प्रिय रंग,
कितीतरी दिवस तुला प्रेमपत्र लिहिन म्हणत होते, पण धाडस होत नव्हतं. कुठल्याही स्त्रीला आपल्या प्रिय व्यक्तीला प्रेम पत्र लिहायला आधी धैर्य आणि मग शब्द जुळवावे लागतात्. दरवेळी मनात येइल ते शब्दांत उतरवता येइलच असे नाही. कदाचित त्याला तेवढी प्रतिभा असायला लागत असेल. माझ्याकडे तेवढी ताकद नाही. त्यातुन तुझ्यासारख्याला लिहायचे म्हणजे शब्द आणि भावना ह्यांचा तालमेळ मस्त जमायला हवा ना. तुझ्यासारखाच मस्त. रंगा, माहीत आहे मला तु जितका तेजस्वी आहेस तितकाच तु मधाळ हळवा आहेस. माझे हे हळवे शब्द तुला नक्कीच कळत असणार, कारण हळव्या शब्दांना समजण्यासाठी हळवे मन हवे. मी सुद्धा प्रसंगी तेजस्वी, प्रसंगी हट्टी... जिद्दी म्हण हवं तर! आणि प्रसंगी तितकीच भावुक असते. सगळ्या भावनांचं रंगीबेरंगी समीकरण म्हणजे मन. खरतर मला रंगी-बेरंगी हा शब्द फारसा आवडत नाही, पण कधी कधी खरंच मनात फार बेरंगी भावना येतात रे. ज्या सगळ्या माहौलचा बेरंग करतात. पण तरि त्याही आपल्याच मनांत उठलेल्या तरंगाचं प्रकटीकरण आहे म्हणुन त्याही स्विकारायला लागतात. बेरंग हाही एक रंगच. मला ठाऊक आहे रंगा, हे सारं मी जितक्या आत्मीयतेनं लिहित आहे तितक्याच आत्मीयतेनं तुही ते वाचत असणार! कारण आत्मीयता ही तुझ्याशी किती निगडीत आहे ठाऊक आहे मला. जाणते मी तुला. कंटाळणार नाहीस अशी खात्री आहेच. निदान मी काय लिहलंय ह्या उत्सुकतेपोटी तरी तु हे वाचत असशील. माझ्या मनांत प्रत्येक क्षणी रंग असतो. तुझाच एखादा रंग. कधी तो मला खुदकन हसवतो तर कधी धाय मोकलुन रडायला लावतो.
सकाळ झाली की पहाटेचा गारवा जेव्हा माझ्या खिडकीवर दस्तक देतो तेव्हा मला आकाशात तु दिसतोस. अगदी प्रेमात आल्यासारखा. किती मिश्किल प्रियकरासारखा तु हवेच्या गळ्यात हात टाकुन येतोस. त्याक्षणी तुला तमा नसते कुणी आपल्याला पहाते किंवा नाही ह्याची. तरुण वयातला बेफिकीर प्रियकर! मला त्या उजळत्या हवेचा हेवा वाटतो. सुर्य उगवतो. मावळतो. नेहमीच. नेमानं. पण तु तुझ्या वेगवेगळ्या कला कुसरीनी त्याचं सोनं करतोस. उंच डोंगर माथ्यांवर जेव्हा उन्हाची किरणं तिरपी होउन लोटतात तेव्हा त्या मस्तमौला डोंगर कड्यांना एखाद्या साधु सिद्ध पुरुषाची तेजस्विता लाभली की काय असं वाटतं. तेजस्वी, सोनेरी किरणाचा खेळ प्रभावलय होउन शिखरांमागे उभा रहातो, तेव्हाचा तु पोक्त वडीलधार्यासारखा भासतोस. रंगा, निसर्ग आणि तु ह्यांचं हे नातं किती दृढ आहे रे. किती समाज बदलला, तरि तुमचं नातं बदललं नाही. जेव्हा जसा रंग यायला हवा तसाच तु येतोस. बदल नाही. मला तुमच्यातल्या ह्या दृढ नात्याचा हेवा वाटतो.
सकाळचे अकरा-बारा वाजले की आकाशाचा रंग बदलतो. खरतर तो दरक्षणी बदलतो. बदलणार्या ह्या प्रत्येक रुपाचा, रंगाचा एक अविनाशी तरल असा चित्रपट चालुच रहातो. ह्याला अंत नाही. नवनीत सृजन हा जणु तुला लागलेला ध्यासच. इथे कंटाळा, थकवा, नाराजी असल्या क्षुद्र जाणिवांना थारा नाही. मलाही तुझ्यासारखे सातत्य माझ्या व्यक्तीमत्वात असावे असे वाटते. काय करु?
दुपारचं ओसंडणारं ऊन. दु:ख, श्रम आणि वेदना जणु शिगेला पोचल्यात असं उत्कट ऊन. ही उत्कटता प्रेमात असते. भुकेत असते. कितीतरी ठिकाणी अशी उत्कटता असते, पण उन्हात? इतकी तिव्र, उग्र भावना. रंगा, तु तेव्हा फार दुष्ट वाटतोस. वाहन चालकांना सतवणारं ऊन. हातगाडीवाल्यांना भाजणार ऊन. आणि हे सगळ तु मोठमोठाल्या इमारतींवर पिवळ्या धमक स्वरुपात विखरत असतोस. विखारी पिवळ्या रंगात. पण तुझा तो उग्र पणाही मला आवडतो. तु कसाही मला आवडतोस.
संध्याकाळ झाली की पश्चिमेचा वारा लडीवाळ होउन येतो, अंगाशी लगट करतो. केसांतुन फिरुन, मानेवरुन खांद्यावर... पाठीवर, पोटावर, छातीवर कुठेही कसाही अधिकारानं फिरतो. कधी ओठांशी चाळा करतो, कधी डोळ्यांत फुंकर घालतो. कधी हातात गुंफतो. कधी कानाशी काही कुजबुजतो. त्या वार्याला रंग असतो. नवपरिणीत रंग. नवीन लग्न झालेल्या प्रणयाराधीत वराच्या अधिकारयुक्त प्रेमाचा. गुलाबी रंग. वारा - हवा दिसत नाही म्हणे, ते फक्त जाणवतात. जाणवतात म्हणजे तरी काय? आपल्या अंतर्मनाच्या अंतःचक्षुंनी त्यांना आपण बघतच असतो ना. बर्याचदा प्रत्यक्ष न दिसणार्या गोष्टींना आपण मनात चिंतीतो, कल्पितो, अनुभवतो. अर्थातच पहातो. हे दिसणं तर फारच अतुलनीय. जे साध्या डोळ्यांना दिसत नाही. मला हवा दिसते, मला वारा दिसतो. मला ते दिसतात. त्यांच्यात तु दिसतोस. धुसर हवा, निळसर वारा . . .
रात्र झाली की जांभळ्या रंगछटांनी आकाश चित्रमय होते. त्यावर चांदण्यांची चंदेरी किनार लाभलेलं आकाश मला राधेच्या जांभळ्या जरीकाठी ओढणीवर हात पसरुन पहुडलेल्या श्रीकृष्णासारखं भासतं. राधेच्या प्रेमळ हस्तस्पर्षानं गुंगलेल्या श्रीकृष्णासारखी रात्र गडद होत जाते. आजुबाजुची गर्द रानं, वेली दिवसभर आपले रंग उधळत असतील पण अशा ह्या मिलनसमयी तेही गडद होतात आणि एक पडदा बनुन जणु आडोसा धरतात. एक तृप्तसा गारवा हवेत भरुन येतो. मंद वास दरवळतो. सगळं जग गुंगुन जातं. दारा-खिडक्यातले दिवे हळुहळु विझत जातात आणि उजळु लागतात चांदण्या. एखाद्या घरातुन रंगीत वलयं निघताना दिसतात, तर एखाद्या घरातुन एखादी करुण कहाणी अधिकच विषण्ण होउन काळी बनुन ढगांपर्यंत जाऊन पसरते. चंद्र पुर्ण असो की कोर, चंद्र तो चंद्र. त्या लखलखत्या शुभ्र चंद्रातला तुझा रंग मला अधिकच तुझ्या जवळ ओढुन धरतो.
कुणा आप्ताच्या निधनानं चेहर्यावर पसरते अवकळा. विदारकता. अश्रुंच्या रुपानं वाहताना सगळेच रंग त्यात मिसळलेत असं वाततं, सगळेच एक झाल्यानं कुणीच वेगळं दिसत नाही अशी ही विचित्र रंगसंगती. चेहरा बोलतो म्हणतात. अशाच काही आलेल्या चेहर्यांवरुन समजतं की त्यांना किती दु:ख झालंय! म्हणजे दु:खालाही रंग असतो!
नव्यानं जन्म घेतल्या बाळाचे हात, पाय, नाजुक बोटं, ओठ किती पवित्र आणि शुद्ध असतात. ह्या जगाच्या फसव्या मेक-अपचा स्पर्श न झालेलं नवजिवन. स्पर्शास्पर्शात परमेश्वरी संदर्भ. बाळाच्या लालसर ओठात शुभ्र दुधाचा थेंब, किती सुंदर! गुलाबी गुलाबी बाळाला घातलेले मऊसूत कपडे. आईच्या चेहर्यावर ओसंडुन वहाणारं वात्सल्य आणि पित्याच्या चेहर्यावरची सार्थकता, दोन्ही एकाच गोष्टीशी संलग्न पण तरीही दोन्हीचे रंग किती वेगळे रे. जे कुणी बाळाला हातात घेइल त्याला हसवणारं खुलवणारं बाळ. जन्माला येताना कुठल्या जातीचा कडवट शिक्का घेऊन ते जन्म घेतं, मग हा जातीयतेचा रंग कधी चढतो रे? नुकत्याच मिशा फुटु लागलेल्या तरुणाच्या हातात काळी कभिन्न बंदुक धरायला लावणार्या अमानुष धर्माचा कुठला रंग?
आयुष्याला नमन करण्यासाठी वाकलेल्या वार्धक्याला रंग असतो तपकिरी. तपकिरी हा एक गडद, उत्कट आणि गोड असा रंग आहे. पिकलेलं फळही नाही का हळुहळु गडद आणि अधिकच गोड होत जातं!
पावसाळा हा तर जणु तुझा जिवलग मित्रच. पावसानं भरलेल्या आभाळाला नक्की कोणता रंग असतो. नुसता राखी किंवा राखाडी म्हणावा तर त्या भरुन आलेल्या आभाळात जांभळा इतका बेमालुम मिसळलेला असतो की काय सांगावं! बरं त्यातुन निळाही वेगळा करता येत नाही. मधेच वाटतं कि लाल्-गुलाबीचाही त्यात अंश आहेच. घरादारांवर पावसाळ्यात एक वेगळाच स्वच्छ उजेड दिसतो म्हणजे पिवळाही? झाडं कशी उजळ माथ्यानं डोलतात . . .कदाचित म्हणुनच तर इंद्रधनुष्य कमान उंचावुन सगळ्या रंगांना अभिवादन् करते. सगळ्याच गोष्टींना सायन्स्-शास्त्र असल्यात तोलु नयेत. काही गोष्टी भावनीक स्तरावरच आनंद उपभोगण्यासाठी असतात. हिरव्या गार दाटीवाटीनं जमलेल्या झादाझुडुपातुन आपला मार्ग शोधत धावणारा फेसाळणारा, खळाळणारा झरा. किती शुभ्र! शुभ्रतेची परिसीमा. किती चमचमते लोलक कवेत घेऊन उंच कड्यांवरुन झेपावतो हा! असे हजारो मोती ज्याच्या हाती असतील तो असाच तर बेफाम मस्तीत उड्या मारेल ना!
कैक काळ उभ्या राहीलेल्या हिरव्या गार झाडांचे रंग ऋतुनुसार बदलतात. उन्हाळ्यात ही झाडं मलुल दिसतात, थंडीत ती बिचारी धुक्याच्या अर्ध पारदर्शी चादरीत स्वतःला घट्ट लपेटुन घेतात, तर पावसाळ्यात अंगावरची सगळी मळकी वस्त्रं उतरवुन ती मनसोक्त भिजतात, खिदळतात . . . आणि तसंच ऋतुबदलाचे वारेही मोकळेपणानं अनुभवतात. त्या अनुभवी झाडाझाडाच्या फांदी फांदीवर मला तु नाचताना दिसतोस, रंगा, तु मला खुणावतोस.
एखाद्या फांदीवर बसलेल्या निवांत पक्ष्याच्या लाल चोचीत, लाल डोळ्यांत किंवा ऊबदार पंखात मला तु दिसतोस. एखाद्या पक्ष्याच्या मानेखाली चतुरपणे दडलेला निळा रंग असतो, तर कधी प्रियपक्षिणीला आकर्षीत करण्यासाठी अधिकच उभारलेला रसिक केशरी असतो. तर एखादा पक्ष्यांचा अख्खा समूह कधी संतीणीसारखा पवित्र शुभ्र रंगात असतो तर एखादा थवा काळ्या, कलत्या रंगात असतो.
रानटी पोपटी गवतात छोटी नाजुक फुलं. छोटे छोटे चिमण भुइनळे जणु. वलयंकीत जांभळा, किंवा अंगठीत जडवलेल्या पाच पुष्कराजांसारखी. उग्र हिरवा, मस्त मारवा, थंडगार हिरवा, पिवळसर हिरवा, गडद हिरवा . . . ह्या रानाला हिरवाईची भूल पडलीय. कैक युगं. कैक शतकं. न उतरणारी हिरवी भूल. रंगा, मलाही तशीच तुझी भूल. न मिटणारी.
जेवणाच्या ताटातही रंगांचा अट्टाहास धरणारी आम्ही खुळी माणसं. सारेच तर तुझ्यावर प्रेम करतो. कुणाला मटणाचा तांबडा रस्सा आवडतो, कुणी पांढर्या रश्शाचा दिवाना. कुणाला शुभ्र भातावर पिवळं धमक वरण आवडतं, तर एखाद्याला मिसळीचा नक्षीदार लाल रस्सा वेडावतो. कुणी रोटीच्या, पोळीच्या खरपूस रंगांवर फिदा. तर कुणाला आवडते केशराची श्रीखंडात लाजत शिरण्याची अदा. हिरव्या गार पालेभाज्या, रंगीत चटण्या-कोशिंबीरी, लाल केशरी लोणचं . . . सगळेच रंग म्हणजे जणु काही मांडी घालुन गप्पा मारायला बसलेले बालमित्रं. सगळेच गुणवान.
वेड लावतोस रे. वेड लावतोस. कुठेही जाते तर तूच साद घालतोस, तुच ठायी ठायी. ईश्वराचा अनुयायी. मंदीरातल्या पवित्र ज्योतीतुन हाक मारतोस. सावळा विठु, निळा कृष्ण, धुम्रवर्ण गणपती. गुलाबी कमळ, लाल गुलाब, पांढरा मोगरा, पिवळा चाफा.
आंधणाखालच्या धगेतुनही हाकारतोस. ज्योती ज्योतीतुन तेवतोस. मशालीतुन वेगळाच प्रगटतोस.
स्मशानात पेटलेल्या वास्तवाच्या निखार्यातही तुच जळतोस. यात्रेमध्ये उधळलेल्या गुलाल्-पुष्पांतुन कुठल्या प्रकारची यात्रा आहे ते वर्तवतोस. फडकवलेल्या निशाणातुन सार्वभौमत्वाची आणि सत्तेची पताका फडकवतोस. सणांना रंगाचा बाज चढवतोस. म्हणुनच आम्ही तुझा सण साजरा करतो. पण खरतर तु रोजच साजरा होउन येतोस. साजिरा होउन जगतोस.
वेगवेगळ्या धर्मांच्या अनुयायांनी वेगवेगळ्या रंगाला आपापल्या समजुतीनं वेगवेगळे अर्थ लावले. कुणी लाल् रंगाला मस्तकावर सजवले, कुणी दर्ग्यामध्ये आदरानं हिरव्याला स्थान दिले. चर्चमध्ये पांढरा पावित्र्य जपतो. तर एखाद्या समाजानं दुष्ट नजरेपासुन वाचवायला काळ्या रंगाला ढाल बनवले. निळा एखाद्या समाजानं गौरवला तर केशरी रंगाच्या छ्त्राखाली कुणी सामर्थ्य गाजवले. थोडक्यात काय, प्रत्येकानं तुलाच वाढवले. तुलाच जोपासले. आणि तु. .. सार्यांच्या भावना जपत जपत अधिकच खुलतोयस.
मला तुझं खुलणं भावतं. माझी काहीच अपेक्षा नाही तुझ्याकडुन. निष्ठावंत, उपासक प्रेम. माझ्या सार्या अपेक्षा तु कळत नकळत पुर्ण करतोच आहेस. आहेस तसाच रहा. इतकंच. तुझ्यावर प्रेम करणारे माझ्यासारखे अनंत आहेच, त्यातलीच मी एक! माझा वेगळा रंग जपु पाहतेय. समुद्राच्या असंख्य लाटांपैकी मी एक लाट. तुझ्या काठांवर झेपावणारी. संकोचानं मागे फिरणारी. पण पुन्हा झेपावणारी. वाळुनं भरलेल्या सोनेरी काठांवर तु भेटतोस. तापलेल्या वाळवंटात झुलवतोस. ही कसली तडप? ही कसली तहान? ही कसली भूक? माहीत नाही हे नक्की काय आहे, पण जे आहे ते नितांत सुंदर आहे, तुझ्यासारखे. न संपणारे हे लोभस प्रेम. निरतिशय. अनुबंधीत. आणि मी तुझी प्रेयसी, तु नाकारलीस वा स्विकारलीस तरी तशीच. खुळी. खुळेपण चालेल मला. तुझ्या प्रेमात काहीही कुणी म्हणो. रंगा, तुझ्या पावलांची धुळ मस्तकाला लावुन तुझ्या पाठी चालणारी मी... मी एक चित्रकार. कधी हरलेली, कधी हरवलेली तर कधी हरवणारी मी.
तुझीच मी.
प्रिय रंग,
Submitted by पल्ली on 12 January, 2009 - 01:14
गुलमोहर:
शेअर करा
केवळ
केवळ अवर्णनिय, माते.....सुंदर !
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
http://maagevalunpahataana.blogspot.com
रंगलो
रंगलो तुझ्या रंगी.
.........................................................................................................................
http://kautukaachebol.blogspot.com/
सर्वांगी
सर्वांगी सर्वरंगी सुंदर लेख.
पल्ले कस जमत हे तुला?
खरच, खुप छान लिहीतेस तु.
************
आपला अमर.....
पल्लवी...एक
पल्लवी...एकदम मस्त.. सगळ्या रंगछटा एकदम लाजवाब.
लगे रहो..
शुद्धलेखन
खुप
खुप मनमोकले पने लिहितेस म्हनुन भावत..सगल्याना....
अप्रतीम...
अप्रतीम... मस्तच जमलय...
पल्ले,
पल्ले, जम्या है! वेगळं आहे, आवडलं.
HATS OFF पल्ली !
HATS OFF पल्ली ! रंगांची आयुष्यातली केवढी ती पखरण... किती छान रेखाटलीयेस...
पल्लवी
एकदम
एकदम खल्लास पल्ली
(No subject)
सुरेख
सुरेख लेखन! पण हि कथा वाटत नहिये..
ललित मधे
ललित मधे टाकायचा विचार होता, पण प्रेमपत्रातुन मांडलेली प्रेम कथा . म्हणुन इथे पोस्टली.
सगळे चांगल
सगळे चांगल म्हणतात पण कथा वरुन गेलि राव
वेगळाच
वेगळाच विशय आणि फार सुंदर लेख !
सुंदर (ही
सुंदर
(ही कथा वाटत नाही असं मला पण वाटलं.)
निसर्गाच्
निसर्गाच्या चित्रात जेव्हढे धुंद व्हावे तेव्हढे कमीच आहे...... खूपच छान.......
काय आहे
काय आहे जरा वरचंच आहे ते.
रंगुनी
रंगुनी रंगात सार्या रंग तुमचा वेगळा..
(कवी सुरेश भट यांची क्षमा मागून)
..प्रज्ञा
(No subject)
स्पर्शास्
स्पर्शास्पर्शात परमेश्वरी संदर्भ. बाळाच्या लालसर ओठात शुभ्र दुधाचा थेंब, किती सुंदर! गुलाबी गुलाबी बाळाला घातलेले मऊसूत कपडे. आईच्या चेहर्यावर ओसंडुन वहाणारं वात्सल्य आणि पित्याच्या चेहर्यावरची सार्थकता..
वाह!
खूप खूप
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप सुंदर ...

इतके हळ्वे आणि अप्रतिम शब्द!!!!
खरंच खूप खूप सुंदर
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
कॉम्प्युटरही चुका करतो......................
पण त्या दुसर्यांवर ढकलत नाही
पल्ली केवळ
पल्ली केवळ अप्रतीम .. उच्च आहेस ग .....
असच लिहित रहा.
पल्ली,
पल्ली, अतिशय सुंदर लेख...सगळेच रंग मस्त, कल्पना तर अफलातून!!!!!! वार्धक्याचा रंग सरळ भिडला मनाला!!!!!
आणी हे एवढे शब्द कसे सुचतात गं...खरंच मायबोलीवरचं थोडंसं दर्जेदार साहित्य निवडलं ना, तरी एक आख्खा शब्दकोश तयार होईल
*****************
सुमेधा पुनकर
*****************
व्वा ! रातीच्या मिट्ट
व्वा ! रातीच्या मिट्ट अंधारातही 'इंद्रधनुष्य' डोळ्यासमोर दिसलं.
आधी मणकर्णिकेचा तो 'जांभळ्या रंगाचा माणूस' आणि त्यानंतरचं हे 'प्रिय रंग'. खरंच काहीतरी खास आहे. प्रेम,रंग आणि दंग यांची समीकरणं जुळल्याशिवाय आणि जुळल्यानंतरही,"आता बस्स !" असं म्हणता येईल?
खरोखर कधी कधी दु:ख स्वप्नांना खडबडून जाग येते आणि रात्रीच्या अंधारात उगाच अस्वस्थ मनाला असं काहीतरी वाचायला मिळाल्यावर आणखी काय पाहीजे. आज मध्यरात्रीच पहाट झाली असं म्हणायला हरकत नाही.
आईशप्पथ, खूप तगडी दाद आहे
आईशप्पथ, खूप तगडी दाद आहे नाद्खुळा
धन्स