वारसा भाग ७

Submitted by पायस on 4 February, 2015 - 18:19

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/52585

रात्रीच्या आकाशाला निरखणे हा किती आनंददायी अनुभव असतो. जणु मुक्तहस्ताने कोणी असंख्य हिरे उधळुन दिले आहेत. हा व्याध, हि चित्रा, हे रोहिणी अशी नक्षत्रे ओळखत सहज वेळ घालवतो येतो. प्रताप प्रथमच हा अनुभव घेत होता. रात्री जागण्याचे पहारा, अचानक करायचा हल्ला, अंधारात भूत-प्रेत विरोधात हिम्मत दाखवणे इ. सोडून हे नवीनच कारण तो ऐकत होता.
" ते बघ. आता सप्तर्षी अस्तास गेले कि शर्मिष्ठेवरुन ध्रुवतारा शोधता येतो. हे पाच तारे इंग्रजी एम आकारात जोडले कि शर्मिष्ठा नक्षत्र बनते. युरोपियन्स त्याला Cassiopeia म्हणतात. तर चिनी लोकांना तिथे त्यांचा राजे-महाराजांचा पूल 'ब्रिज ऑफ किंग्ज' दिसतो ज्यावरुन त्यांचा महान रथ वांग-लिंग जात आहे. अजब आहे नाही कोणाला तो पूल दिसतो कोणाला ती शापित राजकन्या तर कोणाला खुर्चीवर बसलेली राणी."
"खरंच मित्रा. आपण बघू तसे जग दिसते याचे याहून दुसरे सुंदर उदाहरण ते काय. आता तू दाखवलेल्या पेगॅसस मध्ये मला घोडा तर सोडच, एक चौकोनी ठोकळा जेमतेम दिसत होता."
दोघेही खळखळून हसले. त्यांच्या प्रवासाची ही पहिलीच रात्र होती. त्यांचे पथक अत्यंत छोटे ठेवण्यात आले होते. अग्रज, प्रताप, शाम, बळवंत व स्वयंपाक आणि इतर किरकोळ गोष्टींकरिता मंजूलाही बरोबर ठेवण्याची सूचना झाली होती. तिला या टेकड्या व डोंगरांची चांगली माहिती असल्याचाही उपयोग होऊ शकला असता. खरेतर याला मंजूच्या घरातूनच विरोध झाला होता. एकटी पोर अशी पाठवायची म्हणजे. आणि खजिना शोध मोहिमेत पोरगी कशी उपयोगी पडणार? कसेबसे मंजूने घरच्यांना तयार केले होते कारण तिला स्वतःला या मोहिमेत रस होता. अग्रजची यावरची टिप्पणी शामने डायरीत नमूद करुन ठेवली होती.
"गंमत आहे नाही. एकीकडे पुण्यातले सुधारक स्त्री-पुरुष समान हक्क प्रतिपादित करत आहेत आणि दुसरीकडे अजूनही खेड्यात याचे वारेही लागलेले दिसत नाही. मंजू येणे किंवा न येणे हा इथला प्रश्नच नाही. पण काही समज इतके ठाम आहेत कि बास. कदाचित युरोपीय शिक्षणपद्धतीत वाढल्यामुळेही मला हा एवढा मोठा इश्यु नाही वाटत. तसेच मला नाही वाटत आपले १०० वर्षांनंतरचे वंशज सुद्धा फारसे वेगळे असतील एवढी खोल या वृत्तीची पाळेमुळे रुजली आहेत."
हो ना करता करता ही पंचकडी बाहेर पडली होती. दुर्जनचा संभाव्य धोका लक्षात घेता एका मोठ्या पथकाबरोबर यांची रवानगी झाली होती. मग गुपचूप रात्रीत ते या पथकापासून वेगळे होऊन १७.६४,७३.५६ कडे रवाना झाले होते. दुर्जनला असे वाटावे की ते अजूनही या पथकातच आहेत अशी अपेक्षा होती म्हणून ते पथक काही दिवस आसपासच्या डोंगरांमध्येच भटकणार होते. अग्रजने रात्रीचा प्रवास करण्याचे ठरविले. तो मोहिमेचा मुखत्यार होता.
"मान्य रात्रीचा प्रवास सामान्यतः धोकादायक असतो. पण आपले मार्गदर्शक तारे रात्रीचेच दिसतात. आणि तसेही दुर्जन का जो कोण आहे ज्याच्याविषयी प्रतापला सावध राहायला सांगितले गेले आहे, खरे तर प्रताप तू त्याची काय दुश्मनी आहे हे नीट सांगत नाहियेस सर्वांना पण असो तुझे जहागीरदारांचे गुपित, तो अशी अपेक्षाच करणार नाही की आपण रात्रीचा प्रवास करु. त्याचा फायदाही मिळेल. दिवसा मुक्काम करणे देखील सोयीस्कर पडते, आश्रय मिळणे सोपे जाते. रात्रीचा देखील आपल्याला सलग असा प्रवास नाही करायचा. मधून मधून आपण विश्रांती घेऊ आणि तिथे सेक्स्टंटच्या मदतीने अक्षांश रेखांश मोजू. ठीक आहे?"
अग्रजची योजना अशी होती कि प्रथम आपण १७.६४ = १७ ३८' २४'' अंश अक्षांशाला पोहोचू. मग तिथून रेखांश बघून पूर्व/पश्चिमेला सरळ प्रवास करु. त्यानुसार ते मार्गक्रमण करीत होते. सेक्स्टंट म्हणजे एक प्रकाराच कोनमापक. पण तो दूरवर दिसणार्‍या गोष्टींमधला कोन मापू शकतो. अक्षांश मिळवण्यासाठी जमीन व ध्रुवतारा यांच्यातील कोन मोजावा. तो कोन म्हणजे त्या जागेचा अक्षांश. ते सध्या १७.३ अक्षांशापर्यंत पोचले होते. सकाळी सकाळी कोणा छोट्याश्या वाडीत त्यांना आसरा मिळाला.
"कशी असेल रे ती जागा? जादूच्या गोष्टीत सांगतात तसले तिलिस्म वगैरे काही नसेल ना?" शामचे भाबडे प्रश्न आता त्यांच्यापर्यंत पोचत नव्हते. प्रवासाने थकून सर्वजण त्यांच्या आश्रयकर्त्याच्या घरी झोपेच्या अधीन झाले होते.
~*~*~*~*~*

मायाकापालिक फ्लॅशबॅक खंड १:

काळ : पंधरावे शतक (१४७० च्या आसपास)

ती टेकडी आसपासच्या भागात कुख्यातच होती. कोणी म्हणे तिथे आमुशेला येताळाची पालखी निगतीया. तर कोणी सांगे कि त्या टेकडीवर एक तळे आहे आणि त्यात आसरा राहतात. कोणी म्हणे कि तळे नसून विहीर आहे आणि तिथे हडळ राहते व वर शपथेवर भर घाली कि त्या हडळीने आपल्याला वर ओढून न्यायचा प्रयत्न केला. वेताळ, पिशाचे, लावसट, खवीस या सर्व भूतांच्या कहाण्यांनी त्या डोंगराला भारुन टाकले होते. पंचक्रोशीतले गुराखी तर त्याला भूताचा डोंगर म्हणूनच संबोधत. या डोंगराच्या आसपास फिरकायला गुरेढोरे देखील घाबरीत तर माणसाची काय बिशाद! पण या सर्व अफवांच्या पलीकडे त्या डोंगरावर काही होते हे नक्की कारण अधून मधून माणसे गायब होते आणि ती त्या टेकडीवजा डोंगराच्या पायथ्याशी सापडत. इतक्या दंतकथांमध्ये गुरफटलेला तो डोंगर, पण काही जुन्या जाणत्यांना त्यामागचे गुपित ठाऊक होते.
" पोरा काय नाव सांगितलंस? आदित्य नाही का? सूर्यावाणी तेजःपुंज भासतोस खरा. तू आणि तुझा हा मित्र जायचे म्हणताय खरे त्या डोंगरावर पण एवढ्या तरुण वयात.... असो मला भेटलात ते बरे झाले तेवढाच या म्हातार्‍याचा दोन जीव वाचवायला उपयोग झाला तर झाला. नीट कान देऊन ऐका तर.
त्या डोंगरावर कोणी भूत नाही. तिथे काही अघोरी तांत्रिक राहतात. मी स्वतः कधीकाळी त्या तांत्रिकांच्या उपासना स्थळापर्यंत जाऊन आलोय. तसा त्यांचा कोणाला उपद्रव नसतो, त्यांनी माझी मदतच केली म्हणा. पण तांत्रिक तो तांत्रिकच. त्यांना अनेकदा नरबळी लागतो. जवळच्या स्मशानात अनेकदा ते मानव मांसभक्षणासाठी गुपचूप येत असतात. ते तिथे केव्हापासून आहेत माहित नाही. पण एक खरे कि त्या टेकडीवर केवळ त्यांची आणि त्यांचीच सत्ता चालते. त्यांचे हे गुपित मी सहसा कोणाला सांगत नाही कारण मला भय वाटते कि ते माझे काही बरे-वाईट करतील पण .. आता तरी ही थैली मला द्या."
आदित्यने हसत हसत ती थैली दिली आणि तो उठला. पमाण्णा बरोबर तो चालत बाहेर पडला.
"मग पमाण्णा पाहून यायचे काय या लोकांना."
"येऊयात कि मालक." तेवढ्यात किंकाळी ऐकू आली.
"लोकांना थैली दिसली कि त्यात मोहोराच असतील असे का वाटते? कोणी थैलीत खवड्या साप घेऊन फिरु शकत नाही का? तरी त्याचे दात काढलेले होते पण साप दिसला कि विषारीच असला पाहिजे नाही का. डरपोक बुढ्ढा, फुकट मेला. चला आपल्या शत्रूचे एक काम कमी केले आपण. कसले दिलदार आहोत आपण"
दोघेही आदित्यच्या या विधानावर हसत पुढे चालू लागले.
----------
टेकडी चढण्यास त्यांना फार वेळ लागला नाही. विशेष म्हणजे त्यांना कोणी अडविले सुद्धा नाही. कोणी दिसलेच नाही म्हणाना. लवकरच मंदिर दिसू लागले. आता लांबून नजरेत भरणार्‍या कराल मूर्त्या शंकराच्या म्हणायच्या म्हणून मंदिर नाहीतर अशा अवकळा आलेल्या वास्तूला मंदिर म्हणायचे का हा प्रश्नच होता. ती वास्तू अगदीच निर्मनुष्य भासत होती. आदित्यच्या डोळ्यात मात्र वेगळीच चमक दिसत होती.
"ए त्या खांबाच्या मागे लपणार असाल तर नीट लपावे ना. बाहेर या. तुमच्या गुरुकडे घेऊन चला मला आणि माझ्या सेवकाला."
या बोलण्यावर त्रिशूळधारी १५-२० जण एक एक करीत बाहेर आले. आदित्यने हात उंचावत आपण निशस्त्र असल्याची पुष्टी केली. त्याला त्या भग्नावशेषांच्या भूलभूलैय्यातून वाट काढत मुख्य वेदीकडे नेण्यात आले. तिथे एक हवनकुंड प्रज्वलित होते. कोणी साधू तिथे मोठमोठ्याने मंत्र म्हणत कसलीशी राख त्या वेदीत आहुती म्हणून टाकत होता. त्याने नवागतांची उपस्थिती हेरली. लवकरच तो त्यांच्या भेटीस आला.
"कोण रे तुम्ही? काय पाहिजे? कोणावर महाकालला कुदृष्टी टाकायला सांगायची आहे?"
आदित्य त्याला न्याहळत होता. सावळा वर्ण, पुरुषभर उंची, अंगभर भस्म लावलेले. ५० चा वाटत होता तो वृद्ध. दणकट शरीराच्या आदित्य समोर मात्र तो काहीतरीच वाटत होता.
"तुझ्यावर." हे बोलताच काही त्रिशूळ आदित्यवर रोखले गेले.
एक गडगडाटी हास्य करीत त्या साधूने ते त्रिशूळ मागे घ्यायची आज्ञा केली.
"आजवर फक्त महाकालाचीच स्तुती या जिव्हेने केली. पण प्रथमच कोणाच्या मूर्खतेची स्तुती करण्याची वेळ आली आहे. मी मनात आणले तर तू इथून परत जाऊ शकणार नाहीस पण मी तरी तुला एक संधी देऊ इच्छितो."
"मी मनात आणले तर हे मंदिर सर्वांच्या विस्मरणात जाईल."
आता सर्व साधू कृद्ध भासू लागले. एकाने त्रिशूळ उंचावला आणि तो त्या त्रिशूळावर उंचावला गेला. त्रिशूळावर लटकलेले प्रेत पमाण्णामुळे आज ते अघोरी बघत होते.
"ऐक. मला हा सर्व प्रदेश वतन म्हणून ताब्यात घ्यायची आज्ञा झाली आहे. बहमनी सल्तनतीचे वजीर महमूद गावान यांनी हा हुकूम दिला आहे. मी आदित्यवर्मन् तुला शेवटची संधी ... सुद्धा नाही देत आहे. पमाण्णा"
पमाण्णासाठी हा आदेश पुरेसा होता. त्याने कत्तल आरंभली. आदित्यचा तर्क खरा होता. यातल्या बर्‍याचशा अघोरांकडे काही शक्ती नव्हती. त्यात त्यांचा चुकीचा आहार या सर्वांमुळे युद्धकौशल पारंगत त्याच्या सेवकापुढे ते टिकणे शक्य नव्हते. लवकरच आदित्य आणि पमाण्णा त्या एकट्या साधूसमोर उभे होते.
तो साधू मात्र वेगळा होता. त्याने तडक कुठुनशी एक लहान कुपी काढली आणि ती यांच्या अंगावर फेकली. तिच्यातून कसला तरी द्राव बाहेर आला व त्याचा धूर होऊन यांच्या चेहेर्‍यावर आला.
त्यांचे डोळे चुरचुरु लागले. अगदी पमाण्णाचेही.
"पमाण्णा तुझ्यावर याचा असर कसा होऊ शकतो?" आदित्यला काही कळत नव्हते.
" हाहाहाहा. तू मला सामान्य साधक समजलास कि काय? हा मनुष्य योनीतला नव्हे हे मी केव्हाच समजून चुकलोय. पण माझे हे द्रावण अमानवीयांवरही काम करते. माझे नाव मायाकापालिक. ही वस्ती माझ्याच नावाने ओळखली जाते. आता महाकालाकडे जाण्यास तयार हो."
त्याने जवळच पडलेला त्रिशूळ उचलला. वार केला पण हे काय त्याने तलवारीने तो अडवला. अरे हा काय हालचाल करतोय. सप्प त्या साधूच्या दंडावर खोल जखम झाली. तो बावचळल्यासारखा पाहतच राहिला.
"मायाकापालिक. मी आत्ता माघार घेतोय पण मी परत येईन माझी सेना घेऊन. आशा आहे तेव्हा तुझी खरी सेना मला दिसेल. आणि हो मी शब्दवेधी आहे. तेव्हा जरा जपूनच"
आदित्यने तात्पुरती माघार घेतली होती. मायाकापालिक देखील शांत राहिला पण त्याला समजले होते काही केले नाहीतर अंत निकट आहे.
~*~*~*~*~*~

दुर्जनने आता त्याच्या मायाकापालिक साथीदारांना बोलावून घेतले होते. त्या बैठकीचा एकच विषय होता सध्याच्या मायकपाळ मधील हालचाली. संगारी उठली तिने त्याचा आढावा घेतला.
"काल मायकपाळमधून एक १०० जणांचे पथक खजिना शोधासाठी बाहेर पडले. त्यातून पाचजण वेगळे झाले. आपला खबरी त्यांचा माग काढत राहिल चिंता नसावी. उरलेले ९५ इतस्ततः फिरणार आहेत. आपली दिशाभूल करने का इरादा लगता है. फिलहाल तो और कुछ खास नही. हैबत स्वतः वाड्यातच आहे आणि ती शक्ती सुद्धा जिची कधीकाळी त्याच्या पूर्वज आदित्यने मदत घेतली होती. पण जुनी व्यवस्था तशीच आहे. ती शक्ती नंतर गुपचूप या ५ जणांना गाठणार आहे."
दुर्जनच्या चेहेर्‍यावर हास्य आले. "कब बाहर निकलेगी वो?"
"पता नही. जेव्हा यांना पहिले दार सापडेल तेव्हा असे म्हटले आहे."
तो खुश झाला.
"सुनो. त्या ५ जणांना आत्ता हात देखील लावू नका. त्या ९५ वर लुटूपुटूचे हल्ले चढवा पण फार ताणू नका. आपली दिशाभूल होतीये एवढा संदेश फक्त जाऊ दे. ती शक्ती बाहेर पडेपर्यंत हे असेच चालू राहु दे."
"पण सरदार तो खजिना?"
"जे अजून हाती आले नाही त्याच्यामागे धावण्यात काय अर्थ आहे? तसेही व्याघ्ररुप मिळणे हे महत्त्वाचे आहे. त्यानंतर त्या शक्तीचीही भिती उरणार नाही. मग असे १०० खजिने मिळतील. आणि तसेही जहागीरदाराचा बदला त्याचे वंशज मारुन मिळणार नाही."
मग? कोणाला नीट कळले नाही?
"आदित्यने मायाकापालिकास मारले नाही. फक्त त्याची वस्ती, साम्राज्य उद्ध्वस्त करुन सोडून दिले. तेच आपल्याला करायचे आहे. मायकपाळला एकही मनुष्य जित्ता न राहणे हाच मायाकापालिकांचा प्रतिशोध आहे. जय महाकाल" "जय महाकाल" "जय महाकाल"
लाखन एका कोपर्‍यात शांतपणे गवताची काडी चघळत होता. मनसोक्त रक्तपात करायला मिळणार हेच त्याला पुरेसे होते. प्रतिशोधाचे तत्त्वज्ञान त्याच्या डोक्यापलीकडचे होते.
~*~*~*~*~*~

"आणि अजून बरोब्बर ४ तास ५४ मिनिटे व १४ सेकंदांनंतर जर पहाटेच्या पहिल्या प्रहराचे टोले पडले तर आपण बरोबर ठिकाणी आलो आहोत. थोडाफार फरक आला तरी खजिना जवळपास कुठेतरी असणार."
काही दिवस असेच गेले होते. त्या खडकाळ प्रदेशातून प्रवास करणे दुष्कर होते. मंजूचा उत्तम स्वयंपाक हे एकमेव चांगले कारण होते असे बळवंतचे मत. १७.६४ अक्षांश त्यांनी गाठला होता. आता खरे अवघड काम असल्याचे अग्रजचे मत होते.
"रेखांश अचूक मोजण्यासाठी खरेतर चांगल्या प्रतीचा क्रोनोमीटर हवा. पण आपण चांद्र अंतराची पद्धत वापरु. खरे तर एक निष्णात आकाश निरीक्षकच यावरुन रेखांश मोजू शकतो पण आपल्याकडे सेक्स्टंट हे एकच कोनमापक उपकरण असल्याने आपल्याला दुसरा पर्याय नाही. आपल्या सुदैवाने मला या सर्वात रस असल्याने मी नॉटिकल अल्मानाक मिळवला होता. त्यामुळे आपण अंतरे मोजण्याची गरज नाही. फक्त चंद्र आणि रेग्युलस या सिंह राशीतील तार्‍याचे कोनीय अंतर मोजायचे. मग बाकी कॅलक्युलेशन्स ....."
"हा बाबा येडा झालाय" मंजूने हळूच पिल्लू सोडले आणि खसखस पिकली.
अग्रजने घड्याळ बरोबर ठेवले होते. त्याच्या मदतीने तो काहीतरी क्लिष्ट पद्धत वापरून रेखांश मोजी. प्रहराचे टोले ऐकायला अनेकदा शाम व बळवंतला जवळच्या गावाच्या वेशीवर पिटाळी आणि वेरिफाय (हा कसला आळुपिष्टनाच्या ठेवणीतला शबुद - मंजू) करुन घेई. अखेरीस आज या प्रकाराचा शेवट होण्याची शक्यता होती.
शाम व बळवंत धावतच येत होते. तिथे एका खडकाच्या आसर्‍याने बसलेले अग्रज, प्रताप, मंजू उठले.
"४ तास ५४ मिनिटे आणी १२ सेकंद"
"म्हणजे गुहा जवळच कुठेतरी असली पाहिजे. चला शोधा"
सर्व लगबगीने कामाला लागले. तिथे बर्‍याच गुहा होत्या. पण खजिना लपवला म्हणजे तिथे काही ना काही मानवी शिल्प/कारागिरी असणार. एक तासभर शोधल्यावर अखेरीस त्यांना ती गुहा सापडली. गुहा अशासाठी कि यांना माहित होते कि त्या भिंतीच्या मागे काहीतरी आहे. अन्यथा तो कातळच वाटला असता.
"पुन्हा ती विचित्र भाषा. पण देवनागरी लिपीतही त्याचे उच्चारण लिहून ठेवले आहे. अग्रज...."
अग्रज आता ते पुस्तक घेऊनच झोपत होता. त्याने महत्प्रयासाने ती भाषा तोडकीमोडकी का होईना शिकून घेतली होती. एक एक शब्द लावत त्याने त्याचा भावार्थ वहीत उतरवला.
" जर तू हे वाचू शकत असशील तर त्याचा अर्थ तू माझ्या वंशजांपैकी कोणी आहेस. मुद्दामच देवनागरी तर्जुमा ठेवला आहे कारण मी ही लिपी पुढे नीट देऊ शकलो नाही आणि माझा अंत निकट असल्याची मला माहिती आहे. माझ्या खजिन्याच्या पहिल्या द्वारापाशी तुझे स्वागत आहे. कोणी चुकून इथे पोचलेच तर ही भित फोडण्याचा प्रयत्न करु शकतात. पण तसे झाल्यास त्याचे पाय कापले जातील अशी व्यवस्था आहे."
"म्हणजे बाबा इथे आले होते." प्रताप उद्गारला.
अग्रजने एक सहानुभूतीपूर्ण कटाक्ष टाकला व तो पुढे वाचू लागला.
"इथून २५ कदमांवर एक शेंदरी दगड आहे. लोक त्याला देव समजू लागले आहेत का? असो त्या रंगामुळे त्याचे रक्षण नक्की झाले असेल. तो दगड उचलून टाका. त्याच्याखाली एक खुंटी आहे. ती ओढा. आत शिरल्यावर डाव्या बाजूची खुंटी बाहेर आलेली आत दाबा म्हणजे द्वार बंद होईल. जर आतले द्वार उघडू शकलात तर खजिन्याचा पहिला अंश तुझा व पुढचे अंश शोधण्याची संधीही तुझी. अन्यथा बाहेर सांडलेल्या काही तुकड्यांवर समाधान मान व परत जा. लुमिखा तुझे भले करो.
- मुधोजी"
हे लुमिखा काय आहे? शामने विचारले.
ते जाऊ दे. बळवंत लाग कामाला, अग्रजने फर्मावले.
सांगितल्याप्रमाणे करताच तो कातळ एखाद्या दरवाज्याप्रमाणे उघडला. सर्वजण विस्फारलेल्या नेत्रांनी आत बघत होते. तो सांडलेला खजिना सोन्याच्या काहीशे मोहोरा असतील असं कोणाला वाटले नव्हते. आत शिरून बळवंतने खुंटी दाबली. मशालीच्या उजेडात ते आतले ते दार निरखू लागले.
"एक रोमन एकदा त्याच्या मित्रांबरोबर जात होता. त्याला मदिरा प्यायची हुक्की आली. तो मधुशालेत गेला व त्याने हाताची दोन बोटे उंचावली. त्याने किती चषक मदिरेचे मागितले?"
आता काय हे नवीन? या मोकळ्या चौकोनात कसे उत्तर द्यायचे आणि.
प्रतापने भीतभीत दोन बोटे टेकविली. आणि अचानक ते दालन छोटे होऊ लागले.
"शिट किती सोप्पय. थांबत जा ना थोडे" अग्रज पुढे आला आणि त्याने दाणकन् आपला पंजा त्या चौकानात दाबला आणि ते दार उघडू लागले.
"५?" सगळे एकत्र चित्कारले. दालन आक्रसायचे थांबले. शामने तर अग्रजला मिठीच मारली.
"अरे तो रोमन ना. २ बोटांनी व्ही चा शेप बनतो. रोमन व्ही म्हणजे ५. ५ बोटे, पंजा!"
"खुळ्याच खूळ कामी आलं की" मंजूच्या या वाक्यानंतर उरलासुरला तणावही निवळला.
दार अलगद उघडले गेले. आता मशालीची काहीच गरज नव्हती. आतून येणारी रत्नांची चमक डोळे दिपवणारी होती व प्रकाशासाठी पुरेसे टेंभे होते. ते पेटवताच लक्ष्मीची अगणित रुपे त्या शोधपंचकाच्या सेवेत हजर झाली.

क्रमशः

टीपा: रेखांश मोजायची पद्धत खोलात जाणून घ्यायची असेल तर Lunar Distance Longitude असे गुगल करावे. नक्षत्रांची माहिती जसे शर्मिष्ठा इ. विकीपिडीयावर सहज उपलब्ध. मी हौशी खगोलनिरीक्षक असल्याने मला यातील काही गोष्टी आधीच माहिती होत्या. रोमनचे कोडे क्लासिक आहे. काही जणांनी ऐकलेही असेल. ऐकले नसले तर आता नक्कीच विसरणार नाहीत. छोट्या दोस्तांना घालायला उपयुक्त Happy

पुढील कथासूत्र येथे - http://www.maayboli.com/node/52631

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@जिज्ञासा - मी अगदी अचूक अंदाज नाही देऊ शकत पण अजून १० भाग तरी होतील म्हणजे साधारण १५ भागांची. कमीजास्त होऊ शकेल कारण मी वेळ होईल तसे छोटे-मोठे भाग टाकतोय त्यामुळे लांबी एकसमान नाहीये भागांची. आणि मग भाग योग्य ठिकाणी तोडण्याचाही प्रश्न आहेच. तुम्ही १५+ धरून चाला.
माझ्या पहिल्याच प्रयत्नास इतके छान प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद Happy
पुढचा भाग ७ फेब्रुवारी ५:००am IST च्या आसपास प्रकाशित केला जाईल.

एका दमात सगळे भाग वाचून काढले आहेत.. ट्रॅपमुळे ह्याच्याकडे लक्षच गेले नसते.. जबरी चालू आहे कथा.. लवकर पुढचे भाग लिहा..

पेरु वर लिहिल्याप्रमाणे उद्या येतोय. इतर कामांमुळे जरा उशीर होतोय तरी कृपया एक दिवस अजून थांबावे. Happy

एक्स्ट्रा फीचर
या कथानकाला गेमप्ले सारखा फील द्यायचा मी शक्यतो प्रयत्न केलाय. त्यानुसार हे chapters आहेत हीरो, विलेन ,साईड विलेन दोघांचे साइडकिक्स, ट्रांस वाले ड्रीम्स, flashback फाइट्स इ. अशा गेम्स (rpg) मध्ये normally क्लूज खूप विचित्र सोडलेले असतात जे ऑटोसेव चालू असताना दाखवतात (माझे ब्रेक्स Proud ) तर जी गारिसन इ. विचित्र भाषा आहे ती malay/filipino मिक्स आहे.