( खरे तर या लेख मालिकेच्या पहिल्या भागातच काही लिहायला हवे होते. पण माझ्याच मनात ते फार स्पष्ट झाले नव्हते. आता थोडे होतेय. म्हणून लिहायचा प्रयत्न करतेय.
कृष्ण, नेहमी मनाला भुरळ घालणारे एक गारुड ! किती विविधांगी व्यक्तित्व ! आपण पाहू तसे दिसणारे, अन तरीही प्रत्येक वेळा काही नवे सांगणारे, सूचवणारे, शिकवणारे.
या व्यक्तित्वाच्या सोबत काही जुन्या, काही नव्या, काही काल्पनिक घटना जगून बघायचा हा प्रयत्न. या सर्व लिखाणाला पुरावे सापडतीलच असं नाही, किंबहुना माझ्या मनातले हे सारे खेळ... कधी काही वाचलेले, ऐकलेले. त्याला धरून मनात उठणारे हे तरंग. ते चितारण्याचा हा प्रयत्न फक्त !
त्यामुळे काहींना पटतील, भावतील, काहींना अवास्तव वाटतील. पण त्यात वास्तव शोधायचेच तर त्यातील भावना, तत्व यांत शोधा. अन्यथा कवी कल्पना म्हणुन सोडून द्या.
राधा ही मला कृष्णाची सारासार विवेकबुद्धी वाटते; राधा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून कृष्णाचे अंतर्मनच आहे. भले- बुरे, नैतिकता- अनैतिकता, राजकारण- माणुसकी, ... या सा-यात एक तरल सीमा रेषा आखणारे त्याचे मन म्हणजे राधा. आणि म्हणून ही राधा त्याला त्याच्या सा-या आयुष्यभर भेटत राहतेय. खरी राधा गोकुळापुरती; पण ही त्याची मनसखी मात्र सतत त्याच्या सोबत, त्याला सजग ठेवणारी.)
-----------
आणि तो ही दिवस आठवतो...
थंडीचे दिवस होते; मध्यान झालेली. सगळे बाल गोपाल जेवून यमुनेतीरी उन खात पहुडलेले. सारीकडे छान हिरवेगार गालिचे पसरलेले. वृक्ष डेरेदार होऊन हिरवी छत्र चामरं ढाळत उभे होते. उन्हे डोक्यावर आली तरी हवेत एक दाट गारवा भरला होता. यमुनाही थोडी जडशीळ झालेली, सुस्तावलेली;अन सभोवती आम्ही सारे!
तेव्हढ्यात तू झळकलीस, हो हो झळकलीसच. उन्हात तुझा कोरा, नवीन राजवर्खी रंगाचा, पिवळ्या, लाल, हिरव्या रंगाच्या नक्षीचा, घागरा खरच झळकन लकाकला. घाग-यावरच्या छोट्या छोट्या बिंदल्या;तुझ्या पावलांच्या ताला;; उन्हात चकचकत होत्या .
डोक्यावरची गर्द निळ्या रंगाची ओढणी वा-यावर मंद गोलाकार घेत होती अन खाली तुझ्या डौलदार चालीतून तुझा घागरा तालात पुढे मागे होत होता. जणुकाही एखादा मोरच आकाशातल्या मेघांना पाहून आपला पिसारा फुलवत नाचत होता.
आम्ही सारे मंत्रमुग्ध होऊन तुझ्या येण्याकडे टक लावून पहात होतो.
अन तू ... तू कोणत्या तरी धुंदीत भराभर चालत येत होतीस.
अगदी जवळ आलीस तशी एका गोपीने तुला हटकले..
"राधे काय ग, ना सण ना काही कारण; आज नवीन घागरा? "
अन मग तू आधी दचकलीस अन मग लाजलीस.
"अग कालच अनयने आणला मथुरेच्या बाजारातून. "
" अग मग तसाच कोरा घातलास; आजच? "
" अग तोच मागे लागला ना" तुझ्या तोंडून अलगद शब्द सुटले. अन पुन्हा लाजलीस.
" अन मग, आता दुपारची यमुनेवर का आलीस ग? आज तर अनय घरीच आहे की "
" काय करू ? अनयचा हट्ट मी नवीन घागरा घालावा, अन सासूचा राग. कशाला पुरे पडू सांग ग.... मग सासूने रागाने पाठवले पाणी भरायला... यावच लागलं ग..."
तुझी घाई चालूच होती. माझ्याकडे नजरही न टाकता पटकन घागर भरलीस अन पाठमोरी होऊन चालू पडलीस.
माझा हात बासरी कडे जातच होता, तेव्हढ्यात सर्र्कन वळलीस, म्हणालीस " कृष्णा आज नको रे थांबवूस..."
अन पुन्हा वळून पुढे झालीस.
तुझ्या गर्द निळ्या ओढणीत पुन्हा वारा भरू लागला. अन मला कुठून तरी हुक्की आली; हातात कधी गलोल आली अन सण्णकन दगड तुझ्या घागरीवर आपटला.... ढप्प ...
अन क्षणात कोरा करकरीत सुरेख रंगीत घागरा चिंब चिंब झाला, सारे कच्चे रंग एकमेकात मिसळून गढूळ झाले.
सारे गोप हसू लागले. तसा तर नेहमीचा आमचा हा खेळ. तुलाही ओळखीचा झालेला.
पण आज वेळ वेगळी होती.
तू हलकेच वळलीस. तुझा घागराच नव्हे तर तुझे डोळेही गढुळले होते. ओढणीतले सारे काळे-निळे मेघ डोळ्यात जमा झाले होते.
एका क्षणात तू पुन्हा उलटी वळलीस अन ओला, जड घागरा कसाबसा सावरत पळत सुटलीस. त्या कच्च्या रंगांना खारट पाण्यात घालून; त्यांचा रंग टिकवण्याची तुझी धडपड होती. पण आता उशीरच झाला होता.
कधी नव्हे ते माझ्याही मनात काही डचमळले. काय ते नाही कळले, पण काही तरी हलले होते खासच.
अन मग ती संध्याकाळ अशीच पारोशी-पारोशी होत गेली.
रात्रही गार, शांत असूनही नेहमी सारखी कुशीत घेत निजवली नाही.
मग दुसरा दिवस उजाडला, आळसावलेला, कसलीही उभारी नसलेला. तुझ्या ओढीने यमुने तीरी आलो खरा पण ना तू आलीस, ना यमुना माझ्याशी बोलली, अन बासरी.. ती ही बिचारी मुकीच राहिली.
असेच अजून दोन दिवस गेले.
थंडीतलेही खूssssप मोठ्ठे दिवस...
अन मग तू भेट्लीस. संध्याकाळ होत आलेली. गारठा हाडांपर्यंत पोहचत होता. मी गाईंना घेऊन मी माघारी येत होतो. अन यमुनेच्या काठावर एका खडकावर तू बसलेलीस.
मी जवळ येताच तट्टकन उठलीस, सामोरी झालीस.
माझ्या डोळ्यात डोळे रोखून पहात विचारलस,"कधी मोठा होणार तू लल्ला?..."
माझ्या गालावर ओघळणारे थेंब पुसत म्हणालीस, " असा का रे वागतोस ? "
अन माझं लक्ष तुझ्या हाताकडे गेलं... काळे निळे झालेले ते हात, मी दचकून वर पाहिलं. तुझ्या फिक्या ओढणीतून तुझ्या गालावरचे, पाठीवरचे वळ... मी कळवळलो.
"राधे, माझ्यामुळे मार बसला ना तुला? "
मटकन मी तुझ्या पायाशी बसलो. तू पण मागच्या खडकावर टेकलीस. माझे मस्तक मांडीवर घेत थोपटत म्हणालीस;
" अरे कच्चे रंग, ते नाजूकच असतात रे. म्हणून तर त्यांना खा-यापाण्याने न्हाहू घालायचे. तरच पक्के होतात ते. तसेच सोडले वाहत्या पाण्यात, तर वाटेल तसे रंगतील अन शेवटी गढुळतीलच की ..."
अन मग माझ्या माथ्यावर खा-या पाण्याचा अभिषेक करत राहिलीस तू ... कितीतरी वेळ...
"राधे ..."
राधे...१. http://www.maayboli.com/node/51393
राधे...२. http://www.maayboli.com/node/51440
राधे...३. http://www.maayboli.com/node/51543
राधे...५. http://www.maayboli.com/node/51968
राधे...६. http://www.maayboli.com/node/52356
राधे... ७. http://www.maayboli.com/node/54215
कालच पाहीलेला हा धागा, पण
कालच पाहीलेला हा धागा, पण आजसाठी राखुन ठेवलेला.
दिवसाची सुरूवात छान झाली.
मला हे चिंतन सगळ्यात आवडलंय. >>>> मलाही सगळ्यात जास्त
आइग्गं
आइग्गं
सुंदर.
सुंदर.
आइग्गं अरेरे >>>> + १००००
आइग्गं अरेरे >>>> + १००००
अवल _______/\_______
अवल _______/\_______
मी हे मिसलं होतं ह्यातली
मी हे मिसलं होतं
ह्यातली राधा.. कृष्णाला घडवणारी अधिक वाटतेय. कृष्णावरही सावली धरणारी...
भारी जमलाय हा सुद्धा लेख, अवल.
Pages