सॅन फ्रॅन्सिस्को!
अमेरीकेच्या पश्चिम किनार्यावरील एक अत्यंत प्रसिद्ध आणि महत्वाचे शहर!
कॅलिफोर्नियाच्या उत्तरेकडील सॅन फ्रॅन्सिस्को बे च्या किनार्यावर वसलेल्या शहराचा इतिहास हा गेल्या अडिचशे वर्षांच्या आतबाहेर आहे. २९ जून १७७६ रोजी स्पॅनिश रहिवाश्यांनी या शहराची उभारणी केली. गोल्डन गेट इथे एक लहानसा किल्ला बांधण्यात आला. १८४९ मध्ये कॅलिफोर्नियात सोन्याचा शोध लागल्यावर या शहराची भरभराट झाली. १९०६ च्या भूकंपात या शहराचा तीन चतुर्थांश भाग पूर्णत: नष्ट झाल होता, परंतु त्यातूनही सावरून हे शहर पूर्वीपेक्षा वैभवाने दिमाखात उभं राहीलं! आजच्या घडीला सॅन फ्रान्सिस्को हे अमेरीकेतील दुसर्या क्रमांकाचं दाट लोकवस्ती असलेलं शहर आहे!
सॅन फ्रान्सिस्को बे सुमारे तीन मैल लांब आणि किमान मैल-दीड मैल रुंद अशी खाडी आहे. सॅक्रेमॅन्टॉ आणि सॅन जुआन नद्या सिएरा नेवाडा पर्वतराजीतून वाहत इथे पॅसिफीक महासागराला मिळतात. या नद्या सुईसन बे या भागात एकत्र येऊन पुढे सॅन पाब्लो बे च्या मुखाशी नापा नदीला मिळतात. नापा नदीचं खोरं हे वाईनच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
सॅन फ्रॅन्सिस्को बे मधून पूर्वी फेरीबोटीची वाहतूक होत असे. सॅन फ्रॅन्सिस्को शहर जसजसं खाडीच्या पलिकडे विस्तारण्यास सुरवात झाली तशी या खाडीवर पुलाची अत्यंत निकड भासू लागली. अखेर ५ जानेवारी १९३३ ला या खाडीवर पूल उभारण्यास सुरवात झाली. सुमारे पावणेपाच वर्षांनी हा पूल बांधून तयार झाला!
अमेरीकेच्या इतिहासातील नायगरा आणि ग्रँड कॅनियन इतकाच सुप्रसिद्ध असलेला हा पूल म्हणजेच...गोल्डन गेट ब्रिज!
गोल्डन गेट ब्रिजच्या पूर्वेला सॅन फ्रॅन्सिस्को बे मध्ये दोन बेटं नजरेस पडतात.
या दोन बेटांपैकी एक म्हणजे ट्रेझर आयलंड! गोल्डन गेट ब्रिजच्या निर्मीतीच्या काळात अमेरीकन सरकारकडून सॅन फ्रॅन्सिस्कॉ बे मधील या बेटवजा भूभागावर अनेक बांधकामं करण्यात आली. अनेक झाडांची लागवडही या काळात करण्यात आली. दुसर्या महायुद्धाच्या काळात या बेटावर अमेरीकन नौदलाचं ठाणं होतं. आज हे बेट एक पर्यटन स्थळ म्हणून नावारुपाला आलेलं आहे.
दुसरं बेट म्हणजे सुप्रसिद्ध अल्कात्राझ!
सुमारे ५०० मीटर लांब आणि १८० मीटर रूंदीचं अल्कात्राझ हे सॅन फ्रॅन्सिस्कोच्या किनार्यापासून सुमारे १ १/४ मैल (२ कि.मी.) अंतरावर ट्रेझर आयलंडच्या पश्चिमेला वसलेलं आहे. काळाच्या ओघात अनेक स्थित्यंतरातून हे बेट गेलं आहे.
अमेरीकेतील मूळ रहिवासी असलेल्या इंडीयन जमाती अल्कात्राझ आयलंड कायम टाळत असत! या जमातींमधील पूर्वापार समजुतींनुसार हे बेट शापीत होतं! १७७५ मध्ये स्पॅनिश दर्यावर्दी जुआन मॅनुअल डी अयाला याने सर्वप्रथम हे बेट नकाशात दर्शवलं होतं. या बेटावर त्याकाळी पेलीकन पक्ष्यांचं प्रचंड प्रमाणात वास्तव्यं होतं. त्यामुळे त्याने या बेटाचं वर्णन पेलीकनचं बेट (आयलंड ऑफ अल्कात्राझ) असं केलं.
(पेलीकन या शब्दाला स्पॅनिशमध्ये अल्कात्राझ असं म्हटलं जातं. मूळ शब्द अल्बॅट्रॉसवरुन हा शब्द आला आहे).
स्पॅनिश खलाशांनी या बेटावर मामुली बांधकाम उभारलं. पुढे १८४६ मध्ये मेक्सीकन गव्हर्नर पियो पिको याने अल्कात्राझची मालकी ज्युलियन विल्यम वर्कमन याच्याकडे सोपवली. वर्कमनने तिथे दीपस्तंभ बांधावा अशी पियो पिको याची अपेक्षा होती. १८४६ च्या शेवटी जॉन फ्रीमाँट याने ५००० डॉलर्सला फ्रान्सिस टेंपलकडून हे बेट विकत घेतलं. मेक्सीकन-अमेरीकन युद्धाच्या समाप्तीनंतर या बेटाचा अमेरीकन सरकारला चांगला उपयोग होईल अशी त्याची अपेक्षा होती. परंतु युद्धसमाप्तीनंतर अमेरीकन सरकारने ही खरेदी रद्द करून टाकली आणि फ्रीमाँटच्या अपेक्षेला वाटाण्याच्या अक्षता लावल्या!
(मेक्सीकन अमेरीकन युद्धाचा परीणाम म्हणून टेक्सास, न्यू मेक्सीको, अरिझोना, नेवाडा, कॅलीफोर्निया अशा अनेक भूभागांवार अमेरीकेने कायमचा कब्जा केला)!
मेक्सीकन युद्धानंतर अमेरीकन सरकारने नौदलाच्या वापराच्या दृष्टीने अल्कात्राझवर तटबंदी उभारण्यास सुरवात केली. १८५३ मध्ये या अल्कात्राझवरील या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं.
यद्धसाधनांतील प्रगतीमुळे किल्ल्याचा काही उपयोग नाही हे अमेरीकन सरकारच्या लवकरच ध्यानात आलं. अल्कात्राझचं असलेलं भौगोलिक स्थान विचारात घेऊन त्याचा युद्धासाठी उपयोग करण्यापेक्षा तुरुंग म्हणून वापर करावा असा सरकारने निर्णय घेतला. १८९८ च्या स्पॅनिश अमेरीकन युद्धातील अनेक युद्धकैद्यांना इथे कैदेत ठेवण्यात आलं. १९०६ मध्ये सॅन फ्रॅन्सिकोतील भूकंपात अनेक कैद्यांना इथे हलवण्यात आलं.
पहिल्या महायुद्धाच्या काळात अनेक इमारतींच अल्कात्राझवर बांधकाम करण्यात आलं. तसंच इथे असलेल्या तुरुंगाची कैदी ठेवण्याची क्षमताही वाढवण्यात आली. १९३३ मध्ये अल्कात्राझ इथला तुरुंग अमेरीकन सरकारच्या तुरूंगखात्याकडे हस्तांतरीत करण्यात आला.
अमेरीकन तुरुंगखात्याच्या ताब्यात अल्कात्राझ येताच तिथल्या तुरुंगात काही मामुली बदल करण्यात आले. पहिल्या मजल्याखाली अनेक मोठे खंदक असल्याची आणि खंदकात नरभक्षक मगरी सोडण्यात आल्याची आवई उठवण्यात आली! तसेच तुरुंगाची क्षमताही वाढवण्यात आली.
इतर तुरुंगात डोकेदुखी ठरलेले कैदी अल्कात्राझला पाठवण्याची सुरवातीपासूनच प्रथा होती. यात मुख्यत्वे भरणा होता तो दरोडेखोर आणि खुनी आरोपींचा. तसेच इतर तुरुंगांतून सतत पलायनाचा प्रयत्न करणार्या कैद्यांचीही अल्कात्राझमध्ये रवानगी होत असे.
११ ऑगस्ट १९३४ ला सकाळी ९.४० ला पहिल्या १३७ कैद्यांचं इथे आगमन झालं. तुरुंगात सुरवातीला एकूण १५५ कर्मचारी होते. जेम्स जॉन्स्टन हा तुरुंगाचा पहिला मुख्य अधिकारी होता. सेसील शटलवर्थ त्याचा प्रमुख सहाय्यक अधिकारी होता. अधिकारी आणि कर्मचारी हे सर्व प्रकारच्या कैद्यांना हाताळण्यात माहीर होते.
अल्कात्राझच्या या तुरुंगाची जबरदस्तं दहशत अमेरीकेतील गुन्हेगारांमध्ये पसरली होती. ही पसरवण्यात अर्थातच अमेरीकन सरकाचा हात होताच. एकदा का आपली रवानगी अल्कात्राझला झाली तर पूर्ण शिक्षा भोगल्याशिवाय सुटकेची कोणतीही आशा नाही हे देशभरातील तुरुंगातील कैद्यांच्या मनावर पुन्हा-पुन्हा बिंबवण्यात येत होतं. अल्कात्राझमधील तुरुंगातील अनेक किस्से, खंदकातील मगरी याविषयी जाणिवपूर्वक बातम्या पसरवण्यात येत असत! इतकंच नव्हे तर अल्कात्राझ आणि सॅन फ्रॅन्सिस्कोच्या किनार्यादरम्यान असलेल्या सॅन फ्रॅन्सिस्को बे मध्ये ग्रेट व्हाईट शार्कस् मुक्तपणे फिरत असल्याचीही वदंता पसरलेली होती!
अल्कात्राझचा हा तुरुंग अभेद्य आहे असं अमेरीकन अधिकारी गर्वाने सांगत असत. परंतु तरीही तिथून सुटण्याचा प्रयत्न करण्यात कैदी मागे नव्हते!
अल्कात्राझमधून पलायनाचा प्रयत्न करणारा पहिला कैदी म्हणजे जोसेफ बॉवर्स. २७ एप्रिल १९३६ रोजी बॉवर्सने तुरुंगाची भिंत चढून जाण्यात यश मिळवलं होतं. भिंत चढून गेल्यावरही तो आपल्या हातातील खाद्य सीगल्सना घालत राहीला होता! भिंतीवरुन उतरण्याच्या पहारेकर्यांच्या सूचनेकडे त्याने साफ दुर्लक्षं केलं होतं. निरुपायाने पहारेकर्याने गोळी झाडली. गोळी लागताच बॉवर्स बाहेरील खडकांवर कोसळला.
अल्कात्राझमधील दुसरा कैदी हेनरी लॅरीच्या मते बॉवर्सचा हा सुटकेचा प्रयत्न नसून आत्महत्या होती! बॉवर्स मानसिकदृष्ट्या विकलांग होता. त्याच्यात आत्मघाती प्रवृत्ती होती! पूर्वीदेखील त्याने चादरीचा फास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता!
अल्कात्राझ तुरुंगाच्या अभेद्य प्रतिमेला पहिला धक्का बसला तो पुढच्याच वर्षी!
राल्फ रो हा अत्यंत खतरनाक दरोडेखोर होता. ३० डिसेंबर १९३३ मध्ये त्याला ओक्लाहोमा इथे गोळागोळीनंतर अटक करण्यात आली होती. या गोळागोळीत रोचा साथीदार विल्बर अंडरहील बळी पडला होता. रोने ओक्लाहोमातील मॅकअॅलीस्टर तुरुंगातूनही पलायनाचा प्रयत्न केला होता. यथावकाश त्याची रवानगी अल्कात्राझ इथे करण्यात आली.
थिओडर 'टेड' कोलही रोप्रमाणेच दरोडेखोर होता. अनेक बँका लुटल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्याखेरीज एका खुनाच्या केसमध्ये त्याला मृत्यूदंडही फर्मावण्यात आला होता. रो प्रमाणेच मॅकअॅलीस्टर तुरुंगातून पलायनाचा प्रत्यत्न केल्यावर त्याची रवानगी अल्कात्राझला करण्यात आली.
अल्कात्राझमध्ये आल्यावर सुरवातीला काही महिने दोघांनाही एकांतवासाची शिक्षा फर्मावण्यात आली. त्यानंतर मोटारीच्या टायर्सपासून अमेरीकन नौदलासाठी रबरी चटया तयार करण्याच्या कामावर दोघांची नेमणूक झाली.
रो आणि कोल ही जोडी एकत्रं आल्यावर अल्कात्राझमधून पलायनाच्या प्रयत्नावर विचार करु लागली.
अल्कात्राझमधून कोणाच्याही नकळत पलायनाचा एकच मार्ग होता तो म्हणजे पोहून किंवा कोणत्या तरी कामचलाऊ बोटीवरुन अथवा तराफ्याच्या सहाय्याने सॅन फ्रॅन्सिस्कोचा किनारा गाठणं! अर्थात हा मार्ग वरकरणी सोपा दिसत असला तरी प्रत्यक्षात अत्यंत दुष्कर होता. आधी तुरुंगातून बाहेर पडून बेटाचा किनारा गाठणंच मोठं कठीण होतं. ते साध्यं झालं तरी सॅन फ्रॅन्सिस्को बेमध्ये शार्क्सच्या अस्तित्वाची भिती होतीच! तसेच पाण्याखाली पॅसिफीक समुद्राच्या दिशेने वाहणारा ७-८ नॉट्सचा सागरप्रवाह होता! या प्रवाहाच्या तडाख्यात सापडलेला कोणताही माणूस - अगदी पट्टीचा पोहणारा असला तरीही पॅसिफीकमध्ये वाहून जाण्याची शक्यता होती. तसंच पाण्याचं ७-८ डिग्री सेल्सीयस असलेलं तापमान हे देखील धोकादायक ठरणार होतं!
या सर्व परिस्थितीची कल्पना असूनही रो आणि कोल यांनी सुटकेचा प्रयत्नं करण्याचा निश्चय केला!
पूर्ण योजना आखून रो आणि कोल यांनी सुटकेची तयारी सुरु केली. आपल्या कामाच्या ठिकाणाहून त्यांनी करवती मिळवल्या. त्या करवतींच्या सहाय्याने त्यांनी आपल्या रिपेअर शॉपमधील एका खिडकीचे गज रोज कापण्यास सुरवात केली! आपले उद्द्योग कोणाच्या ध्यानात येऊ नयेत म्हणून त्यांनी कापलेल्या गजांना ग्रीस आणि बूट पॉलीश फासून ठेवलं होतं! अनेक दिवसांच्या उपद्व्यापानंतर खिडकीचे गज आणि त्यामागे असलेल्या काचेच्या तीन जाड तावदानांना २२ सेंटीमीटर लांब-रुंद आणि दीड फूट खोलीचं भोक पाडण्यात ते यशस्वी झाले!
१६ डिसेंबर १९३७ ला दुपारी १२.५० च्या सुमाराला तुरुंगातील सर्व कैद्यांची शिरगणती करण्यात आली. यावेळी रो आणि कोल आपल्या जागी काम करत असल्याचं आढळून आलं! परंतु दुपारी दीडच्या सुमाराला पहारेकरी पुन्हा रिपेअर शॉपमध्ये आले तेव्हा रो आणि कोल पसार झाले होते!
रिपेयर शॉपमधून बाहेर पडल्यावर रो आणि कोल यांनी तारांचं कुंपण असलेलं बाहेरील फाटक गाठलं. रिपेअर शॉपमधून घेतलेल्या कानशीच्या सहाय्याने त्यांनी त्या दाराचं कुलुप उखडलं आणि वीस फूट खोल थेट समुद्रात उड्या ठोकल्या!
रो आणि कोल तुरुंगातून निसटण्यात यशस्वी झाले होते, पण सॅन फ्रॅन्सिस्कोच्या किनार्यावर पोहोचणार होते का?
सॅन फ्रॅन्सिस्को बेवर त्या वेळी गेल्या कित्येक वर्षांत पडलं नव्हतं इतकं दाट धुकं पसरलेलं होतं!
रो आणि कोल यांनी तरंगण्यासाठी पाच गॅलनचे मोठे ड्रम बरोबर घेतले होते. या ड्रमच्या सहाय्याने ते अल्कात्राझपासून काही अंतर पोहोचण्यात यशस्वी झाले. त्यांच्या पलायनच्या प्रयत्नाची पूर्ण माहीती आणि कल्पना असलेला कुख्यात गँगस्टर अल्वीन कार्पिस ('मी लुटारू आहे, खुनी नाही!' असं एफ. बी. आय. चा प्रमुख जे. एडगर हूवर याला सर्वांसमोर तोंडावर ठणकावणारा हाच तो महाभाग!) त्यांच्यावर लक्ष्यं ठेवून होता! खाडीतील प्रवाहात पोहोचताच एक धडकी भरवणारं दृष्यं त्याच्या नजरेस पडलं.
रॉल्फ रो ज्या ड्रमच्या सहाय्याने तरंगत होता, तो ड्रम रो सकट हवेत फेकला गेला!
दुसर्याच क्षणी रो आणि त्याचा ड्रम पाण्याखाली गेले!
कोल प्रवाहाच्या तडाख्यात सापडून गोल्डन गेट ब्रिजच्या दिशेने वाहत गेला!
"त्यांची ही अवस्था पाहील्यावर अल्कात्राझमधून समुद्रमार्ग पळून जाण्याचा कधीही प्रयत्नं करायचा नाही असं मी ठरवून टाकलं!" कार्पिसने पुढे चौकशीत सांगितलं!
रो आणि कोलच्या पलायनाची वार्ता पसरताच एकच हलकल्लोळ माजला. तुरुंगातील अधिकारी आणि सर्व पहारेकरी झाडून कामाला लागले, परंतु धुक्यामुळे त्यांच्या तपासावर मर्यादा आली होती. ज्या फाटकाचं कुलुप रो आणि कोलने उखडलं होतं, तिथपर्यंत येऊन त्यांचा तपास खुंटला!
दुसर्या दिवशी एफ. बी. आय., अमेरीकन मार्शल्स, सॅन फ्रॅन्सिस्को पोलीस आणि नौदलाच्या अधिकार्यांनी एकत्र तपासाला सुरवात केली. फरार कैदी अद्यापही बेटावरच असतील या कल्पनेने बेटाच्या अनेक भागांत अश्रूधुराचा मारा करण्यात आला. परंतु त्यातून काही निष्पन्नं झालं नाही. पुढचे कित्येक दिवस कसून तपास करुनही रो किंवा कोल यांचा काहीही पत्ता लागला नाही!
रो आणि कोल सॅन फ्रॅन्सिस्को बे मध्ये बुडून मरण पावले असावे असा तपासाअंती निष्कर्ष काढण्यात आला!
अल्वीन कार्पिसच्या साक्षीचा त्यासाठी उपयोग करण्यात आला. पाण्याच्या तेज प्रवाहात सापडल्यावर कोणालाही पोहून जाणं शक्यं नाही या आपल्या मतावर एफ. बी. आय. ठाम होतं. तसंच धुक्याच्या पडद्यामुळे एखाद्या साथीदाराला त्यांना बोटीत उचलून घेणं अशक्यं आहे या मतावरही तपास अधिकार्यांचं एकमत होतं.
एफ. बी. आय. ने रो आणि कोल मरण पावले असं जाहीर केलं तरी त्यांचा तपास मात्रं थांबला नव्हता. मिळालेल्या प्रत्येक खबरीचा कसोशीने पाठपुरावा करण्याचं त्यांचं काम सुरु होतं. मात्रं कोल आणि रो यांचा काहीही पत्ता लागला नाही.
कोल आणि रो यांचे मृतदेह न मिळाल्याने ते जिवंत असावेत अशा अफवा पसरल्या नसत्या तरंच नवल. सॅन फ्रॅन्सिस्को क्रॉनिकलच्या एका पत्रकाराने रो आणि कोल दक्षिण अमेरीकेत सुरक्षीत असल्याचा दावा केला. दोघा प्रवाशांनीही रो आणि कोल यांना पाहील्याचा आणि फोटोवरुन ओळखल्याचा दावा केला! ७ जून १९३९ ला ओक्लाहोमातील सेमीनॉल या कोलच्या मूळ गावी एका टॅक्सी ड्रायव्हरने या दोघांनी आपल्याला जखमी करुन लुटल्याचा दावा केला! रो आणि कोल यांना त्याने फोटोवरुन ओळखलं होतं!
सेमीनॉल प्रोड्युसर या दैनिकाच्या मते ओक्लाहोमा पोलीसांना मुद्दामच रो आणि कोल यांना ओळखण्याचं टाळलं होतं! अर्थात यामागील पोलीसांचा हेतू कोणता यावर मात्रं काहीही भाष्यं करण्यात आलं नाही.
राल्फ रो आणि टेड कोल यांचं नेमकं काय झालं?
ते अल्कात्राझमधून निसटण्यात यशस्वी झाले होते का?
सॅन फ्रॅन्सिस्को बेच्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला होता का?
पाण्याच्या प्रवाहात सापडून ते पॅसिफीक समुद्रात तर वाहत गेले नाहीत ना?
रो आणि कोल यांच्यानंतरही अनेकांनी अल्कात्राझमधून निसटण्याचे प्रयत्न केले. तुरुंगातून बाहेर पडून सॅन फ्रॅन्सिस्को बे च्या पाण्यापर्यंत अनेकजण पोहोचले परंतु एकही जण पोहून सॅन फ्रॅन्सिस्कोच्या किनार्यापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला नाही.
२३ मे १९३८ ला रुफस फ्रँकलीन, थॉमस लिमरीक आणि जेम्स लुकास तुरुंगातून बाहेर पडले खरे, परंतु पहारेकर्याच्या गोळीला फ्रँकलीन बळी पडला. त्यांच्यानंतर कुख्यात दरोडेखोर आणि कुप्रसिद्ध बार्कर-कार्पिस गँगचा सभासद आर्थर 'डॉक' बार्कर, विल्यम मार्टीन, रुफस मॅक्केन, हेनरी यंग आणि डेल स्टॅमफिल यांनी १३ जानेवारी १९३९ ला तुरूंगातून पोबारा केला. परंतु हा प्रयत्नही अयशस्वीच ठरला. बार्करला आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर २१ मे १९४१ मध्ये ज्यो क्रेट्झर, सॅम शॉकली, अरनॉल्ड कील आणि लियाम बार्कडॉल यांचा प्रयत्नही अयशस्वी ठरला. १५ सप्टेंबर १९४१ ला जॉन बायलिस पाण्यापर्यंत पोहोचला खरा परंतु पाण्यात उडी टाकल्यावर पाच मिनीटांतच तो बाहेर आला आणि मुकाट्याने तुरुंगात परतला!
१४ एप्रिल १९४३ ला जेम्स बोरमन, हॅरॉल्ड मार्टीन ब्रेस्ट, फ्लॉईड हॅमिल्टन आणि फ्रेड जॉन हंटर यांनी आपल्या पहारेकर्यांवर ताबा मिळवून पलायन केलं. ३० फूट कड्यावरुन उडी मारुन ते पाण्यात पडले खरे, परंतु तोपर्यंत त्यांनी बांधून ठेवलेला पहारेकरी स्मिथ आपली शिटी दुसर्या पहारेकर्याच्या तोंडात खुपसण्यात यशस्वी झाला. पहारेकर्यांना पोहण्याचा प्रयत्न करणारे कैदी दिसताच त्यांनी त्यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या.
तुरूंगाधिकारी बोटीतून पोहणार्या ब्रेस्टपाशी पोहोचले तेव्हा त्यांना एक विलक्षण दृष्यं दिसलं.
ब्रेस्टने बोरमनचा देह धरुन ठेवला होता!
बोरमनच्या डोक्यातून गोळी आरपार गेली होती. बोटीवर चढण्यासाठी ब्रेस्टने त्याच्याभोवतीचा हात सोडताच तो तळाशी गेला! बोरमन मरण पावला होता याबद्दल ब्रेस्टला कोणतीच शंका वाटत नव्हती.
हंटरने पोहण्याचा प्रयत्न रहित करुन एका गुहेत आश्रय घेतला. परंतु पहारेकर्यांनी त्याची तिथून उचलबांगडी केली!
फ्लॉईड हॅमिल्टनचा कुठेही पत्ता लागला नाही. तो मरण पावला अशीच सर्वांची समजूत झाली होती!
.....परंतु हॅमिल्टन जिवंत होता!
ज्या गुहेत हंटर लपला होता तिथेच हॅमिल्टनही लपला होता. परंतु गार्डसच्या तावडीतून तो निसटला. तीन दिवसांनी कडा चढून तो पुन्हा तुरुंगाच्या अंतर्भागात आला! स्टोअर रुममध्ये अनेक गोष्टींच्या ढिगाआड तो लपून राहीला!
दोन दिवसांनी दर आठवड्याला येणारी फेरीबोट अल्कात्राझवर आली. बोट आलेली पाहताच हॅमिल्टनने अधिकार्याचा वेश करुन बोटीवर प्रवेश मिळवला आणि अल्कात्राझ सोडलं!
परंतु हॅमिल्टनचा सुटकेचा आनंद अल्पजिवीच ठरला. बोटीच्या कॅप्टनला या नवीन अधिकार्याचा चांगलाच संशय आला होता. सॅन फ्रॅन्सिस्को बंदरात हॅमिल्टनच्या स्वागताला पोलिस अधिकारी हजर होते! पुन्हा त्याची रवानगी अल्कात्राझमध्ये झाली!
अल्कात्राझच्या इतिहासातील पलायनाचा सर्वात रक्तरंजित प्रयत्न १९४६ मध्ये झाला.
बॅटल ऑफ अल्कात्राझ!
२ मे १९४६ ला बर्नाड कॉय, मर्विन हब्बार्ड, ज्यो क्रेट्झर, क्लेरेन्स कार्नेस यांनी अल्कात्राझच्या एका भागावर ताबा मिळवला. इतर सुमारे डझनभर कैद्यांचीही त्यांनी कोठडीतून सुटका केली. सॅम शॉकली आणि मिरान थॉमसन यांनी त्यांच्याशी हातमिळवणी केली, परंतु बाकीचे कैदी मात्रं मुकाट्याने आपल्या जागी परतले! तुरुंगातील शस्त्रागारावर चाल करुन त्यांनी काही शस्त्रे हस्तगत केली, परंतु तुरुंगातून बाहेर पडणं मात्रं त्यांना शक्यं झालं नाही!
तुरुंगातून बाहेर पडण्याचा प्लॅन अयशस्वी होताच शॉकली, थॉमसन आणि क्रेट्झर यांनी ओलीस ठेवलेल्या पहारेकर्यांवर गोळीबार करण्यास सुरवात केली. यात पाच पहारेकरी गंभीर जखमी झाले. वॉर्डन बिल मिलरचा पुढे जखमांमुळे मृत्यू झाला. निरुपायाने ते शॉकली, थॉमसन आणि कार्नेस आपल्या कोठड्यांत परतले, परंतु कॉय, हब्बार्ड आणि क्रेट्झर यांची खुमखुमी अजून गेली नव्हती. त्यांनी लढाईचा पवित्रा घेतला.
या लढाईला काहीही अर्थ नव्हता. अखेरीस अमेरीकन नौदलाच्या मरीन्सनी तुरुंगावर ताबा मिळवला. झालेल्या गोळागोळीनंतर कॉय, हब्बार्ड आणि क्रेट्झरचे मृतदेहच त्यांच्या हाती लागले.
शॉकली, थॉमसन आणि कार्नेस यांच्यावर पुढे खटला चालवण्यात आला. ओलीसांपैकी एकाने सर्वांची नावं टिपून ठेवली होती. सर्वांनाच मृत्यूदंड फर्मावण्यात आला, परंतु कार्नेसने ओलीसांवर गोळ्या चालवण्यास नकार दिल्याचं आणि इतरांनाही त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्नं केल्याचं सिद्ध झाल्याने त्याची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली.
३ डिसेंबर १९४८ ला सॅम शॉकली आणि मिरान थॉमसन यांना सॅन क्वेंटीन तुरुंगाच्या गॅस चेंबरमध्ये मृत्यूदंड देण्यात आला.
बॅटल ऑफ अल्कात्राझनंतर तुरुंगातील सुरक्षाव्यवस्था कमालीची कडक करण्यात आली. पुढील दहा वर्षांत कोणालाही पलायनाचा प्रयत्न करण्याची संधीच मिळाली नाही!
२३ जुलै १९५६ ला फ्लॉईड विल्सन तुरुंगातून निसटला खरा, परंतु बेटावरच त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर २९ सप्टेंबर १९५८ ला अॅरन बर्गेट आणि क्लाईड जॉन्सन यांनी तुरुंगातून पोबारा केला. पोहून सॅन फ्रॅन्सिस्कोचा किनारा गाठण्याचा त्यांचा इरादा होता. पोलीसांच्या बोटीने जॉन्सनला पाण्यातून उचललं परंतु बर्गेटचा मृतदेह दोन आठवड्यांनी सॅन फ्रॅन्सिस्कोच्या किनार्यावर आढळून आला.
अल्कात्राझच्या 'अभेद्य' या बिरुदावलीला सर्वात मोठा धक्का बसला तो १९६२ मध्ये!
क्लेरेन्स आणि जॉन अँजलीन हे सख्खे भाऊ होते. जॉर्जीयामध्ये अनेक बँका त्यांनी लुटल्या होत्या. १९५६ मध्ये त्यांना अटक झाल्यावर त्यांची अटलांटा इथल्या तुरुंगात रवानगी करण्यात आली. अटलांटाच्या तुरुंगातून पलायनाच्या अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर त्यांची अल्कात्राझला रवानगी करण्यात आली.
जॉन अँजेलीन
क्लेरेन्स अँजेलीन
फ्रँक मॉरीस मूळचा वॉशिंग्टनचा होता. अनेक वेगवेगळ्या गुन्ह्यांत अटक झाल्यावर तो अटलांटाच्या तुरुंगात आला होता. अँजेलीन बंधूंबरोबर त्याने पलायनाचे अनेक प्रयत्न केले. पण ते फसल्यावर त्यांच्याप्रमाणेच त्यालाही अल्कात्राझला हलविण्यात आलं.
फ्रँक मॉरीस
या त्रिकूटाचा चौथा साथीदार म्हणजे अॅलन वेस्ट. अटलांटा तुरुंगात अँजेलीन आणि मॉरीस यांची वेस्टशी मैत्री झाली होती. समानशील व्यसनेशुसख्यम् या न्यायाने त्यानेही त्यांच्या पलायनाच्या प्रयत्नांत भाग घेतला होता. यथावकाश त्याचीही अल्कात्राझला बोळवण करण्यात आली.
अॅलन वेस्ट
अल्कात्राझमध्ये पाऊल ठेवल्याच्या दुसर्या दिवसापासून या चौकडीने तिथून पलायनाच्या योजनांवर विचार करण्यास सुरवात केली. पूर्वीच्या सर्व फसलेल्या प्रयत्नांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. सर्व बाजूने विचार केल्यावर एखाद्या तराफ्यावरुन अथवा होडीतूनच निसटणं शक्यं आहे या निष्कर्षाला ते आले होते.
पलायनाची योजना आखल्यावर पुढची तब्बल दोन वर्ष त्यांनी या योजनेप्रमाणे तयारी करण्यात घालवली!
कोठडीच्या भिंतीला भोक पाडून फारशा वापरात नसलेल्या एका बोळकंडीत शिरायचं, तिथून हवा खेळती राहण्यासाठी मोकळ्या ठेवण्यात आलेल्या भागातून छतावर पोहोचायचं, खाली उतरुन बाहेरची भिंत चढून बेटाचा किनारा गाठायचा आणि मग तराफ्यावरुन पसार व्हायचं अशी त्यांची योजना होती.
आपण पळून गेल्याचं लगेच कोणाच्या ध्यानात येऊ नये म्हणून नकली डोकी तयार करुन बिछान्यावर ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता!
आपल्या कोठडीतून बाहेर पडण्यासाठी भोक पाडण्याचा प्रत्येकाचा कार्यक्रम सुमारे वर्षभर सुरू होता! तुरुंगाच्या भटारखान्यातून चोरलेले काटे-चमचे आणि त्यापासून बनवलेल्या हत्यारांचा त्यांनी त्यासाठी वापर केला होता! कोठडीवरील खोबणीत ही हत्यारं त्यांनी दडवून ठेवली. कोठडीत खाली धूळ पडते या सबबीखाली वेस्टने चक्कं एक पोतं छताला लावून ही हत्यारं झाकून टाकली! टॉयलेट पेपर, साबण आणि तुरुंगाच्या सलूनमधून मिळवलेले खरेखुरे केस यांच्या सहाय्याने नकली डोकी बनवण्यात आली! रेनकोट आणि चोरलेल्या इतर सामग्रीच्या सहाय्याने तराफा बनवण्यात आला होता.
फ्रँक मॉरीसच्या कोठडीतील नकली शिर
११ जून १९६२ च्या रात्री क्लेरेन्स आणि जॉन अँजेलिन आणि फ्रँक मॉरीस आपल्या कोठड्यांतून निसटले! अंग चोरुन भिंतीला पाडलेल्या भोकांतून त्यांनी वापरात नसलेली 'ती' बोळकंडी गाठली. तिथे पोहोचताच मोकळ्या हवेसाठी ठेवण्यात आलेल्या जागेतून मार्ग काढत ते तुरुंगाच्या छतावर पोहोचले!
कोठडीला पाडण्यात आलेलं भगदाड
अॅलन वेस्टचं काय झालं?
वेस्टला आपल्या कोठडीला असलेली जाळी उचकटण्यात अद्याप यश आलं नव्हतं. त्याला होणार्या उशिरामुळे इतरांच्या सुटकेचा प्रयत्नंही फसण्याची शक्यता होती!
इकडे छतावरुन उतरुन तिघांनीही तुरुंगाची बाहेरील भिंत गाठली होती! पहारेकर्यांची नजर चुकवून एकामागोमाग एक भिंतीवर चढून तिघांनी पलीकडे उड्या टाकल्या! काही मिनीटातच ते बेटाच्या किनार्यावर पोहोचले होते!
आपल्याबरोबर आणलेला तराफा त्यांनी फुगवला आणि त्यावर स्वार होऊन अल्कात्राझचा किनारा सोडला!
आपल्या कोठडीतून बाहेर पड्ण्यात अखेर वेस्टला यश आलं. तो घाईघाईतच तुरुंगाच्या छतावर पोहोचला, परंतु त्याला उशीर झाला होता...
अँजेलीन बंधू आणि मॉरीस तराफ्यासह अदृष्य झाले होते.
मागे राहीलेल्या वेस्टसाठी त्यांनी एक छोटेखानी तराफा आणि लाईफ जॅकेट ठेवलं होतं, परंतु अंधारात या लपवलेल्या गोष्टी वेस्टच्या दृष्टीस पडल्या नाहीत! वेस्ट पहाटेपर्यंत छतावरच बसून राहीला. निरुपायाने अखेरीस तो आपल्या कोठडीत परतला.
तुरुंगातील पहारेकर्यांना दुसर्या दिवशी सकाळी क्लेरेन्स आणि जॉन अँजेलिन आणि फ्रँक मॉरीस यांची मस्तकं आढळून आली. सुरवातीला काही कारणाने त्यांचा शिरच्छेद झाला असावा अशी त्यांना शंका आली. मात्रं बारकाईने पाहणी केल्यावर चतुराईने आखलेली पलायनची योजना त्यांच्या ध्यानात आली. तुरुंगाच्या छतावर लपवलेलं सामान पहारेकर्यांनी सकाळी ताब्यात घेतलं!
अल्कात्राझमधून या तिघांच्या पलायनाची खबर मिळताच एफ. बी. आय., अमेरीकन मार्शल आणि सॅन फ्रॅन्सिस्को पोलीस खडबडून जागे झाले!
अॅलन वेस्टही या प्रयत्नात सामील असल्याचं कळताच एफ. बी. आय. ने त्याची अथपासून इतिपर्यंत चौकशी केली. वेस्टनेही कोणतीही गोष्ट लपवून न ठेवता पलायनाची संपूर्ण योजना तपशीलवारपणे अधिकार्यांसमोर मांडली. आपल्याला बाहेर पडण्यात उशीर झाल्याने आपण निसटून जाऊ शकलो नाही हे देखील त्याने कबूल केलं!
एफ. बी. आय., अमेरीकन मार्शल्स आणि सॅन फ्रॅन्सिस्को पोलीसांनी बारकाईने या पलायनाचा तपास केला. सॅन फ्रॅन्सिस्को बे मध्ये असलेल्या अँजल बेटावर त्यांना तराफ्याचे काही अवशेष, दोन पॅडल्स आणि अँजेलिन बंधूंची वैयक्तीक सामग्री असलेली एक लहानशी बॅग सापडली. परंतु या व्यतिरिक्त तिघांचीही कोणतीही खूण आढळून आली नाही!
एफ. बी. आय. ने सर्व चौकशीअंती क्लेरेन्स आणि जॉन अँजेलीन आणि फ्रँक मॉरीस सॅन फ्रॅन्सिस्को बे मध्ये बुडाले असा निष्कर्ष काढला! अँजल बेटावर तराफा आढळूनही ते त्या बेटावर पोहोचले असावेत या तर्काला एफ. बी. आय. ने ठाम नकार दिला. एफ. बी. आय. च्या दाव्यानुसार अँजेलीन बंधूंनी आपली वैयक्तीक सामग्री असलेली बॅग मागे सोडली नसती. तसंच पसार झाल्यावर कपडे आणि कार चोरण्याचा त्यांचा इरादा होता, परंतु आसपासच्या परिसरातून एकही कार चोरीची तक्रार नोंदवण्यात आली नसल्याचं एफ. बी. आय. ने प्रतिपादन केलं. अल्कात्राझमधून कोणीही कोणत्याही मार्गाने निसटू शकत नाही या आपल्या दाव्यावर एफ. बी. आय. चे अधिकारी ठाम होते.
एफ. बी. आय. च्या दाव्यांत कितपत तथ्यं होतं?
अँजल बेटावर ज्या ठिकाणी तराफा आढळून आला होता, त्या ठिकाणाहून दूर जाणारे पावलांचे ठसे आढळून आले होते! तसेच निळ्या रंगाची एक शेवरोलेट गाडी त्याच रात्री चोरीस गेली होती!
एफ. बी. आय. च्या रिपोर्टनुसार १७ जुलै १९६२ ला एका नॉर्वेजियन बोटीवरील खलाशांना गोल्डन गेट ब्रिजच्या पश्चिमेला सुमारे २० मैलांवर पॅसिफीक महासागरात एक मृतदेह आढळला होता. या मृतदेहाच्या शरीरावर अल्कात्राझमधील कैद्याचे कपडे होते. मृतदेहाच्या वर्णनावरुन तो फ्रँक मॉरीसचा असावा असा एफ. बी. आय. ने निष्कर्ष काढला.
१६ डिसेंबर १९६२ ला जॉन पॉल स्कॉट आणि डार्ल पार्कर यांनी अल्कात्राझमधून पोबारा केला. बेटाचा किनारा गाठल्यावर त्यांनी रबरापासून बनवलेल्या वल्ह्यांच्या सहाय्याने पोहण्यास सुरवात केली. पार्करचा पाय मुरगळल्यामुळे त्याला जास्तं मजल मारता आली नाही आणि पोलीसांच्या बोटीने त्याला उचललं, परंतु स्कॉटचा मात्रं पत्ता लागला नाही.
सकाळी ७.२० च्या सुमारांना चार तरुणांना गोल्डन गेट ब्रिजच्या पायथ्याशी एक माणूस वाळूवर पडलेला आढळून आला. तो प्रचंड थकल्यामुळे काहीसा बेशुद्धावस्थेत होता. अतिथंड पाण्यात राहील्यामुळे त्याच्यावर परिणाम झाला होता. त्याची अवस्था पाहील्यावर त्यांनी ताबडतोब पोलीसांना कळवलं.
तो माणूस कोण होता?
जॉन पॉल स्कॉट!
स्कॉटला पोलीसांनी ताब्यात घेतलं आणि पुन्हा त्याची अल्कात्राझमध्ये रवानगी केली!
अल्कात्राझमधून निसटल्यावर पोहून कोणीही पळून जाऊ शकत नाही या दाव्याला स्कॉटच्या पलायनामुळे जबरदस्तं धक्का बसला! स्कॉट सॅन फ्रॅन्सिकोच्या किनार्यावर सुमारे ३ १/२ मैलांवर आढळून आला होता!
स्कॉट सापडल्यावर प्रश्न उभा राहीला तो म्हणजे अँजेलीन बंधू आणि फ्रँक मॉरीस निसटण्यात यशस्वी झाले होते का?
अल्कात्राझमधून पलायन केल्यावर अनेकांनी अॅंजेलीन बंधू आणि फ्रँक मॉरीस यांना पाहील्याचा दावा केला होता. अँजेलीन बंधूंच्या आईला दरवर्षी निनावी पत्रं येत होती! तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळी दोन उंचापुर्या आणि संशयास्पद स्त्रिया तिथे घुटमळत असल्याचं आढळून आलं होतं!
फ्रँक मॉरीसचा चुलत भाऊ बड मॉरीस याने अल्कात्राझमधून पसार झाल्यावर काही महिन्यांनी फ्रँकशी भेट झाल्याचा दावा केला होता. बडच्या मुलीनेही एका बागेत फ्रँकशी भेट झाल्याचं चौकशीत सांगितल्याचं निष्पन्न झालं!
एफ. बी. आय. ने १७ वर्षांच्या तपासानंतर १९७९ मध्ये केसची फाईल बंद केली. परंतु अमेरीकन मार्शल्सचा तपास मात्रं आजही सुरु आहे!
क्लेरेन्स आणि जॉन अँजेलीन आणि फ्रँग मॉरीस अल्कात्राझमधून निसटण्यात यशस्वी झाले होते का?
का एफ. बी. आय. च्या दाव्याप्रमाणे ते बुडून मरण पावले?
नॉर्वेजियन खलाशांनी पाहीलेला मृतदेह फ्रँक मॉरीसचा होता का आणखीन कोणाचा?
सॅन फ्रॅन्सिस्को बे मध्ये बुडालेल्या ७५% लोकांचे मृतदेह सापडतात, असं असतानाही या तिघांपैकी एकाचाही मृतदेह का सापडला नाही?
आपल्या वैयक्तीक गोष्टी असलेली बॅग दिशाभूल करण्यासाठी अँजेलीन बंधूनी मुद्दाम मागे ठेवली होती का?
क्लेरेन्स आणि जॉन अँजेलीन आणि फ्रँक मॉरीस आजही हयात आहेत का?
(पूर्वप्रकाशित - दिवाळी २०१४)
मस्तच, नेहमीप्रमाणे
मस्तच, नेहमीप्रमाणे
क्लेरेन्स आणि जॉन अँजेलीन आणि
क्लेरेन्स आणि जॉन अँजेलीन आणि फ्रँक मॉरीस - ह्यांच्या पलायनावर आधारित ह्याच नावाच पिक्चर पण आहे.. क्लिंट इस्टवूड आहे त्यात.. तो मस्त घेतलाय..
कथेतल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी पुढचा भाग लिहिणार आहात का?
मस्त
मस्त
पहिल्यांदा क्रमशः आहे का
पहिल्यांदा क्रमशः आहे का लेखाच्या शेवटी, ते पाहिले आणी मग लेख वाचायला घेतला.
आवडला.
मस्तच ☺
मस्तच ☺
धन्यवाद स्पार्टाकस!! ट्रॅप
धन्यवाद स्पार्टाकस!! ट्रॅप संपल्यानंतर आता पुढे काय? हा प्रश्ण पडला होता. तो तुमच्या या नविन लेख मालिकेने सुटला...
वॉव.. मस्त लिहिलंयस..हे
वॉव.. मस्त लिहिलंयस..हे ही..
लव्ड फ्रिस्को आणी भन्नाट वार्यात सुसाट गतीने निघालेली लाँच जेंव्हा अलकाट्रझ ला वळसा घालते तेंव्हा तेथील सुपर चॉपी पाणी बघूनच धडकी भरली.. अश्या चॉपी समुद्रात उडी मारून निसटायचे तेही अलकाट्रझ मधून.. धाडसा ची कमालच!!!
नेहमीप्रमाणेच
नेहमीप्रमाणेच मस्त!!!
स्पार्टाकस, हा तोच तुरूंग आहे ना जो 'द रॉक' या हॉलिवुडपटात दाखविला आहे.
जे के रॉलिंगच्या लिखाणात
जे के रॉलिंगच्या लिखाणात वाचलं होतं की हॅरी पॉटर पुस्तकातील अझकाबान प्रिझनचं नाव ठेवताना- अल्कात्राझ आणि अजून एक नाव आठवत नाही - ह्या २ वरून ठेवलं आहे असा उल्लेख आहे, आता लेख वाचते
खूप छान.. हे title कुठेतरी
खूप छान..
हे title कुठेतरी वाचलंय.. हे भाषांतर आहे का?
ह्याच नावाचा एक चित्रपट आहे,
ह्याच नावाचा एक चित्रपट आहे, तो पण जबरदस्त आहे!
मस्त !
मस्त !
खूप छान लिहिला आहे.
खूप छान लिहिला आहे.
छान माहिती. आवडले.
छान माहिती. आवडले.
स्पार्टाकस, आवडली कथा! या
स्पार्टाकस,
आवडली कथा! या प्रकारात तुमची हातोटी आहे.
कथेवरून आठवलं की पुण्यापाशीही एक अल्कात्राझ आहे. पण बेट नसून घाट आहे!
आ.न.,
-गा.पै.
कथेवरून आठवलं की पुण्यापाशीही
कथेवरून आठवलं की पुण्यापाशीही एक अल्कात्राझ आहे. पण बेट नसून घाट आहे! डोळा मारा
आ.न.,
-गा.पै.
>>
अल कात्रज घाट! पण यातुन कार सहज जातात
अहो निलिमा, एखाद्याला
अहो निलिमा, एखाद्याला कुठल्याशा झंझटात अडकवणे म्हणजे त्याचा कात्रजचा घाट करणे हे ऐकलं असेल तुम्ही.
आ.न.,
-गा.पै.
खाद्याला कुठल्याशा झंझटात
खाद्याला कुठल्याशा झंझटात अडकवणे म्हणजे त्याचा कात्रजचा घाट करणे... >> हे म्हणजे too much :))))))
क्लेरेन्स आणि जॉन अँजेलीन आणि
क्लेरेन्स आणि जॉन अँजेलीन आणि फ्रँक मॉरीस - ह्यांच्या पलायनावर आधारित ह्याच नावाच पिक्चर पण आहे.. क्लिंट इस्टवूड आहे त्यात.. तो मस्त घेतलाय..>>
काय नाव आहे? पहायला फारच आवडेल.... बाकी कथा नेहमीप्रमाणेच मस्त!
स्पार्टाकस - पु. ले शु.
माउ | 5 February, 2015 -
माउ | 5 February, 2015 - 10:25 नवीन
क्लेरेन्स आणि जॉन अँजेलीन आणि फ्रँक मॉरीस - ह्यांच्या पलायनावर आधारित ह्याच नावाच पिक्चर पण आहे.. क्लिंट इस्टवूड आहे त्यात.. तो मस्त घेतलाय..>>
काय नाव आहे? पहायला फारच आवडेल.... बाकी कथा नेहमीप्रमाणेच मस्त!
स्पार्टाकस - पु. ले शु.
>>>
एस्केप फ्रॉम अल कात्रज असच काहीस्स सरळ सोट नाव आहे. खुप हिट
मुव्ही आहे पण मला इतका खास वाटला नाही. केबल वर लागत असतो अधुन मधुन.
मस्त
मस्त
छान
छान
अभेद्य अशी बिरूदावली >>नाही
अभेद्य अशी बिरूदावली >>नाही एकच बिरूद.
ग्वांटानामो बे बद्दल पण लिहा. रॉक सिनेमात हा तुरुंग पाहिला आहे.