पूर्वसूत्र इथे वाचू शकता - http://www.maayboli.com/node/52378
***खजिना***
सन १८१८
ते सर्व मिळून साधारण १० घोडेस्वार असावेत. रात्रीच्या अंधारात त्यांची संख्या नीट कळून येत नव्हती. मायकपाळ दृष्टीपथात आले होते. तो काळ पुणे प्रांतासाठी फारसा लाभदायी नव्हता. पेशवाई विलास त्याच्यावर कळसावर होता आणि अचानक टोपकरांनी चक्क तिची राजधानी ताब्यात घेतली होती. तसे तर एलफिन्स्टनच्या हुकुमावरुन जेव्हा स्मिथने एका मागोमाग एक किल्ले ताब्यात घ्यायला सुरुवात केली होती तेव्हाच पेशव्याचा पराभव स्पष्ट झाला होता. पेशव्याचे अनेक सरदार, मातब्बर उघड उघड इंग्रजांच्या बाजूला गेले होते. मायाकपाळचे जहागीरदार घराणे त्यातीलच एक. तसे जहागीरदारांची मनसब फारशी मोठी नव्हती पण आजूबाजूचे किल्ले बाहेरून वेढा फोडण्यासाठी त्यांच्यावर विसंबून राहू शकत होते. पुण्याचा पाडाव झाला असला तरी जहागीरदारांना तसे काही भय नव्हते. स्वतः स्मिथ मुधोजीरावांना, तेव्हाचे मायकपाळचे सर्वेसर्वा, भेटून गेला होता. त्या छोटेखानी घोडदळात ६-७ टोपकर सोजिर होते. त्यांनी गढीचे दरवाजे ठोठावले असते तर त्यांना प्रवेश मिळाला नसता असे नक्की झाले नसते. पण त्यांचा इरादा काही वेगळाच होता.
"हाऊ मच मोर वुई हॅव टू गो? हे अॅलन यू अंडरस्टँड हिज लँग्वेज राईट? आस्क हिम."
" हे जानोजी. और कितना? विलेज तार आले. आता व्हेअर? डू वुई नीड टू रेड द व्हिला?"
श्श्श्श.... हातात धरलेली मशाल वळवत जानोजी नावाचा तो इसम शक्य तेवढ्या दबक्या आवाजात बोलू लागला.
"अॅलनभाऊ मायाकपाळ मध्ये हवेलाही कान आहेत. असा विचार मनात आला तर मनातल्या मनात दाबून टाका. मुधोजीरावांकडे सेना फार नसेलही पण एक लक्षात ठेवा कि जवाधरनं या घराण्यानं कारभार हाती घेतला तवाधरनं निजाम, हैदर व हैदरचा पोर टिपू यांच्या सेनांनी इथे पराभवच पाहिला. काय काय दंतकथा पसरल्यात तयांबद्दल माह्या तर जीव घाबरतोसा. म्हने त्यास्नी कर्नपिशाच्च सुदीक वश हायती. त्यामुळे असले विचार मनातल्या मनात दाबून टाका. तसंबी माह्या माहितीनुसार आपल्याला जे हवं त्ये वाड्यात न्हाई. ये बगा तिकडे हाये सीतामातेचे टेकाड. आपल्याला तेथे जायाचं."
हे घोडदळ काही असंतुष्ट घटकांनी भरलेले होते. अॅलन हा तसा निधड्या छातीचा, बुद्धिमान शिपाई होता पण लालसेने ग्रासले की कोणाला काही दुसरे दिसत नाही. तर त्याचा मराठा साथीदार व वाटाड्या जानोजी हा पेशव्यांकडून दुर्लक्षिला गेलेला एक छोटासा शिलेदार. इंग्रजांकडे त्याला नोकरी तर मिळाली पण दोघांचाही हव्यास खूप होता. आणि जेव्हा अॅलनला कळले कि पुण्याहून काही कोस अंतरावर एक गढी आहे आणि तिथे कल्पनातीत खजिना आहे तेव्हा अॅलनने ठरवले कि ही लूट आपल्याला मिळालीच पाहिजे. "पण मुधोजीरावांना तर टोपकरांचे संरक्षण आहे." अॅलन यावर फक्त छद्मी हसला. अजून काहीजण गोळा करुन त्यांनी हे धाडस केले होते.
टेकाडावर समोरुन एक ब्राह्मण येत होता. जानोजी त्याला ओळखून होता. "ओ पमाण्णा." पुजारी थबकला.
"पमाण्णा तुम्हाला काकड्याची तयारी करायची असते हे मला हाये ठावं. आता बिगी बिगी मला ते भुयार दाखवा बरे जे त्या गुप्त तिलिस्मा महालात घेऊन जाते." पमाण्णा क्षणभर गोंधळले पण रोखलेली बंदूक पाहून त्यांचाही नाईलाज जाहला. रात्रीच्या अंधारात मशालीच्या प्रकाशात ते सर्व पमाण्णांच्या मागे मागे चालत होते. पमाण्णा सराईतपणे खाचखळग्यातून वाट काढीत होते. सोसाट्याचा वारा सुटला होता. मंदिरातल्या घंटा एकमेकींवर आपटून ते वातावरण अजूनच भयाण करीत होत्या. "हेच विवर तुम्हाला महालापर्यंत घेऊन जाईल."
"थँक यू वेरी मच. बहुत शुक्रिया" असे म्हणत अॅलनने पमाण्णांच्या छातीत त्याच्या मस्केचे टोक खूपसले. ब्लडी शास्त्री असा रिमार्क देत ते सर्व विवरात चालू लागले. विवरात चालायला लागताच त्यांना हसण्याचा जोरदार आवाज आला. "कोन हाये जी?" अंधूक प्रकाशात शोधूनही कुणी गावलं नाही. शेवटी त्यांनी नाद सोडला आणि त्या चिंचोळ्या बोळातून चालायला सुरुवात केली. हळूहळू तो बोळ रुंदावला व ते भुयार एका भुलभुलैय्यात रुपांतरित झाले. अॅलन हुशार होता. "ऑल ऑफ यू. गो इन्टू इच ऑफ दीज रूट्स. मी अॅन्ड जानोजी विल वेट हिअर. अॅन्ड रिमेंबर द ओन्ली अदर वे आऊट ओपन्स इन द विला. सो डू रिटर्न हिअर." हसण्याचा आवाज आता क्षीण झाला होता. तो मधूनच तीव्र व्ह्यायचा मधूनच जोरात. हे चक्र खूप वेळा चालू होते.
व्हाट टू डू? अॅलन अस्वस्थ होत होता. उजाडायच्या आत हे सर्व उरकणे गरजेचे होते. अचानक एका भुयारातून प्रकाश येऊ लागला. दोघेही उत्सुकतेने उठले. हसण्याचा क्षीण आवाज येत होता त्याच्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. त्या भुयारातून राजेशाही कपडे परिधान केलेली एक व्यक्ती उगवली. "मुधोजीराजं?" जानोजी हबकून पाहतंच राहिला.
"तुम्हास काय वाटले? तुम्ही आमचा खजिना चोरू शकता? असे चौर्यकर्म आम्हास मुळी पसंत नव्हे. पमाण्णा!"
हसण्याचा आवाज अधिकच क्षीण जाहला. प्रहरभर आधी पाहिलेली ब्राह्मण व्यक्ती मुधोजीराजांच्या मागून येत होती. तिच्या छातीवर अजूनही त्या घावाचे निशाण होते. पण आता तो रक्ताने माखलेला होता. त्याचे सर्व अंग रक्तवर्णी झाले होते. त्याच्या हातात काहीतरी गोल गोल होते. "जोनाथन!" अॅलनला परिस्थितीचे गांभीर्य पुरते कळून चुकले. त्या भुयारांमध्ये ते आलेले सर्व घोडेस्वार मरुन पडले होते. कोणाचे डोके भिंतीला टेकवून ठेवले होते व भिंत व कपाळ दोन्ही रक्ताचा टिळा बाळगत होते. तर कोणी आपला चेहरा व पाठ दोन्ही दाखवत एखाद्या पुतळ्यासारखे उभे होते. कोणाच्या स्वरयंत्रातून त्याचीच संगिन आरपार होऊन त्याला जमिनीवर तिरका पेलून धरत होती तर कोणी नुसताच निपचित पडला होता, हृदयविकाराच्या धक्क्याने.
"जानोजी तुम्हाकडून आम्हाला अशाच हरामखोरीची अपेक्षा. परंतु टोपकर सोजिर त्यांच्या धन्यांच्या मित्राबरोबर असे धाडस करतील असे आम्हा वाटले नव्हते. टोपकराला निश्चितच कडक शासन होईल. पण तुमच्या साहसावर आम्ही खूश आहोत. आमच्याबद्दल थोडीबहुत माहिती असताना देखील तुम्ही मूठभर सोजिरांसमवेत येथपर्यंत थडकलात हेही नसे थोडके. तुम्ही गोर्याचे शासन बघून ठरवा कि तुम्हा काय शासन पाहिजे. पमाण्णा!"
"यूअर एक्सलन्सी..." अॅलनचे पुढचे शब्द त्याच्या गळ्यातच अडकले. पमाण्णाच्या डोळ्यात एका हिंस्त्र श्वापदाचे भाव तरळत होते. त्याच्या तीक्ष्ण दंतपंक्ती क्षणभरच चमकल्या न चमकल्या व त्याने सोजिरावर झेप घेतली. अॅलनच्या किंकाळ्या गुहेत घुमल्या. जानोजी पळभर स्तब्ध राहिला. त्याने प्रतिक्षिप्त क्रियेने काढलेली समशेर मूठ बदलून हवेत उंचावली व ती तशीच आपल्या पोटात खुपसली. मुधोजीरावांच्या चेहर्यावर एक आसुरी स्मितहास्य खेळत होते.
"बहुत खूब पमाण्णा. तुमच्या सारखा रक्षक असताना आमच्या खजिना कोणी बघू देखील शकत नाही."
"राजे, तुमचा खरा खजिनातर कल्पनातीत आहे तर आत लपलेल्या त्या छोट्याश्या खजिन्याची कथाच नको. यासर्वांकडून मिळालेले धन व ही समशेर, जानोजीची मोत्यांची माळही जमा करुन घेतो. घोडे आधीच पागांमध्ये रवाना केलेत जी. आता मला रजा द्यावी. काकड्यापूर्वी मजला ही जखम लपवणे भाग आहे."
~*~*~*~*~
ओsssब्ब्बा! पंगतीला बसलेल्यांपैकी कोणीतरी छानशी ढेकर देऊन उदरदेवता तृप्त झाल्याची पावती दिली. तसा बेत साधासाच होता. झुणका, ज्वारीची भाकरी, झणझणीत ठेचा व जोडीला मधुर असे ताक. पुणेरी पावणे तसे ठेच्याच्या हिरव्याकंच रंगाकडे पाहून बिचकलेच होते पण त्यांना नवीन सवय लावायची म्हणून व प्रताप बल्लुची सवय पुन्यांदा सुरु करायची म्हणून आग्रहाने खायला लावला. जोडीला असलेले ताक त्यांना तारून गेले. जेवण झाल्यावर चौकात खाटा मांडून जहागीरदार आपल्या नातवाच्या मित्रांबरोबर बसले. सोबतीला त्यांचा पानसुपारीचा डबा होताच. सुपारी कातरत त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. "काय रं पोरांनो. मी हा असा म्हातारा तुमच्या गप्पांमध्ये अडथळा तर नाही ना आणत?"
"नाही हो आजोबा. हे तसेही उत्सुक आहेतच गावाविषयी जाणून घ्यायला."
"बरं पहिल्यांदा मला या दोघांविषयी जाणून घ्यायला आवडेल. तू आणि बल्लू तर माझ्याच डोळ्यांसमोर वाढले. बरं का रे शाम, अग्रज हा तुमचा बल्लु आहे ना त्याला लहानपणी आमच्या पमाण्णांनी अनेकदा आमच्या खासगीतल्या आंब्याच्या बागेतून कैर्या पाडताना पकडले होते. तसा हूडच आहे तो पण त्याला अंगरक्षक व्हाययचे त्याच्या बासारखे. बल्लु अजुनही सांगतो जमलं तर शिक्षण पूर्ण कर. नाही तर ते पद तुह्या बानंतर तुझेच. अरे माझीच बडबड खूप झाली. मला जवळचे लोक हैबतराव हाक मारतात तसे बोलावलेत तरी चालेल नाहीतर आजोबाच म्हणा. आता तुम्ही बोला."
शाम नेहमीप्रमाणेच संधी मिळताच ऑन झाला "आजोबा मी शाम भावे. मूळ कोकणातला, इथला न्हवे. केळशी वेळास वगैरे माहिती असेलच. बस्स त्याच क्षेत्राजवळ आमची वाडी आहे. आमच्या कोकणात काजू, सुपारी, आंबा, पोफळी इ. च्या मोठ्या मोठ्या बागा आहेत. मला लिटरेचर मध्ये रस आहे. तुमच्या प्रतापशी ओळख न्यू इंग्लिश मध्ये आधी झाली मग फर्ग्युसनलाही एकत्रच. या शिंच्या प्लेगमुळे पुण्यास राहता येत नाही अथवा सगळे ग्रंथालय पालथे घातले असते सुट्टीचा फायदा घेऊन."
"आरं काहीबी शिक. परं शिक्षण हे महत्त्वाचं. आणि तू रे?"
अग्रज काहीसा बावरला. दोन क्षण त्याने एकडे-तिकडे पाहिले मग हलकीशी चूळबूळ करीत तो बोलू लागला.
"आजोबा मी अग्रज जोशी. जन्मापासून पुण्याचाचा. किंबहुना हीच माझी पुण्याबाहेरील ठिकाणाला भेट द्यायची पहिलीच वेळ. मला प्रश्न सोडवायला काहीतरी शोधून काढायला आवडते. प्रश्न सुटेपर्यंत अवघड असतात पण एकदा सुटले की होणारा आनंद अवर्णनीय असतो. तो आनंद मला गणितात मिळतो आणि मी गणित शिकतो. तसा मी प्रतापचा या दोघांइतका घनिष्ठ मित्र नाही पण प्रतापने एवढ्या प्रेमाने दिलेले आमंत्रण आणि प्लेगच्या वातावरणातून सुटका तसेच जरा निवांतपणा मिळत असल्याने येथे आलो."
"तू जे काय बोलला ते कायबी टक्कुरात शिरंना. ते समजा जाऊ दे. तुझे आईबाप?"
आजोबा, प्रताप मध्ये पडला.
"असू दे प्रताप. तर आई मी १० वर्षांचा असताना वारली. बाबांविषयी तिने कधी सांगितले नाही."
हैबतराव या धक्क्यातून लगेच सावरले नाहीत. सावरल्यावर ते परत बोलू लागले.
"मला येक सांग की तुला प्रश्न सोडवायला, काहीतरी शोधून काढायला आवडते?"
अग्रज काहीसा गांगरला. त्याने हैबतरावांचे डोळे निरखून बघायला सुरुवात केली. ते अंधारात जणू चमकत होते. प्रतापने आपले अंमळ जादाच कौतुक तर नाही केले अशी शंकाही त्याच्या मनाला चाटून गेली.
"होय."
"अस्सं. बरं आपण नंतर बोलू. आज निवांत झोप घ्या आणि उद्यापासून जा गाव भटकायला. आणि जोशीबुवा तुमची भेट नीरस होणार नाहीए याची खात्री बाळगा आणि हसर्या चेहर्याने राहायला शिका."
उरली सुरली सुपारी चघळत जहागीरदार तेथून निघून गेले.
ते चौघे मात्र चंद्रप्रकाशात अजून काही वेळ बोलत बसले. टिळक आता काय करीत असतील. प्लेगने पुण्यात नक्की काय हैदोस घातला असेल वगैरे वगैरे. त्यांना कधी झोप लागली त्यांनाच कळले नाही. चंद्रप्रकाशात ते चार मित्र पुण्यातल्या त्या तणावपूर्ण वातावरणापासून खूप लांब आले होते. त्या जीवघेण्या आजाराला त्यांनी गुंगारा दिला होता. पण मृत्यूला?
~*~*~*~*~*~
पमाण्णा स्वतःच्या खोलीत आले. त्यांनी एका कोनाड्यात हात घालून कसलीशी कळ दाबली व जमीनीत खाली जाण्यासाठी पायर्या दिसू लागल्या. चक्राकार आकारात वळत जाणार्या १३ पायर्या उतरून ते एका तळघारात पोचले. हैबतराव त्यांची वाटच पाहत होते.
"या पमाण्णा या. तुम्ही आज चांगली कामगिरी बजावलीत. तुम्हाला याचे बक्षीस नक्की मिळेल."
पमाण्णाने अत्यंत अदबीने आपली मान तुकविली. "ही तर सर्व मालकांची मेहेरबानी"
हैबतरावांनी एक कटाक्ष त्याच्याकडे टाकला. रामोश्याचे पिळदार शरीर अजूनही घट्ट होते. पण ते गर्द हिरवे डोळे त्याला साजेशे नव्हते. गळ्यातली साखळी काढल्यामुळे शिवणीच्या खुणा दिसून येत होत्या ज्या व्यक्तिमत्त्वाच्या गूढात भरच घालत होत्या.
पमाण्णाही मालकांना नकळत निरखून पाहत होते. गेली १८ वर्षे या शरीराने मालकांची सेवा केली होती. पण आता मालकांची उमर होत आली होती. भरघोस मिश्या, राखलेले कल्ले जवळपास ६ फूट उंची यामुळे अजूनही जहागीरदार वयाने ५ वर्ष तरुण वाटत. पण केसांचा पांढरा रंग, टक्कल पडायला झालेली सुरुवात ही लक्षणे दिसू लागली होती.
"तर पमाण्णा आम्ही आपणास अजून एक कामगिरी सोपविली होती. कसा वाटतोय?"
"मालक मी खात्री देऊ शकत नाही. पण मुलगा प्रचंड हुशार आहे. आपल्या कामासाठी लागणारी नेमकी बुद्धिमत्ता त्याच्याकडे निश्चित आहे. छोटे मालक एक चांगला मित्र बनवू शकले आहेत. कदाचित तो आपले काम पूर्ण करेलही पण तोवर आपल्याला यांच्यावर लक्ष ठेवायला हवे. मी १० माणसे गुप्तरुपाने यांच्यावर नजर ठेवण्यासाठी व त्यांच्या संरक्षणासाठी, अशा दुहेरी हेतूने तैनात केली आहेत.
"शाब्बास पमाण्णा."
"धन्यवाद मालक. पण त्याला हे सर्व इतक्या लवकर सांगावे काय?"
"हाच तर प्रश्न आहे पमाण्णा. किती दिवस थांबावे? म्हणून मी हळूहळू त्याचा कल जाणून घेत घेत त्याला यात ओढण्याचा विचार करतोय. उद्या किमान त्याच्याशी मायकपाळच्या इतिहासावर बोललेच पाहिजे. काहीनाही तर सुरुवात तर केलीच पायजे. प्रताप मोठा झाल्यावर यात लक्ष घालेलच असे नाही. त्यात त्याने हे गाव सोडले तर खजिन्याचा मात्र एक हिस्साच आपल्या ताब्यात राहिल आणि अलोट संपत्तीला जहागीरदार घराणे मुकेल. संपूर्ण खजिन्याचे रहस्य उलगडायचे असेल तर असा बुद्धिमान मनुष्य आपल्याला हवाच. असो तूर्तास तुम्ही या. शुभरात्री."
पमाण्णा मुजरा करुन पाठ न दाखवता त्या तळघरातून परत वाड्यात परतले. तर जहागीरदार तिथल्याच एका आसनात विचार करीत बसले. किती, कसे व काय क्रमाने सांगावे?
क्रमशः
(ऐतिहासिक टीपा - १८१८ मध्ये मराठेशाहीचा दुर्दैवी अंत झाला व शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकला. एलफिन्स्टन या अधिकार्याने अँग्लो-मराठा युद्धांमध्ये इंग्रजांचे नेतृत्व केले. तर जनरल स्मिथ या त्याच्या खालच्या अधिकार्याने बहुतांशी किल्ले काबीज करण्याचे महत्त्वाचे काम केले. पुणेकरांचा एलफिन्स्टनवर खूप राग असला पाहिजे. म्हणूनच कि काय त्याचे उट्टे त्यांनी त्याचे नामाभिधान आळुपिष्टन करून काढले मस्के एक प्रकारची बंदूक असते जिच्या पुढे संगिन जोडलेली असते. माझ्या माहितीनुसार १८५० पर्यंत ब्रिटीश ब्राऊन बेस मस्के वापरत जी रायफल प्रकारात मोडते. नंतर त्यांनी एनफील्ड रायफल वापरायला सुरुवात केली. हिच्याच साठी नंतर ती गाय-डुक्कराच्या चरबीची काडतुसे आणली, १८५७ च्या मागचे एक कारण. १८९७ पर्यंत फर्ग्युसन प्रमाणेच न्यू इंग्लिश स्कूलही अस्तित्त्वात आले होते.)
पुढील कथा इथे - http://www.maayboli.com/node/52441
ठीक चालली आहे. आणखी काही भाग
ठीक चालली आहे. आणखी काही भाग आल्यानंतरच कळेल कथा कशाबद्दल आहे ते.
मस्त! अचुक ऐतिहासिक
मस्त! अचुक ऐतिहासिक नोंदींमुळे वाचायला मजा येतेय. गुढ पण व्यवस्थित जाणवतय पण अजुनही अंदाज येत नाहिये. कारण उपोद्घ्हातात वर्णन केलेले वासुदेव बळवंतांचे बंड आणि हा काळ कंटेम्पररी आहे. पुढिल भाग लवकर टाका प्लीज वाचायची खुप उत्सुकता आहे.
रमा +१. वेगळ्या धाटणीची कथा
रमा +१. वेगळ्या धाटणीची कथा आहे.
छान लिहिताय. उत्सुकता
छान लिहिताय. उत्सुकता वाढलीये.
धन्स सर्वांना. थोडा कामाचा
धन्स सर्वांना. थोडा कामाचा व्याप जास्ती झाल्याने हा भाग टंकायला जरा अधिक वेळ लागला. पण आज उद्या फार काही काम नसल्याने आज रात्री बसून पुढचा भाग टंकून टाकतो.
आज एक्स्ट्रॉ फीचर
मला ही कथा बायोशॉक नावाचा गेम खेळता खेळता सुचली. हा अल्टरनेट हिस्टरी जॉनर मध्ये मोडतो. तेव्हा माझ्यापुढे दक्षिण भारताच्या इतिहासासंदर्भात काही पुस्तके पडली होती. शेवटी मी रात्री एक हॉरर मूव्ही पाहिला आणि अचानक ही कथा स्फुरली. मग मी साखळी जुळवित गेलो आणि आपोआप कथा व इतिहास समांतर चालु लागले. यानिमित्ताने मी लेखनाचा अनेक दिवस बारगळलेला प्लॅन पुढे सरकवू शकलो आणि अनेक वेगवेगळे आधी न वाचलेले इतिहास पुन्हा वाचू लागलो.
पायस, छान चाललीये कथा. या
पायस, छान चाललीये कथा. या भागात बर्यापैकी उकल झालीय. काही अंदाज बांधले आहेत.
मस्त लिहिताय.
पायस हे अफाट चालू आहे. माझा
पायस हे अफाट चालू आहे. माझा आवडता जॉनर असल्यानं अजूनच मजा येतेय. पटापट पुढचे भाग टाका.
मस्त! फक्त .. परांजपे - जोशी
मस्त!
फक्त .. परांजपे - जोशी काही तरी घोळ झला माझ्या वाचण्यात किंवा समजण्यात!
Chhanach chalu aahe katha ...
Chhanach chalu aahe katha ... Khup awadali