सबलीकरण

Submitted by आतिवास on 5 January, 2015 - 02:47

पुरुष माणसं मीटिंगमध्ये हजर असताना त्या खुर्चीत बसू शकत नाहीत, मी मात्र बसू शकते.
मी महागडे कपडे वापरू शकते, त्या नाही वापरु शकत.
मी चारचाकीने प्रवास करू शकते, त्या कधीच चारचाकीत बसलेल्या नाहीत.
मी डिजीटल कॅमे-याने फोटो काढू शकते, त्यांनी कधीच फोटो काढलेला नाही.
मी वेगवेगळ्या राज्यांत प्रवास करते, त्यांच्यापैकी अनेकींनी शेजारचा तालुकाही पाहिलेला नाही.
माझ्याकडे मोबाईल फोन आहे, त्यांच्याकडे तो नाही.
मी वाचू शकते,लिहू शकते – त्या शाळेत गेलेल्या नाहीत.
मी माझ्या इच्छेने मला हवे तेव्हा आणि मला पाहिजे तितके पैसे खर्च करू शकते; त्यांना अशी चैन करता येत नाही.
मी इंग्रजी बोलते, त्या बोलायचे तर लांबच, समजूही शकत नाहीत ती भाषा.

माझ्या सोबत असलेल्या स्त्रियांचा दृष्टीने ‘तुम्ही किती हुशार आणि आम्ही किती अडाणी’ असा मुद्दा अधोरेखित करणारी ही यादी न संपणारी आहे. त्यांच्या दृष्टीने मी जणू कुठल्यातरी परग्रहावरून आले आहे. त्यांच्या आणि माझ्या जगण्यात साम्य तर नाहीच पण त्यांना कधी माझ्यासारखं जगता येईल ही शक्यताही त्यांना दिसत नाही. खरं तर या जाणीवेत, या भावनेत, या अभिव्यक्तीत एक संदेश पण आहे माझ्यासाठी. ‘तुम्ही जे काही बोलाल, ते आम्हाला लागू पडणार नाही’ असंच जणू त्या स्त्रिया मला सांगायचा प्रयत्न करताहेत. मी बरीचशी संदर्भहीन आहे त्या परिस्थितीत.

मला त्या स्त्रियांची भावना समजते. पण सत्याला अनेक बाजू असतात आणि त्यांना केवळ सत्याची एक बाजू दिसते आहे असं मला वाटतं. कारण त्या सत्याची दुसरीही एक बाजू आहे – ती मला आत्ताच दिसते आहे असं नाही, तर अनुभवाने मला ती माहिती आहे. त्या बाजूची चर्चा झाल्याविना हा संवाद पूर्ण नाही होणार माझ्यासाठी.

मी गुजरात राज्यात आहे. तापी जिल्ह्यातल्या छिन्दिया गावाच्या एका पाड्यात मी आहे. माझ्या सोबत पंधरा वीस कोटवालिया स्त्रिया आणि काही मुले-मुली आहेत. भारत सरकारने एकंदर ७५ आदिवासी समूहांना ‘आदिम जनजाती’ अशी मान्यता दिलेली आहे. या समुहांची जीवनशैली बरीच जुन्या पद्धतीची आहे आणि विकासाचा वारा त्यांच्यापर्यंत न पोचल्याने त्याच्या फायद्यांपासून ते वंचित आहेत. त्यांची शेतीची आणि उपजीविकेची साधनं आधुनिक झालेली नाहीत अद्याप.

मीटिंगच्या आधी मी त्यांच्या वस्तीतून एक फेरफटका मारते आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा प्राथमिक स्वरूपाचा अंदाज मला आला आहे. शिवाय इथं येण्यापूर्वी माझ्या सहका-यांनी मला या समूहाची, या गावाची माहिती पुरवली आहे. त्यामुळे समोर येत असलेल्या दृश्यात अनपेक्षित, धक्का बसावं असं काही नाही माझ्यासाठी. जे आहे ते काही फारसं सुखावह नाही, हे मात्र निश्चित.

स्त्रियांच्या सोबत फेरफटका मारताना अनेक विषयांवर आमच्या गप्पा होत आहेत. त्यात मी वर उल्लेख केलेले अनेक मुद्दे येताहेत. इथं मला त्यांच्या जगण्याबद्दल जितकं कुतूहल आहे, तितकंच, किंबहुना थोडंसं जास्तच त्यांना माझ्या जगण्याबद्दल आहे. शिवाय मी एकटी आणि त्या वीस जणी – त्यामुळे एकापाठोपाठ मला प्रश्न विचारण्याची संधी त्यांना आहे. मला गुजराती भाषा चांगली समजते त्यामुळे त्या विनासंकोच प्रश्नांच्या फैरी माझ्यावर झाडत आहेत. मला गुजराती फार चांगलं बोलता येत नाही – बोलण्याच्या ओघात मी व्याकरणाच्या चुका करते आहेत. त्यामुळे खूष होऊन त्या स्त्रिया आणि लहान मुलं हसत आहेत.

माझे प्रश्नही बहुधा विनोदी आहेत. पाड्यात भटकताना मला एक सायकल दिसते, तेव्हा ‘तुमच्यापैकी कुणाला येते सायकल?” या माझ्या प्रश्नावर सगळ्याजणी हसतात. कदाचित त्या प्रश्नातूनच ती वरची प्रश्नोत्तरी उगम पावली आहे. झाडाखाली एक पुरुष बसला आहे. तो माझा प्रश्न ऐकतो आणि त्या स्त्रियांना त्यांच्या (आदिवासी) भाषेत काहीतरी सांगतो, त्यावर एकच हशा उसळतो. “काय म्हणाले ते भाई?” मी विचारते. तर तो भाई म्हणालेला असतो की, “सांगा येते सायकल आम्हाला म्हणून. त्या बेनसमोर कशाला काही येत नाही म्हणता? तिला थोडचं खरं काय ते कळणार आहे?” पण त्या स्त्रिया खोटं सांगत नाहीत. कदाचित मी ‘दाखवा बरं चालवून’ असं म्हणेन याचा त्याना एव्हाना अंदाज आला असावा.

पण तो माणूस हुशार आहे – अनोळखी लोकांसमोर आपली बलस्थानंच फक्त जाहीर करावीत – हे त्याचं धोरण तसं पहायला गेलं तर योग्यच आहे.

भटकून झाल्यावर आम्ही एक ठिकाणी बसून ‘मीटिंग’ करतो आहोत आता. माझ्या इथं येण्याने स्त्रियांचा न्यूनगंड वाढणं योग्य नाही याची मला जाणीव आहे. त्यांनी त्यांना येत नसणा-या गोष्टी प्रामाणिकपणे मला सांगितल्या आहेत. आता गरज आहे मीही तितकंच प्रामाणिक असण्याची.

Chindiya Women Gujrat June 10.jpg

मिटींगमधली औपचारिकता पार पडते – ओळख, स्वागत वगैरे. आता मी बोलायचं आहे. मी ती संधी घेते. त्या स्त्रियांच्या रोजच्या कामाची चर्चा सुरु करते.

आजपर्यंत कोटवालिया समाजाने गायीम्हशी कधीच पाळल्या नव्हत्या. पण सरकारी योजेनेचा भाग म्हणून आता त्यांना म्हशी मिळाल्या आहेत. इथल्या स्त्रिया आणि पुरुष काहीही अनुभव पाठीशी नसताना म्हशीची धार काढायला लागल्या आहेत.

“हं! मला नाही येत गायी-म्हशीची धार काढायला.कधीच काढली नाहीये मी धार,” मी सांगते. सगळ्या हसतात.

या सगळ्या स्त्रिया शेणाच्या गोव-या करतात, मला हेही काम येत नाही करता.

जंगलात एकटीने जायचं आणि जळणासाठी पाहिजे ती (योग्य या अर्थाने) लाकडं आणायची हे रोजचं काम आहे त्यांचं. मी जंगलात एकटी जाऊ शकणार नाही आणि कोणतं लाकूड जाळण्यासाठी योग्य आहे हे मला कळत नाही आणि मला लाकूड तर तोडताच येणार नाही हे मी जाहीर करते. सगळे पुन्हा हसतात. आता त्यांना गंमत वाटायला लागली आहे. आत्तापर्यंत मी ‘हुशार’ होते त्यांच्या दृष्टीने, पण मला अनेक गोष्टी येत नाहीत हे हळूहळू त्यांच्या लक्षात येतंय!!

हापशावरून त्या पाणी आणतात – घराला लागेल तितकं. मला भरलेली बादली उचलायला फारसं जमणार नाही हे मी त्यांना सांगते.
त्या स्त्रियांना त्यांची आदिवासी भाषा आणि गुजराती दोन्ही चांगल्या येतात, हिंदीही थोडी थोडी बोलता येते. म्हणजे त्यांना तीन भाषा येतात. मलाही हिंदी, गुजराती येत असलं तरी त्यांची भाषा मात्र येत नाही.
त्या चुलीवर स्वैपाक करतात, मला तर चूल पेटवताही येत नाही, स्वैपाक करणं तर फार पुढची गोष्ट!
त्यांना बांबूची बास्केट बनवता येते – जी मला येत नाही.

आता आमच्या चर्चेत रंग भरायला लागला आहे. मला असंख्य गोष्टी येत नाहीत याची त्यांना झालेली जाणीव त्यांच्यात एक वेगळाच आत्मविश्वास जागा करते आहे.

त्यांना तालावर नृत्य करता येतं; मला येत नाही.
त्यांना गाणी गाता येतात वेगवेगळ्या प्रसंगाना अनुरूप; मला गाता येत नाही.
त्यांना झाडं ओळखता येतात, झाडांची नावं सांगता येतात – माझं ज्ञान दोन-चार झाडांपल्याड जात नाही.
त्यांना ‘माशांची आमटी आणि भाजी ’ बनवता येते मस्त – मला मासेही ओळखू येत नाहीत वेगवेगळे.
शहरातली असले, शिकलेली असले, पैसेवाली असले, इंग्रजी बोलता येणारी असले ... तरी मला सगळं येत नाही ही गोष्ट आता त्या स्त्रियांना चकित करून गेली आहे.

माझ्यासाठी ही साधी गोष्ट आहे. जगण्याची काही कौशल्य त्या स्त्रियांकडे आहेत – काही माझ्याकडे आहेत. काही माझ्याकडं असणारी कौशल्य जशी त्यांच्याकडं नाहीत तशीच त्यांच्याजवळ असणारी अनेक कौशल्य माझ्याकडं नाहीत. त्या काही बाबतीत अडाणी आहेत तर मी काही बाबतीत अडाणी आहे.

नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे आमच्यात फरक पडला आहे हा? शिक्षण? जात? आर्थिक स्थिती? शहर-खेड्यात असणा-या संधी? त्या आदिवासी आहे आणि मी नाही म्हणून? धर्म? हा फरक केवळ वर्तमानाताला आहे की त्याला भूतकाळ आहे? हा फरक इथं संपणार की भविष्यातही असाच राहील?

अनेक प्रश्न. त्या प्रश्नांची उत्तरं माहिती नाहीत; जी माहिती आहेत ती विषण्ण करणारी आहेत. म्हणून मी प्रश्न विचारत नाही, त्यांची उत्तरं इथं शोधायचा प्रयत्न करत नाही. आम्ही मिळून ज्या गप्पा मारतो आहोत, त्यातून आमची एकमेकीच्या आयुष्याबद्दलची समज वाढायला मदत होते आहे हे मात्र नक्की! त्यातून आमचे सगळ्यांचेच सबलीकरण होते आहे कळत नकळत!

स्वत:ला पाहिजे तसे निर्णय घेत स्वत:चं आयुष्य घडवण्याची क्षमता असणं अशी सबलीकरणाची ढोबळ व्याख्या करता येईल. ही क्षमता प्रत्येक व्यक्तीला आणि समूहाला मिळणा-या संधींवर अवलंबून असते. आपली बलस्थानं कोणती याचं भान असणं ही या प्रक्रियेतली महत्वाची गोष्ट आहे. आमच्या या चर्चेतून आम्हाला आमची बलस्थानं कळली हे फार चांगलं झालं! आपल्याला जे चांगलं करता येतं त्याबद्दल आपल्याला काय वाटतं याच्याइतकंच महत्त्व आहे ते आपल्याला जे काही चांगलं करता येत नाही त्याबद्दल आपल्याला काय वाटतं ते!!

त्यादिवशी आमच्या त्या गप्पा आम्हाला सगळ्यांनाच नवा विचार देवून गेल्या.

मी काय केलं मला नाही माहिती; पण त्या स्त्रियांनी मला थोडं अधिक सबल केलं त्यादिवशी!!

**
अन्यत्र पूर्वप्रकाशित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिक्षण जबरदस्तीचे बनवायला हवे आहे असा काही निष्कर्ष कोणीतरी काढायला हवा आहे.
निष्कर्ष काढणे सोपे आहे. अंमलात आणणे कठीण. अगदी खूप श्रीमंत व सर्व संधि असलेल्या कित्येक मुलांना शिक्षणाची अजिबात गोडी नसते. तीच गोष्ट गरीबांच्या काही मुलांनाहि लागू पडते. श्रीमंत नि संधि असलेले लोक वाया गेले तर मला काही वाटणार नाही, पण इच्छा असूनहि संधि न मिळाल्याने शिक्षण घेता न येणे हे दुर्भाग्य देशाचे, त्या एकट्या मुलाचे नव्हे.

जबरदस्ती म्हणजे काय? कायदा करायचा? म्हणजे सरकारने ना?
इथला अनुभव असा आहे की एखाद्या चांगल्या गोष्टीचे वाट्टोळे करायचे असेल तर ते सरकार च्या ताब्यात द्यावे.

भारतात सुद्धा ऐकून आहे की कुटुंब नियोजन नि गरीबांना मदत, पाणीपुरवठा, चारा पुरवठा या गोष्टी सरकारच्या ताब्यात गेल्यावर ज्यांना हवे होते त्यांना मिळालेच नाही म्हणे.

Pages