आजोबा ४००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१ - भाग २........
३ डिसेंबर, १९९१ :
आज मोहिमेचा चवथा दिवस होता. किरण, शैलेश, महेंद्र, आनंद, मिलिंद बेसकॅंपवरून, कॅंप १ च्या दिशेने निघाले. काल नरेंद्रने चढाई थांबवलेल्या ठिकाणी पोहोचून पुढे चढाई सुरु करायला आनंदला ११ वाजले. संपूर्ण कडा ताशीव गुळगुळीत असल्याने फ्री मूव्ह करण्यास वाव नव्हता तेंव्हा आजही चेन बोल्टिंगच करावी लागणार होती. एक एक करत त्याने लागोपाठ पाच बोल्ट ठोकले व खाली उतरला, त्याची जागा घेतली महेंद्रने. एक छान फ्री मूव्ह करीत तो २५ फुट वर पोहोचला व तेथेच एका कपारीत बसून त्याने एक बोल्ट ठोकला व मिलिंदला मदतीला वर बोलावून घेतले, नंतर आणखी दोन बोल्ट ठोकून पुढच्या चढाईची सूत्रे मिलिंदकडे सोपवली. संध्याकाळचे पाच वाजले होते. काल परतीचा अनुभव लक्षात घेऊन किरण व आनंद परत बेसकॅंपवर जाण्यास निघाले. मिलिंदने चढाई सुरूच ठेवली होती. मिलिंद व महेंद्र आज इथेच मुक्काम करणार होते. दरम्यान संध्याकाळी सुभाष आणि मंडळी मुक्कामासाठी जेवण पाण्यासाहित बेसकॅंपवरून कॅंप १ वर येण्यास निघाले. मध्येच किरण व आनंद परतत असतांना त्यांना वाटेत सुभाष आणि मंडळी भेटली, आवश्यक निरोप, सूचना करून सर्व मंडळी आपपल्या वाटेने निघून गेली. आज किरण आणि आनंद काळोख पडायच्या आतच बेसकॅंपवर पोहोचले. त्याचप्रमाणे सुभाष आणि मंडळी काळोख पडता पडता कॅम्प १ वर पोहोचली. दरम्यान मिलिंदने चार बोल्ट आणि एका पिटॉनच्या साहाय्याने बऱ्यापैकी उंची गाठून दिवसभराची चढाई थांबवून परत पायथ्याला आला. आज रात्रीचा हा मोहिमेतला पहिलाच उघड्यावरचा मुक्काम (Bivouac) होता.
दरम्यान आनंद व किरण बेसकॅंपवर पोहोचल्यावर, सुभाष व व मंडळी पुरेसं अंथरूण, पांघरूण न घेता गेल्याचे कळले आणि जीव कळवळला. कारण गारठलेल्या आसमंतात त्यांना उघड्यावरच अंथरायला दगडांची गादी व पांघरायला फक्त घोंगडी होती. त्यातच बेसकॅंपवर असलेल्या अनिलला ताप भरून आला, त्याच्या विव्हळणे आम्हाला ऐकवत नव्हते. कशीतरी रात्र सरली.
१.
From Aajoba 1991
२.
From Aajoba 1991
४ डिसेंबर, १९९१ :
येत्या दोन/तीन दिवसात आम्ही कॅंप १ च्या वर सुमारे ४००-५०० फुटांवर पोहोचणार होतो, त्यामुळे आता वर कॅंप २ ची स्थापना करावी लागणार होती. तसेच चढाईची साधने व इतर आवश्यक सामग्री खालून वर न्यावी लागणार होती. जसजसे वर पोहोचू तसतसे बेसकॅंपवरून प्रत्येक गोष्ट वर पोहोचवणे अवघड होणार होते. आमच्या पुढे सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता पाण्याचा, सध्या तरी आम्ही बेसकॅंपवरूनच पाणी पुरवीत होतो. वरच्या भागात पाणी जवळपास आढळले, तरच आमचे सर्व प्रश्न सुटणार होते. त्यामुळे आज किरण, नरेंद्र व कुट्टी यांची एक टीम वरच्या भागात पाणी मिळतं का याचा शोध घेणार होते. तसे सीतेच्या पाळण्यापाशी पाणी होते, पण तेथून चढाईच्या ठिकाणापर्यंत पाणी आणण्यास व बेसकॅंपवरून पाणी आणण्यास जवळपास दोन-अडीच तास लागत. त्यामुळे काही उपयोग नव्हता. आम्ही सर्व तयारी करून निघणारच होतो इतक्यात कॅंप १ वरून मिलिंद व महेंद्र परतले. मग मिलिंदने सांगितल्याप्रमाणे आश्रमातून डावीकडे वरच्या भागात नजर टाकली तर तिथे कड्याच्या उतरत्या बाजूस (सोंडेवर) एक नेढ दिसतं. त्याच्या आसपास भरपूर कढीपत्ता आहे व तो आणावयास गावातली बरीच मंडळी जातात. तो भाग आम्हाला सुरुवातीपासूनच खूप हिरवागार दिसत होता, त्यामुळे मिलिंदच्या खात्रीपूर्वक बोलण्याने आमच्या विचाराला दुजोराच मिळाला. आता आम्ही त्या नेढ्यापाशीच जाऊन पाण्याचा शोध घेण्याचे ठरवले.
काल रात्री सुभाष व मंडळीनी चढाईच्या ठिकाणावरच मुक्काम केलेला असल्याने सकाळी लवकरच ९ वाजता चढाई सुरु केली. त्याच दरम्यान किरण व मंडळी सकाळी १० वाजता पाण्याच्या शोधात बेसकॅंपवरून नेढ्याच्या दिशेने निघाले. नेढ्याच्या आसपास अथवा वरच्या भागात पाणी आढळलं तर ते खूपच फायदेशीर होणार होत, कारण तो परिसर आमच्या चढाईच्या ठिकाणपासून वरच्या भागात होता. त्यामुळे आमचा बराच वेळ वाचला असता. दरम्यान किरण, नरेंद्र व कुट्टी नेढ असलेल्या सोंडेच्या पायथ्याशी (सुमारे १००० फुट खाली) पोचले. तेथून एका आडव्या गेलेल्या वाटेचा वापर करत ते पुढे सरकू लागले. मिलिंदने दिलेल्या माहितीनुसार सोंडेच्या पुढे पहिल्याच घळीतून नेढ्याकडे जायला वाट होती. त्यामुळे ते सुद्धा पहिल्याच घळीतून वर सरकू लागले. वाट काढीत ते झपाट्याने पुढे सरकत होते. तस पाहिलं तर वाट अशी नव्हतीच, पण ते तिघेही प्रस्तरारोहक असल्याने नेढ डोळ्यासमोर ठेऊन प्रस्तरारोहण करीतच वरवर सरकत होते. चढताना मध्येच दगड धोंडे लागून अंग खरचटत होत, तर कधी काट्याकुट्या जाताना काटे टोचत होते. एव्हढ सर्व करून सुद्धा एका टप्प्यावर आल्यावर आमच्या समोर एक उंच कडा दत्त म्हणून उभा राहिला. आता इथून उजवीकडे नेढ्याच्या दिशेने जाणे अशक्यच होते. थोड थोड पाणी पिऊन मिलिंदच्या नावाने शिव्या घालत आम्ही कड्याच्या डाव्या बाजूला सरकू लागलो. अचानक खाली जंगलातून रानातील श्वापदांचे गुरगुरण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. सोबत माकडे, पक्षी यांच्या कलकल्याने आसमंत दुमदुमून गेला. आमच्यापैकी कुट्टी या क्षेत्रात अनुभवी, त्याने सदर गुरगुरणे वाघाचे असल्याचे ओळखले, पण आम्ही त्या आवाजापासून जवळपास १००० फुट उंचावर असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
बरेच डावीकडे गेल्यावर रांगत-रांगत आम्ही वरच्या दिशेने वर-वर सरकू लागलो. नेढ्याचा तर पत्ताच नव्हता, परंतु तरी त्यांचा निश्चय पक्का होता. थोडं वर गेल्यावर आजोबा व कात्राबाईच्या डोंगराला जोडणारी खिंड दिसू लागली. त्यांचा गिर्यारोहणातील अनुभव त्या खिंडीतूनच मार्ग असल्याचे सांगत होता. खिंडीकडे जायला वरूनच शक्य होणार होते. कारवी आणि गवतातून वाट काढीत शेवटी एकदाचे ते त्या खिंडीत पोहोचले. घड्याळ पाहिले तर दुपारचे २ वाजले होते. अजूनही पाण्याचा कोठेही मागमूस नव्हता. पोटाची आग जाळण्यासाठी जवळ ठेवलेला सुकामेवा व पाणी पिऊन शरीराची गरज भागवली. सकाळी १० ते २ सतत चार तास पायपीट केल्यानंतर प्रथमच आम्ही ढुंगणाला आराम दिला होता. बसल्या बसल्याच आम्ही एकमेकांशी चर्चा केली व परत फिरण्याचा निर्णय घेतला. नेढ्यापर्यंत पोहोचायला आणखी २-३ तास लागले असते. आम्ही बसलो होतो त्या ठिकाणापासून वर चढत जायचे व तेथून जंगलातून वाट तुडवत उजवीकडे नेढ्याच्या दिशेने घुसायचे. बरे तेथपर्यंत पोहोचून पाणी मिळेल किंवा नाही हे हि माहित नव्हते. शिवाय पाणी मिळूनही त्यांना त्याचा काहीच फायदा होणार नव्हता. कारण त्या नेढ्याला जाणारी वाट खूपच जिकिरीची आणि संपूर्ण डोंगर फिरवून आणणारी होती. त्यामुळे पाणी आणण्यात एव्हढा वेळ घालवणे शक्यच नव्हते.
म्हणून आम्ही तिघांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला. सकाळी आम्ही बेसकॅंपवरून निघालो होतो पण आता बेसकॅंपवर न जाता सुभाष व मंडळीना निरोप देण्यासाठी चढाईच्या ठिकाणावर अर्थात कॅम्प १ वर जायचे होते, त्यामुळे परत वाट वाकडी करून आम्ही कॅंप १ च्या दिशेने अंदाजाने निघालो. बरेच खाली आल्यावर मार्गात आता सुमारे २०० फुट कडा आडवा आला, त्याच्या डाव्या बाजूने खाली उतरत गेल्यावर एक वाट डावीकडे जंगलात गेलेली दिसली. वरील बाजूस सोंडेचा अंदाज घेऊन आम्ही त्याच वाटेने पुढे सरकू लागलो. चालताना अचानक सकाळचे गुरगुरणे आठवले…… अक्षरशः जीव मुठीत घेऊनच वाट काढीत होतो. कसेबसे अंदाजानेच खिंडीत पोहोचलो कारण तो परिसरच इतका भयानक होता की वर्णन करणे शक्य नाही. एखाद्या कैद्याला शिक्षा करण्याऐवजी त्या भागात जिवंत सोडून दिलं तर तो सुद्धा काही दिवसात एकतर वेडा होईल किंवा प्राणास तरी मुकेल. सर्वत्र मोठमोठे कडे त्यांच्या पायथ्याशी घनदाट रान, दरड कोसळून होणारा गडगडाट, जंगली श्वापदांचे गुरगुरणे, किंचाळणे, भरीस भर म्हणून पायाखालून कधीही सरपटत जाणारे साप, त्या जंगलाची भयानकता अधिकच वाढवीत होते.
इतक्यात आमची तंद्री भंगली ती सकाळचीच वाट सापडल्यामुळे, आम्ही योग्य ठिकाणी आहोत हे पाहून जीव थाऱ्यावर आला. घड्याळात पाहिले तर ४ वाजून गेले होते. भरभर पुढे सरकताना कॅंप १ वर चढाईच्या ठिकाणावरून हातोडीचे आवाज ऐकू येऊ लागले पण कुणीही नजरेस पडत नव्हते. झपाझप पावले उचलत आम्ही अजून पुढे सरकलो. सुभाष व चढाई करणाऱ्या मंडळीना आम्ही कॅंप १ वर न येता थेट बेसकॅंप वर जात आहोत हा निरोप देणे गरजेच होत. आमच्या नजरेच्या टप्प्यात कोणीही नव्हते. संध्याकाळ झाल्यामुळे आता सुभाष व चढाई करणाऱ्या टीमला परत बेसकॅंपवर निघण्याचा निरोप मिळणे आवश्यक होते, अन्यथा ते आमची वाट पाहत तेथेच राहिले असते. आणखी थोडे पुढे गेल्यावर आम्हाला आता कॅंप १ अस्पष्ट दिसू लागला होता, किरण ने सुभाषला हाका मारायला सुरुवात केली, ५-६ वेळेला हाक दिल्यानंतर सुभाषने प्रतिसाद दिला. दोघांमधील अंतर जास्त असल्याने किरणने एका एका शब्दावर जोर देऊन निरोप सुभाष कडे पोचवला.
''सु ss भा ss ष, आ ssम्ही, राssत्री येssत नाssही.तुssम्ही साssमाssन पॅssक कssरूssन बेssसssकॅssम्प वssर पssरssत जा''. नशिबाने सुभाष ला निरोप कळला.
सुभाषचा ओके सिग्नल मिळाल्यामुळे आम्हीही निर्धास्तपणे बेसकॅंपच्या वाटेला लागलो. दिवसभराच्या अथक परिश्रमानंतरही आम्हाला पाण्याचा शोध काही लागला नव्हता. मिलिंदचा तर खूपच राग आला होता, कारण त्याने तो स्वतः तिथे जाऊन आल्याचे सांगितले होते. वास्तविक मिलिंद नेढ्यात गेलाच नव्हता व आमच्याशी खोट बोलला हि आमची पक्की खात्री पटली होती. मिलिंदला जाब विचारायचा होता. साधारण साडेपाच वाजता आम्ही बेसकॅंपवर पोहोचलो, पण समोर आमचे डोंबिवलीहून आलेले नवीन सहकारी अशोक, दिनेश, राजू दिसताच राग आवरता घेतला. चहाचे घुटके घेत घेतच सदर घटनेचे स्पष्टीकरण विचारताच, कुमशेतहून परतताना त्याच खिंडीतून तो खाली उतरल्याचे स्पष्ट झाले पण नेढ्याबद्दल त्याने सांगितलेली माहिती गावकऱ्यांकडून एकेलेली ऐकीव माहिती होती. तो स्वतः त्या नेढ्यात गेलाच नव्हता. सकाळीच जर त्याने हि माहिती आम्हाला दिली असती तर आमचे दिवसभराचे परिश्रम फुकट गेले नसते. तेंव्हा भविष्यात अशा खोट्या बातम्या कुणालाही न सांगण्याची ताकीद द्यावी लागली.
अशोक, राजू, दिनेश यांच्याशी गप्पा चालू असतानाच आज चढाई करणारी टीम रात्रीच्या मुक्कामाकरीता परत बेसकॅंपवर आली. मग त्यांनी आजच्या दिवसभराच्या चढाईची माहिती दिली. सकाळी सुभाषने चढाईला सुरुवात केली, लागोपाठ पाच बोल्ट मारल्यावर त्याला एके ठिकाणी फ्री मूव्हसाठी वाव असल्याच जाणवलं. म्हणून त्याने दत्ता आणि पुंडलिक जे कॅंप १ वर सुभाषच्या मदतीसाठी होते, त्यांना हाक मारायला सुरुवात केली. पण दोघांकडूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी कंटाळून सुभाषने आवश्यक तेव्हढा दोर खेचून घेऊन त्यानेच मारलेल्या शेवटच्या बोल्टला बांधून टाकला. त्याने आता बिलेशिवायच फ्री मूव्ह केली आणि एका टप्प्यावर थांबून परत एक बोल्ट मारला. या मारलेल्या बोल्टला दोर बांधून सुभाष दोराला धरून (कमांडो पद्धतीने) परत खालच्या बोल्ट वर आला आणि त्याला बांधलेला दोर सोडून मुक्त केला. दोर खालच्या बोल्टपासून मुक्त होताच तो परत दोराला धरून (कमांडो पद्धतीने) वरच्या बोल्टपर्यंत पोहोचला. त्यापुढे आता परत बोल्टिंग करायची होती. सुभाष जेंव्हा दत्ता आणि पुंडलिकला मदतीसाठी हाका मारत होता तेंव्हा ते चक्क कुंभकर्णासारखे झोपले होते. सुभाषने दिवसभरात एकूण २० बोल्टच्या साहाय्याने ८० फुटांची चढाई केली होती. आज सगळेच बेसकॅंपवर होते. शिवाय उद्यापासून किरण, नरेंद्र व इतर चढाईला जाणार होते व उंचीही बरीच वाढली होती. उद्यापासून कदाचित कड्यावरच राहावे लागणार होते, त्यामुळे पुन्हा एकदा बेसकॅंपवर कॅंपफायर करून 'मानसिक बेटरी' चार्ज करून घेतली.
३.
From Aajoba 1991
४.
From Aajoba 1991
५ डिसेंबर, १९९१ :
सकाळी नेहमीप्रमाणे उठून नित्यकर्मे आटोपून सर्व साहित्यानिशी बेसकॅंपवरून ठीक ९.३० वाजता किरण, नरेंद्र, दिनेश व आंनंद चढाईच्या ठिकाणावर अर्थात कॅंप १ वर जाण्यासाठी निघाले. शॉर्टकटच्या अवघड वाटेने जाताना नेमके जंगलात वाट चुकले. पुन्हा बेसकॅंपवर हाका मारून मिलिंद व महेंद्रला बोलावून घेतले व त्यांनी या चौघांना बरोबर ११ वाजता कॅंप१ वर नेउन सोडलं आणि ते दोघे परत बेसकॅंपवर आले. वाटेत येताना ५ लिटरचा पाण्याचा कॅन हातातून सटकून खाली घरंगळत गेला आणि सगळ पाणी सांडल. त्यामुळे आता दिवसभर पाण्याची बोंब होणार होती. आता पर्यंत कॅंप १ पासून ४७ बोल्ट्स आणि फ्री मूव्ह करून १७५ फुटांची उंची गाठली होती. त्यांच्यापाशी झुमार नसल्याने कमांडो पद्धतीने दोर पकडूनच काल चढाई थांबवलेल्या ठिकाणापर्यंत जाणे भाग होते. फ्री-मूव्ह करण्याची संधी दिसत होती. किरण, पुंडलिक आणि शेखर यापैकी कुणीही तिथे असला कि तो जास्तीत जास्त फ्री-मूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. किरण शेवटच्या बोल्टवर पोहोचताच फ्री-मूव्ह करत जवळपास ४० फुट वर सरकला, सेकंड मॅन व त्याच्यामधील अंतर वाढल्यामुळे सुरक्षेसाठी तिथेच एक बोल्ट ठोकून त्यातून दोर पास करून आणखी जवळपास ५० फुटांची फ्री-मूव्ह करत वर सरकला. आता अंतर बरेच वाढल्यामुळे सुरक्षेसाठी एक बोल्ट ठोकुन त्यात दोर पास करून पुढे आणखी वीस फुटांची फ्री-मूव्ह केली व सपाट कातळ असल्यामुळे लागोपाठ २ बोल्ट ठोकले. आता तो एका ओव्हरहॅन्गच्या मुळास पोहोचला होता.
त्यामुळे इथून पुढे परत चेन बोल्टिंग करावी लागणार होती. म्हणून किरणने नरेंद्रला वर बोलावून घेतले व पुढची सूत्रे त्याच्या हातात दिली. इथे नरेंद्रने लागोपाठ दोन बोल्ट ठोकले व पुढे फ्री-मूव्हची संधी दिसल्याने त्याने आता किरणला संधी दिली. त्या ओव्हरहॅन्गवर एक सुंदर मूव्ह करत किरणने जवळपास चाळीस फुटांची उंची गाठली आणि नेमका बिलेचा दोर संपला त्यामुळे किरणने समोर असलेल्या एका कपारीत एक पिटोन ठोकून स्वतःला त्यात अडकवून सुरक्षित केले व नरेंद्रकडून दुसरा दोर वर खेचून घेतला आणि त्याच्या साहाय्याने नरेंद्र किरण पर्यंत पोचला. नरेंद्र जवळ पोहोचताच किरण ने परत संधी पाहून फ्री-मूव्ह करत जवळपास आणखी ६० फुटांची उंची गाठत एका लेजवर पोचला. किरणने दोर तेथील एका मोठ्या खडकाला बांधून त्याच्याआधारे नरेंद्रला आपल्यापर्यंत खेचून घेतले. आता कॅंप १ पासून इथवर खूप उंचावर असल्याने, पुढील चढाईच्या सोयीसाठी नरेंद्रने त्या लेजवरच एक बोल्ट ठोकून कॅंप २ ची स्थापना केली.
थोडा वेळ आराम करून किरणने परत चाचपणी सुरु केली. त्याच्या अगदी नाकासमोर चाळीसेक फुटांचा सरळसोट रॉकपॅच होता आणि त्याच रेषेत जर चढाई करावी म्हटलं तर आणखी ४-५ बोल्ट ठोकावे लागले असते. ते टाळण्यासाठी किरणला उजव्या बाजूस चढाईसाठी योग्य संधी दिसली. सुमारे ३०-४० फुट उजवीकडे सरकून वर जात पुन्हा डावीकडे ३०-४० फुट याव लागणार होत. एका अरुंद लेजच्या साहाय्याने थोडी कसरत करावी लागणार होती, या गडबडीत काही चूक झाली तर ४० फुटांचा फॉल (Fall) ठरलेलाच, पण तरीही ४-५ बोल्ट ठोकण्याचा वेळ वाचवण्यासाठी धोका पत्करायच ठरवलं व उजवीकडे हळूहळू वर सरकू लागला.
तब्बल अर्धा तास प्रयत्न केल्यावर किरण वर जाण्यात यशस्वी झाला. चढाईच्या सरळ रेषेत येण्यासाठी आता परत डावीकडे ३०-४० फुट यावे लागणार होते. लेज खूपच अरुंद म्हणजे ४-५ इंच ते १ इंचापर्यंत रुंद होती. वाटेत दिसणारे गवत, त्यांचे बुंधे इ. पकडत हातापायांचा सावधपणे उपयोग करीत सुमारे २५ मिनिटात किरण परत चढाईच्या सरळ रेषेत आला. इथे त्याला सुरक्षेसाठी एक बोल्ट ठोकावाच लागणार होता. कारण वर मूव्ह करणे खूप धोक्याचे होते. त्या अरुंद लेज वर स्वतःचा तोल सावरत बोल्ट ठोकायला तब्बल अर्धा तास गेला. बोल्ट ठोकल्यावर त्यात स्वतःला अडकवून घेऊन किरणने स्वतःला सुरक्षित करून घेतलं आणि हे कळताच खाली नरेंद्रने सुटकेचा निश्वास टाकला. एव्हाना संध्याकाळचे ६ वाजले होते त्यामुळे दिवसभराची चढाई थांबवून किरण खाली आताच स्थापन केलेल्या कॅंप २ वर नरेंद्रपाशी पोहोचला. कॅंप १ पासून जवळपास ४०० फुट उंचीवर कॅंप २ ची स्थापना करण्यात आली होती. हे सर्व होईस्तोवर सात वाजले व अंधार पडला होता. खाली आश्रमाजवळ बेसकॅंपवर जावं तर पुरेसा अवधी नव्हता. त्यात ४०० फुट खाली कॅंप १ वर उतरण्यासाठी पुरेसा दोरही त्यांच्यापाशी नव्हता. तेंव्हा नाईलाजाने आजची रात्र कॅंप २ वर उघड्यावरच काढावी लागणार होती.
या दरम्यान दिवसभरात बेसकॅंपवर भरपूर घडामोडी घडत होत्या. दुपारी कुर्ल्याहून दत्ताचे दोन मित्र तातडीचा निरोप घेऊन आले होते. किरण व नरेंद्रच्या मदतीस खाली कॅंप १ वर असलेले दिनेश व आनंद किरणच्या सल्ल्यानुसार संध्याकाळी पाच वाजता परत बेसकॅंपवर निघून गेले होते, कारण सुभाष, दत्ता व पुंडलिक आज रात्री कॅंप १ वर मुक्कामाला येणार होते. सोबत किरण व नरेंद्रला जेवणपाणी व झोपण्यासाठी चादरी आणणार होते. पण रात्री त्यांच्यापैकी पुंडलिक व दत्ताच कॅंप १ वर आले होते. किरणने कॅंप २ वरूनच सुभाषबद्दल विचारताच त्याच्या कंपनीत काहीतरी तातडीच काम निघाल्यामुळे तो उद्या सकाळीच डोंबिवलीला परत जाणार होता. निरोप कुणी आणला, अस विचारताच, ‘माहिती नाही’ असं उत्तर मिळालं. वास्तविक आज दत्ताचे २ मित्र सोडल्यास कुणीच नवीन मंडळी बेसकॅंपवर आली नव्हती. त्यातच दत्ताचे दोन्ही मित्र सुभाषला चेहऱ्यानेच काय नावाने सुद्धा ओळखत नव्हते. किरण खूपच उद्विग्न झाला. खरतर किरण पाठोपाठ दत्ता आणि सुभाषकडे मोहिमेच नेतृत्व होत. पण किरण कॅंप २ वर अडकला होता आणि खाली येण्यासाठी पुरेसा दोरही नव्हता. रोज होत असलेल्या अतिरिक्त परिश्रमामुळे मानसिक आणि शारीरिक ताण पडत होता. बेसकॅंपपासून चढाईच ठिकाण अर्थात कॅंप १ जवळपास २ तासावर होता, त्यातच कॅंप १ जवळ पाण्याची कुठलीही सोय नव्हती, त्यामुळे बेसकॅंपवरूनच पाणी वाहून न्यावे लागत होते. या सर्व परिश्रमामुळे सुभाषने हात टेकले होते. खाली दत्ता आणि पुंडलिकने किरण व नरेंद्र साठी जेवणपाणी आणि झोपण्यासाठी चादरी आणल्या होत्या. पण आज सर्व काही असूनही किरण व नरेंद्रला त्यांचा काहीच उपयोग नव्हता. कॅंप २ वरून खाली कॅंप १ वर उतरण्यास त्यांच्याकडे पुरेसा दोर नसल्याने हे सर्व साहित्य वर खेचून घेऊ शकत नव्हते. टप्प्या टप्प्याने ते उतरू शकले असते कारण मार्गात मध्ये बोल्ट ठोकलेले होतेच पण काळोख झालेला असल्याने तो धोका पत्करण्यात आला नाही.
किरण व नरेंद्रकडे सुकामेव्याची १०० ग्रामची दोन पाकीट होती व पाण्याची एक बाटली होती. दिवसभराच्या अथक परिश्रमानंतर पोट जाळण्यासाठी फक्त सुकामेवा, त्याच्यावरच थंडीमध्ये कुडकुडत उघड्यावरच संपूर्ण रात्र काढावी लागणार होती. हा मोहिमेतला दुसरा उघड्यावरचा मुक्काम (Bivouac) होता.
५.
From Aajoba 1991
६.
From Aajoba 1991
दिवसभर उपाशीपोटी चढाई केल्यामुळे भूक तर प्रचंड लागली होती. प्रथम सुकामेवा खाऊन त्यावर पाणी पिऊन ‘जेवण’ संपवले. पाणी पिऊन पोट भरावे तर पुरेस पाणी सुद्धा जवळ नव्हत. कारण अवघे दीड लिटर पाणी त्याच्यावर पूर्ण रात्र व कदाचित उद्याचा दिवसही काढावा लागणार होता. थंडी असल्यामुळे जास्त तहान लागत नव्हती हेच त्यातल्या त्यात समाधान. कारण कॅंप १ वरून दत्ता व पुंडलिक जोवर कॅंप २ वर येत नाहीत तोवर आम्हाला काहीच मिळणार नव्हते. हळूहळू रात्र वाढू लागली. सोबत थंडीही, कारण आम्ही उंच कड्यावर उघड्यावर होतो. तिन्ही बाजूंनी गार वारा सुटला होता त्यामुळे थंडी आणखीनच वाढली. उब निर्माण करण्यासाठी अंगावरच्या कपड्यांशिवाय काहीच नव्हत. किरणच्या अंगावर फुल बाह्याचे दोन शर्ट होते, तर नरेन्द्रकडे दोन हाफ शर्ट होते. किरणने एक फुल बाह्यांचा शर्ट नरेंद्रला दिला व त्याच्याकडील एक हाफ बाह्यांचा शर्ट स्वतःसाठी घेतला. थोडावेळ बर वाटलं पण तेव्हढ्यापुरतंच. बराच वेळ दोघेही एकमेकांशी बोलत बसूनच होतो. आम्ही बूट न घालता अनवाणीच चढाई करीत असल्याने हातांपायांची उघडी बोट गारठून बधीर झाली होती. पण रात्र वाढू लागल्यावर दातही कडकडू लागले, त्यामुळे गप्पाही बंद झाल्या. हातावर हात घासून तात्पुरती उष्णता निर्माण केली. इतक्यात किरणला काहीतरी आठवले, त्याने कॅमेऱ्याची बॅग उघडून कॅमेरा बांधायचे दोन पिवळे डस्टर्स काढले. एक नरेंद्रने आणि दुसरा किरणने आपल्या डोक्याला बांधला. दोन प्लास्टिकच्या पिशव्या काढून डोक्यात घालून खालपर्यंत ओढून घेतल्या. जास्त लांब नसल्यामुळे त्या मानेपर्यंत पोचल्या पण घट्ट असल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे थोड थांबून पिशवी वर उचलून मोकळा श्वास घ्यावा लागे. काडीचा आधार मिळाला होता. एकमेकांच्या अंगावर पाय टाकून व शर्टच्या आत हात घालून दोघेही झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. पण झोप कसली येतेय, नुसतेच वेळ संपण्याची वाट पाहत होतो. बराच वेळ झाला अस वाटून घड्याळ पाहिलं तर रात्रीचे आठच वाजत होते. बापरे! अजून तब्बल १०-१२ तास घालवायचे होते. या कल्पनेनेच अंग शहारून निघाल. मध्येच नरेंद्रने आजुबाजूच गवत उपटून जमा केल व ते पेटवून दोघेही हातापायांना शेक देऊ लागलो.
पण शेकोटी संपताच थंडी जास्तच जाणवू लागे. म्हणून तोही प्रयत्न सोडून दिला. पुन्हा कड्यावर बसून सभोवतालचा परिसर पाहू लागलो. नुकतीच अमावस्या होऊन गेली होती. आकाशात सर्वत्र चांदण्यांचा मंद प्रकाश पसरला होता. बहुतेक घाटघर-साम्रद परीसर असावा. डावीकडे मात्र दिव्यांचे बरेच पुंजके दिसत होते, त्याही डावीकडे मोठा हॅलोजनचा प्रकाश पडला होता, कदाचित एखादा कारखाना असावा. त्या उजेडाकडे पाहताना उगीचच अंगात उब आल्यासारखी वाटली. खाली आश्रमाजवळ आमच्या बेसकॅंपमध्ये पेट्रोमॅक्सचे दोन्ही दिवे पेटल्याने बराच भाग प्रकाशित झाला होता. परत घड्याळाकडे पाहिले तर नऊच वाजत होते. सुर्योदयासाठी अद्याप दहा तास वाट पहायची होती. वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. टाईमपास म्हणून पुन्हा गवत पेटवून शेकवून घेण्याचा प्रयत्न केला. मध्येच कधीतरी ओबडधोबड दगडावर आडवे झालो आणी डोळा लागला न लागला तोच वरून लहान लहान दगड खाली पडायला लागले. झोप ती काही लागली नाहीच. अक्षरशः तास/मिनिटे/सेकंद अशा अंतराने घड्याळ पाहत असतानाच पूर्वेकडे तांबड फुटायला लागलं आणि जिवात जिव आला. एखाद्या गोष्टीची वाट पाहण म्हणजे काय ते त्या कालच्या रात्रीने आम्हाला शिकवलं होत.
७.
From Aajoba 1991
सदर फोटो दुसऱ्या दिवशी काढलेला असल्याने त्यात blankets दिसत आहेत. त्यांनी आधीची रात्र कुठे काढली ते समजण्यासाठी हा फोटो डकवण्यात आला आहे.
६ डिसेंबर १९९१ :
सकाळी ६ वाजताच दोघांनी हालचाल केली. थोड गवत जमा करून प्रथम अंग शेकून घेतलं व दत्ता व पुंडलिक कॅंप १ वरून कॅंप २ वर येण्याची वाट न पाहताच सकाळी ठीक ७ वाजता उपाशीपोटीच चढाईला सुरुवात केली. काल शेवटचा बोल्ट मारला तेथपर्यंत दोर पकडून पोहोचणे आवश्यक होते. हातही गारठून गेले होते. तरीही किरण अनामिक उत्साहाने ‘झुमार’ नसल्याने कमांडो पद्धतीने दोर नुसताच धरून त्या ओव्हरहॅन्गच्यावर काल मारलेल्या शेवटच्या बोल्टपर्यंत जाण्यात सफल झाला. फ्री-मूव्ह करण्यास संधी नसल्याने किरणने एक बोल्ट ठोकला व त्यात दोर पास करून त्याने पुढे चाळीस फुटांची उंची गाठली. त्याचा मदतनीस नरेंद्र खाली कॅम्प २ वरच्या लेजवरूनच किरणला बिले देत होता. उंची वाढल्याने किरणने सुरक्षेसाठी आणखी एका बोल्टची भर घालून त्याच्यापुढे फ्री मूव्ह करीत परत चाळीसेक फुटांची उंची गाठली. उंची आणखी वाढल्याने आता त्याला मदतनीस त्याच्याजवळ हवा होता. लागलीच त्याने नरेंद्रला वर येण्यास सांगितले. कमांडो पद्धतीने दोर नुसताच पकडून त्या ओव्हरहॅन्गच्या वर येताना नरेंद्रचा हात चांगलाच खरचटून रक्तबंबाळ झाला. त्याला खालून बिले देण्यासाठी कॅम्प २ च्या लेज वर कोणीच नव्हते. जखमी झाल्यामुळे नरेंद्र बिलेच्या सुरक्षेशिवाय किरण पर्यंत पोहोचू शकत नव्हता. त्यातच किरणने दोर वर खेचून घेतला होता. स्वतः वर चरफडत किरणने नरेंद्रला उगीचच बोल लावले. मुंब्य्रात सराव करायला नको वगॆरे…… खरतर चूक किरणचीच होती, फ्री मूव्ह करण्याच्या नादात दोर खूपच वर खेचून घेतला होता.
शेवटी किरणने दोलायमान स्थितीतच बोल्टिंग करण्याचा निर्णय घेतला, पर्यायही नव्हता. अक्षरशः जिवावर उदार होऊन किरणने सावधपणे पायांच्या आधारावरच पालीप्रमाणे कड्याला चिकटून दोन्ही हात सोडून हातोडीचे घाव घालायला सुरुवात केली. बरे, हात जास्त बाहेर काढून हॅमरींग करणे शक्य नव्हते, अन्यथा तोल जाऊन जवळपास १२५ फुटांचा फॉल निश्चित होता तो हि थेट नरेंद्रपाशीच कॅंप २ वर. फक्त कोपरात उरलेली सगळी ताकद एकवटून २५ मिनिटांच्या अथक परिश्रमानंतर किरण बोल्ट ठोकण्यात यशस्वी झाला. सर्प्रथम त्या बोल्ट मधून दोर पास करून स्वतःला सुरक्षित करून घेतले.
एव्हाना ९ वाजले होते. कॅंप १ वर दत्ता व पुंडलिक कुंभकर्णी झोपेतून उठले होते. तेंव्हा किरणने त्या बोल्टला दोर बांधून त्या दोराच्या साहाय्याने रॅपलिंग करत नरेंद्रपाशी कॅंप २ वर उतरला. कॅंप १ वर असलेल्या दत्ता आणि पुंडलिकला आता सामानासहित कॅंप २ वर घेणे आवश्यक होते. किरण खाली पोहोचताच नरेंद्रची चौकशी केली, त्याचा हात चांगलाच खरचटला होता, किरणने मघाशी त्याच्यावर भडकल्याबद्दल माफी मागितली. वास्तविक नरेंद्रच्या जागी दुसरा कुणीही असता तरी वर येऊ शकला नसता कारण पूर्ण एक दिवसाचा उपास, रात्री धडपणे झोप नाही, प्यायला पुरेसे पाणी नाही अशा परिस्थितीत जवळपास ३६ तास काढले होते. आणि तशातच थंडीने हात गारठून दोर हाताच्या पकडीत येत नव्हता हे विशेष!
तसही जखम होण्याची हि काही पहिलीच वेळ नव्हती, अशा अनुभवांना या आधीहि सामोरे गेलो होतो, त्यामुळे ती जखम कुरवाळत न बसता नरेंद्र परत जोमाने कामाला लागला. नरेंद्रला कॅंप २ वरच ठेवून किरण उपलब्ध दोराच्या साहाय्याने रॅपलिंग करत जवळपास १०० फुट खाली एका बोल्टवर लटकत थांबला. दरम्यान पुंडलिक खालून नवीन दोर सोबत घेऊन आधी मारलेल्या बोल्टच्या साहाय्याने किरणच्या दिशेने निघाला. पुंडलिक जवळ पोहोचताच, किरण त्याच्याकडून नवीन दोर घेऊन परत वर कॅंप २ च्या दिशेने निघाला. कॅंप २ वर पोहोचताच किरण व नरेंद्रने दोराच्या साहाय्याने सर्व सामान वर खेचून घेण्यास सुरुवात केली. जवळपास दीडेकशे किलो साहित्य व खाण्याचे सामान कॅंप २ वर खेचून घेण्यात आले.
८.
From Aajoba 1991
या सर्व उपद्द्व्यापात दुपारचे तीन वाजले. सर्वात शेवटी दत्ता व पुंडलिक कॅम्प १ सोडून कॅंप २ वर आले. क्षणभर विश्रांती घेतानाच खाली शैलेश व कुट्टी बेसकॅंपवरून आमच्यासाठी जेवण घेऊन येताना दिसले. परत जेवण घेण्यासाठी खाली उतरावे लागले. दोन दिवसांच्या उपाशीपोटी परिश्रमानंतर शरीर व मन दोन्ही थकली होती. नरेंद्र व किरण तर जवळपास ३६ तासांनंतर जेवत होते. शरीराला थोडावेळ कुठे आराम मिळत होताच तो आलेल्या बातम्यांनी मनाचा आराम पार उडून गेला. दत्ता व पुंडलिक व शैलेश /कुट्टी यांनी बेसकॅंपवरून आणलेल्या ताज्या बातम्या ऐकून मन सुन्न झाल. पण जे समोर आल होत ते स्विकारण अपरिहार्य होत. त्यात आता काहीच बदल घडू शकत नव्हता. या विषयावर रात्री सविस्तर विचार करू अस म्हणून आम्ही परत चढाई करण्यासाठी सज्ज झालो. किरण परत त्याने शेवटी मारलेल्या बोल्टवर पोहोचला. यावेळेस दत्ताला बिलेसाठी सोबत घेतलं. किरणने दत्ता त्याच्याजवळ पोहोचताच फ्री-मूव्ह करत जवळपास ६० फुटांची उंची गाठली. सुरक्षेसाठी तेथेच एक बोल्ट मारून दत्ताला तिथे बोलवून घेतले. दत्ता तिथे पोहोचताच परत किरणने फ्री मूव्ह करत आणखी १०० फुटाची उंची गाठली. आता तो आजोबाच्या मुख्य कड्याच्या पायथ्याशी पोहोचला होता. वर नजर फिरवताच त्या कड्याच्या भव्यतेने त्याचे डोळेच दिपले. दोन्ही बाजूना दूरवर पसरत गेलेल्या आजोबाच्या लांबलचक कडा पाहताना डोळ्यांमध्ये काय साठवू आणि काय नको असे झाले होते. जवळ जवळ हजार फुटांचा ताशीव कडा उभा होता. व सर्वात आश्चर्य व आव्हानात्मक गोष्ट म्हणजे शेवटच्या टप्प्यात ५००-६०० फुट उंचीवर मुख्य कड्यापासून ९० अंशाच्या कोनात बाहेर आलेलं एक अभेद्य दगडी छत आमची वाट पाहत होत.
९.
From Aajoba 1991
ते छत आता दिसायचं कारण कि तो वरचा भाग कायम धुक्यात असायचा. शिवाय आमच्या चढाईच्या मार्गापासून दूर उजवीकडे होता म्हणून आतापर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष झाल होत. आता ते दिसल्यामुळे आमच्या तावडीतून सुटण शक्य नव्हत. या आधी आम्ही १९९० मध्ये पांडवकडा धबधबा येथील ३५ फुटी दगडी छत लीलया पादाक्रांत केल होत. पण ते जमिनीपासून खूपच जवळ होत. इथे मात्र त्याच्या अगदी उलट चित्र होत. हे दगडी छत जमिनीपासून सुमारे ३५०० फुट उंचीवर होत. त्यासाठी किरण आणि दत्ताने तिथेच बसून त्याचा निट अभ्यास केला व दोघांमध्ये चर्चा करून आमच्या आतापर्यंतच्या चढाईच्या मार्गापासून उजवीकडे सुमारे १०० फुट लांब आमचा चढाई मार्ग बदलला. संध्याकाळचे ६ वाजले होते. दरम्यान किरण व दत्ताने पाण्याच्या शोधात कड्यावरील आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. एके ठिकाणी खडकावर थोडासा ओलसर भाग दिसला म्हणून फ्री मूव्ह करत ७० फुट उंच त्या खडकापर्यंत पोचले. तेथील ओलसर खडक हातोडीच्या साहाय्याने फोडून काढला पण त्यातून पाण्याचा एक थेंबही ठिबकेना. पाण्याचा एक थेंब जरी ठिबकत असता तरी दिवसभर चार ते पाच लिटर पाणी सहज जमल असत. आजोबाच्या कड्याने जणू आमची परीक्षा घ्यायचीच ठरवलं होत. अतिशय कष्टी मनाने परतायचा निर्णय घेतला. उद्या डावीकडचा परिसर पाहू तिथे पाणी नक्कीच मिळेल हि मनाशी आशा बाळगून ते दोघेही रॅपलिंग करत रात्रीच्या मुक्कामा साठी कॅंप २ वर दाखल झाले. त्यांचे दोघांचेही चिंताग्रस्त चेहरे पाहून पुंडलिक व नरेंद्र बरेच काही जाणून गेले.
संध्याकाळी ७ वाजताच जेवायला बसलो. अंधार पडल्यावर जेवण शक्य नव्हत कारण बेसकॅंपसारखी इथे दिव्यांची सोय नव्हती. सोबत असलेली मेणबत्ती / काडेपेटी आणीबाणीच्या प्रसंगात जपून ठेवणे आवश्यक होत. जेवताना कुणीच एकमेकांशी बोलत नव्हत. पण प्रत्येकाच्या मनात पाण्याचा प्रश्न थैमान घालत होता. आता जवळ असलेल दोन ते अडीज लिटर पाणी उद्या संध्याकाळपर्यंत पुरवायच होत. जेवण करून प्रथम जमिनीवरचे दगडगोटे साफ करून बऱ्यापैकी जागा समान करून घेतली. काल उघड्यावर काढलेल्या रात्रीच्या आठवणीवर आज मात्र घोंगडीच्या उबदार स्पर्शाने मात केली होती. रात्री झोपताना दिवसभराचा आढावा घेण जरुरी होत.
समजलेल्या बातमीनुसार सुभाष परत घरी जाणार होता. पण अजून किती जण घरी जाणार आहेत हे मात्र माहित नव्हत. दुपारी शैलेश व कुट्टी जेवण घेऊन आले तेंव्हा सर्व स्पष्ट झाले. सुभाष, महेंद्र, दिनेश, मिलिंद, पटेल, अशोक शिबे असे एकूण सहाजण झटकन कमी झाले होते. बेसकॅंपवर आता फक्त नंदू, कुट्टी, शैलेश व बालाजी असे चौघेजणच शिल्लक होते. वास्तविक पाहता प्रत्येकजण बेसकॅंप ते कॅंप १ अशी वर-खाली ये-जा करून कंटाळला (चार तास) होता, आणि महत्वाचे म्हणजे सर्व मनातून घाबरले होते. अर्थात ती वाट पण भयानक होती. पैकी १. सुभाष या मोहिमेचा नेता होता ज्याने शेवट पर्यंत किल्ला लढवायचा तोच काहिही कारण न देता किरणला न भेटताच निघून गेला होता. महेंद्रची रजा संपली होती. पटेलला कंपनीच्या कुठल्यातरी ट्रेकला जायचे होते. दिनेशचा धंदा होता त्यामुळे तो बुडवण शक्य नव्हत. मिलींदची १५ दिवसांची सुट्टी होती, पण तोही थकला होता. अशोक तर आमचा सारथी त्याचाही स्वतःचा धंदा होता, तसाही तो मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी होत नसे. पण आमच्यासाठी त्याची गाडी कायमच उपलब्ध असे.
आनंदला गावी जाणे आवश्यक होते. याच्या विरुद्ध परिस्थिती होती दत्ता आणि शैलेशची. शैलेशच्या बहिणीचे लग्न ठरले होते व त्याची सर्व तयारी त्यालाच करायची होती. त्याही पेक्षा वाईट परिस्थितीत दत्ता अडकला होता. या क्षेत्राशी निगडीत नसलेले त्याचे दोन मित्र खास निरोप घेऊन कुर्ल्याहून आले होते. त्याची आई आजारी पडली होती व घरी तिला पाहायला दत्ताशिवाय दुसर कोणीही नव्हत. खरतर असा निरोप मिळाल्यावर एखादा सरळ घरी पळत सुटला असता. पण तो किरणला भेटून परिस्थिती कथन करण्यासाठी २ दिवस थांबला होता. दुसऱ्या दिवशी काळजावर दगड ठेवून सामान वर चढवण्याच्या कामास लागला पण किरणला काहीच कळू दिले नाही. सर्व स्थिरस्थावर झाल्यावर रात्री त्याने किरणकडे विषय काढला. म्हणजे आता किरणचे दोन खंदे वीर सुभाष आणि दत्ता मोहिमेत नसणार.
किरण व नरेंद्र जेंव्हा थंडीमध्ये कुडकुडत कड्यावर रात्री वेळ सरण्याची वाट पाहत होते तेंव्हा उद्या निघणार म्हणून बेसकॅंपवर कॅंप फायर करून जल्लोष चालू होता. कॅंप १ वर दत्ता आणि पुंडलिक उद्या हि बातमी किरणला कशी सांगायची या काळजीने त्यांना ग्रासले होते. खरेच एका रात्रीत संपूर्ण परिस्थिती कशी बदलली होती! बेसकॅंपवर उरलेल्या शैलेश, नंदू व कुट्टी व बालाजीला काय करावे तो प्रश्न पडलेला. शेवटी आम्ही चर्चा करून करून कंटाळलो. काय व्हायचे असेल ते होवो उद्या आपण सकाळी आपला दिनक्रम सुरूच ठेवायचा. किरण व पुंडलिक ने उद्या पाणी शोधायला निघायचे तर दत्ता व नरेंद्रने कॅंप २ वरून सामान अजून वर चढवून आज चढाई थांबवलेल्या कड्याच्या पायथ्याशी नेउन ठेवायचे. जर त्यांना जवळपास पाणी मिळाले तर त्याच्या आधारे उरलेली चढाई किरण, पुंडलिक व नरेंद्रने पूर्ण करायची. जेवणासाठी आमच्याकडे कॅंप २ वर असलेले खजूर, सुका मेवा, ग्लुकॉन डी ई. वापरायचे. त्यामुळे आता बेस कॅंप वर अवलंबून राहावे लागणार नव्हते. अशी मनाची तयारी करून आम्ही रात्री कड्यावरच झोपी गेलो. हा कड्यावरील उघड्यावरचा ४ था मुक्काम (Bivouac) होता.
From Aajoba 1991
From Aajoba 1991
आजोबाचा नेढ
From Aajoba 1991
From Aajoba 1991
क्रमशः
वाचूनच थकलो
वाचूनच थकलो
माझी तर धडधड सुरू झाली ती
माझी तर धडधड सुरू झाली ती संपलीच नाही. कसं जमवता तुम्ही हे लोक?
फार मोठं जिगर पाहिजे अशी मोहिम फत्ते करायला.
झुकके सलाम अगदी.
मस्त लेख... (ह्या "माबो" वर
मस्त लेख...
(ह्या "माबो" वर १०च लेख का साठवता येतात?)
असो....
हमरे पास मेंदू हय...
हमने दुसरा इंतजाम कर दियेला हय.
मस्त लेख... (ह्या "माबो" वर
मस्त लेख...
(ह्या "माबो" वर १०च लेख का साठवता येतात?)
असो....
हमरे पास मेंदू हय...
हमने दुसरा इंतजाम कर दियेला हय.
सलाम! अभियानात सामिल झालेल्या
सलाम! अभियानात सामिल झालेल्या सगळ्यांच्या जिद्दीला.
३६ तास उभ्या कड्यावर काढले...
३६ तास उभ्या कड्यावर काढले... ग्रेटच!!! घारी आणि गिधाडांना नंतर किरण आणि नरेंद्रच... हॅट्स ऑफ
लेखनही उत्तम सुरु आहे. मात्र आजोबा दम काढतोय..
अप्रतिम .... खरच सलाम
अप्रतिम .... खरच सलाम
अप्रतिम .... खरच सलाम
अप्रतिम .... खरच सलाम
केवळ अतर्क्य!!! ‘आजा’च्या
केवळ अतर्क्य!!!
‘आजा’च्या अशक्य उभ्या कड्यावर टिकून राहण्याच्या जिद्दीला त्रिवार सलाम!
धन्यवाद!!!
केवळ अतर्क्य!!! ‘आजा’च्या
केवळ अतर्क्य!!!
‘आजा’च्या अशक्य उभ्या कड्यावर टिकून राहण्याच्या जिद्दीला त्रिवार सलाम!
धन्यवाद!!!+ १०००
केवळ अतर्क्य!!! ‘आजा’च्या
केवळ अतर्क्य!!!
‘आजा’च्या अशक्य उभ्या कड्यावर टिकून राहण्याच्या जिद्दीला त्रिवार सलाम!
धन्यवाद!!!+ १००००००००००००००००००००००००००००००००००००००००