पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/52631
"या जगात सर्वात भयानक काय आहे? पिशाच्च? रक्तासक्त बूटी समोर पिशाच्च एक पळ टिकाव धरणार नाही. अंधकार? एक काजवा देखील अंधकार दूर करु शकतो. आग्यावेताळ? कालभैरवाचे अभिमंत्रित जल त्याला पाताळात घालवून द्यायला पुरेसे आहे."
"मग गुरुजी कालभैरवच कोपला तर? महाकालाचा कोप सर्वात भयानक ना?"
"नाही भैरवी. कालभैरवालाही शांत करता येऊ शकते. त्याचा कोप कधी होणारच नाही याची काळजी घेता येऊ शकते. अंधका तू सांग."
"अविचार, गुरुजी." इतका वेळ शांत बसलेला अंधक उत्तरला.
"अगदी बरोबर. आपण तांत्रिकांमध्ये हीच प्रवृत्ती सर्वाधिक आढळते. अविचाराने केलेल्या कामाचा परिणाम हा सर्वात भयानक! काही वर्षांपूर्वी आपण अविचाराने या शक्तीच्या स्वामीशी शत्रुत्व ओढवून घेतले."
पमाण्णा एका कोपर्यात हसत उभा होता.
"आपण केवळ नामशेष नाही झालो तर आपले अस्तित्त्व इतिहासाच्या पानांतून पुसले गेले. आज कोणालाही सांगूनही पटणार नाही कि कधीकाळी एक अत्यंत शक्तीशाली तांत्रिक पंथ या टेकडीवर राज्य करीत असे. याचे कारण केवळ अविचार. आणि अविचार कोठून येतो."
अहंकार! मी नकळत उत्तरतोय?
"बरोबर गुरुजी. हा माझा, अंधकाचा वंशज देखील अविचार आणि अहंकाराच्याच पावलांवर पाऊल ठेवतोय."
या दोन्हींचा उगम होतो अर्धवट माहितीतून - पमाण्णा
अर्धवट माहिती हीच मग सर्वात भयानक - भैरवी
सर्वात भयानक गोष्टीचा परिणाम अर्थातच सर्वनाश - मायाकापालिक
होय तुझा सर्वनाश होणार, सर्वनाश होणार, सर्वनाश, सर्वनाश, सर्वनाश, सर्वनाश, सर्वनाश, सर्वनाश!!!!!!
नाssssssssहीsssssssss
"काय झाले सरदार?" लाखनने आत डोकावत विचारले.
"कुछ नही." दुर्जन उत्तरला. त्याने हलकेच शेजारच्या तांब्यातून थोडेसे पाणी प्यायले. ऐन थंडीतही त्याला त्या दु:स्वप्नाने घाम फुटला होता. अखेरीस काय कमी आहे माझ्या माहितीत?
~*~*~*~*~*~
रात्रीच्या अंधारात जहागीरदारांची गढी अधिकच बुलंद भासे. एकतर मायकपाळमध्ये तेवढी मोठी इमारत दुसरी कुठली नव्हती. आणि कोण जाणे रात्रीच्या अंधारात त्या वाड्यात काय आकर्षक शक्ती तयार होत असे. दुरुन कित्येक माणसे तिकडे आकर्षित होत व मग त्यांना वाड्याचे पहारेकरी दूर घालवून देत असत. पण चुकूनही एकही प्राणी त्या गढीच्या आसपास फिरकत नसे. रात्रीत तर वटवाघळेही तिथे घोंगावत नसत. यामुळे वाड्यात नीरव शांतता असे. खरे तर शांत वातावरण कोणास आवडत नाही पण इतकी शांतता अंगावर येऊ बघते. पहारेकरी देखील अनेकदा या शांततेला घाबरुन काम सोडून गेल्याची नोंद होती. पण सध्याचे पहारेकरी हे निद्रादेवीचे उपासक असल्याने त्यांना या शांततेची फारशी चिंता नव्हती. त्या अंधारात एक व्यक्ती काळ्या बुरख्यात निर्धास्तपणे वावरत होती. तिने सज्जातून सहज दरवाज्यावर पाहिले. पमाण्णा दरवाज्यावर एखाद्या रक्षक आकृतीप्रमाणे बसला होता. त्याच्या पाठीतून दोन पंख बाहेर आले होते पण त्यांना पिसे नव्हती. त्याने एक जांभई दिली. त्या शांततेत त्या जांभईचा आवाजही भयावह वाटत होता. त्या बुरखाधारीने झपाझप पावले उचलली. अग्रज आपले कागदपत्र इथेच ठेवतो ना? हा विचार करीत ती व्यक्ती ग्रंथालयात घुसली. अलगदपणे तिने अग्रजच्या नोंदी तपासायला सुरु केल्या. ती येऊन गेल्याचा पुरावा जो नको होता. त्या नोंदवह्या चाळायला सुरुवात केली.
खजिना, कोडी, खजिना, गणित, खाडाखोड, गिचमीड, गिचमीड, खाडाखोड अरे काय आहे?
त्या व्यक्तीने एक कागद पैदा केला आणि त्या अत्यंत गिचमीडकांदा प्रकारातून काही माहिती मिळतीये का हे बघण्यास सुरुवात केली. झुरळाला शाईत बुडवून कागदावर नाचवले तर जे काही दिसेल त्यापेक्षा फार काही वेगळे अक्षर नाहीये या माणसाचे अशी मनाशी नोंद तर कागदावर काही शाब्दिक नोंदी करुन ती व्यक्ती सटकली.
चालुक्य - वेंगी - विष्णुभूपती - मानहानी - अनौरस - गुणवर्मन् - चोळ - श्रीविजय - पालेम्बंग - कालद्वीप - पमानानान्गल? - खंजीर - क्रिया - करार - आदित्यवर्मन् - वीराजी - पुणे
पमानानान्गलला अग्रजने लाल शाईने गोल करुन अधोरेखित केले होते. बुरखाधारी त्यातून अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत होता. पण सध्या तरी त्यातून सुसंगत अर्थ लावणे त्याच्या शक्तीच्या पलीकडचे होते.
~*~*~*~*~*~
उद्गम खंड १ - श्रीविजय मोहिम
मी कोण हे तुम्ही समजू शकत नाही. पमाण्णा? मजेशीर प्रश्न करता तुम्ही. पमाण्णा एक सामान्य पमानानान्गल माझ्याबद्दल काय समजावणार तुम्हाला? एक लुमिखाच कदाचित मी कोण ते तुम्हाला सांगू शकेल. माझा आणि गुणवर्धन् चा संबंध कसा आला हे तुम्हाला सांगणे खरे तर माझे कर्तव्य नाही. मानव प्राण्यापेक्षा आम्ही कोणी श्रेष्ठ आहोत. पण स्वप्नात येऊन तुम्हास सांगणे शक्य नाही आणि किडे-मकोडे नाचल्यासारखे अक्षर कोण आणि कधी वाचणार? त्यापेक्षा मीच माझ्या आयुष्यातील - छे फारच मनुष्यप्राण्यासारखे होत चाललो आहोत आम्ही - माझ्या आसपासच्या भागात घडलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो.
यवद्वीप व आसपासच्या द्वीपकल्पात, ज्याला आज तुम्ही इंडोनेशिया म्हणता, श्रीविजय साम्राज्य सार्वभौम होते. इथल्या समुद्रांवर त्यांची हुकुमत होती. व्यापारी दृष्टीकोण असल्याने त्यांनी सर्व समुद्री मार्ग नियंत्रणाखाली आणले होते. आमची त्यांना दहशत बसली होती आमच्या शक्तीमुळे. त्यामुळे कालद्वीपात आमचे बरे चालले होते. मनानानान्गल, पॉन्तियानाक, अस्वँग अशा विविध नावांनी आमची आठवण आजही शाबूत आहे. एकंदरीत बरे चालले होते पण आमची समस्या काही वेगळीच होती. काय समस्या? हाहाहाहा
अशा परिस्थितीत चोळ राजांशी त्यांचा खटका उडणे दुर्दैवी होते. पण राजेन्द्र चोळसारखा कर्तृत्त्ववान् सम्राट आपल्या व्यापारी हितांना हलकीशीही बाधा येणे खपवून घेणे शक्यच नव्हते. त्याने श्रीविजय साम्राज्याला धडा शिकवायचा म्हणून ही मोहिम आखली. चोळांचे आरमारी सामर्थ्य जबरदस्त होते. त्यासमोर श्रीविजयने सपशेल शरणागती पत्करली. सलामीलाच राजधानी पालेम्बंग चोळांच्या ताब्यात गेली. स्वतः सम्राट संग्रामविजयोत्तुंगवर्मन् बंदी बनला. काही काळ संपूर्ण श्रीविजय चोळांच्या ताब्यात होता. त्यानंतर पुढची काही दशके श्रीविजय राजे चोळांचे मांडलिक होते, नंतर त्याचे तुकडे पडले व ते विलयास गेले. जाईना! आम्हाला या वादात पडण्याचे कारणच काय? पण तियानाक ऐकेल तर ना!. तो सुरुवातीपासून या लोकांत मिसळत असे. पालेम्बंग, श्रीविजय साम्राज्याची राजधानी तर त्याचे आवडते ठिकाण बनले होते. आमच्या समस्या समाधानासाठी ते आवश्यकच होते म्हणा.
गुणवर्धन् कुठून आला याविषयी अधिक माहिती पमाण्णाने मिळविली. मालकांशी संबंधित असलेली वारसा प्रथा त्यानेच चालू केली. पण हे खरे गुणवर्धन् चोळांबरोबर पालेम्बंग मध्ये आला. पालेम्बंग मध्ये तियानाकला हरवण्यात तो यशस्वी झाला. पमाण्णाला तो कसा भेटला हे माहित नाही पण तिथून आम्ही या स्वतःला मालक म्हणवणार्या वंशाच्या संपर्कात आलो किंवा असे म्हणू का कि पुढची ८७२ वर्षे पमाण्णाने आमच्या अस्तित्त्वाच्या लढाईसाठी गुंतविली.
अजून ऐकायचे आहे? *छद्मी हास्य* मानव प्राण्यांची हीच सवय आम्हाला फारशी आवडत नाही. उतावीळ असता तुम्ही. गुणवर्धन् व आदित्यवर्मन् सोडता आम्हाला एकही आमच्या तोडीचा मनुष्य सापडला नाही. धीर सोडू नका. कोणी ना कोणी तुम्हाला नक्की सांगेल कि गुणवर्धन् ने नक्की काय केले.
~*~*~*~*~*~
अग्रज अथक प्रयत्नांनंतर ती भाषा आत्मसात करण्यात यशस्वी झाला. तो आता पुढच्या अंशाच्या कोड्यावर काम करत होता. तो एवढेच सांगत होता - "आपल्याला एक कार्डिऑईड काढावा लागणार आहे. जर पहिली जागा (०,०) कॉऑर्डिनेट्स वर पकडली तर कार्डिऑईडचा कस्प कोणत्या कॉऑर्डिनेट्स वर येईल ते शोधायचे आहे. बाकी भाषांतर आपल्या कामाचे नाही."
अग्रजच्या प्रयत्नांचे कौतुक झाले असले तरी त्याने सांगितलेले कोडे व भाषांतर कळत नसल्याने सर्व, विशेषकरुन हैबतराव अस्वस्थ झाले होते. प्रतापला त्यांच्या अशा अवस्थेची कल्पना होती. त्यामुळे त्यांनी बोलावणे पाठवल्यावर त्याच्या पोटात नाही म्हटले तरी गोळा आलाच होता.
"ये प्रताप. तू आज काही बोलणार नाहीस. फक्त ऐकशील. स्वप्नांचा पुरावा पुरेसा ठरावा पमाण्णा."
पमाण्णाला तोवर प्रतापने बघितलेच नव्हते. मागे उभा असलेला पमाण्णा पुढे आला.
"मला अजूनही वाटते कि तुम्ही मला रक्ततपासणी करु द्या. त्याच्या इतका खात्रीलायक पुरावा दुसरा नाही."
"नको. त्याची अजून तयारी झाली नाही. तो वीराजी इतका थंड डोक्याचा नाही, आईवर गेलाय. भावुक जास्ती आहे. तसेही मी संपूर्ण मालकी त्याच्याकडे नाही सोपवत आहे. फक्त त्याला खजिना शोध मध्ये मदत मिळण्यासाठी आपण हे करतोय. तसेही त्याला हे कळणारच आहे."
"काय आजोबा?"
"प्रताप. पमाण्णा मानव नाही. त्याला पळून जाऊ देऊ नकोस. तशी काहीतरी व्यवस्था कर. तो आत्ताच किती बावरलाय. जहागीरदाराला हे शोभत नाही."
प्रतापला आपल्याला कोणीतरी धरुन ठेवलंय याची जाणीव झाली. जणू अनेक अदृश्य हात त्याला घेराव घालून होते. पमाण्णा काहीसा विचित्र दिसत होता. हे काय होतंय?
"पमाण्णा तुझे रुप स्पष्ट कर."
पमाण्णाची त्वचा सैलावल्यासारखी दिसत होती. त्याचे डोळे अचानक खोल जाऊ लागले. नव्हे त्याचे कातडे जणू चेहेर्यावरुन ओघळत होते. त्याने आपल्या गळ्यातील ती साखळी काढून टाकली. तिथे एक संपूर्ण गळ्याभोवती शिवलेली जखम होती. त्याचे टाके तटातट तुटू लागले. लवकरच तिथे एक रामोश्याची त्वचा पडली होती.
"पमाण्णा. हे काय आहे नक्की आजोबा? पमाण्णा कुठे गेला?"
"तो येथेच आहे. नीट बघ."
प्रताप रोखून बघू लागला. त्याला अंधूकशी एक आकृती दिसू लागली. तिला पंख असल्याचे त्याला जाणवले. पण चेहेरा मानवाकृतीच वाटत होता, डोक्यावर एकही केस नव्हता. पंख वगळता ती मानवाचीच प्रतिकृती वाटत होती.
"हे आहे पमाण्णाचे खरे रुप. लक्षात घे तो भूत नाही, राक्षस अथवा पिशाचही नाही पण तो मानवही नव्हे. त्याच्या शरीराचा प्रत्येक कण इतक्या वेगाने सतत थरथरत असतो कि तो आपल्याला सामान्यतः दिसणे कठीणच आहे. तो मानव शरीर आपण कपडे धारण करतो तसे धारण करु शकतो पण तो शरीराची झीज पूर्णपणे थांबवू शकत नाही म्हणून त्याला ठरावीक काळानंतर शरीर बदलतो. हे शरीर त्याला १८ वर्षांपूर्वी एका रामोश्याकडून मिळाले."
"मालक माझ्यामते त्याला दम खाऊ द्या."
प्रतापला खरंच वेळ पाहिजे होते. त्याला हे पचविणे कठीण होते. थोड्यावेळाने त्याला आपण काय आहोत याची कल्पना आली.
"छोटे मालक तुम्ही बरोबर समजत आहात. जर तुम्ही खरोखरच वीराजी राजांचे वारस असाल तर मी तुमचा."
प्रताप चमकला. यावर हैबतराव हसून म्हणाले
"ती एक अलौकिक शक्ती आहे प्रताप. मनातले वाचणे तिच्यासाठी डाव्या हातचा मळ आहे. तसेच तुझ्या हालचाली समजून घेणे माझ्यासाठी खेळ आहे. प्रताप..." हैबतराव थोडेसे पुढे आले. थरथरत्या हाताने त्यांनी प्रतापच्या चेहेर्यावरुन हात फिरवला. आणि फाड्ड........
"तू माझा खजिना त्या सुधारक मंडळींच्या घशात घालणार? तू असा विचार करूच कसा शकतो?"
फाड्ड फाड्ड फाड्ड फाड्ड एका पाठोपाठ प्रतापच्या कानशीलात चपराका हाणल्या जात होत्या.
"तुझ्या मित्राचेही दान पदरात घालणारच आहे मी. एकदा सर्व खजिना ताब्यात येऊ दे. इथून पुढे सर्व शोधात पमाण्णा तुझ्याबरोबर राहिल. पमाण्णा कधीकाळी तुझाच असेल पण तोवर तुला नजरेखाली ठेवणे गरजेचे आहे."
प्रताप आता भेदरला होता. त्याला त्याच्या प्रेमळ आजोबांचे हे रुप नवीन होते.
"पोरा असे काय करतोयेस? आपल्याकडे फार वर्षे शिल्लक नाहीत. अरे.." दीनवाण्या हैबतरावांना अदृश्य पमाण्णाने थोपविले. आत्ता नाही असेच काही बोलत असावा.
"पमाण्णा तुझ्यावर नजर ठेवणार असला तरी तो तुझ्या अंशतः हुकुमात राहिल. त्याच्या शक्तीचा योग्य वापर करुन घे."
हैबतराव अजूनही काही बोलणार होते. पण तेवढ्यात काही आवाज ऐकू आला. ते सर्व बाहेर आले. अग्रज "पोलार नॉट कार्टेशियन" करीत नाचत होता. हैबतरावांच्या चेहेर्यावर पुन्हा हसू खेळू लागले. अजून एक कोडे सुटले, अजून एका प्रवासाला सुरुवात. पण यावेळी तरी खंजीर मिळणार का?
क्रमशः
टीपः श्रीविजय साम्राज्य इंडोनेशियन साम्राज्य होते व त्यांच्या समुद्रावरील हुकुमत व अनुषंगाने आलेली नावे सत्य आहेत. (विकिपीडीयावरुन साभार) राजेन्द्र चोळ या चोळ राजाने श्रीविजयचा निर्णायक पराभव १०२५ साली केला. मोहिमेचे नक्की कारण ठाऊक नाही, कादंबरीतील कारण काल्पनिक आहे. भारत व इंडोनेशियामधील अन्यथा सौहार्दपूर्ण असलेले संबंध लक्षात घेता या युद्धावर अनेक इतिहासतज्ज्ञ आश्चर्य व्यक्त करतात. मनानानान्गल, पॉन्तियानाक, अस्वँग ही फिलिपाइन्स, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर भागातील भूतांची नावे आहेत जसे आपल्याकडे वेताळ, गिरा, मुंजा, समंध वगैरे असते तसे.
पुढील कथासूत्र येथे - http://www.maayboli.com/node/52696
मस्त!! उत्कंठा वाढतेय..
मस्त!! उत्कंठा वाढतेय..
सही चालली आहे कथा.
सही चालली आहे कथा.
पुढचा भाग कधी येणार मालक..
पुढचा भाग कधी येणार मालक..
मस्त सुरू आहे.
मस्त सुरू आहे.
हिम्सकूल - उद्या रात्रीपर्यंत
हिम्सकूल - उद्या रात्रीपर्यंत येईल
मस्त चाललयं... पुढचा भाग कधी
मस्त चाललयं...
पुढचा भाग कधी येणार मालक.. >>>> +१
सहीये.
सहीये.
छान..
छान..
काय बोलावे..... १च नम्बर
काय बोलावे..... १च नम्बर !!!
कमाल आहे.. आवडल..
कमाल आहे.. आवडल..
मस्त आहे..
मस्त आहे..
अत्यंत अभ्यासपूर्वक केलेले
अत्यंत अभ्यासपूर्वक केलेले लेखन असे लेखन मी स्पार्टा कस यांच्या लेखनात बघितले आहे इथे मी तुलना करू इच्छित नाही पण खरेच अत्यंत उत्कंठा वाढवणारे लेखन …………. चालू द्या असेच