पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/52728
"ओहो, कित्ती सुंदर " मंजू चित्कारली.
कोणाच्या स्वप्नातही आले नव्हते कि त्या गुहेच्या आत इतके मोठे दालन, छे दालन कसले जणू एका दुसर्याच जगात आल्याचा भास होत होता. समोर एक स्वच्छ पाण्याचा झरा होता. तो कुठून उगम पावला होता कोणास ठाऊक पण तो उंचशा छतातून उगम पावून एका तळ्यात पडत होता. त्याचे पाणी पुढे होऊन बळवंतने थोडेसे चाखून पाहिले. वाह, याला तर गोडसर चव आहे. सर्वांना आश्चर्य वाटत होते. फत्तराच्या त्या भिंतींवर विविध फुले उगवली होती. तिथे मशालींची गरजच लागत नव्हती. कुठून तरी तिथे पुरेसा प्रकाश येत होता. नीरव शांतता असली तरी ती अंगावर येत नव्हती. एवढी चांगली जागा एका डोंगराच्या आत असू शकते यावर विश्वास बसणे कठीण होते. बिनखांबाचे दालन तसेही कुठे बघायला मिळणार? त्या भगदाडातून आत आल्यावर एका छोट्या बोळकांडातून आपण इथे पोहोचू अशी कोणाची अपेक्षा नव्हती. कुठे ती पहिल्या गुहेतील दाटीवाटीने उभे राहण्यापुरती जागा आणि हे त्याच्या तुलनेत भव्यदिव्य वाटणारे अंडाकृती दालन.
"पण आता इथून पुढे कुठे?" प्रतापचा हा प्रश्न सर्वांना पुन्हा वास्तवाचे भान करुन देणारा होता.
सर्वजण अग्रजकडे व एका कोपर्यातून पमाण्णाकडे पाहायला लागले.
अग्रजने शांतपणे एक गोल फेरी मारुन पाहिली. त्याला काहीच विचित्र वाटले नाही. कुठेच काही फट नाही. सर्वकाही एकदम नैसर्गिक. यात कोडे काय आहे?
"पमाण्णा मला सांगा इथून पुढे काय आहे?"
सर्वांनी नजरा वळवून पाहिले, शामकडून हा प्रश्न आला होता.
"अरे पमाण्णांना कसे माहित असेल शाम?"
"प्रताप आता बास झाले. तुला आम्ही दूधखुळे वाटतो का? हे जो कोणी आहेत ते नक्कीच सामान्य नाहीत. तसेही कोणी एवढा मोठा दगडी दरवाजा एका लाथेने फोडू शकत नाही. यांना काही ना काही नक्कीच माहिती आहे."
"प्रताप मी जेवढे वाचले त्यातून हाच अर्थ निघतो. पमाण्णा तुम्ही भिंतीच्या आरपार बघू शकता का? सांगा ना इथे काय कोडे आहे?"
प्रताप भांबावून गेला. बळवंत त्याच्या लाडक्या पमाण्णा काकांकडे साशंकपणे पाहू लागला. मंजू या सर्वात तटस्थ निरीक्षक होती. पण ती इथे काहीच बोलू शकत नव्हती.
"छोटे मालक, तुमची आज्ञा असेल तर मी काही स्पष्टीकरण देऊ?"
प्रतापने काहीच न सुचल्यामुळे होकारार्थी मान हलविली.
"अग्रज, शाम, बळवंत, मंजू आणि तुम्हीसुद्धा छोटे मालक. खरे तर हे जहागीरदार घराण्याचे सर्वात मोठे रहस्य आहे. तुम्हाला ते पूर्णपणे कोणी समजू देणार नाही. छोटे मालकांची गोष्ट वेगळी आहे, कदाचित बळवंतला मोठे झाल्यावर थोडे फार ते सांगितले जाईल. आत्ता तुम्ही एवढेच समजा कि मी कोणी संशयास्पद व्यक्ती, भूत/प्रेत इ. नाही. माझ्याकडे तुमच्यापेक्षा काही प्रमाणात जास्त ताकद आहे हे अगदी मान्य! पण याचा अर्थ असा नाही कि सर्व उत्तरे माझ्याकडे आहेत. अग्रज तू इतका तर्कसंगत विचार करतोस, तूच सांग जर हे सर्व इतके सोपे असते आणि मला सर्वकाही ठाऊक असते तर ही वेळ आली असती का कि तुमच्या सारख्या सामान्य, माफ करा तुम्ही सर्व पण हाच शब्द योग्य आहे, तुमच्यासारख्या सामान्य पोरांची मदत मालकांसारख्या व्यक्तीने घेतली असती का? असो एक गोष्ट मी सांगू शकतो कि आमच्या मालकांच्या माणसांनी इथला व्यूह रचला नाही. एकूण खजिन्याचे २७ अंश लपविले गेले. त्यातली फक्त ही गुहा पूर्णपणे त्या गणित्याने तयार केली. त्यामुळेच कि काय त्याने हे तिलिस्म असे तयार केले आहे. पण मी हेही सांगतो कि त्याचे तिलिस्म खूप मोठे नसणार."
"का?"
"कारण तो भयंकर आळशी होता. त्याला आवडणारे कामही तो खूप जास्ती वेळ करु शकत नसे. आता मला एवढी माहिती कशी हे विचारू नका. मी सांगू शकणार नाही."
या क्लूने कोणताच फायदा झाला नव्हता. इथून पुढे जायचा कोणताच मार्ग दिसत नव्हता पण दुसरा अंश नक्कीच इथे होता यात कोणाचेच दुमत नव्हते. जणू त्या गणित्याने खजिना शोधायला आलेल्या माणसाला निराश करून आल्या पावली परत पाठवायचा चंग बांधला होता.
~*~*~*~*~*~
असे म्हणतात कि जनावरांना सर्वात आधी धोक्याची जाणीव होते. मायकपाळमधली गुरे जेव्हा पाणवठ्यापाशी जायला नकार देऊ लागली खरे तर तेव्हाच गाववाल्यांना जाणीव व्हायला हवी होती. पण त्यांना संकटाची खरी जाणीव सकाळी झाली. बाहेरून आपल्याला गावात कोंडले गेले आहे ही बातमी अजून सर्व गावाला कळायची होती. मायकपाळला एक बाजू वगळता इतर बाजूंनी यातर नैसर्गिक डोंगरी किंवा भक्कम वेशीच्या भिंतीचे संरक्षण लाभले होते. तर दुसर्या बाजूने कृष्णा नदीचे विस्तीर्ण पात्र होते. त्याच्या दुसर्याबाजूला जंगल; त्यामुळे वेढा वगैरे गोष्टी स्वप्नात अशीच त्यांची धारणा होती. नदी तशी गावापासून थोडी दूरच होती पण गावात एकच विहीर तीसुद्धा जहागीरदारांच्या वाड्यात त्यामुळे नदीवर जाणे क्रमप्राप्त होते.
सकाळच्या वेळी गावात काय होते? प्रातर्विधी उरकून गावातले पुरुष चावडीवर गप्पा छाटत असतात. पोरेसोरे नदीवर हुंदडत असते. बायका पाणी भरत असतात. काहीजण कपडे धुवायला काढून बसलेले असतात. एकंदरीत नदीकाठ गजबजलेला असतो. नदीत खेळत असलेल्या पोरांनी अचानक दुसर्या काठावर हालचाल पाहिली. कोणीतरी नक्की येत होते तिकडून.
"कोन हाय रं तिकडं?"
आता तिथे असलेल्या मोजक्याच पुरुष मंडळींचे लक्षही तिकडे वेधले गेले. बायकांनीही क्षणभर कपडे धुणे थांबवले. जंगलातून काही घोडेस्वार येत होते. त्या सर्वांनी संपूर्ण काळ्या रंगाचा पोशाख केला होता. लांबून त्यांची बाकीची काहीच शरीर वैशिष्ट्ये लक्षात येत नव्हती. पण एक नक्कीच कळत होते. त्यातील प्रत्येकाने काळ्या रंगाचा फेटा परिधान केला होता आणि त्याच्या दुसर्या टोकाने आपला चेहरा झाकला होता.
"डाकू!!!!!"
सर्वांच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात यायला थोडा वेळ गेला. हे सर्वांना अनपेक्षित होते. मायकपाळच्या गेल्या कित्येक वर्षात एक चोरी घडली नव्हती. कोणी बाहेरचा चोर आलाच तर त्याचे प्रेत वेशीवर टांगलेले मिळे. या अनपेक्षित धक्क्याने सर्वजण काही क्षण स्तब्ध राहिले. आणि अचानक बाप्यांपैकी एकाला हसू फुटले.
"वाट चुकला जनू. ह्ये मायकपाळ हाये. हितं जहागीरदारांचा अंमल चालतो. दरोडा घालाल हजाराचा आणि जीव गमवाल लाखाचा. पावनं येक सल्ला हाय. आले तसे परत फिरा. न्हाईतर ......"
त्या बाप्याचा आवाज तसाच बंद पडला. त्याच्या जवळ बसलेले व त्याच्या विनोदावर चेष्टेने हसत असलेले बाकीचे पुरुषही हादरले. एक सुरा नेम धरुन त्याचा कंठ फोडून रुतून बसला होता.
"शाबास संगारी." त्या जथ्यातील सर्वात पुढचा घोडेस्वार आपला बुरखा काढत उद्गारला. त्या बुरखेधारी स्त्रीने आपला बुरखा न हटविताच त्याला घोड्यावरुनच लवून प्रणाम केला. दुर्जन बोलू लागला.
"मायकपाळवाल्यांनो! तुम्हाला याची सवय नाही हे मला माहित आहे. पण आता परिस्थिती वेगळी आहे. तुम्हाला आत्ता फक्त सूचित करून सोडून द्यायचा माझा इरादा होता पण काय करणार? मला चेष्टा अजिबात सहन नाही होत ओ. असं कधी करतात का सांगा मला?"
त्याच्या स्वरात एक प्रकारचं आर्जव होते. थोडेसे भित्रे असणारे जे आधी धूम ठोकणार होते त्यांनाही काय चालू आहे ते कळेना. सर्वजण बावचळल्यासारखे थिजून बघत राहिले. हे काय चालू आहे? हे डाकू आहेत? का ही कुठली वेड्यांची फौज आहे जी डाकूंचा वेष घेऊन आली आहे? पण मग त्यांनी एकाचा खून केला हे सुद्धा विसरुन चालण्यासारखे नव्हते.
अचानक दुर्जन जोरजोरात हसू लागला.
"आणि म्हणूनच चेष्टा करायचीच नाही माझी. काय कळले नाही? अरे कसे कळेल अजून तुमच्या चेष्टेचा पूरा इनाम कहा दिया है? साथियों जिसे चाहिये उसे मार डालो. सिर्फ औरतजाद को बचा लो. रात मे काम आयेंगी."
"और सरदार बच्चे?"
एक मुलगा दुर्जनच्या अगदी जवळच भेदरुन नदीत उभा होता. दुर्जन त्याच्याकडे प्रेमाने हसला आणि त्या मुलाने पापणी लवली ते शेवटचीच. एक सुरा त्याच्या डोळ्यात रुतला होता. कृष्णेचे पात्र निष्पाप रक्ताने न्हाऊन निघत होते. आणि तिच्या काठावर एक नराधम खदाखदा हसत या सगळ्याची मजा घेत होता.
~*~*~*~*~*~
उद्गम खंड ४ - गुणवर्धनाचे आत्मवृत्त : कालद्वीपाचे रहस्य
मी दोन्ही हेरांची प्रेते घेऊन आम्हाला मदतीला आलेल्या कुमकेबरोबर परत पालेम्बंगला आलो तेव्हा माझे भरघोस स्वागत झाले. कोणाला अपेक्षा नसताना मी एका राक्षसी ताकदीच्या तरुणाला धूळ चारली होती. या चकमकीत अनेक चोळ सैनिक धारातीर्थी पडले ही गोष्ट अर्थातच सेनानायकाच्या दृष्टीने चिंतेची बाब असली तरी केदाहपर्यंत खबर पोचवण्याचा प्रयत्न हाणून पाडला हे समाधान त्यास लाभले होते. अर्थातच चोळांची प्रतिष्ठा लक्षात घेता हे प्रकरण शक्य तितके दाबले गेले. पण आतल्या वर्तुळात त्याची वार्ता पसरलीच आता माझ्याशी अनेक चोळ सैनिक पूर्वीची आढ्यता सोडून मित्रत्वाने वागू लागले होते. चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार मिळत नाही हेच खरे. पण तो कोण होता हे मला शेवटपर्यंत कळाले नाही. त्याने माझे आभार मानले आणि मग ते शरीर तसेच कोसळले. आम्ही ते प्रेत तसेच घेऊन परत फिरलो. तोवर माझ्या नशीबाने काहीजण शुद्धीवर आले होते ज्यांच्या साक्षीमुळे सेनानायकाला माझे डोके फिरले नाही आहे आणि मी एका राक्षसाशी लढत होतो हे मान्य करावे लागले. पण यासर्वांमुळे माझ्याबद्दल नकळत अनेक समज-गैरसमज निर्माण झाले हे मात्र खरे.
त्यानंतर एकदा मला आमच्या सैन्यातील वैद्याने बोलावून घेतले. तो वैद्य असला तरी अनेकदा शवविच्छेदनाची कामेही त्याच्याकडे येत त्यामुळे तो त्या कलेत निष्णात मानला जाई. त्याने मला एक धक्कादायक गोष्ट सांगितली.
"हे शरीर विशेष आहे गुणवर्धना. आपले शरीर हे अत्यंत क्लिष्ट पद्धतीने बनलेले यंत्र आहे. त्यात अनेक आंतरिंद्रिये असतात, हाडेच २०६ असतात. त्याशिवाय स्नायुंचे एक अतिक्लिष्ट जाळे, आतली जुळणी थक्क करणारी आहे."
"माफ करा वैद्यराज मी आपल्या इतका निपुण नसलो तरी शरीरशास्त्राचे थोडके ज्ञान मजला आहे. आपण याबाबत माझ्याशी का बोलत आहात?"
"येतोय मी त्याच्याचकडे. आत्ता म्हटले ना मी कि शरीर एक यंत्र आहे. तसे पाहिले तर जहाज देखील एक यंत्रच आहे. पण जर जहाजाला शीडच नसले तर? किंवा सुकाणूला जहाजाला जोडणारा दांडकाच नसेल तर? यंत्राचा प्रत्येक भाग महत्त्वाचा असल्यामुळे एकही भाग नाहीसा असता कामा नये? उचित विधान?"
"उचितच आहे वैद्यराज"
"पण या शरीरात कित्येक आंतरिंद्रिये नाहीत. सर्व छोटी छोटी हाडे गायब आहेत तर मोठी हाडे झिजल्यासारखी वाटतात. जणू झाडाची ढोली आतून पोखरली आहे. हे काय आहे गुणवर्धना? तू तर काही छेडछाड केली नाहीस ना? रागावू नकोस पण मी सर्व शक्यता तपासून बघत आहे."
माझ्याकडे त्यांजकरिता काहीच उत्तर नव्हते. मी काय बोलणार होतो यावर? मला फक्त हेच शब्द आठवत होते.
"मनुष्या, मला तुमच्या भांडणात काही एक स्वारस्य नाही. पण तू तियानाक विरूद्ध दाखवलेले धैर्य व कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. त्यामुळे मी तुला जीवनदान देत आहे. तू माझ्याबद्दल, म्हणजे या शरीराबद्दल काहीही सांगू शकतोस फक्त पमानानान्गल आणि तियानाक ही नावे उच्चारू नकोस. हे तुझ्याच भल्याकरिता आहे अन्यथा तू वेडा ठरविला जाशील. आम्ही कालद्वीपवासी चोळांचे शत्रू नाही आणि यवद्वीपवासींचे मित्रही नाही. तियानाकला हे समजावे लागणार आहे. असो त्यास पकडण्यास अप्रत्यक्षरीत्या मदत केल्याबद्दल धन्यवाद. पालम ना"
------------
त्या दिवसापासून चोळांचे माझ्याबद्दलचे मत सुधारले असले तरी यवद्वीपवासी व आम्ही पकडलेले युद्धकैदी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले. अशातच आम्हाला एक दिवस केदाह सर झाल्याची बातमी मिळाली. संपूर्ण श्रीविजय साम्राज्य चोळांचे अंकित झाले. त्यादिवशी मोठाच जल्लोष झाला. या मोहिमेची सांगता होऊन आम्ही परत फिरणार होतो. श्रीविजय सम्राटाला समेटाची कलमे ठरविण्याकरिता व भारतीय पाहुणचाराकरिता महिनाभर तंजावूरला न्यायचे ठरले होते. आमच्या सैनिकांनी पुन्हा श्रीविजयन अधिकार्यांना त्यांची सूत्रे ताब्यात द्यायला सुरुवात केली. त्यांनीही पराभव मान्य करून खिन्न मनाने आपला दिनक्रम सुरु केला होता. हीच अखेरची संधी आहे रहस्य जाणून घेण्याचे हे जाणून मी त्यातील बर्यापैकी तमिळ जाणणार्या व माझ्याबरोबर त्यातल्या त्यात मित्रत्वाने वागणार्या एका अधिकार्याला बाजूला घेऊन, विश्वासात घेऊन सर्व वृत्तांत कथन केला.
"हे काय होते नक्की? तुम्ही काही सांगू शकलात तर मी आपला आभारी असेन."
"मी इतकेच सांगेन कि तुम्ही खूप नशीबवान तरी आहात किंवा सर्वोच्च दर्जाचे थापाडे. तियानाक, पमानानान्गल ही आमच्या इथल्या भूत-पिशाच्चांची नावे आहेत. तो कैदी एका तियानाकाने झपाटल्या गेल्याची वदंता होती. त्यामुळेच आम्ही त्याला मोकळे सोडू नका असे तुम्हा सर्वांना विनवत होतो. वायव्येकडचे जंगल तसेही तियानाकांनी भारलेले आहे अशी आमची धारणा आहे, होती. पण हे सर्व मला आश्चर्यजनक आहे. आणि कालद्वीप ..(येथे थोडासा घुटमळला व हलक्या आवाजात बोलू लागला) कालद्वीप काय आहे, कुठे आहे हे कोणाला माहीत नाही. ते एक रहस्यमयी द्वीप आहे जे आमच्या साम्राज्याच्या पूर्वेकडच्या समुद्रात कोठेतरी आहे अशी समजूत आहे. असे म्हटले जाते कि तिथे जो कोणी जाईल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात पण त्या बदल्यात त्याला काहीतरी द्यावे लागते."
"काहीतरी म्हणजे?"
"काहीतरी म्हणजे असे काहीतरी जे तुम्ही गमवू इच्छिणार नाही. तुमचा जीव!"
००००००००००००
आल्यानंतर माझा राजेन्द्र महाराजांनी मोठा सत्कार केला, अर्थातच गुप्ततेने. काहीही झाले तरी चोळ साम्राज्याची एक इभ्रत होती. अनेक चोळ सैनिकांना एका कैद्याने, कितीही भूत वगैरे अफवा उठू देत पुरावा कोठे होता?, लोळवले ही बातमी फुटणे परवडण्यासारखे नव्हते. राजेन्द्र एक पारखी राजा होता हे खरेच. त्याने माझे म्हणावे तसे कौतुक करता येत नाही यामुळे माझ्यावर एक महत्त्वाची वेगळी जबाबदारी सोपवून एकप्रकारे मला बक्षिस दिले. सर्वात धाकले राजकुमार, देवोत्तुंगाच्या शिक्षणावर देखरेख करण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. देवोत्तुंग एक सुयोग्य राजकुमार होता. वय आडवे आले नसते तर तो युवराजपदासाठी योग्य होता. पुढे तोच कुलोत्तुंग होऊन गादीवर येणार होता पण आत्ता तो एक गुणी, विजिगीषु वृत्तीचा किशोर होता. देवोत्तुंगाबरोबर काही काळ लोटला. मी पालेम्बंगच्या आठवणी आता विसरत चाललो होतो. माझी प्राणप्रिय सखी, माझी सहचारिणी याच काळात मला भेटली. ती महाराणींची कोणी दूरची नातलग लागत होती. नावही मला साजेसेच होते - गुणवती. याच निमित्ताने मी राजघराण्याशी नात्याने जोडला गेलो. मला एक पुत्ररत्नही प्राप्त झाले. सर्वकाही आनंदीआनंद होता आणि एक दिवस मला महाराजांनी बोलावून घेतले.
जेव्हा मी त्यांच्या कक्षातून बाहेर पडलो तेव्हा माझ्यासोबत देवोत्तुंगही होता. त्याचे अनधिकृत नामकरण आता देवकुलोत्तुंग झाले होते. देवकुलोत्तुंगाची नेमणूक यवद्वीपाचा राजदूत म्हणून झाली होती. आणि मी त्याचा सहायक व एक अनुभवी मंत्री व सेनापती अशा दुहेरी भूमिकेत सोबत जाणार होतो. क्षणार्धात माझ्या डोळ्यासमोरून सर्व आठवणी तरळून गेल्या. गुणवतीनेही दुसर्या सकाळी तिच्या गोड आवाजात तक्रार केली कि मी हे कसले नाव रात्रभर बरळत होतो - कालद्वीप!!!
~*~*~*~*~*~
हणमंत हा हैबतरावांचा खाजगी अंगरक्षक होता. बळवंताचे वडील म्हणून ते शोधपंचकाला ठाऊक होते. नेहमी हसर्या चेहेर्याने वावरणार्या हणमंतरावांच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पडले होते. काल रात्रीच हैबतरावांनी त्यांना दुर्जनाच्या रुपाने चालून येत असलेल्या संकटाची कल्पना दिली होती. पण इतक्या लवकर? हे असे पण घडू शकते? हे आपल्याला परवडण्याजोगे नाही.
"राव" सर्वजण त्यांना राव म्हणूनच संबोधत.
"राव टेकडीपासच्या जंगलातली खबर गावली."
"काय हाये खबर?" आशेने हणमंतरावांनी विचारले.
त्या शिपायाने खालच्या मानेने त्यांना बाहेर बोलावले आणि उभी असलेली घोडी दाखविली. त्यांच्यावर पहार्याला ठेवलेल्या सर्व सैनिकांची बीभत्स रीतीने विटंबना केलेली प्रेते होती. शिव शिव करीत त्यांनी नजर फिरविली. हाताच्याच इशार्याने त्यांनी त्या सर्वांची योग्य ती विल्हेवाट करण्याचा इशारा केला.
"आता कठीण आहे."
"का राव असे का बोलता? २०-२५ शिपाई मारले म्हणजे आपण टेकीस थोडीच आलो?"
"तुला कळत नाहीये. लहान आहेस तू. त्यांनी स्पष्ट संदेश दिला आहे. नदीवर त्यांनी १०-२० माणसे मारली पण कोणाचाच गावापर्यंत पाठलाग केला नाही. शिपाई सुद्धा असेच मारले गेले जे गावापासून दूरवर, गावाबाहेर जाणार्या वाटांवर उभे केले होते. याच्यातून संदेश असा मिळतो कि गावावर इतक्यात तरी हल्ला होणे नाही पण गावातून कोणी बाहेरही पडणे नाही. पाण्याचा एकमेव सार्वजनिक स्रोत त्यांच्या ताब्यात. विचार कर काय होईल."
"राव असे काही त्याच्या मनात असेल? त्याला फक्त आपले हाल करायची इच्छा आहे? इतका विकृत आहे तो? पण तो चुकतोय. वाड्यात विहीर आहे. पाणी आहे."
"तू चुकतोयस. या गावात फक्त आपण शिपाईगडी नाहीत. आणि आत्ताही सर्व शिपाई वाड्यात नाही राहत. वर अजून २०० शिपाई जर घुसू शकले तर येणार आहेत. आणि त्याहूनही महत्त्वाचे ती विहीर सार्वजनिक नाही."
"म्हणजे जर हे असेच सुरु राहिले तर.........."
हणमंतराव खिन्नतेने हसले.
~*~*~*~*~*~
अग्रज आता सर्वांना मध्ये बसवून बोलत होता.
"या दालनातला आपला सर्वात मोठा धागा आहे इथली जवळपास नीरव शांतता. जर इथे एक झरा आहे जो बर्यापैकी उंचीवरुन तळ्यात पडत आहे तर त्याचा आवाज व्हायला नको? पण तो आवाज आपल्याला लांबवर, अधिक उंचीवर अधिक तीव्र जाणवतोय. याचा एकच अर्थ असू शकतो तो झरा नकली आहे किंवा तो आपण समजतो तसा झरा नाही."
"म्हणजे नेमके तुला काय सुचवायचंय?"
"आपण समजत होतो कि तो झरा इथे प्रवेश करतोय. डोंगरात झिरपलेले पाणी गुहेत अनेकदा येते तसे वाटले खरे पण ते पाणी खारट असते. हे पाणी गोड आहे. याचा अर्थ कि नदीवजा ओढ्याचे मूळचे पाणी इथे फिरवले असावे व त्यामुळेच ती मृत्युपंथास लागली आहे."
"म्हणजे?"
"होय. हा झरा खालून वर जातोय. या दालनातून बाहेर पडण्याचा तो एकच मार्ग आहे. पमाण्णा मी एवढी अपेक्षा तुमच्याकडून करु शकतो ना?"
पमाण्णाने प्रतापकडे सूचकपणे पाहिले. प्रतापने त्याला अनुमोदन दिले.
"चला मग पोरेहो. करु मग. हा तर मग हुय्या"
पमाण्णाने जोरात उडी मारली व त्याचे गुहेच्या छतावर डोके आपटले. एका धडकीत त्या झर्याच्या उगमापाशी भोक पडले. अग्रजचा अंदाज खरा होता. वरचे भोक जिथून ते पाणी वर ओढले जात आहे ते मोठे झाले तर दोन्हीकडचा दबाव नीट साधला जाणार नाही. अशाने पाणी नीट खेचले जाणार नाही. वरती वाहणारे पाणी काही प्रमाणात खाली पडणार आणि दबाव पुन्हा नीट बनेपर्यंत आपण पाणी दालनात भरणार. त्यावर तरंगत आपण छताच्या काही प्रमाणात तरी जवळ पोहोचू आणि या दालनातून बाहेर पडण्याची संधी निर्माण होणार. पाणी बाहेर पडू नये म्हणून त्याने आत येण्याच्या बोळकांडीचे तोंड बंद केले होते. जर दार तोडले नसते तर ही वेळच आली नसती म्हणा. त्या पाण्याबरोबर ते झर्याच्या भोकाच्या अधिक जवळ पोचले.
"आता श्वास रोखून धरा रे पोरांनो." असे म्हणत पमाण्णाने त्या सर्वांना धरून त्या प्रवाहात झेप घेतली. प्रवाहातून पोहत पोहत तो त्यांना त्या नळीतून एका दुसर्याच ठिकाणी बाहेर पडला.
"आह्ह्ह्ह" सर्वांनी रोखून धरलेला श्वास सोडला. सर्वांना ब्रह्मांड आठवले होते केवळ ३ मिनिटात.
ते एका नवीनच तळ्यात बाहेर पडले होते. शाम अचानक ओरडला. मागे असलेल्या सिंहाचे तोंड पाहून तो दचकला होता. त्यांच्या बाहेर पडण्याच्या भोकाला सिंहाचे तोंड समजून बाकीचा चेहरा कोरून काढला होता. नाकातोंडात गेलेले पाणी सर्वांनीच बाहेर काढले.
"शेवटी पोचलोच तर."
सर्वांच्याच, अगदी पमाण्णाच्या चेहेर्यावर विजयी हास्य आले. ते एकमेकांकडे बघून आपल्याच वेड्या साहसावर हसू लागले. कसे का होईना ते खजिन्याच्या या अंशाच्या दुसर्या दालनात प्रवेश करते झाले होते.
क्रमशः
टीपः यातल्या शेवटच्या परिच्छेदातला ट्रॅप भौतिकशास्त्रीय दृष्ट्या कितपत अचूक आहे मला माहित नाही पण शक्य तितक्या शक्याशक्यता कव्हर केल्या आहेत.
पुढील कथासूत्र येथे - http://www.maayboli.com/node/52799
सरस! मस्त झालाय हा ही भाग.
सरस! मस्त झालाय हा ही भाग.
इंटरेस्टिंग. मस्त चालू अहे.
इंटरेस्टिंग. मस्त चालू अहे.
छान आहे हा हि भाग.
छान आहे हा हि भाग.
बेस्ट!
बेस्ट!
lay bhari
lay bhari
लै भारी!
लै भारी!
खुप सुन्दर आनि उत्कठा
खुप सुन्दर आनि उत्कठा वाढविणारी श्रुन्खला आहे.
पुढिल भाग लव्कर लव्कर येऊ द्या
उत्कंठावर्धक झाला आहे हा ही
उत्कंठावर्धक झाला आहे हा ही भाग.
मला तुमची कथा थोडी चांदोबा आणि थोडी सुशी अशी सरमिसळ वाटते आहे
ते मायावी द्वीप तर अगदी बालपणात घेऊन जाते
मस्त! पुढचा भाग कधी ???
मस्त!
पुढचा भाग कधी ???
पुढचा भाग कधी ???
पुढचा भाग कधी ???
उद्या दुपारच्या आधी. प्रयत्न
उद्या दुपारच्या आधी. प्रयत्न राहील कि शक्यतो आज रात्रीपर्यंत प्रकाशित व्हावा पण उद्या दुपारच्या आत निश्चित!