कलमनामा – ०८/१२/२०१४ – लेख १० – नाव
http://kalamnaama.com/nav/
नाव
नावात काय आहे? हे वाक्य शेकस्पिअरचं किंवा हा प्रश्न शेकस्पिअरचा. त्याचा या वाक्यामागील अर्थ असा होता की जर गुलाबाला काही वेगळ्या नावाने संबोधलं तर त्यातून येणारा सुगंध बदलेल का? किंवा त्याचं सौंदर्य कमी होईल का? उत्तर आहे ‘नाही’. मग नावात काय आहे? नाव का असतं? इतिहासातील किंवा वर्तमानातील कित्येक नावं मोठी किंवा महान आहेत म्हणजे नेमकं काय? नाव बदलल्याने नक्की माणूस बदलतो का? एखाद्या नावाशी असलेला संबंध किंवा नातं आणि त्याचं महत्त्व म्हणजे काय? असे अनेक प्रश्न आणि त्यांचा वेध.
जरी आजच्या काळात नावापुढे आडनाव लावलं जात असलं तरी त्यात जात, धर्म, पंथ, अल्पसंख्याक समाज असे अनेक मुद्दे संबंधित असल्यामुळे केवळ नावापुरताच शोध मर्यादित ठेवायचं असं ठरवलं (नावातही धर्माची, जात-पात, अल्पसंख्याक याची धुसरशी का होईना ओळख होत असते. पण धुसरशीच) आणि तसंही पूर्वीच्या काळी आडनाव हा प्रकार तसा अस्तित्वातच नव्हता. अगदी मागे जायचं म्हटलं तर रामायण, महाभारतातील व्यक्तिंची नावं आठवली तर कळून चुकेल की त्या काळी आडनाव हा प्रकारच मुळात नव्हता. उदाहरणार्थ राम, लक्ष्मण, सीता यांचं आडनाव होतं का? मुळात आडनाव किंवा पूर्ण नावातील मध्य भाग म्हणजेच वडिलांचं नाव हे प्रकार समाजात वावरताना व्यावहारिकदृष्ट्या काहीही गैरसोय होऊ नये किंवा व्यावहारिक आणि कायदेशीरदृष्ट्या सोईस्कर, सोपं व्हावं म्हणून अस्तित्वात आलं. असो.
मुळात नाव ठेवणं किंवा नामकरणविधी करणं म्हणजेच एखाद्या व्यक्तिच्या स्वभावगुणानुसार, व्यक्तिमत्त्वानुसार त्याला अर्थपूर्ण ओळख देणं होय. याचा अर्थ ज्या व्यक्तिचा जसा स्वभाव असेल तसं त्याचं नाव ठेवणं होय किंवा ज्या व्यक्तिचं जसं व्यक्तिमत्त्व असेल त्या अनुषंगाने त्याचं नामकरण करणं होय. पण हे आजच्या काळात शक्य आहे का? याचं उत्तर नाही. कारण व्यावहारिकदृष्ट्या जन्माचा दाखला, शाळेतील दाखला किंवा प्रवेश अशा अनेक बाबी, तसंच अनेक कायदेशीर बाबी महत्त्वाच्या असल्याने अगदी लहान वयातच मुला-मुलींची नावं ठेवली जातात किंवा नामकरणविधी पूर्ण केले जातात. त्यामुळे सहसा आईवडील किंवा इतर मोठ्या जवळच्या व्यक्ती आपापल्या आवडीनुसार मुला-मुलींचं नामकरण करतात (कारण एखाद्याचा स्वभाव किंवा व्यक्तिमत्त्व कळेपर्यंत थांबणं किंवा तोपर्यंत मूळ नाव न ठेवणं हे व्यावहारिकदृष्ट्या गैरसोयीचं ठरेल). पुढे जाऊन तर एखादं लाडीक नाव असो किंवा टोपण नाव असो किंवा अन्य काही प्रकार असो आवड, प्रेम, आपुलकी यांसारख्या भावनांच्या आधारावरच मुला-मुलींचं नामकरण केलं जातं.
आता प्रश्न आहे तो नावाचा नक्की उपयोग काय? केवळ हाक मारण्यासाठी? याचं उत्तर आहे एखाद्या व्यक्तिला किंवा त्याच्या कार्याला/कामाला/कर्माला संबोधित करण्याचं एक साधन म्हणजे ‘नाव.‘ एक प्रकारची ती प्रत्येक व्यक्तिच्या कर्माची/कार्याची/कामाची ओळखच असते. मग प्रश्न असे उपस्थित होतात की कार्याची/कामाची/कर्माची ओळख म्हणजे नेमकं काय? एखादं कार्य मोठं असतं म्हणजे नक्की काय? एखादं नाव मोठं असतं म्हणजे नक्की काय? एखाद्या महान नावाशी असलेल्या नात्याचा अर्थ काय? थोडक्यात कर्म आणि नाव यांचा थेट संबंध काय?
आपण आपल्याच मनात स्वतःशीच संबंधित किंवा संबंधित नसलेलं पण सार्वजनिक जीवनात नावाजलेलं किंवा लोकप्रिय किंवा प्रसिद्ध असलेलं असं एखादं मोठं किंवा महान नाव उदाहरणादाखल घेऊया आणि विचार करूया की अशा लोकप्रिय किंवा नावाजलेल्या व्यक्तिचं नाव त्यांच्या आईवडिलांनी, आप्तेष्टांनी जेव्हा त्यांच्या लहानपणी ठेवलं असेल तेव्हा कुणालातरी ठाऊक असेल का की पुढे जाऊन हे नाव एवढं मोठं होईल किंवा हे नाव एवढं महत्त्व प्राप्त करेल किंवा हे नाव एवढं लोकप्रिय होईल किंवा हे नाव एवढी प्रसिद्धी कमवेल? त्या लोकप्रिय किंवा नावाजलेल्या व्यक्तिला त्यांच्या लहानपणी त्यांच्या नावाचा अर्थ तर दूरच पण त्यांना ते नाव साधं उच्चारतादेखील येत नसावं आणि हेच आपल्यासारख्या सामान्य माणसांच्याबाबतीतदेखील घडतं. म्हणजेच कुठल्याही व्यक्तिचं नाव मोठं नसतं, तर त्या व्यक्तिचं कार्य मोठं असतं. (नाव ही त्या कार्याची साधारण ओळख असते) आणि ते कार्य जरी मोठं असलं तरी ती व्यक्ती मोठी किंवा महान नसते कारण ते कार्य वेगळं असू शकतं. पण कधीही जगावेगळं असू शकत नाही. आता प्रश्न असा उद्भवतो की समजा अशा लोकप्रिय किंवा नावाजलेल्या किंवा प्रसिद्ध व्यक्तिशी किंवा अशा मोठ्या किंवा महान नावाशी जर आपला संबंध असेल किंवा काही नातं असेल तर त्याचा आदर कसा बरं राखला जाऊ शकतो? अशा व्यक्तिच्या कार्याशी आपलं काही नातं असेल तर आपणदेखील आपल्या कुवतीनुसार ते किंवा त्यासारखं कार्य किंवा त्या पातळीवरचं अन्य कुठलंही काम लोकांमध्ये राहून, लोकांसाठी करून ते नातं त्या कार्यातून/कामातून लोकांपर्यंत पोहोचवायचं. केवळ त्या नात्याचा/नावाचा महिमा गाणं (मग ते चांगलं असो वा वाईट असो) किंवा त्या नात्याची/नावाची (मग ते चांगलं असो वा वाईट असो) त्याची बडबड गीतं गाण्याऐवजी आपणही लोकांमध्ये लोकांसाठी काम करून त्या नावाची/नात्याची जबाबदारी स्वीकारावी. एखाद्या नात्याची/नावाची बडबड गीतं गाणं म्हणजे त्या नावाचा उदो उदो करणं. एखाद्या नावाचा उदो उदो करण्यामागे दोन हेतू असतात. एक चांगला हेतू आणि एक वाईट हेतू. वाईट हेतू म्हणजे एखाद्या नावाचा किंवा नात्याचा दुरुपयोग करणं-एखाद्याला पाण्यात पहाणं, कमी लेखणं, स्वतःला प्रतिष्ठित/ वरचढ भासवणं, कॉलर वर करणं, फायदा उचलून स्वार्थ साधणं, अन्य. चांगला हेतू म्हणजे एखाद्या नावाचा किंवा त्या नावाशी असलेल्या नात्याचा आनंद किंवा अभिमान बाळगणं. पण या चांगल्या हेतुंपलीकडेदेखील जाणं गरजेचं आहे. पलीकडे जाणं म्हणजे जबाबदारीची जाणीव होणं आणि जबाबदारी स्वीकारणं म्हणजेच वर म्हटल्याप्रमाणे कार्य किंवा काम किंवा कृती करणं. थोडक्यात सांगायचं झालं तर नाव मोठं नसतं तर कार्य/कर्म/कृत्य/काम मोठं असतं. नाव ही केवळ एक नाममात्र ओळख आहे त्या कार्याची/कामाची/ कर्माची/कृत्याची. (इथे काम मोठं असणं यातील मोठं हा शब्द भरीव काम या अर्थाने संबोधला आहे).
आता मुद्दा आहे तो नाव बदलण्याचा. साधारणतः लग्न झाल्यावर मुलीचं नाव बदललं जातं. इथे प्रश्न येतो तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा. पूर्वीच्या काळी पुरुषसत्ताक संस्कृती असल्यामुळे (आजही थोड्याफार प्रमाणात का होईना पुरुषसत्ताक संस्कृतीच आहे) सगळे व्यवहार पुरुष सांभाळत असत आणि स्त्रिया या चूल-मूल याभोवतीच घुटमळत असत. त्यामुळे स्त्रियांचं पूर्ण नाव लग्नानंतर बदललं तर जायचंच पण पुढे जाऊन होणार्या मुला-मुलींची नावंदेखील वडिलांच्या (पुरुषांच्या) नावाशीच जोडली जायची. समाजाची बांधणीच अशाप्रकारे झाली. पण माझ्यामते (कायद्याचा आधार घेऊन) नाव काय आणि कसं असायला हवं, मग ते केवळ नाव असो वा वडिलांचं/आईचं नाव लावणं असो वा आडनाव न लावणं असो, हे ठरवण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे आणि मुळात नाव बदलल्याने माणूस बदलत नाही. त्यामुळे नाव बदलण्यासाठी कुणीही संस्कृती, रूढी, परंपरेचा आधार घेऊ शकत नाही. हा, वर म्हटल्याप्रमाणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय आहे. आजही त्याची उदाहरणं दिसतातच ना… संजय लीला भन्साली हे नावात वडिलांचं नाव न लावता आईचं नाव लावलं आहे. परदेशात अनेक व्यक्ती आपल्या वडिलांचंच पूर्ण नाव स्वतः धारण करतात, ते केवळ ज्युनिअर असा उल्लेख पुढे करतात. आजही कित्येक आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांमध्ये एकीकडे आजी, आई, नात या सगळ्यांची नावं एकच असतात. तर दुसरीकडे आजोबा, वडील, नातू यांचीसुद्धा नावं एकच असतात. मग मुद्दा तोच येतो की नावात काय आहे? नाव बदलल्याने किंवा न बदलल्याने व्यक्ती किंवा व्यक्तिमत्त्व बदलत नाही. तर उलट व्यक्तिच्या
कार्यामुळे/कर्मामुळे/कामामुळे नावाला जी ओळख प्राप्त होते ती मात्र बदलू शकते. आता तो बदल प्रगल्भतेकडे वाटचाल करणारा असावा की अधोगतिकडे वाटचाल करणारा असावा हा ज्याचा त्याचा प्रश्न किंवा ही ज्याची त्याची निवड.
शिरीष फडके
नाव
Submitted by शिरीष फडके on 9 December, 2014 - 22:41
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा