शीर्षक फारसे वाढू नये म्हणून फुल्ल वर्जन नाही लिहिले, पण ते वाचताना, असे वाचावे -
भारतीय महिला राजकारणात "पुरुषांच्या तुलनेत" कमी रस घेतात का? आणि उत्तर हो असल्यास तसे का?
किंवा
प्रत्येक नागरीकाकडून / मतदाराकडून अपेक्षित असतो किमान तेवढा ईंटरेस्ट दाखवत नाहीत का?
शीर्षकाला तळटीप - यात अपवाद असणारच हे गृहीत पकडावे, एकंदरीत प्रमाण लक्षात घ्यावे.
..................
असो, आता व्यक्त होतो!
..................
आमच्या ऑफिसमध्ये जेवताना आमचा दहा-बारा जणांचा ग्रूप असतो. (योगायोगाने) स्त्री-पुरुष समानता राखत ५०-५० टक्के प्रमाणात आहोत. तो अर्धा तास म्हणजे रिलॅक्सेशन पिरीअड असल्याने जेवणाच्या जोडीने निव्वळ गप्पाटप्पा चालतात. बोलण्यासारखे रोजच नवनवीन आणि चिक्कार टॉपिक असले तरी साधारण प्रत्येकाच्या आवडीचे विषय ठरलेले आहेत. जसे की बायकांची घरगुती विषयांवरची गॉसिपिंग ठरलेलीच. ज्यावर मी परवाच निष्कर्श काढला की बायका लग्नानंतर सासरी राहत असल्याने त्यांना त्या घरातील सदस्यांवर बोलण्यासारखे बरेच असते, पण पुरुष हे लग्नानंतर स्वताच्याच घरी राहत असल्याने त्यांच्याकडे मुळातच बोलण्यासारखे काही नसते. असो! पुरुषांना मात्र सहसा या घरगुती गप्पा ऐकण्यातही रस नसतो.
त्यानंतर एक विषय असतो तो पाककृतींचा. जेवणाच्या ताटावरच बसलो असल्याने, हा विषय कोणाच्या ना कोणाच्या डब्यातील पदार्थ बघून आपसूक रोजच निघतो. यातही साधारणपणे महिलांकडे बोलायला जास्त असते. पण काही जाणकार पुरुषमंडळी सुद्धा आपापली मते मांडतात व माझ्यासारखे अज्ञानी बालक किमान श्रोता म्हणून यात भुमिका निभावतात.
एक विषय असतो आताची पिढी कशी आहे आणि आपल्यावेळी कसे होते, मग निघतात शाळा-कॉलेजच्या आठवणी, लोकं नॉस्टेल्जिक बनतात आणि इथे स्त्री-पुरुष हा भेद मिटत सारेच भरभरून बोलतात.
तर कधी कंपनीबद्दल विषय निघतो, सहकर्मचार्यांबद्दल आणि कंपनीच्या पॉलिसीबद्दल बोलले जाते, आमच्या ईंजिनीअरींग फिल्ड संबंधित विषय निघतो. अश्यावेळी गंभीर आणि संयत चर्चा होते.
झाल्यास थोडीफार चर्चा चित्रपटांबद्दलही होते, पण ती तेवढ्यापुरताच. मालिकांबद्दलची चर्चा मात्र लांबते. त्यात डेली सोपांवर डिट्टेलवार टिका करतानाही हि हौशी मंडळी आपण ती न चुकता बघत असल्याचे अप्रत्यक्षपणे कबूल करत असतात. असो!.. तर कधी क्रिकेटचा हंगाम चालू असल्यास त्यावर दोनचार वाक्ये फेकली जातात.
पण,..
जेव्हा केव्हा राजकारणाचा विषय निघतो तेव्हा तो पुरुषांकडूनच निघतो आणि पुरुषांमध्येच संपतो. कारण महिलावर्ग यावर बोलायला तोंड तर उघडत नाहीच, पण कानही बंद ठेवत ते ऐकण्यातही रस नसल्याचे दर्शवतात. सुर्य दक्षिणेला उगवल्यासारखे बोलल्या तरी काय बोलतात, तर "सगळेच नेते मेले एकसारखेच नालायक आहेत" या वाक्यावर सुरू होऊन त्या वाक्यावरच थांबतात.
हे उदाहरण माझ्या सध्याच्या ऑफिसचे असले तरी आधीच्या ठिकाणीही काही वेगळी परिस्थिती नव्हती, वा कॉलेजमधील मैत्रिणींचाही असाच अनुभव घेतलाय. मायबोलीसारख्या संकेतस्थळावर येणार्यांचा पिंड जरा वेगळा असल्याने इथे त्यामानाने राजकारणात रस घेणार्या महिलांचे प्रमाण हे कमी वाटत नाही. मात्र प्रत्यक्ष आयुष्यात आजूबाजुला पाहिलेले अनुभव असेच आहेत. घरोघरी रिमोट कंट्रोल पुरुषाच्या हाती जातो, तेव्हाच काय तो न्यूज चॅनेल लागतो आणि तेव्हाच राजकारणात घडणार्या घडामोडी जाणून घेतल्या जातात, त्यावरची चर्चा आवडीने पाहिली जाते.
मध्यंतरी लोकसभा आणि विधानसभेच्या दोन निवडणूका झाल्या तेव्हाही हे प्रकर्षाने जाणवले. एवढे काही आसपास घडत होते तरीही आमचा जेवणाचा टेबल मात्र त्यापासून अलिप्त होता. या काळात मी सोशल साईटवर आणखी एक प्रकार पाहिला. काही मुली आपल्या ओळखीच्या ईतर मुलांची मते पाहून आपले मत ठरवत होत्या. हा मार्ग त्यांना सोयीचा वाटत होता. म्हणून माझ्या कॉंटेक्ट लिस्टमधील मैत्रीणींना सोयीचे पडावे म्हणून मी व्हॉटसपवर फॉर्वर्ड होणारे मेसेज त्यांना पाठवू लागलो. अर्थात, जे मला पटले आणि ज्यांच्या सत्यतेची मी तपासणी करून खात्री केली असेच मेसेज पाठवायचो, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत. पण त्या एवढ्या काळात समोरून एकीनेही त्यावर उलटा रिप्लाय दिला नाही, वा साधी स्माईली टाकली नाही, किंवा मुलामुलींच्या कॉमन व्हॉटसपग्रूपवर देखील कोणी चर्चेला पुढे आले नाही.
नाही म्हणायला एकीदोघींचे रिप्लाय आले ते असे,... "रिशी,. का पकवतोयस?"
बस्स! मग उगाच राजकारणाच्या नादात मैत्रिणी तुटायच्या म्हणून मीच मेसेज आवरते घेतले.
आणि हो, आता माझ्या ग’फ्रेंडला राजकारणात काय किती समजते हा प्रश्नही मनात आला असेलच. तर त्या आघाडीवर देखील राजकारण आणि क्रिकेट हे दोन्हीही विषय वर्ज्य आहेत.
असो, खरे तर मी स्वत:ही राजकारणात जेमतेम रस राखून असणाराच आहे. किंबहुना गरजेपुरताच रस दाखवतो. आणि हि गरज म्हणजे योग्य उमेदवाराला, योग्य पक्षाला मत देऊन, आपला देश योग्य हाती देणे. एखाद्या विकांताला कुठल्या सिनेमाला जायचे आहे हे जाणून घ्यायलाही आपण चारचौघांची परीक्षणे वाचतो, घरातला पाईप फुटला तर नाक्यावरचा कोणता प्लंबर चांगला आहे याची चौकशी करतो.. तर त्याच धर्तीवर आपला देश चालवायला देणारे योग्य आहेत की अयोग्य यासाठीही थोडाफार विचार आणि अभ्यास करणे तितकेच गरजेच आहे असे वाटते. आणि बस्स, याच भावनेतून हि माहिती घेतो. त्यानंतर घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य हे ज्याचे त्याचे मत. पण आपले मत हे असेच अंधपणे कोणालाही दिलेले नसावे याचसाठी हा खटाटोप असतो.
लोकशाहीचे एक वैशिष्ट्य़ आहे,. कोणी राजकारण या विषयातील तज्ञ असो वा कोणी चौथी नापास, दोघांच्याही मताची किंमत एकसमानच असते. निसर्गाने स्त्री-पुरुष यांचे प्रमाण ५०-५० ठेवले आहे, त्याला अनुसरून मतदारांच्या संख्येतही स्त्री-पुरुष हे प्रमाण ५०-५० च असते. हे पाहता देशाचे सरकार निवडताना ५० टक्के मते हि पुरुषवर्गाकडून येतात तर ५० टक्के मते हि महिलावर्गाकडून. त्यामुळे स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकाने मत देताना ते योग्य प्रकारे निर्णय घेऊनच ठरवणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे.
या विधानसभेच्या निकालानंतर मी मुद्दाम ऑफिसमधील मैत्रीणींना तुम्ही कोणाला आणि का मत दिले हे विचारले. तर त्यापैकी काही जणींनी उत्तर द्यायचे टाळले. एकीने गुप्त मतदानाची पळवाट शोधली, तर दोघीतिघींनी तिचीच री ओढली. एकदोघी म्हणाल्या, आमच्या घरी अमुकतमुक पक्षालाच मत देतात. तर एकीने चक्क "नवर्याने सांगितले त्याला दिले" असे बिनधास्त उत्तर दिले. अपवाद ठरली एकच, जिने आदल्या रात्री ईंटरनेटवर आपल्या विभागातील एकूण एक उमेदवाराची शैक्षणिक पात्रता शोधून जो सर्वात जास्त शिकलेला होता त्याला मत दिले. तो अपक्ष उमेदवार निघाला, जो काही निवडून आला नाही. आता इथे केवळ शालेय शिक्षण बघून असा निर्णय घेणे कितपत योग्य हा वेगळा विषय झाला, तरी माझ्यामते तिची हि योग्य उमेदवार निवडायची मेथड चुकली असल्याने मी तिला तसे समजावलेही, पण किमान तिने ईंटरेस्ट दाखवत एफर्टस घेतले याचेच कौतुक वाटले. पण याचेही कौतुक वाटायचे कारण हेच की कुठेतरी महिलांचा राजकारणातील रस कमी पडतोय हे माझे झालेले मत!
असो, लेखाचा रोख टिका करण्याचा वा दोष काढण्याचा वाटत असेल तर क्षमस्व! पण मनात जे विचार चालतात ते त्याच भावनेशी प्रामाणिक राहून व्यक्त करने हे मी योग्य समजतो. त्यामुळे ते विचार चुकीचे असल्यास सुधारणेला वाव राहतो.
राजकारणाचा विषय असून चालू घडामोडींमध्येच न टाकता मुद्दाम ललितविभागात टाकतोय.
महिलांना राजकारणातील काही समजत नाही असे धाडसी विधान करायचा वा असा बिनबुडाचा निष्कर्श काढायचा हेतू नाहीये. देवाने बुद्धी / अक्कल स्त्री-पुरुष दोघांनाही समानच दिली आहे. मात्र कोणतीही गोष्ट समजण्यासाठी वा समजून घेण्यासाठी त्यात गोडी असावी लागते जी राजकारण या विषयाबाबत महिलांमध्ये कमी असते का? आणि असल्यास त्याचे तसेच तोटे आहेत का जे देशाला योग्य शासन देण्या न देण्यावर फरक पाडू शकतात का?
लेखाला तळटीप - धागा ऋन्मेषचा आहे म्हणून त्याची किडे आणि काड्या करायची सवय लक्षात ठेऊन (काय हा प्रामाणिकपणा!) पूर्वग्रहदूषित नजरेने वाचले असल्यास पुन्हा वाचा आणि मग त्यानंतर आपलेही प्रामाणिक मत दिल्यास आवडेल !
आभारी आहे,
- ऋन्मेऽऽष
मला वाटते प्रत्येकाची एक age
मला वाटते प्रत्येकाची एक age येते politics मध्ये इंटरेस्ट घेण्याची ... मला college मध्ये या बाबतीत रस नवता ... पण आता आहे ...
बाकी लिखाण मस्त ... पण हा नवीन धागा उघडण्याआधी जुना धागा पूर्ण करा कि राव...
ढोल, गंवार, शूद्र, पशु और
ढोल, गंवार, शूद्र, पशु और नारी सकल ताड़ना के अधिकारी’’रामचरित मानस की ये चौपाई सुन्दरकाण्ड से है
भला हो महात्मा जोतिराव फुलेंचा आम्ही स्त्रिया लिहायला वाचायला तरी लागलो आणि तु प्रश्न विचारयतोस
भारतीय महिला राजकारणात कमी रस घेतात का? आणि का?
रिप्लाय आले ते असे,...
रिप्लाय आले ते असे,... "रिशी,. का पकवतोयस?"
>>> अरे वा तिथे पण?
ज्या धाग्यावर 'उत्सर्ग' होतो
ज्या धाग्यावर 'उत्सर्ग' होतो तेथे लिहिणे मी निषिद्ध मानतो.
आभारी आहे.
मी तुमचा धागा वरवर
मी तुमचा धागा वरवर वाचलाय.फक्त हेडिंगचे उत्तर देते.-- राजकारणा या विषयातील सगळ्याच पक्षातली कट्टरता कधीना कधी त्या कट्टर व्यक्तीला गोत्यात आणतेच. केवळ चर्चेचा शुद्ध हेतु ठेवुन चर्चा करणारया महिला मी तर म्हणेन पुरुषही जर भाग घेत असतील तर त्यातील निरर्थक वादाची झळ लागते आणि मग चर्चेला काही अर्थच राहत नाही.आणि महिला या त्याबाबतीत थोड्या कच्च्या जरी असल्या तरी निर्बुद्ध नसतात. त्यामुळे राजकारणापासुन लांब राहतात. हे फक्त माझे मत आहे.
स्त्री राजकाराणाबद्दल बोलत
स्त्री राजकाराणाबद्दल बोलत नाही म्हणजे रस घेत नाही हा विचारच चुकीचा आहे!
विनिता, स्त्री राजकाराणाबद्दल
विनिता,
स्त्री राजकाराणाबद्दल बोलत नाही म्हणजे रस घेत नाही हा विचारच चुकीचा आहे!
>>>>>>>
हो, बोलणे वा चर्चा करणे हे फक्त एक पॅरामीटर आहे, याउपर जाऊन मी निरीक्षण नोंदवलेय त्यावर हे मत बनवलेय.
सिनी,
तुर्तास वरवर न वाचता शेवटचा पॅरा वाचा, बाकी मी फ्री होताच टंकतो.
बेफिकीर,
'उत्सर्ग' या शब्दाला मराठी प्रतिशब्द सुचवल्यास आपल्या प्रतिसादाला प्रत्युत्तर देता येईल, याउपर आपली प्रतिवाद करायची इच्छा नसल्यास लेखा प्रति आपण सहमत आहात असा सोयीने अर्थ घेण्यात येईल.
भारतीय महिला राजकारणात कमी रस
भारतीय महिला राजकारणात कमी रस घेतात का?>>>>>>.. अज्ज्याबात नाही. उलट त्याच जास्त उचापत्या आणी उद्योग करतात.:दिवा: मायबोलीवरच्या पोस्टस पाहुन पण विश्वास बसत नाहीये का ऋन्मेष तुझा?
राजकारणात स्त्रीया जास्त आहेत, निवडुन पण येतात. पण जनरली खेड्या-पाड्यात जर त्या निवडुन आल्या तर त्यान्चे नवरे आणी घरची इतर पुरुष मन्डळी त्या स्त्रीयाना फक्त नामधारी सदस्य बनवुन ठेवतात. राबडी आणी बालुशाही हे उत्तम उदाहरण आहे. राबडीबाईन्चे कुन्कु उर्फ बालुशाही उर्फ लालु यादव यानी राबडी बाईना नुसतेच खुर्चीत बसवले गम लावुन, बाकी राज्यकारभार त्यानीच हाकला.
बाकी प्रचन्ड माहिती नन्तर देईनच.
राजकारणात स्त्रीया जास्त
राजकारणात स्त्रीया जास्त आहेत, निवडुन पण येतात. पण जनरली खेड्या-पाड्यात जर त्या निवडुन आल्या तर त्यान्चे नवरे आणी घरची इतर पुरुष मन्डळी त्या स्त्रीयाना फक्त नामधारी सदस्य बनवुन ठेवतात.
>>>>>
याचा अर्थ त्या मुळातच नामधारी म्हणून उभ्या असतात..
तसेही सक्रिय राजकारणातील सहभाग हे आणखी वेगळे पोटेंशिअल झाले. त्या आधी नागरीक वा लोकशाहीतील एक मतदार म्हणून रस घेणे अपेक्षित आहे.
वाचला शेवटचा पॅरा . <<महिला
वाचला शेवटचा पॅरा . <<महिला या त्याबाबतीत थोड्या कच्च्या जरी असल्या तरी निर्बुद्ध नसतात>> हे वाक्य संपादित केले आहे असे समजा. कोणी कुठे लिहावे(बोलावे) हे त्या व्यक्तीचे 'व्यक्तीस्वातंत्र्य' आहे. असावं.
<<<देवाने बुद्धी / अक्कल
<<<देवाने बुद्धी / अक्कल स्त्री-पुरुष दोघांनाही समानच दिली आहे. मात्र कोणतीही गोष्ट समजण्यासाठी वा समजून घेण्यासाठी त्यात गोडी असावी लागते जी राजकारण या विषयाबाबत महिलांमध्ये कमी असते का?>>>
असे अजिबात नाहि,
आणि असल्यास त्याचे तसेच तोटे आहेत का जे देशाला योग्य शासन देण्या न देण्यावर फरक पाडू शकतात का?
हो खुप फरक पडू शकतो..
तीची choice जशी कायम "my
तीची choice
जशी कायम "my choice"
Thanks.