शेजार - माधुरी पुरंदरे

Submitted by सई केसकर on 7 January, 2015 - 04:59

गेले काही दिवस माधुरी पुरंदरेंची दोन अतिशय गोड पुस्तकं अनुवादित करण्याचे काम मिळाले. पुस्तकं "शेजार" या शृंखलेतील दोन भाग आहेत.
सख्खे शेजारी आणि पाचवी गल्ली अशी त्यांची नावे आहेत. माधुरीताईनी काढलेली चित्रं बघण्यातच पुस्तकची पहिली काही पारायणं निघून जातात. आणि नंतर गोष्ट खुलायला लागते. या शृंखलेचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील कुटुंबाची रचना. लहान मुलांना नेहमी घरातील कुटुंब प्रमुख वडील, आई, आजी आजोबा अशी चौकोनी कुटुंब व्यवस्था दाखवली जाते. बाबा दमून घरी येतात, आई स्वयपाक करते, आजी देवाचं करते, आजोबा पेपर वाचतात, अशा आणि अजूनही अनेक अकारण प्रस्थापित केलेल्या कौटुंबिक भूमिका त्यांना फारसा विचार न करताच दाखवल्या जातात. घरात बाबा असतात, आईपेक्षा बाबांना मिळणारे महत्व आणि त्यांचा दरारा मोठा असतो. अशा प्रतिमांमुळे आपल्यावर नकळत संस्कार होत असतात.

सख्खे शेजारी आणि पाचवी गल्ली या दोन्ही पुस्तकाची जी छोटी नायिका आहे ती आई बाबा विभक्त झालेल्या कुटुंबात राहणारी मुलगी आहे. तिच्या आजूबाजूच्या जगातून तिनी तिची स्वत:ची अशी नाती गुंफली आहेत आणि त्या नात्यांनी तिचं जग खूप समृद्ध करून टाकलं आहे. जसा तिचा स्वत:चा परिवार अपारंपरिक आहे; ती तिच्या आई आणि आईच्या मावशी (मावशीआजी) बरोबर राहते; तसेच तिला मिळालेले शेजारी सुद्धा वेगळे आहेत. एकटी राहणारी, नोकरी करणारी आणि सदैव लॅपटॉपला चिकटलेली, मल्याळी बगुली ताई. किंवा वरच्या मजल्यावर राहायला आलेला चित्रकार कान्हा आणि त्याची मूकी आणि बहिरी बायको जिया. कान्हा त्यांच्या मुलाकडे लक्ष देण्यासाठी घरी थांबतो आणि जिया बाहेर कामाला जाते. तिला चाफ्याच्या झाडाला मामा मानायला सांगणारे दाजी काका, त्यांची बायको उमा काकू, हे सगळे तिच्या जीवाभावाचे सखे बनून जातात.

लहान मुलांसाठी लिहिलेल्या गोष्टीचा कस त्यातील अचेतन तत्पर्यातच लागतो. तशाच या गोष्टी आहेत. आणि अशाच गोष्टी जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचाव्यात ही आजच्या काळाची गरज आहे. मोठं होत असताना, काही वेळा आपल्याला अशा भ्रमात वाढवलं जातं की आपलं आयुष्य आपण बांधत आहोत. आणि पारंपारिक कुटुंब व्यवस्था, त्यातील कलह, आणि त्यातील सुरक्षितता हे अजाणतेपणे आपल्या आयुष्याच्या पायाचे दगड होतात. मग कुठेतरी "हे असंच असतं" किंवा "सगळीकडे असंच असायला हवं" हा गैरसमज घेऊन आपण मोठे होतो. पण कधी कधी या व्यवस्था आपल्यासाठी घालून दिलेली कुंपणं आहेत असं वाटायला लागतं. या कुंपणाच्या बाहेरील जग असुरक्षित आहे, त्याला सामाजिक दर्जा कमी आहे, तसं आयुष्य जगण्यासाठी अवघड आहे आणि तसं आयुष्य जगणारी लोकं ही चौकोनी कुटुंबांपेक्षा कमी अशा सामाजिक स्तरावर आहेत हे सगळे गैरसमज या प्रकारच्या पारंपारिक संस्कारांमुळे लहान मुलांच्या मनात शिरतात.

या सगळ्या गैरसमजांचा खून माधुरीताईंनी अतिशय खेळकरपणे केला आहे. आणि त्यासाठी त्यांचे आभार मानावेसे वाटतात. आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या सगळ्यांना कुठल्याही पूर्वग्रहाविना सामावून घेणारी लहान मुलं (जशी ती मूळ असतात) जर मोठी झाल्यावर तशीच राहिली तर आपलं जग नक्कीच आत्ता आहे त्यापेक्षा थोडं जास्त चांगलं होईल!

पुस्तकाची लिंक (मराठी): http://www.jyotsnaprakashan.com/index.php?option=com_zoo&task=item&item_...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुपर्ब कल्पना आहे!! लहान मुलांना आजुबाजुचे जग अजुन विस्ताराने व रिअलिस्टिकली दाखवायची आयडिया आवडली. ज्योत्स्ना प्रकाशनाची सगळीच पुस्तके मस्त आहेत!
सई तू मराठीतून इंग्रजीत अनुवाद करणार आहेस का?

सई केसकर, खूप मस्त परिक्षण लिहिले आहेस. धन्यवाद.

तू अनुवादीका आहेस का? अभिनंदन! तुझे हे गुपित माहिती नव्हते की तू लिहितेस. यादी देशील का म्हणजे तुझी पुस्तके मिळवून वाचेन.

अनुवाद इंग्रजीत आहे. प्रकाशित झाल्यावर इथे दुवा देईन.
@बी, या आधी मी प्रथम बुक्स साठी माधुरीताईंचेच "बाबांच्या मिशा" "Daddy's Mo" अनुवदित केले आहे. प्रथम
साठीच अणखीनही काही केली आहेत. यादी सवडीने करीन. Happy

http://store.prathambooks.org/p_9788184792607

हा बाबाच्या मिशाचा दुवा. Happy

सई,

तुझ्याबद्दल वाचून फार आनंद झाला. तुझी मराठी भाषा खूप छान आहे. आता ईंग्रजीमधले वाचून बघेन. तू ह्याच भाषेत अनुवाद करायचे असे का ठरवले? ईंग्रजीमधे काही खास शिक्षण घेतले आहेस का?

पुढील लिखाणासाठी शुभेच्छा.

मेघना पेठेंच्या हंस अकेलामधे त्यांनी सई केसकर हे पात्र इतके तरल रंगवले आहे की बास...

मेघना पेठेंच्या हंस अकेलामधे त्यांनी सई केसकर हे पात्र इतके तरल रंगवले आहे की बास...

हे काय आहे? याचा दुवा मिळेल का?

सई, तू अनुवाद करतेस हे माहीत नव्हतं. शुभेच्छा Happy

योगायोगाने, कालच मी माझ्या मुलाला 'सख्खे शेजारी' वाचून दाखवले. पाचवी गल्ली उद्या-परवात वाचू.
त्यातले केतकी-तिची आई आणि मावशीआजीचे अपारंपारीक कुटुंब, एकटे राहणारे आजी-आजोबा, आपापल्या जगात बिझी असणारे आई-वडील-मुलगा, एकटी राहणारी करियरिस्ट बागुलीताई हे सगळे इतके सहज 'मॅटर ऑफ फॅक्ट' पद्धतीने आले आहे. माधुरी पुरंदर्‍यांच्या आत्तापर्यंत वाचलेल्या सगळ्या बालकथांतून अगदी किंचितही प्रचारकी सूर न लावता, नकळत भाषेचे आणि वर्तनाचेही उत्तम संस्कार मुलांवर ( आणि मोठ्यांवरही ) होतात. ही पुस्तकं आणि त्यातली चित्रं मुलांच्या कल्पनाशक्तीला खुणावतात.

फार गोड आहे हे पुस्तक. चित्रंही अर्थातच सुरेख. त्यांच्या इतर अनेक पुस्तकांसारखीच ( जी दुकानात उपलब्ध होती ती सगळीच आहेत आमच्याकडे. )

माधुरी पुरंदरेंची पुस्तके माझ्या मुलांची खूप आवडती आहेत. रैनाच्या कृपेने 'शेजार'ची माहिती कळाली तेव्हा मी दुसरा काहीही विचार न करता ऑर्डर केली. ती आमच्याकडे पोचायला अजून बराच वेळ आहे, पण हा धागा वाचल्यावर मस्त वाटलं. धन्यवाद.
बाकी त्यांची इंग्रजीत अनुवादीत पुस्तके ही आमची अमराठी मित्रांसाठी ठरलेली नेहेमीची गिफ्ट-आयटम असतात. Happy त्या मुलांनाही ती हमखास आवडतात, असा अनुभव आहे. सई, तू त्यांची कुठली पुस्तके अनुवादीत केली आहेस?

परिचय आवडला. पुस्तकं मागवली आणि लगोलग वाचून काढली. गडबडीत सख्खे शेजारी आधी वाचलं.
'बागुलबुवा' या शब्दाचा अनुवाद कसा करणार याची उत्सुकता आहे.
अनुवाद प्रकाशित झाला की इथे कळवा.

छान परिचय.
अरे वा ! तुम्ही अनुवाद करताय हे वाचून छान वाटले.

योगायोगाने या भारतवारीत आणली ही नवीन पुस्तके आणि कालच संपले दोन्ही भागांचे वाचन. पुस्तके अर्थातच आवडली आमच्या घरातील छोट्या मुलीला. Happy
आधीच्या पुस्तकांच्या तुलनेत जाणवलेले दोन ठळक फरक. थोड्या मोठ्या मुलांसाठी असावा मजकूर मह्णजे सहा/सात वर्षे. मजकूर मोठा आहे, तसेच थोडा काँप्लीकेटेड आहे. चित्रे फारच सुंदर आहेत आणि रंगांची छपाई का काय म्हणतात ते पूर्वीपेक्षा जास्त सुंदर आहे. ज्योत्स्ना प्रकाशनाचे कौतुक वाटले.

मला असे वाटले की माधुरीताईंनी पुढले पुस्तक आता थोड्या वेगळ्या वळणाने लिहावे. 'नाती' / 'परिसर' या थीम्स बास आता.

मी इकडे मराठी शिकवायला सुरवात केली आहे. ज्योत्स्ना प्रकाशन आणि माधुरीताईंच्या कृपेने उत्तम सुरु आहे. मुलांना हमखास आवडतात. आता 'राधाचे घर' आणि 'लालू बोक्याच्या गोष्टी' करिक्युलमला लावले आहे. Proud

सई,
जमल्यास माधुरीताईंना निरोप सांगणार का कृपया ? आम्ही आता सलग पाचव्या पारायणावर आहोत. रोSSज रात्री वाचून दाखवावेच लागते. घसा बसलाय तरी सुटका नाही. कदाचित नुकतेच भारतवारीहून आल्यामुळे संदर्भ तिच्या डो़ळ्यासमोर येत असतील. उदा- Oh ya ! I have heard aaji saying अहोSS all the time. अहोSS.. अस्सं करा.. I think Aaji Aaba fight all the time. वगैरे सटासट टिपण्ण्या .. येतात .... Proud
गेल्या आठवड्यात वाचायला लागल्यापासून ही पुस्तकं तिच्या उशापायथ्याशी, अवतीभवती असतात.. जेवताना, झोपताना, शाळेतून घरी आल्यावर. 'शाळेत नेऊ का माझ्या फ्रेंडस ना दाखवायला' या प्रश्नाला 'तू ठरव' असे उत्तर देताना मलाही जड गेले. पुस्तकं हरवली तर हलकल्लोळ होईल, पण कधीतरी तिला तिची जबाबदारी घेणे भाग आहे. Happy

उद्या आम्ही इकडला घराजवळचा सोनचाफा पहायला जावे असं म्हणतोय.

गेल्याच आठवड्यात ही दोन्ही पुस्तके आणली, केवळ अप्रतिम!
मुलाबरोबर मलाही प्रचंड आवडली.
भाषांतर - सई केसकर हे वाचून ही तूच का? असा प्रश्न पडलाच होता!!!

सई, खरंच माधुरी ताईंना निरोप सांगा अतिशय सुरेख पुस्तक
खरंतर मला त्यांना भेटायचे आहे .माझा संशोधनाचा विषय बाळ कुमार कादंबरी आहे आणि माझ्या अभ्यासात माधुरी ताईच स्थान अतिशय महत्वाचे आहे Happy

सई, माझ्याकडे ही अनुवादित पुस्तके आहेत. सुरेख अनुवाद झालाय .

माधुरी ताईंची सगळीच पुस्तके आमच्या घरी आवडतात. बाकी सगळी मराठी आहेत पण हि इथे बुक फेअरमध्ये घेतल्याने इंग्रजीत घेतली होती.
यावेळी इथे दिल्लीत बुकरू फेस्टिव्हलमध्ये माधुरीताईना भेटायला मिळाले. दोन गोष्टी पण ऐकल्या त्यांच्यातोंडून. लेकानी त्यांची स्वाक्षरी घेतली, सोबत फोटो काढला.

अरे वा सई, तू अनुवाद करतेस हे माहीत नव्हतं. तो सुद्धा मराठीतून इंग्रजी मधे. जास्त वेळा इंग्रजीतून मराठीत आलेल्या पुस्तकांबद्दल ऐकलं होतं. असो, पुस्तकाला शुभेच्छा! माधुरी लेखना व्यतिरिक्त इतरही काही कलांमधे निपुण आहे. Happy

ओह हे वर्षापुर्वीचे आहे
कसा काय नजरअंदाज झाला धागा न कळे !

छान परिचय! धन्यवाद!
हे "वाचू आनंदे" ग्रुपमध्ये असायला हवे का?
>>> +१