पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/52567
*पमानानान्गल*
काळ : १०५०-१०६० मध्ये कधी तरी
समुद्र. न जाणे किती रहस्यरुपी रत्ने दडलीयेत या रत्नाकराच्या अंतरंगात. त्यातही प्रशांत महासागरासारख्या अथांग पसरलेल्या जलसाम्राज्यात तर विचारायची सोयच नाही. किती विशाल आहे हे सर्व, राजेन्द्र महाराज व त्यांचे चोळ आरमार सुद्धा कधी येथे येऊ शकणार नाही. शांत समुद्रात एकटाच तो मध्यमवयीन युवक नावेत बसून सफर करीत होता. मोठ्या मुश्किलीने तो कुलोत्तुंगाचे मन वळवू शकला होता व त्याने इथे एकटे येण्याची परवानगी मिळवली होती. तो पूर्वी पालेम्बंगच्या चढाईत येऊन गेला होता. केदाह सर करण्यातही त्याचा मोठा वाटा होता. स्वतः कुलोत्तुंग त्याला खूप मानत होता. पण कुलोत्तुंग इतक्यात राजा बनण्याची शक्यता दिसत नव्हती. त्यासाठी त्या शक्तीला पूर्ण वश करण्याची आवश्यकता होती. पण किती दूरवर मजल मारणार? प्रशांत महासागराचे दुसरे टोक पाताळ लोकाचे द्वार उघडते असे लहानपणी ऐकल्याचे त्याला आठवत होते. ही शक्ती कोणी राक्षसी शक्ती तर नाही? पाताळ लोकातील कोणी मायावी दानव, दैत्य, असुर तर नव्हे? तो हातातील जीर्णशीर्ण झालेली ती पुस्तिका पुन्हा पुन्हा चाळत होता. ती यवद्वीपातील प्रचलित भाषा त्याने महत्प्रयासाने शिकून घेतली होती. तो एक एक शब्द जुळवून पुन्हा पुन्हा वाचत होता. त्या शक्तीच्या खूणा, तिला वश करण्याचे मंत्र, ते वरकरणी अर्थहीन वाटणारे शब्द पुन्हा पुन्हा म्हणून बघत होता. परवचा म्हटल्यासारखी त्याची उजळणी करीत होता. पुस्तिकेच्या शेवटी काढलेला ढोबळ नकाशा बघून तो स्वतःचे भूतलावरचे स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करत होता. तो नकाशा त्याला उत्तेजित करीत होता. कधी येईल इथे दर्शविलेले कालद्वीप? कधी मी प्रवेश करु शकेन त्या द्वीपावरच्या मंदिरात? पमानानान्गल. मी तुला हरविले आहे. माझे स्वागत करण्यास तयार राहा.
त्याच वेळी जोरात हसण्याचा आवाज आला. तो युवकही हसला. अजून तू पुष्कळ लांब आहेस म्हणजे. लवकरच तुझे हसणे मंद होईल आणि तेव्हा मला कालद्वीप दिसू लागलेले असेल.
~*~*~*~*~*~
त्या खलबतखान्यात आता केवळ प्रताप, अग्रज, बळवंत, शाम, हैबतराव होते. रातोरात सेक्स्टंट आणायला बैलगाडीतून माणसे रवाना झाली होती. गढीचा एक अविभाज्य हिस्सा म्हणून त्या खलबतखान्याची रचना करण्यात आली होती. हैबतरावांच्या खोलीत एक शिडाळे होते. त्या शिडाळ्यातील दासबोधाची प्रत हलकेच आत दाबल्यास आत जाणारी पायवाट उघड होत असे. ती खोल गेलेली नागमोडी वाट जमिनीच्या पोटात कोठवर गेली होती ते रामराणा जाणे. तिस पायर्या नव्हत्या. प्रतापला त्याचे कारण माहिती होते. अनेकदा फितूरांचे वध करून या वाटेने त्यांची शरीरे लोटून दिली जात. मग जंगलात कोठून तरी विल्हेवाट लावणारा घुसून ती प्रेते ताब्यात घेई. अर्थात गेले ८ दशक त्या वाटेचा हा उपयोग बंद होता. एवढ्या खोल भुयारातला आवाज तसेही बाहेर पडणे अशक्यच पण तरीही कसलासा लेप त्या कक्षाच्या भिंतींना देण्यात आला होता. त्याने आवाज दबण्यास मदत होई म्हणे. ते तळघर खूपच मोठे होते व ते संपूर्ण दाखविण्यास हैबतरावांचा नकार होता. शेवटी जहागीरदार घराण्याची अशी काही खास गुपिते होती.
हैबतराव अग्रजला कौतुकास्पद नजरेने निरखत होते. तो चहा पिऊन ताजातवाना भासत होता. कोडे सोडविल्यावर त्याला भुकेची जाणीव झाली होती. तसेच त्याच्यासाठी साधाच का होईना पण पिठलेभाताचा सैपाक रांधण्यात आला रात्री १२ ला! अग्रजकडून आता ते त्या कोड्याचा अर्थ समजून घेण्यास उतावीळ झाले होते पण त्यांनी स्वतःला रोखून धरले होते. झालं आता, सुटलंय कोडं. जात नाही कुठे हा मुलगा इतकी वर्षे थांबलो अजून काही वेळ.
अग्रजला आता जरा हुशारी वाटत होती. त्याने आपले स्पष्टीकरण सुरु केले.
"जेव्हा मला आजोबांनी हे कोडे दाखविले तेव्हा पहिल्यांदा मला ते जरा चमत्कारिकच वाटले. वरवर पाहता असंबद्ध वाटणारे हे आकडे पाहून कोणीही सामान्य माणूस गोंधळून जाईल. मुधोजीरावांच्या दूरदृष्टीचे त्यामुळे खरंच कौतुक केले पाहिजे. कोणी चोर त्यांचा खजिना शोधूच शकणार नाही, चोरणे लांबची गोष्ट आहे."
"अग्रजबेटा, माझ्या पणजोबांचे कौतुक पुरे. त्यांनी प्रक्रिया एवढी अवघड करुन ठेवली कि त्यांचे वारस आपला वारसा म्हणजे हा खजिना घेऊ शकत नाही तर चोरांची काय कथा? असो, पुढे."
" तर मी प्रथम ०४३६१४४४००९०० हा आकडा लिहून घेतला. गाळलेली जागा मी सोडून दिली. चार निखर्व छत्तीस अब्ज चौदा कोटी चव्वेचाळीस लक्ष नऊशे. या अजस्त्र आकड्याला पाहून मला काही सुचेचना. बराच वेळ तर मी उगाचच त्या गारिसन लिन्तांग व बुजूरचा काही मिळतंय का यावर घालवला. पण त्याच रात्री मला याची युक्ती सुचली."
"कोणती?" हैबतरावांच्या चेहर्यावर आता उतावीळपणा स्पष्ट दिसत होता. त्यांना अशी वैज्ञानिकाच्या थाटातील स्पष्टीकरणे ऐकायची सवय नाही हे स्पष्टच होते.
"या आकड्याची आधी शून्य का? त्याने याची किंमत तर बदलत नाही. मग मला सांकेतिक भाषेचाही संशय आला होता. पण मग ती सोडवायची कशी? काहीच क्लू नाही. गारिसन लिन्तांग क्लू मानला तर ती भाषा मला नीट येत नाही, आणि कुठला सिफर वापरला म्हणायचा तर मग एक डिसायफर्ड टेक्स्ट पाहिजे."
आता उतावीळपणाची जागा गोंधळाने घेतली.
"थोडक्यात ही एक अंकमालिका असली पाहिजे. मग मी हिचे विभाजन करुन पाहिले. एक एक आकडा वाचून मग दोन दोन आकडे सोडून
०४ | ३६ | १४ | ४४ | ०० | ९० | ०
मग माझ्या लक्षात आले की पहिले दोन आकडे वर्ग आहेत. मग सगळेच सोपे होते.
० | ४ | ३६ | १४४ | ४०० | ९००
आता हे वर्ग झाले ०, २, ६, १२, २०, ३० चे. असे प्रश्न मी पूर्वी पाहिले आहेत. हे लगतच्या आकड्यांचा गुणाकाराने बनलेल्या संख्या - ०*१, १*२, २*३ इ. मग पुढची अर्थातच ६*७ = ४२ चा वर्ग - १७६४"
सर्व या खेळाने थक्क झाले होते.
"आणि दुसरी ओळ?"
"आता अर्थातच ही सुद्धा अंकमालिकाच असली पाहिजे. १२३४६१२६१३१२२६१८३९२४५२३६७८ लिहून घेतली. विभाजन जमले की झाले. एक एक आकडा वाचण्यात काही अर्थ नाही असे वाटले. मग दोन दोन सोडून वाचून पाहिले.
१२ | ३४ | ६१ | २६ | १३ | १२ | २६ | १८ | ३९ | २४ | ५२ | ३६ | ७८ |
पण काही संबंध लागेना. ३-३, ४-४ सोडूनही तसेच होत होते. मग अचानक स्फुरले की १,२,३,४,६ हे सुरुवातीचे आकडे तर जवळपास क्रमवार आहे. ही वाढती संख्यामाला तर नव्हे? मग असे विभाजन केले
१ | २ | ३ | ४ | ६ | १२ | ६१३ | १२२६ | १८३९ | २४५२ | ३६७८
आता तुम्ही विचाराल असेच का? तर या विभाजनाने तयार होणार्या संख्यामध्ये काही समान धागा आहे. हे सर्व ७३५६ चे अवयव आहेत. मग गाळलेली जागा ७३५६च असावी असे मला वाटू लागले."
सर्व मनोमन त्याच्या गणिती ताकदीची दाद देत होते.
"आता गारिसन लिन्तांग व गारिसन बुजूरचा अर्थ लावणे माझ्या पलीकडचे होते. मी ग्रंथभांडार धुंडाळून पाहिले पण फारसे काही सापडले नाही. ही भाषा आपण शिकू शकू कारण तसे एक पुस्तक तुमच्या पूर्वजांनी सोडले आहे पण शब्दकोश असा नाही. मग मी या आकड्यांचे निरीक्षण केले. आणि आज रात्री मी असाच माडीवर येरझार्या घालत असता माझा विचार चालूच होता. तेवढ्यात माझे लक्ष निरभ्र काळ्या आकाशाकडे गेले. उत्तर दिशेला ध्रुवतारा व त्याला प्रदक्षिणा घालणारे सप्तर्षी दिसले आणि आठवले की ध्रुवतारा हा त्या जागेच्या अक्षांशांइतका उंचीवर असतो. पुण्यातून तो साधारण १८ अंश वर दिसतो. आणि पुण्याचे रेखांश ७३ अंश. मायकपाळ पुण्याहून खूप लांब नाही म्हणजे जवळपासच्या टेकड्यांचे अक्षांश-रेखांश आसपासच असले पाहिजेत. म्हणजे १७६४, ७३५६ = १७.६४ अक्षांश ७३.५६ रेखांश हे स्थान."
अग्रजचा चेहरा उत्तेजित झाला होता. सर्व अवाक होऊन त्याच्याकडे बघत होते.
"मग ते शब्द?"
"माझ्यामते ते तुम्हाला आकाशातील कोन मोजण्याची सूचना करत आहेत जे आपण पण करणार आहोत फक्त अधिक सफाईने. गारिसन म्हणजे मोजा, जा अशा अर्थाचे क्रियापद असावे. लिन्तांग म्हणजे कदाचित वर/एलिवेशन तर बुजूर म्हणजे आडवे/साईडवेज/अझिमुथ असावे. माहित नाही नक्की पण तपासून बघण्यात काय हरकत? अनमानधपक्याने जागा शोधण्यापेक्षा इथे जाऊन बघून तर येऊ."
हैबतराव या अचाट कामगिरीवर आता बेहद्द खूष होते. त्यांनी मान डोलाविली. तब्बल ८ दशकांनंतर मुधोजीरावांच्या अभेद्य सुरक्षाव्यवस्थेतील पहिला चिरा ढासळला होता. त्यांनी वारसाहक्काने सोडलेली संपत्ती त्यांचे वारस परत मिळवणार होते.
~*~*~*~*~*~
मी कुठे चालतोय आज? पुन्हा तो साधू. नमस्कार महाराज. अरे हसतोय चक्क तो.
"मला माहिती होतं. यावेळेसचा मालक हुशार निघणार आहे. सुरुवातीच्या भेटींमधला तुमचा वेंधळेपणा हा दिखावा होता. असो तुम्हाला कल्पना आली असेलच की ही नेहमीची स्वप्ने नाहीत."
"तशी ती पहिल्या स्वप्नापासूनच आली होती. असे म्हणूयात की आज शिक्कामोर्तब झाले."
"तुमचे अभिनंदन सर्वात पहिल्यांदा. तुम्ही आणि तुमचे दोस्त, तुमचे आजोबा आता खजिना शोधणार तर. अ अ मला अडवू नका बोलताना. तुमचा ग्राहक तितकासा विकसित नाहीए अजून आणि माझ्याजवळ एवढा वेळ नाही. चला तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आज कुठे जायला नको."
गोष्ट. बरं गोष्ट तर गोष्ट.
"ही बर्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हे जहागीरदार जसे पूर्वी पेशव्यांचे नोकर होते ना आणि आज ब्रिटीशांकरवी छोटे-मोठे संस्थानिक होऊन बसलेत तसे त्याआधी शिवाजीच्या राज्याचे, त्याही आधी आदिलशाही, निजामशाही, बहमनी सुलतान, विजयनगर, दिल्ली सल्तनत, यादव इथपर्यंत मागे जाता येईल यांच्या धन्यांची यादी करताना. पण नेहमीच चतुराईने यांनी स्वायत्त कारभार केला. पण मायकपाळला स्थिर वतनदारी त्यांना बहमनी सुलतानांच्या काळात मिळाली. तेव्हा मायकपाळला काही उग्र अघोरी राहत. त्यांचा बंदोबस्त करुन तो प्रदेश वतन म्हणून ताब्यात घ्यायची यांना आज्ञा झाली. त्या उग्र अघोरांना म्हणत मायाकापालिक. होय मायकपाळचे मूळ नाव मायाकापालिक. ती सीता व मंदिराची दंतकथा नंतर बनवली गेली. आता या तांत्रिकांचे अस्तित्त्व समूळ खोदून काढण्यासाठी त्यांनी त्यांच्या आराधनेच्या स्थानावर एक नवीन मंदिर बांधून ते स्थळ नाहीसे करुन टाकले. सीतेची नवीन कथा पसरवली व हे नवे गाव वसवले. आहे का नाही गंमत?" त्याने डोळे मिचकावले.
"ओह्ह. म्हणून ते मंदिर अशास्त्रीय पद्धतीने बांधले आहे? कारण मूळ मंदिरात फार बदल नाही करता येत. आणि मूळ मंदिर शंकराचे असेल म्हणून नंदी आहे."
"हुशार आहेस. पण अजूनही काही गोष्टी आहेत ज्या सगळ्या नाही सांगता येणार."
"पण तू हे मला का सांगतो आहेस?"
"मायाकापालिकांचा बंदोबस्त झाला याचा अर्थ त्यांचा निर्वंश थोडीच झाला. ते येत आहेत त्यांचा वारसा परत मिळवण्यासाठी. तू गावाच्या बाहेर असुरक्षित असणार. म्हणून काळजी घे. तुझी सुरक्षा व्यवस्था सर्वोत्तम हातात असली तरी गावाच्या आत ती अभेद्य आहे पण गावाच्या बाहेर नाही. जपून राहा. लुमिखा तुझे रक्षण करो."
लुमिखा. अखेरीस तो कुठला तरी देवच. होय देव माझे रक्षण करील.
~*~*~*~*~*~
लाखनच्या वागण्यात आता आमूलाग्र बदल घडून आला होता. त्याच्या बा ला आता त्याची चिंता वाटू लागली होती. दुर्जनशी त्याची जवळीक अचानक वाढली होती. त्याचा विपरीत परिणाम व्हायची शक्यता होती. अखेरीस ते उपरे होते. माळव्यातून आलेले, या मुलखाची पैदाईश नसलेले. बरेचसे दुर्जनचे सर्व निर्णय डोळे झाकून मान्य करणारे असले तरी सर्वच तसे नव्हते. लाखन आणि त्याचा बा अड्ड्याची टेकडी चढत होते. बा ला काही विशिष्ट वनस्पती गोळा करायचे काम मिळाले होते. लाखनला त्या वनस्पतींची माहिती घेण्याचा हुकूम होता. वनस्पती गोळा करुन ते परतत होते. ते ३ जणांचे टोळके त्या दोघांचीच वाट बघत होते. त्यांनी कोणतीही संधी न देता आकस्मिक हल्ला चढविला. लाखनच्या डोक्यात सोट्याचा एक घाव बसला व छातीत गुप्तीचा. तो जागीच कोसळला. त्याचा बा हादरुन गेला होता.
"म्हातार्या. तुज्यासंग आमची दुस्मनी न्हाई. परं क्या करे? गवाह को जित्ता नही छोड सकते."
तो घाव तसाच हवेत राहिला. लाखनने तो हात मागून धरुन ठेवला होता.
"ए मारा याला. लखण्या सोड हात. ए सांडा उखडून यील तो."
मागून सोट्याचे वार होत असतानाही लाखनला काहीच वाटत नव्हते. त्याने ७-८ वार खाल्लयावर सरळ खांद्यातून तो हात उपटला. हल्लेखोर विव्हळत पडला होता.
"ल ल लखण्या ह्ये बघ. आपुन दोस्त की न्हाई. तसंबी सरदार आपल्या भावकीत कुनालाबी मारायची परवानगी देत न्हाई."
"भावकी? तुमी कोनी त्याची भावकी न्हाई. कारन तुमी कोनी मायाकापालिक नाही."
बा डोळे विस्फारुन बघत होते. इतके वाईट मरण त्याने कोणाचेच पाहिले नव्हते. सरदार वगळत असे क्रौर्य इतर कोणी दाखवलेले त्याला आठवत नव्हते.
"बा" तो भानावर आला. "ए बा. जखम भरुन यायला येळ लागेल. मै जाके कुछ इंतजाम करता हूं इसका. तू आगे बढ. सरदार कुछ पूछे तो सिर्फ उसे सच सच बता देना. आता हूं."
बा त्याच्या जाणार्या पाठमोर्या आकृतीच्या दिशेने कितीतरी वेळ पाहतच होता.
"ये मेरा लाखन नही है. लाखन अब लाखन नही रहा."
~*~*~*~*~*~
हैबतरावांनी प्रतापला बोलावून घेतले होते. सेक्स्टंट आता आला होता. पण इतर किरकोळ तयारीत वेळ गेला होता. तो संपूर्ण आठवडा उत्साहात गेला होता. सर्व आता प्रवासावर निघणार होते. कधीकाळी प्रतापचे वडील असेच कित्येकदा स्वारीवर जायचे. ही त्याची पहिलीच खेप होती.
हैबतरावांनी आलेल्या नातवाला निरखले. त्याला दार लावून घेण्यास खुणावले. मग खलबतखान्यात घेऊन जात ते बोलू लागले.
"प्र्ताप आता तू लवकरच जहागीरदार घराण्याचा पूर्ण वारस म्हणवून घेण्यास लायक ठरशील. अशा वारसास मी आता काही सत्य सांगण्यास बांधील आहे. तुझ्या सुरक्षेसाठी ते महत्त्वाचे आहे."
प्रताप काहीसा चमकला. "काय आजोबा?"
"प्रताप तुला त्याआधी एक प्रश्न विचारतो. तुला कोणी आदिवासी दिसला होता? प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, जागेपणी, स्वप्नात?"
प्रतापचे भाव बदलले. "आजोबा म्हणजे बघा..."
"बास जास्ती बोलायची गरज नाही." त्यांनी त्याचे बोलणे तोडले.
"तो साधू, एखादा योद्धा बनून भेटत राहील. त्याची एवढी चिंता नाही. चिंता आहे मायाकापालिकांची. इथे प्रचलित असलेली दंतकथा अगदीच खोटी नाही. असे अघोर खरेच होते. ते कुठून आले माहीत नाही पण त्यांनी काही शतकांपूर्वी मायकपाळ ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला होता. त्यांना सीतामातेचे मंदिर हवे होते म्हणे ते त्यांच्या साधनेसाठी उपयुक्त होते. ते मंदिर पाडून तिथे त्यांना महाकालाचे मंदिर बनवायचे होते. आता मायकपाळचे नाव जिच्यावरुन पडले त्या सीतामातेचे मंदिर कसे पाडणार? आपल्या तेव्हाच्या पूर्वजाने त्यांना दुसरीकडे मंदिर बनवायला सांगितले. तेव्हा त्यांनी काळ्या जादूने जणू युद्धच पुकारले. पण आपले पुण्य थोर. त्यांचा नि:पात झाला. आपल्या बाजूचीही बरीच हानी झाली म्हणा. असो, पण दयाभावनेला स्मरुन त्यांचा निर्वंश न करता त्यांच्यातील काहीजणांना परत मायकपाळमध्ये पाय न ठेवण्याच्या अटीवर सोडून देण्यात आले. आता तू विचारशील की मी हे आत्ता का सांगतोय. कारण ते परत आले आहेत."
"काय?" प्रताप दचकला.
"होय. आमची खात्रीलायक खबर आहे की कुख्यात डाकू दुर्जन हा मायाकापालिकांचा वारस असून तो सध्या या भागात वावरत आहे. आसपासच्या गावांमधून माणसे गायब होत आहेत. अर्थातच त्याच्या तांत्रिक क्रियांसाठी असणार. पण आता पाणी डोक्यावरुन चालले आहे. मायकपाळमधून काल रात्री एक तरुणी उचलली गेली."
"बास आजोबा. खजिना अग्रज शोधेल. मी त्याचा बंदोबस्त करायला मागेच राहतो मग."
"तू येडा का खुळा. मी जित्ता असताना तू कशाला तांत्रिकाच्या फंदात पडतो. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की तो तुझ्यावर हल्ला करु शकतो. त्यामुळे सावध राहा.. जा आता अधिक काळ आपण असे नाहीसे होणे योग्य नव्हे. आजच्या दिवशी तर नाहीच. विजयी हो माझ्या लेकरा."
प्रतापने त्यांना वाकून नमस्कार केला. त्याच दिवशी जरा बर्यापैकी उजाडल्यावर त्याच्या काफिल्याने गाव सोडले.
राहून राहून प्रताप आपल्या वागण्याचा विचार करत होता. आणि त्याला एक घटना सतावत होती. आजोबा आपल्याशी खोटे का बोलले? त्यांची कहाणी अर्धीच खरी का होती?
क्रमशः
टीपः ध्रुव तारा खरेच त्या जागेच्या अक्षांशाइतक्या elevation वर असतो. हे खगोलशास्त्रीय सत्य आहे. म्हणूनच तो फक्त उत्तर ध्रुवावर आपल्या बरोब्बर डोक्यावर असतो. exactly 90 degree elevation.
पुढील कथासूत्र येथे - http://www.maayboli.com/node/52602
एकदम खिळवुन ठेवत आहे ही
एकदम खिळवुन ठेवत आहे ही कथा...
मस्त सुरू आहे. एक वेगळंच जग.
मस्त सुरू आहे. एक वेगळंच जग.
मस्त कहाणी...
मस्त कहाणी...
बेफाट. लवकर पुढला भाग टाका.
बेफाट. लवकर पुढला भाग टाका. फार इंटरेस्टिंग आहे.
जरा मोठे भाग टाका ना, प्लीज!
जरा मोठे भाग टाका ना, प्लीज!
पायस, कथानकाने चांगला वेग
पायस,
कथानकाने चांगला वेग घेतलाय.
रच्याकने :
पहिल्या संख्यामालेची फोड अशीही करता येते : ० | ४ | ३६ | १४४४०० | ९००
वर्गमूळं ० २ ६ ३८० ३० अशी येतात. ३८० = १९* २०
अर्थात पुढे अर्थान्वये ही माला खुंटते.
आ.न.,
-गा.पै.
गापै - विचारात घेण्यासारखी
गापै - विचारात घेण्यासारखी आहे तुम्ही केलेली फोड. पण जसे तुम्ही म्हटले आहे तसे अर्थान्वये ही खुंटते. तरी एक वेगळा विचार करून प्रतिसाद दिलात याबद्दल धन्यवाद.
पायस, मला वाटलं की पर्यायी
पायस, मला वाटलं की पर्यायी फोडीवर एखादी कलाटणी (ट्विष्ट) येतेय का काय!
आ.न.,
-गा.पै.
ईतिहासाची सांगड मस्त. आणि
ईतिहासाची सांगड मस्त. आणि आकड्यांची
> टीपः ध्रुव तारा खरेच त्या जागेच्या अक्षांशाइतक्या elevation वर असतो. हे खगोलशास्त्रीय सत्य आहे. म्हणूनच तो दोन्ही ध्रुवांवर आपल्या बरोब्बर डोक्यावर असतो. exactly 90 degree elevation.
फक्त उत्तर ध्रुव्वावरून. दक्षिण गोलार्धात नेमका अक्षाच्या दिशेनी कोणताच तारा नाही.
नंतरच्या कथेला त्याची आवश्यकता आहे की नाही ते माहीत नाही, पण हजार वर्षांमध्ये पृथ्विच्या परांचलनामुळे तार्यांच्या सहाय्यानी केलेल्या गणीतात बरेच फरक पडू शकतात. (टिळकांचेच 'खरे पंचांग कसे मिळेल' याच संदर्भात आहे).
माहितीत सुधारणा केल्याबद्दल
माहितीत सुधारणा केल्याबद्दल धन्यवाद आस्चिग
परांचलनामुळे फरक पडू शकतो हे माहित होते, पण मग कथा अधिकच क्लिष्ट झाली असती. त्यामुळे फार फरक नाही पडला असे कथेच्या सोईकरता पकडले आहे.