ह्या कथेची कल्पना माझी नाही. औरंगाबादच्या एक मायबोलीकरीण आहेत ज्यांनी मला ही कल्पना देऊन त्यावर कथा लिहिण्याची विनंती केली. त्यांनी परवानगी दिल्यास त्यांचे नांव नक्की प्रसिद्ध करेन. त्या असे म्हणाल्या की ही कथा त्या लिहिणार होत्या, पण मी लिहावी असे त्यांना वाटले. त्यांना कथेचा शेवटही सुचत नव्हता व तोही त्यांनी मलाच लिहायला सांगितला. मी आनंदाने हा प्रस्ताव स्वीकारला. स्त्रीमनाशी निगडीत असलेली ही कथा आपल्याला आवडली तर प्रतिसादामार्फत त्या मायबोलीकरणीला अवश्य आपला अभिप्राय कळवा. माझे श्रेय फक्त कथाबीज फुलवून ते शब्दांकित करण्याइतकंच!
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
==============================
रुग्णाचे नांव - नयना कदम
नयनाताई हातातील त्या रिपोर्टकडे बराच वेळ खिन्नपणे पाहात होत्या. एक साधा कागद आणि तो जवळ ठेवून घेतलेली ऑन्कॉलॉजिस्टची भेट! त्या एका भेटीत सगळे विश्वच उलटेपालटे झाले होते. आपल्या मुलाबरोबर, सुहासबरोबर घरातून डॉक्टरांकडे जाताना नयनाताईंनी देवाला नमस्कार केला होता. प्रार्थना केली होती की रिपोर्टमध्ये काही भलतेच निघू नये. मुळात आपल्याला रोग झालेला आहे हे त्यांना गेल्या चार महिन्यांपासूनच माहीत होते. पण आजकाल अनेक लोक ह्या रोगावर विजय मिळवून जिवंत असतात हेही त्यांनी पाहिलेले होते. पण गेल्या आठवड्यात जरा गुदमरल्यासारखे वाटू लागले. दोन दिवस अॅडमीट करण्यात आले. मग घरी सोडण्यात आले. मग पुन्हा जरा त्रास झाला म्हणून स्कॅन करायला सांगण्यात आले. त्याच स्कॅनिंगचा रिपोर्ट घेऊन नयनाताई आपल्या मुलाबरोबर डॉक्टरांकडे जाऊन आल्या होत्या.
ऑन्कॉलॉजिस्ट तसे मध्यमवयीन होते. नयनाताईंना मावशी, मावशी म्हणत होते. नावाजलेले डॉक्टर होते ते! त्यांनी केवळ तीन चार मिनिटांत स्कॅन्स आणि रिपोर्ट पाहिला आणि सुहासकडे पाहात म्हणाले.
"हम्म्म्म! सो? इट्स स्प्रेडिंग फास्ट!"
सुहासने क्षणार्धात चेहर्यावरील निराशा लपवल्याचे नयनाताईंच्य अनजरेतून त्या वयातही सुटले नाही.
सुहासने विचारले.
"आता...पुढची ट्रीटमेंट काय करावी लागेल?"
"पाहू, अजून दोन केमो आहेत त्या करून घेऊ!"
संवादांचा सूर एकुण विशेष उत्साहवर्धक नाही आहे हे स्पष्टपणे कळू लागताच नयनाताईंनि संवादात सहभाग घ्यायचा निर्णय घेतला आणि त्यांनी डॉक्टरांना थेट प्रश्न विचारला.
"डॉक्टर? किती दिवस आहेत हातात?"
सुहासच म्हणाला.
"अगं काहीतरी काय बोलतेस आई? ट्रीटमेंट चालू आहे ना?"
"असूदेत! सांगा ना डॉक्टर?"
डॉक्टरांनी धीर देणारे स्मितहास्य चेहर्यावर आणून उत्तर दिले.
"हे कोणी कोणाला सांगू शकतो का मावशी?"
"तरी? अंदाज?"
आता सुहासलाही उत्तर ऐकावेसे वाटू लागले होते कारण प्रश्न तर दोनदा विचारून झाला होता. आता उत्तर न ऐकणे हेच चुकीचे ठरणार होते.
"कितीही वेळ असला तरी माणसाला तो कमीच असतो मावशी! तीन चार महिने तर तुम्ही मरायचा विचारही करू नका! चांगली दणकून ट्रीटमेंट चालू आहे. मनस्थिती जितकी उत्तम ठेवाल तितक्या लवकर ह्यातून सुटाल! आणि विश्वास ठेवा, जे सर्व्हायव्हर्स आम्ही पाहतो ना? ते औषधांपेक्षाही आणि ट्रीटमेंटपेक्षाही विजयी मनोवृत्तीने त्यातून सुटून आयुष्य जगत असतात. एक लक्षात ठेवा, मृत्यू कधी येणार ह्याचा विचार करत जगण्यापेक्षा काय काय करून पाहता येईल ह्याचा विचार करत जगावे. ज्यांच्यावर आजवर राग धरला होतात त्यांना मनापासून माफ करून टाका. मन शांत होईल. ज्यांच्याबरोबर आयुष्यातला उत्तम काळ घालवला आहेत त्यांना अधिक प्रेम द्यायचा प्रयत्न करा, तेही तुम्हाला प्रेम देतील आणि तुमचे मन आपोआप प्रसन्न होईल. मृत्यू ही अजिबात घाबरण्याची बाब नाही मावशी, ती फक्त स्वीकारण्याची किंवा लांबवण्याची बाब आहे. अगदी निरोगी माणसासाठीसुद्धा! तेव्हा तुम्ही काय, मी काय आणि हा तुमचा मुलगा काय, आपण सगळे मृत्यूला फक्त लांबवत असतो इतकेच! त्यासाठी ताकद खर्ची घाला, काय?"
नयनाताई मंद हासून आणि नमस्कार करून खुर्चीवरून उठल्या. पुढच्या ट्रीटमेंटची जुजबी चर्चा करून सुहासही उठून बाहेर आला आणि त्याची आणि आईची नजरानजर झाली. सुहासच्या मनात कालवाकालव झाली.
'अरे, ही आपली आई! आपल्याला नऊ महिने पोटात ठेवणारी! नंतर आपल्याला काहीही करता येत नसताना स्वतःच्या उबदार वात्सल्याने लहानाचे मोठे करणारी! आता ती जाणार! हे तिलाही आणि आपल्यालाही समजलेले आहे. आई, अगं नुसते आयुष्याच्या जागी आयुष्य देता येत असते ना तर तुझा रोग मी स्वीकारला असता गं! मला नाही तुला धरून ठेवता येत आहे. प्लीज समजून घे! तुझ्यामुळे मी इथे आहे आणि तुला जावे लागू नये ह्यासाठी पैसा आणि प्रेम ओतण्याव्यतिरिक्त काही करू शकत नाही आहे. आणि ते पुरे पडणार नाही आहे आई! शक्य असते तर तुझा हा कृश हात मी इतका घट्ट धरून ठेवला असता ...... पण आई......"
एका क्षणभराच्या त्या नजरानजरीत जगातील सर्वोत्कृष्ट नात्याने गुंफले गेलेले ते दोन जीव एकमेकांशी काय काय बोलले असतील ते शब्दांत कसे सांगता येईल! असह्य झाला तो एकच क्षण सुहासला! झर्रकन् तिथून पुढे सरकत सुहास वेगाने कारकडे चालत गेला. जाताना दोन्ही डोळ्यांमधून आसवांच्या धारा सरसरत गालावर आल्या. कारचे दार उघडताना आई बघत नाही हे पाहून सुहासने दोन तीव्र हुंदके दिले आणि पटकन् डोळे पुसून गॉगल घातला. नयनाताई हळूहळू चालत शेजारचे दार उघडून गाडीत येऊन बसल्या. सुहासने कार आतून लॉक करून इग्निशन ऑन केले तेव्हा त्याच्या पाठीवर हात ठेवून नयनाताई म्हणाल्या......
"सुहास, आईला कधी स्वतःच्या जाण्याचे दु:ख नसते बाळा, आपले बाळ पोरके होईल ह्याचे दु:ख जास्त असते तिला! माझ्या पश्चात सांभाळून वाग. निलम आणि मुलांकडे लक्ष दे. चल आता घरी"
सुहासने गाडी बंद केली आणि भावना अनावर होऊन तो तसाच आईच्या मांडीकडे झेपावून एकदाच हमसून हमसून रडला. नयनाताई विषण्णपणे त्याच्या केसांतून हात फिरवत राहिल्या.
तो आवेग! एकदा तो आवेग संपला आणि मग सुहास सावरला. त्याने आईकडे बघत स्पष्टपणे सांगितले.
"आई, डॉक्टर जे बोलले त्याचा एकदम परिणाम झाला म्हणून असे झाले. पण असे काही नाहीच आहे मुळात! ते म्हणत आहेत की तीन चार महिने तर विचारसुद्धा करू नका. ह्या तीन चार महिन्यांत आपण जे करायला पाहिजे ते सगळं करू. बघ मी तुला ह्यातून बाहेर काढतो की नाही ते! अगं हे काय असं काही आहे का की ज्याच्यावर काही उत्तरच नाही? चल बिनधास्त हो तू आपली! मी आहे ना?"
नयनाताईंच्या चेहर्यावर प्रसन्न हास्य पसरले. मग सुहासच्याही चेहर्यावर प्रसन्न हास्य पसरले. दोघे घरी आले तेव्हा निलमला रिपोर्ट सांगताना पुन्हा थोडे गांभीर्य निर्माण झाले पण ते सुहासने घालवून टाकले. मग जेवणे वगैरे आटोपून सगळे आपापल्या खोल्यांमध्ये गेले आणि आता नयनाताई हातातल्या त्या कादगाकडे खिन्नपणे पाहात बसल्या होत्या.
मृत्यूची चाहुल लागलेली असल्यामुळे आता सगळेच संदर्भ बदललेले होते. मंडळातल्या बायकांबरोबर ठरवलेल्या सहलींना आता अर्थ उरलेला नव्हता. पुढच्या वर्षी बहिणीच्या मुलीचे लग्न होते तेव्हा आपण कुठले असायला असे वाटू लागलेले होते. त्या लग्नासाठी मनाने घेतलेली उभारी आता संदर्भहीन वाटू लागली होती. रोज सकाळचे फिरणे उत्तम असते म्हणून थंडीतही कंटाळा न करता फिरायला जाण्याचा आता अचानकच कंटाळा आला होता. सुहासने इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेल्या दुसर्या फ्लॅटचा ताबा चार महिन्यांनी मिळणार होता. तिथल्या वास्तूशांतीला सगळ्यांना बोलवण्याचे मनसुबे आता मनातच विरू लागले होते. सगळ्यांना बोलावले आणि बोलावणाराच कार्यक्रमाला नसला तर काय उपयोग!
संथपणे तो कागद ड्रेसिंग टेबलवर ठेवून नयनाताईंनी एकदा बाळासाहेबांच्या फोटोकडे पाहिले. चष्मा काढून त्यांनी तो फोटो नीट निरखला. दहा वर्षांपूर्वीच त्यांच्या पतीचे निधन झालेले होते. तेव्हा संसाराकडे बघून सावरलेल्या नयनाताई आत्ता तो फोटो हातात घेत मनातच म्हणाल्या......
"कसे आहात? मी पण येतीय! मिळालं मला एकदाचं तिकीट! दहा वर्षे रांगेत उभी होते"
खुदकन हसू आले त्यांना स्वतःच्याच विचाराचे! आणि त्या खुदकन आलेल्या 'हसू'च्या पाठोपाठ हा विचारही आला, की क्षणभर आपण एक विनोदी कल्पना केली तिकिटाच्या रांगेची तर अजूनही, ह्या परिस्थितीतही हसू शकलो की? मग रडायचं कशाला? वेळ आली की बघू रडायचं का काय ते! उगाच प्रत्येक क्षणी रडायलाच पाहिजे असे कुठे आहे? उलट आपण अधिकाधिक हसून घेऊयात! आयुष्यात अगदी मनमोकळेपणाने, कोणतीही जबाबदारी किंवा ताण मनावर नसताना हासण्याचे क्षण असे कितीसे येतात? फार दुर्मीळपणे येतात. आता हे तीन चार महिने आपल्यावर काहीच जबाबदारी नाही आहे. आपणच एक जबाबदारी आहोत बाकीच्यांसाठी! मग आपल्यावर जर काही ताणच नाही तर आपण का रडावे? आपण हसत राहू. डॉक्टर म्हणाले तसे ज्यांच्यावर राग धरला त्यांना माफ करून टाकू. ज्यांच्याशी अबोला धरला त्यांच्याशी स्वत:हून बोलायला लागू. ज्यांना आपण दुखावले असेल त्यांची आपण स्वतःहून माफी मागू. हसत राहू. मजेत राहू. जे जे करायचे राहून गेले असेल...... ते सगळे करायचा प्रयत्न करू...... जे जे करायचे राहून गेले असेल...... ते ते सगळे...... सगळे!!!!!!
ह्या शेवटच्या विचारासरशी नयनाताई निमिषार्धातच अतिशय गंभीर झाल्या. आजवर कित्येक वर्षांत त्या इतक्या गंभीर झालेल्या नव्हत्या. आढ्याकडे पाहात त्या पडून राहिल्या. झोप तर आता उडालीच होती. त्या रिपोर्टमुळे जितकी उडाली होती त्यापेक्षाही आत्ताच्या ह्या विचाराने अधिक उडाली होती.
जे जे करायचे राहून गेले......ते ते सगळे?????? अगदी सगळे??????
ते करता येईल? आहे शक्य?
ती इच्छा होऊ शकेल पूर्ण?
जसजसा तो विचार नयनाताईंचे मन व्यापू लागला तसतश्या नयनाताई झोपायच्या ऐवजी अधिकाधिक जाग्याच होऊ लागल्या. त्यांनी उठून पटकन् दिवा लावला. एकदा आरश्यात पाहिले. स्वतःच्या डोळ्यांत डोळे घालून त्या दोन तीन क्षण उभ्या राहिल्या. स्वतःलाच म्हणाल्या......
"तू? तू आत्ता हा विचार केलास? अगं काय बाई आहेस का काय तू? हात टेकले बाई मी तुझ्यापुढे! पण एक सांगू का नयना, आता ते करूनच टाकायचे! एकच आयुष्य आहे ना? मग करूनच टाकायचे"
आरश्यासमोरून दूर होत नयनाताई एका खुर्चीवर बसल्या. आपल्या फुललेल्या श्वासांनी जोरात धपापणार्या छातीवर दोन्ही हात ठेवून त्यांनी काही आवंढे गिळले. इकडे तिकडे पाहून त्या उठल्या. दार उघडून वर जाणार्या जिन्याकडे बघितले. वरच्या, सुहास आणि निलमच्या बेडरूमचा दिवा सुरू असला तरी दार आतून बंद होते. मुलांची बेडरूमही बंद होती आणि मुले झोपलेलीही होती. खालच्या मजल्यावर आता निर्मनुष्य सन्नाटा होता. नयनाताईंनी उरावरचे दडपण झुगारून स्वतःच्या खोलीचे दार आतून अलगद लावले आणि आवाज न करता एक स्टूल ढकलून भिंतीजवळ नेले. पुन्हा एकवार विचार करून त्या स्टूलवर चढल्या. अजून हातपाय चांगले धडधाकट असल्याने त्यांना ते सहज शक्य झाले. माळ्याचा पडदा सरकवून आतल्या अंधारात त्यांनी निरखून पाहिले. कुठेतरी एक बोचके होते. गाठोडे! त्यात पूर्वी नयनाताई उगाच हौस म्हणून कुणासाठीही दुपटी वगैरे शिवायच्या त्याच्या चिंध्या ठेवलेल्या होत्या. बाळासाहेब गेल्यापासून असले छंद बंदच केले होते त्यांनी! मात्र ते गाठोडे त्यांना आत्ता स्पष्टपणे दिसले. कसाबसा हात लांबवून त्यांनी ते गठोडे ओढत ओढत खाली काढले. दम लागल्यामुळे त्या थोडावेळ बसून राहिल्या. नंतर त्यांचा श्वास तीव्रच होत गेला. गाठोड्याच्या गाठी सुटत गेल्या. दशकांची धूळ उडत गेली. गाठोडे सुटले. जणू मेंदूत कित्येक अनावश्यक, मुद्दाम अव्हेरलेल्या आठवणींचे एक गाठोडेच आत्ता बेभानपणे सुटले असावे तसे! आणि एखाद्या अल्लड स्त्रीपमाणे नयनाताईंनी गाठोड्यातील दुपटी, कुंच्या, चिंध्या हातांनी इतस्ततः उडवायला, विखुरायला, उधळायला सुरुवात केली. अंहं! काहीच नाही. असे कसे? असे कसे झाले? बधीर झालेल्या नयनाताईंनी पुन्हा सगळ्या इकडेतिकडे पडलेल्या चिंध्या हाताने उडवल्या. आणि कुठले तरी दुपटे उडवताना एकदम हात थांबला. चरकून थांबला! पापण्या स्तब्ध झाल्या. डोळे रोखले गेले. काय उडवले आपण आत्ता? हे दुपटे उडवायला हातात घेण्यापूर्वी आपण काय उडवले? काय पाहिले? तेच तर होते ना ते? जे शोधायला आपण हे गाठोडे काढले आहे? सर्रकन् मान फिरवून त्यांनी एक नक्षीदार कुंची हातात घेतली आणि तिच्या खालच्या बाजूला चिकटलेला तो......
......तो गुलाबी रुमाल!
रुमालाचा तोच कितीतरी ओळखीचा, परिचयाच, अगदी आपलासा वाटणारा, उबदार स्पर्श!
रुमालाला तोच......'एलिगन्स'चा येणारा पुरुषी सुगंध! कित्येक दशकांपूर्वी जो विरून गेलेला असायला हवा होता......
...... आणि रुमालाच्या एका कोपर्यात एक बदामाचा आकार, त्यातून एक बाण आरपार गेलेला आणि त्या बदामाच्या एका बाजूला 'एन' हे इंग्लिश अक्षर तर दुसर्या बाजूला 'ए' हे इंग्लिश अक्षर!
'एन-ए'!
नयना!
नयना लव्ह्ज अनिल!
अनिल शिर्के!
खणखणीत कांबीसारखे शरीर! गव्हाळ रंग! अत्यंत चमकदार डोळे! उत्तम संस्कारातून झालेले वैचारीक संगोपन! व्यवसायाने प्राध्यापक! घरची बर्यापैकी श्रीमंती! कायम हासरा चेहरा! आणि...... आणि त्याच्या मिठीत घालवलेल्या अनंत भेटी!
दोघांच्या लग्नाआधीच्या!
तो काळ त्या रुमालापेक्षा अधिक गुलाबी होता. चोरून केलेल्या प्रेमाचा स्वाद काही औरच असतो. कॉलेजमधील त्या चुटपुटत्या नजरानजरी! वाढणारी हुरहुर! अचानक झालेली ओळख! उगाच संवाद साधण्यासाठी निर्माण केली जाणारी खोटी कारणे! ती खोटी आहेत हे माहीत असूनही दोघांनी ती खरीच मानण्याचा केलेला प्रयत्न! त्यातून निर्माण होणारे अधिकच गहिरे क्षण! गालांवर फुलणारी लाज! अडखळणारे श्वास! एकमेकांच्या दर्शनाने जीव सुखावणे! दुसरा दिसला नाही तर चुकल्यासारखे वाटणे! एकमेकांची अधिकाधिक माहिती मिळत राहणे! आवडी निवडी समजत राहणे! अभ्यासाच्या कारणास्तव भेटी वाढवणे! मग अभ्यासातले, सगळ्यातलेच लक्ष हळूहळू उडू लागणे! आपण दुसर्याला आवडतो आहोत हे माहीत असूनही ते विचारण्याचे धाडस न होणे! दुसरा आपल्याला आवडत आहे हे माहीत असूनही तसे सांगण्याचे धाडस न होणे! कॉलेजला सुट्टी लागताना अतिशय वाईट वाटणे! आता महिना दिड महिना भेट नाही म्हणून डोळ्यात पाणी येणे! दूर गेलेल्या माणसाचा अगदी ठिपका दिसेपर्यंत जागीच खिळून बघत राहणे! मग एका वेगळ्याच वेदनेतून निघालेल्या सुखात सुट्टी व्यतीत होणे! मग तो दीर्घ विरहकाळ संपून एकदाचे पुन्हा कॉलेजमध्ये दर्शन! मनात उत्साहाच्या, लज्जेच्या, आनंदाच्या असंख्य लाटा! त्यांचे चेहर्यावर उडालेले मनमोहक रंगांचे मिश्रण! डोळ्यांमधून आपसूकच दिली गेलेली ताटातुटीच्या काळातील हुरहुरीची कबूली! त्या कबूलीच्या वेष्टनातच गुंफलेली प्रेमाची कबूलीही आपसूक आणि अनियंत्रीतपणे दिली जाणे! मग पुन्हा तश्याच निमित्ते निर्माण करून सर्वांदेखत घेतलेल्या मिनिटभराच्या भेटी! तोंडातून वाक्य एक बोलणे आणि चेहर्यावरून अर्थ निराळाच सांगणे! एका विशिष्ट अडथळ्यापाशी सगळ्या भावनांची दाटीवाटी येऊन तिच्या वादळात पिसासारखे मन इतस्ततः उडत राहणे! आणि शेवटी कधीतरी न राहवून त्याने तिला विचारणे! 'आपण कायम एकमेकांचे बनू शकतो का?'! हाच तो प्रश्न जो ऐकायला कानाचे प्राण करण्यात गेली दोन वर्षे व्यतीत केलेली असणे! हाच तो प्रश्न जो आजवर हजारो लोकांनी कोणाला ना कोणाला विचारलेला असूनही प्रत्येकासाठी त्यातील ताजगी काही खासच! हाच तो प्रश्न जो कोण विचारणार, कधी विचारणार, कुठे विचारणार आणि विचारणार की नाही हेच माहीत नसणे! हाच तो प्रश्न जो आजवरच्या प्रत्येक क्षणाला विचारता येऊ शकत असूनही आत्ता विचारल्यावर मात्र 'हा प्रश्न काय आत्ता विचारायचा असतो का' असे वाटणे! हाच तो प्रश्न, ज्यावर मनातील प्रत्येक कण अन् कण 'होय' असे उत्तर द्यायला तुडुंब आतुर झालेला असूनही प्रत्यक्षात उत्तरादाखल मात्र मान इतरत्र फिरणे, नजर झुकणे, ओठ थरथरणे, गाल लाल होणे आणि एक अस्पष्ट हुंकार तोंडावाटे बाहेर पडणे! 'हं' असा!
त्यानंतरचा तो अनिर्बंधतेचा काळ! प्रेमातुराणां न भयं न लज्जेचा काळ! सर्वांदेखत खाणाखुणा! पत्रे! भेटी! इतरांना गुपीत समजू लागणे! मैत्रिणींनी केलेली थट्टा! मुलांनी केलेली असूया! कॉलेजला जाते सांगून तिसरीचकडे जाऊन भेटी घेणे! अलगद स्पर्श! हजारो अनोळखी लहरी आणि स्पंदनांचे एकमेकांना क्षणभर भिडणे व कावरेबावरे होणे! कधीतरी एखाद्या क्षणात दडलेला तारुण्याचा स्फोटक साठा अनावर होऊन ओठ एकमेकांत गुंफले जाणे! आजूबाजूचे विश्व अनंत काळासाठी स्तब्ध झाल्यासारखे वाटणे! आवाज कानावर पडूनही ऐकू न येणे! दृष्ये डोळ्यांना दिसूनही त्यांचे अर्थ न झिरपणे! स्पर्श होत असूनही हे शरीर कोणा दुसर्याचे आहे ही संवेदनाच न होणे! समाजाच्या भीतीने डोळ्यांत आलेल्या अश्रूंमध्ये दोन मनांमधील सगळ्या भिंती पार केल्यामुळे आलेले आनंदाश्रू मिसळणे! कोणतेही नियंत्रण नसल्याप्रमाणे प्रश्न विचारला जाणे! 'आपण आता कधीही, कुठल्याही कारणास्तव वेगळे व्हायचे नाही ना?' तो प्रश्न ऐकून भर बागेत मारलेली गच्च मिठी सुटता न सुटणे! एकमेकांच्या कानात 'आय लव्ह यू'च्या कुजबुजीचा अखंड पाझर! आणि शेवटी नयनाने मिठीतच कबूली देणे! 'नाही, कोणत्याही कारणास्तव आता कधीही एकमेकांपासून वेगळे व्हायचे नाही'! मग तसेच एकमेकांच्या उबदार स्पर्शात बसून योजना आखणे! अगदी लग्न कसे करायचे, हनीमून कुठे करायचा, तिथे जायचे कसे, एकमेकांच्या आवडीनिवडी कश्या जपायच्या, राहायचे कुठे, सगळे सगळे!
आणि त्याचक्षणी! त्याचक्षणी अचानकच अनिलने केविलवाणेपणाने व वेदना सहन न होऊन शेजारी कलंडणे! आणि मागे पाहिले तर नयनाचे वडील हातात जाड लाकडी काठी घेऊन तिचा एक प्रहार अनिलवर करून तो कलंडल्यानंतर डोळ्यांत अंगारे घेऊन नयनाकडे बघत ओरडणे......
"नालायक?????? ही थेरं करायला कॉलेजला घातली तुला?"
नयनाची वेणी एका हाताने धरत तिला फरफटत बागेतून बाहेर ओढणे आणि नंतर आपल्याच कुटुंबाची लाज सगळ्यांदेखत जायला नको म्हणून तिला नीट उभी करून चालवत घरी नेणे!
त्या एका रुमालात एक संपूर्ण कहाणी होती. त्या एका रुमालाला बोलता आले असते तर त्याने जगातील सर्वात सुंदर प्रेमकथा रचली असती. तो एक रुमाल, फरफटत नेल्या जाणार्या नयनाकडे वेदनांनी तळमळत पडलेल्या अनिलने कसाबसा फेकला होता. वडिलांची नजर चुकवून तिने तो कसाबसा हातात घेऊन लपवला होता. त्याने त्या दिवशी तिच्यासाठी आणलेली ती भेट, त्याने तिला देऊ केलेल्या भेटींपैकी शेवटची भेट ठरली होती. त्या रुमालात चुंबनांची जादू होती, स्पर्शातील चोरटेपण होते, 'एलिगन्स'चा सुगंध होता, दोघांची आद्याक्षरे होती, भावी मंगलाष्टके होती, सनई होती, सहजीवन कोरलेले होते आणि त्याच रुमालावर ताटातुटीची एक आर्त गझलही होती.
तो रुमाल साडे तीन दशके सगळ्या जगापासून लपवून नयनाताईंनी स्वतःचा निराळा संसार उभा केला होता. सुहासला जन्म दिला होता. त्यानंतर राणीलाही जन्म दिला होता. आता राणी तिच्या सासरी तिच्या लेकराबाळांसह रमलीही होती. सुहासचा संसारही आकाराला आलेला होता. दोन नातवंडे घरात होती. दोन नातवंडे राणीच्या संसारवेलीवर होती. बाळासाहेब तेवढे नव्हते आता!
एक प्रेमकहाणी मनाच्या सगळ्यात अंधार्या, गुप्त कपारीत कैक वर्षे दडवून नयनाताईंनी एक उत्तम संसार उभा करून दाखवला होता. ह्या साडे तीन दशकांमध्ये एक दिवसही असा नसेल जेव्हा अनिलची आठवण आली नव्हती. पण संपर्क करणे तर दूरच, नयनाताईंनी ती आठवणही त्याच कपारीत ढकलून दिलेली होती. एक दिवसही असा नव्हता जेव्हा असे वाटत नव्हते की खरे तर हा संसार मी करणारच नव्हते, पण नयनाताईंनी प्रत्येक क्षणी तोच संसार करण्यात स्वतःला झोकून दिले होते.
अश्रूंच्या साठ्यावर बांधलेल्या कठोरपणाच्या धरणातून पुढे सोडले जाणारे पाणी वापरून ह्या संसाराची जमीन हिरवीगार पिकत होती, प्रत्येक मोसमात!
मागे बघायला वेळच राहिलेला नव्हता. दोन बाळंतपणे, संगोपन, शिक्षण, बदल्या, घरे, स्थलांतरे, मुलांच्या नोकर्या, पतीचा मृत्यू, मुलांची लग्ने, नातवंडे, उतारवयाच्या बसमध्ये एकदाची जागा मिळणे!
कुठल्याकुठे राहिली होती ती बाग जिथे ताटातूट झाली होती. कुठून कुठे येऊन पोचला होता हा रुमाल!
नयनाताईंनी आज कित्येक वर्षंनी तो रुमाल नीट निरखला. नाकाशी नेला. ओठांवरून फिरवला. छातीशी धरला. अजिबात ठरलेले नसतानाही ओठांमधून ते चार शब्द बाहेर पडले. आय लव्ह यू अनिल'! नंतर आसवांच्या दोन शृंखला दोन मिटलेल्या पापण्यांना न जुमानता गालांवर ओघळल्या. नयनाताई रुमाल छातीशीच कवटाळून टेकून आढ्याकडे बघत बसल्या.
अनिल? आज अनिलचीच आठवण का आली? तशी तर सारखीच येत असे. आज इतकी तीव्रपणे का आली? राणीच्या लग्नापर्यंत हा रुमाल आपण कुठेकुठे लपवत असू. राणीच्या लग्नानंतर जो एकदाचा ह्या गाठोड्यात तो रुमाल आपण कोंबला, तो थेट आजच पाहतो आहोत. असे का? आज काय निराळे घडले आहे? बरोबर! वरवर आनंदी भासू पाहणार्या आपल्या वेड्या मनाला आतपर्यंत हादरवणारा, छिन्नविच्छिन्न करणारा एक आघात सोसावा लागला आहे. काही महिन्यांतच आपण ह्या जगाचा निरोप घेणार हा आघात! आयुष्यात ज्यांना खरेखुरे आघात म्हणावे असे दोनच आघात झाले. एक हा आजचा आणि एक ह्या रुमालाच्या वेळेसचा! मग का बरे आठवण येणार नाही तीव्रपणे ह्या रुमालाची? बाळासाहेब गेले तेव्हाही आपण रडलो नव्हतो. तेव्हा मुलांचे अश्रू पुसण्याची जबाबदारी होती म्हणून! आजही आपण रडलो नाहीत. आज का रडलो नाहीत? आपल्यासाठी सुहास रडला, पण आपलीच 'बातमी' ऐकून आपणच रडलो नाहीत. कारण काय? कारण हेच की जो संसार मला करायचाच नव्हता त्या संसारातून लांब जाताना रडायचे कशाला? ठीक आहे मुले माझीच आहेत. पण त्यांच्यासाठी आईने जे जे करायचे असते त्याच्या दिडपट मी केले आहे. गेली दहा वर्षे तर वडीलही मीच झाले आहे त्यांची! त्यांना भरभरून आई मिळाली आहे. बाळासाहेबांना भरभरून बायको मिळाली आहे. माझ्या वडिलांना त्यांचे म्हणणे ऐकणारी आणि त्यांचे नांव बदनाम न होऊ देणारी मुलगी भरभरून मिळाली आहे. चारही नातवंडांना भरभरून आजी मिळाली आहे. मला भरभरून आनंद मिळाला आहे आई होताना, पत्नी होताना, आजी होताना! सगळ्यांना सगळे मिळालेले आहे. सगळे तृप्त आहेत आपल्यासकट! मग आज जर मी म्हणाले की जो संसार करण्याची माझी इच्छा नव्हती आणि जो संसार करायची माझ्यावर जबरदस्ती केली गेली तो संसार संपूर्ण अर्थाने मी पूर्णत्वाला नेला आणि सार्थकीही लावला. मग आता हे म्हणायला काय हरकत आहे की ह्या संसाराच्याही पलीकडे काहीतरी आहे ज्यात माझे मन गुंतलेले होते आणि आजही आहे. मी त्या 'काहीतरी'चा जर काहीही प्रभाव माझ्या घरावर, संसारावर पडू दिला नसेन तर निदान आज सगळ्यातून मोकळे झाल्यानंतर आणि येथे जगण्याचे शेवटचेच काही दिवस राहिलेले असताना मी असे का म्हणू नये की माझ्यातील 'त्या काहीतरी'वर जीव जडवून बसलेल्या नयनाला आता उरलेले क्षण जगूदेत? माझ्यातील जी मी इतरांना हवी होते ती मी त्यांना पस्तीस वर्षे देत आले. मग माझ्यातील जी मी मला हवी होते तिला शेवटचे तीन चार महिने तरी मिळूदेत की?
पण! पण मला जे हवे आहे ते......अनिलला आज का हवे असावे? माझ्या वडिलांनी आम्हा दोघांच्या बाबतीत घेतलेला निर्णय आणि नंतर त्या निर्णयाचे मी प्राणपणाने पालन करणे ह्या पार्श्वभूमीवर मी अशी अपेक्षा कशी करू शकते की आज त्याने माझ्या पालटलेल्या मनाच्या आशाआकांक्षांवर जुन्या काळची अलवार फुंकर घालावी? सगळा त्याग त्याने का करावा? सगळे निर्णय त्याने का मान्य करावेत? आपण मैत्रिणीकरवी त्याल निर्वाणीचा संदेश धाडला होता की माझे लग्न ठरलेले आहे, मला विसरून जा आणि पुन्हा भेटायचा प्रयत्न करू नकोस. हाही निर्णय त्याने पाळला. का पाळला? केवळ आपल्या सुखासाठी? आपण त्याच्यासाठी काय करू शकलो? आपण काहीच करू शकणार्या नव्हतो आणि मुलीला आवाजच नसलेल्या जमान्याचे आपण एक निर्जीव चिन्ह बनून वावरत होतो. तो बरेच काही करू शकत असूनही आपल्या शब्दाखातर एकदा लांब झाला तो झाला. आणि आज आपल्याला तो हवासा वाटत आहे तर त्याने ते मान्य करावे? का?
का करू नये? विरहात मीही तितकीच जळले ना? आणि मी कुठे काय मागत आहे? एक साधी भेट! जुन्या आठवणींना उजाळा! थोडीशी नजरानजर आणि मग कायमचा निरोप! पुनर्जन्म अस्तित्त्वात असेल असे गृहीत धरून पुढच्या जन्मी तरी एकमेकांचे व्हायच्या आणाभाकासुद्धा मूकपणेच घ्यायच्या! मग त्याला तेवढे नाही करता येणार? येईल! आणि तो करेलही! जो स्वाभिमानी आणि दिलदार स्वभावाचा पुरुष प्रेयसीच्या एका शब्दाखातर तिच्यापासून पस्तीस वर्षे दूर राहू शकतो तो तिच्या एका शब्दाखातर तिला भेटायलाही येऊ शकतोच की?
प्रयत्न करायला काय हरकत आहे?
रुमाल आपल्या कुशीत घेऊन नयनाताई झोपी गेल्या अंग अवघडले होते. व्याधी आतमध्ये पसरत आहे असे डॉक्टर म्हणाले होते. पण एक रुमाल आत्ता जालिम औषधासारखा आरामदायी ठरत होता. एक रोग सगळ्या जगाला गिळायला सज्ज झालेला असताना एक रुमाल त्या रोगाचा समूळ नाश करण्याची ऐपत बाळगून होता जणू!
सकाळी नाश्त्याच्या वेळी नयनाताईंनी सुहासला मनातील इच्छा सांगितली.
"मी कॉलेजला असताना एक अनिल शिर्के म्हणून होता सुहास! त्यांचं जे कुलदैवत आहे ना, ते चक्क महाराष्ट्रात नसून जबलपूरला आहे मध्यप्रदेशात! असे कसे ते काही माहीत नाही. पण तिथे जाऊन यायचं राहिलं आहे. तिथे त्याच्या घरचे दर वर्षी जाऊन येत असत. तेवढी एकच इच्छा आहे मनात!"
"जबलपूर? पण जाणार कशी तू?"
"तेच त्या अनिलला विचारायला हवे आहे"
"कुठे राहतात ते अनिल शिर्के?"
नयनाताईंचे मन उदासपणे पण मूकपणे हासले. तो कुठे राहतो हेही माहीत नाही. इतकेच काय, आहे की नाही हेही माहीत नाही.
"तेच शोधायला लागणार आहे. मोठा द्राविडी प्राणायाम आहे बघ! सरस्वती कॉलेजच्या रेकॉर्डमध्ये काही धागादोरा मिळेल. नाहीतर तुज्या आजोळापासून सहा किलोमीटरवर नांदं आहे ना, तिथे त्याच्या वडिलांच घर होतं. तिथे काहीतरी कळेल."
"आई, आता ह्या अश्या परिस्थितीत हे जबलपूर वगैरे कशाला?"
"सुहास, मी एक सांगू का? मला मेडिकल ट्रीटमेंट नको, माझ्यावर खर्च करू नका, माझ्यासाठी तीळ तीळ तुटत बसू नका, फक्त हे एक काम तेवढं करा माझं कोणीतरी मनावर घेऊन! तू किंवा निलम! तेवढ त्या अनिल शिर्केचा पत्ता लावून त्याला त्याचं कुलदैवत कुठे आहे तेवढं विचारून या"
"पण त्याच्या कुलदैवताशी आपला काय संबंध आहे?"
"अरे मी बोललेली आहे त्या देवीला एकदा जाऊन येईन म्हणून"
"कशासाठी?"
"ह्यांच्या आजारपणाच्या वेळी बोलले होते"
नयनाताईंना हे खोटे बोलताना फार वाईट वाटले होते. पण त्याशिवाय सुहासला गांभीर्यच पटले नसते. त्यातच निलम सुहासला म्हणाली.
"जा की रे घेऊन त्यांना! एवढं म्हणतायत तर"
नयनाताईंना एकदम धोका जाणवला, त्या म्हणाल्या......
"छे छे! तुला तिकडे यायची गरजच नाही. अनिल शिर्केचं कुटुंब दर ऑक्टोबरमध्ये तिकडे जातं कसल्याश्या उत्सवाला. पुढच्या महिन्यात जाणार असतील ते सगळे. त्यांच्याबरोबरच मी जाऊन येईन"
"अगं पण ते शिर्के तुला आता ओळखतील तरी का?"
नयनाताईंचं मन पुन्हा विषण्ण हसलं! म्हणालं, बाळा, एकवेळ तू मला विसरशील पण अनिल मला नाही विसरायचा! पण त्या वरवर म्हणाल्या......
"तू फक्त त्या शिर्क्यांचा शोध घे, पुढचं मी बोलते त्यांच्याशी"
सगळी गंमतच होती. आई मुलाला स्वतःच जुना प्रियकर शोधायला सांगत होती आणि सूनही मुलाला भरीस पाडत होती. शेवटी एकदाच शनिवार आला आणि सुहास आणि निलम गाडी काढून मुलांसकट निघाले नांद्याकडे! त्या निमित्ताने आपली वीकएण्ड ट्रिप होईल असे निलमचे म्हणणे पडले. तसेही नयनाताईंचे अजून काही करावे लागत नव्हतेच. त्यांच्याकडे स्वतःच मोबाईलही होता आणि शेजारीपाजारीही एखादा दिवस लक्ष सहज ठेवू शकले असते.
घर सुनेसुने झाले आणि नयनाताईंना अपराधी वाटू लागले. घरात बाळासहेबांचा एक फोटो सोडला तर माणूस दुसरा नव्हता. आपण आपल्या थिल्लर भावनांसाठी आपल्याच मुलाला प्रवासाला धाडावे हे त्यांना मनातच खात होते. सगळे निघून गेल्यानंतर अचानक त्यांना जाणवू लागले की आपण नको ते करत आहोत. पण आता ते मागे घेण्यासारखे नव्हते. काहीश्या खिन्न होत नयनाताई बराच वेळ बसून राहिल्या. शेवटी स्वतःच्या उद्योगात त्यांनी स्वतःला रमवले आणि मनातून सारखा वर येणारा आजाराचा विचार झटकायचा दुबळा प्रयत्न करत राहिल्या. आता तो रुमाल त्यांना एखाद्या वेदनादायक वस्तूसारखा वाटू लागला. आपला मुलगा अनिलला भेटलाच तर अनिलला काय वाटेल? कदाचित तो सुहासशी नीट वागेल पण आपल्याशी संपर्कात येण्याच्या मनस्थितीतच नसेल. त्याला संताप येऊ शकेल. कोण जाणे काय होणार!
सहा, सात तास होऊन गेले तसा नयनाताईंनी सुहासला फोन लावला. सुहासचा फोन लागेना म्हणून निलमला लावला. मग त्यांच्या लक्षात आले की बहुधा नांदेसाईडला अजून कव्हरेजच नसेल. त्यामुळे त्यांची उत्सुकता अधिकच ताणली गेली. देवाचे नांव घेत आणि टीव्ही बघत त्या बसून राहिल्या. हळूहळू त्यांना सुहासचाच राग येऊ लागला. आपल्यासाठीच गेला असला म्हणून काय, स्वतः एखादा फोन नाही का करायचा कुठूनतरी!
रात्रीचे दहा वाजले. नयनाताईंना झोपण्यापूर्वी आठ गोळ्या घ्याव्या लागत असत. लक्षात ठेवून त्यांनी त्या सगळ्या गोळ्या घेतल्या आणि वैतागून झोपायचा प्रयत्न करत राहिल्या. केव्हातरी डोळा लागलाच, औषधांचा परिणाम झाला एकदाचा!
पण सकाळी नेहमीपेक्षा उशीरा जाग आली. बघतात तर चक्क साडे सात! बहुतेक आपण फार मानसिक ताण सहन केल्यामुळे जास्त झोप लागली असावी असे त्यांना वाटले. लगबगीने उठून सहज खिडकीतून बाहेर पाहिले तर कार पार्क केलेली. अँ? हे आलेसुद्धा?
एक तर फोन लागत नाही, त्यात स्वतः फोन करायचा नाही आणि भलत्या घटकेला घरात अवतरून सरळ झोपून जायचे ह्याला काय अर्थ आहे? इथे आपण किती तडफडून वाट पाहतो आहोत?
काहीश्या चिडलेल्या नयनाताई आपल्या खोलीचे दार उघडून तणतणत बाहेर येऊन सुहासच्या बेडरूमकडे, म्हणजे जिन्यातून वर बघत जोरात म्हणाल्या......
"सुहास? अरे कधी आलात तुम्ही? फोन लागत नाही तुमचा, काही कळवत नाहीत. ए सुहास......"
आवाजच नाही. मग त्यांना जाणवले. सुहास आणि निलम मॉर्निंग वॉकला गेलेले असणार आणि मुले झोपलेली असणार! तेवढ्यात काहीतरी जाणवले आणि त्या क्षणत कावर्याबावर्या झाल्या. अरे? तो रुमाल आपल्या पदरातच राहिला की काय? हा ओळखीचा, 'एलिगन्सचा' सुगंध......
विचारात असताना त्या मागे फिरल्या आणि ......
......काळाचे चक्र साडेपस्तीस वर्षे मागे फिरले! एका!...... फक्त एका क्षणात!
डायनिंग टेबलच्या एका खुर्चीवर तो बसला होता.
अनिल!
अर्धेअधिक टक्कल पडलेले, पोट थोडेसे सुटलेले, त्वचा किंचित रापलेली, चष्मा, डोळे तितकेच चमकदार, विलगलेल्या जिवणीतून दिसणारे दातही चमकदार, ग्रे कलरचा कुर्ता आणि नजर आयुष्यभराच्या कालखंडाचा आढावा घेत नयनाच्या नजरेत मिसळलेली!
थिजल्या होत्या नयनाताई! जागच्याजागी! काही शब्दच उरले नव्हते बोलायला. काही बघायलाही उरलेच नव्हते दुसरे! पुतळ्यासारख्या त्या एकटक अनिलकडे बघत राहिल्या.
अनिल उठला. त्याच्या चेहर्यावर एक आश्वासक उबदार स्मितहास्य होते. तो जवळ येऊ लागला तसतसा 'एलिगन्स'चा गंध अधिक गडद होऊ लागला. नयनापासून चार फुटांवर येऊन अनिल मृदू स्वरात म्हणाला......
"आपला मुलगा आणि सूनबाई फिरायला गेलेत. नातवंडं अजून झोपलीयत"
नाही लिहिता येणार त्या क्षणीच्या नयनाताईंच्या भावना!
उभ्या उभ्या कोसळावे तश्या त्या अनिलच्या छातीवर कोसळल्या. बांध फुटले. ज्या धरणातून सोडलेल्या पाण्यावर फक्त हिरवीगार पिके डोलत त्या धरणाच्या मागचे खारे पाणी इतके बेफामपणे धरण फोडून पुढे आले की त्यात त्या पिकांची साडे तीन दशकांची वसाहत नामशेष व्हायला अवघा एक क्षण पुरला. अनिलचा शर्ट नयनाच्या आसवांनी भिजू लागला. केमोथेरपीने कमी झालेले नयनाचे केस अनिलच्या आसवांनी भिजू लागले. जेथे शब्दांनी हात टेकलेले होते, पापण्यांना आतील वादळे सोसलेली नव्हती आणि स्पर्शांना लिंगभेदापलीकडेही एक अस्तित्व असल्याचे जाणवले होते तेथे त्या दोन आसवांच्या नद्यांचा संगम झाला होता. आता कशालाच काहीच अर्थ राहिलेला नव्हता. भोवतीच्या प्रासादतूल्य बंगल्याला, कोवळ्या नातवंडांना, फुललेल्या संसाराला, बंगल्याला वेढणार्या बगीच्याला, शरीराला व्यापणार्या गाठींना, मधल्या साडे तीन दशकांना! कशालाही अर्थ उरला नव्हता. असे वाटत होते की आत्ता बाबा येतील आणि अनिलच्या पाठीत तडाखा हाणतील आणि आपले उरले सुरले केस धरून आपल्याला येथूनही फरफटत नेतील. नयनाचा उजवा हात अनिलच्या पाठीवरून फिरला. अनिल नयनाच्या कानात कुजबुजला.
"ती जखम विरली नाही नयना, फक्त ती मागून पुढे आली आणि हृदयावर ठाण मांडून बसली"
नयनाताईंची जणू शुद्ध हरपू लागली ह्या वाक्याने!
कशावर विश्वास ठेवावा? आपल्याला झालेल्या रोगावर? आपल्या संसारात आपण घेतलेल्या स्वारस्यावर? की अनिलच्या आत्ता येण्यावर? की कशावरच विश्वास न ठेवण्यावर विश्वास ठेवावा?
"तू कसा आलास?"
नयनाच्या तोंडातून तब्बल पाच मिनिटांनी हा एकच प्रश्न बाहेर पडू शकला. तो प्रश्न निरर्थक आहे हे नयनालाही माहीत होते, पण निरर्थकतेला अर्थ देण्यात पस्तीस वर्षे गेल्यामुळे सवय लागली होती निरर्थक बोलण्याची!
"मी गेलोच कुठे होतो? फक्त तुझा संसार वगैरे आटोपल्यावर आणि तू मोकळी झालीस की मग तुला जमेल तेव्हा तुला भेटू असे ठरवले होते मी"
अश्रूंनी ओल्या कच्च झालेल्या गालांवर स्मितहास्य पसरले.
"अजून तसाच बोलतोस?"
"नाही, मधली पस्तीस एक वर्षे मी बोलतच नव्हतो, आज बरेच वर्षांनी काहीतरी बोललो आहे मी"
"तू खरंच आलायस अनिल?"
"सुहास पत्ता शोधत शोधत संध्याकाळी सातला पाटगावला माझ्या घरी येऊन पोचला. नांद्याला त्याला कळले की मी पाटगावला प्रोफेसर झालो. तिथल्या कॉलेजमध्ये आला तर मी निवृत्त झाल्याचे त्याला समजले. तिथून पत्ता घेऊन तो घरी आला. पण मला राहवेना! मी बायकोला म्हणालो, ह्यांना जेवायला वाढ आणि आम्ही आत्ताच निघतो. सगळे बघतच बसले. आपल्या घरी आलेल्या माणसांच्या राहण्याची वगैरे व्यवस्था करायच्या ऐवजी हा गृहस्थ स्वतःच त्यांच्याकडे जायला काय निघत आहे? पण समहाऊ सुहासलाच ते पटले. तो म्हणाला विशेष ड्राईव्ह नाही आहे. नऊ पर्यंत निघालो तर एक वाजता पोहोचू देखील आपण! उद्या मग इतर काहीतरी करता येईल. त्याला तसे वाटण्याचे कारण म्हणजे पाटगावला काहीच नाही आहे. मग मुले कशी रमली असती? पथ्यावर पडले. आम्ही एक नाही, पण सव्वा दोनला पोचलो इथे. तुला पाहायला मी अधीर झालो होतो. पण तुझ्या रोगाबद्दल समजले होते आणि तूही गाढ झोपलेलीच होतीस. मग मी रात्रभर जागाच राहिलो. सुहास आणि निलम वॉकला बाहेर गेल्यावर इथे येऊन बसलो. तुला काय झालं गं नयना? तुला काही नाही होणार आता. आता मी आलेलो आहे."
कसल्या गाठी अन् काय! आपले शरीर पिसासारखे वाटत होते नयनाला! जणू क्षणार्धात रोग पळाला असावा तसे!
आखरी हिचकी तेरे जानूपे आये
मौतभी मै शायराना चाहता हूं
पुन्हा पडलेल्या लाडक्या माणसाच्या गाठीमुळे पोटातल्या गाठी क्षुल्लक वाटू लागल्या.
आणि गेटचा आवाज आला. गेटच्या कडीच्या आवाजाने त्या भेटीत आणलेला व्यत्ययसुद्धा भयंकर वाटला दोघांना! पटकन् डोळे पुसत दोघेही लांब झाले आणि नयनाताईंनी दार उघडले. आईच्या चेहर्यावर स्वच्छ हसू पाहताना सुहासला त्या हासाच्या मागे नुकतेच वाळलेले अश्रू दिसू शकले नाहीत, इतके ते हसू स्वच्छ होते.
निलम पुढे होत म्हणाली.
"आई, काकांना आम्ही घेऊनच आलो. आता तुमची तुम्हीच ठरवा तीर्थयात्रा"
तोंडभर हसून नयनाने सगळ्यांचा चहा ठेवला. चहाच्या आधणाची दोन पातेली पाहून निलमने विचारले.
"हे काय? ह्या लहान पातेल्यात वेगळा चहा का?"
"अनिलला तुळशीची पाने घातलेला चहा आवडतो"
नयनाने मागे न बघताच उत्तर दिले. चाट पडलेली निलम अनिलकडे पाहू लागली. अनिल घाईघाईने म्हणाला.
"तोच विषय चालला होता आमचा तुम्ही येण्याआधी! ती म्हणाली चहा ठेवते, मी म्हणालो घरात तुळशी असली तर तुळशीची पाने घालून कर"
त्यावर निलम गोड हसून म्हणाली.
"तुळस असतेच की प्रत्येक घरात. आई, सगळ्यांच्याच चहात घाला की मग तुळशीची पाने"
रविवार असल्याने आरामात चांगला दिड दिड कप चहा पीत सगळे बराच वेळ गप्पा मारत बसले. हळूहळू गप्पांना रंग चढू लागला आणि नकळतच गप्पांमधून सुहास आणि निलम वेगळे पडू लागले. सगळ्या गप्पा नयनाच्या कॉलेजच्याच! तो हा कुठे असतो रे आता? ती ही कसली भाव खायची ना? त्या ह्याच्याशी संपर्क आहे का?
एकेका वाक्याबरोबर सासूबाईंचा आवाज अधिकाधिकच उत्साही होत चालला आहे आणि अनिलकाका प्रचंड हजरजबाबी आहेत हे बघून निलम आणि सुहास अवाक झाले होते. आपल्या आईची डॉक्टरला भेटल्यानंतरची मनस्थिती काय होती हे ती पूर्णपणे विसरून गेलेली आहे हे पाहून सुहासला अनिल काकांचे येणे म्हणजे शुभयोगच वाटला.
अचानक 'घराच्या घरपणात' सहस्त्रपटींनी वाढ झाली. आपली खोली दाखवताना नयनाने अनिलला तो रुमालही दाखवला. क्षणभर अनिलचे डोळे भरून आले. पण तो लगेच सावरला.
बाहेरच्या खोलीत सुहास आणि निलम एकमेकांकडे पाहातच बसले होते. हा माणूस अर्ध्या रात्री आपल्याबरोबर येतो काय? बाबा गेलेले असतानाही आई त्याच्याशी इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारतात काय? दोघेही अचानक लहान झाल्यासारखे वागतात काय! सगळेच अविश्वसनीय आणि तरीही आनंददायी!
निलमने टाकलेल्या ऑम्लेट्सचा वास वरपर्यंत पोचला तशी मग मुलेही उठून, ब्रश करून खाली आली. नव्या आजोबांनी मग मुलांचा ताबा घेतला. पेशाने प्राध्यापक असूनही आजोबा रुक्ष नव्हते. उलट जो मूड आई बाबांना क्रिएट करणे कधी जमलेच नव्हते तो ह्या आजोबांनी क्रिएट केला. अनिल काका आले हे आईंपेक्षा आपल्या मुलांनाच अधिक आवडले आहे असे निलमला वाटू लागले. त्या आनंदात ती अधिकच मनापासून कामे आवरू लागली. दुपारचे जेवण बाहेर करायचे असे ठरले होते आणि ते जेवण अनिलकाकांतर्फे होते. त्यामुळे सगळेच आणखीनच मजा करू लागले. दुपारी जेवताना तीर्थयात्रेचा विषय निघाला तसा अनिल म्हणाला......
"नयना, मी आणि ही दहा दिवसांनी जबलपूरला जाणारच आहोत. पण त्याआधी ही माहेरी जाऊन येणार आहे. त्यामुळे उलटेपालटे हेलपाटे मारण्यापेक्षा एक काम करू. मी तुला घ्यायला इथे येईन. तू माझ्याबरोबर पाटगावला चल तिथून चाळीसगावला जाऊन आपण ट्रेन पकडू. बघ चालतंय का?"
"पण रिझर्व्हेशन?"
"ते माझ्याकडे लागलं"
"चालेल की मग?"
हा संवाद होईपर्यंत सुहास आणि निलमला काहीच प्रॉब्लेम नव्हता कारण त्या अनिलकाकांबरोबर त्यांच्या कुलदैवताचे दर्शन घ्यायला जायचे हीच तर इच्छा राहिली होती नयनाताईंची! तपशीलवार सगळे ठरवून मग सगळेजण घरी आले. अनिलचा मोबाईल नंबर नयनाने स्टोअर करून ठेवला. संध्याकाळ झाली तसा अनिल निघाला. आता त्याच्या निघण्याचे दु:ख होत नव्हते. त्यालाही आणि नयनालाही!
आयुष्याने अचानक कूस बदलली होती.
एक सत्तावन्न वर्षांची प्रौढा आता नवतरुणीसारखी लाजू लागली होती. मोबाईल खुट्ट वाजला तरी सगळ्यांची नजर चुकवून हळूच बघत होती. अनिलचा मेसेज असला तर वाचून पटकन डिलीट करत होती. मग रात्री कधीतरी स्वतःच एक मेसेज करत होती.
मेसेज तरी काय? जेवलीस का? औषधे घेतलीस का? मी आज कटिंग करून आलो, न्हावी म्हणाला कापण्याइतके केस आहेत कुठे?
मग त्यावर नयनाची उत्तरे! तुला पाहूनच पोट भरले आहे. जेवतीय कसली? बायको काय करतीय? पकडेल आपला एखादा मेसेज! मग विसरशील मला! तुमच्यात उगीच वाद होतील.
मग मेसेजेसनी पुढची पायरी गाठली. तुला बरे अजून आठवते तुळशीच्या पानांचे? मग? तुला नाही का आठवत माझ्यासाठी 'एलिगन्स' वापरायचास ते? अगं त्यावेळी तुझ्या बाबांनी काठी मारली होती, आता तुझा मुलगा मारेल. असा बरा मारेल, चांगला सरळ करीन त्याला!
मग त्यापुढच्या पायरीला प्रेमाचा रंग अधिकाधिक गहिरा होऊ लागला. वयाला शोभणार नाहीत असे वाटण्यासारखे मेसेजेस सुरू झाले.
आणि मग नयनाताई केमोसाठी अॅडमीट झाल्या. त्यादिवशी अनिल पुन्हा येऊन गेला. चक्क! केवढं भरून आलं होतं नयनाला! सेम डे डिसचार्ज मिळाला. पण औषधांचा परिणाम दोन दिवस राहिला. पुन्हा खुटखुटीत झाल्यावर झाली सुरू नयनाची प्रवासाची तयारी! आणि तश्यात अनिलचा मेसेज आला.
'जबलपूरलाच जायचंय ना?'
नयनाने मनाशीच लाजत हसत उत्तर पाठवले.
'नेशील तिथे! तुझी सोबत हेच कुलदैवत'
त्यावर उत्तर आलं!
'हनीमून? सापूतारा?'
'ह्या वयात?'
'का?'
'आपल्या तब्येती काय'
'त्याला काय झालं? मी चांगला व्यायाम सुरू केला आहे चार दिवसांपासून'
'भला मोठा हसण्याचा स्मायली'
'हसतेस काय?'
'आणि काय काय सुरू केलं आहेस?'
'ड्रायव्हिंगची पुन्हा प्रॅक्टिस'
'हम्म्म! आणि?'
'आणि औषधपण आणून ठेवलं आहे'
'कसलं?'
'तेच! ह्या वयातही व्यवस्थित करता यावं म्हणून'
हे वाचून नयना अक्षरशः पलंगावर कोसळून कितीतरी वेळ हसत राहिली. मग तिने उत्तर पाठवले.
'असलं काही करायचं नाहीये. सभ्य वागायचं. आपल्याला नातवंडं आहेत'
'कोणीतरी असभ्यपणे वागल्यामुळेच मुलं आणि नातवंड झालीयत ना दोघांना?'
ते नंतरचं नंतर पाहू, कधी येणारेस?'
'परवा सकाळी दहा वाजता'
'वाट बघतीय. जयश्रीला काय सांगितलंयस?'
'तिला सांगितलंय नाशिकच्या साहित्य संमेलनाला बोलावलं आहे म्हणून'
'मग?'
'मग काय? म्हणाली माझी मामेबहिण तिकडेच आहे, मीही येते'
नयनाताई हे वाचून हिरमुसल्याच. त्यांनी पुन्हा प्रश्न पाठवला.
'मग?'
'मग काय? मी सांगितलं की गाडीत जागा नाही'
'का?'
"म्हणालो वाटेत चार साहित्यिकांना घ्यायचं आहे'
'मग?'
'मग बरं म्हणाली'
'आण ना तिला पण, तुमचा तरी हनीमून होईल'
'नीट बोलायचं नाही आहे का?'
'रागवू नको रे, गंमत केली'
'तयार राहा'
'हम्म्म्म'
'शालू?'
ठेवलाय बॅगेत'
'लाल टिकल्या?'
'घेतल्या आहेत रे बाबा'
'औषधे?'
'घेतली'
'तुझा मुलगा आणि सून काय म्हणतायत?'
'अजूनही जाऊ नकोच म्हणतायत'
'मग?'
'मग काय? मी सांगितलं की इतकीच इच्छा राहिली आहे म्हणून'
'ए नयना, आपण वेड्यासारखे वागतोय ना?'
'ठार वेड्यासारखे'
'हसण्याचा स्मायली'
'त्याहून मोठा स्मायली'
'कोणी पकडलं तर?'
'अब्रूच जाईल'
'मग बरी तयार होतीयस यायला?'
'जी गोष्ट जपून आता काहीच फायदा होणार नाही आहे ती उधळून जर घटकाभर खरे आयुष्य मिळणार असेल तर बिघडले काय?'
'तुझा संसार हेसुद्धा तुझे खरे आयुष्यच आहे नयना'
'मान्य आहे. पण स्त्रीला मनसुद्धा असतं. एवढी एक इच्छा देवाने पूर्ण करावी. आपण शपथ घेतली होती लग्नानंतर सापूतार्याला जायची'
'येस्स! चल, गुड नाईट'
'गुड नाईट'
'आय लव्ह यू'
'आय लव्ह यू टू'
'किती?'
'आधी इतकंच'
'आपला हनीमून किती विनोदी असेल नाही?'
'हो पण हसायचं नाही, एकदम गंभीरपणे करायचं सगळं'
'जे जमेल ते करायचे.'
'श्शी! झोप आता'
'बाय'
'बाय'
'नयना?'
'हं! एकदा पूर्ण नांव मेसेज कर ना तुझं! आपण भेटायचो तेव्हा मातीत लिहायचीस ते'
'नयना अनिल शिर्के'
'सौ.'
'सौ. नयना अनिल शिर्के! झोपू आता?'
'बाय'
'बाय'
मनासारखा माणसाचा मोठा शत्रू नाही आणि मनाइतका माणसाचा चांगला मित्रही नाही. मन खुष झाले तर सगळे जग, सगळे जीवन आनंदी वाटू लागते. नयनाने सगळे मेसेजेस काळजीपूर्वक डिलीट केले. दिवा बंद करायला ती उठली आणि अचानक आरश्यात तिला स्वतःचे प्रतिबिंब दिसले. अर्धवट उरलेले केस, स्थूल देह, रोगाने चिन्हांकित झालेला! ह्या आपण? आणि असे जायचे अनेलबरोबर? क्षणभर काळीकभिन्न निराशा पसरली मनावर! दुसर्याच क्षणी मनाने पुन्हा उचल खाल्ली. व्हायचे ते होवो, तो कुठे काय म्हणतोय? त्याचं अजूनही तितकंच प्रेम आहे. पण त्याची बायको? तिला फसवत आहोत आपण! हे असते तर आपण हनीमूनचा प्रस्ताव मांडू धजलो असतो का अनिलसमोर? इतकंच काय त्याला भेटायची इच्छा का आहे हे तरी सांगू शकलो असतो का? सुहास होता म्हणून हे सगळे जमले. खरे म्हणजे हे नाही आहेत म्हणून हे सगळे जमले. आता हे क्षण घालवायचे नाहीत निराशेत! मला माफ करा हो, तुमच्या पश्चात मी हे असले कृत्य आणि तेही ह्या वयात करायला निघालेले आहे. पण एक सांगू का? मी तुम्ही असताना कधीही तुमच्याशी अप्रामाणिक झाले नाही. जीवापाड प्रेम केले तुमच्यावर आणि मुलांवर! पण आता माझीच जायची वेळ आली आहे. हे एक आयुष्य आहे हो माझ्याकडे! फक्त माझे असे तेवढेच आहे आता! तेही तीन चार महिन्यांचे! कदाचित डॉक्टर धीर देण्यासाठीही तीन चार महिने म्हणाले असतील. कदाचित महिनाभराचेच असेल. तेवढे फक्त मनासारखे जगावे म्हणत आहे, रागवू नका, जिथे कुठे असाल तिथे! ही तुमच्याशी केलेली प्रतारणा नाही आहे. ही अनिलला दिलेल्या शपथा पाळण्याची पराकाष्ठाही नाही आहे. ही फक्त एक धडपड आहे, स्वतःच्या आयुष्यात स्वतःला जे वचन दिले होते ते काही काळ तरी खरे करून दाखवले हे सिद्ध करण्याची! कोणी मला विचारले की तू जगात काही काही जणांना शब्द दिले होतेस. तुझ्या वडिलांना म्हणाली होतीस की अनिलचा विचार करणार नाहीस, तो शब्द पाळलास का? तर माझ्याकडे उत्तर आहे 'हो' असे! पण कोणी जर विचारले की अनिलला आशेला लावून तू स्वतंत्रपणे जगत राहिलीस ते योग्य आहे का? तुझ्यातील सत्यप्रियता कुठे गेली? तर त्याचेही उत्तर 'हो' असे देता यावे म्हणून केलेला प्रयास आहे हा! नका रागवू माझ्यावर!
मग बराच वेळ नयना उशीत तोंड खुपसून आक्रंदत राहिली. तणावाने हतबल झाली होती ती! व्याधीचा तणाव, उपचारांचा तणाव, मृत्यूचा तणाव, प्रतारणेच्या भावनेचा तणाव आणि अनिच्या प्राप्तीचाही तणाव!
पण हळूहळू पुन्हा मनावर सुखाचे विचार शिंपडले गेले. मेसेजेस आठवून हसू यायला लागलं! भिजलेल्या उशीला जो खारट वास येत होता त्यात आता खुदकन् हसण्यचे सुस्कारे मिसळू लागले. कधीतरी झोप लागून गेली.
आणि एकदाचा तो दिवस उजाडला.
पहाटेपासून सुहास आणि निलमची नुसती लगबग सुरू होती. हे घेतलंस का, ते घेतलंस का! काहीही झाले तरी कळव! आम्ही लगेच येऊ. औषधांच्या बाबतीत अजिबात हेळसांड करायची नाही. जास्त दिवस जाऊच नका.
सगळ्यांची नजर चुकवून नयनाने एक खूप जुना हिरवा शालू आणि काही बांगड्या बॅगेत भरल्या. हळूच निलमचे एक लाल टिकल्यांचे पॅकेटही पर्समध्ये दडवले. उगीचच थोडीशी कॉस्मेटिक्स बरोबर घेतली. देव्हार्यासमोर नमस्कार केला. बाळासाहेबां<च्या फोटोसमोर हात जोडताना डोळे भरून आले. पण निग्रहाने तिने त्यांना त्याही अवस्थेत समर्थन दिले मनातल्या मनात! ते तर काही विचारतही नव्हते.
पावणे दहालाच गेटसमोर गाडी उभी! अनिल त्यात एकटाच! ते पाहून सुहास चक्रावला.
"काका? काकू आणि नातवंडं कुठे आहेत?"
"ते थेट पाटगाव स्टेशनला येतायत, आजोळी गेलेले आहेत ना?"
"पण मग? ही कार?"
"कार स्टेशनवर ठेवणार आणि ट्रेनने जाणार!"
"काका नक्की ना?"
"म्हणजे काय? मला काय ह्या वयात इतके ड्रायव्हिंग जमणार आहे?"
कुरबूर करत सुहासने एकदाचे आईचे सगळे सामान डिकीत ठेवले आणि टाटा बायबाय करून गाडी निघाली तेव्हा सुहास आणि निलमला हे माहीत नव्हते की आई त्यांचा मोबाईल फोन मुद्दाम घरी विसरून निघालेल्या आहेत.
कितीतरी वेळ अबोल प्रवास सुरू होता. नाशिकच्या दिशेने! दोघेही गंभीर झाले होते. आयुष्यात प्रथमच त्यांनी आपापल्या घरच्यांना फसवले होते, तेही ह्या कारणासाठी आणि ह्या वयात! पचायला जरा वेळ लागतच होता स्वतःचे कृत्य!
शेवटी अनिलच बोलायला लागला. त्याच्या मुलाचे नांव विक्रम!
"विक्रमने दहावेळा चौकशी केली. म्हणे इतके ड्रायव्हिंग जमणार आहे का? कोण साहित्यीक आहेत? ते कुठे भेटणार आहेत? हिलाही सतराशे साठ प्रश्न! म्हणे इतकी वर्षे ड्रायव्हिंग करत नव्हतात. आता अचानक का कार हवी आहे? ट्रेनने का जात नाही? कोण येणार आहेत बरोबर? हा व्यायाम काय करायला लागला आहात? असे विचित्र का वागताय?"
नयना हसू लागली. तिचे ते हसणे पाहून अनिल खुलला. तोवर दुतर्फा घनदाट झाडे असलेला रस्ता लागला. पावसाळा संपून दोन महिने झाले असले तरी हिरवाई भरपूर होती. धुंद सकाळ होती ती एक! ऑक्टोबर हीट नावाला नव्हती त्या झाडीतल्या रस्त्यावर! हळूहळू ड्राईव्हची नशा पसरू लागली गाडीत! एकमेकांना अस्पष्टसे स्पर्श होऊ लागले. सीडीवर राज कपूर आणि नर्गीसचे आजा सनम लागले आणि नयना अनिलकडे सरकली. अनिलने डाव्या हाताने तिला जवळ घेतले. गाडीचा वेग कमी केला. घाई नव्हतीच. त्यापेक्षा हे क्षण लांबवणे हेच प्राधान्य होते. स्मूथ रस्ता होता. वर्दळ जवळपस अजिबातच नव्हती. सेफ रस्ता होता. मस्त वातावरण होते. मस्त गाणी होती. मस्त सोबत होती. कितना हसीं है मौसम, कितना हसीं सफर है, साथी है खूबसूरत, ये मौसमकोभी खबर है! नयनाने पर्समधून लल टिकली काढून कपाळावर लावली. अनिल म्हणाला......
"मोबाईल आणला असता तर आत्ता तुझा फोटो काढला असता"
"म्हणजे?????? तू पण??????"
"डू नॉट डिस्टर्ब"
दोघेही हसत हसत पुन्हा एकमेकांना बिलगले. वाटेत एक सुंदर मंदिर लागले, अतिशय लहानसे! एक शेंदरी रंगाचा मोठा दगड आणि शेजारी एक काळी देवी उभी! एक घंटा! कोणीतरी कधीतरी वाहिलेली फुले! खोबर्याला मुंग्या लागलेल्या! अनिलने घंटा वाजवली. देवीसमोरच्या अंगार्यात बोट बुडवून नयनाच्या कपाळावर आणि गालावर अंगारा लावला. मग स्वतःच्या! दोघेही एकमेकांच्या मिठीत त्या देवीसमोर तसेच काही क्षण उभे राहिले. सुन्न शांतता आणि दोन प्रेमी जीव! निघवत नव्हते. पण निघावे लागले. पुन्हा मस्त ड्राईव्ह सुरू झाला. एका ठिकाणी चहा प्यायला थांबले. त्या टपरीवाल्या बाईचे घरही लागूनच होते. नयनाशी काही न बोलताच अनिल त्या बाईला थेट म्हणाला......
"ताई, देवदर्शनाला चाललोयत! जरा घाई झाली त्यामुळे आमची मंडळी साधीच साडी नेसून आली, हिरवी साडी नेसूदेत का घरात?"
टपरीवालीला भलताच आनंद झाला. अगदी घरातल्यासारखे वागवत ती नयनाला आत घेऊन गेली. पंधरा मिनिटांनी नयना बाहेर आली तेव्हा अनिल बघतच बसला. नयना सुंदर अजिबातच दिसत नव्हती, पण एक असे स्वप्न साकारले जात होते ज्याला सौंदर्याच्या लौकीक व्याख्यांची चौकट लागूच होत नव्हती. तिथून पुढचा प्रवास अधिकच रोमँटिक झाला.
खूप खूप वेळाने दोघे सापूतार्याला पोचले. नयनाने तेथील एका लँडलाईनवरून आपल्या घरच्या लँडलाईनवरच फोन केला. तिला माहीत होते की तिच्या घरच्या फोनवर कॉलर आय डी दिसत नाही. सुहास भडकलेला होता मोबाईल नेला नाही म्हणून! कुठे आहात विचारले तर म्हणाली ट्रेन भुसावळला थांबलीय, आता जबलपूरहूनच एकदम फोन करेन.
नशीब अनिलने आणि नयनाने सुहास आणि विक्रम ह्या दोघांना एकमेकांच्या संपर्कात येऊ दिले नव्हते. नाहीतर खेळ खलासच झाला असता. विक्रम किंवा अनिलची पत्नी जयश्री विशेष काळजी करत नव्हते. बाबा मोबाईल विसरले ह्यात त्यांना काहीच वाटले नव्हते कारण अनिल विशेष मोबाईल वापरतच नसे. दुसरे म्हणजे तो अनेकदा तीन तीन, चार चार दिवस बाहेर राहात असे मोबाईलशिवाय! त्यामुळे ते शांत होते.
सापूतार्याच्या रिसॉर्टच्या रजिस्टरमध्ये एन्ट्री करताना अनिलने नांवे लिहिली.
अनिल शिर्के आणि सौ. नयना अनिल शिर्के!
रिसॉर्टवाल्याचे लक्ष नाहीसे पाहून नयनाने कितीतरीवेळा त्या नावांवरून आपली बोटे फिरवली.,
दोघे रूममध्ये गेले. रूम प्रशस्त होती. सापूतार्याची हवाही भन्नाट होती.
हनीमूनच्या आवेगाला उधाण आले. प्रत्यक्ष शृंगारीत स्त्रीपेक्षाही शृंगार करतानाची स्त्री अधिक सुंदर भासते तश्या प्रकारचा हनीमून ठरला तो! पण त्यातही अनोखा अंदाज होता. वादळ होते, पाऊस होता, हजारो आठवणींना उजाळे मिळत होते, हजारो निर्जीव स्वप्नांना चैतन्य मिळत होते, हजारो शपथांना आकार प्राप्त होत होता आणि हजारो भावनांना प्रवाही होता येत होते.
हसण्याखिदळण्यातच आवेग शमला! एक मरणाच्या उंबर्यात पोचलेली स्त्री, एक आयुष्याच्या आघातांनी पिचलेला पुरुष! दोघांनीही पन्नाशी केव्हाच पार केलेली! आणि सगळ्या जगाला फसवून, सगळ्या जगाला विसरून आज दोघे साडेपस्तीस वर्षांनी एक झालेले होते.
बर्याच वेळाने अनिलने घरी फोन केला. सगळे ठीक होते. अनिलबद्दल कोणाला विशेष चिंता दिसली नाही. उलट त्याचा फोन आल्याने सगळ्यांची मने शांत झाली. नयना रूममध्ये पुन्हा नटत होती, अनिल पुन्हा तिला छेडत होता. आयुष्याच्या उतारवाटेवर एक अनोखे वळण आले होते.
बर्याच वेळाने, रात्री उशीरा नयनाने पुन्हा लँडलाईनवर फोन करून 'आम्ही सगळे पोचलो जबलपूरला' असे सांगितले. आता सुहासही जरा शांत झाला होता. ते पाहून नयनाने 'आता एकदम परवाच फोन करेन, उगाच चौकश्या करत बसू नका' असे दटावण्याची संधीही घेतली व ती सुहासने मान्यही केली.
आता प्रायव्हसीच प्रायव्हसी! कोणाचेच आणि कशाचेच टेन्शन नाही.
गप्पांना ऊत आला. आठवणींचा भडिमार झाला. स्पर्शांना नावीन्य मिळत राहिले. नयनाच्या मनाच्या धरणाच्या मागचे पाणीही आता गोडे झाले. पोटातल्या गाठी जणू वितळू लागल्या. रेडिएशनमुळे होणारी आग किंचित कमी झाली. हे काहीतरी नवीनच होत होते. ह्यात अश्लीलता नव्हती. ह्यात कामतृप्तीला प्राधान्य नव्हते. ह्यात एक ओढ होती. काही काळ फक्त हवे तसे जगण्याची ओढ! बाकी काहीही नाही. हे व्यक्तीस्वातंत्र्य होते. जे संस्कृती नाकारत होती. त्यामुळे फसवून मिळवावे लागत होते. पण फसवून मिळवूनही ते समृद्धच करत होते. कोणी सवाल विचारलाच तर आधीपेक्षा आता अधिकच ठाम स्पष्टीकरण तयार होत होते दोघांकडेही ह्या वर्तनाचे! एकवेळ अनिलची बाजू थोडी कमकुवत मानली गेली असती, पण नयनाचे समर्थन खणखणीत ठरणारे होते.
परिणाम व्हायचा तोच झाला. 'मला हवे तसे मी काही काळ तरी जगू शकत आहे' ह्या भावनेने तो परिणाम घडवून आणला जो तज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या महागड्या औषधांना साधता आला नव्हता. अचानक नयनाच्या शरीरातील अस्वस्थता कमी होऊ लागली. दाह कमी होऊ लागला.
सापूतार्याच्या थंड हवेत एकमेकांच्या मिठीत नुसते पडून राहण्यातही काय स्वर्ग असतो हे ते दोघे अनुभवत होते. एकमेकांची आता अजिबात आकर्षक वाटणार नाहीत अशी शरीरेही त्यांच्यासाठी जादूई ठरत होती. ते दोघे तो काळ जगत होते जो केव्हाच उलटून गेलेला होता.
शेवटी एकदाचा हनीमून संपला!
निघायच्या आधी अनिलच्या मिठीत नयना अर्धा तास हमसून हमसून रडली. तिच्या रडण्यामुळे अनिलला स्वतःचे रडणे थांबवता येईना!
नयना त्याला रडत रडत म्हणाली......
"पुढचा जन्म वगैरे काही नसते रे अनिल! म्हणून मी तुला भ्रष्ट व्हायला लावले ह्या जन्मी! माझ्यावर रागावू नकोस प्लीज! हे शरीर काही क्षणांचे सोबती आहे. मी गेल्यावर माझी आठवण म्हणून फक्त हा हिरवा शालू कुठेत्री ठेव तुझ्याकडे प्लीज! आणि आता तू रडू नकोस. आयुष्यातला सर्वात चांगला काळ मी तुझ्यासोबत, मनासारखा घालवला आहे. थोडा उशीर झाला अनिल, पण जे पाहिजे ते आपण दोघांनी मिळवलेच रे! ह्याचाच आनंद मान! नको रडूस ना! मला रडूदेत एकटीला! मी वाईट आहे. मी ह्यांच्या पश्चात ह्यांना फसवले. तुझा संसार असताना माझ्या इच्छेखातर तुला शीलभ्रष्ट केले. तुझ्या आणि माझ्या मुलाबाळांना फसवले. हिरवा शालू नेसून ह्या वयात मिरवले. तुझ्या हाताने कुंकू लावून घेतले. मंगळसूत्र घातले तुझ्या हाताने. सगळ्या जगाला फसवून इथे तुझ्यासोबत राहिले. पण अनिल, हा एवढाच काळ मी खरीखुरी जगले रे! बाकी जे जगत होते ते माझे शरीर होते. एक धर्म पाळायचा म्हणून मी माझ्या संसारावर प्रेमसुद्धा खरेच केले. पण हे आत्ताचे तीन दिवस, हे माझ्या सत्तावन्न वर्षातील सगळ्यात चांगले तीन दिवस आहेत अनिल! हे दिवस नशीबात आल्यानंतर मला आता काहीही नको आहे. अगदी आत्ता देवाने नेले तरी चालेल अनिल! खरे तर, ह्या क्षणी नेले तर फारच उत्तम होईल! पण तेवढे कुठले नशीब?"
दोघांनी एकमेकांची आसवे एकमेकांच्या ओठांनीच टिपली आणि परतीचा प्रवास सुरू झाला.
दोघे विषण्णपणे आपापल्या घरी पोचले आणि दुसर्या दिवशी नयनाला पोस्ट केमो स्कॅनिंगला जावे लागले.
संध्याकाळी त्या स्कॅनचा रिपोर्ट पाहताना डॉक्टर समोर बसलेल्या नयनाकडे गंभीरपणे बघत मग सुहासकडे वळत म्हणाले......
"धिस इज अमेझिंग! शी हॅज इम्प्रूव्ह्ड! अॅन्ड शी हॅज इम्प्रूव्ह्ड बियाँड माय एक्स्पेक्टेशन्स मिस्टर कदम"
======================
-'बेफिकीर'!
डोळा का मारताय? म्हणजे भारतात
डोळा का मारताय?
म्हणजे भारतात असतात (किंवा जेथे आहात तेथे) ही विचारप्रणाली झेपू शकत नाही का?
मुळात कोणाला काहीही कळलेलेलेच नाही आहे. कोणालाही काहीही न कळता असे काही करता येते हे पाश्चात्य संस्कृतीच्याही दृष्टीने पुरोगामित्व ठरते का?
प्रतिसाद काढून टाकत आहे.
प्रतिसाद काढून टाकत आहे.
>>यात पुरोगामी काय आहे?
>>यात पुरोगामी काय आहे? हायस्कूल/कॉलेज स्विटहर्टची बकेट लिस्ट पूर्ण करायची म्हणून भावनेच्या भरात वाहून जाऊन , सध्याच्या जोडीदाराला अंधारात ठेवून ४ दिवस त्या व्यक्तीबरोबर हनिमून साजरा केला. बस्स!<<<
यू नो समथिंग?
यू इव्हन डोन्ट नो व्हॉट यू शूड बी अशेम्ड ऑफ!
बेफि संसाराच्या बाहेरही आपण
बेफि संसाराच्या बाहेरही आपण काहीतरी असतो हे खूप आवडलं.
आपल्या देशात लग्न झालं की ती व्यक्ती त्या लग्नातल्या रोल मध्ये हरवून जाते. रादर आजुबाजुचे लोक आता तुझं लग्न झालं म्हणून सतत त्या व्यक्ती ला पती/पत्नी/भावजय्/ दिर्/ आई/ वडिल याच भूमिकेत पाहणं पसंत करतात आणि तसं बिंबवणं चालू असतं. त्या व्यतिरिक्त एक माणूस म्हणून त्या व्यक्तिला पडद्या आड लपवले जाते. मग पडद्या आडून तो माणूस कधीतरी बाहेर पडू ईच्छितो. मला त्यांचं भेटणं किंवा हनिमून साजरं करणं खटकलं नाही. फक्त फार सोयिस्कर घडलं जे घडलं ते, असं वाटलं.
साडे पस्तिस वर्ष नवरा/मुलं यांना भरपूर प्रेम दिल्यावर आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं त्या व्यक्तिला मरण्या अगोदर एकदा भेटावं ही भावना समजू शकते, फक्त अनिल या व्यक्तिला पण सेम भावना असणं आणि ती पण भावना बरोब्बर त्याच वेळेला उद्भवणं थोडं फिल्मी वाटलं.
शेवट करण्याची मुभा तुम्हाला होती ती तुम्ही बरोब्बर निभावलित. तुमच्या जागी मला शेवट लिहायला सांगितला असता तर मी ही कदाचित असाच काहिसा लिहिला असता. दुनिया को कौन पुछता है ?
दक्षिणा, पुरुष फार ताकदीचे,
दक्षिणा,
पुरुष फार ताकदीचे, अबोल, गुप्त आणि योग्यवेळी प्रकट होणारे प्रेम करू शकतो.
(आस्क मी :फिदी:)
प्रतिसाद काढून टाकत आहे.
प्रतिसाद काढून टाकत आहे.
यू इव्हन डोन्ट नो व्हॉट यू
यू इव्हन डोन्ट नो व्हॉट यू शूड बी अशेम्ड ऑफ!
===> +१ .
मला खरेच कळले नाहीये.
मला खरेच कळले नाहीये. त्यामुळे मी माझे प्रतिसाद संपादित करत आहे. उगाच बेफिंच्या कथेच्या धाग्यावर माझ्यामुळे अवांतर व्हायला नको.
स्वाती२, तुम्ही भारतातून
स्वाती२,
तुम्ही भारतातून तिकडे जाताना एखादा माठ किंवा घडा घेऊन गेलाय का?
असल्यास तो उलटा ठेवून त्यात पाणी भरून बघा.
स्वाती२. >>>यात पुरोगामी काय
स्वाती२.
>>>यात पुरोगामी काय आहे? हायस्कूल/कॉलेज स्विटहर्टची बकेट लिस्ट पूर्ण करायची म्हणून भावनेच्या भरात वाहून जाऊन , सध्याच्या जोडीदाराला अंधारात ठेवून ४ दिवस त्या व्यक्तीबरोबर हनिमून साजरा केला. बस्स!<<<
ह्यातील 'सध्याच्या जोडीदाराला अंधारात ठेवून' ह्याबाबत मी बोललो.
'त्या व्यक्तीबरोबर हनीमून (हनीमून सोडून द्या, एखादा असा क्षण जो आत्ताच्या जोडीदाराला भारतीय संस्कृतीनुसार मानवणार नाही) साजरा करणे हे भारतीय संस्कृतीनुसार पुरोगामित्व होईलही, पण काय ते अमेरिकनही संस्कृतीनुसार पुरोगामित्व आहे?
अपार्ट फ्रॉम एव्हरीथिंग
अपार्ट फ्रॉम एव्हरीथिंग एल्स!
आपण कधीतरी कोणावरतरी मनापासून खरेखुरे प्रेम केलेले असते आणि नंतरच्या आयुष्यात आपल्याला समोर आलेल्या माणसावर 'खरेखुरे' प्रेम करण्याची सवय लावली जाते, जबरदस्ती केली जाते, अपेक्षा ठेवली जाते आणि काहीच नसले तर किमान 'आता तरी तू इथे मन गुंतव' असे सांगितले जाते हे फार भीषणरीत्या अविश्वसनीय वाटत आहे का?
हे मान्यच होऊ शकत नाही आहे का की एका कधीकाळच्या असफल प्रेमाच्या आठवणींच्या ताकदीवर माणूस अख्खे आयुष्य ओढून नेऊ शकतो?
आणि मग आपल्याच आयुष्याचा शेवट दिसू लागल्यावर त्या असफल प्रेमाला चंद क्षण सफल करण्याची इच्छा जेव्हा जोर धरते तेव्हा ती इच्छा कळल्यानंतर प्रतिपक्षातल्या व्यक्तीच्याही मनात तीच इच्छा प्रबळ होते?
आपण 'प्रेम', किंबहुना, आयुष्यातील घंटा काहीही वास्तव कळत नसताना केलेले प्रेम, ह्याबाबत इतके कठोर, रिलक्टंट आणि त्रयस्थ कसे काय होऊ शकतो?
बेफि तुम्हि लिहित रहा ... वी
बेफि तुम्हि लिहित रहा ... वी लव युर लिखान.
या काकु अजुन समजनार नाहित
बेफी, भारतीय काय किंवा
बेफी,
भारतीय काय किंवा अमेरिकन काय कुठल्याच संस्कृतीनुसार यात पुरोगामित्व आहे असे मला वाटत नाही.
मी जिथे रहाते तिथे कॅज्युअल डेटिंग करणार असाल तर तशी स्पष्ट कल्पना देणे अपेक्षित असते. एकदा कपल म्हणून वावरायला सुरुवात झाली( ज्याला एक्स्क्लुझिव डेटिंग म्हणतात), की लग्नाचे प्रपोजल करण्याआधीही एकनिष्ठ रहाणे अपेक्षित आहे. यात जोडीदाराला माहित असो वा नसो , एकनिष्ठ राहिले नाही तर ते चिटिंग. इथे मी कुणालाच चिटिंग ला पुरोगामित्वाचे लेबल लावताना ऐकले /पाहिले नाहिये. अशा प्रकाराची कबुली फ्रेंड्समधे देतानाही लोकं 'चूक झाली/ बॅड जजमेंट / मी फसवणूक करत आहे' असेच सांगतात. आयुष्यभर एकच रिलेशनशिप - हायस्कूल स्वीटहर्टशी लग्न झाले , लग्नाला ६० वर्षे झाली- अशा प्रकारचे भाग्यवान लोकं सोडले तर इथे २-३ रिलेशनशिप्स होतात पण प्रत्येक वेळी क्लिन ब्रेक अप करुन नविन रिलेशनशिप ही अपेक्षा असते.
>>आपण कधीतरी कोणावरतरी मनापासून खरेखुरे प्रेम केलेले असते आणि नंतरच्या आयुष्यात आपल्याला समोर आलेल्या माणसावर 'खरेखुरे' प्रेम करण्याची सवय लावली जाते, जबरदस्ती केली जाते, अपेक्षा ठेवली जाते आणि काहीच नसले तर किमान 'आता तरी तू इथे मन गुंतव' असे सांगितले जाते हे फार भीषणरीत्या अविश्वसनीय वाटत आहे का?>>
अविश्वसनिय नाही वाटत. विशेषतः त्या रिलेशनशिपला नॅचरल क्लोजर न मिळताच जबरदस्तीने दुसर्या रिलेशनशिपमधे अडकवले जाते तेव्हा सगळेच विचित्र होऊन बसते. पण पहिल्या प्रेमाला नॅचरल क्लोजर मिळाले असेल तर माणूस मुव ऑन करतो. चांगल्या टर्मस वर वेगळे झाले असल्यास परस्परांमधे जिव्हाळा, सद्भावनाही रहाते .
अहो हि सत्य कथा आहे ... चुका
अहो हि सत्य कथा आहे ... चुका कसल्या कध्ताय...
Befikarji katha chan
Befikarji katha chan aahe.
Nayanamavshini ni je kele tyat kahi chuk nahi, tyani phakt tyanche aayush jagle aahe. ka eka stree sathi phakt tich ghar, tich sansar, ticha navra, tichi mul hech tiche astitv asu shakte ka, hya palikade tila mann nahi ka...
mala nahi vatat nayanamavshini kahi chuk keli aahe.
बेफिकीर, आवडली. ही कदाचित
बेफिकीर,
आवडली. ही कदाचित सत्यकथा असेलही, पण मी वाचतांना तुमची कथा म्हणूनच वाचली!
नयना हे पात्र जितक्या प्रभावीपणे सादर झालंय तितकं अनिल झालं नाहीये. ही नयनाची कथा आहे म्हणूनही तसं असेल. मात्र अनिलच्या मनातली खळबळ दिसली असती तर कथेला वेगळी मिती प्राप्त झाली असती (असं वाटतंय). किंवा तुम्ही वेगळी कथा रचू शकाल अनिलच्या डोळ्यांतून.
अनिलचं ठळक सादरीकरण कथावस्तूसाठी आवश्यक का वाटतं ते सांगतो. नयनाच्या तोंडी एक विधान आहे. त्यापासून सगळी विचारशृंखला सुरू झाली :
>> पुढचा जन्म वगैरे काही नसते रे अनिल! म्हणून मी तुला भ्रष्ट व्हायला लावले ह्या जन्मी!
आता पुढचा जन्मच जर मानला नाही, तर या जन्मी भ्रष्ट होणे यालाही काही अर्थ नाही. इथे नयनाची नीतिमत्ता परस्परविसंगत पद्धतीने व्यक्त होते. हे देखील मूलभूत लक्षण नाही. कारण तिचं सगळं आयुष्यच मुळी 'स्व'शी विसंगत आहे. स्वत:च्या मताने वागण्याची सवय सुटण्यासाठी तीन तपं पुरेशी आहेत.
सापुताऱ्यास जे काही (समाजमते) अश्लाघ्य झालं त्याचं कारण अनिल हेच आहे. त्याने पुढाकार घेऊन शारीरिक संबंधांना नकार दिला असता तर तो घडला नसता. गतप्रेमाच्या ओढीने सहवास स्वीकारणं समजू शकतो. पण ठरवून ती मर्यादा ओलांडण्याची संगती लागत नाही. ती लागावी म्हणून अनिलचं पात्र अधिक गहिरं रंगवायला पाहिजे!
स्त्रीच्या दृष्टीने समागम हा सहवासाचा पैलू आहे. बऱ्याच पुरुषाच्या बाबतीत सहवास समागमामुळे विकसित होतो, पण ठोस सांगता येत नाही (मी दोन्ही उदाहरणं बघितली आहेत.). माझ्या मते पुरुषाने नीती पाळणं खूप महत्त्वाचं आहे.
अनिलच्या एकंदर वर्णनावरून तो वाहवत जाणारा वाटंत नाही. म्हणूनच त्याची कथा वाचायला आवडेल!
आ.न.,
-गा.पै.
म्म्म्म.. चूक बरोबर जाऊ
म्म्म्म.. चूक बरोबर जाऊ द्या. हे असं असं घडलं इतकंच. बाळासाहेब जिवन्त असते तर नयनाताईंनी पुढे काय केलं असतं असा एक विचार आला. कदाचित नुसता भेटण्याचा प्रयत्न. मिळून खरोखरच जबलपूरला सुद्धा गेले असते सहकुटुंब. भेटणं, शक्य तितकं मिळवणं ही ती इच्छा. बाकी सगळं परिस्तिथी प्रमाणे बदलणार. पण म्हणून हे सग्ळं फार उदात्त आणि जस्टिफायबल होत नाही.
स्वाती यांचा शेवटचा प्रतिसाद पटला आहे. क्लीन ब्रेकप्स आणि मग नवीन रिलेशन शिप असंच अ सायला हवं ते. त्यात पुरोगामित्वाचा काय संबंध? प्रेम ही जशी नैसर्गिक भावना आहे तशी लॉयल्टी ची अपेक्षा ही पण आहेच. तसं नसेल तर कहीतरी मेजर लोचा आहे हे नक्की.
>> पुरुष फार ताकदीचे, अबोल, गुप्त आणि योग्यवेळी प्रकट होणारे प्रेम करू शकतो.
हे नक्की. फक्त त्याला प्रेम म्हणायचं का संधीसाधूपणा ते बघा.
असो. गोष्ट लिहीली मस्तच आहे.
Aai shapat kai story aahe
Aai shapat kai story aahe jabardast
खुप छान आहे कथा खुप खुप आवडली
खुप छान आहे कथा खुप खुप आवडली
<<<प्रेम ही जशी नैसर्गिक
<<<प्रेम ही जशी नैसर्गिक भावना आहे तशी लॉयल्टी ची अपेक्षा ही पण आहेच>>>> + ११
स्वाती आपले प्रतिसाद विचार करायला लावणारे आहेत....तुमच्या मताशी मी सहमत आहे.
खुप सुन्दर कथा
खुप सुन्दर कथा
अप्रतिम ..अगदी शब्दच नाहीत
अप्रतिम ..अगदी शब्दच नाहीत बोलायला ...........मनाला भावली ........
फार सुरेख कथा आणी त्यावर फार
फार सुरेख कथा आणी त्यावर फार सुरेख लेखन!!!
सुरेखच!
सुरेखच!
it's just amazing story
it's just amazing story
संसाराच्या बाहेरही आपण
संसाराच्या बाहेरही आपण काहीतरी असतो >>=+१
कथा खूप छान....
उत्क्रुष्त लेखन ..... खास
उत्क्रुष्त लेखन ..... खास तुम्हाला प्रतिसात देन्यसथि मि लोग इन झलो आहे इतक इतक आवदल
कथा फार सुदर आहे.फक्त्
कथा फार सुदर आहे.फक्त् प्रत्यक्षात असे घडल्यावर कस हाताळता येइल ते समजत नाही.
मस्त कथा
मस्त कथा
बेफीजी कथा नेहमीप्रमाणे
बेफीजी कथा नेहमीप्रमाणे मस्तच.. अगदी बेफीस्टाईल.
या कथेवरचे सर्व प्रतिसाद वाचल्यावर एकच मत मांडावस वाटत की कथेकडे कथा म्हणुन बघाव.. त्यात पुरोगामित्व आहे की प्रतिगामित्व आहे, प्रत्यक्षात घडल तर काय होईल, कथेमधल/कथेमधली मुख्य पात्र चुकीच वागली की बरोबर इ गोष्टींचा उहापोह करत बसु नये.. तसच कथेवरुन कथालेखक कसा आहे, त्याची प्रत्यक्ष आयुष्यातली विचारसरणी कशी आहे याचाही उहापोह होउ नये.. वास्तवात घडलेली घटना सुद्धा जेव्हा कथा म्हणुन जगासमोर मांडली जाते तेव्हा त्यात कल्पनाविलास हा येतोच.. मग जी गोष्ट खरच घडली आहे की नुसतीच एखाद्याची कल्पना आहे हेच माहीत नसताना या सर्व गोष्टींचा काथ्याकुट कशासाठी? अर्थात हे सर्व मा. वै. म.
वरील प्रतिसादातुन कुणाला दुखावण्याचा माझा हेतु नाही तरीही कुणी दुखावले गेल्यास क्षमस्व.. ही माझी या कथेवरील पहीली आणि शेवटची पोस्ट... धन्यवाद..
Pages