ज्याच्या साठी केला अटटाहास...

Submitted by सुभाषिणी on 28 January, 2015 - 04:56

ज्याच्या साठी केला अटटाहास...
माझी बाग ही गच्चीवर फुलवलेली आहे. त्यामुळे काही मोठी झाडे लावता येत नाहित.विशेषतः फळझाडे. तरी पण आपल्याकडे आंब्याचे झाड असावे असे मनापासुन वाटे. त्या मुळे एक कलम लावले. यथाशक्ती त्याची निगराणी करत राहीले. आणि काय...या वर्षी पहिल्यांदा मोहोर आला..PicsArt_1422436891854.jpgPicsArt_1422436947441.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा,मस्तच.
ते झाड सोसायटीच्या आवारात एखाद्या ठिकाणी लावता येतंय का ते पहा. तिथे छान वाढ होईल त्याची.

खुप छान.. मोठ्या कुंड्या असतील आणि पाण्याचा निचरा होत असेल, तर मोठी झाडेही लावता येतील ( सिताफळे, लिंबू, डाळिंब, पपई वगैरे ) गच्चीतील बाग या विषयावरची पुस्तकेही उपलब्ध आहेत.

ग्रेट...... Happy

रच्याकने, तुम्ही सहकारनगरच्या आसपास राहता का ?

ताई तुमच्या भावना समजु शकते... आंब्याचा मोहर बघुन अगदी गहवरुन आले...
तुमचे श्रम आणि प्रबल इच्छा शक्तीचे हे फळ आहे...

अरे वा! अभिनंदन!

>> मोठ्या कुंड्या असतील आणि पाण्याचा निचरा
+१
पावसाळ्याच्या तोंडावर (पाऊस सुरू झाल्यावर) झाडाला मोठ्या कुंडीत हलवता येईल. कुंडीसाठी एक छोटा स्टँड घ्या किंवा चक्क तीन विटा लावून टेरेस आणि कुंडी यात अंतर राहील असे बघा. पुढच्या वर्षी निदान लोणच्यापुरत्या तरी येतीलच कैर्‍या. Happy

मस्तच!
नक्की कैर्‍या येतील. कुंडीतल्या बोन्सायला नाही का येत?

मी पपई लावली आहे कुंडीत ३ वर्षे झाली पण फळ नाही अद्याप.

डीविनिता, पपईला फुले येतात का? झुबक्याने फुले आली तर ते नर झाड. एकेकटे फूल आले तर मादी झाड. फळे फक्त मादी झाडालाच येतात, तेही नर झाड आसपास असून कीटकांनी वगैरे परागीभवन घडवून आणले तर. एकाच झाडावर नर/मादी फुले असे असणारी झाडेही असतात बहुधा, त्यांना येत असणार फळे. जालावर शोधून पहा.

आपण लावलेल्या झाडाला फुल्/फळ आलेले पाहायचा आनंद काही वेगळाच असतो. मी तरी त्याची तुलना अपत्यजन्माच्या आनंदाशी करेन. Happy

तुम्ही बाग चांगली फुलवलीत त्यामुळे तुम्हाला काही सल्ला द्यायचे धाडस मी करणार नाही तरी नुकतेच मिळालेले ज्ञान इथे वाटण्याचा मोह होतोय.

मराठी विज्ञान परिषदेच्या गच्चीवरही एका कुंडीत त्यांनी आंब्याचे झाड लावलेय. गेली दोन - तिन वर्षे झाड फळे देतेय. यावर्षीचा मोहोर मी पाहुन आलेय. या आंब्याच्या जन्माची त्यांनी कहाणी सांगितली ती खालीलप्रमाणे -

मविपच्या गच्चीत शहरी शेतीचे प्रयोग होतात. पण आंबा मात्र कधीच लावला नव्हता. एका कर्मचा-याच्या आग्रहाने आंबा लावण्यात आला. खरेतर आंब्याचे उत्पादन लवकर यावे यासाठी कलम लावणे योग्य पण त्या कर्मचा-याने आधीच कोय रुजवुन रोप वाढवलेले म्हणुन ते रोपच लावले. बरोबर ४ वर्षांनी त्याला पहिला मोहोर आला. अकाली पावसाने तो गेला पण पुढच्या वर्षाच्या मोहराने त्यांना ४० कै-या दाखवल्या. त्यापैकी १२ आंबे व्यवस्थित वाढले. ३ चोरीला गेले, दोन पक्ष्यांनी खाल्ले आणि ७ आंबे मविपला मिळाले. जरी या आंबा जातिवंत नव्हता तरी त्याची चव अप्रतिम होती. प्रति आंब्याचे वजन १५० ते २०० ग्रम होते. कुंडीतल्या झाडांपासुन इतके उत्पादन म्हणजे खुपच झाले.

कुंडीत अशी लागवड करण्यासाठी खास असे काहीच करावे लागत नाही. आंब्यासारख्या मोठ्या झाडासाठी साधारण आपल्या गुढग्यापर्यंत येईल इतक्या उंचीची प्लॅस्टिकची कुंडी/बादली घ्यायची. कुंडीचा वरचा व्यास दिड फुटापर्यंत ठिक.

या कुंडीच्या खालच्या तळाला चाळणीसारखी भोके पाडावी. अतिरिक्त पाणी वाहुन न गेल्यास कुंडीतली माती दगडासारखी घट्ट होते. ती तशी होऊ नये म्हणुन ही भोके. (आपल्या कुंडीतल्या मातीला बोट लावुन पाहा. अगदी घट्ट होते माती). मातीची कुंडी घेतली तर तिला भोके पाडता येत नाहीत म्हणुन प्लॅस्टिकची कुंडी. भोके पाडुन झाली की कुंडीचा वरचा १ इंच भाग सोडुन उरलेल्या भागाचे मनाशीच तिन आडवे भाग करावेत. तळाच्या १/३ भागात उसाचे चिपाड घट्ट दाबुन बसवावे. मधल्या भागात झाडांची वाळलेली पाने दाबुन बसवावी आणि बरच्या उरलेल्या १/३ भागात माती घालुन त्यात झाड लावावे. घरात निर्माण होणारा भाजीपाल्याचा कचरा बारिक करुन रोज झाडाच्या मुळाशी पसरत राहावे. कचरा बारिक करावा कारण असा बारिक केलेला कचरा लवकर विघटन पावतो. रोज १० मिनिटे यासाठी द्यावीत. दर आठवड्याला एकदा अर्धा तास द्यावा. यात झाडाचे निरिक्षण करुन तब्येत बघणे, किड वगैरे पडली तर बंदोबस्त, सुकलेली पाने परत झाडाच्या बुंढ्याशी घालणे इत्यादी करण्यत घालवावी. इतक्या देखभालीवर झाड निट वाढुन तुम्हाला योग्य वेळी १०-१५ फळे खायला घालु शकते. कुंडीत झाड लावले तर डझनावरी फळे येणार नाहीत, आणि जरी तेवढी फुले धरली तरी त्यापैकी सुदृड फुले ठेऊन बाकी फुले तोडणे उत्तम. कारण जास्त फळे धरली तर त्यांचा आकार लहान होणार.

वरचे टेक्निक वापरुन रोजची पालेभाजी, फळभाजीही मिळवता येते. एक रोपटे लावले आणि रोज देखभाल केली तर ते रोपटे पुर्ण कालावधीत १- १.५ किलो इतकी भाजी देऊ शकते. तुमची एक्-दोन वेळेची गरज भागते. नीट संयोजन करुन, लावण्याची वेळ मागेपुढे करुन जास्त रोपटी लावली तर आठवड्यातुन दोन्-तिन वेळा घरची भाजी खायला मिळू शकते. भाजीसाठी २५ सेमी उंची असलेली कुंडी हवी. तसेही कुंडीच पाहिजे असे नाही. आपल्या भाजीच्या दणकट पिशव्याही चालु शकतात. फक्त तळाला भोके पाडायची किंवा तळच कापुन टाकायची. कार्डबोर्डचे मजबुत बॉक्स, फुटलेल्या कूंड्या, बादल्या, प्लॅस्टिकच्या बाटल्या काहीही वापरु शकता. जे वापराल त्याची उंची २५ सेमी आहे एवढे बघा. मग परत त्याचे तीन भाग करुन ते वर लिहिले तसे भरायचे. आणि बी पेरायचे. बी नर्सरीत मिळते. आदल्या दिवशी भिजत घालुन मोड आणले आणि ते पेरले तर अधिक उत्तम.

मुळात शहरी शेती करायची यासाठी की वाया जाणा-या वस्तु वापरता येतील. त्यामुळे मुद्दाम काहीही विकत न आणता घरातल्या नेहमीच्या भाजीपाल्याचा कचरा आणि भाजीच्या पिशव्या वापरुन भाजी पिकवता येईल. बाजारात असा कचरा फेकुन दिला जातो. आपल्या घरचा भाजीचा कचरा कमी पडत असेल तर भाजी विकत घेताना भाजीवाल्याकडुन थोडा कचराही वेगळा मागुन घ्यायचा. भाजीवाले देतात काहीच खिच खिच न करता. Happy माझातरी हा अनुभव आहे.

आपण पिकवलेली भाजी एक वेळेला जरी झाली तरी तीची चव अफाट लागते.

माझ्याकडे एकुलते एक लाल माठाचे रोपटे वाढलेले, त्याची पाने खुडून त्याची भाजी केली. रोपटे परत तसेच वाढायला सोडुन दिले. एका रोपट्याच्या पानांची एक वाटीभर भाजी झाली. मी आणि आईने अगदी आवडीने आणि कौतुकाने खाल्ली. Happy आता वालाच्या शेंगा आहेत, त्यांचे मुठभर वाल गोळा झालेत. उद्या त्यात बटाटा घालुन भाजी करणार. दोन घास जरी खायला मिळाले तरी स्वर्ग.... Happy घरची तीन अननसे आणि चारपाच खरबुजे खाऊन झालीत. सध्या एक खरबुज पिकतेय. Happy

ज्यांना वेळ आणि इच्छा आहे त्यांनी जरुर करुन पाहा.

मस्त माहिती साधना.
घरच्या भाजीची चव मस्तच असते.
मी ऑफिसमधे टेबलावर एक टॉमेटोची आणि एक मिरचीची अश्या दोन कुंड्या ठेवत असे. यावर्षी (नव्या ऑफिसात) पुन्हा सुरुवात करेन. ऑफिसच्या एसी वातावरणात अतिशय आनंदात वाढतात ही झाडे.

साधना छान माहिती! मी सध्या घरचेच टमाटे व वांगे खातेय दोघांपुरेशी होते. पुढच्या आठवड्यात कदचित लुटावे लागतील ...