स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिनावर निबंध

Submitted by अनुराधा म्हापणकर on 27 January, 2015 - 04:58

स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन अनुक्रमे १५ ऒगस्ट व २६ जानेवारीला येतात. या दिवशी आम्ही व्होट्सअप फेसबुक ट्विटरवर अनेक पेट्रिऒटिक सॊन्ग्ज आणि फोटो "शेअर" "अपलोड" आणि फोरवर्ड करतो. तिरंग्याच्या फोटोला "लाइक" करतो. देशभक्तीच्या पोस्टसवर "कमेन्टस" करतो. यादिवशी टीव्हीवर स्वदेस, तिरंगा, क्रांतीवीर, चकदे, बॊर्डर असे अनेक देशभक्तीचे सिनेमेही लागतात. त्यातले सन्नी देओल आणि शाहरुख खान आम्हांला विशेष आवडतात. नाना पाटेकरच्या डायलॊगला आम्ही हटकून टाळ्या वाजवतो. खूप सोसायट्या आणि मंडळामधे या दिवशी सत्यनारायणाची पूजा घालून त्या रात्री तिथल्या होतकरु मुलामुलींकडून "शीला , फेव्हिकॊल, मुन्नी" वगैरे गाण्यांवर वेस्टर्न डान्स करून घेतले जातात.

आम्हांला हे दोन्ही दिवस फार आवडतात. कारण यादिवशी हक्काची सुट्टी मिळते. यावर्षी २६ जानेवारी सोमवारी आल्यामुळे शनिवार- रविवार- सोमवार अशी लागून ३ दिवस सुट्टी आली आहे. तेव्हा आऊटस्टेशन विकेन्ड प्लॆन ठरवायला हरकत नाही. धम्माल मज्जाच मज्जा !!
.
.
.
.
.
अरे हो ! १५ ऒगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र मिळाले होते म्हणून तो "स्वातंत्र्य दिन" आणि २६ जानेवारी १९५० ला आपली घटना अस्तित्वात आली म्हणून तो "प्रजासत्ताक दिन" असा साजरा केला जातो. ह्या दोन्ही दिवशी दिल्लीला लाल किल्ल्यावर झेंडावंदनही करतात. जयहिंद !!

- एक देशभक्त (??)
अनुराधा म्हापणकर

(आपल्या देशाच्या दुर्भाग्याने हे असे आहे ना आपले राष्ट्रप्रेम !)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या देशाच्या दुर्भाग्याने हे असे आहे ना आपले राष्ट्रप्रेम !>>> एवढी वाईट परिस्थिती नाहीये हो. अनेक जण झेंडा वंदनासाठी मुलांच्या शाळेत जातात. स्वतःच्या (माजी) शाळेत किंवा कॉलेजमधे जातात. सोसायटीमधे हॉसेने झेंडा वंदन करतात. आणि प्रजासत्ताक दिनाला राजपथवरची परेड बघणे हा तर अनेकांचा आवडीचा कार्यक्रम असतो.