वारसा भाग ८

Submitted by पायस on 6 February, 2015 - 18:03

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/52602

पंचक गावाच्या वेशीवर पोहोचले. त्यांच्या येण्याची वर्दी हैबतरावांपर्यंत पोचविण्यात आली. पोरं परत आली हे ऐकल्यावरच जहागीरदारांच्या गढीवर चैतन्य पसरले होते. आल्या आल्या त्यांनी हैबतरावांची भेट घेतली. प्रतापने आजोबांचा आशीर्वाद घेत त्यांच्या पायावर आणलेले धन ठेवले. त्या अंधार्‍या खलबतखान्यालाही ते धन उजळून टाकत होते. हैबतरावांचा आनंद गगनात मावत नव्हता.
"पोरा तू धन्या आहेस. तू आमच्या प्रतापचा मैतर बनलास हे संपूर्ण जहागीरदार घराण्याचे भाग्यच!"
अग्रज त्या स्तुतीने थोडासा लाजलाच. पमाण्णाने मागून एक कौतुकमिश्रित धपाटा घालत आपला आनंद दाखविला.
"आजोबा मी आत्ताशी कुठे कामाला सुरुवात केलीये." अग्रज लाजत लाजत उत्तरला.
"आरं असं कसं. ज्या खजिन्यापायी जहागीरदारांच्या ५ पिढ्या खर्ची पडल्या तो शोधलाय तू. बोल तुला काय पाहिजे ते माग."
"आजोबा अहो असं काय करताय? हा खजिन्याचा पहिला हिस्सा आहे. तुम्ही दाखविलेल्या खजिन्याच्या समोर ती गुहा काहीच नव्हती. अजून खूप कोडी सोडवावी लागणार आहेत."
"अरे जाऊ दे उरलेले हिस्से. या खजिन्यात तुम्हाला एक खंजीर मिळाला असेलच. तो आणला तरी मला पुरे."
आता सगळेच गोंधळले. खंजर? शेवटी बळवंतने विचारले
"आजोबा कसला खंजर? तिथे काही हत्यारे होती खरी. त्यात काही खंजीर देखील होते पण तुम्हाला नेमका कोणता हवाय?"
"ते सामान्य खंजीर असतील. फार फार तर रत्नजडीत मूठ वगैरे वाले. हा खंजीर विशेष आहे. दिसायला तो अगदी साधा आहे. म्हणून त्या खजिन्यात तो अगदीच विजोड भासेल. पण त्याच्या दिसण्यावर जाऊ नका."
"असं काय आहे त्या खंजीरात?" शामने उत्सुकतेने विचारले.
"अरे त्या खंजीरातच सर्वकाही आहे. त्या खंजीराशिवाय......"
आणि हैबतरावांचा आवाज गळ्यातच अडकला. मागे उभा असलेला पमाण्णा आता त्यांच्याकडेच बघत होता. त्याचा चेहरा क्रुद्ध भासत होता. पण सर्वात बदललेली गोष्ट म्हणजे त्याचे डोळे. काळ्या बुबुळात पांढरी बाहुली असलेले ते डोळे जणू बजावत होते, तू करार मोडतोयस.
"त्या खंजीराशिवाय?" शामने वाक्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. अग्रजने आजोबा ज्या दिशेला बघत होते तिकडे बघितले. पमाण्णा तसाच शांत उभा होता. त्याचे डोळे अग्रजला सामान्यच भासले. पमाण्णाच मदतीला धावला.
"मालकांना म्हणायचे होते कि त्या खंजीराशिवाय जहागीरदार बिरुदाला काही अर्थ नाही. तो खंजीर सामान्य असला तरी मुधोजीरावांचा आहे. तो जहागीरदार घराण्याचा जणू वारसाच आहे. खजिन्यापेक्षाही तो मालकांना आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून तो महत्त्वाचा वाटतो. होय कि नाही मालक?"
हैबतरावांनी घाम पुसत मानेनेच रुकार दिला.
"असा कुठला खंजीर दिसला तर नाही बुवा." बळवंत आपल्या स्मरणशक्तीला शक्य तितका ताण देत म्हणाला.
जहागीरदारांनी उसासा सोडला. "हरकत नाही. पुढच्या अंशाला शोधण्याच्या कामाला लागा. पमाण्णा यांची आजची सोय लावा. अग्रज इथून पुढचा बेत काय असणार आहे?"
"मी इथून काही कागदपत्रे घेऊन बाहेर पडेन म्हणजे वारंवार इथे परतायला नको. पमाण्णा आमच्याबरोबर येतील सापडलेला खजिना ताब्यात घ्यायला. तिथेही एक छोट्या कोनाड्यावजा जागेत काही कागदपत्रे व पुस्तके होती. त्यांचाही अभ्यास करणे मी जरुरी समजतो. आमच्या बरोबर पुरेशी शिधासामुग्री द्यावी म्हणजे आम्ही पाचजण तिथे राहून पुढच्या गुहेचा शोध घेऊ शकू. ती तिथून फार लांब नसणारच त्यामुळे गुहा क्र. १ ला एखाद्या ठाण्यासारखे वापरावे म्हणतो."
या योजनेला सर्वांची मूक संमती लाभली. त्या रात्री जंगी मेजवानी देण्यात आली. सर्वत्र आनंदी आनंद होता. या वातावरणात एक बुरखेधारी व्यक्ती जलदीने कोठेतरी जाऊ लागली. लवकरच ती इष्ट ठिकाणी पोचली. लाखन तिथे उभाच होता. आता त्याला कवचाची जरुरी नव्हती. मायाकापालिक बनल्याचे काही फायदे होते.
"सरदाराचे नाव?"
"८ सहस्त्र दोनशे ऐंशी" - आता त्याला या सांकेतिक भाषेची पूर्ण ओळख झाली होती.
"ह्ख्द्ङ" त्या बुरखाधारीनेही बरोबर व्यंजनमाला उच्चारुन संकेत पूर्ण केला.
"बोल काय खबर आणली आहेस?"
"पहिला अंश सापडला. मी ते ठिकाण लक्षात ठेवले आहे. हा त्याचा नकाशा. ही लोक इतक्यात बाहेर नाही पडत. सरदार हवे तेव्हा इथे जाऊ....न"
लाखनने तो नकाशा बघितला न बघितला आणि टरकावला.
"हे हे काय केले? आता सरदार तिथे जाणार कसे? खजिना लुटणार कसे?"
"सरदारना खजिना लुटण्यात रस नाही. त्यांना या गावाला बेचिराख करण्यात रस आहे. ती शक्ती यामध्ये अडथळा बनू शकते. तिच्या विषयी सांग."
बुरखाधारीला प्रथम विश्वासच नाही बसला. सरदारना फक्त गाव नष्ट करायचे आहे. "ती शक्ती आमच्या बरोबर परवा निघेल. आम्ही तिथे १ दिवसात पोहोचू. थोडक्यात ३ दिवसांनंतर गाव नक्की मोकळे मिळेल."
"हम्म. ठीक आहे.जय महाकाल"
"जय महाकाल"
~*~*~*~*~*~

मायाकापालिक फ्लॅशबॅक खंड २

मायाकापालिक अस्वस्थ होऊन येरझार्‍या घालत होता. ते दोन तरुण येऊन आता एक आठवडा लोटला होता. तलवारीची ती जखम फारशी खोल नव्हती. पण केवळ या आठवणीनेच ठसठसत होती. जर मी ठरवले तर हे मंदिर विस्मरणात जाईल, मी शब्दवेधी आहे - त्या तरुणाचे शब्द मायाकापालिकाच्या मनात घुमत होते. त्याचे सर्व ताकदवान शिष्य एकत्र आले होते. पण का कोण जाणे त्याला एक अजब भीती वाटत होती. टेकडीवर आत्ता असलेले शिष्य हे गेल्या वेळी मार खाल्लेल्या शिष्यांसारखे सामान्य नव्हते. प्रत्येकाने थोड्या फार प्रमाणात सिद्धी प्राप्त केल्या होत्या. त्याचे स्वतःचे अजेय व्याघ्ररुप होतेच. तरी का कोण जाणे तो तरुण सामान्य भासत नव्हता. आणि त्याच्या बरोबर आलेला तो...... त्या तरुणाकडे इतकी सामर्थ्यवान शक्ती कशी आली? त्या शक्तीविषयी महाकालच्या या सर्वश्रेष्ठ भक्तासही कसे काहीच ठाऊक नाही. गुरुजी, अचानक त्याला हाक ऐकू आली.
"गुरुजी डोंगराला वेढा पडलाय."
तो धावत धावतच कड्यापाशी गेला. तिथे त्याचा आवडती शिष्या भैरवी उभी होती. तिने आदराने त्याला प्रणाम केला. संपूर्ण टेकडीला मानवी कडे घातले गेले होते. ६०० बहमनी सैनिक आदित्यच्या दिमतीस होती. पुढे मागे तिथे छोटासा किल्ला उभारता येईल या महमूद गावानच्या योजने अंतर्गत ही मोहिम आखण्यात आली होती. अर्थात गावानला हे माहिती नव्हते कि तिथे भविष्यात कधीच किल्ला बनणार नव्हता. मायाकापालिक मात्र विनाकारण भरडला जाणार होता. भैरवी त्याच्याकडे पाहत होती. तिला कळून चुकले कि या युद्धात आपला विजय होणे अवघड आहे.
--------------

त्याला युद्ध म्हणावे का? बहमनी बखरकारांनी या एका प्रश्नामुळे या युद्धाचा उल्लेख बखरीमध्ये यातर टाळला आहे किंवा एका ओळीची वाटाण्याची अक्षता दाखविली आहे. अर्थात यामुळे आदित्यला काहीच फरक नाही पडत. पमाण्णाबरोबर आधी जाऊन त्याने दोन कामे आधीच करुन ठेवली होती. मायाकापालिकाचे धैर्य किंचित खच्ची केले होते. तसेच त्याने तांत्रिक सेनेचा अंदाज घेऊन ठेवला होता. मुख्य वेदीपाशी अजून २ आसने होती म्हणजे जेमतेम २ तगडे शिष्य असले पाहिजेत. राहायची सोय फार फार तर ५० जणांची असावी. म्हणजे ६०० सैनिक त्यांना निश्चित संख्याबळात भारी पडणार. आदित्यने सेनेची दोन भागात विभागणी केली ४००+२००. वेढा घातल्यावर त्याने ४०० सैनिक सरळ वर पाठवले. त्यांना माहित नव्हते कि ते आत्मघाती पथक आहे. मंत्र तंत्र अगदीच काही कमी नव्हते. आदित्यला माहित होते कि हे मंत्र तंत्र बरेचसे वनस्पती विज्ञान आहे. तिथल्या विशिष्ट वनस्पतींच्या आहुत्यांमुळे तिथले वातावरण दूषित असते त्याचा परिणाम होतो. हे माहित असण्याचे मुख्य कारण हेच होते की त्याला माहित होते कि पमाण्णा भूत-पिशाच नाही. व्हायचे तेच झाले. तांत्रिकांनी जोरदार लढा दिला. बरेचसे मांत्रिक हे प्राणी रुपात येऊन हल्ले चढवू लागले. स्वतः मायाकापालिक वाघाच्या रुपात येऊन जबरदस्त लढा देऊ लागला. मायाकापालिक, भैरवी व काही मोजके शिष्यगण वगळता सर्वजण कापले गेले. बरेचसे सैनिकही धारातीर्थी पडले. पण तेवढ्यात आदित्य उरलेल्या २०० सैनिकांबरोबर आला. २०० सैनिक भैरवी व उरलेल्या मूठभर तांत्रिकांवर तुटून पडले. स्वतः आदित्य व पमाण्णा मायाकापालिकासमोर उभे ठाकले.
"तुला मी सोडणार नाही आदित्य हे रुप अभेद्य आहे हे लक्षात ठेव."
पमाण्णा व व्याघ्र सामना रंगला. पमाण्णाचे अंग रक्ताने भरुन गेले पण वाघाच्या अंगावर एक ओरखडाही उठत नव्हता. काहीतर गडबड होती. त्याच्या गळ्यातील कवटीची माळा का चमकतीये, हा प्रश्न आदित्यला पडला.
"पमाण्णा त्या माळेवर हल्ला चढव"
कापालिकाने लगेच बचावात्मक पावित्रा घेतला. आदित्यने धनुष्यबाण काढला.
"तू गुरुजींना रोखू शकत नाही." भैरवीने आदित्यला वेगळा पाडला. तिने ते रसायन वापरुन लगेच त्याला तात्पुरते आंधळे केले. आता कसोटीचा काळ होता. भैरवी त्याला भारी पडत होती. ती आडव्या पडलेल्या आदित्य समोर विजयी मुद्रेने उभी राहिली.
"आता लवकरच आमचा विजय आणि........." तिच्या तोंडातून रक्ताची धार बाहेर पडली. शब्दवेध्याने तिच्या गळ्यावर जोरात मुष्टीप्रहार केला होता.
"भैरवी.." मायाकापालिकाचे लक्ष भंगले आणि पमाण्णाने ती कवटी उडवून लावली. लगेच त्या व्याघ्ररुपावर असंख्य जखमा दिसू लागल्या. त्याही अवस्थेत त्याने जोरात हुंकार देत पमाण्णाला दूर ढकलले आणि तीच त्याची चूक ठरली. हुंकाराचा वेध घेत आदित्यने कंठाचा अचूक भेद केला. मायाकापालिकाचा समूळ विनाश झाला.
------------------

लांडग्याच्या रुपात लढणार्‍या त्याच्या दुसर्‍या मुख्य शिष्याला आदित्यने सोडून दिले ते परत कधीही न येण्याच्या अटीवर. त्या मुख्य शिष्याला हे कळून चुकले होते कि व्याघ्ररुपाशिवाय आपल्याला जिंकण्याची काही संधी नाही त्यामुळे वेळ घालवायला तोही उत्सुक होताच.
"पमाण्णा आता हे मंदिर बदलायला हवे."
"मालक तुम्ही फक्त हुकुम सोडा."
"इथे एक सीतेचे मंदिर उभारा. या आराखड्यात फार बदल करता येणार नाहीत. जेवढे जमतील तेवढे करा."
"मालक सीताच का?"
"आता या लढाईनंतर नाही म्हटलं तरी मायाकापालिक हे नाव कानावर आलंच असेल लोकांच्या. मायाकापालिक चे आपण करु मायकपाळ. सीतेने भूदेवी म्हणजे तिच्या माय/आईला भेटून जिथे कपाळ टेकविले ती जागा. कशी वाटती नवी दंतकथा?"
"एकदम झकास"
आदित्य हसला. खरंच ते मंदिर त्याने विस्मरणात घालविले होते.

मायाकापालिक फ्लॅशबॅक समाप्त
~*~*~*~*~*~

आजही विचित्र स्वप्नाची रात्र दिसतीये. आलाच तो बाबा.
"प्रणाम"
"प्रणाम मालक. अभिनंदन तुम्ही पहिला अंश शोधण्यात यशस्वी झालात. मी सांगितलेला शोधही पूर्ण करत आणला आहे."
"होय. खजिना शोध काळात बरे झाले ते शोधण्यास सांगितले. माझ्या बर्‍याच शंका दूर झाल्या."
"मालक. पमाण्णा जुन्या मालकांच्या ताब्यात आहे. ते आहेत उतावीळ स्वभावाचे. त्यामुळे तो चुका करु शकतो. त्या होऊ नयेत म्हणून ही खबरदारी."
"बरं मला एक सांग तो खंजीर ज्याच्या विषयी आजोबा बोलत होते. तो मुधोजीरावांचा आहे वगैरे शुद्ध थापा होत्या ना?"
"आदित्य नंतर तुम्हीच सर्वात हुशार वारस आहात. होय. त्या थापाच होत्या. अर्थात तो खंजीर मुधोजीरावांचाच आहे पण तो मोठ्या मालकांना हवा असल्याचे कारण संपूर्णपणे वेगळे आहे."
"अर्थातच तू मला म्हणणार असशील कि ते कारण जाणून घ्यायची वेळ अजून आली नाही."
तो साधू गालातल्या गालात हसत उत्तरला "तसेच काहीसे. एवढे समजा पमाण्णावर संपूर्ण सत्ता गाजवायची असेल तर त्या खंजीराशिवाय पर्याय नाही."
"आज इतकेच पुरे. आज मीच तुझी रजा घेतो."
"जशी तुमची मर्जी मालक"
~*~*~*~*~*~

अग्रज विविध कागदपत्रे घेऊन बसला होता. प्रतापने सहज येऊन डोकावले. इतर सर्वजण तयारीत मग्न होते. उद्या त्यांना गाव सोडायचे होते. प्रतापने पाहिले तर सर्व कागद त्या विचित्र भाषेशी संबंधित होते.
"काय रे? हे काय घेऊन बसला आहेस?"
"अरे तुझ्या आजोबांनी साधारण काय प्रकारचा संदेश दिसेल पहिल्या दारावर याची कल्पना दिली होती. त्यामुळे तेवढे शब्द शिकलो आणि भावार्थ लावला. आता तू पाहिलेच कि पुढचे कोडे याच लिपीत आहे. त्यामुळे ही लिपी शिकावीच लागेल."
"पण कशी शिकणार तू? आजोबा म्हणतात कि भलतीच अवघड आहे ती."
"समसंबंध. मी अशी वाक्ये वेगळी काढतो ज्याच्यात समान शब्द असतील मग त्यांच्याशी मॅच करत जातो तसे तसे संकेत. सब्स्टिट्युशन सिफर सोडवायची बेसिक रीत. ही भाषाही मजेशीर आहे. हिच्यात वाक्ये क्रियापदापासून सुरु होतात. नामांमध्ये लिंगभेद होत नाही तसेच क्रियापदांना वचन, काळ यानुसार प्रत्यय लागत नाहीत. म्हणजे माझे नाव अग्रज आहे ला ते 'अग्रज नाव मी' अशा संरचनेत लिहितील."
"मग काळ कसा दर्शवतात?"
"ते काळ दाखवणार शब्द घेतात. उदा. भूतकाळासाठी होता चा समानार्थी शब्द वाक्यात घेतील."
"बापरे एवढे सर्व तू शोधून काढलेस?"
अग्रज स्तुतीने सुखावला. "शोधलेच पाहिजे नाहीतर पुढचा संदेश कसा कळणार? आता फक्त शब्दसंपत्तीची कमी आहे. त्यासाठीच या जुन्या कागदांची तपासणी म्हणजे नवीन शब्द कळत राहतील."
प्रतापने मान डोलाविली. पहिल्या यशाने सुखावलेले ते मित्र आता पुढच्या शोधाला लागले होते. इकडे हैबतराव मनोमन प्रार्थना करीत होते - त्या दुसर्‍या अंशात तरी खंजीर असू दे.

क्रमशः

टीप : महमूद गावान हा बहमन शाही साम्राज्याचा वजीर होता. त्याच्या नेतृत्त्वाखाली बहमनी राज्य त्याच्या कळसावर पोचले. बहमनशाही एक दखनी पातशाही होती जी १४व्या शतकाच्या शेवटी शेवटी उदयास आली. हिचेच पुढे तुकडे पडून निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही इ. तयार झाल्या.

पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/52677

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त चालू आहे. लवकर पुढला भाग टाका. ट्रॅपपाठोपाठ वारसाने देखील मायबोलीला घेरलंय.
>>>>> +१

नंदिनी, खुपच आवडलीय काय कथा ??? डबल पोस्ट टाकलीस Wink

Katha lihnyasathi angraj pekha jast abhyas tumhala karava lagla asnar as watat aahe (Y) exlnt