कुंडलिका एक नंदनवन
२४ जानेवारी २०१३ ची रात्र. अकरा वाजून गेलेले. ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक ७, अर्ध्यातासाने अवतरणाऱ्या कोकणकन्या ऐक्सप्रेसच्या प्रतीक्षेने खचाखच भरलेला. येथे उघडणाऱ्या एकमेव बोगीत घुसणाऱ्यांची संख्या कमाल मर्यादेपेक्षा दसपटींनी अधिक असावी. त्यात आम्ही आठजण आणि आमच्या आकारमानापेक्षा दुप्पट अशा आमच्या सॅक. आपला या सगळ्यात निभाव लागणार नाही हे लक्षात आल्याबरोबर आम्ही परिस्थितीचा आढावा घेऊन काढलेली तिकिटे रद्द केली आणि सरळ स्टेशन बाहेरच असलेल्या एसटी डेपोची वाट धरली. एव्हढ्या रात्री कोकणात जाणाऱ्या गाड्या ठाण्यातून मिळणार नाहीत हे ऐकून डोक्यावर हात मारला. तेव्हढ्यात कोणीतरी पनवेलला जाऊया, अशी सुचना केली. लगेच लोकल बस पकडून कळवा नाक्यावर दाखल झालो. बस निघून गेल्यावर मंगेशला त्याची सॅक बस मध्येच राहिल्याचं जाणवलं, झालं बिचाऱ्याची मोहीम ठाण्यातून निघून ठाण्याच्या वेशीवरच संपली.
नशिबाने पुणे बाजूला जाणारी एक बस मिळाली, तिने आम्हाला पनवेल डेपोला नेऊन सोडले. लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांमुळे इकडे तर जत्रा भरलेली, रात्री एक वाजत आलेलो असतांना सुद्धा सर्व बसेस अक्षरशः ओसंडून वाहत होत्या. आम्हाला काही जत्रेमध्ये सामील व्हायचे नसल्याने आम्ही सरळ डेपोच्या बाहेर हायवेवर आलो. खूप वाहनांना हात दाखविल्यावर एक क्वालीसवाला थांबला, त्यालाही गिऱ्हाईक हवीच होती. सर्व सामान वर कॅरीअवर बांधलं आणि गाडीत बसताच इतका वेळ उघडे ठेवलेले डोळे कधी बंद झाले तेच कळल नाही.
आमच्या गाडीचा सारथीसुद्धा कमालीचा मुरलेला होता, झटपट पण सफाईदारपणे सारथ्य करीत माणगाव केंव्हा गाठलं हे कळलसुद्धा नाही. माणगाव डेपोत परत एकदा सॅक उतरवून सहा वाजताच्या पुणे गाडीची वाट पाहत बसलो, दरम्यान एक दोन वेळा चहा बरोबर ''धुरांच्या रेषा हवेत काढी'' चा कार्यक्रम सुद्धा उरकून झाला.
अरे, हो आम्ही चाललोय कुठे ते सांगायचच राहिलं. मुंबईपासून आडबाजूला कुंडलिका दरीत भविष्यकालीन प्रस्तरारोहण मोहिमेसाठी रेखी करण्यासाठी हा कार्यक्रम होता. तसही या ठिकाणी मुंबईकरांपेक्षा पुणेकरांचा वावर जास्त, कारण वाहतुकीची समस्या.
तर असो, नेहमीप्रमाणेच सहाची बस साडेसहाला येताच सर्व प्रवासी दारावर तुटून पडले, पण आम्ही त्यांच्यापेक्षा सरस निघालो आणि सर्वात पहिला नंबर लाऊन मनाजोगती जागा पकडली. माणगाव -पुणे बस विळेमार्गे डोंगरवाडीतून, ताम्हिणी घाट करून जाते. बाहेर सुर्योदयात न्हालेल्या परिसरात सुधागड आणि त्यामागे तैलबैलाच्या भिंती आणि घनगड आदी डोंगररांगा पाहत असतानाच तासाभराने आमचं इच्छित स्थळ अर्थात ताम्हिणी घाटाच्या सुरुवातीलाच असलेलं डोंगरवाडी गाव आलं. आमचाच एक जुना सहकारी हेमंत बागडे (तिथेच नोकरीस असलेला) बस थांब्यावर स्वागतास हजर झाला.
एव्हढा प्रवास करूनसुद्धा अद्यापही आम्ही इच्छित स्थळी पोहोचलो नव्हतो. इथे हेमंतने आमच्यासाठी एक मिनीबस आणली होती. या मिनीबसने परातेवाडीच्या दिशेने निघालो. ताम्हिणी घाटातूनच पुण्याच्या दिशेने निघाल्यावर प्रथम घाटाच्या कडेला खोलवर प्लस व्हेंलि लागली व त्याच्यापुढे गेल्यावर मुख्य रस्ता सोडून गाडी परातेवाडीच्या दिशेने आडरस्त्याला लागली. एक योगा आश्रम गेल्यावर परातेवाडीत उतरलो. तिथेच एका छोट्याश्या तलावावर कुठलस मराठी सिनेमाचं शुटींग सुरु होत. समोरच दूरवर डोंगरधारेवर दोन विजेचे टोवर दिसत होते, तिथूनच कुंडलिका नदीचा उगम होतो. त्याच्या पलीकडे भांबुर्डा, तेलबैला, घनगड आदी डोंगररांगा पसरलेल्या आहेत, अर्थात त्या या ठिकाणावरून दिसत नाहीत. शुटींगकडे दुर्लक्ष करून आम्ही सॅक पाठीवर मारल्या आणि तलावाच्या काठाने विजेच्या टोवरना डोळ्यासमोर ठेऊन दरीच्या दिशेने निघालो. दरीच्या तोंडावर पोहोचल्यावर सुरु होते कुंडलिका नदी. जानेवारीचा महिना असल्याने वाहते पाणी नव्हते, कुंडलिका नदी इथून सुरु होऊन पुढे दरीच्या तोंडावर ताम्हिणी घाटाच्या सुरुवातीला बाहेर पडल्यावर भिरा (महाराष्ट्रातील सर्वाधिक पाउस इथेच पडतो) येथे एका धरणामध्ये सामावते, इथे टाटांचा वीज प्रकल्प आहे. तिथून पुढे निघून अरबी समुद्राला जाउन मिळते. इतिहासकाळातील चौल हि मोठी बाजारपेठ या नदीच्या मुखाशी वसलेली आहे.
१.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
दूरवर दरीमध्ये कुंडलिका आणि अंधारबन सुळके दिसत होते, जिथपर्यंत आम्हाला पोहोचायचे होते. इथून वाट खाली दरीमध्ये उतरत होती, खरतर वाट अशी नाहीच. दोन्ही बाजूला उत्तुंग डोंगरांनी वेढलेले असल्याने नदीचे पात्र खडकांनी भरलेले आहे. एव्हाना दहा वाजले होते. आजूबाजूस पडलेल्या मोठमोठ्या खडकांमधून मध्येच वाट कुठेतरी गायब व्हायची, एकंदर लपाछपीचा खेळ चालू होता, हरिश्चंद्रगडाच्या नळीच्या वाटेचीच प्रचीती येत होती, फरक एव्हढाच कि हि वाट उताराची होती, जवळपास ७-८ किमी लांब असेल आणि रुंदी पण बऱ्यापैकी होती, तर नळीच्या वाटेला चढ लागतो.
२.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
खांद्यांवर भरलेल्या सॅक असल्याने खडकांवर उड्या मारता मारता वेग कमी झाला होता, पाय मातीला लागतच नव्हते. ठिकठीकाणी पाण्याचे नैसर्गिक डोह दिसत होते म्हणजे संपूर्ण वाटेत बारमाही पाण्याची सोय आहे. मनाला वाटेल तिकडे तंबू ठोका अर्थात सपाट जागा सापडली तर, तीच मुख्य अडचण!
आता माकडचाळे अर्थात खडकांवर उड्या मारून थकायला झाले होते, अडीच वाजत आले होते, एके ठिकाणी पोटोबा केला आणि तिथेच १५-२० मिनिटे विश्रांती घेतली. कुंडलिका आणि अंधारबन दोन्हीही सुळके आणखी बरेच लांब होते आणि दिवस संपण्याच्या आत तिथे पोहोचू शकणार नसल्याची जाणीव झाल्याने त्या वेळेत किरणकाका व आशिष पुढील मार्ग आणि रात्री मुक्कामासाठी योग्य जागा पाहण्यास निघून गेले.
३.निसर्गाने बनवलेली माणसासारखी आकृती
From Kundlika rekhi 24-27 january 2013
४.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
आम्ही आता आम्हाला त्यावेळेपर्यंत अपरिचित असलेल्या एका सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचलो होतो (नावजी सुळका). पायथ्यापासून उंची साधारण दोन-अडीचशे फुट असावी. अनायसे उद्या २६ जानेवारी असल्याने सुळक्यावर चढाई करून तिरंगा फडकावायचा सुवर्णयोगच जुळून आला होता. केवळ रेखी हेच उद्दिष्ट समोर ठेऊन आलेलो असूनही सुळका पाहून त्याच्या मोहातच पडलो व सर्वानुमते इथेच थांबण्याचा निर्णय घेण्यात आला. सुळक्याच्या पायथ्याजवळूनच एक छोटासा धबधबापण वाहत होता आणि त्याच्या बाजूलाच आमचा तंबू मावेल एव्हढा एक सपाट खडक सुद्धा होता. चार वाजले होते, सूर्य मावळण्यास अद्यापही वेळ होता, त्यामुळे आजच केलेली थोडीफार चढाई उद्यासाठी उपयोगी पडणार होती.
चढाई तशी सोपीच असल्याने आज बऱ्याच वर्षांनी आशिष आणि योगेश हि जोडगळी प्रस्तरारोहणासाठी सज्ज झाली होती. अंधार पसरण्याच्या आत ७० फुट चढाई करून आशिष खाली आला, उरलेली चढाई उद्याच्या दिवसावर ढकलण्यात आली.
५.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
६.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
७.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
८.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
९.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
१०.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
११.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
१२.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
१३.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
संधीप्रकाशाचा खेळ चालू झाला होता, आम्ही आता रात्रीच्या जेवणाची तयारी करीत असतानाच कड्याच्या वरच्या भागातून (ताम्हिणी घाट) कोणीतरी हाक मारीत असल्याचे जाणवले. आम्ही झाडाझुडुपात असल्याने स्पष्ट दिसत नव्हते म्हणून योगेश लगेच थोड्या मोकळ्या जागेत गेला. वरच्या कड्यावर एक पुसटशी आकृती दिसत होती आणि तीच हाक मारत होती. योगेशने त्यांना प्रत्युत्तर दिल्यावर त्या माणसाकडून कुठल्यातरी कारविषयी विचारणा झाली. आम्ही अवाक झालो, आमच्यात कुजबुज सुरु झाली इकडे या दगडांमध्ये कोणती कार येणार.
सुमारे हजार-बाराशे फुटी कड्याच्या वरच्या भागातून आमच्या पर्यंत आवाज निट पोहोचत नव्हता, पण आमचा आवाज त्यांना स्पष्ट ऐकू येत असल्याने योगेशने त्यांना आपला मोबाईल नंबर दिला. मोबाईल नंबर देताच काही क्षणातच योगेशचा फोन खणखणला. समोरची व्यक्ती पौड पोलिस स्टेशनशी संबंधित अधिकारी होती. तुम्हाला खाली दोन कार पडलेल्या दिसल्या का? अशी त्यांनी विचारणा केली, क्षणभर आम्ही सुद्धा भांबावलो.
त्याचे असे झाले होते की, माथ्यावर एक साईट सीईंगचा पॉइन्ट होता. त्याच्या जवळच दरीच्या तोंडावर मातीत दोन गाड्यांच्या टायरच्या खुणा उमटलेल्या होत्या. तशी दोन गाड्या हरवल्याची तक्रारही पौड पोलीसांपाशी दाखल झाली होती. आता अंधार झाला आहे, उद्या सकाळी गाड्यांचा शोध घेऊन तुम्हास कळवतो असे त्यांना सांगून आमचा संवाद संपला. पोलिस काही खाली दरीमध्ये उतरून तपास करणार नव्हते, त्यांनी ते काम आमच्यावर ढकलले होते. आमच्या मनात ना-ना शंकाकुशंका येऊ लागल्या कि बाबारे फक्त कारच असुदे आणखी काही नको. नाहीतर आमच शोधकार्य बरंच लांबल असतं.
दिवसभराच्या परिश्रमांनी सारेच दमलेले असल्याने गरमा-गरम जेवणावर आडवा हात मारून, ढेकर देऊन शेजारीच उभारलेल्या तंबूत जागा कमी असल्याने ऐकमेकाला खेटून आडवे झालो.
दुसऱ्या दिवशी सकाळी प्रदीपने सतीश आणि सुदर्शनला सोबत घेऊन सुळक्यावरची उरलेली चढाई सुरु केली. दरम्यान योगेश आणि अमेय पोलिसांनी सांगितलेल्या शोधकार्यास निघून गेले. सुमारे अर्ध्या तासाने बिनतारीवर योगेशचा संदेश आला कि तिथे एकूण दोन वेगवेगळ्या गाड्यांचे अवशेष पडले होते, पैकी एक अगदीच नवीन म्हणजे कालपरवाचीच घटना असावी. कारण खडकांवर सांडलेले डीझेल आणि तेलाचा वास अगदी ताजा होता. पण मोटारींची अवस्था चुरगाळून टाकलेल्या कागदाप्रमाणे झाली होती. गाडीच्या चेसीसवर फोर्ड कंपनीच नाव कोरलेलं आढळल, त्याचे योगेशने वेगवेगळ्या कोनातून फोटो काढले व ते सर्व मोबाईल मार्फतच कालच्या पोलिस अधिकाऱ्यास पाठवून दिले. योगेशला त्या ठिकाणी इतर काही आक्षेपार्ह मिळाले नाही. या ठिकाणी महिन्यातून एक-दोन गाड्या दरीत ढकलून देण्याच्या घटना घडत असल्याच त्या पोलिस अधिकाऱ्याकडून आम्हास कळले.
इकडे प्रदीपने सतीशच्या मदतीने चढाई जवळ जवळ संपुष्टात आणली होती. संपूर्णपणे मुक्त चढाईचा वापर करून माथा गाठला होता, प्रदीपने माथ्यावर एक झाड होते त्याला दोर बांधून सतीश आणि सुदर्शनची वाट पाहत बसला. वाट पाहून पाहून प्रदीप थकला तरी सतीश आणि सुदर्शन दोघेही नवशिके वर येण्याची काही चिन्ह दिसत नव्हती. इथे सुळक्याच्या मध्यावर सतीशने बिले पॉइन्टचा डीसेंडर आणि कॅराबिनर न काढताच दोरावर जुमारींग सुरु केले आणि नेमका अडकला. शेवटी सुदर्शनला वर जाऊन सतीशला त्या जंजाळातून बाहेर काढावे लागले. सतीशची सुटका होताच यथावकाश दोघेही वर पोहोचले आणि २६ जानेवारीचा मुहूर्त साधून तिरंगा फडकवला. वाइंड-अप करतांना सुळक्याच्या मागील बाजूचा वापर केला, हि जबाबदारी प्रदीप आणि सतीशने पार पाडली.
१४.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
१५.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
१६.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
१७.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
१८.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
आता आमचा मुख्य उद्देश म्हणजे कुंडलिका आणि अंधारबन सुळक्यांची रेखी शिल्लक होती. साईट सोडताना नेहमीप्रमाणे साधनाची तपासणी करताना दोन कॅराबिनर्स वरच कुठेतरी राहिल्याच जाणवलं. पण हरवलेल्या सामानाचा शोध लागल्याशिवाय आम्ही इथून निघणार नव्हतोच, भले त्यासाठी परत सुळक्यावर चढाई करावी लागली तरी बेहत्तर! कारण आम्ही आजपर्यंत कधीही साधी सुईसुद्धा सोडून आलो नव्हतो, भले ती कितीही अवघड ठिकाणी पडलेली असली तरी तिथपर्यंत जाऊन तिला घेऊन येणारच. कारण सर्व साधनं जमा करण्यामागे वर्षानुवर्षांची मेहनत होती आणि पैसेही स्वतःच्याच खिशातून गेले होते.
परत पुन्हा एकदा सुळक्याच्या पायथ्याला गोळा झालो आणि तेव्हढ्यातच शेजारच्या कड्यावरील आग्या माश्या उठल्या आणि आमच्या अवतीभवती पिंगा घालायला लागल्या. यापूर्वीही अशा अनुभवातून गेलेलो असल्याने आम्ही स्वतःला जागेवरच statue करून टाकल. एक दोन माशा अंगावरसुद्धा बसल्या पण आमच्याकडून कोणतीच हालचाल न जाणवल्याने आम्हाला त्या निरुपद्रवी जीव समजून निघून गेल्या. माशा निघून जाताच किरणकाकांनी कंबरेला दोर फक्त आवळून बांधून अक्षरशः माकडाप्रमाणे उड्या मारतच निव्वळ ८ मिनिटात सुळक्याची १०० फुट उंची गाठली आणि हरवलेले कॅराबिनर्स सापडले. वाइंड-अप करतांना सुळक्याच्या मागील बाजूचा वापर करताना हि चूक घडली होती.
एव्हाना अंधार पडू लागला होता, त्यामुळे आमचं विंचवाच बिऱ्हाड लगेच उचलून पुढे वाटचाल सुरु केली. अंधाराने चांगलच घेरल होत आणि नशिबाने आम्हाला हवी असलेली सपाट जागा कुंडलिका सुळक्याच्या थोडे अलीकडेच सापडली. एक मोठा पाण्याचा डोह होता, त्याच्या बाजूलाच कड्यातून सुटून खाली पडलेला खडक आणि त्याच्या बाजूला हि मोकळी जागा, अहाहा एकदम झकास!
१९.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
२०.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
२१.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
२२.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
२३.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
उद्या फक्त परतीचा प्रवास होता त्यामुळे घाई नव्हती. रात्री जेवणामध्ये चक्क पांच प्रकारची भजी बनवली, शेवटी पीठ उरलं म्हणून कढीपत्त्याचीसुद्धा भजी बनवली.
सकाळी उठून आम्ही ज्याकरीता आलो होतो त्या कुंडलिका आणि अंधारबन सुळक्यांची रेखी केली. दोन्ही सुळक्यांवर जवळपास विसेक वर्षांपूर्वी पुण्यातील 'आरोहण' संस्थेने चढाई केली होती. पण एव्हढ्या वर्षांमध्ये खूपच बदल झाले होते. ठिकठिकाणी मार्ग बदलला होता, त्यामुळे पुन्हा नव्याने चढाई करावी लागणार होती. आम्ही भविष्यकालीन चढाईसाठी एक अवघड मार्ग निश्चित केला.
इथला निसर्ग तर जणू वेडच लावतो, आम्ही मार्गक्रमण करीत होतो तो भाग दुतर्फा हजारो फुट उंच कडे, घनदाट भयावह जंगल, जानेवारी संपत आलेला असतानाही पाण्यानं काठोकाठ भरलेले डोह, अजूनही बारीकशी धार का असेना पण वाहणारे झरे, दूरवर दिसणारे भिरा धरणाचे समुद्रमय पात्र! एखाद्या सिनेमातलंच दृष्य पाहतोय असच वाटत होत. इतक्यात एका खोल डोहामुळे आमचा मार्ग रोखला गेला.
२४.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
२५.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
२६.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
थोडीशी शोधाशोध करताना रानात गेलेली वाट सापडली. मार्गात आमच्या विरुद्ध दिशेने म्हणजे प्लस व्हॅलीतून ट्रेक करीत आलेले पिंपरी-चिंचवडचे काही ट्रेकर्स भेटले. त्यांचा निरोप घेऊन डोहाच्या बाजूने खाली उतरत गेल्यावर आणखी एक डोह लागला. पाण्यावर तवंग दिसत होता. इथली स्थानिक मंडळी मासेमारीसाठी या डोहांवर येतात, पण मासे पकडण्यासाठी जाळे किंवा गळ न वापरता एका जंगली पण थोडे विषारी असलेले 'रामेठा' या झाडाची साल काढून तिला पाण्यामध्ये आपटून आपटून तिचा रस पाण्यात सोडतात. मासे बेशुद्ध होऊन वर आले कि त्यांना पकडतात. इथेच तासभर पोहण्याचा आनंद लुटून पुढे परत नदीपात्रात पसरलेल्या खडकांवर माकडउड्या मारत सटकलो.
२७.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
सूर्य डोक्यावर आल्यामुळे उन फार जाणवत होत. आता आम्ही भिरा धरणाच्या जवळपास आलो होतो. इथून एक वाट डावीकडे प्लस व्हॅलीकडे जाते तर सरळ वाट भिरा धरणाच्या दिशेने जाते.
२८.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
पण अद्यापही आमचा ट्रेक संपला नव्हता, वाट सरळ असली तरी निदान २ तास आणखी लागले असते. दगडांवरून उड्या मारून मारून कंटाळलो होतो. समोर रेती काढणाऱ्या लहान लहान होड्या दिसत होत्या. त्यातलाच एक तयार झाला, त्यामुळे दोन-अडीज तासांची वाट आम्ही अर्ध्या तासात कापली व भिरा गाव गाठल, इथे टाटांचा वीज प्रकल्प आहे. इथून संध्याकाळी पाच वाजताची बस पकडून पाली गाठलं आणि तिथून खोपोली व खोपोलीवरून ट्रेनने रात्री डोंबिवली मध्ये.
२९.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
३०.
From Kundlika rekhi 24-27 january 2013
सहभागी: किरण अडफडकर, आशिष पालांडे, योगेश सदरे, सुदर्शन माळगावकर, अमेय परब, प्रदीप म्हात्रे, सतीश कुडतरकर
हो. अगदी आरामात. फक्त एक
हो. अगदी आरामात. फक्त एक रात्र आत मध्येच काढावी लागेल. त्यासाठी आवश्यक तयारी करून जाणे. मध्ये एक दोन ठिकाणी ८-१० फुटांचे boulders आहेत, पण अशक्य नाहीत. बरोबर एकदमच नवखा गाडी असेल तर ३०-४० फुटांचा दोर सोबत असलेला बरा.
धन्य!!!
धन्य!!!
सुरेख वर्णन आणि फोटो.
सुरेख वर्णन आणि फोटो.
Local guide cha contact
Local guide cha contact number asel tar share karava
Pages