अन...ढगोबा फुटला !!!
एका संध्याकाळी आकाशात खूप काळे ढग जमले होते.सगळ्यांच्या आपसात मस्त गप्पा रंगल्या होत्या.कोणाचं पोट सगळ्यात जास्त ‘टम्म’ फुगलय हे बघण्याची स्पर्धाच लागली होती.लहान- मोठे सगळे त्यात रमले होते.एका ढगाचं पोट खूपच ‘टम्म’ फुगल होतं त्याची सगळे स्तुती करू लागले. मग काय...त्या स्तुतीनं आपले ढगोबा खूपच खुश झाले. त्यानं मनात ठरवलं आता मस्त त्या झुं ........जाणा-या वा-याच्या पाठीवर बसून मोठ्ठी चक्कर मारायची आणि आपल्या मित्रांना जळवायाचं. तो वा-याची वाट बघू लागला. तेवढ्यात वारा झोकात खूप वेगानं पळत आलाच. आपल्या ढगोबानं त्याला थांबवलं आणि म्हटलं ,’वा-या...वा-या ..जरा थांब न.मला तुझ्या पाठीवर बसवून भूर$$$र..घेवून जा नं!”ढगोबाचा तो लाडिक आवाज ऐकून वा-याला हसू आलं.तो म्हणाला,अरे मी खूप जोरात पळणार आहे.खूप मज्जा येते असं पळतांना.तू घाबरशील.तू एवढा ढेरपोट्या किती मंद चालतोयस .नको ...तुला नाही घेत मी माझ्या पाठीवर.एवढं बोलून वारा पळणार तेवढ्यात त्याला आपल्या ढगोबानी अडवलं.आणि तो गयावया करू लागला.म्हणाला,अरे सगळ्या ढगांमध्ये मीच खूप जास्त फुगलोय.म्हणून त्यांना माझा हेवा वाटतोय.तुझ्या पाठीवर बसून मी पळालो ना...की ते तुझी माझी मैत्री बघून आणखीन जळतील.ऐ...ने नारे मला.’ढगोबाचा काकुळतीला आलेला चेहरा वा-याला बघवेना.शेवटी वारा म्हणाला,चल..बसं माझ्या पाठीवर.’ढगोबाला खूप आनंद झाला.तो वा-याच्या पाठीवर बसणार तोच त्याच्या मित्रांनी ढगोबाला हटकलं.म्हणाले
‘ढगोबा हे काय करतोयस तू? अरे, वा-याचा वेग आपल्याला झेपत नाही.तू नको बसूस त्याच्या पाठीवर.’ मित्रांचं बोलण एकूण न ऐकल्यासारखं करत ढगोबा त्यांना
२
म्हणाला,वा-याचा वेग तुम्हाला नाही झेपत.मी नाही तुमच्यासारखा पुळचट.’ढगोबा वा-याच्या पाठीवर बसला. मित्रांनी ढगोबाला समाजावण सोडलं .
वारा पळू लागला.
पळता-पळतावारा म्हणाला,,’तू म्हणशील तिथे मी कुठेही थांबणार नाही.कबुल?नाहीतर आत्ताच खाली उतर.’कबुल’तात्काळ ढगोबा म्हणाला.’अरे पण वा-या तू किती हळू पळतोयस? ते माझे मित्रपण आपल्या बरोबरच पळताहेत.त्यांच्याच वेगानं तू पळालास तर मग काय उपयोग तुझ्या पाठीवर बसून?’ ‘असं काय मी हळू पळतोय का?.......बघच तू आता. असं म्हणत वा-यानं जो वेग घेतला तो बघून सुरवातीला ढगोबाला गंम्मत वाटली.पण,नंतर मात्र त्याच्या पोटात भीतीचा गोळा उठला.त्याचं टम्म भरलेलं पोट वा-याच्या वेगामुळ गद्गद हलत होतं त्यामुळे तोही हलु लागला तसा वारा ओरडला,’ए...ढगोबा ...निट बस नं.किती हलतोयस! मला पळतांना त्रास देऊ नकोस.’म्हणत वा-यान आणखीन वेग वाढवला. ढगोबा आता चांगलाच घाबरला.वा-यानं नुसता वेगच नव्हता घेतला तर तो खूप उंचही गेला होता.ढगोबान हळूच खाली बघितलं तर काय त्याचे मित्र त्याला इवलेसे दिसत होते.पृथ्वीवरच तर काहीच दिसत नव्हतं.घाबरत...घाबरतच ढगोबा वा-याला म्हणाला.’ए....जरा हळू पळ नं! आणि जरा खाली चल नं. माझे मित्र मला खूपच इवलेसे दिसताहेत.’ हे ऐकून वारा खो-खो हसू लागला.तो म्हणाला,’तुला मी सांगितलं होतं नं की मी तुझ्या म्हणण्यान कुठेही थांबणार नाही. आणि खालीही येणार नाही.’ वा-याचं बोलणं ऐकताच आपल्या ढगोबाची पाचावर धारण बसली..त्याला आता वाटू लागलं आपण आपल्या मित्रांच ऐकायला हवं होतं.त्यांना कमी लेखण्यासाठी,त्यांना खिजवण्यासाठी आपण वा-याच्या पाठीवर बसलो. पण,आता आपलाच जीव धोक्यात आला आहे.ढगोबाला त्याच्या आई-बाबांची आठवण येऊ लागली.त्याचे बाबा त्याला नेहमी सांगत,’बाळा ,दुस-यांना कधीही कमी
३
लेखू नकोस.’देवा आता मी काय करू ? ढगोबाच्या मनात विचार सुरु झाले.तेवढ्यात वारा असा काही वळला की ढगोबाला आपला तोलच सावरता आला नाही तो वा-याच्या पाठीवरून खाली पडला आणि त्याचं टम्म फुगलेलं पोटं क्षणात फुटलं आणि प्रचंड वेगानं त्यातील पाणी पाणी खाली पृथ्वीवर पडू लागलं.जिथे हे पाणी कोसळू लागलं तिथले लोकं सैरावैरा जीव वाचवण्यासाठी पळू लागले.पळता-पळता ओरडू लागले,’धावा...धावा ...ढगफुटी झाली...ढगफुटी झाली.’.
या ढगफुटीनं पृथ्वीवर प्रचंड हाहा:कार उडाला.तो बघून आपलं काही देण-घेण नसल्यासारखा वारा हसत त्याच वेगानं पुढे निघून गेला.आणि ढगोबा ...? तो तर कधीच आपला जीव गमाऊन बसला होता.
तात्पर्य----दुस-यांना कमी लेखण्यासाठी केलेल्या कामानं आपलं नुकसान तर होतचं पण...त्याची झळ दुस-यांनाही पोचते.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------समाप्त ---------------------------------------------------
सौ.मीनाक्षी वैद्य.,
मस्त आहे गोष्ट .बालसाहित्य
मस्त आहे गोष्ट .बालसाहित्य असलं तरी मोठ्यांसाठीही वाचण्यासारखी आणि बोध घेण्यासारखी आहे.(मी लहानच आहे अजुन :स्मित:)
<<तात्पर्य----दुस-यांना कमी लेखण्यासाठी केलेल्या कामानं आपलं नुकसान तर होतचं पण...त्याची झळ दुस-यांनाही पोचते.>> +१
तुम्हाला पुढील लेखनास शुभेच्छा (पुलेशु)
सिनि +१
सिनि +१
हे हे किती छान
हे हे किती छान