मी झीनत शाहिस्तेखान इनामदार! वय पंचावन्न! राहणार म्हसळा, तालुका म्हसळा, जिल्हा रायगड! सर्वांसमक्ष कबूल करते की......
कवल हिरवे ह्या पस्तीस वर्षीय इसमाचा मी त्याच्या डोक्यात धोंडा घालून मर्डर केलेला आहे. मर्डर करण्याचे कारण असे, की हा इसम मला नकोनको झाला होता. मी चळवळीतली बाई नाही. जगाचं भलं करायला माझा जन्म झालेला नाही. स्वतःचं भलं करण्याचं काम अल्लाने मला दिलेले आहे. ते मी करत आले. त्याच कामाचा एक भाग म्हणून हा इसम मी जित्ता मारला. मला त्याचा पश्चात्ताप नाही. उलट मला आनंद झालेला आहे. तो हिंदू होता म्हणून मारलेला नाही. तो गरीब होता म्हणून मारलेला नाही. त्याला मारायचे म्हणून मारलेला आहे. तेव्हा कायदा देईल ती शिक्षा मला मंजूर आहे.
मात्र! माझ्यावर घातलेल्या केसचा निकाल लागून ती फाईल सरकारच्या कुठल्याश्या भोकातल्या अडगळीत धूळ खात पडायला जाण्यापूर्वी त्यात माझा हा जबाबही चिकटवला जावा म्हणून हे बाकीचे सांगत आहे.
माझा जन्म वेळ्याचा! आम्ही सहा बहिणी आणि दोन भाऊ! मी सगळ्यात थोरली! माझा बाप दिवसा जगाला स्वतःवर चढवून घ्यायचा आणि रात्री माझ्या अम्मीवर चढायचा. त्याला मुलगा हवा होता असे काहीच नाही. त्याला काहीच नको होते. आंघोळही नको होती. राब राब राबायचे, घरी येताना नाक्यावर थांबून हातभट्टी नरड्यात ओतायची, घराच्या रस्त्यावर चालताना अख्ख्या दुनियेची आईबहिण काढायची, घरी येऊन स्वतःची दुर्गत बघून कपाळ बडवून अंधार्या आकाशाकडे बघत हात उचलायचे, अल्लाच्या नावाने सुचतील त्या चार ओळी पोपटासारख्या बोलायच्या आणि मग समोर येईल ते ताट चिवडायचे. त्या रांडेच्याने कधी स्वतःच्या कष्टाने मिळत असलेले जेवणही पूर्ण केले नाही. कारण जेवताना ठसका लागायचा. ठसका लागला की समोर दिसेल त्याला शिव्या! तसेच चूळ भरत उठायचे. पोरांसाठी चुलीपुढे भाकरी बडवत असलेल्या अम्मीच्या कंबरेत लाथ घालायची. तिच्या सात पिढ्यांचा उद्धार करायचा. तिचे लांब केस हातात धरून तिला फरफटत आतल्या खोलीत न्यायचे. आणि तिच्यावर चढायचे. दारबीर उघडेच! बारकी पोरं आत जाऊन खुल्लेआम बघतायत ह्याचेही भान नाही. आम्हा बहिणींनाच लाजलज्जा! मी थोरली असल्यामुळे उरलेल्या भाकरी मी भाजायचे आणि मग आम्ही आठजण बकाबका जेवायचो. कधी राजगिर्याची भाजी तर कधी बेसन! कधी नुसताच कंदा, मीठ अन् मिरची! पाणी तेवढे भरपूर होते वेळ्याला! बाप गळून पडला की आहे तिथेच लवंडायचा! दहापाच मिनिटांनी कावरीबावरी होऊन आणि शरमून आई बाहेर यायची. उंबर्यात बसून दहा मिनिटे टिपं गाळायची. मग चौकशी करायची कोण कोण जेवलं त्याची! तोवर दोघं भाऊ, जे सगळ्यात धाकटे होते, ते लवंडलेलेही असायचे. चार लहान बहिणी गपचूप छतावर जाऊन पडलेल्या असायच्या. मी आणि माझ्या मागची शबाना आईला वाढायचो. आईच्या घशातून घास सरकायचा नाही. पण पोरांसाठी जिवंत राहायला हवे होते. मग ती जेवायची आणि पुन्हा बापाजवळ जाऊन पडायची. इतकंच काय त्याच्या अंगावर पांघरूणही घालायची. पहाटे जाग येईल तेव्हा बायको कुशीत पाहिजे हा बापाचा नियम होता. मग आम्ही दोघी छतावर जाऊन धाकट्यांना थोपटून झोपवायचो. मग मी शबानाच्या कपाळावर हात फिरवायचे. मग शबानाचा डोळा लागला की मी छतावरून अलगद खाली उतरायचे. घरात आतल्या खोलीत जाऊन बापाच्या मुडद्यासारख्या निजलेल्या बॉडीवर थुंकायचे आणि पुन्हा छतावर यायचे. इथे जमलेल्यांना क्षणाक्षणाला ओकारी येईल अश्या परिस्थितीत आम्ही अल्लाची बंदगी करत जमेल तसे फुलत होतो.
एकदा कसलीशी साथ पसरली. एक बहिण वारली. पाच नंबरची. ती उद्यापासून दिसणार नाही ह्याचे दु:ख मानण्यापेक्षा एक खायचे तोंड कमी झाले ह्याचा आनंद होता बापाला! त्या खुषीत हरामी जास्त प्यायला. आल्यावर आईनेच दिली एक ठेवून! गपचूप झोपला. आईचे ते रूप पाहून मी तर फार हरखले. पहाटे आवाज झाला म्हणून जागी झाले. बापाने आईचे केस धरून तिचे डोके तीनवेळा भिंतीवर आपटले होते. उजव्या कानाच्यावरून रक्ताचा ओघळ येत होता. आईने बापाचे पाय धरले. त्याच्या पावलांवर आसवे गाळली. तेव्हा कुठे तिच्या कंबरेत लाथ घालून तो कामाला बाहेर पडला. आईवर फुकटात उपचार झाले प्राथमिक आरोग्य केंद्रात! मनावर उपचार करणारी केंद्र सरकारने आजवर उघडलेली नाहीत.
सहा महिन्यांनी शेठ दारात आला. आई घाबरली. शेठ दरडावत म्हणाला, फिरोज कुठाय? फिरोज म्हणजे बाप! तो कुठे आहे हे आम्हाला माहीत नसायचे. आईने बावरून माहीत नाही म्हणून सांगितले. शेठ म्हणाला फिरोजने दहा हजाराची उचल घेतलीय चार दिवसांपूर्वी! रोज तीन तास जास्त खपून भरपाई करेन म्हणालाय. तेव्हा कुठे आम्हाला कळलं की गेले तीन दिवस बाप उशीरा का येत होता. शेठ म्हणाला फिरोज आज कामावर आलेला नाही. तो पैसे घेऊन पळून गेलेला असणार म्हणाला ऐष करायला. कारण भिर्याकडे मंडळी आली होती म्हणे! मंडळी म्हणजे वेसवा! पुरुषाने पैसे फेकले की नाचणार! बस म्हणाला की बसणार मांडीत! निज म्हणाला निजणार! आई अजूनच घाबरली. शेठ म्हणाला, उद्यापर्यंत फिरोज दिसला नाही तर तुला ओढून मजूरीसाठी नेईन. आई पुन्हा टिपं गाळत बसली. बाप आलाच नाही. बाप दुसर्या दिवशीही नाही आणि तिसर्याही दिवशी आला नाही. तिसर्या दिवशी शेठ आला आणि आईचं बखोट धरून तिला उठवत म्हणाला चल वावरात राबायला. आईला आवाजच नव्हता. त्याच्या गाडीत बसून गेली बिचारी! आम्ही पोरं बघत होतो. धाकटा ताहिर मला विचारत होता. दिदे, अम्मी किधर गै! माझ्याकडे उत्तर नव्हते. शेठच्या गाडीत बसताना आईला पाहिले ते शेवटचे. त्यानंतर आई कुठे गेली माहीत नाही. बाप आला दोन दिवसांनी! भकास नजरा घेऊन पोरे बघत आहेत बघून माझ्यावर डाफरला. मी थोरली! अम्मी किधर है म्हणाला. मी काय झाले ते सांगितले. त्यावर खदाखदा हासत म्हणाला गेली ब्याद हरामजादी! नुसते बच्चे पैदा करायची. मी सगळ्यांच्या भाकरी केल्या. त्या रात्री अचानक सुलतानाचे आमच्या घरी आगमन झाले. आली ती थेट बापाखालीच गेली. मला आणि शबानालाच फक्त समजले. बापाने स्वतःची रात्रीची सोय बघितलेली आहे. आपण आता अनाथ!
नंतर शेठ उगाचच 'इकडून चाललो होतो, कसे आहे बघायला आलो' करत येऊ लागला. सुलताना आमच्यावर फार डाफरायची. शेठ आला की त्याला पार आत घेऊन जायची. बाहेर यायचे तेव्हा फार खुष असायचे दोघे! एकदा तर बाप घरी आला तेव्हा दोघे आत होते. शेठसमोर शेपूट गांडीत घालून बाप घराबाहेर बसून राहिला. शेठ त्याच्यासमोर हसत हसत सुलतानाला पैसे देऊन निघून गेला. मग बापाने सुलतानावर हात उगारला. सुलतानाने जळते लाकुड बापाच्या थोबाडावर हाणले.
एका औरतने एका मर्दावर घेतलेला, मी पाहिलेला, तो पहिला सूड होता.
आमची अम्मी कुठे गेली ते समजतच नव्हते. बापाला विचारायची सोय नव्हती. सुलतानाला विचारायची इच्छा नव्हती आणि शेठला विचारायची हिम्मत नव्हती.
माझी मैत्रीण एक बकरी होती. तिला बिलगून मी रडायचे. पण मला वाटायचे की बकरीसुद्धा रडते आहे. मग तिला बिलगणे मी सोडून दिले. रडणार्याला काय बिलगायचे?
माझी छाती वाढत होती. मावत नव्हती फ्रॉकमध्ये! आजूबाजूचे येऊन मला निरखून जाऊ लागले. तसे मग भान आले. सुलतानाही निरखायची. एकदा सुलताना मला म्हणाली की तू मोठी झालीस का? मी अम्मी असतानाच मोठी झालेले होते. मी हो म्हणाले. त्यानंतर सहाव्या दिवशी माझ्या बापाने मला गावात नेऊन एका मुल्लाकडे सोपवले. तो मुल्ला म्हातारा होता. त्याने बापाला पैसे दिले. त्या रात्री मला शबानाची आणी भावंडांची आठवण आली. पण तिथून निघता आले नाही. मुल्ला बाहेर झोपलेला होता. सकाळी मुल्लाने मला एस टी ने कुठेतरी नेले. खूप गर्दी होती. म्हातारेकोतारे पुरुषसुद्धा मला चिकटून जात होते. ओकारी आली. पण रडायचे नाही हे ठरवलेले होते. ह्याचे कारण इतकेच की मी तिथे रडले तर माझी भावंडे घरी रडतील. मुल्लाने मला चिपळूणला नेऊन विकले असावे. काहीतरी पैश्यांचा व्यवहार झाला खरा. मी तिथे राबू लागले. आता मी मनाने मेलेले होते. काम काम आणि काम!
आणि एके रात्री नको ते झाले. ज्या घरात मी होते ते घर हिंदूचे होते. तिथला एक म्हातारा माझ्या अब्रूवर घाला घालायला आला. रबरी बाहुलीसारखी वागले मी! त्या आईघल्याला काय सुख मिळाले असेल अल्ला जाने! पण माझ्यासाठी एक नक्की झाले. जग मर्दाचे आहे. आपण मर्द नाही.
पुढे ते वारंवार होऊ लागले. दिवस गेले. बच्चा पाडला. पुन्हा तेच! कोणी वाली नाही. मग त्या घराला कर्ज झाले. मग मला भाड्याने राखायला म्हणून दिड वर्षासाठी एका सावकाराकडे ठेवले.
तेव्हापासून सतत तीस वर्षे मी गांधीबाबाच्या नोटेसारखी खिसे बदलत फिरत राहिले.
उबग आला होता. शरीर नष्ट करायचे नव्हते कारण भावंडांना एकदा डोळे भरून पाहायचे होते.
पण ह्या सगळ्या प्रकारात मी दडवून दडवून बरीच माया गोळा केली. ह्या दुनियेत पुरुषानंतर चालते कुणाचे विचाराल तर पैश्याचे! मी पैसा जमवला.
वयाबरोबर औरत बदसूरत होते. मी खूबसूरत होत गेले. चमडीचा रंग उजळला. शरीर पुतळ्यागत झाले. मला बघणारे घायाळ होऊ लागले.
पण आता मी महागडी झाले होते. कोई बी ऐरागैरा माझ्याकडे येऊ शकत नव्हता. खरे तर मी धंदा खोललेलाच नव्हता. अगदीच कोणी पैसेवाला असला तर निजायचे मी! हां! माझ्याकडे यायचे तर खिश्यात गड्डी पाहिजे. महिन्यातून कोणकोण यायचे. ख्याती ऐकून यायचे अगदी! ही भलीदांडगी चळत माझ्यावर फेकल्यावर मग कुठे मी साडी सोडायचे. एकदा एक हट्टाकट्टा गडी आला. त्याला पाहूनच हसू आले मला. तो दिसायला असा होता की खिश्यात पैसे नसते तरी एखादी बाई भुलली असती. पण मी भाव खाल्ला. त्याने सात हजार समोर टाकले. त्याला घेऊन आत गेले. माझी एक पद्धत आहे. मर्द तोंड जवळ आणतो तेव्हा मी नांव विचारतेच. त्याने त्याचे नांव ताहिर शाहिस्तेखान इनामदार सांगितले.
सेंटरमध्ये लाथ घालून आणि त्याचे सात हजार त्याच्या थोबाडावर फेकून हाकलून दिले भडव्याला!
मग ठरवले. मर्द कोणाचा नसतो. कोणाचाही कोणीही नसतो.
आणि मग मी ठरवले. आजवर पब्लिकनी आपल्याला ठेवले. आता आपण मर्द ठेवायचा.
मी ठेवलेला पहिला आणि शेवटचा मर्द म्हणजे हा मयत इसम कवल हिरवे! माझ्यापेक्षा वीस वर्षांनी लहान!
तो माझी साडी चोळी धुवायचा. भाकरी भाजायचा. त्याला मी घरात राहण्याचा पगार द्यायचे. गावाला वाटायचे तो फार पैसेवाला असावा. नाहीतर माझ्याकडे कसा राहील? पैसेवाली होते मी! त्याला कामधंदा नव्हता. शिक्षण नव्हते. कांबीसारखा होता, माझ्या नजरेत भरला. मी विचारले. हो म्हणाला. यडझवा होता. त्याला त्यातच आनंद वाटायचा. मनगटात जोर होता, पण तो जोर तो माझे पाय चोळायला वापरायचा. एका बैठकीत चार भाकरी उडवायचा. पण स्वतःच भाजलेल्या! मी ऐष करत होते. वीस वर्षांनी धाकटा मर्द! रोज रात्री खेळवायचा. सकाळी कामाला लावायचा. शब्दाबाहेर नाही. तोंडच उघडायचा नाही. त्याचा आवाज ओळखायला सांगाल तर ओळखता यायचा नाही मला आजही.
आणि तोही उलटला. एके रात्री हक्काने आत आला. शेजारी निजून म्हणाला काल लै मजा आली. पुढे म्हणाला आडवी हो. मी डोळे मोठे केले. त्याने डोळे मिचकावले. मी जा म्हणून सांगितले. त्याने जायच्याऐवजी आतून दार बंद केले. मी हातात फावडे घेतले. त्याने ते लाथेने उडवले. ठेवलेल्या मर्दाचीसुद्धा भीती वाटण्याइतकी कमकुवत होते मी, हे मला तेव्हा लक्षात आले. तो अंगावर आला. विरोध करण्यात अर्थ नव्हता. तो तरुण होता. ताकदीचा होता. त्याला जे पाहिजे ते द्यावे लागले. पण तो बाजूला जाऊन पडला.
हे त्या दिवशी झाले. मग ते वारंवार होऊ लागले. मग तेच एक कारण बनून राहिले आम्ही एकत्र असण्याचे! मग माझी ताकद कमी पडू लागली. हे त्याने ओळखले तसे मग कामेधामे सोडून तो मला खेळवण्याच्या नादाला लागला. अचानकच त्याला त्याच्या सामर्थ्याची जाणीव झाल्यासारखे झाले. माझे हुकूम उडवून लावणे, हसण्यावारी नेणे, असे सुरू झाले. पैसे तर हवे होते, पण सत्ताही हवी होती.
नको नको झाले. मला वाटू लागले की औरत मर्दाला ठेवू शकत नसावी. पण जर औरत मर्दाला जन्माला घालते, जर औरत मर्दाला ठेवू शकत नसते, ...... तर औरत मर्दाला सहन तरी का करते?
त्याही रात्री तो तेच सगळे करून शेजारी आडवा झाला. तशी मी त्याच्याकडे अंधारातच बघत राहिले. त्याच्या घोरण्याचा आवाज वाढला तशी हळूच उठले. चुलीपासचा पाटा उचलला. त्याच्या डोक्यात घातला. पुन्हा उचलला. पुन्हा डोक्यात घातला. पुन्हा उचलला. पुन्हा घातला. सहा वेळा पाटा त्याच्या डोक्यात घातला.
त्याचा मर्डर केला मी!
कायदा देईल ती शिक्षा मंजूर आहे मला.
माझ्यावर झालेल्या अन्यायाचा हिसाबकिताब कायद्याने बघावा अशी भीक मागणारच नाही मी! कारण हा छक्क्यांचा कायदा आहे. छक्क्यांनी औरतजातीविरुद्ध बनवलेला कायदा! छक्क्यांकडे भीक मागण्याची औरतची वेळ नाही आली अजून!
ला इलाह इल्लिलाह मुहम्मददुर्रसलिल्लाह
============================
-'बेफिकीर'!
लेखन शैलि मस्त ... पन कथा
लेखन शैलि मस्त ... पन कथा कम्कुवत आहे ...
वर्नन मस्त केले आहे...
मस्त
मस्त
काटा आला अंगावर
काटा आला अंगावर
आणकी एक छान आणि धाडसी
आणकी एक छान आणि धाडसी स्त्रीचे रूप लेखन स्वरुपात मांडले ........ अप्रतिम कथा आहे .
हतबलतेतून निर्माण होणारी एका
हतबलतेतून निर्माण होणारी एका स्त्रीची मानसिकता खूप वास्तविक स्वरुपात शब्द्दबद्द केली आहे .
जबरदस्त
जबरदस्त
खतरनाक हो
खतरनाक हो
बेफिकीर, पराकोटीचं शोषण
बेफिकीर,
पराकोटीचं शोषण झाल्याशिवाय कोणी स्त्री पुरुषाचा खून करेलसं वाटंत नाही. झीनतवरील अन्यायाचं चित्रण अधिक उठावदार हवं होतं.
तिने शेवटी केलेल्या विधानाशी सहमत :
>> कारण हा छक्क्यांचा कायदा आहे.
मात्र तो मुद्दामून बायकांच्या विरुद्ध कट केल्यासारखा बनवलाय हे अमान्य. अर्थात, माझे मध्यमवर्गीय सुरक्षित वातावरणात तयार झालेले मापदंड झीनतच्या पचनी पडतील अशी अपेक्षा नाहीच!
आ.न.,
-गा.पै.
पराकोटीचं शोषण झाल्याशिवाय
पराकोटीचं शोषण झाल्याशिवाय कोणी स्त्री पुरुषाचा खून करेलसं वाटंत नाही....>>>>>> का नाही करणार पुरुषप्रधान संस्कृतीची बळी पडलेली स्त्री रागाच्या भरात हेच करू शकते .....
गा मा, >>>पराकोटीचं शोषण
गा मा,
>>>पराकोटीचं शोषण झाल्याशिवाय कोणी स्त्री पुरुषाचा खून करेलसं वाटंत नाही. झीनतवरील अन्यायाचं चित्रण अधिक उठावदार हवं होतं. <<<
मला वाटते झीनतवर झालेला अन्याय पराकोटीचाच आहे. म्हणजे ह्यापेक्षाही अधिक अन्याय स्त्रीवर जगात होत असतो, पण हा कथेतील अन्याय खुनाचा गुन्हा करण्यास अपुरा वाटू नये.
>>>मात्र तो मुद्दामून बायकांच्या विरुद्ध कट केल्यासारखा बनवलाय हे अमान्य. अर्थात, माझे मध्यमवर्गीय सुरक्षित वातावरणात तयार झालेले मापदंड झीनतच्या पचनी पडतील अशी अपेक्षा नाहीच!<<<
माझी कथालेखनाची प्रक्रिया काँप्लेक्स असून ती स्पष्ट करण्यास बरीच जागा वापरावी लागेल. तेव्हा त्या कल्पनेला किनारा देऊन एकच विधान नोंदवतो की 'सुरुवातीपासून अनेक कायदे मुद्दाम कट केल्याप्रमाणे स्त्रियांच्या विरुद्ध करण्यात आलेले आहेत' अशी माझी समजूत आहे.
तरीसुद्धा, तुमच्या प्रतिसादातील विचारांचा संपूर्ण आदर आहे. ह्या आधी काही वेळा माझ्या कथा-कवितांवरील तुमचे प्रतिसाद विचारांत पाडणारे होते हे येथे स्मरते.
तुमचे व सर्व प्रतिसाददात्यांचे आभार मानतो.
-'बेफिकीर'!
बेफिकीर, १. >> 'सुरुवातीपासून
बेफिकीर,
१.
>> 'सुरुवातीपासून अनेक कायदे मुद्दाम कट केल्याप्रमाणे स्त्रियांच्या विरुद्ध करण्यात आलेले आहेत' अशी माझी समजूत
>> आहे.
तुम्हाला इथे कायदे या शब्दात भारतीय दंडविधान अभिप्रेत आहे का? की सामाजिक चालीरीती? का दोन्ही?
२.
>> मला वाटते झीनतवर झालेला अन्याय पराकोटीचाच आहे. म्हणजे ह्यापेक्षाही अधिक अन्याय स्त्रीवर जगात होत
>> असतो, पण हा कथेतील अन्याय खुनाचा गुन्हा करण्यास अपुरा वाटू नये.
तसं असेल तर माझ्या मते झीनत स्वत:वरच सूड उगवतेय. कवल केवळ निमित्तमात्र आहे.
आ.न.,
-गा.पै.
तुम्हाला इथे कायदे या शब्दात
तुम्हाला इथे कायदे या शब्दात भारतीय दंडविधान अभिप्रेत आहे का? की सामाजिक चालीरीती? का दोन्ही?<<<
दोन्ही!
>>>तसं असेल तर झीनत स्वतःवरच सूड उगवतीय<<<
कसे काय?
बेफी, कथा एकदम अंगावर आली.
बेफी,
कथा एकदम अंगावर आली. काल वाचल्यावर कितीतरी वेळ सुन्न बसून होते.
>>पराकोटीचं शोषण झाल्याशिवाय कोणी स्त्री पुरुषाचा खून करेलसं वाटंत नाही. झीनतवरील अन्यायाचं चित्रण अधिक उठावदार हवं होतं.>>
झीनतवर झालेल्या अन्यायाचे चित्रण खरे तर फार परीणामकारक झाले आहे. सुरवातीला ती मोठी मुलगी म्हणून आईवर रोज होणारा अत्याचार उघड्या डोळ्यानी पाहाते. यात तिच्यावर रोज मानसिक अत्याचार होतो. नंतर आईचे छत्र हरपल्यावर शारीरिक अत्याचार होत रहातो. या सगळ्यातून जगायचा ती तिच्या परीने प्रयत्नही करते पण एका टोकाच्या क्षणी धाकटा भाऊच गिर्हाइक म्हणून समोर आल्यावर ...
अब्युझ सोसलेली व्यक्ती पुढे स्वतःही अब्युझर होण्याची शक्यता असते असे शास्त्र सांगते. पुरुष ठेवण्याचा झिनतचा प्रवास त्याच मार्गावरचा. पण जेव्हा तिथेही तिची हार होते तेव्हा ती खून करते. जगाच्या दृष्टीने खून पण तिच्या साठी प्रतिकाराचा एकमेव मार्ग, सुटकेसाठी केलेली धडपड.
धन्यवाद स्वाती२! तुम्ही
धन्यवाद स्वाती२!
तुम्ही कथानकातील ठळक टप्पे चांगले मांडलेत.
>>>सुन्न होऊन<<<
होय! कथा लिहिताना मी एका झटक्यात लिहिली आणि वाचली तेव्हा मलाही तसेच झाले. हा आत्मस्तुतीचा स्वार्थी प्रयत्न नसून जे झाले ते सांगत आहे. एका माबोकरणीचा मला त्याचवेळी मेसेजही आला की कथा अंगावर आली व काय प्रतिसाद द्यावा ते समजत नाही आहे. पण ह्या कथेचे श्रेय मी घेण्यात अर्थ नाही. हे खरेच घडत आहे आणि गेल्या काही महिन्यांत मी करत असलेल्या भ्रमंतीतून कसली कसली उदाहरणे बघायला मिळाली आहेत ते लिहायचे झाले तर अवघड होईल.
धन्यवाद!
स्वाती २ यांच्या प्रतिसादाशी
स्वाती २ यांच्या प्रतिसादाशी पूर्णता सहमत !
काल रात्री ही कथा वाचली आणि अत्ता इकडे फिरकायच धारिष्ट्य एकवटू शकले, पाशरहित आयुष्याच वैफल्य असे परकोटीचे टोकाचे निर्णय घ्यायला उद्युक्त करत असावेत. कथा खरोखर अंगावर येतेय.
धन्यवाद सुप्रिया! तुम्हा
धन्यवाद सुप्रिया!
तुम्हा सर्वांचे प्रतिसाद मी 'कथा प्रभावीपणे शब्दबद्ध झाली आहे' ह्या अर्थाने घेतो. कारण कथा चांगली तर म्हणता येणारच नाही.
'म्हसळा हे गाव असलेला
'म्हसळा हे गाव असलेला तालुकाही म्हसळाच आहे' ही दुरुस्ती सुचवल्याबद्दल स्वाती २ ह्यांचे आभार!
बेफिकीर, >> >>>तसं असेल तर
बेफिकीर,
>> >>>तसं असेल तर झीनत स्वतःवरच सूड उगवतीय<<<
>> कसे काय?
उशीरा टाकलेल्या प्रतिसादाबद्दल क्षमस्व.
या कथेचा आकृतिबंध परिचित वाटत होता. खूप शोधलं तेव्हा तुमची बीना ही कथा आठवली. त्यातल्या राज या नायकासारखी झीनत वाटते.
मनाजोगतं दान पडलं नाही म्हणून पट उधळून लावणार्या लहान मुलासारखा वाटतो राज मला. झीनतच्या आयुष्यातही कुठलंच दान मनाजोगतं पडलं नाहीये. तिथे राजने स्वत:ची हानी करून घेतलेली दिसते. पण प्रत्यक्षात तो बीना वर सूड उगवू पाहतोय. इथे झीनतने कंवलचा जीव घेतलाय, मात्र तो वैफल्यग्रस्त होऊन स्वत:च्या आयुष्यावर उगवलेला सूड तर नाहीना?
बीना कविता जगंत नाही हे कळूनही राज तिला सेल्फिश म्हणतो. हा निरर्थक आरोप आहे. तशीच झीनत कंवलच्या बाबतीत निरर्थक पावलं उचलीत आहे असं वाटतंय. तो जर इतका अन्यायी आहे तर त्याला जवळ ठेवलंच कशाला? ती कधीही त्याला जा म्हणू शकत होती. पण ती आशेवर तगून राहिली. आणि शेवटी असह्य झाल्याने कुणावर तरी सूड उगवायचा म्हणून कंवलला ठार मारलं. पण प्रत्यक्षात तिने स्वत: केलेल्या चुकीची (= कंवलवर अति विश्वास टाकण्याची) स्वत:लाच शिक्षा दिली आहे.
राजच्या मनात जो संघर्ष चालला होता त्यासंबंधी मार्गदर्शन करणारा/री कोणीच न मिळाल्याने त्याने टोकाचं पाऊल उचललं. इथे झीनतही नेमक्या मार्गदर्शनाच्या अभावी गोंधळलेली आणि चिडलेली आहे. याअर्थी झीनत राजसारखी दुर्दैवी आहे.
राज आणि झीनत यांच्या पार्श्वभूम्या पार भिन्न असूनही ते एकाच प्रकारच्या चक्रव्यूहात सापडतात. ही बाब मोठी उल्लेखनीय आहे. मला वाटतं की हे एक प्रतिभेचं लक्षण आहे.
आ.न.,
-गा.पै.
बेफिकीर.... आता वाचली तुमची
बेफिकीर.... आता वाचली तुमची कथा...खूपच सुंदररित्या मांडली आहे ...
Eka purush Pradhan Sanskriti
Eka purush Pradhan Sanskriti madhe ase atyachar hotat he nehmi aikto pahayo pan Katha wachtana waatla ki ashya anek bahini astil jya roj yatun jatat ani tyana kiti yaatna hot asawya he aapan samjane kathin Karan me eka aaya Ghari rahili jithe mulga mulgi bhed nawta ,khup shikwala aai Baba Ni ani nawra hi titkach changla. Job ghar donhi Karun self respect japnarya aaplya ya Jagat ashya bahini kadhi Samil honar kunas thauk.
कथा अंगावर आली. By the way
कथा अंगावर आली. By the way 'सनमचे' पुढे काय झाले?
मस्त
मस्त