पूर्वसूत्र येथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/52505
टण्ण! मध्यरात्रीचा पहिला प्रहर सुरु झाल्याचे टोले पडले. लाखनने आपल्या खिशातील पिस्तुलावर आलेला हात बाजूला घेतला. एका छोट्या खेड्याच्या मानाने घंटेचा आवाज चांगलाच मोठा होता. वेशीच्या बाहेरपर्यंत ऐकू येत होता लाखनने तरी सुद्धा चाचपणी केली, कोणी आसपास तर नाही. सरदारने त्याला बजावले होते की जहागीरदारला कसले तरी कर्णपिशाच वश आहे त्यामुळे प्रत्येक पाऊल जपूनच टाक. पौष अजून संपायचा होता आणि रात्रीची थंडी मी म्हणत होती. लाखनच्या मनात क्षणभर आले खड्ड्यात गेला आपला सरदार आणि त्याचा तो दुश्मन जहागीरदार, एवढ्या कडाकाच्या थंडीत कोण येतंय बातमी घेऊन. त्याने एक पाऊल कडेला टाकले आणि तेवढ्यात त्याला त्यानेच जमिनीवर आखलेली रेष दिसली. या रेषेने आखलेल्या वर्तुळापलीकडे त्याच्या जीवाची शाश्वती नव्हती. त्याचा स्वतःचा दुर्जनसिंहच्या मायावी शक्तींच्या बकवासवर विश्वास नव्हता पण त्याच्या क्रौर्यावर होता. आणि ज्या जहागीरदारशी टक्कर घेताना बेदरकार दुर्जनपण सावधपणे वागतो त्याला आपण दबकून राहायलाच हवे. तेवढ्यात त्याला कसला तरी आवाज आला. त्याने वळून पाहिले तर त्याला एक बुरखाधारी व्यक्ती त्याच्याचकडे चालत येताना दिसली. कमरेच्या पिस्तूल त्याने तयारीत ठेवले. पण ते वापरायची गरज नाही पडली.
"पाच लक्ष अकरा सहस्त्र एकशे एकतीस?"
"ङ्क्ट्प्ब्य" मोठ्या कष्टाने दुर्जनने शिकवलेली लाखनने ती व्यंजनमाला उच्चारली.
"मायाकापालिक. खूण पटली. सरदार कसे आहेत?"
"ठीक आहेत जी."
"हम्म. बरं खबर ऐक. जहागीरदाराने कुणी कोडी सोडविणारा मिळवलाय. सध्या तो विविध पत्रव्यवहार तपासतोय. कदाचित उद्या तो मुधोजीरावांचा ताम्रपट अभ्यासायला सुरुवात करेल. नेहमीपेक्षा वेगळा दिसतोय. त्याच्या नातवाचा मित्र आहे, तरुण आहे त्यामुळे उत्साही देखील आहे. लवकरच ते टेकड्या भटकायला सुरुवात करतील. तिथे एखादी मोक्याची जागा बघून त्यांना गाठता येईल. तसेच ते बाहेर पडले कि पमाण्णा व हैबतराव त्यांच्या मागोमाग जातीलच."
"पण पमाण्णा किंवा हैबतराव गेले तर काय होईल? आणि पमाण्णा कोण?"
ती व्यक्ती खळखळून हसली. "तू पूर्वी कधी मायकपाळ मध्ये आलेला दिसत नाहीस. पमाण्णा कोण हे तर मी सांगू शकत नाही. पण त्या गढीचे सर्वात मोठे रहस्य तेच आहे हे निश्चित. तू फक्त माझे शब्द दुर्जनला जसेच्या तसे सांग. सरदारला कळेल काय समजायचे ते."
"जी" ती व्यक्ती काही तरी पुटपुटायला लागली. तिने एक अर्थहीन वर्णमाला उच्चारुन लाखनच्या कपाळावर अंगठा टेकवला. तिथे आग लागल्याचा भास त्याला झाला व त्याने मुश्किलीने तोंड बंद ठेवले. दुर्जनच्या हुकुमात ओरडण्याला स्थान नव्हते.
"जा आता. तुला मायकपाळच्या हद्दीतून बाहेर पडायला अर्ध घटिका मिळेल."
"पण मी तर बाहेरच आहे."
"मूर्ख आहेस तू. त्या मंदिराच्या टेकडीपर्यंत त्याची हद्द चालते. निघ आता. वेळ घालवू नकोस."
लाखनने अधिक चर्चा न करता पळ काढला. टेकडी ओलांडल्यावरच तो विश्रांतीस थांबला.
~*~*~*~*~*~
अग्रज कितीतरी वेळ त्या ताम्रपटास निरखून पाहत होता. त्याच्यावर मोडी लिपीत विविध माहिती नोंदलेली दिसत होती. त्याशिवाय अजून एक अनोळखी लिपी दिसत होती. पण ती कोणती हे कळायला मार्ग नव्हता. मोडी लिपीत सुवाच्य अक्षरात प्रथम मुधोजीरावांच्या वतीने त्यांच्या वारसांसाठी संदेश होता. जर येनकेन कारणाने आकस्मिक मुधोजी निधन पावल्यास या ताम्रपटातील धाग्यांचा वापर करुन खजिना शोधता येईल असे नमूद करुन ठेवले होते. कुणा भावे नामक इसमाने ही रक्षक कोडी तयार केल्याचा उल्लेख होता. (अरे माझा कोणी पूर्वज तर नव्हे - शामची थट्टेखोर टिप्पणी). यानंतर जवळपास सर्व शब्द हे कोण्या वेगळ्या भाषेत,लिपीत लिहिले होते.
"मी ही लिपी काही प्रमाणात वाचू शकतो. आमच्या घराण्यातील कर्त्या पुरुषाला ही लिपी शिकून घ्यावीच लागते. तसा दंडकच आहे. खरे तर ही भाषा शिकणेही बंधनकारक आहे पण खजिना लपविल्यापासून सर्व त्याच्यामागे लागल्याने आजोबांनी बाबांना ती नीट शिकवली नाही. त्यांनी मला भाषाच शिकवली नाही." हैबतरावांनी माहिती पुरविली.
अग्रजने मान डोलाविली. मोडीतील संदेशात ज्या कोड्यापासून सुरुवात करावी असे सांगितले होते ते आता तो वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत होता. सुदैवाने आकडे देवनागरीत होते.
गारिसन लिन्तांग (हैबतरावांचे उच्चारण, लिपी/भाषा अनाकलनीय)
०४३६१४४४००९००____
गारिसन बुजूर (ही कुठली विचित्र भाषा आहे?)
१२३४६१२६१३१२२६१८३९२४५२३६७८____
धाड! सगळ्यांनी माना वळवून पाहिले. बळवंत जमिनीवर पडला होता. "हे काय आहे? एवढे मोठे आकडे?"
खतरनाक हा एकच शब्द उच्चारावा लागत होता. प्रताप काहीसा निश्चिंत झाला. अग्रजने त्याला मुश्किलीने तयार केले होते. त्याच्या डोक्यात जो शाप बसला होता तो शाप स्वराज्य प्राप्तीसारख्या पवित्र कामासाठी दिल्यास धुतला जाईल हे ठसवले होते. पण जर सुरुवातच अशा अनाकलनीय कोड्यांनी होणार असेल तर हे खजिना मिळणे अशक्यच होते. त्याने अग्रजकडे नजर टाकली. अग्रजचे कपाळ आठ्यांच्या जाळ्यांनी भरुन गेले होते.
हैबतरावांनी अग्रजच्या खांद्यावर हात टाकला व ते सहानुभूतीपूर्ण आवाजात म्हणाले - " या कोड्यावरच आम्ही आजवर अडकलो आहोत. आम्ही कितीक माणसे, विद्वान या कोड्यावर लावले पण कोणालाही हे कोडे सोडवता आले नाही. काहीजणांनी हे आकडे समजल्याचा दावा केला पण लिन्तांग, बुजूरशी त्यांना संबंध जोडता आला नाही. दुर्दैवाने पूर्वीच्या प्रयत्नांची आम्ही नोंद अशी ठेवली नाही. तू अजूनही हे सोडवू इच्छितोस?"
अग्रजने ताम्रपटाकडे बघत होता. त्याच्या डोळ्यांसमोर आकडे आता नाचत होते.
"अग्रज बाळा?" "गप्प बसा."
सगळे दचकले, प्रताप सोडून. प्रतापने अग्रजला गणिते सोडवताना पाहिले होते. त्याला विचारप्रक्रियेत जराही अडथळा खपत नसे. पण इतरांना अशा उत्तराची सवय नव्हती, खासकरुन हैबतरावांना. पमाण्णातर खडसावण्यासाठी पुढे सरसावले. पण प्रतापने अर्थाचा अनर्थ होण्याआधीच हस्तक्षेप करुन त्यांना अडविले.
"आजोबा. चला, तो हे सोडविणार ही आता काळ्या दगडावरची रेघ. आता आपल्या हातात त्याला कमीत कमी त्रास देणे एवढेच आहे."
"पण प्रताप.." "आजोबा. भयंकर हुशार माणसे अनेकदा विक्षिप्त असतात. अशा लोकांना कामात अडथळा खपत नाही. आता वाट पाहायची, होय खजिन्याची पहिली चावी मिळण्याची वाट पाहायची."
~*~*~*~*~*~
लाखन आता अड्ड्यावर पोचला होता. तो आल्याची वर्दी दुर्जनकडे पोचविण्यात आली होती. त्याला थोड्यावेळ वाट पाहण्यास सांगितले गेले. तोवर हात-पाय शेकत बसला होता. तांबडे फुटण्यास घटका-दीड घटका होती. बरेचसे साथीदार झोपले होते. पहार्यावरचे मात्र डोळ्यात तेल घालून जागत होते. तशी पेंग त्यांनाही येत होती पण झोपण्याची सोय नव्हती. सरदार काय करेल याची खात्री नव्हती. एकदा त्याचे अनुष्ठान सुरु झाले की मग आपण पेंगायला मोकळे हाही एक विचार मनाशी होता. लाखन रात्रीच्या उरलेल्या बोकडाचे मटण तोडत बसला होता. सोबत मोहांच्या फुलांची दारू देखील होती. एकीकडे तो स्वतःच्या आयुष्यावर विचार करीत होता. लखण्या.. होय याच नावाने तो त्या दलात प्रसिद्ध होता. त्याची मूळ पैदाईश माळव्यातील होती. तसे त्याचे पूर्वज गंगावेशीचे. पण नशीब काढायला इंदूरास होळकरांच्या पदरी आले. पुढे मराठेशाहीच्या अस्ताबरोबर त्यांची ससेहोलपट झाली. ब्रिटीशांच्या दमनचक्रात ते पिळले गेले व पळून महाराष्ट्रात आले. खरेतर आता इंदूर संस्थानात त्यांना फारसा त्रास कदाचित झालाही नसता पण १८५७ मधल्या रणधुमाळीपासून लांब राहिल्याचे समाधान. कधीतरी लाखनच्या वडिलांनी लूटमार करण्यास सुरुवात केली. बेकारी फार वाईट, अशा परिस्थितीत माणसे वाईट मार्गाला लागली नाहीतरच नवल. कधीतरी ते या अघोरी माणसाच्या संपर्कात आले होते. त्यानंतर लाखन उर्फ लखण्याने दरोड्यांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली होती. लखण्याला स्वतःला त्यातल्या संपत्तीत, लूटीत फारसा रस नव्हता. त्याला त्यातल्या रोमांचाशी मतलब होता. कधीकधी त्याचा बा त्याला म्हणतही असे - लाखनबेटा, तू हमारे पुरखों की तरह है. सिर्फ लडाई मे ही तुझे सुकून मिलता है. वक्त बदल रहा है बेटा, अब हमे इस नरक से निकलने की सोचनी चाहिये. और तू है की इसी खूनखराबे मे खूश है.
लाखन हे बोलणे हसण्यावारी नेत असे. तसा तो दुर्जनचा फार लाडका वगैरे नव्हता पण त्याच्या डोळ्यात कत्तल करतान उमटणारे खुनशी भाव दुर्जनने हेरले होते. अशाच माणसांचा दुर्जन पारखी होता.
"लखण्या तुला सरदारने आत बोलावले हाय."
लाखन उठून सरदारच्या अनुष्ठानाच्या ठिकाणी चालू लागला. दुर्जन मधूनच अशी अनुष्ठाने करीत असे. त्याच्या काही अत्यंत जवळच्या साथीदारांव्यतिरिक्त कोणाला हे ठाऊक नव्हते की तो नक्की काय करतो. स्वतः लाखनला त्याची खूप उत्सुकता होती. पण आपल्याला बोलावले गेले म्हणजे यातर अनुष्ठान संपले किंवा सुरु होण्यापूर्वीच आपल्याला बोलावले गेले.
लाखन आत जाताच इतरांना बाहेर जाण्यास सांगितले गेले. समोर कालभैरवाची कराल मूर्ती होती जिला दुर्जन महाकाल म्हणून संबोधत असे. कोणी एक स्त्री शांभवीच्या नशेत धुत् पडली होती. दुर्जन काळ्या रंगाचे वस्त्र नेसला होता. कपाळावर कुंकवाने काही चित्रविचित्र आकृत्या रेखाटल्या होत्या. अंधुक प्रकाशात तो अधिकच उग्र भासत होता. लाखनने त्याने ऐकलेली खबर जशीच्या तशी सांगितली. येतो जी करुन तो मागे वळणार, तेवढ्यात त्याला थांबण्याची आज्ञा झाली.
"लाखन (हा धक्काच होता. दुर्जन त्याला प्रथमच लाखन म्हणून पुकारत होता.) तू खूप छान कामगिरी बजावलीस. त्या बदल्यात आज तुला मी काही खास रहस्यांमध्ये सामील करुन घेणार आहे. तुझ्या प्रतिसादावरुन कदाचित तू माझा खास माणूसही बनशील. पण प्रथम मी हे अनुष्ठान, हेहेहे, ही तांत्रिक क्रिया संपन्न करतो."
लाखनचा मेंदू आता संवेदनांच्या पलीकडे चालला होता. तिथे कसला तरी दर्प भरुन राहिला होता. दुर्जन आता एका छोट्या कट्यारीने त्या तरुणीला विविध ठिकाणी जखमी करीत होता. एकीकडे तो काही मंत्र पुटपुटत होता. जशी जशी ती तरुणी शुद्धीवर येत होती तसा तसा दुर्जन अधिकच धिप्पाड भासत होता. त्याच्या सर्वांगावर राठ केसांचे जाळे निर्माण होत होते. मूर्तीच्या डोळ्यांतून क्षणभरच किरणे सुटल्याचा भास झाला. दुर्जन आता दुर्जन राहिला नव्हता. हा नक्की मनुष्यच आहे ना? एखाद्या लांडग्यासारखा कोणी प्राणी तिथे उभा होता. लाखन आता त्या कक्षाच्या भिंतीला खिळून उभा होता. त्या तरुणीचा कंठ पहिल्याच वारात फुटला होता. त्यामुळे तिचा ओरडण्याचा प्रश्नच नव्हता. आता लाखन सुन्न होऊन फक्त कत्तल बघत होता. काही मिनिटांनंतर त्याला उग्र श्वास जाणवला. त्याच्यासमोर दुर्जन आता मनुष्यरुपात उभा होता. लाखन थरथर कापत होता. पण त्याच्या पायांमध्ये पळण्याचे त्राणच नव्हते. त्याने नजर फिरवली. वेदीपाशी रक्ताचा सडा होता. तिथे जागोजागी लचके तोडलेले स्त्रीचे शव पडले होते.
"लाखन मायाकापालिकांची ही खरी शक्ती आहे. हा महान दुर्जन मायाकापालिक नावाच्या एका अतिप्राचीन अघोरी तांत्रिक पंथाचा शेवटचा वारस आहे. तुझ्यासमोर असलेली मूर्ती ही महाकालाच्या शक्तीचा अंशमात्र आहे. खरी मूर्ती मायकपाळ म्हणजेच मायाकापालिकांच्या आद्य वस्तीस्थानी आहे. लाखन तुझ्यात तो दम आहे जो तुला एक मायाकापालिक बनवू शकतो. मलाही एका साहाय्यकाची गरज आहेच. मग बोल तुझा काय निर्णय झाला आहे?"
आपण मरत नाही आहोत हे लक्षात आल्यावर लाखन थोडा सावरला. त्यातले खुनशी रक्त उफाळून आले.
"होय सरदार. मी मायाकापालिक बनायला तयार आहे."
~*~*~*~*~*~
गढीवर आज शांती होती. २ दिवस उलटून गेले होते. अग्रजने स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते. सर्वजण चिंतित होते. कोडे नाहे सुटले तरी चालेल पण या पोराचा जीव हकनाक नको जायला अशीच सर्व गडीमाणसांची धारणा होती. शाम, बल्लु, प्रताप तो किमान दोन घास खाईल याची काळजी घेत होते. पण अर्धेअधिक ताट तसेच परत येत होते. त्याच्या खोलीत त्याने केलेल्या कच्च्या कामाने भरलेले कागद इतस्ततः पसरलेले होते.
हैबतराव सर्वात जास्त चिंताक्रांत होते. त्यांची अपेक्षा होती की अग्रज हे कोडे सोडवताना आपल्याला पूर्ण विश्वासात घेऊन, आपल्या समोर बसून, त्याच्या प्रत्येक कृतीचे स्पष्टीकरण देत सोडवेल. प्रताप मनातल्या मनात त्यांची कीव करीत होता. या अशाच स्वभावामुळे जहागीरदारांना हे कोडे सोडवता आले नसल्याचे त्याच्या ध्यानात आले होते. ज्याचे काम त्याला करु दिले नाही तर ते नीट होणार नाही हे अखेरीस हैबतरावांच्या डोक्यात घुसविण्यात तो व पमाण्णा यशस्वी झाले होते. ते सुपारीचे खोंड चघळत आपल्या खोलीत बसले होते. तेवढ्यात पमाण्णा प्रवेश करते झाले.
"मालक एक महत्त्वाची बातमी आहे."
"बोला पमाण्णा." पमाण्णांनी कोणी आसपास नाही याची खात्री करुन घेत दरवाजा लावून घेतला.
"मालक कापालिक पुन्हा डोके वर काढतायेत."
हैबतरावांना आपल्या वडलांनी जे काही थोडेफार घराण्याच्या इतिहासाबद्दल ज्ञान दिले होते ते आठवले. मायाकापालिक! जहागीरदार घराण्याचे काही पुरुष स्वतःला मायाकापालिक संबोधत पण त्यांचा या अघोरांशी काही संबंध नव्हता. मायकपाळ मूळचे त्यांचे असल्याचा या अघोरांचा दावा होता.
"काय म्हणत आहेत कापालिक?"
"त्यांचा माझ्या माहितीप्रमाणे आता एकच वंशज शिल्लक आहे. तो वरकरणी दरोडेखोर बनून फिरतो. दुर्जनसिंह या नावाने तो कुप्रसिद्ध आहे."
"तो डाकू तांत्रिक आहे?"
"होय मालक. त्याचा कोणी माणूस आपल्या गावात येऊन गेला."
"मग त्याला तुम्ही जित्ता कसा सोडलात?"
"मालक ते मला काही प्रमाणात निष्प्रभ करु शकतात हे तुमचे वडील सांगायचे विसरले वाटते. असो, तरी मी अधिक सावधतेने गावाची सुरक्षा व्यवस्था बघणार आहे. पण खजिना शोधाच्या मोहिमेला आता अधिक तीव्र करण्याची गरज आहे."
"खरे आहे पमाण्णा पण जे कित्येक वर्षे जमले नाही ते या पोराला असे अचानक जमणार कसे?"
"होय. आणि मालक. आपल्या गावात निश्चित त्यांचा कोणी अजून हेर आहे. मी त्याला शोधून काढतो तोवर तुम्ही अग्रजला लवकर काम करायला लावा."
"ठीक आहे. बघुया कसे जमते ते."
तेवढ्यात जोरदार आवाज झाला. रात्र केव्हाच झाली होती. सर्व झोपायच्या तयारीत होते. कोणीतरी वेड्यासारखे वाड्यात नाचत होते. तो अग्रज होता. पमाण्णा पुढे होऊन त्याला थांबवू लागले. प्रतापही आला.
"अरे काय झाले?"
"खजिना............" तो काही बोलणार इतक्यात पमाण्णांनी त्याचे तोंड दाबले. अग्रजला गांभीर्य समजले तिथे अनेक संबंधित नसलेली माणसेही जमा झाली होती.
त्याला खलबतखान्यात नेल्यावर अग्रजला पुन्हा कंठ फुटला.
"मी सोडवलं ते कोडं प्रताप. आजोबा पमाण्णांना पाठवून एक सेक्स्टंट आणायला लावा."
"काय?"
"अहो मी सांगतो ते उपकरण. माझ्या हॉस्टेलच्या खोलीत राहून गेलंय. आपल्याला पहिले यश मिळालंय."
"अरे पण आहे काय ते कोड्याचे उत्तर."
"अहो ते लिन्तांग आणि बुजूर म्हणजे अक्षांश-रेखांश. त्या कोड्याचे उत्तर आपल्याला खजिन्याच्या पहिल्या अंशाचे अक्षांश-रेखांश देतात."
क्रमशः
टीपा: सेक्स्टंट दोन खगोलीय वस्तूंमधील कोन मोजण्याचे काम करते. हे १७३० पासून युरोपात प्रचलित होते. त्याचा वापर करुन आपण अक्षांश रेखांश मोजू शकतो.
पुढील कथासूत्र येथे - http://www.maayboli.com/node/52585
मी पहिली खतरनाक कथानक आहे...
मी पहिली
खतरनाक कथानक आहे...
मस्तच !!
मस्तच !!
मस्तच
मस्तच
छान चाललीय! मस्त!
छान चाललीय! मस्त!
भारीच!!!!
भारीच!!!!
मस्तच
मस्तच
अरे वा!! एकदम अक्षांश
अरे वा!! एकदम अक्षांश रेखांशावर आली गाडी. मस्त चालू आहे!