पत्रातून विनंती केली होती!

हे पत्रं म्हणजे एका अत्यंत वादळी प्रकरणाची नांदी ठरणार होतं!

सोळाव्या आणि सतराव्या शतकात सर्व जगभर पसरलेल्या युरोपियनांनी व्यापाराच्या माध्यमातून हळूहळू आपली साम्राज्ये उभी करण्यास सुरवात केली होती. या व्यापार्‍यांमध्ये ब्रिटीश, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांचा मुख्यत्वे समावेश होता. आफ्रीकेच्या काही भागात यांच्या जोडीला बेल्जियन आणि जर्मनही होते. तत्कालीन आफ्रीकेतील बहुसंख्य जनता ही निग्रोवंशीय होती. व्यापारी म्हणून आलेल्या युरोपियननांना आपल्या गोर्‍या कातडीचा दर्प होताच! स्थानिक निग्रो जनतेपेक्षा आपण श्रेष्ठ आणि उच्चवर्णीय आहोत अशी बहुसंख्य युरोपियनांची धारणा होती.

वर्णवर्चस्वाचा आणि वर्णद्वेषाचा अतिरेक झालेला आफ्रीकेतील देश म्हणजे दक्षिण आफ्रीका!

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच दक्षिण आफ्रीकेतील बिगर गौरवर्णीय जनतेची मुस्कटदाबी सुरु झालेली होती. दक्षिण आफ्रीकेच्या अनेक प्रांतातील कायद्यान्वये तिथे असलेल्या भारतीय, आफ्रीकन आणि इतर बिगर गौरवर्णीयांना गोर्‍या युरोपियनांच्या तुलनेत कस्पटासमान वागणूक दिली जात असे. दक्षिण आफ्रीकेतील भारतीयांमध्ये प्रामुख्याने धनाढ्य मुस्लिमांचा आणि गरीब हिंदू मजुरांचा समावेश होता.

दक्षिण आफ्रीकेच्या नताल कॉलनीतील (आताचा क्वा-झुलू नाताल) दादा अब्दुल्ला आणि कंपनीचा वकील म्हणून इंग्लंडमधून कायद्याची पदवी घेतलेला एक भारतीय तरुण दक्षिण आफ्रीकेत आला. पीटरमॅरीझबर्ग स्टेशनवर फर्स्ट क्लासच्या डब्यातून युरोपियन प्रवाशांनी या हिंदुस्थानी तरुण वकीलाला हुसकून दिलं. या तरुण वकीलाच्या आंदोलनानंतर त्याला दुसर्‍या दिवशी फर्स्ट क्लासमध्ये प्रवेश देण्यात आला खरा, परंतु या घटनेचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला तो कायमचा! हा तरुण वकील म्हणजे मोहनदास करमचंद गांधी!

दक्षिण आफ्रीकेतील युरोपियनांचा हा वर्णद्वेष हळूहळू वाढतच होता. स्थानिक आफ्रीकन आणि भारतीय कामगारांच्या तुलनेत आपण शारिरीक बळात कमी पडतो हा आपला न्यूनगंड लपवण्यासाठी युरोपियनांनी वर्णवादाच हिरीरीने पुरस्कार केला. त्यामागे अर्थातच आर्थिक हितसंबंधही गुंतलेले होतेच! युरोपियनांनामध्ये आपसातही अनेक वाद होतेच! आफ्रीकन भाषा बोलणार्‍या युरोपियनांना इंग्लीश भाषिकांचा होत असलेला उत्कर्ष डाचत होता, परंतु शेवटी सगळे युरोपियन असल्याने स्थानिक निग्रो आफ्रीकन्स आणि भारतीयांच्या विरोधात ते एकत्रच होते.

यातूनच पुढे आला तो वंशभिन्नत्वाचा एक मतलबी सिद्धांत!

गौरवर्णीय युरोपियन आफ्रीकनांच्या या सिद्धांतानुसार, दक्षिण आफ्रीका हा एकच देश असला तरीही त्यात चार भिन्न वंशीय गट अस्तित्वात होते. गोरे, काळे, भारतीय आणि इतर वर्णीय अथवा कलर्ड! भिन्नवंशीय आणि भाषिक लोकांनी एकत्रं राहणं ही अशक्यं कोटीतली आणि अतर्क्य गोष्टं होती! भिन्नवंशीय लोकांचा विकास आणि उत्कर्षासाठी त्यांना परस्परांपासून वेगळं करण्याची प्रथम आवश्यकता आहे असं तत्वं मांडण्यात आलेलं होतं! सर्वशक्तीमान परमेशवरलाही हेच अपेक्षित असल्याने त्याने वेगवेगळ्या कातडीचे लोक निर्माण केले आहेत असा सफाईदार धार्मिक मुलामाही या सिद्धांताला देण्यात आला होता!

१९४८ मध्ये दक्षिण आफ्रीकेत झालेल्या निवडणूकीनंतर डॅनियल मॅलनच्या नेतृत्वातील रियुनायटेड नॅशनल पार्टी आणि आफ्रीकनर पार्टी यांनी एकत्रं येऊन सरकार स्थापन केलं. या दोन्ही राजकीय पक्षांची या वर्णभिन्नत्वाच्या सिद्धांतावर नितांत श्रद्धा होती! हे दोन्ही पक्ष परस्परात विलीन होऊन नॅशनल पार्टी या नावाचा नवीन पक्ष उदयास आला. या पक्षाचा पहिला पंतप्रधान म्हणून मॅलनने सूत्रं हातात घेतली!

दक्षिण आफ्रीकेतील वर्णवर्चस्वाची परिणीती एका काळ्याकुट्ट कालखंडात झाली.

अपार्थाइड!

अपार्थाइड या आफ्रीकन शब्दाचा इंग्रजीत अर्थ म्हणजे सेपरेशन अथवा भिन्नत्वं!

मॅलन सरकारने सत्तेवर येताच पूर्ण जोमाने अपार्थइड कार्यक्रम राबवण्यास सुरवात केली होती. अनेक वेगवेगळे कायदे करण्यात आले. श्रीमंत गौरेतर व्यापार्‍यांपासून ते सामान्य मजुरांपर्यंत सर्वांनाच आपालली राहती घरं सोडून सरकारप्रणित घेट्टोंमध्ये जबरद्स्तीने स्थलांतरीत व्हावं लागलं. धनाढ्यांची सर्व मालमत्ता अर्थातच गोर्‍यांनी ताब्यात घेतली!

जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये अपार्थाइड पुरेपूर झिरपेल याची सरकारी पातळीवरुन 'व्यवस्था' करण्यात येत होती! शाळा, कॉलेजेस, वाहतूकव्यवस्था इतकंच काय तर गोर्‍यांसाठी राखीव असणार्‍या समुद्रकिनार्‍यांवरही इतरांना मज्जाव करण्यात आला! उपलब्धं असलेली सर्वात उत्तम साधनसंपत्ती आणि सुविधा गोर्‍यांच्या वाट्याला येतील आणि निकृष्ट दर्जाच्या आणि टाकाऊ गोष्टी इतरांच्या वाट्याला येतील याची काळजीपूर्वक वाटणी करण्यात येत असे! स्थानिक आफ्रीकन आणि भारतीयांनी गोर्‍यांचे कामगार आणि गुलाम म्हणूनच राहवं हीच मूळ मानसिकता यातून जाहीर होत होती!

हेच धोरण खेळांतही राबवण्यात आलं!

क्रिकेट आणि रग्बी हे दक्षिण आफ्रीकेतील दोन प्रमुख खेळ! या दोन्ही खेळांत अगदी खालच्या स्तरापासून वर्णभिन्नत्वाचं धोरण पुरेपूर अवलंबण्यात आलं! गौरेतर खेळाडूंना गोर्‍यांच्या स्पर्धात भाग घेण्यास मज्जाव करण्यात आला! कितीही प्रतिभावान खेळाडू असला तरी दक्षिण आफ्रीकेच्या राष्ट्रीय संघात त्याला स्थान मिळणं हे अशक्यंच होतं! इतकंच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षिण आफ्रीकेचा संघ रग्बी आणि क्रिकेटही केवळ गोर्‍या संघांशीच खेळत असे! क्रिकेटच्या छोट्याशा जगातही दक्षिण आफ्रीकेचे सामने होत होते ते केवळ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याशीच! भारत, वेस्ट इंडीज, पाकिस्तान यांच्याशी क्रिकेट खेळण्यासही दक्षिण आफ्रीकेचा नकार होता!

१९४८-४९ साली एमसीसीचा क्रिकेट संघ दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यावर गेला होता. (तत्कालीन इंग्लंडचा अधिकृत संघ हा एमसीसीचं प्रतिनिधीत्वं करत असे). एमसीसी आणि दक्षिण आफ्रीकन क्रिकेट बोर्डाचे अर्थातच दृढ संबंध होते! बीबीसीचा कॉमेंटेटर आणि पत्रकार असलेला जॉन अरलॉटही या संघाबरोबर होता. या दौर्‍याच्या दरम्यान अरलॉटला दक्षिण आफ्रीकेतील अपार्थाइडचं भयावह रुप दृष्टीस पडलं. बाकीच्या अनेक खेळाडूंनाही हा फरक निश्चितच जाणवला असावा, परंतु त्यांच्यापैकी कोणीही फारशी फिकीर केली नाही!

गौरेतर नागरीकांना दिली जाणारी वागणूक पाहून अरलॉटच्या संवेदनशील मनात मात्रं प्रचंड संघर्ष उभा राहीला. अरलॉट हा मानवतेवर दृढ श्रद्धा असणारा आणि तत्वनिष्ठ माणूस होता. केवळ वर्णवर्चस्वावर आधारीत ही व्यवस्था त्याच्या पचनी पडणारी नव्हतीच! इंग्लंडमध्ये परतल्यावर दक्षिण आफ्रीकेतील अपार्थाइड पद्धतीचे त्याने बीबीसीवरुन जाहीर वाभाडे काढले.

"दक्षिण आफ्रीकेतील सध्याचं सरकार हे दुसर्‍या महायुद्धातील नाझी सरकार आहे असं अनुभवाअंती माझं ठाम मत झालं आहे! दक्षिण आफ्रीकेच्या स्थानिक नागरीकांच्या वर जे अनन्वित अत्याचार सुरु आहेत, त्याची तुलना दुसर्‍या महायुद्धातील ज्यूंवर झालेल्या अत्याचाराशीच तुलना होऊ शकेल! कोणत्याही कारणाविना एखाद्या स्थानिक नागरीकाची हत्या होऊ शकते आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीवर कोणत्याही स्वरुपाची कारवाई होईलच अशी खात्री निदान मी तरी देऊ शकत नाही!"

इतकंच नव्हे तर यापुढे कोणत्याही दक्षिण आफ्रीकन दौर्‍यावर आपण कॉमेंट्री करण्यासाठी जाणार नाही असंही त्याने जाहीर केलं!

याचा परिणाम म्हणून दक्षिण आफ्रीकन ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशनने बीबीसीच्या प्रसारणावरच बंदी घातली!

ब्रिटीश पंतप्रधान हॅरॉल्ड मॅकमिलन १९६० मध्ये दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यावर गेले असताना त्यांनी आफ्रीकन पार्लमेंटसमोर केलेल्या भाषणात अपार्थाइड पद्धतीवर जाहीर टीका केली होती. यूनोने १९५० पासूनच याविरोधात आवाज उठवण्यास सुरवात केली होती. अर्थात ब्रिटीश सरकारचं धोरण सावधगिरीचंच होतं. अनेक ब्रिटीश नागरीक दक्षिण आफ्रीकेत वरिष्ठ पदांवर कार्यरत होते. तिथे त्यांची बरीच मालमत्ताही होती. त्यामुळे उघडपणे संघर्ष टाळण्याकडेच सरकारचा कल होता.

१९५६-५७ च्या एमसीसीच्या दौर्‍यात अनेक खेळाडूंना दक्षिण आफ्रीकेतील गौरेतर लोकांना दिली जाणारी वागणूक पाहून प्रचंड धक्का बसला होता. स्थानिक आफ्रीकन आणि भारतीयांवर होणारे विनाकारण अत्याचार पाहून अनेक खेळाडू अस्वस्थं झाले होते. परंतु त्यापैकी अनेकांचे दक्षिण आफ्रीकेत कौटुंबिक हितसंबंध गुंतलेले असल्याने त्यावेळी गप्पं बसणंच त्यांनी पसंत केलं होतं!

१९६० मध्ये दक्षिण आफ्रीकेचा संघ इंग्लंडच्या दौर्‍यावर आला होता. या काळात इंग्लंडमध्ये आलेल्या कॅरेबियन आणि आशियाई लोकांमुळे काही काळ वांशिक दंगली वाढल्या होत्या, परंतु क्रिकेट हा सर्वांना एकत्रं आणणारा समान धागा असल्याचंही निदर्शनास आलं होतं. या पार्श्वभूमीवर दौर्‍यावर आलेल्या दक्षिण आफ्रीकन संघासमोर अपार्थाइड विरोधात निदर्शनं करण्यात आली. इतकंच नव्हे तर इंग्लीश बॅट्समन आणि धर्मगुरु डेव्हीड शेपर्डने दक्षिण आफ्रीकन संघाविरुद्ध खेळण्यास ठाम नकार दिला! (सुप्रसिद्ध अंपायर डेव्हीड शेपर्ड तो हा नव्हे)!

१९३१ मध्ये सिग्नल हिल, केप टाऊन इथे एका मुलाचा जन्म झाला. या मुलाचे पूर्वज भारतीय आणि पोर्तुगीज होते. दक्षिण आफ्रीकेतील अपार्थाइड वर्गवारीनुसार त्याच्या कुटुंबियांचा समावेश गौरेतर (केप कलर्ड) लोकांमध्ये करण्यात आला होता!

अगदी लहान वयातच या मुलाने क्रिकेटमधील आपलं प्राविण्य दाखवण्यास सुरवात केली होती. परंतु दक्षिण आफ्रीकन सरकारचा अपार्थाइड धोरणामुळे त्याला दक्षिण आफ्रीकेत फर्स्ट क्लास क्रिकेट खेळणं किंवा राष्ट्रीय संघात स्थान मिळणं शक्यंच नव्हतं! अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने दक्षिण आफ्रीकेच्या गौरेतर संघाचं प्रतिनिधीत्वं आणि नेतृत्वंही केलं होतं, परंतु हे सारे सामने अनधिकृत होते. दक्षिण आफ्रीकेतील गौरेतर संघांच्या स्पर्धांमध्ये त्याने १००.४७ च्या अ‍ॅव्हरेजने रन्स काढल्या होत्या! इतकंच नव्हे तर सलग तीन मोसमात दरवर्षी शंभरावर विकेट्सही काढल्या होत्या!

परंतु याचा काहीही उपयोग नव्हता!

दक्षिण आफ्रीकन दौर्‍यावर आलेल्या संघाचे सामने पाहण्यासाठी गौरेतर प्रेक्षकांना वेगळी व्यवस्था करण्यात आलेली होती! ही व्यवस्था म्हणजे अपार्थाइडचा खास नमुना होता! स्टेडीयमच्या लहानशा भागात हे प्रेक्षक कोंबण्यात आले होते. या जागेभोवती लोखंडाचं कुंपण घालण्यात आलं होतं! याला नाव देण्यात आलं होतं -

द केज!

पिंजरा! या पिंजर्‍यातून दक्षिण आफ्रीकेच्या संघाचे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडशी सुरु असलेले सामने पाहताना त्याच्या मनात नैराश्याची भावना दाटून येत होती. आपल्यापेक्षा निम्म्यानेही कमी प्रतिभावान असलेले खेळाडू दक्षिण आफ्रीकेचं प्रतिनिधीत्वं करताना पाहून त्याला प्रचंड यातना होत होत्या. एक क्रिकेटर म्हणून दक्षिण आफ्रीकेत आपल्याला काहीही भवितव्य नाही हे त्याच्या ध्यानात आलं होतं. त्याला आशेचा एकच किरण दिसत होता!

जॉन आरलॉट!

१९५९ साली आरलॉटला आलेल्या त्या पत्रामागे ही पार्श्वभूमी होती!

या पहिल्या पत्रानंतर एकामागून एक पत्रं आरलॉटला मिळत होती. आपल्याला इंग्लीश काऊंटी क्रिकेटमध्ये संधी मिळवून द्यावी अशी त्याने आरलॉटला विनंती केली!

आरलॉटला अर्थातच त्याच्याबद्दल सहानुभूती होती. परंतु तो अत्यंत प्रॅक्टीकल माणूस होता. एका संपूर्णतः अनोळखी आणि नवीन खेळाडूला संधी देण्यासाठी कोणतीही इंग्लीश काऊंटी सहजासहजी तयार होणार नाही याची त्याला कल्पना होती. परंतु आपल्याकडून शक्यं तितके प्रयत्न करण्याचा आरलॉटचा आधीच निश्चय झालेला होता!

त्याने प्रत्येक काऊंटी संघाच्या व्यवस्थापनाला पत्रं पाठवून चाचपणी केली, परंतु त्याला सर्वत्रं नकारच मिळाला! अर्थात इतक्यावर हार मानली तर तो आरलॉट कसला? त्याने आपला सहकारी आणि जुना मित्रं जॉन के याला गाठलं. काऊंटी संघात नाहीतर निदान लीग मॅचेसमध्ये तरी या दक्षिण आफ्रीकन खेळाडूला संधी मिळावी यासाठी तो प्रयत्नशील होता.

"दुसर्‍या एखाद्या टेस्ट मॅचेस खेळणार्‍या देशातील कोणी खेळाडून असता तर मी फारशी फिकीर केलीही नसती!" आरलॉट के ला म्हणाला, "पण हा माणूस दक्षिण आफ्रीकेतून येतो आहे! आय अ‍ॅम ऑल फॉर इट! मला यातून काहीही श्रेय मिळण्याची अपेक्षा नाही, परंतु त्याला न्याय मिळावा असं मला वाटतं!"

सुदैवाने आरलॉटला तशी संधी चालून आली. लँकेशायर लीगमधील मिडलट्न या क्लबमध्ये असलेला वेस्ट इंडीजचा फास्ट बॉलर वेस हॉल याने आयत्या वेळी माघार घेतली! मिडलट्नला हॉलची जागा भरुन काढण्यासाठी एका खेळाडूची तातडीची निकड निर्माण झाली होती! आरलॉट आणि के यांच्याकडून या दक्षिण आफ्रीकन खेळाडूविषयी कळताच मिडलट्नने त्याच्याशी काँट्रॅक्ट करण्याची तयारी दर्शवली! आरलॉटने ताबडतोब दक्षिण आफ्रीकेला पत्रं पाठवून त्या खेळाडूला इंग्लंडला येण्याची सूचना दिली!

आरलॉटचं पत्रं दक्षिण आफ्रीकेत पोहोचताच त्या खेळाडूच्या आनंदाला पारावार उरला नाही. परंतु इंग्लंडला जाण्यामध्ये मुख्य अडचण उभी राहिली ती पैशाची! स्वतःचं आणि आपल्या पत्नी आणि नवजात मुलाचं विमानाचं तिकीट काढण्याइतके पैसे त्याच्यापाशी नव्हते! मात्रं त्याच्या मित्रांनी पैशाची जमवाजमव करुन त्याची ही अडचण दूर केली!

१९६० च्या वसंत ऋतूमध्ये आपल्या पत्नी आणि मुलासह तो लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उतरला. दक्षिण आफ्रीकेतील सवयीप्रमाणे तो गौरेतर लोकांनी बाहेर पडण्यासाठी असलेला दरवाजा शोधत काही काळ विमानतळावरच घोटाळत राहीला! त्याला घेण्यासाठी विमानतळावर गेलेल्या जॉन के ने त्याला गोर्‍या लोकांपेक्षा वेगळी रांग लावण्याची आवश्यकता नाही हे सांगितल्यावर त्याला आश्चर्य वाटलं! के त्याला घेऊन लंडनमधल्या एका फ्लॅटवर आला. दार वाजवताच सुहास्य वदनाने जॉन आरलॉटने त्याचं स्वागत केलं,

"वेलकम! बेसिल डॉलीव्हिएरा! वेलकम!"

आरलॉट आणि के यांनी डॉलिव्हिअएराला आवश्यक असणार्‍या क्रिकेट सामग्रीची आणि त्याच्या कुटुंबियांची मिडलट्नमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यासाठी खूप मदत केली. अपार्थाइड व्यवस्थेतून आलेल्या डॉलिव्हिएराला इंग्लंडमध्ये गोरे लोकं प्लंबर, सुतार अशी कामं करताना तसेच कचराही उचलताना पाहून नवल वाटलं होतं. हॉटेलमध्ये गेल्यावर गोरा वेटर त्याला ऑर्डरप्रमाणे खाद्यपदार्थ आणून देत असलेला पाहूनतर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला होता. सर्वांना मिळणारी समानतेची वागणूक पाहून दक्षिण आफ्रीकेतील अपार्थाइड व्यवस्थेचा फोलपणा त्याला पदोपदी जाणवत होता.

मिडलट्न लीगमधली डॉलिव्हिएराची सुरवात थोडी अडखळतच झाली. परंतु एकदा जम बसल्यावर मात्रं त्याचा खेळ चांगलाच बहरला. मिडलट्नच्या जोडीला कॅव्हेलियर्स संघातूनही तो खेळला. हे सामने टी व्ही वर प्रक्षेपित झाल्यामुळे तर त्याला अधिकच प्रसिद्धी मिळाली. काही प्रसिद्ध खेळाडूंच्या जोडीने त्याने अनेक परदेशी दौरेही केले! एक उत्तम क्रिकेटर म्हणून त्याचं नाव झालं होतं. सुरवातीला त्याला नकार देणार्‍या अनेक काऊंटी त्याच्याशी प्रोफेशनल म्हणून करार करण्यास उत्सुक होत्या!

१९६४ च्या मोसमात वूस्टरशायरकडून डॉलिव्हिएअराने काऊंटीमध्ये पदार्पण केलं. पदार्पणाच्या मॅचमध्येच त्याने आकर्षक फटकेबाजी करत शतक ठोकलं होतं! पुढच्या दोन वर्षांत बॅटींग आणि बोलिंगमध्ये सातत्यं राखल्यामुळे १९६६ मध्ये एमसीसीच्या संघात त्याची आपसूकच निवड झाली होती! दरम्यान आपलं दक्षिण आफ्रीकेचं नागरिकत्वं सोडूण त्याने ब्रिटीश नागरिकत्वं मिळवलं होतं!

दरम्यान अपार्थाइड व्यवस्थेला दक्षिण आफ्रीकेबाहेर असलेला विरोध विविध खेळांच्या संघटनांमधून दिसू लागला होता. १९६१ मध्ये फिफा या फुटबॉल संघटनेने दक्षिण आफ्रीकेच्या फुटबॉल संघटनेचं सदस्यत्वं स्थगित केलं होतं. १९६३ मध्ये काही काळ पुन्हा सदस्यत्वानंतर १९६४ मध्ये पुन्हा दक्षिण आफ्रीकेची हकालपट्टीच झाली! १९६४ मध्येच आंतरराष्ट्रीय तलवारबाजीतून दक्षिण आफ्रीकेची हकालपट्टी झाली होती! १९६४ मध्येच आंतरराष्ट्रीय ऑलिंपीक संघटनेने दक्षिण आफ्रीकेला अपार्थाइड व्यवस्था मोडीत निघेपर्यंत ऑलिंपीकमध्ये भाग घेण्यास मनाई केली!

१९६६ मध्ये न्यूझीलंडचा रग्बी संघ दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यावर येणार होता. दक्षिण आफ्रीकन सरकारने न्यूझीलंडला माओरी खेळाडूंना वगळून केवळ गोर्‍या खेळाडूंचीच संघात निवड करण्याची सूचना दिली! याचा परिणाम असा झाला की न्यूझीलंडच्या रग्बी फुटबॉल संघटनेने हा दौराच रद्दं केला! दक्षिण आफ्रीकेतील गोर्‍या युरोपियनांमध्ये रग्बीचा खेळ बराच लोकप्रिय असल्याने त्यांच्यात अर्थातच नाराजी पसरली.

एमसीसीचा क्रिकेट संघ नेमका यावेळी न्यूझीलंडच्या दौर्‍यावर होता. १९४८-४९ मध्ये दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यावर असताना जॉन आरलॉटबरोबरच बिली ग्रिफीथनेही अपार्थाइडचे दुष्परिणाम पाहिलेले होते. परंतु त्यावेळी ग्रिफीथने त्याबद्दल काहीही बोलण्याचं टाळलं होतं. न्यूझीलंडच्या रग्बी संघाचा दौरा रद्दं झाल्याविषयी ग्रिफीथकडे विचारणा केल्यावर एमसीसीचा सेक्रेटरी असलेल्या ग्रिफीथने अशा परिस्थितीत एमसीसीही दौरा रद्दंच करेल असं जाहीरपणे सांगितलं! मात्रं एमसीसीचा वरचष्मा असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीवर कोणताही दबाव आणण्यास एमसीसीने स्पष्टं नकार दिला! परिणामी भारत, पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज यांच्या विरोधानंतरही दक्षिण आफ्रिकेबरोबर क्रिकेट खेळत होते!

१९६६ च्या इंग्लिश मोसमात वेस्ट इंडीजविरुद्ध डॉलिव्हिएअराने टेस्टमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच इनिंगमध्ये २७ रन्स काढल्यावर त्याचा आणि जिम पार्क्सचा गोंधळ झाल्यामुळे तो रन आऊट झाला! पदार्पणाच्या या पहिल्याच सिरीजमध्ये ३ अर्धशतकं काढून त्याने आपली छाप सोडली होती. पाठोपाठ १९६७ मध्ये दौर्‍यावर आलेल्या भारतीय संघाविरुद्ध त्याने आपलं पहिलं कसोटी शतकही झळकावलं! १९६७ मध्येच पाकिस्तानविरुद्धच्या सिरीजमध्येही तो यशस्वी झाला होता!

डॉलिव्हिएराच्या पदार्पणापासूनच १९६८-६९ मधला एमसीसीचा दक्षिण आफ्रीकेचा दौरा हा त्याच्या करीयरमधला महत्वाचा दौरा ठरणार याची त्याला आणि त्याच्या समर्थकांना कल्पना होती. अर्थात डॉलिव्हिएराची इंग्लिश संघात निवड झाली तरब्रिटन आणि दक्षिण आफ्रीकेतील क्रिकेट आणि राजकीय संबंध ताणले जातील याची अनेकांना कल्पना आली होती. १९६६ मध्ये दक्षिण आफ्रीकेत कोच म्हणून काम करण्यास गेलेला असताना खुद्द डॉलिव्हिएरालाही अनेकदा हा प्रश्न विचारण्यात आला होता!

दक्षिण आफ्रीकेतील लोकांमध्ये डॉलिव्हिएराची एमसीसीच्या संघात निवड होईल की नाही याबद्दल शंका होती. त्याची निवड झाली तर दक्षिण आफ्रीकन सरकार त्याला खेळू देईल का हा महत्वाचा प्रश्न होता. डॉलिव्हिएराने इंग्लिश संघातून दक्षिण आफ्रीकेविरुद्ध खेळणं म्हणजे त्याने अपार्थाइड व्यवस्था मान्यं केल्यासारखंच होईल असं काही जणांचं मत होतं!

स्वतः डॉलिव्हिएरा मात्रं खेळण्यास उत्सुक होता!
दक्षिण आफ्रीकेतील गौरेतर लोकांसाठी त्याच्या खेळण्याचं काय मोल आहे हे त्यालाच माहीत होतं!

आणि दक्षिण आफ्रीकेतील राज्यकर्त्यांचीही डॉलिव्हिएरावर करडी नजर होती!

१९६६ साली पदार्पण केल्यापासूनच दक्षिण आफ्रीकन क्रिकेट बोर्डाचे अधिकारी आणि खुद्दं पंतप्रधान बाल्थझर व्होर्स्टर याच्या कामगिरीवर बारीक लक्षं ठेवून होते!

१९६७ मध्ये ग्रिफीथ दक्षिण आफ्रीकन क्रिकेटच्या अधिकार्‍यांना भेटण्यासाठी रवाना झाला होता. एमसीसीचा १९६८-६९ चा दौरा कोणत्याही अडचणीविना पार पाडण्याची एमसीसीची इच्छा होती. याच हेतूने ग्रिफीथ दक्षिण आफ्रीकेत आला होता. प्रत्यक्षात या बैठकीतून काहीच निष्पन्न झालं नाही.

१९६७-६८ च्या वेस्ट इंडीजच्या दौर्‍यावर डॉलिव्हिएराची निवड झाल्यावर दक्षिण आफ्रीकेत अस्वस्थंता पसरली. या दौर्‍यावर त्याची निवड होणं म्हणजे दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यासाठी त्याची निवड होणं हे जवळपास नक्कीच झाल्यासारखं झालं होतं. परंतु हा दौरा मात्रं त्याला फारच सपक गेला. बॅट्समन आणि बोलर म्हणून तो या दौर्‍यावर अयशस्वी ठरला असला तरी त्याने वेस्ट इंडीजमधील अनेकांच्या गाठीभेटी घेऊन आपल्याला भरपूर पाठीराखे मात्रं मिळवले!

१९६७ च्या फेब्रुवारीत दक्षिण आफ्रीकन सरकारचा अंतर्गत मंत्री पीटर ली रॉक्स याने अपार्थाइड व्यवस्थेबद्द्ल सरकारचं धोरण स्पष्टं केलं.

"दुसर्‍या कोणत्याही देशांतील गोर्‍या खेळाडूंचा समावेश असलेल्या संघालाच आमच्या गोर्‍या खेळाडूंच्या संघाविरुद्ध दक्षिण आफ्रीकेत खेळण्याची परवानगी आहे! इतर कोणालाही नाही! आमचं हे धोरण दक्षिण आफ्रीकेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही सर्वांच्या परिचयाचं आहे!"

ली रॉक्सच्या या वक्तव्याविरुद्धं ब्रिटनमध्ये काहूर उठलं! एमसीसीने खेळाडूंची निवड ही केवळ गुणवत्तेच्या आधारावरच केली जाईल आणि दक्षिण आफ्रीकेतून कोणताही हस्तंक्षेप करण्यात आल्यास दौरा रद्दं करण्यात येईल असं ब्रिटनच्या सरकारला सांगितलं! क्रीडामंत्री डेनिस हॉवेलने एकाही खेळाडूच्या समावेशाबद्दल विरोध झाल्यास एमसीसीने दौरा रद्दं करावा अशी सूचना केली!

ली रॉक्सच्या या वक्तव्यावर झालेल्या गदारोळानंतर पंतप्रधान व्होर्स्टरची परिस्थिती कात्रीत सापडल्यासारखी झाली होती. आपण हे वक्तंव्य केलंच नाही असं त्याने ली रॉक्सला जाहीर करण्यास भाग पाडलं. दक्षिण आफ्रीकेत गौरेतर खेळाडूंना खेळण्यास बंदी असली तरी दक्षिण आफ्रीकेचा गोर्‍या आणि गौरेतर खेळाडूंचा एकत्रं संघ बाहेरच्या देशात पाठवण्याची त्याने तयारी दर्शवली! अर्थात यामागे १९६८ च्या ऑलिंपीकमध्ये आपला संघ पाठवण्याची संधी मिळावी असाच व्होर्स्टरचा हेतू होता. न्यूझीलंडच्या रग्बी संघाप्रमाणे इतर कोणीही आपला दौरा रद्दं करु नये असाही त्यामागे प्रयत्नं होता.

एमसीसीच्या अधिकार्‍यांनी मात्रं व्होर्स्टर सरकारकडून कोणत्याही खेळाडूच्या निवडीबाबत दक्षिण आफ्रीकन सरकारकडून कोणत्याही प्रकारची आडकाठी येणार नाही याची पक्की खात्री करुन घेण्याचा निर्णय घेतला. १९६८ च्या जानेवारीत बिली ग्रिफीथने दक्षिण आफ्रीकन क्रिकेट संघटनेच्या अधिकार्‍यांना या संदर्भात पत्रं पाठवलं. संघ निवडीबद्दल जर कोणताही हस्तंक्षेप करण्याचा प्रयत्नं झाला तर दौरा रद्दं करण्यात येईल असं त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं.

गोर्‍या आणि गौरेतर खेळाडूंचा एकत्रं संघ पाठवण्याची कल्पना व्होर्स्टरच्या पाठिराख्यांच्या फारशी पचनी पडण्यासारखी नव्हती. परंतु दक्षिण आफ्रीकेवर आंतरराष्ट्रीय बहिष्कार टाळण्यासाठी दुसरा इलाज नाही याची व्होर्स्टरला कल्पना होती. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आपण आपल्या पाठीराख्यांचा रोष पत्करु शकतो हे त्याला माहीत होतं. मात्रं जास्तं ताणण्यात काही अर्थ नाही हे तो ओळखून होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि विशेषतः इंग्लंडमध्ये डॉलिव्हिएराचं दक्षिण आफ्रीकेत स्वागतच होईल असं चित्रं निर्माण करण्यात व्होर्स्टर यशस्वी झाला होता, पण काहीही झालं तरी डॉलिव्हिएराला दक्षिण आफ्रीकेत खेळू देण्यास व्होर्स्टरचा ठाम विरोध होता!

ग्रिफीथच्या पत्राला कोणतंही उत्तर न आल्याने एमसीसीच्या अधिकार्‍यांनी माजी ब्रिटीश पंतप्रधान अ‍ॅलेक् डग्लस-होम यांना यात लक्षं घालण्याची विनंती केली. डग्लस-होम हे नुकतेच एमसीसीचे अध्यक्ष म्हणून निवृत्त झाले होते. डग्लस-होम लवकरच दक्षिण आफ्रीका आणि र्‍होडेशिया (झिंबाब्वे) च्या दौर्‍यावर जाणार होते.

डग्लस-होमनी दक्षिण आफ्रीकेत पंतप्रधान व्होर्स्टरची भेट घेऊन चर्चा केली. व्होर्स्टरने त्याला स्पष्टपणे काहीच उत्तर दिलं नाही! इंग्लंडला परतल्यावर डग्लस-होमनी सर्व काही ठीक असल्याची एमसीसीच्या अधिकार्‍यांना छातीठोकपणे सांगितलं! मात्रं व्होर्स्टरचा नेमका हेतू काय आहे हे गुलदस्त्यातच राहिलं!

दक्षिण आफ्रीकन क्रिकेट संघटनेने व्होर्स्टरच्या सल्ल्यानुसार ग्रिफीथच्या पत्राला लांबलचक उत्तर तयार केलं. अर्थात ग्रिफीथने विचारलेल्या प्रश्नाचं नेमकं उत्तर यात दिलेलंच नव्हतं! दक्षिण आफ्रीकेचा माजी कर्णधार जॅक चिथॅम याने हे पत्रं एमसीसीचा सेक्रेटरी असलेल्या गबी अ‍ॅलनकडे दिलं. अर्थात एमसीसीचं डग्लस-होमच्या सल्ल्याने समाधान झालं होतं त्यामुळे अ‍ॅलनने बाकी सदस्यांपासून हे पत्रं लपवून ठेवण्याचा निर्णय घेतला. हे पत्रं फुटून वृत्तपत्रांपर्यंत जाण्याची त्याला भीती वाटत होती!

गबी अ‍ॅलनच्या या निर्णयाचा परिणाम असा झाला की एमसीसीला उत्तराची जरुर नाही असा चिथॅमने सोईस्कर अर्थ काढला. डॉलिव्हिएराबद्दल आपला अंतस्थ हेतू आणखीन काही काळ लपवून ठेवण्यात व्होर्स्टर यशस्वी झाला!

वेस्ट इंडीजच्या दौर्‍यावरील अपयश डॉलिव्हिएराला डाचत होतं. १९६८ च्या मोसमाच्या सुरवातीपासूनच हे अपयश धुवून काढण्याच्या इराद्यानेच तो खेळत होता. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रीकेतील राजकीय कसरतींपासून शक्यं तितक्या आलिप्तपणे तो सातत्याने रन्स काढत होता. जूनमध्ये अ‍ॅशेस सिरीजमधल्या पहिल्याच टेस्टमध्ये त्याची इंग्लंडच्या संघात निवड झाली. इंग्लंडच्या दुसर्‍या इनिंगमध्ये डॉलिव्हिएराने नाबाद ८७ रन्स काढल्या खर्‍या पण तरीही ऑस्ट्रेलियाने १५९ रन्सनी मॅच खिशात घातली!

दरम्यान डॉलिव्हिएरावर बारीक लक्षं ठेवून असलेल्या व्होर्स्टर आणि दक्षिण आफ्री़कन क्रिकेटच्या अधिकार्‍यांनी दुहेरी योजनेस आकार दिला होता. या योजनेचा एक भाग होता तो म्हणजे डॉलिव्हिएराला भरभक्कम रकमेची लाच देऊन त्यानेच आपण दक्षिण आफ्रीकन दौर्‍यावर येण्यास असमर्थ असल्याचं जाहीर करणं! दुसरा भाग म्हणजे एमसीसीच्या अधिकार्‍यांवर डॉलिव्हिएराची निवड न करण्याचं दडपण आणणं!

१९६८ च्या दक्षिण आफ्रीकन क्रिकेटच्या मोसमात डॉलिव्हिएरा दक्षिण आफ्रीकेत न परतल्यामुळे त्याला लाच देऊन फितवण्याचा प्रयत्नं करण्यास कोणतीही संधीच मिळाली नाही!

बिली ग्रिफीथच्या विनंतीवरुन लॉर्ड कॉबहॅम (चार्ल्स लेटलटन) दक्षिण आफ्रीकन क्रिकेट संघटनेचा अधिकारी असलेल्या आर्थर कॉय याच्या भेटीसाठी दक्षिण आफ्रीकेत आला होता. कॉबहॅम एमसीसीचा माजी अध्यक्षं होता. डॉलिव्हिएराच्या वूस्टरशायर काऊंटीशीही कॉबहॅमचे अत्यंत जवळचे संबंध होते. कॉबहॅमने कॉयची चर्चा करताना एमसीसीचा दौरा सुरळीत होण्याची इच्छा प्रगट केली होती, परंतु डॉलिव्हिएराचा समावेश झाल्यास ते कठीण असल्याची त्याला कल्पना होती. व्होर्स्टरशी झालेल्या भेटीत व्होर्स्टरने डॉलिव्हिएराची निवड झाल्यास दक्षिण आफ्रीकन सरकार हा दौरा रद्दं करेल असं त्याला स्पष्टंपणे सांगून टाकलं!

इंग्लंडला परतल्यावर कॉबहॅमने एमसीसीच्या एका सदस्याला पत्राद्वारे या सर्व घटना सविस्तर कळवल्या. त्या सदस्याने हे पत्रं ग्रिफीथकडे पोहोचवलं! ग्रिफीथने हे पत्रं गबी अ‍ॅलन आणि एमसीसीचा अध्यक्षं असलेल्या आर्थर गिलीगनला दाखवलं. परंतु एमसीसीच्या इतर सदस्यांपासून हा सर्व मामला लपवून ठेवण्यात आला! क्रीडामंत्री डेनिस हॉवेललाही काहीही कल्पना देण्यात आली नाही!

गबी अ‍ॅलनने नंतर आपल्या या निर्णयाच्या समर्थनार्थ डग्लस-होम या राजकीय मुत्सद्द्याचा सल्ला जास्तं महत्वाचा होता असा दावा केला. चार सिलेक्टर्सपैकी दोघेजण एमसीसी सदस्य असल्याने संघ निवडताना या निर्णयाचं सावट त्यांच्यावर राहील या हेतूने इतर सदस्यांना कोणतीही कल्पना देण्यात आली नाही असं त्याने आपल्या आत्मचरित्रात नमूद केलं आहे. परंतु अ‍ॅलनचा हा दावा अर्थातच अर्थहीन होता, कॉबहॅम नुकताच दक्षिण आफ्रीकेतून परतला होता. त्याच्याजवळील बातमी अधिक खात्रीशीर आणि ताजी होती. आणि एमसीसीच्या सर्व सदस्यांना ही बातमी कळल्यावर संघ निवडीचा प्रश्नंच उद्भवला नसता कारण दौरा रद्दंच होण्याची शक्यता होती!

एमसीसीने डग्लस-होमच्या सल्ल्यानुसारच आपली तयारी सुरू ठेवली होती. दक्षिण आफ्रीकन सरकार बेसिल डॉलिव्हिएराला खेळू देईल की नाही याबद्दल साशंकता होती आणि त्याबद्दल आताच कोणतीही चौकशी न करणंच श्रेयस्कर अशी एमसीसीची जाहीर भूमिका होती! अर्थात फार थोड्या सदस्यांना वस्तुस्थितीची कल्पना होती! अ‍ॅलन - ग्रिफीथ यांनी घातलेल्या या घोळामुळे उघडपणे डॉलिव्हिएराला खेळण्यास नकार देण्याचं टाळण्यात व्होर्स्टर यशस्वी झाला होता!

मँचेस्टरच्या पहिल्या टेस्टमध्ये डॉलिव्हिएरा खेळत असताना कॉय आणि इतरही काही दक्षिण आफ्रीकन स्टेडीयममध्ये हजर होते. डॉलिव्हिएराने ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियनांचा मुकाबला केला होता ते पाहता दुसर्‍या अ‍ॅशेस टेस्टसाठी त्याची इंग्लंड संघात निवड होणार याबद्द्ल कोणालाही शंका राहीली नव्हती! मात्रं काही वार्ताहरांनी डॉलिव्हिएरा बोलर म्हणून अयशस्वी ठरल्याबद्दल त्याच्यावर टीका केली होती!

दुसरी टेस्ट लॉर्ड्सवर होती. मॅचच्या पूर्वसंध्येला ग्रिफीथने डॉलिव्हिएराला गाठलं.

"डॉली, एमसीसीचा दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍याबद्दल जे काही सुरु आहे ते तुझ्या कानावर आलंच असेल!"

"येस!" डॉलिव्हिएरा उत्तरला.

"हा दौरा वाचवण्याचा एकच मार्ग आहे असं मला वाटतं! आपण इंग्लंडकडून खेळण्यासाठी उपलब्धं नसून भविष्यात इंग्लंडऐवजी दक्षिण आफ्रीकेचं प्रतिनिधीत्वं करण्यास आपल्याला आवडेल असं तू जाहीर कर!"

डॉलिव्हिएराला आश्चर्याचा आणि संतापाचा धक्का बसला.

"माझी बांधीलकी इंग्लंड संघाशी आहे!" डॉलिव्हिएरा संतापाने उद्गारला, "एक इंग्लीश खेळाडू म्हणून मला स्वीकारा अथवा नकार द्या!"

दुसर्‍या दिवशी प्रसिद्ध क्रिकेट लेखक आणि समिक्षक अर्नेस्ट विल्यम स्वॅन्टन यानेही डॉलिव्हिएराची गाठ घेऊन जवळपास तशीच सूचना केली! डॉलिव्हिएराने त्यालाही अर्थातच ठाम नकार दिला. स्वॅन्टन गबी अ‍ॅलन आणि इंग्लंडचा कॅप्टन कॉलिन कौड्रीचा जवळचा मित्रं होता. ग्रिफीथ आणि स्वॅन्टन दोघांचाही अपार्थाइडला ठाम विरोध होता. स्वॅन्टनने १९६४-६५ च्या दक्षिण आफ्रीकन दौर्‍याच्या वार्तांकनाला साफ नकार दिला होता. परंतु त्याचबरोबर एमसीसीचा दौरा सुरळीत व्हावा अशी दोघांचीही इच्छा होती.

ही योजना बहुतेक कॉय किंवा मँचेस्टर टेस्टला हजर असणार्‍या आणि खाजगी क्रिकेट दौरे आयोजीत करण्यार्‍या विल्फ्रेड आयझॅक किंवा दक्षिण आफ्रीकनांपैकी कोणाच्या तरी डोक्यातून बाहेर पडली असावी असा अंदाज बांधला जातो. या योजनेचे धागेदोरे दक्षिण आफ्रीकन क्रिकेट संघटनेपर्यंत पोहोचल्याचेही पुरावे आहेत. ग्रिफीथ आणि स्वॅन्टन यांचा हेतू प्रामाणिक असला तरी दक्षिण आफ्रीकनांच्या सापळ्यात ते अनिच्छेने अडकले असण्याची शक्यता जास्तं आहे!

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्कराव्या लागलेल्या इंग्लंडच्या संघात पाच बदल करण्यात आले. या पाचपैकी एक होता बेसिल डॉलिव्हिएरा! कॉलिन कौड्रीने डॉलिव्हिएराला बारावा खेळाडू म्हणून राखीव ठेवण्यात आल्याची सूचना दिली! डॉलिव्हिएराऐवजी फास्ट बॉलर असलेल्या बॅरी नाईटची निवड करण्यात आली! लॉर्डसच्या मैदानावर डॉलिव्हिएरासारख्या स्विंग बॉलरपेक्षा तेज सीमरची आवश्यकता असल्याचं कौड्रीचं मत होतं!

अर्थात या निर्णयावर टीकेची झोड उठलीच!

सामान्य ब्रिटीश जनतेने केवळ क्रिकेटच्या दृष्टीकोनातूनच विचार करुन डॉलिव्हिएराला वगळण्यात आल्यावर विश्वास ठेवण्यास साफ नकार दिला. यामागे दक्षिण आफ्रीकेचा दबाव असल्याचीच सर्वांची भावना झाली होती. कॉय आणि इतर दक्षिण आफ्रीकन क्रिकेट संघटनेचे अधिकारी लॉर्ड्सच्या टेस्टला हजर राहणार होते! त्यांच्यासमोर मुद्दाम डॉलिव्हिएराला खेळवणं हे त्यांना खिजवण्यासारखंच होईल असं एमसीसीच्या अधिकार्‍यांचं मत होतं का?

संघातून वगळल्यामुळे नाराज झालेल्या डॉलिव्हिएरा लॉर्ड्स टेस्टनंतर वूस्टरशायरच्या संघात परतला. या सगळ्याचा त्याच्या खेळावर आणि मानसिक स्थितीवर खूपच परिणाम झाला होता. त्याचा फॉर्म पार ढेपाळला! त्या संपूर्ण मोसमातील फर्स्ट क्लासच्या सामन्यात मिळून त्याने केवळ २०५ रन्स काढल्या होत्या! त्याची बोलिंग मात्रं पूर्वीइतकीच प्रभावी होती!

१९६८ च्या जुलैमध्ये एमसीसीने इंग्लंडमधील ३० खेळाडूंना पत्रं पाठवून दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यासाठी उपलब्धतेबद्द्ल चौकशी केली होती! या ३० खेळाडूंमध्ये डॉलिव्हिएराचा समावेश नव्हता! या मागचं कारण दक्षिण आफ्रीकेचा दबाव हेच असावं हे उघड होतं. एमसीसीच्या सिलेक्टर्सना डॉलिव्हिएराची निवड केल्यास व्होर्स्टर सरकार दौर्‍याला परवानगी देणार नाही याची पूर्वकल्पना होती!

दरम्यान या कालावधीतच टिनी ऑस्थिझेन या कॅरेरास या प्रसिद्ध तंबाखू कंपनीच्या डायरेक्टरने डॉलिव्हिएराची भेट घेतली. रॉथमन्स या सुप्रसिद्ध कंपनीबरोबर कॅरेरास रेम्ब्रँड्ट टोबॅको कॉर्पोरेशन या दक्षिण आफ्रीकन कंपनीत भागीदार होती. दक्षिण आफ्रीकेत एका स्पोर्ट्स फाऊंडेशनची रेम्ब्रँड्टने स्थापना केली होती.

आपण रॉथमन्सचे प्रतिनिधी असल्याचं ऑस्थिझेनने डॉलिव्हिएराला सांगितलं. वूस्टरशायरकडून खेळण्यापूर्वी डॉलिविएरा खेळत असलेले काही सामने रॉथमन्सने स्पॉन्सर केले होते. ऑस्थिझेनने दक्षिण आफ्रीकन स्पोर्ट्स फाऊंडेशनसाठी कोच म्हणून काम करण्यासाठी ४००० पौंडाची ऑफर देऊ केली! एका व्यावसायिक क्रिकेटरसाठी ही रक्कम त्याकाळी भरपूर मोठी होती!

मात्रं एक अट होती!

१९६८ चा इंग्लिश मोसम संपताच डॉलिव्हिएराला दक्षिण आफ्रीकेत जाण्यासाठी इंग्लंड सोडावं लागणार होतं! दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यासाठी संघ निवडला जाण्यापूर्वीच आपण या दौर्‍यासाठी उपलब्धं नाही असं त्याला जाहीर करावं लागणार होतं!

डॉलिव्हिएराने याला अर्थातच नकार दिला. परंतु ऑस्थिझेनने त्याचा सतत पाठपुरावा चालू ठेवला होता! दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यासाठी त्याची निवड होण्याची कितपत शक्यता आहे हे देखील शोधून काढण्याची ऑस्थिझेनची तयारी होती! एकवार डॉलिव्हिएराला या ऑफरचा मोह झालाही होता! परंतु ही ऑफर स्वीकारल्यास आपल्याविषयी बर्‍याच जणांचं प्रतिकूल मत होईल आणि आपण त्यांच्या टीकेचे धनी होऊ याची त्याला कल्पना होती! त्याने ऑस्थिझेनला काहीच कळवण्यास नकार दिला.

अखेर ऑस्थिझेनने डॉलिव्हिएरा एमसीसीच्या संघातून दक्षिण आफ्रीकेला येणं हे व्होर्स्टरला मान्यं होणं शक्यं नाही असं डॉलिव्हिएराला सांगितलं! तो डॉलिव्हिएराच्या खनपटीसच बसला होता. डॉलिव्हिएराने अखेर आपला एजंट रेग हेटर याला हा सगळा प्रकार सांगितला. हेटरने दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यासाठी संघाची निवड होईपर्यंत थांबण्याचा त्याला सल्ला दिला! डॉलिव्हिएराच्या निवडीची शक्यता बरीच असल्याची सिलेक्टर्सच्या जवळच्या एका माणसाकडून हेटरला आधीच बातमी मिळाली होती! डॉलिव्हिएराने त्याप्रमाणे आपला निर्णय ऑस्थिझेनला कळवला!

ऑगस्टच्या मध्यावर वॉरीकशायरविरुद्ध ८९ रन्सच्या आक्रमक इनिंगबरोबरच डॉलिव्हिएरा पुन्हा फॉर्ममध्ये आला. त्याचवेळी हॅम्पशायरविरुद्ध खेळताना त्याने ६८ रन्समध्ये ११ विकेट्स घेतल्या! इंग्लंडच्या सिलेक्टर्सपुढे आता डॉलिव्हिएराला फॉर्मवरुन वगळण्याचीही सबब उरली नव्हती!

अ‍ॅशेस सिरीजमधली शेवटची मॅच ओव्हलवर होती. काऊंटी सामन्यात इथे बॅटींग करतानाच सीम ऐवजी स्विंग बॉलरच या विकेटवर उपयुक्त ठरेल याची कौड्रीला कल्पना आली होती. त्याने त्याप्रमाणे सिलेक्टर्सना सूचना दिली होती. नाईट आणि टॉम कार्टराईट हे दोघंही उपलब्धं नव्हते! उरला एकच.. डॉलिव्हिएरा!

या टेस्टच्या आदल्या दिवसापर्यंत ऑस्थिझेनने डॉलिव्हिएराचा पाठपुरावा सुरूच ठेवला होता. डॉलिव्हेएराला देण्यात आलेली ऑफर वाढवून देण्याचीही त्याने तयारी दर्शवली होती! मात्रं ओव्हलच्या टेस्टमध्ये डॉलिव्हिएराची निवड झाल्यावर ऑस्थिझेनशी त्याचा कधीही संपर्क झाला नाही! लवकरच ऑस्थिझेनची लंडन ऑफीसमधून बदली करण्यात आली!

ऑस्थिझेनने डॉलिव्हिएराला दिलेली ही ऑफर म्हणजे व्होर्स्टर आणि कॉय यांनी लाच देऊन त्याला दक्षिण आफ्रीकेत खेळण्यापासून परावृत्त करण्यासाठी केलेला प्रयत्नं होता हे वेगळं सांगायला हवंच का?

ओव्हल टेस्टच्या दिवशी सकाळीच बॅट्समन रॉजर प्रिडॉक्स प्लूरसीमुळे खेळण्यास असमर्थ ठरला! कौड्रीने आपल्या बॅटींग ऑर्डरची पुनर्रचना केली आणि डॉलिव्हिएराला बॅट्समन म्हणून खेळवण्याचा निर्णाय घेतला! आता सर्व काही डॉलिव्हिएराच्या हातात... खरंतर बॅटवर होतं! डॉलिव्हिएरा खेळायला आला तेव्हा त्याच्यावरील दडपणाची कल्पनाही करणं अशक्यं आहे!

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा डॉलिव्हिएरा २३ वर नॉट आऊट होता! अत्यंत आकर्षकपणे हूक आणि ड्राईव्ह करत त्याने या २३ रन्स काढल्या होत्या.

दुसर्‍या दिवशी सकाळी त्याची सुरवात काहीशी चाचपडतच झाली! तो ३१ वर असताना ऑस्ट्रेलियन विकेट्कीपर बॅरी जार्मनने त्याचा अगदी सोपा कॅच सोडला! अंपायर चार्ली इलियट आणि त्याच्या बरोबर खेळणारा जॉन एड्रीच यांच्या प्रोत्साहनामुळे डॉलिव्हिएराचा आत्मविश्वास वाढला! त्याचं फूटवर्क आणि इतर हालचाली हळूहळू अचूक होत गेल्या! १२१ रन्सच्या पार्टनरशीपनंतर एड्रीच आऊट झाला. त्यानंतर अ‍ॅलन नॉटच्या साथीने डॉलिव्हिएराने ६२ रन्स जोडल्या! १५८ रन्स काढून तो आऊट झाला तेव्हा इंग्लंड ४८९ वर पोहोचलं होतं!

डॉलिव्हिएराने अर्धशतक पूर्ण केल्यावर त्याचं अभिनंदन करतना एड्रीच हळूच म्हणाला,
"वेल प्लेड डॉली! गॉड, तू बर्‍याच जणांना अडचणीत आणणार आहेस आता!"

डॉलिव्हिएरा आऊट होऊन परत येताना ओव्हलवर हजर असलेल्या एकूण एक प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला! इतकंच नव्हे तर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियनांनीही - विशेषत: जॉनी ग्लिसन आणि बॅरी जार्मन यांनी - त्याचं अभिनंदन केलं!

(बॅरी जार्मनने ३१ वर डॉलिव्हिएराचा कॅच मुद्दाम सोडला असाही एक प्रवाद आहे)!

ऑस्ट्रेलियाची बॉलींग फारशी धारदार नसली आणि तुलनेने बॅटींग कंडीशन्स अगदीच साध्या असल्या आणि त्याला अनेक जीवदानं लाभली असली, तरीही ज्या दडपणाचं ओझं घेऊन डॉलिव्हिएरा खेळला होता, त्याचा विचार करता ही एक नि:संशय उत्कृष्ट इनिंग्ज होती यात काही वाद नाही!

"माय गॉड! आता बेसिलला वगळणं सिलेक्टर्सना शक्यंच नाही!" कौड्री उद्गारला!

पीटर मे ला मात्रं तसं वाटत नव्हतं! त्याच्या मते डॉलिव्हिएरा नशिबवान ठरला होता! दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यावर त्याला नेण्यासारखं त्याने काहीही केलं नव्हतं!

कौड्रीने डॉलिव्हिएराला गाठून दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यावर येण्याबद्दल विचारणा केली. डॉलिव्हिएराने अर्थातच होकार दिला! खुद्दं कौड्रीनेच विचारल्यावर आपली निवड निश्चितच होणार याबद्दल डॉलिव्हिएराला कोणतीच शंका राहीली नाही!

डॉलिव्हिएरा म्हणतो,
"मला कोणत्याही परिस्थितीत खेळायचं होतं! गोर्‍या खेळाडूंच्या तुलनेत इतर खेळाडू कोणत्याही अर्थाने कमी नाहीत हे मला सिद्धं करुन दाखवायचं होतं!"

इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन ओव्हल टेस्ट जिंकली! डॉलिव्हिएराने महत्वाच्या वेळी बॅरी जार्मनची विकेट घेत त्याची जॉन इव्हॅरॅरीटीबरोबरची पार्टनरशीप संपुष्टात आणल्यावर डेरेक अंडरवूडने ऑस्ट्रेलियाचा पार निकाल लावून टाक्ला होता!

सरे क्रिकेट काऊंटीचा सेक्रेटरी जेफ्री हॉवर्डला ऑस्थिझेनचा फोन आला. तो बिली ग्रिफीथला गाठण्याचा अयशस्वी प्रयत्नं करत होता. त्याने हॉवर्डला ग्रिफीथला देण्यासाठी एक मेसेज दिला,

"आज शतक झळकवणार्‍या बॅट्समनची निवड झाली तर दक्षिण आफ्रीकेचा दौरा रद्दं झालाच असं समजा!"

ओव्हल टेस्टच्या शेवटच्या दिवशीच दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यासाठी सिलेक्शन कमिटीची मिटींग सुरु झाली. चार सिलेक्टर्स - डग इन्सोल, पीटर मे, अ‍ॅलेक बेडसर आणि डॉन केन्यन (वूस्टरशायरचा कॅप्टन), कॉलीन कौड्री, गबी अ‍ॅलन, बिली ग्रिफीथ, आर्थर गिलिगन, डोनाल्ड कार आणि मॉरीस अ‍ॅलॉम इतके सर्वजण या मिटींगला हजर होते. या सर्वांमध्ये एकजण दक्षिण आफ्रीकन क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून व्होर्स्टरच्या संपर्कात असावा असा संशय घेण्यास वाव आहे, कारण या मिटींगमधला शब्दन् शब्दं व्होर्स्टरला कळला होता! उपस्थित असलेल्यांपैकी अ‍ॅलन, ग्रिफीथ आणि गिलिगन यांना डॉलिव्हिएराच्या निवडीचे काय परिणाम होतील याची कोबहॅमच्या पत्रामुळे आधीच कल्पना होती! आर्थर कॉयनेही दक्षिण आफ्रीकन सरकारचा निरोप स्पष्टपणे सांगितला असावा असा संशय घेण्यास बराच वाव आहे!

डॉलिव्हिएराला दौर्‍याविषयी विचारणार्‍या कौड्रीने प्रत्यक्ष सिलेक्शन मिटींगमध्ये मात्रं त्याच्या नावाला विरोध केला! खरंतर मनातून डॉलिव्हिएराची निवड व्हावी असं त्याला वाटत होतं, परंतु आपलं मत ठामपणे आणि आत्मविश्वासाने मांडण्यात कौड्री कमी पडला! त्याचा जवळचा मित्रं असलेल्या पीटर मे ने दक्षिण आफ्रीकेच्या विरोधाची कल्पना असूनही कौड्रीला त्याची काही कल्पना दिलेली नव्हती! बहुतेक सर्व सिलेक्टर्सना डॉलिव्हिएराचा समावेश न केल्यास दौर्‍या होण्याची शक्यता असल्याची आधीच कल्पना होती! अपवाद डॉन केन्यनचा!

डॉलिव्हिएराला अखेर दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला!

क्रिकेटच्या दृष्टीने विचार करताही नुकतंच शतक झळकावलेल्या बॅट्समनला वगळण्याचा हा निर्णय अनाकलनीय होता! अर्थात केवळ बॅट्समन म्हणून डॉलिव्हिएराला अनेक प्रतिस्पर्धी होते! उपलब्धं असलेल्या बॅट्समनच्या जागी केन बॅरींग्टन आणि कीथ फ्लेचरची निवड करण्यात आली! बॉलर म्हणून डॉलिव्हिएअरा दक्षिण आफ्रीकेत यशस्वी होणार नाही असं सिलेक्टर्सचं मत पडलं! डॉलिव्हिएराच्या क्रिकेटची सुरवातच दक्षिण आफ्रीकेत झाली होती आणि तिथे तो नेमाने विकेट्स घेत होता याकडे मात्रं सोईस्करपणे काणाडोळा करण्यात आला होता!

२८ ऑगस्टला एमसीसीच्या कमिटीने संघ निवडीला मान्यता दिली!

वूस्टरशायरच्या ड्रेसिंग रुममध्ये दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यावर जाणार्‍या संघाच्या निवडीची बातमी रेडीओवरुन सर्वांना ऐकू आली! डॉलिव्हिएरा नुकताच ससेक्स विरुद्ध १२८ रन्सची इनिंग्ज खेळून परतला होता! रेडीओवरील बातमी ऐकल्यावर डॉलिव्हिएरा उध्वस्तं झाला! त्याचा घनिष्ट मित्रं असलेला टॉम ग्रेव्हनीही हतबुद्ध झाला होता! ग्रेव्हनीने त्याला कसाबसा आधार देऊन ड्रेसींग रुममधून एका बाजूला असलेल्या खोलीत आणलं. डॉलिव्हिएराला आपले अश्रू आवरणं अशक्यं झालं होतं!

"गोर्‍या दक्षिण आफ्रीकनांना हरवणं कोणालाही शक्यं नाही टॉम!" डॉलिव्हिएअरा विशादाने ग्रेव्हनीला म्हणाला!

एमसीसीच्या या निर्णयावर अर्थातच सडकून टीका करण्यात आली!

सामान्य ब्रिटीश क्रिकेट रसिकांच्या मते अ‍ॅशेसमध्ये शतक झळकवणार्‍या बॅट्समनची निवड न करणं हे निव्वळ अनाकलनीय होतं. काही पत्रकारांच्या मते क्रिकेट्च्या नैपुण्याचाच विचार करता एमसीसीचा हा निर्णय योग्यं होता! या पत्रकारात टाईम्स आणि डेली टेलीग्राफचा समावेश होता.

इतरांनी मात्रं डॉलिव्हिएराला वगळण्याबद्दल तीव्र प्रतिक्रीया व्यक्तं केली. टेड डेक्स्टर, ट्रेव्हर बेली यासारखे माजी क्रिकेटर्स आणि खुद्दं स्वॅन्टननेही डॉलिव्हिएराला वगळण्याच्या या निर्णयावर टीका केली.

वूस्टरशायरचा सेक्रेटरी आणि वेस्ट इंडीजचा जुना बॉलर लिअरी कॉन्स्टनटाईनने तर उघडपणे एमसीसीवर वर्णभेदाचा पुरस्कार करत असल्याचा आरोप केला. तो म्हणतो,
"डॉलिव्हिएराला त्याच्या क्रिकेटमधील नैपुण्यामुळे न वगळता त्याच्या रंगामुळे तरी वगळण्यात आलं असावं किंवा एमसीसीची अपार्थाइडला मान्यत असावी!"

जॉन आरलॉटने तर एमसीसीवर टीकेची झोड उठवली!

"दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यातून डॉलिव्हिएराला वगळण्याचा एमसीसीचा निर्णय हा आजपर्यंत घेण्यात आलेला सर्वात क्लेशकारक आणि दुर्दैवी निर्णय आहे!

निव्वळ क्रिकेटमधील क्षमतेचा विचार करताही, डॉलिव्हिएराची निवड होणं अपेक्षीत होतं! परंतु क्रिकेटक्षमतेत तो कमी पडला असता तरीही अपार्थाइडला विरोध म्हणून त्याची निवड होणं हे फार महत्वाचं होतं! डॉलिव्हिएराची निवड झाल्यामुळे हा दौरा रद्दं झाला असता तर जगभरातील विविध धर्माच्या आणि वर्णाच्या लोकांशी जवळीक साधण्याची ब्रिटीश जनतेला संधी मिळाली असती! उलट त्याची निवड न करून ब्रिटीशांची दक्षिण आफ्रीकेच्या वर्णद्वेशी अपार्थाइड धोरणाला मान्यता आहे असाच संदेश सर्वत्रं गेला आहे! या दुर्दैवी निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार आहेत!"

एमसीसीच्या अधिकार्‍यांवर आणि सिलेक्टर्सवर उठवण्यात आलेली ही टीकेची झोड काही बाबतीत अवास्तव आहे असं आधुनिक संशोधकांचं मत आहे. एमसीसीच्या अधिकार्‍यांना डॉलिव्हिएराच्या निवडीमागील राजकीय परिणामांची अजिबातच कल्पना नव्हती असं मानणं भाबडेपणाचं असलं तरीही राजकारण आणि खेळ यात सरमिसळ करु नये असं बहुतेकांचं मत होतं असं मानण्यास वाव आहे. अपार्थाइडला समर्थन न देताही दक्षिण आफ्रीकेशी क्रिकेटपुरते संबंध ठेवण्याची एमसीसीची इच्छा होती!

अर्थात राजकारण आणि खेळ एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे राहूच शकत नाहीत याची एमसीसीला तेव्हा कल्पना नसावी!

एमसीसीच्या सुमारे सत्तरेक सदस्यांनी या निर्णयाला ठाम विरोध दर्शवला! डेव्हीड शेपर्डच्या नेतृत्वाखाली या सर्व सदस्यांनी दक्षिण आफ्रीकेचा दौरा रद्द करण्याची मागणी केली! स्वतः अत्यंत धार्मिक असलेल्या कौड्रीला धर्मगुरु असलेल्या शेपर्डच्या या मागणीमुळे मोठा धक्का बसला! काही आठवड्यांतच अनेक एमसीसी सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाचे राजीनामे दिले! एमसीसीवर हजारोंनी तक्रारीचा पाऊस पडला!

ब्रिटीश अपार्थाइड विरोधी संघटनेने पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन आणि एमसीसी अध्यक्ष आर्थर गिलिगन यांना पत्र पाठवून दौरा रद्दं करण्याची मागणी केली!

डॉलिव्हिएराला कौड्री, इन्सोल, ग्रिफीथ आणि कोबहॅम यांच्याकडून सहानुभूती व्यक्तं करणारी आणि पाठींबा दर्शवणारी पत्रं आली होती! सामान्य ब्रिटीश जनतेचीही त्यालाच सहानुभूती होती! डॉलिव्हिएरा जोरदार फॉर्ममध्ये होता! एमसीसीवर कोणतीही टीका करण्याचं त्याने कटाक्षाने टाळलं होतं! उलट दौर्‍यावर जाणार्‍या खेळाडूंना त्याने पूर्ण सहकार्य देऊ केलं!

दक्षिण आफ्रीकेतील गोर्‍या लोकांनी डॉलिव्हिएराला वगळण्याच्या निर्णयाचं उघडपणे समर्थन केलं! तर इतर वंशियांची ब्रिटीशांनी आपली फसवणूक केल्याची भावना झाली होती!

न्यूज ऑफ द वर्ल्ड या वृत्तपत्राने या दौर्‍याच्या वृत्तसंकलनासाठी डॉलिव्हिएराची निवड केली! तसा त्यांनी डॉलिव्हिएराशी करार केला! या निर्णयावरुनही व्होर्स्टर सरकारवर टीकेची झोड उठली! या टीकेमुळे खवळलेल्या व्होर्स्टरने डॉलिव्हिएराला पत्रकार म्हणूनही या दौर्‍यावर येण्यास विरोध दर्शवला!

१६ सप्टेंबरला या सगळ्या प्रकरणाला कलाटणी देणारी एक घटना घडली!

वॉरीकशायरचा फास्ट बॉलर टॉम कार्टराईटला ऑर्थोपिडीक सर्जन असलेल्या डॉक्टर बिली टकरने त्याच्या खांद्याची खास काळजी घेण्याचा सल्ला दिला. खांद्याची दुखापत चिघळल्यास पुन्हा तो बॉलिंग टाकण्यास असमर्थ ठरेल याची डॉ. टकरने त्याला स्पष्टं जाणिव करुन दिली! हे कळल्याबरोबर कार्टराईटने आपण दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यावर येण्यास असमर्थ असल्याचं एमसीसीला कळवलं!

कॉलीन कौड्रीच्या मते कार्टराईट १४ सप्टेंबरला कोणत्याही तक्रारीविना खेळला होता. त्यानंतर त्याने फिटनेस टेस्टही पास केली होती, पण नंतर अचानकच त्याने दौर्‍यातून माघार घेतली!

कार्टराईटने आपल्या आत्मचरित्रात याचं स्पष्टीकरण दिलं आहे. दक्षिण आफ्रीकेतील अपार्थाइडला त्याचा विरोधच होता, फक्तं आपलं हे मत उघडपणे बोलूण दाखवण्याची त्याची हिम्मत नव्हती!

"डॉलिव्हिएराला वगळल्याची बातमी दक्षिण आफ्रीकेत कळल्यावर तिथल्या पार्लमेंटमधील सत्ताधारी नॅशनल पार्टीच्या सर्व सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात या बातमीचं स्वागत केलं!" कार्टराईट म्हणतो, "ही बातमी वाचल्यावर माझे हातपाय गळाले! या दौर्‍यात भाग घ्यावा की नाही असा प्रश्न माझ्यापुढे उभा राहीला! अखेरीस मी माघार घेण्याचा निर्णय घेतला!"

कार्टराईटने माघारीचा निर्णय घेतला तरी कौड्रीने त्याचं मन वळवण्याचा प्रयत्नं सोडला नाही!

"तू आमच्याबरोबर दौर्‍यावर चल टॉम!" कौड्री म्हणाला, "निदान सुरवात तर कर! तिथे गेल्यावर जर काही त्रास झालाच, तर तुला परत येता येईल! दक्षिण आफ्रीकेत अनेक ब्रिटीश खेळाडू आणि कोच आहेत! दुसर्‍या कोणालाही आम्ही तिथे बोलावू शकतो!"

कार्टराईटने कौड्रीच्या या सूचनेला नम्रपणे पण ठाम नकार दिला!

"कॉलिनने दक्षिण आफ्रीकेत खेळत असलेल्या किंवा कोच असलेल्या अनेक खेळाडूंची नावं घेतली!" तो म्हणतो, "पण बेसिलचं नाव मात्रं त्याने घेतलं नाही!"

कार्टराईटच्या ठाम नकारानंतर कौड्री, ग्रिफीथ आणि गिलीगन यांनी दहा मिनीटात त्याच्यऐवजी दुसर्‍या खेळाडूची निवड करण्याचा निर्णय घेतला!

बेसिल डॉलिव्हिएरा!

या निर्णयाचं समर्थन करताना कौड्री आणि ग्रिफीथला बर्‍याच शाब्दीक कसरती कराव्या लागणार होत्या. डॉलिव्हएराची बॉलींग फारशी प्रभावी नाही म्हणून त्याला वगळण्यात आलं होतं, परंतु आता टॉम कार्टराईटसारख्या बॉलरच्या जागी त्याची वर्णी लावण्यात आली होती! कार्टराईटची बॅटींग मात्रं पूर्वीइतकी प्रभावी नव्हती, तर डॉलिव्हिएरा उत्कृष्ट बॅट्समन होता!

एमसीसीने जनक्षोभापुढे झुकून हा निर्णय घेतला अशीच बर्‍याच जणांची समजूत झाली होती! मात्रं काहीही झालं तरी डॉलिव्हिएराची निवड योग्य होती असंच बहुतेकांचं मत होतं! राजकीय कारणामुळेच सुरवातीला त्याला वगळण्याचा निर्णय घेतला असावा अशी बहुतेकांची पक्की खात्री झाली!

डॉलिव्हिएराला या निर्णयाचा आनंद झाला होता, परंतु दौरा रद्दं होण्याचीच त्याला जास्तं शक्यता वाटत होती!

दक्षिण आफ्रीकेत व्होर्स्टरला १७ सप्टेंबरला ही बातमी कळताच त्याचा संताप पराकोटीला पोहोचला! ब्ल्यूफॉन्टेन इथे ऑरेंज फ्री स्टेट नॅशनल पार्टी काँग्रेसपुढे भाषण करताना तो म्हणाला,

"डॉलिव्हिएराचा समावेश इंग्लिश संघात असेल तर त्याला दक्षिण आफ्रीकेत येण्याची सरकार परवानगी देणार नाही! आमच्यावर राजकीय हेतूने जबरदस्तीने लादलेल्या या संघाचं आम्ही स्वागत करु शकत नाही! हा संघ एमसीसीचा संघ नसून अपार्थाइड विरोधकांचा, दक्षिण आफ्रीकन वंशविरहीत ऑलिंपीक कमिटीचा आणि अपार्थाइडचा विरोधक बिशप रीव्हजचा संघ आहे! एमसीसीने पूर्ण पणे राजकीय हेतूने हा निर्णय घेतला आहे!"

दक्षिण आफ्रीकन वृत्तपत्रांनी व्होर्स्टरच्या या भूमिकेवर टीक केली. त्याच्या या भूमिकेमुळे दक्षिण आफ्रीकेवर सर्व क्रीडा संघटना बहिष्कार घालण्याची भीती व्यक्तं करण्यात आली होती. व्होर्स्टर मात्रं आपल्या भूमिकेवर ठाम होता! दक्षिण आफ्रीकेच्या भल्यासाठीच आपण हा निर्णय घेतल्याचं त्याने आग्रहाने प्रतिपादन केलं होतं!

बिली ग्रिफीथने डॉलिव्हिएराला येऊ न दिल्यास दक्षिण आफ्रीकेचा दौरा रद्द होईल असं ठणकावलं. डॉलिव्हिएराची निवड केवळ क्रिकेट क्षमतेवर करण्यात आली असून कोणताही राजकीय दबाव नाही आणि मूळ संघात केवळ थोडक्यासाठी त्याची जागा हुकली असल्याचं त्याने स्पष्टीकरण दिलं!

कॉलिन कौड्रीने स्वत: दक्षिण आफ्रिकेला भेट देऊन दौरा सुरळीतपणे पार पडण्यासाठी प्रयत्नं करण्याची तयारी दर्शवली होती! कौड्रीचा अपार्थाइडला विरोध असला तरी दक्षिण आफ्रीकेत क्रिकेट खेळण्याला मात्रं नव्हता! इतकंच नव्हे तर दक्षिण आफ्रीकेत अपार्थाइड व्यवस्था काम करत असल्याचंही त्याने वक्तव्यं केलं होतं. आपल्याला या प्रकरणातील सर्व खाचाखोचा माहित असून कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यास आपण समर्थ आहोत असं कौड्रीचं मत होतं!

व्होर्स्टर सरकारमधील मंत्री बेन स्कोमन याने मात्रं डॉलिव्हिएराची निवड राजकीय हेतूनेच झाली असून दक्षिण आफ्रीकन सरकार कोणत्याही परिस्थितीत त्याला खेळू देणार नाही असं निक्षून सांगितलं! कॉय आणि चिथॅमने इंग्लंडमध्ये येऊन एमसीसीच्या सभासदांची भेट घेतली. परंतु यातून काहीच निष्पन्न झालं नाही. अखेर एमसीसीने दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यासाठी निवडलेला संघ दक्षिण आफ्रीकन सरकारला मान्य नसल्याने दौरा रद्दं करत असल्याचं जाहीर केलं!

न्यूझीलंडच्या रग्बी संघापाठोपाठ इंग्लंडच्या क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रीकेचा दौरा रद्द केल्याचा दूरगामी परिणाम झाला! १९६९-७० मध्ये दक्षिण आफ्रीकेच्या रग्बी संघाचं इंग्लंड आणि आयर्लंडच्या दौर्‍यावर अपार्थाइड विरोधकांनी अनेक निदर्शनांनीच स्वागत केलं! लंडनमध्ये एका निदर्शकाने तर दक्षिण आफ्रीकन खेळाडूंची बस हायजॅक करण्याचा प्रयत्न केला!

रग्बीपाठोपाठ दक्षिण आफ्रीकेचा क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौर्‍यावर जाणार होता. एमसीसीचा हा दौरा सुरळीतपणे पार पडावा यासाठी आग्रह होता, जॉन आरलॉटने एमसीसीच्या या निर्णयावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली. बीबीसीसाठी कॉमेंट्री करण्यास त्याने ठाम नकार दिला. आरलॉट म्हणतो,

"इंग्लंडचा यशस्वी दौरा म्हणजे दक्षिण आफ्रीकेतील वर्णभेदी सरकारला समर्थन ठरेल! एमसीसी जनतेच्या भावना ओळखून वागण्यात पूर्णपणे अपेशी ठरलं आहे यात शंका नाही!"

जनक्षोभापुढे झुकून एमसीसीने अखेर दक्षिण आफ्रीकेचा दौरा रद्द झाल्याची घोषणा केली!

१९७१ मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि रग्बी संघटनांनी दक्षिण आफ्रीकेबरोबरचे आपले संबंध संपुष्टात आणले! परंतु ८० च्या दशकातही न्यूझीलंडमधील संघानी दक्षिण आफ्रीकेचा दौरा केला होता! न्यूझीलंड संघातील माओरी खेळाडूंना ऑनररी व्हाईट म्हणून संबोधण्यात आलं होतं!

बेसिल डॉलिव्हिएरा पुढे १९७२ पर्यंत इंग्लंडकडून नियमितपणे टेस्टमध्ये खेळत होता! १९७९ पर्यंत त्याने वूस्टरशायरचं प्रतिनिधीत्वं केलं!

अपार्थाइड मोडीत निघाल्यावर १९९१ मध्ये भारताच्या दौर्‍यापासून दक्षिण आफ्रीकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अपार्थाइड मोडीत निघाल्यावर १९९१ मध्ये भारताच्या दौर्‍यापासून दक्षिण आफ्रीकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं! >> इतकी भयंकर परिस्थिती होती .. अगदी १९९१ पर्यंत .. बापरे. किती विचीत्र विचार असतात एकेकाचे आणि असे लोक एक अक्ख्या देशाचं प्रतिनिधीत्व करणार.. भयानक आहे हे सगळं ..

नेहमीपमाणेच सुंदर माहितीपुर्ण लेख!!!!!!

क्रिकेट जगतातील अनेक घडामोडींची माहिती मिळणार त्यांमुळे पुढील भागाच्या प्रतिक्षेत.............

खूप सुंदर ,माहितीपूर्ण लेख!!

अपार्थाइड चा प्रभाव किती खोलपर्यन्त रुजलेला होता, हा स्टिग्मा चक्क १९९० पर्यन्त होता?? बापरे... इतक्या प्रदीर्घ काळापर्यन्त सो कॉल्ड कलर्ड लोका ना किती कठीण परिस्थितीतून जावं लागलं असेल.. अन इमॅजिनेबल!!!

स्पार्टाकस.. जियो!...

इतक सविस्तर पण तरीही रंजक स्पोर्ट्स लिखाण मी प्रथमच मायबोलिवर वाचत आहे... स्पार्टाकस.. हे माझ्या निवडक १० मधे नक्कीच जाणार..!

मला ही गोष्ट माहीत होती पण एवढ्या सगळ्या आतल्या गोष्टी आजच कळल्या.. वाचल्यावर अमेरिकेतल्या त्याच वेळेला चालु असलेल्या वर्णभेद व वर्ण द्वेषाशी कंपॅरिझन करण्याचा मोह आवरला नाही. अमेरिकतही १९६५ च्या आधी याहुनही भयंकर वर्णद्वेष व वर्णभेदाच्या गोष्टी प्रचलित होत्या.. (त्यासाठी रुट्स नावाची ८ भागाची मिनि सिरिज जरुर पहा!)

एनि वे.. इतक चांगल लिखाण वाचल्यावर मायबोलिवर मी सभासद आहे याचा गर्व वाटतो.. परत एकदा.. जियो... स्पार्टाकस .. जियो...:)

सुरेख लेख... सगळीच नवीन माहिती कळाली.. आफ्रिकेतील वर्णद्वेशाबद्दल थोडेफारच माहित होते..

तुम्ही खूप छान आणि महितीपूर्ण लिहिता!! पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत...

दक्षिण आफ्रिकेत अजूनही खूप वर्णभेद आहे असे म्हणतात

उत्तम माहितीपुर्ण लेख. क्रिकेट आणि वर्णभेद, दोन्ही विषय एकत्र. मजा आली. बरेच कन्सेप्ट क्लीअर झाले.

स्पार्टाकस, लेख मस्तच आहे.

क्रिकेटवरची सिरीज का? बॉडीलाईन सिरीजबद्दल लिहीणार असशीलच.

ह्यातल काहीच माहिती नव्हतं.
डिटेल मध्ये लिहिलेल्या लेखामुळे बर्‍याच गोष्टी कळाल्या.
उत्तम लेख.
Happy