प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत होणारे संचलन आणि त्यानंतरचे बिटींग रिट्रीट न चुकता (दूरचित्रवाणी/नभोवाणीवर पाहिले/ऐकले, तर ते केवळ दूरदर्शन/आकाशवाणीवरच किंवा प्रत्यक्ष) पाहण्याची यंदा माझी २१वी वेळ आहे. जागतिकीकरणाच्या वाऱ्याने आपल्या देशात प्रवेश केला तसा एक विचार आपल्याकडे जोमाने फोफावण्यात आला. तो म्हणजे कोणत्याही व्यवस्थेला सरकारी असे लेबल लावून कमी लेखत राहायचे आणि खासगीकरणाचा जप करायचा. त्या पार्श्वभूमीवर मी हे सोहळे केवळ दूरदर्शनवरच पाहण्यामागच्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे या राष्ट्रीय सणाच्या प्रसारणाच्यावेळी दूरदर्शन/आकाशवाणीवर आढळणारे भाषेचे मार्दव्य आणि गांभीर्य. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात या गोष्टीला अतिशय कमी महत्त्व आहे. म्हणजेच वागण्या-बोलण्या-राहण्यात जितका उथळपणा असेल, तितके तुम्ही आधुनिक, अशी आधुनिकतेची एक व्याख्या सर्वत्र रूढ झालेली दिसते.
या १९९५पासून मी हे दोन्ही समारंभ पाहण्यास सुरुवात केली. त्याला यंदा वीस वर्षे पूर्ण होत आहेत. या वीस वर्षांमध्ये दरवर्षी केवळ या एकाच सोहळ्याची आवर्जून वाट पाहण्याची सवय लागली आहे. कारण या दोन्ही समारंभांचे माझ्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान राहिले आहे. हा समारंभ ३० जानेवारी ते पुढच्या २५ जानेवारी या काळात जगातील सर्वांत मोठ्या प्रजासत्ताकाचा हा सोहळा एक प्रकारची प्रेरणा देत राहतो आणि कधीही नैराश्याला जवळ येऊ देत नाही.
अशा या भव्य सोहळ्यासाठी यंदा अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. मात्र त्यांनी भारताच्या राष्ट्रपतींचे निमंत्रण स्वीकारले आणि तेव्हापासूनच भारतीय सुरक्षा यंत्रणांवर ताण वाढू लागला आहे. त्यांनी निमंत्रण स्वीकारल्याची बातमी समजताच मनात विचार येऊन गेला की, आता आमचा राष्ट्रीय सोहळा आम्ही कसा साजरा करायचा हेही अमेरिकन सुरक्षा यंत्रणा ठरविणार. आणि आता तसे घडूही लागले आहे. महिनाभर आधीपासून प्रचंड सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. संचलनात काय दाखवायचे काय नाही हेही ते सांगत आहेत. त्यातच सुरक्षेच्या कारणास्तव यंदा सामान्य लोकांना कमीच तिकिटे उपलब्ध ठेवलेली आहेत इ. बातम्या सतत येऊ लागल्या आहेत.
एकीकडे हे सारे घडत असताना माझ्या दृष्टीने मात्र एक आनंददायक घटनाही घडली आहे. गेल्या वीस वर्षांच्या निरीक्षणांवरून एक बाब माझ्या लक्षात आली की, प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात आजपर्यंत नौदलाचा सहभाग अत्यल्प राहिला आहे. त्यामुळे भारतीय नौदलाचा संचलनातील सहभाग वाढवा या इच्छेतून किमान नौदलाच्या विमानांच्या फ्लाय-पास्टमध्ये समावेश करावा, अशी सूचना मी दोन महिन्यांपूर्वी संबंधितांना केली होती. ती मान्य झाली असून यंदापासून नौदलाची विमाने सहभागी होत आहेत.
गेल्या वीस वर्षांमधील निरीक्षणांवरून या सोहळ्याच्या तयारी विषयीची, एकंदर सोहळ्याविषयीची, त्यात झालेल्या बदलांची माहितीही जमवत गेलो आहे. त्याचे एक छोटेसे पुस्तकच तयार होईल एवढी माहिती आज नक्की जमली आहे.
६६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने सर्वांना खूप शुभेच्छा आणि अखेरीस एकच आवाहन – आपल्या प्रजासत्ताकाचा आदर करूया.
प्रजासत्ताक दिन
Submitted by पराग१२२६३ on 25 January, 2015 - 11:27
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रजासत्तकदिनाच्या
प्रजासत्तकदिनाच्या शुभेच्छा...
शक्यतो दरवर्षी हा सोहळा पाहिला जातोच. २६ जानेवारी २००१ मात्र कधीच विसरू शकत नाही.
२६ जानेवारीला जसे संचलन असते तसेच संचलन २७ जानेवारीला देखील असती. त्याला PM rally म्हणतात. राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स हे संचलन करतात.
पराग१२००१, वेगळ्या वाटेचा लेख
पराग१२००१,
वेगळ्या वाटेचा लेख आहे हा! माझ्या माहितीप्रमाणे बाकी कुठल्याही देशाचं असं संचलन होत नाही. हा अतिशय दिमाखदार सोहळा आहे.तुमच्या सूचनेबद्दल कौतुक आणि ती मान्य झाल्याबद्दल शासनाचं अभिनंदन!
आ.न.,
-गा.पै.
आवडला लेख. जरूर पुस्तकरूपात
आवडला लेख. जरूर पुस्तकरूपात प्रसिद्ध करा. फोटो वगैरे मिळवायचा प्रयत्न करा. पंप्र कार्यालयाकडून मिळतील कदाचित.
आता आमचा राष्ट्रीय सोहळा आम्ही कसा साजरा करायचा हेही अमेरिकन सुरक्षा यंत्रणा ठरविणार. >>> एवढे वाईट वाटून घ्यायचे कारण नाही. अमेरिका फक्त ओबामाशी संबंधित गोष्टींबद्दलच सूचना देइल. आणि हे सगळे बरेच आधी ठरले व दोन्ही बाजूने मान्य झालेलेच असेल.
दूरदर्शनच्या भारदस्त प्रक्षेपणाबद्दल सहमत. अनेक वर्षांत बघितलेले नाही पण पूर्वी तरी होते.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।
भारतीय प्रजासत्ताक चिरायु भव।।