वारसा - भाग ० : उपोद्घात

Submitted by पायस on 17 January, 2015 - 06:58

सन १८७९.

बारकू जंगलातून एकटाच वेड्यासारखा धावत होता. नाव बारकू असले तरी तो तरुण रामोशी अंगापेराने चांगलाच मजबूत होता. त्याच्या अंगावरची बंडी रक्तमिश्रित घामाने चांगलीच भिजली होती. पण त्याला त्या जखमांची तमा नव्हती. दौलतराव नाईकांपर्यंत गोर्‍यांच्या डावपेचांची खबर पोहचवणे गरजेचे होते. वासुदेव फडक्यांचे तडफदार सरदार दौलतराव नाईक कोकणाकडे जात होते. त्यांना थांबवणे गरजेचे होते नाहीतर गोर्‍यांच्या फासात ते आयतेच सापडणार होते. त्याच्या मागावरच्या ४ सोजिरांना त्याने कंठस्नान घातले होते. त्याला फक्त एक रात्र विश्रांतीची गरज होती. सूर्य मावळतीकडे झुकला होता व तो कुठल्याश्या गावाच्या सीमेवर आला होता. लांबूनच त्याने ब्रिटीश घोडेस्वार पाहिले आणि त्याने लपून राहणेच पसंत केले.

"हे व्हाट इज धिस रुकस ऑल अबाऊट?" गोरा साहिब आपल्या परीने गावातली लगबग समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. रामोश्यांच्या एका पलटणीला त्यांनी संपवले होते पण बारकू रुपी खबरी मिळणे गरजेचे होते. दुभाष्या आपल्या परीने गावकर्‍यांची हकीगत समजून घ्यायचा प्रयत्न करीत होता. गावातील जहागीरदारांचा वाड्यात सध्या त्याच्या रखवालदाराशिवाय कोणी नव्हते व जुन्या रिवाजानुसार त्या म्हातार्‍या रखवालदाराचा बदली रखवालदार आज-उद्या येणार होता. तो म्हातारा आज सन्मानाने रवाना होत होता तर जहागीरदार सहकुटुंब कुलदैवताच्या दर्शनाला गेले होते.
"स्ट्रेंज कस्टम्स यू हॅव गॉट हिअर! बट व्हाट अबाऊट द प्रॉपर्टी? वोन्ट अवर टारगेट हाईड देअर?"
" दादा तुमी वाड्याला भेट द्या हवं तर. पर थितं वाड्याच्या मालकाच्या परवानगी बिगर फार काळ कोनालाबी राहता येत न्हाय. आमच्यावर इस्वास ठ्येवा थितं कुनीसुदिक न्हाई." सायबाला वाड्यात इंटरेस्ट नव्हता तो परत फिरला. पण बारक्याला होता. तो जवळच पडलेलं एक कांबळे पांघरून हे सर्व ऐकत होता. वाड्यात कोणी नसणार म्हणजे आजची रात्र काढण्याची सोय झाली.

सांज होईस्तोवर त्याने कसातरी दम धरला. रातच्या अंधाराचा फायदा घेत तो लपत छपत वाड्याच्या जवळ पोचला. एखाद्या वतनदाराला शोभेलसा वाडा तो नक्कीच होता. महाराजांच्या काळातले वैभवाची साक्ष अजूनही त्याच्या चिरेबंदी भिंती देत होत्या. वाडा कसंचा छोटीशी गढीच ती. पण बारक्यासाठी तो अभेद्य नक्कीच नव्हता. भित फार उच न्हाई, हा विचार करीत ४०-५० कदम मागे जाऊन बारक्याने जोरदार दौड लगावत भिंतीवर आपली पाऊले दामटली. तो वरच्या टोकाशी पोचताच त्याने चपळाईने त्या टोकावर हाताने रेटा देत कोलांटीउडी घेत वाड्यात प्रवेश केला. वाड्यात मानवी वावर असल्याच्या खुणा होत्या. अंगण शेणाने सारवलेले होते. अंधाराला डोळे सरावलेले असल्याने त्याला फारशी अडचण झाली नाही. धडपडत त्याने स्वयंपाक घर शोधायाला सुरुवात केली.

"द्येवा फार न्हाई. फकस्त थोडीशी फळे व जखमेवर लावायला वाईचं जुनं तूप गावू दे." रामोशी मनाशी विचार करीत होता. "मालक, मालक" ह्यो कुनाचा आवाज? आजूबाजूला डोळे फाडून पाह्यले तरी कोणी दिसत नव्हते. "तू मालक दिसत नाहीस" पुन्हा तोच आवाज घुमला. बारक्याला या वेळेला काही लफडं नको होते. तो मोठ्याने ओरडला "ह्ये बघा तुमाला कोन मालक पायजे मला नाही ठावं पर मला फकस्त आजची रात्र हितं पडू द्या. म्या उद्या कोंबडं आरवायच्या आत हितून जातो."
"म्हणजे तुझ्याकडे ओळख नाही. आनो आंग गगाविन? आय हुमिलिंग इतो ओ अयोस? ही विनंती आहे की आज्ञा?" बारक्याच्या टक्कुरात काहीच प्रकाश पडेना. "विनंती कि आज्ञा?" पुन्हा तोच आवाज गरजला. विनंती, बारक्या उत्तरला. "ठीक आहे. तुझ्या उजव्या हाताच्या फडताळात तुला सर्व काही मिळेल." बारक्या आनंदला. त्याने फडताळ उघडले. तिथे त्याला एक जुनी मद्याची बाटली व जुने तूप सापडले. काही जर्दाळू पण होते. जर्दाळू खाऊन त्याला काहीशी हुशारी आली. जखमांवर जुने तूप चोपडून मद्य पीत तो तिथेच लवंडला. मनात तो विचार करीत होता. नाईकांची पुण्याई थोर! म्हणून तर परवा गोर्‍यांची खबर आपल्याला गावली. तरी त्या सोजिराने पाठीवर एक खोल वार केलाच. पण नाईकांच्या या रामोश्याला पिराजीबाबाचे पाठबळ. त्यामुळे तर आपण येथपर्यंत पोचलो. अजून १-२ दिसात नाईकांना गाठलेच पाहिजे. या गोर्‍यांमुळे आज आपल्याला इथे राहावे लागतेय. जर कोणी इतर निरोप्या पाठवता आला असता तर आपण तो रखवालदार येईपर्यंत इथेच राहू शकलो असतो. नाईकांनाही निरोप जरा लवकर मिळाला असता. हा विचार चालू असताना त्याला डासांनी हैराण केले होते. जखमांवर माशा घोंगावत होत्या. अर्धवट झोप अर्धवट नशा आणि रामोश्याचे गरम रक्त! त्याचा पारा चढत चालला होता. " तिच्या आयची कटकट. या डासांना हाकला अन् कोणीतरी नाईकांना निरोप द्या रं"
"विनंती की आज्ञा?" पुन्हा तोच प्रश्न. एव्हाना रामोश्याला नशा चांगलीच चढली होती. तो खेकसला "आरं जा! आज्ञा हाये ही". "मग पटव ओळख!" बारक्याला काही कळायच्या आत त्याचा उजवा हात खसकंन अंधारात ओढला गेला. त्याला वेदनेची जाणीव झाली. जंगलात त्याने जळवांचा अनुभव घेतला होता. तोच अनुभव त्याच्या मनगटाला येत होता. "हिंदी तुमुग्मा सा दुगो. तू मालक नाहीस. मालक तुम्ही नाहीत म्हणजे मी ठरवू शकतो काय करायचे ते." वातावरणात फिदीफिदी हसण्याचा आवाज घुमला.
बारक्याची नशा खाडकन उतरली. तो उठून उभा राहिला. "हे बघा माजी चुकी झाली. तुमी कोन हायती? मिनी एक डाव..." वाक्य पूर्ण करण्याआधी तो थबकला. त्याला हवेत सळसळ जाणवली. अचानक तलवारीचे पाते क्षणभर त्याच्या डोळ्यासमोर चमकले व सूर्याची पहिले किरण खोलीत शिरले. रामोश्याचे डोके व धड थरथरत जमीनीवर पडले होते.
"चू चू चू. आंग गुलो. मालकांना स्वच्छता प्रिय. ते यायच्या आत हे साफ करायला हवे."

दोन दिवसांनंतर
जहागीरदार गावात परत येत होते. नवीन रखवालदार आलेला होता. "पमाण्णा वाडा नीट आहे ना?" "मालक मी असताना वाड्याला काही होईलचं कसे? मला जुन्या पमाण्णांनी सर्व काही सांगितले आहे. मालकांचा वारसा सुरक्षित आहे! मला जुना पमाण्णाच समजा." जहागीरदारांचे समाधान झाले व ते वाड्यात प्रवेश करते झाले. वाडा तसाच लखलखीत स्वच्छ होता. रामोश्याच्या रक्ताचा एक टिपूसही त्या वाड्याच्या जमिनीवर नव्हता.

क्रमशः

(ऐतिहासिक सत्य : बारक्याची कथा काल्पनिक असली तरी दौलतरावांचा कोकणातील फंदफितुरीने झालेला अंत व १८७९ हा कालखंड खरा आहे.)

पुढील कथा इथे - http://www.maayboli.com/node/52378

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे..थरारक आहे..फडक्यांबद्दल माहीत आहे पण दौलतराव नाईक हे नावही कधी ऐकलं नव्हतं. पुढे वाचायला आवडेल.

हा भाग उपोद्घात पूर्वसूत्र टाईप्स आहे म्हणून थोडा छोटा आहे. गोंधळ टाळण्यासाठी शीर्षकात किंचित बदल केला आहे. इथून पुढचे भाग नक्की मोठे असतील. माझा हा पहिलाच प्रयत्न आहे, त्यामुळे अशा सूचना आवर्जून द्या. म्हणजे मला लिहायला आणि आपल्याला वाचायला अजून मजा येईल Happy