गुरुवार दिनांक १८ डिसेंबर २०१४. सकाळी ११.०० वाजता मुलाखतीला बोलावल होत. मुलाखत सुरु झाली. मुलाखत दुसरी होती त्यामुळे माझा अनुभव पडताळणे हा भाग नव्हता. मी हा जॉब करायला अनुकुल आहे का नाही याचा अंदाज मुलाखतकारिण घेत होती. माझे शब्द आणि बॉडी लॅग्वेज याचा मेळ घालत होती. आज मी स्वतंत्र व्यावसायीक सल्लागार आहे तर मला नव्याने टा़कलेली टर्म एमप्लॉयमेंट ही टर्म पसंत पडेल हे जाणणे मुलाखतीचा मुख्य विषय होता. लगेचच उत्तर देणे शक्य नव्हते म्हणुन मी चेहेरा हसरा ठेवत टाईम बाय केला आणि कळवतो असे सांगीतले.
चाकण वरुन परतीचा प्रवास सुरु झाला. सल्लागार म्हणुन मिळणार काम जर अस्थिर समजल तर फिक्स्ड पिरिएड किंवा ज्याला तात्पुरत्या मुदतीची नोकरी म्हणजे सुध्दा अस्थिरताच आहे. काय कराव या विचारात मोशी आला आणि डावीकडे आळंदीला जाणारा फाटा लागला.
मनात विचार आला चला गजानन महाराजांचा जो मठ आळंदीत आहे तिथे दर्शन घेऊन मग चिंचवडला जाऊ. हा रस्ता चांगला झालाय. मधे मधे शेतकरी काही विकायला बसले आहे ही द्रुष्ये संपवत् मठ आला. मठ एकदम मोकळा. आम्ही तीन माणसे फक्त. बाकीचे मंदीराचे काम करणारे कामगार सोडले तर पालखी आल्यावर जी गर्दी असते तसे अजिबात नाही. मनसोक्त दर्शन झाल पण अपेक्षेप्रमाणे काही संकेत मिळाला नाही. एक संकेत जरुर मिळाला. इथे आला आहेस तर जा माऊलीचे दर्शन घे. आळंदीला येतोस आणि ज्ञानदेवा डोळा नाही पाहिलास तर काय उपयोग ?
संकेत इतका जबरदस्त होता की कधी माऊलीच्या दारी येऊन पोहोचलो समजले नाही. गर्दी प्रचंड होती. पाठीवर लॅपटॉप ची बॅग बांधलेला त्या गर्दीत मी एकटाच. बाकी सर्व पारंपारीक वेशात आणि पायजमा /सदरा आणि पांढरी टोपी घातलेले. नववार साड्या परिधान केलेल्या स्त्रीया आणि पाचवार सुध्दा. जिन्स नाही की अजुन गॉगल सुध्दा नाही. कुठुन लोक आलेले. थकलेले भागलेले, रात्रभर प्रवासाने शिणलेले.
एक तासाच्या रांगेत मग ग्यानबा तुकारामाचा गजर सुरु झाला. कोणाचा उभ्या उभ्या टाळ मृदुंगाशिवाय हरिपाठ सुरु होता, सर्व वातावरण रोमांचित करत होत. मनात विचार येत होता की ग्रामीण भागातुन आलेले हे वारकरी शेतकरी असणार. मराठवाड्यातुन आलेले दुष्काळाने चिंतीत असतील तर इतर गारपीडे ने बाधित असतील. ह्यातली कोणतिही चिंता मनावर न दिसता फक्त हरीनामाचा गजर आणि सात्विक आनंदाने न्हायलेले वारकरी पाहुन मला उत्तर मिळाले. ह्यांना ना पी एफ ना ग्रॅच्युटी, पाचवीला पुजलेला दुष्काळ. हे जर प्राप्त परिस्थीतीत आनंदात रहातात तर तुला काय खायची भ्रांत पडली आहे ? अस्थिरता म्हणजे काय हे नोकरदारांना काय समजाव ? दिड - दोन एकर शेती तीही जिरायती. त्यातले कष्ट आणि बेभरवश्याचा पाउस म्हणजे खरी अस्थिरता.
अस्थिरता मनात असते. ती घालवायची असेल तर युगे अठठाविस उभा त्या एका विठठलाला शरण गेल्याशिवाय आणि मी करतो हा अहंकार त्यागल्याशिवाय काही मन स्थिर होणार नाही. हा संकेतच नाही तर वारकर्यांच्या संगतीने माऊलीने दर्शनाच्या आधीच दिलेला दृष्टांत घेऊन मन स्थिर झाले.
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकानाथ नामदेव तुकारामाचा जयघोष करत जेव्हा ज्ञानदेवाच्या समाधीवर क्षणभरच मस्तक विसावल तेव्हा काही काळापुरता क्लेश मिटला.
छान.. बर्याच दिवसांनी..
छान.. बर्याच दिवसांनी..