छावणी - ३

Submitted by स्पार्टाकस on 21 November, 2014 - 23:08

व्हाईसरॉय माऊंटबॅटन यांनी दिल्ली आकाशवाणीवरुन घोषणा केली आणि पाकीस्तान अस्तित्वात येणार हे पक्कं झालं! हिंदूंचे हिंदुस्तान आणि मुसलमानांचा पाकीस्तान अशी सर्वसामान्य जनतेची धारणा झाली होती. पाकीस्तानातील मुसलमानांनी हिंदूंच्या अस्तित्वाबद्द्ल प्रश्न केल्याबरोबर हिंदूस्तानात मुसलमानांचे काम काय असा प्रश्न साहजिकच पुढे आला. आतापर्यंत पिढ्यानपिढ्या गुण्यागोविंदाने एकत्रं राहिलेल्या दोन्ही समाजांमधे उभी तेढ निर्माण झाली. 'आपण' आणि 'ते', 'पाक मुसलमान' आणि 'काफीर' असे दोन्ही बाजूंकडून उभे तट पडले.

पंजाबातील वातावरण तर कमालीचं गढूळ झालं होतं. गुजरानवाला आणि इतर ठिकाणच्या मुसलमानांच्या आनंदाला उधाण आलं होतं. जणू काही मोठा सण साजरा करत असल्याप्रमाणे त्यांचा धांगडधिंगा सुरु होता. त्यांचं फार दिवसांचं स्वप्नं साकार झालं होतं. मुसलमानांचं वेगळं वतन, वेगळं पाकीस्तान अखेर त्यांच्या पदरात पडलं होतं! परंतु इतक्यावरच समाधान मानतील तर ते मुसलमान कसले? शहरातील बहुसंख्य हिंदू राहत असलेल्या मोहल्ल्यांना आगी लावण्यास सुरवात झाली! या आगी पद्धतशीरपणे लावल्या जात होत्या. मुसलमान गुंडांच्या टोळ्या रोज रात्री बाहेर पडत होत्या. कायद्याचा कोणताही धाक त्यांना उरला नव्हताच. पोलीसांतही मुसलमानांचाच जास्तं भरणा होता. ते आपल्या जातभाईंच्या या पवित्र कार्याकडे सोईस्करपणे दुर्लक्षं करत होते. शहरातील हिंदू आणि शीख कमालीचे भयभीत झालेले होते. घरातून बाहेर पडलेला माणूस सुरक्षीतपणे परतून येईल की नाही याची कोणतीही खात्री उरलेली नव्हती.

रोज रात्री घोषणा कानावर आदळत -

"दीन दीन दीन!"
"नारा ए तकब्बीर!"
"अल्ला हो अकबर!"

या घोषणा कानावर पडल्या की हिंदू आणि शीखांच्या छातीत धडकी भरत असे. ही टोळधाड आज कुठल्या मोहल्ल्यावर पडणार? आपल्यावरच आली तर काय करायचं? हिंदू आणि शीख अक्षरशः जीव मुठीत धरुन आला दिवस ढकलत होते.

केशवराव नेहमीप्रमाणे आपल्या कचेरीत पोहोचले तेव्हा सकाळचे साडेनऊ वाजले होते. पाकीस्तानची घोषणा झाल्यापासून त्यांच्या कचेरीतील वातावरणही तंग झालं होतं. कर्मचार्‍यांमध्येही अपरिहार्यपणे हिंदू आणि मुसलमान असे दोन गट पडले होते. पाकीस्तान अस्तित्वात आल्यावर कचेरीतील हिंदू लोकांना काढून टाकणार असाल्याची वदंता पसरली होती.

केशवराव आपल्या जागी येऊन बसले ना बसले तोच त्यांच्या कचेरीतील शेख सादुल्ला त्यांच्यासमोर येऊन उभा राहीला. सादुल्ला त्यांच्या हाताखालचा कनिष्ठ कर्मचारी होता. पाकीस्तानची घोषणा होण्यापूर्वी केशवरावांच्या नजरेला नजर देण्याची त्याची हिम्मत नव्हती, पण आता सारेच संदर्भ बदलले होते.

"केशवजी.."

एरवी अतिशय अदबीने बोलणार्‍या सादुल्लाच्या आवाजातली गुर्मी केशवरावांना जाणवली. त्यांनी प्रश्नार्थक चेहर्‍याने सादुल्लाकडे पाहिलं.

"मैने सुना.."
"क्या सुना?"
"आमच्या मोहल्ल्यात राहणारे सारे हिंदू आपलं घरदार सोडून हिंदुस्तानात जाण्याची तयारी करत आहेत!
"सुना तो मैने भी है सादुल्ला! पण मला नाही वाटत तसं. असं पहा, कित्येक लोक आपल्या जन्मापासून इथे राहत आहेत. आयुष्यभर मेहनतीने उभारलेली घरं-दारं आणि व्यवसाय सोडून कोणी कशाला जाईल?"
"जान पे बन आई तब तो जानाही पडेगा ना?" सादुल्लाने गुर्मीतच विचारलं, "आप कब लौट्ने वाले है हिंदुस्तान?"
"देखो भाई सादुल्ला, मी गेली वीस वर्ष या मुलुखात राहतो आहे. माझी दोन्ही मुलं इथेच जन्माला आली आणि वाढली.."
"फिर भी, आप लोगोंको यहांसे जानाही होगा!"
"पर क्यों"
"क्यों की आप लोक काफीर हो! अल्ला को नहीं मानते!"
"अरे बाबा, तुम्ही अल्लाला मानता आणि आम्ही रामाला मानतो. शेवटी हा श्रद्धेचा प्रश्न आहे!"
"यह पाकीस्तान है! सिर्फ हम मुसलमीनोंका वतन! काफीर लोगोंके लिये यहां कोई जगह नही! सबको यहांसे चले जाना ही होगा!"

केशवराव काहीच बोलले नाहीत. धर्मांध झालेल्या माणसाशी काही वाद घालण्यात अर्थ नसतोच. त्यांनी कामात गढून गेल्याचं नाटक केलं. ते काहीच बोलत नाहीत हे पाहून सादुल्ला तणतणत निघून गेला.

सादुल्ला निघून गेल्यावर केशवराव विचार करु लागले. पाकीस्तानची घोषणा होण्यापूर्वीच्या आणि नंतरच्या काळात सर्वच स्तरावर झालेला बदल त्यांना दिसत होता. पाकीस्तानची घोषणा झाल्यावर मुसलमानांचा धर्माभिमान कधी नाही इतका उफाळून आलेला होता. पंजाबातील हिंदू त्यांच्या डोळ्यात सलत होते. नेत्यांच्या विखारी भाषणांनी आणि वक्तव्यांनी त्यात रोजच भर पडत होती. शहरातील कोणत्या ना कोणत्या मोहल्ल्यातील घरांना रोज आगी लावल्या जात होत्या. दुकानं लुटली जात होती. माणसाचं रुपांतर पशूमध्ये झालं होतं! आपलं काय होणार ही भिती प्रत्येकाच्या मनात घर करुन होती.

पाकीस्तानची घोषणा झाल्याला आठ दिवस उलटून गेले होते. एक दिवस सकाळी नेहमीप्रमाणे आपली दुकानं उघडण्यासाठी गेलेले चौधरी महेंद्रनाथ अकराच्या सुमाराला वाड्यावर परत आले. कमलादेवी, चंदा आणि चारुलता मधल्या चौकात बोलत उभ्या होत्या. त्यांच्या बोलण्याचा विषय अर्थात शहरातील सद्यपरिस्थिती आणि आपलं भवितव्यं हाच होता. चौधरींना या वेळी घरी आलेलं पाहून कमलादेवींना आश्चर्य वाटलं. चौधरींच्या चेहर्‍यावरचे भाव पाहून काहीतरी भयानक घटना घडली असावी असा तिघींना संशय आला.

मधल्या चौकातून जात महेंद्रनाथ जिन्याजवळ आले आणि तिथल्या ओट्यावर मटकन खाली बसले. त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळलं होतं.

"संपलं सगळं!" स्वत:शीच बोलावं तसं ते म्हणाले.

कमलादेवींनी त्यांच्याकडे धाव घेतली. चंदाने घरातून पाण्याचा तांब्या आणून त्यांच्यापुढे ठेवला. चौधरींनी तांब्या उचलून काही क्षणांत रिकामा केला.

"चाचाजी! काय झालं?" चारुलताने विचारलं.
"बरबादी! केवळ बरबादी! पुरता बरबाद झालो मी!"
"अहो झालं तरी काय?" कमलादेवींनी प्रश्न केला.
"आपली दोन्ही दुकान लुटली कमला! काल रात्री गुंडांनी आपली दोन्ही दुकानं फोडून सगळं काही लुटून नेलं!"
"अरे देवा!" कमलादेवींनी कपाळाला हात लावला, "पण असं कसं झालं?"

आपल्या खोलीत पुस्तक वाचत असलेली सरिता ही गडबड ऐकून खाली आली. वडिलांना मान खाली घालून बसलेलं पाहून तिने विचारलं,

"काय झालं पिताजी?"
"आपलं सगळं लुटलं गेलं बेटी! दोन्ही दुकानं गेली!" चौधरींना पुढे बोलवेना.
"नीच! हलकट!" सरिता सात्विक संतापाने उद्गारली, "पण हे झालं तरी कसं?"
"मुसलमान गुंडांची टोळी होती. चैनवाली बाजाराच्या टोकापासून सुरवात करुन त्यांनी लुटालूट करायला सुरवात केली रात्रीपासूनच! दुकान फोडून माल लुटून न्यायचा आणि सगळी लुटालूट झाली की आग लावून द्यायची! रात्रभर हे थैमान सुरु होतं! हिंदू आणि शीखांची सगळी दुकानं बरबाद झाली आहेत!"
"आणि पोलीस? ते काय करत होते?" चारुलताने विचारलं.
"पोलीस काय करणार बेटी? पोलीसपण मुसलमानच! त्यांचेच जातभाई! ते कशाला त्यांना अटकाव करणार?"
"आमचं दुकान पण वाचलं नसणार!" जसवीर खिन्नपणे उद्गारली.

त्याचवेळी सरदार कर्तारसिंग आणि गुरकीरत यांनी वाड्यात प्रवेश केला. जसवीरने त्यांच्याकडे धाव घेतली. दोघांच्या चेहर्‍यावरचे भाव पाहून जसवीरला आलेली शंका खरी होती हे सर्वांच्या ध्यानात आलं.

"पापाजी! या साल्यांना ठोकून काढलं पाहीजे! तब इनकी अकल ठिकाने आएगी!" गुरकीरतच्या डोळ्यात खून उतरला होता.
"बिलकूल ठीक कह रहा है पुत्तर!" कर्तारसिंगांनी दुजोरा दिला.
"सब्र करो बेटा!" स्वतःला सावरत महेंद्रनाथ म्हणाले, "अब ये मुल्क हमारा नहीं रहा! ही झुंडशाही आहे बेटा. इथे कोणालाही सारासार विचार राहीलेला नाही. आपण इतक्या वर्षांच्या मेहनतीने जे कमावलं ते असं एका क्षणात गमावण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं. आपल्या नशिबाचे भोग आहेत हे! भोगल्यावाचून सुटका नाही!"
"पिताजी, आपल्या आजूबाजूचे मुसलमान दुकानवाले होते का त्या लुटारुंमध्ये?"
"होते तर! आपल्या बाजूचा चपलेचं दुकान असलेला जावेदखान सर्वात पुढे होता असं ऐकलं मी! बाजारातील हिंदूंची सगळी दुकानं तोच हल्लेखोरांना दाखवत होता!"
"कृतघ्नं! एहसानफरामोश!" कमलादेवी संतापाने उद्गारल्या, "याच मेल्या जावेदला दुकान टाकायला पैशाची मदत केली होतीत ना तुम्ही? असा कसा उलटला तो?"

महेंद्रनाथ काही बोलणार इतक्यात डॉ. सेन घाईघाईने वाड्यात शिरले. सर्वांना खाली चौकात बसलेलं पाहून ते तिथे आले.

"चाचाजी! खूप मोठं संकट येणार आहे आपल्यावर!"
"काय झालं डॉक्टरबाबू?"
"चाचाजी, माझा एक मरीज सांगत होता, मुसलमान गुंडांची टोळी आज रात्री आपल्या मुहल्ल्याला आग लावायला येणार आहे!" डॉ. सेननी एका दमात ती भयंकर बातमी सांगितली.

डॉक्टरसाहेबांचं बोलणं ऐकून सगळेच मुळापासून हादरले. आयुष्यभराच्या कमाईची बरबादी झालीच होती. आता जीवावर आणि अब्रूवर बेतणार होतं. हल्ला करण्यास येणारे गुंडं हाती सापडलेल्या हिंदूंची सरसहा कत्तल उडवण्यास मागेपुढे पाहत नव्हते. हिंदूंच्या लेकी-सुना त्यांच्या वासनेच्या शिकार होत होत्या.

नेमक्या याच वेळेस मिर्झा सिकंदरअली खान प्रवेशले. चौधरींची दोन्ही दुकानं लुटली गेल्याची खबर त्यांना मिळाली होती. असं काहीतरी होईल याचा मिर्झांना थोडाफार अंदाज आला होता. आपल्या मित्राला आता मानसिक आधाराची आणि धीर देण्याची गरज आहे याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्याचसाठी ते चौधरींना भेटण्यास आले होते. मिर्झांच्या सोबतीला त्यांचा मुलगा आसिफ हादेखील आला होता.

"कैसे हो महेंदरभाई?" चौधरींच्या शेजारी बसत मिर्झांनी प्रश्न केला.
"बरबाद झालोय मी मिर्झा! पूर्ण कफल्लक झालोय!" महेंद्रनाथ हताशपणे उद्गारले.
"क्या हुवा?" सर्व माहीत असूनही त्यांना बोलतं करण्याच्या दृष्टीने मिर्झांनी विचारलं.
"अपनी दोनो दुकाने लुट गई चाचाजी!" सरिता म्हणाली.

मिर्झा काहीक्षण गप्प राहीले. मग म्हणाले,
"ज्यांचा माणुसकीवर विश्वास नाही अशा अनाडी आणि बेवकूफ गुंडांकडून हे कृत्य घडलं आहे! त्यांना निती-अनितीची काही चाड नाही, देवाधर्मावर ज्यांचा विश्वास नाही अशा लोकांकडून आपण शहाणपणाची काय अपेक्षा करणार?"
"माफ करा मिर्झासाब, पण धर्मावर विश्वास नसलेल्या नव्हे तर धर्माभिमानाने आंधळ्या झालेल्या लोकांनी ही लुटालूट केली आहे!" चारुलता उद्गारली.
"तुम्हारी बात बिलकूल सच है बेटी!" मान डोलवत मिर्झा उद्गारले, "महेंदर, अब आगे क्या सोचा है?"
"या वेळेस माझं डोकं नाही चालत मिर्झा!" महेंद्रनाथ हताशपणे उद्गारले, "आयुष्यभराची पुंजी एका क्षणात लुटली गेलीय माझी. पुढे काय होणार त्या श्रीकृष्णालाच ठाऊक!"
"वो सब छोड दो अब महेंदर! मी तुम्हाला एक वेगळीच खबर द्यायला आलो आहे!"
"मिर्झासाब, गुंडांची टोळी आज आमच्या मुहल्ल्याला आग लावायला येणार आहे असं मला कळलं आहे!" डॉ, सेननी आपण ऐकलेली बातमी मिर्झांच्या कानावर घातली.
"यही बात तो अब्बाजान कहने आए थे!" आसिफ उद्गारला.
"याने की आजची रात्रं आपली शेवटची!" कमलादेवी स्वतःशीच बोलल्यासारख्या म्हणाल्या.
"महेंदर!" मिर्झा कमालीच्या गंभीर स्वरात म्हणाले, "आज रात्री गुंडांची टोळी येण्यापूर्वीच तुम्हाला सर्वांना इथून हालायला हवं! तुमच्या सुरक्षिततेसाठी रात्रीच्या आत हा वाडा सोडायलाच हवा!"
"ये आप कह रहे है चाचाजी?" सरिता संतापाने उद्गारली, "आप हमें यहांसे जाने के लिये कह रहे है?"
"बेटा, बदकिस्मतीसे मुझे अपने सबसे अजीज दोस्तसे ये कहना पड रहा है!"
"तुम्ही नाही मिर्झासाब, आम्हीच बदकिस्मत आहोत!" एवढा वेळ गप्प असलेली चंदा हताशपणे उद्गारली.
"कोई फिकीर ना करो!" सरदार कर्तारसिंग बाहेर येत म्हणाले. त्यांच्या हातात नंगी तलवार होती, "आने दो जो आता है! जबतक कर्ताससिंग जिंदा है एक भी वापस नहीं जाएगा!"
"कर्तारसिंगजी, आपकी हिम्मत को मेरा सलाम!" सरदारजींसमोर आदराने मान झुकवून मिर्झा उद्गारले, "पर सौ गुंडोका मुकाबला आप अकेले करेंगे?"
"तो क्या हुआ मिर्झाभाई? वाहे गुरु गोबिन्दसिंगजी महाराजने फर्माया है, चिडिया नाल जे बांस लडावा, ता गोबिन्दसिंग नाम धरांवा! हम तो इन्सान है चौधरीजी! लडेंगे हम!"
"मिर्झासाब ठीक कह रहे कर्तारसिंगजी, आपण मूठभर लोक कसे लढणार त्या गुंडांशी? आणि किती वेळ? शिवाय ते हत्याराने सज्ज असणार!" डॉ. सेन म्हणाले.
"तो क्या हुआ डॉक्टरसाब? गुरुमहाराजने फर्माया है, एक एक खालसा सव्वालाखके बराबर है!" कर्तारसिंग आवेशाने उद्गारले.
"कर्तारसिंगजी, ये वक्त जोशसे नहीं होशसे काम लेनेका है!" मिर्झा समजावणीच्या सुरात म्हणाले, "महेंदरभाई, तुम्हे मेरी दोस्ती का वास्ता, रात होनेसे पहले यहांसे निकलो! एकदा माथेफिरु गुंडांची फौज इथे आली की काय होईल सांगता येत नाही! इन सबकी सलामतीके बारेमें सोचो! तुम्हारे दुकान लुटने आए लोगोंको मैने हात जोडकर गुजारीश की थी, शैतान मत बनो. इन्सानियत के नाम पर ये कलंक मत लगाओ. धरम के नामपर हैवानियत खुदाको कभी मंजूर नहीं होगी! पर शैतानने पहलेही उनपर कब्जा कर लिया था! इसलिये कह रहा हूं, अपनी बिबी-बेटीकी जान और इज्जत बजानी है तो रात होनेसे पहले यहांसे निकलो. आज की रात यहां रहना मतलब मौत को दावत देना होगा!"
"अरे पर सिकंदर, इतक्या थोड्या कालावधीत आम्हाला घर सोडून कसं जाता येईल?" महेंद्रनाथांनी हताशपणे विचारलं.
"चाचाजी, अब्बाजान ठीक कह रहे है!" आसिफ बोलू लागला, "अपनी जानकी सलामतीके वास्ते आपको रातसे पहले निकलनाही होगा! शहरके बाहरवाले फौजके बडे मैदानमें सरकारने हिंदुस्तान जानेवाले हिंदू औस सीख लोगोंके वास्ते छांवनी लगाई है! छांवनी के चारो बाजू फौजका पहरा है! आप रात होने से पहले वहां चले जाईये. काफी लोग पहलेही वहां जा चुके है. ऐसी हालत में आप वहींपर महफूज रहेंगे!"
"आसिफ ठीक कह रहा है महेंदर! वो जगह ही ठीक होगी! जितना सामान हो सकता है बांध लो! चार बजे तक मै अपनी गड्डी लेकर आता हूं! आप सबको वहांतक पहुंचा दुंगा! चलो आसिफ!"

सरिताचं त्यांच्या बोलण्याकडे लक्षं नव्हतं. तिच्या डोक्यात विचार येत होता तो आदित्यचा! तो कुठे असेल? कसा असेल? ठीक असेल की काही बरं-वाईट.. आपण तर आज रात्रीपूर्वीच वाड्यातून निघून छावणीत जाणार. पुन्हा त्याची भेट होईल की नाही कोणास ठाऊक. निदान आपण छावणीत जात असल्याचा आणि बहुतेक कायमचे हिंदुस्तानात जात असल्याचा निरोप तरी त्याच्यापर्यंत पोहोचवता येईल का? पण कसा?

"चाचाजी एक मिनीट!" मिर्झा आणि आसिफ जायला निघालेले पाहून सरिता धावत वर आपल्या खोलीत आली. वहीच्या एका पानावर तिने रजनीच्या नावाने एका ओळीची चिठी खरडली.

आम्ही गावाबाहेरच्या सैनिकी छावणीत आणि बहुतेक तिथून हिंदुस्तानात जात आहोत - सरिता

"आसिफभाई, मेरा छोटासा काम करोगे क्या? इतनी चिठी शाहदरामें मेरी सहेलीके घर पहुंचा दोगे?
"जरुर दिदी!"

आसिफने चिठ्ठी घेतली. मिर्झांची बेटी सना, सरिता आणि रजनी यांची मैत्री असल्याने तो तिला ओळखत होताच!

मिर्झा आणि आसिफ बाहेर पडले. सर्वजण आपापल्या बिर्‍हाडाकडे वळले. रात्र होण्यापूर्वीच छावणीत पोहोचणं आवश्यक होतं. जेमतेम तीन-चार तासांचा अवधी हाताशी होता. तेवढ्या वेळेत नेता येईल इतक्या सामानाची बांधाबांध करावी लागणार होती! हाताने उचलून नेता येईल इतकंच सामान नेणं शक्यं होतं. बाकीच्या सामानावर पाणीच सोडावं लागणार होतं. जीवानीशी निसटून जाणं तेवढं महत्वाचं!

सर्वांची सामानाची बांधाबांध सुरु झाली. चौधरींनी आपल्या देवघरातली भगवान श्रीकृष्णाची मोठी तसबीर आणि आपली भग्वदगीता आठवणीने बरोबर घेतली. आवश्यक तेवढे कपडे, थोडंफार खाण्याचं साहीत्य, जवळ होते नव्हते तेवढे सारे पैसे त्यांनी बरोबर घेतले. कर्तारसिंग, गुरकीरत आणि जसवीरनेही निघण्याची तयारी केली. लहानग्या सतनामची बरीच खेळणी जमा झाली होती, परंतु ती सगळी नेणं शक्यं नव्हतं. पण हे त्याला कसं समजावून सांगणार? खेळणी मागे ठेवल्यावर त्याने भोकाड पसरलं. त्याला शांत करताना जसवीरच्या नाकी नऊ आले. चंदाने रुक्सानाबानूला बोलावून आणण्यासाठी सुखदेवला पिटाळलं. परत येताच रुक्सानाबानूने पहिली गोष्ट बरोबर घेतली ती म्हणजे तिच्याजवळ असलेली वैष्णोदेवीची तसवीर! चंदाच्या लहान मुलीला - प्रितीला - सामानाची बांधाबांध सुरु असलेली पाहून आपण गावाला चाललो आहोत असंच वाटलं! प्रत्येकाच्या घरी जाऊन आपल्या बोबड्या बोलांनी 'हम गांव जा रहे है!' असं ती सांगून आली होती! आपले आई-वडील आणि आजी कोणत्या परिस्थितीत सापडले आहेत याची जराशीही कल्पना त्या अश्राप जीवाला नव्हती. डॉ. सेन आणि चारुलता यांनीही निघण्याची तयारी केली. डॉक्टरांनी घेता येतील तेवढी औषधं बरोबर घेतली होती. छावणीत आणि हिंदुस्तानात पोहोचेपर्यंत कोणालाही त्यांची गरज लागण्याची शक्यता होती!

चारच्या ठोक्याला मिर्झांनी आपला ट्रक वाड्यासमोर आणून उभा केला. सर्वांचं सामान बांधून तयारच होतं. एकेक करुन प्रत्येकाचं सामान ट्रकमध्ये चढवण्यात आलं. चौधरी महेंद्रनाथ, कमलादेवी, सरिता, सरदार कर्तारसिंग, त्यांचा मुलगा गुरकीरत, जसवीर, लहानगा सतनाम, डॉ. सेन आणि चारुलता, रुक्सानाबानू, सुखदेव, चंदा आणि प्रिती सर्वजण ट्रकमध्ये चढले. रुक्सानाबानूचा नवरा चमनलाल मात्रं गायब होता. चौधरींनी त्याची चौकशी केल्यावर रुक्सानाबानू संतापाने म्हणाली,

"पडला असेल कुठे तरी दारु पिऊन! एक काम कधी धड केलं नाही जन्मात त्याने! कुठे भेटला होता मला कोणास ठाऊक. त्याचं नशिब आणि तो!"

ट्रकमध्ये चढण्यापूर्वी चौधरींनी एकवार आपल्या वाड्याकडे पाहीलं. रात्रंदिवस मेहनत करुन स्वकर्तृत्वाने त्यांनी त्या वास्तूची उभारणी केली होती. कमलादेवींशी विवाह झाल्यावर त्या याच वाड्यात आल्या होत्या! इथेच प्रताप आणि सरितेचा जन्म झाला होता. इथेच दोघंही लहानाचे मोठे झाले होते. प्रतापची पत्नी उमाही लग्नं होऊन इथेच आली होती. चौधरींच्या भरभराटीला, बहरलेल्या संसाराला तो मूक साक्षीदार होता. आणि आज त्याला सोडून जाण्याची वेळ आली तरीही तो मूकपणेच उभा होता. मूकपणेच तो जणू म्हणत होता,

'इथवरच आपला ऋणानुबंध होता मालक! आजवर शक्यं तेवढी सेवा केली तुमची! आता मला निरोप द्या! माझ्या प्राक्तनात लिहीलेलं मला इथेच राहून भोगलं पाहीजे! तुम्ही सुखरुपणे हिंदुस्तानात जा! सुखी रहा!'

चौधरींचे डोळे अविरत पाझरत होते. दोन्ही हात जोडून त्यांनी त्या वास्तूला प्रणाम केला!

गुजरानवालातील एक प्रतिथयश व्यापारी, शहरातील प्रतिष्ठीत म्हणून नावलौकीक असलेले चौधरी महेंद्रनाथ आपल्या परिवारासह आणि वाड्यातील माणसांसह प्राणभयाने आज राहत्या घरावर तुळशीपत्रं ठेवून बाहेर पडले होते...

कारण देश स्वतंत्र होत होता! देशाची फाळणी होणार होती!

क्रमशः

छावणी - २                                                                                                                                      छावणी - ४

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्पार्टाकस, तुमच्या लेखनशैलीमुळे फाळणीच्या सुमारास जे वातावरण होते ते जसंच्या तसं डोळ्यापुढे उभं राहत आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत..............................

सुन्न...

मनात संमिश्र भावना उमटत आहेत.

अवांतर :

"दीन दीन दीन!"
"नारा ए तकब्बीर!

या घोषणांचा अर्थ काय?

प्रथम,
कुराणामध्ये 'दीन' हा शब्द अनेक ठि़काणी वेगवेगळ्या अर्थांनी वापरला गेलेला आहे असं अनेक संशोधकांचं मत आहे. तसंच या शब्दाचे उर्दू आणि अरेबिक या दोन्ही भाषांत अनेक वेगवेगळे अर्थ आहेत. सामान्यतः दीन दीन ही घोषणा युद्धाच्यावेळी हल्ला करण्यापूर्वी मुसलमान सैनिक वर्षानुवर्ष वापरतात. नारा ए तकब्बीर ही देखील युद्धघोषणाच आहे. ज्याप्रमाणे 'जो बोले सो निहाल' ही शीखांची, 'हर हर महादेव' ही हिंदूंची युद्धघोषणा तशीच 'नारा ए तकब्बीर' ही मुस्लिमांची घोषणा. अनेक मुस्लीम देशांतील विशेषतः पाकीस्तान लष्करातील सैनिक आजही हल्ल्यापूर्वी ही घोषणा देतात.

सुन्न व्हायला झालय ... एकदम तिन्ही भाग वाचून काढले ...

माझे आजी आजोबा पण १९४७ ला कराची हुन परत आले ... फाळणी पक्की झाल्यावर ... आजीने तिथुन निघायच्या दिवशी आलेला अनुभव सांगितला तो ह्याच प्रकारचा आहे ...