एक हुरहूर

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 1 December, 2014 - 06:16

एक हुरहूर

"गुड मोर्निंग, हाऊ मे आय असिस्ट यु ?"
"हाय.... कोण सिद्धी ना?"
"हो... म्हणजे आपण कोण?"
"अग; मी मयुरी... ओळखलस का? " ती ओळखेल याची खात्रीच होती, तरीही विचारलच. कितीही झाल तरी मी "ते" ऑफिस दीड वर्षांपूर्वी सोडलं होत. त्यातून आम्ही दोघी वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या. नव नवीन माणसांच्या गर्दीत जुन्या माणसांचा बहुतेक वेळा विसर पडतो. मी हि अशाच एका जुन्या माणसाच्या शोधप्रीत्यर्थ जुन्या ऑफिसमध्ये फोन लावला होता. आमच संभाषण पुढे चालू झाल.
"मयुरी..? "(पॉझ) {आता परत हिला माझी इंट्रोडक्षन देण्यात वेळ जाणार कि काय? या विचाराने मी चिंतीत} "हो, हो ओळखल ना... आज इथे कसा फोन केलास?" (नशीब ओळखल- इति मी, अर्थात मनातच)
"एक काम होत ग... मला न सदानंद काकांचा मोबाइल नंबर हवाय"
"एकच मिनिट हं... "( अस बोलून तिने ७-८ मिनिटे फोन होल्ड वर ठेवला. ) "अग स्टाफ लिस्ट मध्ये नाही सापडत... थोडा वेळ देतेस का? मी विचारते कोणालातरी, मीच फोन करेन तुला. आता ऑफिस शिफ्ट झालाय ग... अर्धा स्टाफ इथे, अर्धा तिथे... पण बहुतेक त्यांनी ऑफिस सोडलं आहे... बरेच महिने दिसले नाहीत ते..नाहीतर काही कामानिम्मित्त आलेच असते इकडे, पण मी तुला अर्ध्या तासात देते शोधून नंबर.."
"ओ के. थ्यांक्स...तुझ्या फोनची वाट पाहेन"
अस म्हणून फोन ठेवला खरा पण पुढचा अर्धा तास हुरहूर लागून राहणार होती. मला सदानंद काकांना फोन करायचाच होता... आणि तोही त्यांचा फोन मला येण्या अगोदर. ते १००% फोन करणार, मला विश्वास होता... आणि म्हणूनच माझाच फोन आधी असावा हा माझा अट्टाहास होता... त्यामागच कारण हि थोडस अजब होत.

सदानंद काका... एक हसर व्यक्तिमत्त्व, वयाच्या ५५-५६ व्या वर्षीही तरुणांना लाजवेल अशी चपळाई आणि अतिशय संवेदनशील माणूस. मुलगी लहान असतानाच बायको अचानक जग सोडून गेली, पण मुलीला दुसर्या (सावत्र) आईचा त्रास होऊ नये, म्हणून त्यांनी दुसर लग्न केल नाही. प्रेमाला अतिशय उच्च स्थान दिल होत त्यांनी आयुष्यात. माणसाना खूप जपायचे ते. अशा या काकांची ओळख मला झाली माझ्या जुन्या ऑफिसमध्ये. तिथे ते होते... सारी लहान सहान कामे पाहण्यासाठी. तसे तर त्यांच्या जोडीला ४-५ जण होते, पण मला हेच जास्त मदत करायचे. काही फाईल्स मायक्रोसोफ्ट एक्सेल आणि वर्डमध्ये सेव्ह असतात पण त्यात नेमक काय आहे त्याच प्रात्यक्षिक ज्ञान यांना जास्त असायचं. मला कामात खूप मदत करायचे, अनेकांना त्यांचा राग यायचा. मलाही थोड वेगळ वाटायचं. विचारलं एकदा, "काका, बाकीच्यांना कामापुरतीच मदत करता मला कामापेक्षा थोडी जास्त मदत का करता हो?" माझ्या प्रश्नातला खरा मतितार्थ ओळखून त्यांनी उत्तर दिलेलं, "घरी मी आणि माझी मुलगी दोघेच असायचो.. तिचही लग्न झाल तीन महिन्यांपूर्वी... ती सासरी गेली आणि महिन्याभरात तू इथे आलीस.. तिचा फोन असतो दररोज...पण तुझ्यात माझ्या मुलीला पाहतो..." बास्स.... दुनिया गयी भाड मै I आमच्या दोघानमधील नात आणखीन घट्ट होत गेल. पुढे योगायोग असेल बहुतेक पण माझ्या मुलीची आणि त्यांच्या जन्मदीवसाची तारीख एकच जुळून आली. बाकी वाढदिवसानच्या तारखा त्यांच्या लक्षात राहत नव्हत्या, पण हा योगायोग ते विसरले नव्हते आणि त्यामुळेच दर वर्षी मुलीच्या वाढदिवसाला त्यांच्या शुभेच्छा ठरलेल्या असायच्या. कधी आमची भेट नाही झाली तर त्यांचा फोन हा ठरलेला असायचा. पुढे ते दुसर्या शाखेत कार्यरत झाले... आणि नेहमीचा संवादहि तुटला. पुढे मी 'ते' ऑफिसही सोडलं, पण गेल्यावर्षी त्यांनी न चुकता शुभेच्छांसाठी फोन केला होता... थकले होते.. जाणवलं ते. "आम्ही जुनी पिढी, नाती विसरत नाही... तुम्ही कामात गुंतून जाता, आम्ही माणसात गुंततो... पुढच्या वर्षी देखील तू विसरशील बघ माझा वाढदिवस आणि माझाच पहिला फोन येईल तुला..." त्यांच्या आवाजातील उदासीनता जाणवली होती... आणि म्हणूनच यावेळेस पहिला फोन माझाच हा दृढ निश्चय मी केला होता. नवीन स्मार्टफोन हल्लीच घेतल्याने काही नंबर्स हरवले होते, त्यातच नेमका यांचा नंबरही गुल झाला होता, आणि म्हणूनच सकाळ उजाडल्या उजाडल्या त्यांचा नंबर शोधण्याच्या तयारीला मी लागले होते. मुलीबरोबर त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या स्मरणीय शुभेच्छा द्यायच्या होत्या. (त्यांनी देण्याच्या आधीच). अर्धा तास उलटून पाउण तास होत आला होता. लक्ष फोनकडे लागल होत. शेवटी न राहवून मीच पुन्हा फोन लावला. घाईतच म्हणाले..."सिद्धीला फोन द्या प्लीज" आवाजातील अगतिकता ओळखून फोन तिच्याकडे पाठवण्यात आला, "हेल्लो, सिद्धी.... मयुरी????" "हो अग, तुला करणारच होते फोन इतक्यात" (मूर्ख समजते का लेकी मला?- मी मनातच)
"हरकत नाही, नंबर मिळाला का?"
"तुला का हवाय ग नंबर?"
(नसत्या चौकशा फार) "अग हवाय ग.. काहीतरी काम आहे... त्यांचा वाढदिवस आहे आज... शुभेच्छा द्यायच्या आहेत... तू नंबर देतेस का प्लीज...?"
"मयुरी... सदानंद काका गेले ग... ते नाही आता या जगात..." पुढे शांतता....
माझ्यासाठी स्मशानशांतता... "....................................................कधी?"
"दोन तीन महिने झाले... आम्हाला काही कल्पनाच नाही ग... त्या शाखेशी संबंधच येत नव्हता... त्यामुळे……."
सिद्धीची वायफळ बडबड कानात शिरत नव्हती... शेवटच एक वाक्य ती म्हणाली "सॉरी ग... तुला धक्का बसला असेल.. आम्हा सगळ्यांनाच माहित आहे तू त्यांना वडील मानायचीस "
"ठेवते मी फोन… थ्यांक्स"

मी त्यांना वडील मानायचे... नाही...ते मला मुलगी मानायचे... खूप फरक आहे दोघांमध्ये. आजच्या पिढीला सख्खी नाती जपता येत नाहीत...तर मानलेली कुठे जपणार? मी हि त्यातलीच. आजही त्यांचा फोन नंबर हवा होता? कशासाठी? तर त्यांना पटवून देण्यासाठी, "कि आम्हीही माणस जपतो..." माझी खोटी जिद्द खरी करण्यासाठी? कुठे जपल मी नात...? मनातही नाही टिकवता आल... सदानंद काकांनी शेवटचा श्वास घेतला आणि मला ते कळाल दोन का तीन महिन्यांनी... कुठे गेला त्या मानलेल्या बापाचा मुलीवरचा विश्वास... कदाचित त्यांच्या चितेबरोबर तोही जळून गेला... ? मनात आलेले प्रश्न अश्रूंबरोबर धुसर होत गेले, उत्तरांची उकल न होताच... पण एक हुरहूर राहिली मनात कायमचीच.

(हा लेख, नृत्य दिग्दर्शक शामक दावर आणि व्हीक्टरी आर्ट्स फ़ोउनडेशन (VAF) या संस्थेकरता कार्य केलेल्या सदानंद काकांना समर्पित)

मयुरी चवाथे- शिंदे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रडवले या लेखाने....
माझ्या पहिल्या ऑफिसमधील काकू आठवल्या. त्यादेखील मला मुलासारख्या मानायच्या. आणि मी त्यांना मैत्रीण. पण ते ऑफिस सुटल्यावर बाकीचे सारे मित्र-मैत्रीण फेसबूकावर काँटेक्टमध्ये आहेत, त्यांचाच नंबर तेवढा मोबाईलमध्ये धूळ खात पडलाय.. Sad

मयुरी,

तुझे ३-४ लेख वाचले. आजकालच्या घाई-गर्दीच्या जगात तू खूप छोटे प्रसंग, भावना, नाती टिपतेस आणि छान मांडतेस - एक्स्प्रेस करतेस. खूप बरं वाटत वाचायला कोणीतरी इतका विचार करतं हे बघून.. लिहित रहा..