मागील भाग -
प्रिटी वूमन - भाग १
ठाण्यातील लोकमान्य नगर वस्ती म्हणजे अरुंद रस्ते, त्याहूनही अरुंद गल्ल्या. जागा मिळेल तिथे उभारलेल्या इमारती. दिवसभर माणसांची आणि वाहनांची वर्दळ. गडबड, गोंधळ, गोंगाट आणि कलकलाट!
तिथल्याच एका कळकट आणि कळाहीन इमारतीतील तिसर्या मजल्यावरच्या एका खोलीत मर्जिना टी व्ही पाहत होती. रात्रीचे दहा वाजून गेले होते. घरात एकटीच होती. तशी या वेळेस ती घरात एकटीच असते. नजमा संध्याकाळी सात वाजता ऑफीसला जाते ती दुसर्या दिवशी सकाळी साडेसहा-सातला परत येते.
सगळे चॅनल फिरवून फिरवून कंटाळा आल्यावर मर्जिनाने टी व्ही बंद केला आणि खिडकीजवळ आली. खाली दोन माणसे मराठीत भांडत होती. तिला इथे येऊन आता वर्ष होऊन गेले होते. दिवसभर बिल्डिंगमधील इतर मुला-मुलींत वावरल्यामुळे तिला आता हिंदी-मराठीची चांगलीच सवय झाली होती. बोलता जरी व्यवस्थित आले नाही तरी!
भांडण बघण्याचाही कंटाळा आल्यावर ती किचनमध्ये आली. मावशीने जाताना तिच्यासाठी वाढून ठेवलेले ताट तिने ओढले आणि जेवू लागली. डाळ, भात आणि कसलीशी भाजी. "माछ" शिवाय भाजी खाण्याचीदेखील तिला आता सवय झाली होती. गावीं भाजी कुठलीही असो, त्यात मासे हवेतच! त्याशिवाय कसली भाजी? तशी नजमा अधून-मधून रोहू, हिल्सा वगैरे आणी. त्यादिवशी मर्जिनाला जेवण दोन घास जास्तच जाई!
जेवण झाल्यावर ती पुन्हा खिडकीपाशी आली. खिडकीत मावशीचा ऑफीसचा एक ड्रेस होता. तिने हळूच त्याचा वास घेतला. ड्रेसचा सिगरेटचा वास आता पूर्ण गेला होता. त्या घागरा-चोळीची व्यवस्थित घडी करून तिने कपाटात ठेवली. कपाटात किमान चाळीस्-पन्नास तरी तसले जोड होते.
मर्जिना नेहेमी विचार करी. टीव्ही वरील सिरीयलमध्येदेखील माणसे ऑफीसला जात पण नजमा मावशीचे सगळे वेगळेच! संध्याकाळी सातला ती निघे ते पंजाबी सूट घालून आणि सकाळी परत येई तेदेखील सूट घालूनच. ऑफीसचे ड्रेस ती कॅरी बॅग मधून वेगळे घेऊन जाई आणि परत आल्यावर खिडकीत वाळत टाकी - सिगरेटच्या वास घालविण्यासाठी! तिचा एक मेकअपचा बॉक्सही आहे. क्रीम, पावडर, काजळ, नेलपॉलीश, मस्कारा, आय्-लायनर आणि शिवाय रंगीत कॉन्टॅक्ट लेन्सेस. पर्फ्युम्स वेगळेच! तेही ती घेऊन जाई.
शिवाय मावशीचे ऑफिसमधील नावही काही वेगळेच! तिच्या मैत्रीणी कधीकधी घरी येत तेव्हा तिला हाक मारीत. काय बरं ते नाव? मर्जिना आठवू लागली. हां, आठवलं - डॉली !!
*******
नजमा आणि मर्जिना झपाझप पोस्ट ऑफीसकडे निघाल्या होत्या. कालच गावाहून निरोप आला होता की फातिमाच्या नवर्याला दवाखान्यात दाखल केले आहे. त्याच्या उपचारासाठी आणि इतर घरखर्चासाठी कुलसूमला पैशाची गरज होती. मनि ऑर्डरच्या खिडकीसमोरील रांगेत त्या दोघी उभ्या राहिल्या. घरचा आणि गावचा पत्ता इंग्रजीत लिहिलेला एक कागद नजमा कायम जवळ बाळगीत असे. नंबर आल्यावर खिडकीमधील माणसासमोर तो कागद सरकवून म्हणाली, "दस हजार".
दहा हजार रुपये पाठविल्याची रिसिट पर्समध्ये ठेवून त्या शेजारीच असलेल्या एस्.टी.डी बूथम्ध्ये गेल्या - गावीं फोन करण्यासाठी.
हे नेहेमीचेच झाले होते. नजमा महिन्याकाठी पाच-सात हजार रुपये पाठवीच. अधून-मधून असे निरोप येत तेव्हा आणखी पाठवी ते वेगळेच!
*******
संध्याकाळ झाली होती. कसलासा ड्राय डे असल्यामुळे नजमाला आज कामावर जायचे नव्ह्ते म्हणून ती अशीच पलंगावर पडली होती. अनुराला जाऊन आता चार वर्षे होऊन गेली होती. मर्जिना किचनमध्ये स्वयंपाकाचे काही बघत होती. जेवण बनवून झाल्यावर ती बाहेर आली. घामट तोंडावर थंडगार पाण्याचे हबके मारून ती जरा फ्रेश झाली. नजमाचा मेकअप बॉक्स तिथे टेबलावरच होता. मर्जिनाच्या डोक्यात काय आले कोण जाणे पण तिने तो उघडला आणि तोंडावर थापू लागली. जमेल तसे - वेडेवाकडे.
"मर्जिना, तुमि की कोरो?", नजमा ओरडली तशी दचकून मर्जिनाच्या हातातील काजळाच्या डबीतील काजळ तिच्या गालावर उमटले. तिचा तो अवतार बघून नजमाला हसू आवरेना.
"मर्जिना, काजल काजल ...".
हसता हसता अचानक ती थांबली आणि मर्जिनाकडे निरखून पाहू लागली. अजूनही तोंडाने ती पुटपुटतच होती, "काजल, काजल.."
******* ******* *******
काजल-----काजल
काजल-----काजल----------
डॉली सारखी काजल?
--------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......
पुढिल भाग
पुढिल भाग कधि? .....लेखन आवडले.
सुनील, छान
सुनील, छान लिहिताय. विषय वेगळा आहे आणि तुमची शैली सुरेखच आहे...
आता तक्रारीला एकच जागा - पुढल्या भागांना इतका वेळ का?
पुढल्या भागाची वाट बघते.