एक-दीड वर्षानंतर मुंबईला जाण्याची ठरले. पुण्याहून मुंबईला जायचे, तर रेल्वेशिवाय अन्य वाहतूक साधनाने जाण्यात अर्थ नाही, असे माझ्या मनाने म्हटले. पुणे-मुंबईच नाही, तर कोणत्याही गावाला जाताना माझी पहिली पसंती रेल्वेलाच असल्याने मनानेही तसाच प्रतिसाद दिला होता. मग ठरले, मुंबईला एक चक्कर मारून यायचे. अगदी ऐनवेळी हे ठरले असल्याने आधी आरक्षण मिळते का पाहू असे ठरविले. पाहिले तर सकाळी प्रगतीच्या बऱ्याच जागा शिल्लक होत्या. मलाही तिच गाडी हवी होती. मग पटकन आरक्षण करून टाकले. एक्सप्रेस वे झाल्यानंतर पुणे-मुंबईदरम्यानच्या रेल्वेगाड्यांमध्ये सर्वाधिक फटका बसला होता तो प्रगतीला. रसोई यानसह तब्बल सहा डबे कमी करावे लागले होते. त्यातच पूर्वी संपूर्ण आरक्षित असलेल्या प्रगतीला अनारक्षित डबेही जोडले जाऊ लागले. मात्र एक्सप्रेस वेवर कधीही होणारी कोंडी आणि बस, टॅक्सीचे वाढलेले भाडे विचारात घेऊन पुन्हा प्रवासी रेल्वेगाड्यांकडे वळू लागले. त्यामुळे प्रगतीचे डबे वाढले. त्याचबरोबर अगदी महिना-महिना आधी नाही तरी शेवटच्या एक-दोन दिवसांमध्ये प्रगतीला प्रतीक्षा यादी दिसून लागली आहे.
आरक्षण झाले. क्रमांक मिळाला डी-६ मध्ये खिडकीची जागा. मग काय माझ्यासारखा रेल्वेप्रेमी खूषच. सर्व जण स्थानापन्न झाल्यावर पुण्याहून फलाट क्रमांक ५ वरून सकाळी ठीक ७.५० वाजता ही प्रति-दख्खनची राणी मुंबईच्या दिशेने निघाली. प्रगतीचे सारथ्य होते कल्याणच्या डब्ल्यूसीएएम-२ पी या इंजिनाकडे. गाडी सुटताच माझ्याजवळून पहिला फोन लागला - मी आता गाडीत आहे, काही नाही गाडी सुटली म्हणून फोन केला. सांग सगळ्यांना! बाकी काय चाललय, झाला का चहाॽ हो-हो. बर ठीकाय. ठेऊ फोनॽ तेव्हाच चाय-कॉफी, बोलो कटलेट-साबुदाणा वडा, पानी-पानी अशा हाकाही ऐकू यायला लागल्या. काही जण गाडीत चढतानाच जरा पेंगूळलेले होते. त्यामुळे कधी गाडी सुटते आणि मला डुकली लागते, असे हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. बऱ्याच जणांनी पेपर वाचायला सुरुवात केली. पण माझे लक्ष खिडकीच्या बाहेरच जास्त होते. संगम पूल ओलांडताना प्रगती तशी सामान्य वेगानेच धावत होती. कारण या पूलावर वेगमर्यादा लागू केलेली आहे. पूल ओलांडल्यावर मोठे वळण घेत शिवाजीनगरमध्ये शिरत होतो, तोच १९३१२ इंदोर बीजी जं. पुणे जं. एक्सप्रेस पुण्याच्या दिशेने निघाली होती. प्रगतीचे सारथ्य जुन्या डब्ल्यूसीएएम-२ पी कडे असले तरी इंदोर-पुणेचा कार्यअश्व अत्याधुनिक - डब्ल्यूएपी-५ होता. पांढराशुभ्र आणि दोन लाल पट्ट्यांचा बडोद्याचा हा कार्यअश्व पाहून खूप रोमांचित झालो. त्याचा हॉर्नही वैशिष्ट्यपूर्ण असतो. प्रगती आणि इंदोर-पुणेच्या चालकांनी व गार्डस् नी एकमेकांशी सिग्नल्सची देवाणघेवाण केली. जाताजाता तशीच देवाणघेवाण शिवाजीनगरच्या स्थानक उपप्रबंधकाशीही करून झाली. हे असे सिग्नल देवाणघेवाणीचे काम वाटेत आलेल्या प्रत्येक ब्लॉक स्थानकाचे स्टेशन मास्टर आणि क्रॉस होणाऱ्या प्रत्येक गाडीच्या चालक व गार्डबरोबर सुरू होते. दरम्यान प्रगतीने शिवाजीनगर स्थानकाच्या मध्यावर लावलेला टी/पी हा फलक पार केला आणि शिवाजीनगरचे स्टार्टर व ॲडव्हान्स्ड स्टार्टर ऑफ असल्याने गाडीने वेग घ्यायला सुरुवात केली. मात्र खडकीचा डिस्टंट सिग्नल डबल-यलो असल्याने दोन-तीन मिनिटातच वेग पुन्हा कमी व्हायला लागला. खडकीच्या होम सिग्नलला वेग बराच कमी झाला होता. माझ्या मनात विचार आला की, बहुतेक मध्ये मालगाडी असेल, म्हणूनच प्रगतीला लूप लाईनवरून नेले जाणार असेल. प्रत्यक्षातही तसेच होते. लुधियानाच्या डब्ल्यूएजी-७ या इंजिनाची बीसीएन वाघिणींची मालगाडी आमच्या मार्गात होती. पुण्याहून सेक्शन कंट्रोलरने दिलेल्या निर्देशांनुसार प्रवासीगाड्यांना प्राधान्य देण्यासाठी या मालगाडीला खडकीत डिटेन्ड करून आधी तळेगाव लोकल, नंतर दख्खनची राणी, सह्याद्री आणि आता प्रगतीला पुढे सोडण्यात आले होते. आमच्या पाठोपाठ १४८०५ यशवंतपूर-बारमेड एसी एक्सप्रेस आणि पुणे लोणावळा लोकल येत असल्यामुळे त्यानंतरही अर्ध्या तासाने ही मालगाडी तेथून निघणार होती.
पुढच्या पाचच मिनिटांत कासारवाडी-दापोडी दरम्यान दोन डल्ब्यूडीजी-४ इंजिने असलेली एक मालगाडी पुण्याच्या दिशेने धडधडत निघून गेली. आता आमच्या प्रगतीने पुन्हा वेग घेतला होता आणि चिंचवड ओलांडले. अशाच वेगात जात असताना प्रगतीने तळेगावात कोल्हापूरहून आलेल्या आणि मुंबईला निघालेल्या सह्याद्रीलाही ओलांडले. तळेगावातले हे नेहमीचे दृश्य आहे. ही सह्याद्री पुण्याहून प्रगतीच्या आधी ५० मिनिटे निघते आणि शेवटच्या स्थानकावर प्रगतीनंतर ३५ मिनिटांनी पोहोचते. त्यानंतर दोनच मिनिटांनी प्रगती आणि आता डिझेल इंजिनाद्वारे धावू लागलेली २२१०५ इंद्रायणी यांनी एकमेकींना अतिशय वेगाने ओलांडत आपापल्या गंतव्याच्या दिशेने धाव घेतली होती. दरम्यान तिकीट तपासनीसाने तिकिटे तपासून पाहिली होती.
आता लोणावळा जवळ आले होते आणि बऱ्याच जणांचे पेपर चाळून झाले होते. त्यामुळे त्यातल्या सध्याच्या गरम विषयावर - दिल्लीची विधान सभा निवडणूक - चर्चा सुरू होऊ लागल्या होत्या. प्रत्येकाला आपले विश्लेषणच कसे योग्य आणि परखड आहे असे वाटत होते. ठीक ८.४२ ला प्रगती लोणावळ्यात पोहोचली. हा तिचा पहिला व्यावसायिक थांबा. दरम्यानच्या काळात लोकल्सचेही आमच्या विरुद्ध दिशेने पुण्याला जाणे सुरू होतेच. लोणावळ्यात आल्यावर प्रवाशांची धावाधाव, गडबड व्यावसायिकांचा कलकलाट सगळं काही एकाचवेळी सुरू झालं. चढणाऱ्या प्रवाशांपेक्षा वडा-पाववाले, चहावाले, चिक्कीवाले, छोट्या-मोठ्या वस्तू विकणारे अशांची गर्दी सर्वांत जास्त होती. इतकी की एकापाठोपाठ एक असे तीन-चार वडापाववाले, पाण्याची बाटलीवाले सारखे येऊ-जाऊ लागले. हे कर्जत येईपर्यंत सुरूच होते. रेल्वेच्या खानपान सेवेचा आस्वाद आधीच बऱ्याच जणांनी घेतलेला असल्याने त्यांच्याकडून ठराविक जणच खरेदी करत होते. दोन मिनिटांनी प्रगतीची दौड पुन्हा सुरू झाली. आता घाट सुरू झाला होता. त्यामुळे दऱ्या-खोऱ्या, बोगदे, पूल आणि अशातून डाव्या डाऊन लाईनवरून पळणारी प्रगती हे रोमांचकच होते.
खंडाळ्याला अर्धा मिनिट गाडी थांबली. हा प्रगतीच्या प्रवासातील पहिला तांत्रिक थांबा. या स्थानकातून बाहेर पडताच तीव्र उतार आणि त्यातच मोठा बोगदा असल्याने वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक गाडीला येथे थांबावेच लागते. अर्धा मिनिट होत असतानाच स्टेशन मास्टरच्या केबीनमधून पॉईंट्समन बाहेर आला आणि प्रगतीला पुढे जाण्यासाठी परवानगी देणारा हिरवा बावटा त्याने दाखविला. मात्र खंडाळ्यासारख्या थंड हवेच्या ठिकाणी हे महाशय एका हातात हिरवा बावटा आणि दुसऱ्या हातात गरमागरम चहाचा ग्लास घेऊन बाहेर यायला विसरले नाहीत. त्या दिवशी पुणे बऱ्यापैकी थंड होते, पण खंडाळा सोडले आणि दोन-एक मिनिटातच हेवत उबदारपणा जाणवू लागला. पुढे घाटात ठाकूरवाडीला दोन मिनिटे थांबलेली प्रगती पुन्हा आपल्या गंतव्याच्या दिशेने निघाली. मंकी हिलला मात्र न थांबताच हळूच पुढे निघून गेली. घाट उतरत असतानाच वाटेत ११००७ डेक्कन एक्सप्रेस पुण्याकडे जाताना दिसली. प्रगती डोंगर ओलांडून आली, तेव्हा डेक्कनचे शेवटचे काही डबे आणि तीन बँकर्स बोगद्यात शिरताना दिसले. मधल्या काळात १२१२७ इंटरसिटी आणि ११३०१ उद्यानही घाटातून क्रॉस झाल्या होत्या. मात्र त्या दिसल्या नाहीत.
ठीक ९.३० वाजले होते आणि दहा मिनिटे उशीर झालेली प्रगती कर्जतला काही क्षण विसावा घेण्यासाठी थांबली. पुण्याहून आलेल्या काही प्रवाशांनी प्रगतीला निरोप दिला, तर काही प्रवाशी नव्याने गाडीत चढले. पूर्वी प्रगती इथे थांबत नव्हती. ती पनवेल मार्गे जाऊ लागल्यावर येथे थांबू लागली आहे. कर्जतमध्ये प्रगती थांबत असतानाच फलाटावर स्पेशल वडापाववाल्यांची मोक्याची जागा मिळविण्यासाठी वडेपावाच्या स्टँडसह लगबग सुरू होती. प्रगतीतल्या अनेकांनी त्या वड्यापावाचा आस्वाद घेण्यास सुरुवात केली.
मिनिटाभरातच प्रगती सुटली आणि कर्जतमधील अगदी कडेच्या लाईनवरून पनवेलच्या दिशेने निघाली. त्याचवेळी सर्व फेरीवालेही गाडीतून गायब झाले. वेग पकडल्यावर काही वेळात चौक स्थानक येताच प्रगतीचा पुन्हा वेग कमी झाला. म्हटलं काय झालं. तिकडून दोन डल्ब्यूडीजी-४ इंजिने असलेली मालगाडी कर्जतच्या दिशेने लूप लाईनवर जात होती. त्यामुळे चौकचा होम सिग्नल लाल होता आणि डिस्टंट पिवळा. म्हणूनच चालकाने वेग बराच कमी केला होता. प्रगती होम सिग्नलजवळ पोहचेपर्यंत मालगाडी पूर्ण आत आली होती. त्यामुळे होम हिरवा झाला आणि प्रगतीने गती पकडली आणि पनवेलपर्यंत तशीच पळत राहिली. मध्ये ११०२५ भुसावळ जं. - पुणे जं. एक्सप्रेसही प्रगतीसाठी बाजूला ठेवण्यात आली होती.
पनवेलला प्रगतीने ठीक १० वाजता म्हणजेच सात मिनिटे उशीर. आता मालगाड्यांच्या साम्राज्यात प्रगतीने प्रवेश केलेला होता. जवाहरलाल नेहरु बंदराला देशाच्या अन्य भागांशी जोडणारे पनवेल हे महत्त्वाचे बंदर. कितीतरी मालगाड्या आणि वेगवेगळी इंजिने तेथे उभी होती. पनवेलहून मिनिटाभरात निघाल्यावर अनेक मालगाड्यांना ओलांडत मार्गक्रमण करत असतानाच निळज्याला मालगाडीच्या शेजारीच दोन मिनिटे थांबली.
दिवा जं.हून ठाण्याकडे निघालेल्या प्रगतीने आपल्या प्रवासातील शेवटचा बोगदा ओलांडला. आता ठाणे आले. १०.५० मिनिटे झाली होती. गाडीतील गर्दी आता हळूहळू कमी होऊ लागली. मुंबईच्या प्रदेशात असल्याने फलाट प्रवाशांनी फुललेले फलाट दिसत होते. लोकल्सच्या टिपिकल मुंबईतील सततच्या उद्घोषणाही ऐकू येऊ लागल्या आणि लोकल्सचीही धावपळ दिसू लागली. मात्र अकरा वाजत आल्यामुळे लोकलगाड्यांमधील गर्दीत तुलनेने कमी होती. अस्सल मुंबईची गर्दी दिसत नव्हती. एक मिनिटाने प्रगतीने ठाणे सोडले. आता स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणेच्या प्रदेशात प्रगतीने प्रवेश केलेला होता. त्यामुळे ही संगणकीकृत यंत्रणा प्रगतीच्या गतीवर नियंत्रण ठेवणार होती. पुढची गाडी जशी पुढे सरकत राहील, त्यानुसार लाल, पिवळा, दोन पिवळे, हिरवा असे सिग्नल देत ती यंत्रणा प्रगतीला नियंत्रित करत होती. ता उपनगरीय गाड्यांचीच धावपळ मोठ्या प्रमाणात दिसू लागली.
११.१० ला दादरला पोहोचल्यावर नेहमीसारखीच निम्म्यापेक्षा जास्त गाडी रिकामी झाली. ११.२५ ला छत्रपती शिवाजी टर्मिनसवर प्रगती पोहोचली, १० मिनिटे उशीरा पोहोचली आणि तिचा अप दिशेने प्रवास संपला. बऱ्याच दिवसांनी केलेला हा प्रवास रोमांचित करून गेला. रुळांचा-प्रगतीच्या चाकांचा खडखडाट, वाऱ्याचा घोंघावणारा आवाज, घाटातील वळणे-बोगदे-पूल, इंजिनाचा कधी नाजूक, कधी भसाडा वाटणारा टिपिकल हॉर्न, या बाबींनी प्रवासाला अधिकच रोमहर्षक बनविले होते.
प्रगती एक्सप्रेस
Submitted by पराग१२२६३ on 4 February, 2015 - 11:16
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त. खूप दिवसांनी लेख
मस्त. खूप दिवसांनी लेख लिहिलात. पूर्वी प्रगती ठाण्याला थांबत नसे. दादरवरून उलटे यायचेच तर मग डेक्कन क्वीन का नको असा विचार करून डेक्कनच्या रसोई यानात बसून ब्रेड ओम्लेट खात बरेच वेळा आलेलो आहे.
मजा आली वाचायला.
वा!!!
वा!!!
मस्त मला खूप आवडतात तुमचे लेख
मस्त
मला खूप आवडतात तुमचे लेख
खुप दिवसांनी आला लेख.
खुप दिवसांनी आला लेख. आवडला.
गाड्या पनवेलला न्यायचे काय कारण असावे ? लांबचा वळसा नाही का पडत ?
आता पनवेलला रस्त्यावर पण फ्लायओव्हर वगैरे बांधलाय. वेगळेच वाटतेय पनवेल आता.
खुप दिवसांनी आला लेख. आवडला.
खुप दिवसांनी आला लेख. आवडला. पुणे मुंबई प्रवास गेल्या कित्येक वर्षात रेल्वेने केलेला नाही.
गाड्या पनवेलला न्यायचे काय कारण असावे ? लांबचा वळसा नाही का पडत ?
आता पनवेलला रस्त्यावर पण फ्लायओव्हर वगैरे बांधलाय. वेगळेच वाटतेय पनवेल आता.
वेळात फार फरक नाही पडत. मेन
वेळात फार फरक नाही पडत. मेन लाईन वरचा भार कमी होतो, आणि तिकडच्या लोकांना (नवी मुंबई/ पनवेल) सुविधा. असं असावं.
मस्त लिहिलं आहे. मजा आली
मस्त लिहिलं आहे. मजा आली वाचायला. प्रगती कल्याणला थांबत नसल्याने प्रगतीने कधी फारसा प्रवास केला नाही. आम्हांला नेहमी संध्याकाळची इंद्रायणी सोईची वाटायची. (आता मात्र सोलापुरपर्यंत नेऊन त्या इंद्रायणीची पार रया घालवली आहे!
)
लेख आवडला. फोटो का काढले
लेख आवडला. फोटो का काढले नाहीत?माहितगार या एंजिनांबद्दल जाणतातच परंतू इतरांसाठी यांचं वैशिष्ट्ये लिहा ना. किती एचपी ची ताकद असते, विजेवर एसी/ डीसी अथवा डिजेल इत्यादी.लिंक दिली तरी चालेल.
पनवेल-कर्जत मार्गाने पुण्यासाठी एक गाडी पनवेलकरांना मिळालीच शिवाय पुणेकरांना कोकणातल्या बसेस पकडता येतात.
वेस्टर्न, सेंट्रल आणि कोकणरेल्वे या मार्गाने जोडल्या गेल्या.पुणे भुसावळ गाडी एंजिन न फिरवता कल्याण-नाशिक जाऊ शकते नेहमीच्या कर्जत -कल्याण मार्गाने आल्यास फिरवावे लागेल {दौंडला फिरवतात तसे}.
पराग१२००१, तुम्हाला रेल्वे
पराग१२००१, तुम्हाला रेल्वे इंजिनांची एवढी माहिती कशी? रेल्वे मधे कामालहोआहत / होता कि असचं हौशी मिळविलित? प्रवासवर्णना प्रथमच कोणी इंजिनांबद्दल त्यांच्या नंबरसहित लिहिताना वाचतो आहे.
पराग१२००१, मी पण तुमच्यासारखा
पराग१२००१,
मी पण तुमच्यासारखा रेल्वेप्रेमी आहे. पण पंखाबिंखा नाही हं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गाडी खंडाळ्याचा घाट उतरतांना तीन ठिकाणी सुरक्षेसाठी थांबवावीच लागते. त्यापैकी एक ठाकूरवाडी आहे. तर खंडाळा आणि मंकी हिल या ठिकाणी थांबली नव्हती का?
फार पूर्वी जांबरुखला देखील उतरणाऱ्या गाड्या थांबत असंत. हल्ली नाही.
आ.न.,
-गा.पै.
अरे वा! आता प्रगती
अरे वा! आता प्रगती पनवेलमार्गे जाते हे माहिती नव्हतं! अजून कर्जत पनवेल लोकल नाही ना सुरू झाली पण? टी सुरू झाली की फार सोय होईल! फोटोंनी अजून मजा आली असती!
फोटो ह्वे होते !........
फोटो ह्वे होते !........
आहा! पुणे-मुंबई ट्रेन प्रवास!
आहा! पुणे-मुंबई ट्रेन प्रवास!
२ वर्षांपूर्वी शेवटचा ट्रेन-प्रवास केला होता, इंटरसिटीने. पण प्रचंड गर्दी, ३ जणांचे बाक इतके छोटे की तिथे खरंतर २ जणंच व्यवस्थित बसू शकतील. खिडकीपाशी बसणारा चिणला जातो !
इंद्रायणीची तर आता अक्षरशः एस.टी. झाली आहे.
पण ट्रेन-प्रवासाची मजा बाकी कशात नाही. (मोशन-सिकनेस होत नाही. :फिदी:)
मी ट्रेन-प्रवास खूप मिस करते आता.
ह्म्म एकेकाळी पु-मु ट्रेनचा
ह्म्म एकेकाळी पु-मु ट्रेनचा पास असायचा. त्या काळातले सगळे प्रवास आठवले.
मु-पु पुरत्याच चालणार्या गाड्या आणि इतर थ्रू ट्रेन्स सगळ्यांचे वेळापत्रक पाठ होते तेव्हा.
तेव्हा प्रगती पनवेलहून जात नसे मात्र.
पनवेल वळसा सुरू झाल्यापासून प्रगतीचे (किंबहुना पु-मु ट्रेन्सचे) तोंडच पाह्यलेले नाहीये.
ट्रेन पकडायला दादरपर्यंत सगळं सामान घेऊन जा मग शिवाजी नगरला उतरल्यावर रिक्षावाल्यांची अरेरावी.
किंवा उलट क्रम नको होतो त्यापेक्षा हायवेला पकडल्यावर पार दांडेकर पुलापर्यंत जाणारी एशियाड बरी वाटते.
आकारमान आणि घनता चिणायचं ...
आकारमान आणि घनता चिणायचं ... की sandwich करायचं... की ढकलायचं च्या समप्रमाणात असतात. :p
मस्त लिहिलंय! विशेषतः
मस्त लिहिलंय! विशेषतः तांत्रिक तपशील मस्त वाटतात वाचायला.
इतक्यातच पुणे-मुंबई इंटरसिटीचा प्रवास घडला आहे. पुण्याहून निघण्यासाठी अगदी भल्या पहाटे उठावं लागत नाही आणि तरीही मुंबईत बर्यापैकी दिवस हाताशी मिळेल अश्या बेताने ही गाडी पोचते.
सर्वांना उत्स्फूर्त
सर्वांना उत्स्फूर्त प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.
मस्त लिहिलंय! विशेषतः
मस्त लिहिलंय! विशेषतः तांत्रिक तपशील मस्त वाटतात वाचायला.>>+१.
अजून रेल्वे अनुभव येऊ द्यात.