आजोबा ४००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
गिरीविराज हाईकर्स, डोंबिवली च्या पहिल्या पिढीतील लढवय्यांची साहसकथा लिहिताना मला स्वतःला खूपच आनंद होत आहे. मी स्वतः या मोहिमेचा साक्षीदार नव्हतो, अर्थात १९९१ साली मी शाळेतले धडे गिरवीत होतो. राग, लोभ, माघार, जबरदस्त इच्छाशक्तीने भरलेली हि चित्तरकथा गेली २३ वर्षे काळाच्या पडद्याआड आठवणींच्या जळमटांखाली दडलेली होती. किरण अडफडकर काकांनी २१ दिवसांच्या मोहिमेदरम्यान घडलेल्या प्रत्येक क्षणाचे अगदी बारीक बारीक तपशील आपल्या दैनंदिनीमध्ये लिहून आपल्या आठवणींच्या कोपऱ्यात जपून ठेवले होते. भारतीय गिर्यारोहण विश्वातील पहिलीच सर्वाधिक उंचीची यशस्वी कृत्रिम प्रस्तरारोहण मोहीम असूनही याची कुठेही म्हणावी तशी वाच्यता झाली नाही. साधनांची कमतरता, मनुष्यबळाची वाणवा, कमकुवत आर्थिक बाजू असूनही केवळ आपल्या जबरदस्त इच्छाशक्तीने मोहीम यशस्वी करणाऱ्या या सगळ्या शिलेदारांच कतृत्व काळाच्या पडद्याआड कायमच विस्मृतीच्या खोल गर्तेत विरून जाऊ नये म्हणून आम्हा नवीन पिढीकडून त्यांना हा मानाचा मुजरा! - सतीश कुडतरकर (सूनटून्या)
शिलेदार:
किरण अडफडकर, सुभाष पांडियन, अनिल दगडे, अनिल इमारते, मिलिंद आपटे, नंदू भोसले, आनंद नाकती, अशोक शिबे, पुंडलिक तळेकर, शेखर फाटक, नरेंद्र माळी, कुट्टी, दत्ता शिंदे, महेंद्र साटम, शैलेश, बालाजी, दिनेश रुपारेल, शेरेकर.
========================================================================================================================================================
काही संज्ञा:
पिटोन - ४-६ इंचाची धातूची पट्टी - कपारीमध्ये ठोकतात.
चोकनट - फुटभर तारेच्या टोकाला लावलेला काही सेंटीमीटर पासून साधारण एक इंचापर्यंत धातूचा विविध आकारातला तुकडा- छोट्या कपारींमध्ये अथवा छिद्रांमध्ये अडकवतात.
पेग - धातूची टोकदार सळई
जुमार - नुसत्याच हाताने दोर धरून वर जाण्यास ''कमांडो'' पद्धत म्हणतात जी सैनिक वापरतात. पण हि पद्धत थोड्या अंतरासाठी आणि उंचीसाठी ठीक आहे.पण जेंव्हा अंतर आणि उंची वाढते त्यावेळेस हि पद्धत उपयोगाची नसते. चढाईच्या दरम्यान तुम्हाला रोज खाली-वर करायचे असल्याने अशा वेळेस 'जुमार' कामास येतात. जुमार हे एक उपकरण दोराला अडकवण्यात येते आणि त्याचे एक टोक तुमच्या हार्नेसला बांधतात. जुमार हे असे उपकरण आहे जे दोरावरून फक्त वर जाते, खाली येत नाही आणि तुमचे श्रम वाचवते.
============================================================================
खरतर या मोहिमेची सुरुवात फेब्रुवारी १९९० पासून झाली असेच म्हणावे लागेल. किरण व इतर सहकाऱ्यांनी रतनगडचा ट्रेक आखला होता. सोबत किरणच्या कंपनीतील सहकारी दिलीप आणि सुराडकर हे दोघेही प्रथमच येत होते. हा ट्रेक आखण्यामागे आमचा मुख्य हेतू म्हणजे रतनगड व सभोवतालचा परिसर नजरेखालून घालणे व त्यातूनच एखादी अवघड मोहीम हाती लागते का ‘ते’ पाहणे. रतनगडाच्या माथ्यावरून सभोवतालचा परिसर पाहून चक्क वेड लागायचीच वेळ येते. एकाहून एक सरस असे थरारक कडे, अगदी ताशीव (गुळगुळीत) स्वरुपात सुमारे २००० ते ३००० फुट खोल दरीत उतरलेले पाहून उरात धडकी न भरली तर नवल! तरीही धुक्यात पहुडलेला परिसर नीट दिसत नव्हता म्हणून बर. पहिल्या प्रथम किरणच लक्ष वेधून घेतलं ते कात्राबाईच्या कड्याने. सुमारे २५०० फुट उंचीचा कडा पाहून आम्हाला इथवर येण्याचं समाधान वाटलं. खर तर खूपच दुरून आम्ही त्याच दर्शन घेत होतो व त्यामुळे नक्की कल्पना येत नव्हती. पण काहीतरी (पूर्वीपेक्षा सरस) थरारक हाती गवसलं होत हे नक्की! तशाच धुकट वातावरणात संधी साधून दोन फोटो काढले. नंतर फोटो पाहिल्यानंतर सदर कड्यावर आरोहण करण्याची मोहीम जवळ जवळ नक्की करण्यात आली व त्या दृष्टीने पुढील तयारी सुरूही झाली. लगेचच पावसाळ्यात १५ ऑगस्ट १९९० ला डोंबिवलीहून गिरीविराजची टीम रेखी करण्यासाठी रवाना झाली. या वेळी खालून म्हणजे कोकणातून (आसनगाव-शहापूर-डेहणे-आजोबा-कात्राबाई) कात्राबाईच्या पायथ्याशी पोहोचण्याच ठरलं होत.
डेहणे गावाच्या पुढे असलेल्या चिंचपाडा गावातून एक स्थानिक वाटाड्या घेतला आणि कात्राबाईच्या घळीच्या रोखाने निघालो. पाऊस धो-धो कोसळत होता, सभोवताली दाट धुक पसरल्याने सकाळचे सात कि रात्रीचे हेच समजत नव्हत. धुवांधार पावसाने आमची रेकी पार कोलमडून टाकली. कात्राबाईच्या घळीत निघालेलो आम्ही दुथडी भरून वाहणारे ओढे, त्यांच्या प्रवाहातून मनाविरुद्ध वाहून जाणारे भलेमोठे दगडधोंडे, वरून मध्येच केंव्हाही गडगडाट करीत कोसळणाऱ्या दरडी व दाट धुक्यामुळे सोबत वाटाड्या असूनही आम्हाला परत फिरावं लागलं. आता पावसाळा थांबेपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.
त्या दरम्यान डिसेंबर-१९९० व मार्च-१९९१ मध्ये आम्ही दोन प्रस्तरारोहणाच्या मोहिमा संपवल्या होत्या. शेवटी परत २९ मार्च, १९९१ ला अशोक शिबेच्या जीपने थेट कात्राबाईच्या पायथ्याशी पोहोचलो. तेथे पाहणी करताना एक दिसून आले कि आपण जसा कडा शोधतोय तसा हा नाही. फार तर आठ दिवसात मोहीम संपलीच असती पण आम्ही या पेक्षाही चढाई करण्यास अवघड अशा कड्याच्या शोधात होतो, त्यामुळे कात्राबाईच्या कड्यावर काट मारण्यात आली. प्रत्येकवेळी पहिल्या पेक्षा अवघड असाध्य मोहीम आखून तो साध्या करण्याचे जे व्यसन लागले होते त्यामुळे साहजिकच कात्राबाईचा कडा आम्ही बाद ठरविला. आता पुढे काय?
कात्राबाईच्या रेकीसाठी आम्ही डेहणेच्या पुढील चिंचपाडा गावात आमची जीप ठेवली त्याचवेळी गावातच समजले कि मुंबईची काही गिर्यारोहक मंडळी आजोबावर चढाई करण्यास आली आहेत. कात्राबाईला जाणारी वाट पूर्णपणे आजोबाच्या संपूर्ण कड्याला वळसा घालूनच पुढे सरकते त्यामुळे साहजिकच आजोबाच्या कड्याचे पूर्णपणे दर्शन आम्ही घेतले होते. या पर्वताची डेह्णे-चिंचपाडा गावाकडील बाजू एका सरळ रेषेत थेट कोकणात उतरत नाही तर अक्षरशः कोसळते. तसेच सोबतच्या दुर्बिणीने रॉकपॅच जेव्हढा पाहता येईल तेव्हढा नजरेखालून घातलेला होता. मुंबईची गिर्यारोहक मंडळी कड्यावर दिसतायत का हे पाहण्यासाठी किरणने दुर्बिणीच्या नजरेतून सारा कडा पालथा घातला, कड्याच्या अवघड मार्गावरून पुन्हा पुन्हा नजर फिरवली पण कुणीही नजरेस पडेना. कात्राबाईचा कडा बाद ठरवून फिरताना मुद्दाम आजोबा डोंगराच्या कड्याची संपूर्ण रेखी केली व त्यातूनच एक अवघड मार्ग गिरीविराजच्या मोहिमेसाठी किरणने मनातल्या मनात निवडला. दुपारी चिंचपाडा गावात परत फिरलो व जीप घेऊन वाल्मिकी आश्रमाच्या वाटेला लागलो.
कड्याचं आता खूप जवळून दर्शन होत होत, पण कड्यावर गिर्यारोहक मंडळी काही दिसेनात, तसेच पाहत पाहत वाल्मिकी आश्रमात पोहोचलो. तिथे आश्रमाजवळच स्लीपर हायकर्स व ईगल मोंटेनिअर्स यांचे दोन बॅनर्स लावलेले आढळले. म्हणजेच दोन्ही संस्थांनी मिळून हि मोहीम हाती घेतली होती. काही ओळखीचे चेहरे वाटले पण त्यातील बहुतेक मंडळीनी किरणला ओळखले आणि त्यांच्यात कुजबुज सुरु झाली. त्यांच्या कॅंपवर प्रवेश केला, शिळोप्याच्या गप्पा झाल्यावर त्यातीलच एकाने किरणला त्यांनी निवडलेला चढाईचा मार्ग दाखवण्यास सुरुवात केली. त्यांनी निवडलेला मार्ग पाहून किरणला हायस वाटलं, कारण त्यांनी निवडलेला मार्ग किरणने ठरवलेल्या मार्गापेक्षा पूर्णतः भिन्न होता व कड्याची मध्यवर्ती उंची सोडून सीतेच्या पाळण्याच्या वरच्या बाजूला होता. म्हणजे आजोबाच्या उत्तुंग भिंतीची मध्यवर्ती चढाई अद्यापही अभेद्य होती. किरणने नियोजित केलेला मार्ग आणि या लोकांनी हाती घेतलेला मार्ग या दोहोंमध्ये जवळपास ४० मिनिटांचे अंतर होते. त्यांनी निवडलेल्या मार्गाची उंची जास्तीत जास्त ७००-८०० फुट असेल. पण किरण ने निवडलेला मार्ग हा आजोबाच्या अगदी मध्य भागातून जात होता आणि उंची ३००० फुटांच्या वर होती.
त्याचवेळी किरणने गिरिविराजचा मार्ग तेथेच बसून नक्की केला. परत जाताना वाटेत सुभाष, नरेंद्र इत्यादींशी चर्चा करून थोडं खाली उतरल्यावर पुन्हा एकवार आम्ही दुर्बिणीच्या साहाय्याने गिरिविराजच्या मोहिमेसाठी संपूर्ण मार्ग नजरेखालून घातला व त्यानुसार जीप मध्येच आखणी करायला सुरुवात केली.
हा फोटो ''यो रॉक्स'' यांच्याकडून साभार
From Aajoba 1991
१.
From Aajoba 1991
२.
From Aajoba 1991
३.
From Aajoba 1991
From Aajoba 1991
From Aajoba 1991
From Aajoba 1991
साधारपणे २० दिवस ह्या अवघड चढाईसाठी लागणार होते. सतत १०/१२ सपोर्टिंग टीम मेंबर्स, ५/६ बेसकॅम्प मेंबर्स व ६/७ लीड क्लाइम्बर्स असा सुमारे २५ माणसांचा ताफा लागणार होता. घरी पोहोचल्यावर त्यानुसार सर्व बजेट बनवायला घेतले. कारण या मोहिमेसाठी आर्थिक मदत पुष्कळ लागणार होती व त्याची तयारी आत्तापासूनच करावी लागणार होती. आमचे बजेट असे होते.
अंदाजे कींमत
१. प्रसरणशील खिळे (३०० नग) Expansion bolt - रू. १०,०००/-
२. १००० फुट दोर रु. १२,५००/-
३. रेशनिंग, मेडिकल, वाहतूक व्यवस्था रु. १०,०००/-
४. फोटो व स्लाईड रु. ४,०००/-
५. कॅमेरा आणि उच्च क्षमतेची झूम लेन्स रु. १५,०००/-
६. व्हिडीओ शुटींग रु. ३०,०००/-
छायाचित्रण व व्हिडीओ शुटींगवर खर्च करण्याचे कारण म्हणजे हि मोहीम भारतीय गिर्यारोहण क्षेत्रातील सर्वात मोठी व अवघड मोहीम ठरणार होती त्यामुळे तो खर्च अत्यावशक होता. तत्कालीन पद्धतीप्रमाणे गिर्यारोहण क्षेत्रात कोणत्याही मोहिमेचा दर्जा हा ती यशस्वी करताना चढाई साठी घेतलेला मार्ग, म्हणजेच क्लाइम्बिंग रूट हा महत्वाचा असतो. त्यानुसार आतापर्यंत मुंबईकर गिर्यारोहण संस्थांनी साध्य केलेल्या अवघड मोहिमांपैकी पहिले स्थान द्यावे लागते कोकण कड्याच्या मध्यवर्ती चढाईला. सुमारे १४०० फुट उंचीचा हा कडा सर करताना त्याला सुमारे ४२ दिवस लागले व एकूण १४० एक्सपानशन बोल्ट वापरावे लागले होते. मुलुंडच्या समिट हायकर्स व पुण्याच्या 'पुणे वेण्चर्स (टेल्को ग्रुप)' ने मिळून मिलिंद पाठकच्या नेतृत्वाखाली सन १९८८ ऑक्टोबर मध्ये हि मोहीम यशस्वी केली होती.
सर्व प्रथम १९८३ साली ठाण्याच्या गिरीविहार या संस्थेने कृत्रिम प्रस्तरारोहण सुरु केले. चारुहास जोशी यांच्या नेतृत्वाखाली १०० एक्सपानशन बोल्ट वापरून त्यांनी ४०० फुटी जीवधनच्या वानरलिंगी सुळक्यावर प्रथम चढाई केली. त्यानंतर हॉलिडे हायकर्स, केव्ह एक्स्प्लोरर्स, नेचर लवर्स, पुण्याच्या काही संस्थांनी थोड्याफार मोहिमा यशस्वी केल्या. पण ह्या सर्व चढाया करताना कोणत्याही एकाच संस्थेने ह्यात सातत्य मात्र दाखवलं नाही.
या काळात 'गिरीविराज हायकर्स' म्हणजे आम्ही दोराशिवाय गिर्यारोहण मोहिमांचा सपाटा लावला होता. १९८३ ते १९८६ पर्यंत एकूण २८ मोहिमा दोराशिवायच यशस्वी केल्या त्या देखील कमीत कमी वेळात. पण १९८७ पासून आम्ही देखील एकाहून एक अवघड मोहिम आखून १८ मोहिमा यशस्वी केल्या.
त्याची खरी पावती मिळाली ती 'हिमालयन क्लब'' च्या ''सह्याद्री बुलेटीन'' या पुस्तकाच्या रूपाने. त्यांनी मेजर रॉक क्लाइम्बिंग इन सह्याद्री १९८५-१९९० या सदरात गिरीविराज हायकर्सचे तब्बल १४ मार्ग देऊन प्रस्तरारोहणातील आमचे सातत्य मान्य केले होते. (संदर्भ: ‘द सह्याद्री बुलेटीन- जुने १९९० नं. २’). त्या नंतर जानेवारी १९९२ च्या आवृत्तीत सुद्धा दोन रूट छापून आले. त्याच वेळी सदर पुस्तकात स्लीपर हायकर्स व ईगल मोंटेनिअर्स या संस्थांच्या आजोबा कड्याच्या क्लाइम्बिंग रूटची माहिती छापून आली होती. एकूण ३२ एक्सपानशन बोल्ट व ९ पिटॉन वापरून त्यांनी ५५० मीटरचा (म्हणजेच १७८० फुट उंचीचा) कडा २८ मार्च ते ०१ एप्रिल १९९१ मध्ये सर केला होता (फक्त पाच दिवस?). त्यापैकी स्लीपर हायकर्सची हि पहिलीच कृत्रिम प्रस्तरारोहण मोहीम, तर ईगल मोंटेनिअर्सच्या खात्यातील हि सर्वात जास्त बोल्ट असलेली मोहीम. सुमारे २००० फुट उंचीचा कडा सर करताना फक्त ३२ बोल्ट वापरले म्हणजे खरतर त्यांनी मुख्य मध्यवर्ती चढाईस हात न घालता वेगळाच मार्ग निवडला होता (अर्थात धबधब्याचा). त्यातही शेवटचा १००० फुटांचा तिरकस रेषेतील मार्ग होता त्या मार्गावर कोणीही सामान्य ट्रेकर्स आरामात चालत गेला असता.
गिरीविराजच्या बाबतीत सांगायचं झाल्यास आम्ही प्रस्तरारोहण किंवा गिर्यारोहणाच कोणतही प्रशिक्षण घेतलेलं नाही. पण स्वबळावर एकलव्यासारख खपून आम्ही आज गिर्यारोहणात एव्हढी प्रगती साधली आहे. तसेच आमची एकच संस्था अशी आहे कि ज्यांनी प्रस्तारारोहणास लागणारी सर्व साधने स्वतःच खपून मेहनीतीने तयार केली होती. तसेच कितीही मोठी अवघड मोहीम आम्ही कोणत्याही इतर संस्थेची मदत न घेता व तीही सलगपणे यशस्वी करू शकतो आणि तीही कमीत कमी वेळात. याची साक्ष देतील पांडवकडा, नागफणी अर्थात डयुक्स नोज, ढाक भैरी, पालीचा सरसगड, मुंब्रा देवी, इत्यादी मोहिमा.
आमच्या दृष्टीने आम्ही काढलेल्या खर्चाच्या डोंगराकडे पाहता इतकी मोठी रक्कम जमा होणे थोडे कठीणच होते. तरी पण व्हिडीओ शुटींगला काट देणे व छायाचित्रणामध्ये कपात करून साधारण ३० हजार रुपयापर्यंत तरी खर्च अत्यावशक होता. पैसे जमवण्यासाठी प्रत्येक सभासदाकडे डोनेशन बुक दिले गेले व प्रत्येकाने जास्तित जास्त कितीही पण कमीत कमी १०० रुपये तरी जमवलेच पाहिजे हे बंधन घातलं. त्या दृष्टीने सर्वच जण प्रयत्नाला लागले, त्यातच अनिल दगडेच्या प्रयत्नांनी त्याचा मित्र जगताप याने प्रवीण खामकर, दूरकुंडे व अपराध साहेबांच्या मदतीने श्री. एकनाथ बांदल यांची भेट घडवली व बांदल साहेबांनी थेट महाराष्ट्राचे तत्कालीन क्रीडामंत्री श्री. शामराव अष्टेकर यांचेपाशीच आम्हाला सर्व लवाजम्यानिशी नेले. अष्टेकर साहेब आमच्या
गिर्यारोहाणातील कामगिरीवर खूपच खुष झाले व त्यांच्यामुळे आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून आजोबा मोहिमेसाठी एकूण रू. १५,०००/- अनुदान त्वरित मंजूर झाले. त्यामुळे आम्ही आर्थिकबाबतीत थोडे निशंक झालो. कारण आता पैशाअभावी आमची मोहीम रद्द होणार नव्हती.
४.
From Aajoba 1991
त्याचवेळी इतरही बाबींकडे लक्ष पुरविणे आवश्यक होते. आम्ही सर्व कामे प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे वाटून दिलीच होती व प्रत्येकजण स्वतःच्या कुवतीनुसार कामालाही लागला होता. किरणने त्याच्या अंधेरीतील एका पार्टीला भेटून त्याच्या कडून सुमारे १००० एक्सपानशन बोल्ट देणगीच्या रूपाने मिळवले. आता निदान बोल्ट साठी ३/४ वर्षे धावपळ करण्याची आवश्यकता नव्हती. फक्त बोल्टसाठी रींग बनविण्याच काम पुंडलिक तळेकरवर सोपवले. प्रथम आम्ही रिंग बेंड करण्यासाठी एक डाय बनवली आणि नंतर बाजारातून योग्य मापाची सळई घेऊन त्याच्या ३०० रींगा बनवल्या. त्याच्यावर प्लेटिंग करून त्या गंजरोधक बनविल्या.
बोल्ट पाठोपाठ किरण आणि सुभाषने स्वतःच २ कामचलाऊ ‘जुमार’ तयार करून घेतले. त्यासाठी किरणने प्रथम आकारानुसार ड्राईंग बनवले व नंतर लोखंडी जाड पत्रा घेऊन तो वळवून जुमारची प्लेट बनवली व त्यात योग्य ते पार्ट बसवून जुमार तयार केले. अर्थात ते कामचलाऊ निघाले ज्याचा प्रत्यक्षात काहीच उपयोग झाला नाही.
एक ५०० फुटी दोर विकत घेण्यात आला ते काम दत्ता शिंदेने केले. त्या शिवाय १००० फुटी दोर नुकताच गेल्या मोसमात आम्ही खरेदी केला होताच. सामान वाहून नेण्यास सॅक अत्यावश्यक होत्या. त्यासाठी अॅसल्युमिनिअमचे पाईप घेऊन ते वाकवून त्याच्या फ्रेम बनवायचे काम विजय सावंतला देण्यात आले. त्याने एकूण ११ फ्रेम तयार करून दिल्या. फ्रेमही खूप उशिरा मिळाल्याने अगदी जाण्याच्या दिवशी पर्यंत कुट्टी, विजय, पुंडलिक आणि सुभाष त्या पूर्ण करण्याच्या मागे लागले होते. शेवट पर्यंत सॅक तयार झाल्याच नाहीत, त्यामुळे अक्षरशः गोण्यांमध्ये सामान भरण्यात आले.
दरम्यान किरणने ४/५ रात्री खपून ७-८ माणसे मावतील एव्हढा एक तंबू स्वतः शिवला. त्याचेही थोडेफार काम शिल्लक होते, ते थेट आजोबाला पोहोचल्यावर करण्याचे ठरले. या शिवाय लाकडे फोडण्यासाठी कुऱ्हाड, टिकाव, कोयता, सुरे व वेळप्रसंगी आत्म सरंक्षणासाठीची सामग्री घेतली. कॅराबीनर्सची साफसफाईचे काम करण्यात आले, नवीन पिटोन, चोकनट बनविण्यात आले. आठ दिवसआधी खाद्यपदार्थांची खरेदी सुरु करण्यात आली. महेंद्र, दत्ता, नंदू, शैलेश वगेरे मंडळी या कामी जुंपली. क्लाइम्बिंग टीमसाठी लागणारे खास अन्नपदार्थ ''फास्टफूड'' (सुका मेवा) महेंद्रने भायखळा येथे जाऊन खरेदी केले. शिवाय डाळी, तांदूळ, गव्हाचे पीठ, साखर, गुळ, चहा, दुध पावडर, मसाल्याचे पदार्थ, औषधे इत्यदि खरेदी करून झाले. या मोहिमेस आम्ही एकूण खर्च काढला होता रु. ८१,५००/- . पण आम्ही जास्तीत जास्त २५,०००/- रुपयेच जमवू शकलो होतो. त्यामुळे नवीन कॅमेरा घेणे, व्हिडीओ शुटींग करणे व इतर अवास्तव खर्च यांना काट देणे भाग पडले. म्हणजे जेमतेम कशीबशी आमची मोहीम आम्ही पूर्ण करू शकत होतो. अतिशय काटकसर करून! खर तर या मोहिमेच व्हिडीओ शुटींग होण अत्यंत आवश्यक होत, पण म्हणतात ना, सारी सोंग आणता येतात पण पैशाचं नाही.
अखेर ३० नोव्हेंबर, १९९१ च्या मध्यरात्री किरण अडफडकर, सुभाष पांडीयन, पुंडलिक तळेकर, दत्ता शिंदे, अनिल दगडे, नंदू भोसले, नरेंद्र माळी, महेंद्र साटम, आनंद नाकती, मिलिंद आपटे आणि कुट्टी असे १२/१३ जण डोंबिवलीहून निघालो. कल्याण-आसनगाव-शहापूर-डोळखांब-साकुर्डी-डेहणे असा प्रवास करत पहाटे ५.०० वाजता आजोबाच्या पायथ्याच्या जास्तीत जास्त जवळपास पोचलो. पुढे टेम्पो जाणे शक्य नव्हते. तेथेच टेम्पो रिकामा केला व नंतर उतरवलेले सर्व सामान प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार घेऊन आश्रमाच्या दिशेने निघालो. दोन फेऱ्यांमध्ये सर्व सामान वाल्मिकी आश्रमात पोचवायला दुपारचे २.०० वाजले. प्रत्येकजण सामान वाहून दमला होता. वर पोहोचताच प्रथम चहाचे सामान काढून किटलीत चहा टाकला व अनिल इमारतेने मिळवून दिलेली ब्रोकन बिस्कीट व चहा प्रत्येकाने यथेच्छ पोटात ढकलला.
वाल्मिकी आश्रमातच गेलो ४० वर्षे वास्तव्य असलेले वृद्ध रामेश्वरबाबा व त्यांच्या सहकाऱ्यानाही चहापाणी दिले. अशाप्रकारे ताजेतवाने झाल्यानंतर आम्ही तंबू लावण्यासाठी जागेच्या शोधत निघालो. इकडे इतक घनदाट अरण्य आहे कि दिवसासुद्धा जमिनीवर सूर्य प्रकाश पोहोचत नाही. आश्रमाच्या जवळच सपाट जागी प्रथम सगळ्यात मोठा तंबू उभारला. सर्व सामान त्यात क्रमवार वर्गीकरण करून लावले व नंतर किरणने स्वतःच शिवलेला दुसरा तंबू उभारायला घेतला. या तंबूच्या तळाला ब्रासचे आईलेट ठोकायचे राहिले होते. हा नवीन त्रिकोणी आकाराचा तंबू छानच दिसत होता. याच्या दाराला दोन्ही बाजूनी चेन लावल्यामुळे साध्या मुंगीला सुद्धा शिरण्यास वाव नव्हता. संध्याकाळी ७.०० वाजले तंबू लावेस्तोवर. तेव्हढ्यात आश्रामाशेजारील असलेल्या एका मोठ्या घराच्या (धर्मशाळा) कोपऱ्यात नंदू व अनिलने इतर सहकाऱ्याच्या मदतीने मातीने लिंपून दोन चुली बनवल्या व तेथेच भांडीकुंडी व्यवस्थित रचून आमची किचन रूम बनवली.
५.
From Aajoba 1991
६.
From Aajoba 1991
आता ते रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागले. काहीजण कुऱ्हाड /कोयता घेऊन लाकडे आणण्यास गेले. आजोबाच्या डोंगररांगांमध्ये शाई नदीचे उगमस्थान आहे. त्यामुळे इथे पायथ्याशी वर्षभर झऱ्याचे मुबलक पाणी असते. हेच पाणी एका मोठ्या हौदामध्ये जमवून आंघोळीची सोय होते. मोहिमेविषयीच्या माहितीबद्दल बनवलेले बॅनर आश्रमाच्या प्रवेशद्वारावर आणि एक तंबूजवळ लावला. सर्व कामे करता करता रात्रीचे ९.३० वाजले होते, त्यामुळे रामेश्वरबाबांनासुद्धा बरोबर घेऊन जेवण उरकून घेतलं. त्याना आम्ही सांगूनच ठेवलं होत, जोपर्यंत आम्ही इथे आहोत तोपर्यंत तुम्ही जेवण बनवायचं नाही. जेवण झाल्याबरोबर उद्याच्या तयारीसाठी परत कॅमेरा चेक करून ठेवले. एक होता मिनोलटा नॉर्मल वाइड अंगल झूमलेन्स आणि दुसरा झेनीत ७०-२०० मिमी झूम लेन्स सहित.
७.
From Aajoba 1991
३१ नोव्हेंबर, १९९१:
सोमवारी सकाळी लवकर जाग आली. प्रत्येकजण आपले प्रातर्विधी आटोपून तयार झाला. आता सर्व प्रथम आम्ही ठरवलेल्या चढाई मार्गाच्या पायथ्याशी पोहोचायचे होते. आम्ही आमचा चढाईमार्ग पायथ्यापासून ठरवला होता, प्रत्यक्षात तिथे गेलो नव्हतो आणि आमचा बेसकॅंप पायथ्यापासून हजारभर फुट उंचावर वाल्मिकी आश्रमाजवळ होता. त्यामुळे नियोजित मार्गाने चढाई सुरु करण्यासाठी परत पायथ्याला खाली डेहणे-चिंचपाडा गावांच्या दिशेने खाली उतरणे क्रमप्राप्त होते. त्यानंतर किरण, सुभाष, पुंडलिक, दत्ता, मिलिंद, महेंद्र व नरेंद्र ठीक ११ वाजता निघालो. पाण्याच्या हौदाला वळसा घालून पायवाटेने आम्ही सर्वजण पुढे सरकत होतो. वाटेत एक धबधबा लागला, पण तो कड्याच्या म्हणजेच आमच्या चढाईच्या नियोजित मार्गाच्या सरळ रेषेत नव्हता म्हणून पुढे सरकलो. पुन्हा थोड्यावेळाने दुसरा धबधबा लागला, हा धबधबा योग्य होता. प्रथम धबधब्यातून डेहणे-चिंचपाडा गावाच्या दिशेने खाली उतरायला सुरुवात केली. वाटेत गावातली गुरे चरताना दिसली. आता यापुढे खाली उतरण्यात अर्थ नव्हता, म्हणून तेथूनच आम्ही आजोबा कड्याच्या दिशेत वरवर चढण्यास (म्हणजे आमच्या मोहिमेस) सुरुवात केली.
आम्ही सर्वजण भराभर धबधब्यातून वर सरकू लागलो, त्याच वेळी क्लाइम्बिंग व फोटोग्राफी अशी दुहेरी भूमिका किरण पार पाडत होता. या मोहिमेस यावेळी मार्गदर्शन, फोटोग्राफी व क्लाइम्बिंग अशी तिहेरी भूमिका किरणला सोपवण्यात आली होती तर सुभाष आणि दत्ताला संयुक्तपणे मोहिमेचे नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली होती. आम्ही सर्वजण धबधब्यातून वाट काढत एका ५०-६० फुटी कड्याच्या पायथ्याशी पोहोचलो, इथून पुढे आता प्रस्तरारोहण करावे लागणार होते. पुंडलिकने कंबरेला हार्नेस बांधला, दत्ता व सुभाष बिले देत होते. हळूहळू पुंडलिक फ्री-क्लाइम्बिंग तंत्राचा उपयोग करीत वरवर सरकू लागला. साधारण ४० फुट वर गेल्यावर त्याने एका कपारीमध्ये पिटॉन (Piton) ठोकला व मदतीसाठी सुभाषला वर घेतले. सुभाष त्याच्यापाशी पोहोचल्यावर पुंडलिक पुन्हा वर सरकू लागला. किरण त्याच्या कुवतीनुसार मिळेल त्या कोनातून फोटो काढत होता. ५०-६० फुट फ्री-मूव्ह करत पुंडलिक आता एका बऱ्यापैकी लेजवर पोहोचला. लागलीच त्याने तिथेच एका झाडाला व खडकाला संयुक्तपणे दोर बांधला. आता उरलेली टीम भरभर प्रथम सुभाषपर्यंत व तेथून पुढे पुंडलिक पर्यंत पोहोचली. इथे बसण्यास ऎसपैस जागा होती. इथे बसून सर्वांनी पाणी पिउन बाटलीचे वजन कमी केले. पुढील ४०-५० फुट चढाई करण्यासाठी मिलिंद सरसावला. सुमारे २० फुट गेल्यावर त्याने महेंद्रला मदतीला बोलावून घेतले व त्यानंतर भरभर वर सरकत मिलिंद दिसेनासा झाला. एक मोठ्या कपारीमधून मिलिंदने हि मूव्ह पूर्ण केली. इथून वर सरकायला पुन्हा मागचाच धबधबा वाटेत आडवा आला. भरपूर वर सरकत सुभाष, दत्ता पाठोपाठ आम्ही सर्वजण बरोबर ४ वाजता वर पोहोचलो. इथून वर पुढे खरी चढाई सुरु होणार होती. आम्ही ज्या लेजवर आता पोहोचलो होतो, तीच लेज उजव्या हाताने बऱ्याच दूर सरकत गेली होती व टोकाला सीतेच्या पाळण्यापाशी संपून एका धबधब्याच्या रूपाने खाली उतरत वाल्मिकी आश्रमापर्यंत गेली होती. म्हणजे तो धबधबा स्लीपर हायकर्स / ईगल मौण्टेनिअर्स यांनी घेतलेल्या क्लाइंबिंग रूटच्या अगदी सरळ रेषेत होता.
८.
From Aajoba 1991
९.
From Aajoba 1991
१०.
From Aajoba 1991
आज पहिल्याच दिवशी चढाई साधारण असल्याने आम्ही डेहणे गावापासून सुमारे १८०० फुट तर वाल्मिकी आश्रमापासून सुमारे ८०० फुट उंचीवर पोहोचलो होतो. संध्याकाळ होत आल्यामुळे बेसकॅंपवर परत जाण्यासाठी आम्ही सीतेच्या पाळण्याच्या दिशेने निघालो, सकाळीच आमच्या ठरलेल्या योजनेप्रमाणे (आम्ही सर्वांनी असे ठरवले होते कि प्रथम आमच्या चढाईच्या नियोजित मार्गानेच चढाई करीत लेजपर्यंत जायचे व नंतर सीतेच्या पाळण्याच्या वाटेने खाली वाल्मिकी आश्रमात म्हणजेच आमच्या बेसकॅंपवर जायचे व त्यानंतरच पुढील दिवसात सीतेच्या पाळण्याच्या वाटेचा उपयोग करायचा) ठीक ५.३० वाजता आम्ही लेज वरून उजवीकडे निघालो. वरच्या बाजूला सुमारे २२०० फुट उंचीचा कडा तर खाली सुमारे ८०० फुट खोल दरी. डोळ्यात तेल घालून सर्वजण लगबगीने पुढे सरकत होतो. ६ वाजले तरी सीतेचा पाळणा येण्याचे लक्षण दिसेना. आता अंधार पडू लागला होता. शेवटी आम्ही निर्णय घेतला कि आहोत तेथूनच ८०० फुट खोलीची दरी उतरायला सुरुवात करायची.
आम्ही लेजवरून निघाल्यापासून दगडावर मिळेल तिथे खुणा करीतच पुढे सरकत होतो. सर्व प्रथम पुंडलिक, सुभाष, दत्ता, महेंद्र, मिलिंद व शेवटी किरण असा क्रम होता. अतिशय भयानक अवघड वाटेने आम्ही खाली उतरत होतो. कारण पायाखाली कधी दगड गोटे तर कधी माती व त्यातच भरभर पसरत जाणाऱ्या अंधारच भय. करता करता शेवटी एका कड्याच्या टोकाला पोहोचलो. पुंडलिकने डावी-उजवीकडे सरकून दुसरी वाट दिसते का ते पाहिले पण छे, त्या कड्यावरून सरळ रेषेत खाली उतरण्याशिवाय पर्याय नव्हता. प्रस्तरारोहणातील (Rock Climbing) मधील सर्व कौशल्य पणाला लावून पुंडलिक खाली सरकू लागला. वर चढण्यापेक्षा खाली उतरणं कठीण. कारण खाली काय असेल याची पुसटशी कल्पनाही नसते व तशात अंधार! पण अंधार एका अर्थी फायद्याचा झाल कारण दरीची खोली किंवा अवघडपणा समजत नव्हता. शेवटी एकदाचे तो सुमारे ५०-६० फुट रॉकपॅच उतरून खाली प्रचंड उतारावर पोहोचलो. आता तर आम्हाला जेमतेम दिसत होत, तशातच पुंडलिक हिमतीने वाट काढीत त्या उतारावरून सरकत होता. एव्हढा प्रचंड उतार होता कि धड बसूनही पुढे सरकता येत नव्हत. तो उतार संपला व आम्हाला एक धबधबा लागला आणि सर्वानीच सुटकेचा निश्वास टाकला. आता आम्ही एकमेकांचे हात धरून साखळी पद्धतीने खाली उतरू लागलो कारण पूर्ण अंधार पसरला होता. कित्याकदा पडण -धडपडण चालू होत. जवळ-जवळ प्रत्येकाने एक दोन वेळा साष्टांग नमस्कार घालून झाले होते. आता आम्ही बेसकॅंपवरील सहकाऱ्यांच्या नावाने हाक मारायला सुरुवात केली व तिकडून प्रत्युत्तरही आले. पण आम्हाला दोघानाही एकमेकांची जागा मिळेना. कारण आवाजावरून त्या घनदाट जंगलात कोण कुठे आहे हे समजण कठीणच होत. फक्त आपण पोचलोय हीच समाधानाची बाब. शेवटी एकदाचे ठेचकाळत कसेबसे रात्री ७.३० वाजता तब्बल अडीच तासांनी आम्ही बेसकॅंपवर पोहोचलो.
बेसकॅम्पवर पोहोचताच, हौदाच्या पाण्यात दिवसभराचा शिणवटा घालवून मने परत प्रफुल्लीत झाली. काल तंबू उभारताना एक साप फिरता फिरता तिथे आला होता म्हणून आज सकाळी रामेश्वरबाबांनी तंबूच्या आसपासचे गवत संपूर्णपणे कापून-जाळून टाकले होते व भोवतालचा परिसर अतिशय स्वच्छ दिसत होता. रात्री जेवण झाल्यावर रामेश्वर बाबांच्या झोपडीत गप्पा टप्पाना उत आला होता. किरण आणि सहकारी तंबूमध्ये काहीतरी काम करत होते, किचन ते तंबू यामधील भागात संपूर्ण अंधार होता. काही सहकारी किचन मध्ये होते, त्यांनी चहा करण्यासाठी टॉर्च पेटवली आणि मिलिंद एकदम ''साप-साप'' म्हणून ओरडला. हाक एकताच चटकन किरण, सुभाष व कुट्टी तंबूच्या बाहेर मिलिंदकडे पळाले. नरेंद्रने टॉर्च सापावर मारूनच ठेवला होता. एक काळ्या रंगाचा साधारण दीड फुट लांबीचा साप होता. त्याच स्थानिक नाव खर्ड्या नाग! हे नाव रामेश्वर बाबांकडून कळल. चटकन किरण व सुभाष पुढे सरसावले. हळुवार हाताने सावधपणे किरणने त्याची मान पकडली. गॅसबत्तीच्या उजेडात त्याच निरीक्षण केल, काळ्या शरीरावर पिवळे ठिपके होते. नंतर त्याला एका प्लास्टिकच्या बाटलीमध्ये बंद करून ठेवला, जेणेकरून त्याला सकाळी तंबू पासून दूर सोडता येईल.
रात्रीचे अकरा वाजले होते, साप तंबूच्या जवळच सापडल्याने परत एखादा साप तंबूमध्ये घुसण्याची शक्यता होती. परत एकदा सामान हलवून छानणी केली. नंतर तंबूच्या परिघाभोवती वर्तुळाकार चर खणला व त्यात कीटकनाशक फवारले. हे सर्व व्यवस्थित होईपर्यंत रात्रीचे साडेतीन वाजले.
११.
From Aajoba 1991
१२.
From Aajoba 1991
१ डिसेंबर, १९९१:
रात्रीच्या जागरणाने सकाळी खूप उशिरा जाग आली. आमची धावपळ चालू असताना शहापूरवरून काही मंडळी, सरपंच व मुंबई सकाळचे उपसंपादक श्री. नार्वेकर इत्यादी वाल्मिकी आश्रमात येऊन थडकले. त्यांच्याशी गप्पा मारता मारता व इतर माहिती देताना ११ वाजले. १२ वाजता आश्रमातून किरण, दत्ता, नंदू व पुंडलिक, आजोबाचा कडा व सीतेचा पाळणा यांच्या मधल्या घळीतून धबधब्याच्या वाटेने सीतेच्या पाळण्याच्या दिशेने निघालो (काल आम्ही याच वाटेने खाली येणार होतो, पण अंधार पसरल्यामुळे आम्हाला मधूनच भलत्याच मार्गाने यावे लागले होते). तासभर वर चढल्यानंतर तेथून डाव्या हाताला वाट वळली होती, ती कड्याच्या पायथ्याने पुढे सरकत आमच्या चढाईच्या मार्गापर्यंत पोहोचत होती व तेथून अजूनही बरीच पुढे जात खिंडीला जाऊन मिळत होती. एकूण अंतर किती असेल कोण जाणे पण दिसायला खूपच दूर म्हणजे जवळजवळ एक दिवस तरी गेला असता. कड्याच्या पायथ्याच्या अतिशय अरुंद वाटेने आम्ही हळूहळू पुढे सरकायला सुरुवात केली. तस पाहिलं तर ती वाट नव्हतीच, अतिशय अरुंद आणि अवघड मार्ग होता.
१२अ
From Aajoba 1991
कारण उजवीकडे उभा कडा तर डावीकडे सरळ रेषेत खोल दरी. पुन्हा भरीस भर पायाखालून दोन सापही वळवळत गेले. इथे आजोबाला साप-विंचवांचा फारच सुळसुळाट आहे. दुपारी १२ वाजता निघालेलो आम्ही ३.३० वाजता आमच्या नियोजित मार्गापाशी पोहोचलो, यावरूनच सदर मार्ग किती अवघड असेल याची सहज कल्पना येईल. रोज ये-जा करून हि वेळ अर्थात कमी होणार होती. काल इथेच आम्ही चढाई करत पोहोचलो होतो. वर सुमारे २००० फुटी कडा आम्हाला आव्हान देत उभा होता. सुरुवातीसच फ्री-मूव्ह करण्यास वाव असल्याने सुरुवात पुंडलिकने केली. हळूहळू त्याने वरवर सरकायला सुरुवात केली व किरण ते क्षण कॅमेऱ्यात टिपायला लागला. सुमारे १७५ फुट फ्री-मूव्ह करून पुंडलिक थांबला, तो एका ३५० फुटी ओव्हरहॅन्गच्या पायथ्याशी पोहोचला होता. खालून किरण, दत्ता व नंदू दोराच्या साहाय्याने पुंडलिकपर्यंत पोहोचले. इथे वावरण्यासाठी चांगली जागा होती म्हणून इथेच आम्ही कॅंप क्र. १ ची स्थापना केली.
आता वरील भागात चेन बोल्टिंग करावे लागणार होते कारण कडाच तसा ताशीव होता. बोल्टिंगचा शुभारंभ नंदूने केला. त्याने अर्धवट मारलेले छिद्र पुंडलिकने पूर्ण केले व पहिला एक्सपान्शन बोल्ट (Expansion Bolt) आजोबाच्या कड्यावर ठोकला गेला. त्यानंतर दत्ताने आणखी एक बोल्ट ठोकला. एव्हाना संध्याकाळचे पाच वाजले होते. दुपारचा वर येतानाचा अनुभव लक्षात असल्यामुळे निदान ७ वाजेपर्यंत म्हणजे अंधार पडायच्या आत बेसकॅंपवर पोहोचता आले पाहिजे या हिशोबाने आम्ही आजच्या दिवसाची चढाई थांबवून परतीच्या वाटेस लागलो. कारण एकतर वाट नवीनच होती, शिवाय वाटेत सापांचा सूळसुळाटही होता. नेमक परत उतरताना नंदूच्या पायाखालील दगडातून एक साप अचानक बाहेर पडून खालील उतारावर सरपटत दिसेनासा झाला. नशिबानेच नंदू बचावला. सावधपणे भरभर पुढे सरकत आम्ही ७ वाजेपर्यंत बेसकॅंपवर आश्रमात पोचलो. आजोबाला सापांचा सूळसुळाट इतका आहे कि १०/१२ दगड उलट सुलट करा एक तरी साप दर्शन देऊन जाईल.
इकडे बेसकॅंपवर आज सुभाष- नरेंद्रचा सुट्टीचा दिवस होता. टेन्टवरील कामे करता करताच सहकारी दुपारी कड्यावर चाललेल्या चढाईचे दुर्बिणीच्या साहाय्याने निरीक्षण करीत होते. पाच वाजता आम्ही चढाई थांबवली व परतायला आम्हाला उशीर होणार हे गृहीत धरूनच कुट्टी, सुभाष, नरेंद्र व महेंद्र गॅसबत्ती पेटवून आम्हाला घ्यायला निघाले. वाटेत आमची भेट झाली. टेन्टवर पोहोचताच चहा वगैरे घेऊन आम्ही चौघे अंघोळीस निघालो तर उरलेली मंडळी जेवणाच्या तयारीस लागली. आज नरेंद्र, कुट्टी आणि सुभाषने मोठे ओंडके फोडून भरपूर सरपण तयार करून ठेवले होते. जेवणानंतर रात्री एक मिटिंग घेण्यात आली. कारण रोज सकाळी व संध्याकाळी मिळून चार तास तरी जाण्या-येण्यात खर्च होत होते. त्यामुळे नरेंद्र व सुभाष यांनी सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी निघून चढाईला सुरुवात करायची तर कुट्टी व किरणने सीतेच्या पाळण्यापाशी पाण्याची सोय आहे का, ते पाहायचे असे ठरले.
पहिल्या दिवशी चढाईच्या ठिकाणावरून उतरताना आम्ही तयार केलेला शॉर्ट्कट मार्ग खूपच अवघड व धोकादायक असूनही वेळ वाचवण्याकरीता त्याच मार्गाचा अवलंब करायचे आम्ही ठरवले, कारण त्यामुळे आमचे दिवसातले दोन ते अडीच तास वाचणार होते.
१३.
From Aajoba 1991
१४.
From Aajoba 1991
२ डिसेंबर, १९९१ :
पहाटे नरेंद्र व सुभाष ठरल्याप्रमाणे लवकर उठले, सोबत पुंडलिकही होता. चहा, नाश्ता करण्यात बेसकॅंपवरून निघायला सकाळचे नऊ वाजलेच. शॉर्ट्कटच्या वाटेने साधारण तासाभरात ते सगळे चढाईच्या ठिकाणावर पोहोचले. अकरा वाजता नरेंद्रने बोल्टिंगला सुरुवात केली आणि सुभाष व पुंडलिक त्याचे मदतनीस झाले.
दुपारी १ वाजता बेसकॅंपवरून किरण, अनिल, दत्ता, महेंद्र व कुट्टी सीतेच्या पाळण्याच्या दिशेने निघाले. तेथे एक सुळका आहे, तेथे पाणी भरून घेतले व तेथून डाव्या हाताने सर्वजण कॅम्प १ च्या दिशेने निघाले. सीतेच्या पाळण्याची वाट खूप लांबची असल्याने आम्ही कॅंप १ वरून परत बेसकॅंपवर येण्यासाठी शॉर्ट्कट मार्ग शोधला होता, पण तो मार्ग खुपच धोकादायक व अवघड होता. तेंव्हा दोर बांधून सुरक्षित करण्याचं काम या चौकडीकडे होते. वाटेत परत एकदा एक साप अनिलच्या पायाखालून वळवळत गेला. मजल दरमजल करत ३ वाजता आम्ही कॅंप १ वर पोचलो. कॅंप १ च्या खालील रॉकपॅचवर दोर बांधून खाली उतरण्यासाठी अनिलने एक बोल्ट मारला. एव्हाना नरेंद्र वरील बाजूस चार बोल्ट ठोकून वर सरकला होता. आज पूर्ण दिवस तोच चढाई करणार होता. किरण, नरेंद्र, सुभाष, दत्ता, पुंडलिक, शेखर असे सगळेच जण दिवसभर चढाई करण्यात तरबेज होते.
सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नरेंद्रने १४ बोल्ट ठोकून दिवसभराची चढाई थांबवली. चढाईचे सर्व सामान शेवटच्या बोल्टला अडकवून तो परत पायथ्याला कॅंप १ वर उतरला. पुंडलिकने तयार केलेल्या शॉर्ट्कटच्या वाटेने बेसकॅंपवर जाण्यास निघाले. सापांनी तर आमची अडवणूकच केली होती. खाली उतरताना परत अनिलला संध्याकाळच्या संधीप्रकाशात एका दगडावर काहीतरी वळवळत असलेलं जाणवलं म्हणून त्याने सुभाषला जवळ बोलावले, सुभाषने तो मण्यार जातीचा साप असल्याच बरोबर ओळखलं. अनिल सापांना खूपच घाबरत असल्याने सुभाषने त्याला तिथे काहीच नाही म्हणून खोटेच सांगितले. एकतर सर्वजण एका कड्यावर उभे होते, खाली सरळ खोल दरी होती व उताराची वाट अवघड होती. त्यामुळे आम्ही सापाला पकडायचं नाही अस ठरवलं. पण अनिलला पक्की खात्री होती कि त्याने सापच पाहिलाय, तेंव्हा त्याने आणखी घाबरू नये म्हणून उलट आम्ही सगळ्यांनी मिळून त्यालाच खोट पाडलं आणि साप नसल्याची बतावणी केली.
एव्हाना अंधारायला सुरुवात झाली होती. सोबत विजेरी (Torch) होती त्यामुळे आठ माणसांना उतरताना खूपच वेळ लागत होता. थोडसं पुढे गेल्यावर एका सपाटीवर महेंद्रचा आवाज आला ''किरण, साप''. किरणने धावत जाऊन विजेरीच्या प्रकाशात न्याहाळून पाहिले तर खरंच हिरव्या रंगाचा घोणस (Bamboo Pit Viper) तिथे होता. त्याला तिथेच सोडण धोक्याच होत कारण आम्ही आता रोजच या वाटेवरून ये-जा करणार होतो. किरणने त्याला पकडून आपल्या सोबत घेतलं आणि सर्वजण परत पुढच्या वाटेला लागले. अंधाराने आपली तीव्रता आणखीनच वाढवली होती. प्रत्येकाच्या मनात सापाचा धसका होताच कारण हात लावताना किंवा पाय टाकताना प्रथम तोच विचार मनात येई, मध्येच कुठे तरी सळसळ, सरसर ऐकू येई व वातावरणाची भयाणता अधिकच वाढे. मार्ग नीट सापडतच नव्हता, कधी उड्या मारीत, कधी सरपटत, ठेचकाळत एकदाचे बेसकॅंपवर पोचलो. तेंव्हा कुठे जीव भांड्यात पडला. बेसकॅंपवर पोहोचताच प्रथम त्या धरून आणलेल्या सापाला एका बाटलीत ठेवले, जेणेकरून सकाळी उठल्यावर बेसकॅंपपासून दूर सोडून देता येईल हा विचार मनात होता.
दरम्यान . बेसकॅंपवर दुपारी मुलुंडवरून शैलेश, बालाजी व आनंद आले होते. त्यामुळे बेसकॅंप टीमला थोडी बळकटी मिळाली होती. संध्याकाळी हौदावर आंघोळ करताना चढाईविषयी गप्पा चालू होत्या. विषय होता. बेसकॅंपपासून चढाईच्या ठिकाणावर (कॅंप १) जाण्यास लागणाऱ्या वेळेबद्दल. जाण्या-येण्यात ३-४ तास जात होते. तेंव्हा असे ठरविण्यात आले कि, दिवसा चढाई करण्याऱ्या टीमने रात्री तिथेच राहायचे आणि त्यांना जेवण-पाणी पुरविण्याच काम दुसऱ्या दिवशी चढाई करणाऱ्या टीमने संध्याकाळी करायचे. म्हणजे दुसऱ्या दिवशी नवीन टीम सकाळी लवकर चढाई सुरु करेल आणि काल थांबलेली टीम परत बेसकॅंपवर निघून येईल. जेणेकरून चढाई सतत चालू राहील.
जेवण तयार झाले होते. पुंडलिक तर रामेश्वरबाबांसोबत पार गप्पांमध्ये रंगून गेला होता. उद्यापासून सर्व टीम एकत्र भेटणार नसल्याने कॅंपफायर करून रात्री एक वाजेपर्यंत सर्वानीच दंगा केला. अनिलच्या खर्ड्या आवाजातल्या गाण्यांनी आणि सोबत माउथ ऑर्गनच्या सुमधुर संगीताने कॅंपफायरला वेगळीच मजा आणली.
१५.
From Aajoba 1991
१६.
From Aajoba 1991
१७.
From Aajoba 1991
क्रमशः
अजूनही थरार जाणवतोय. एवढे
अजूनही थरार जाणवतोय. एवढे बारकावे लक्षात रहावेत अशीच अविस्मरणीय मोहिम !
अगग.... नुसते फोटो बघुनहि
अगग.... नुसते फोटो बघुनहि पोटात गोळा आला माझ्या. आता वाचायचे धाडस करते . शप्पथ्थ ____/\____
मस्तच झालीये सुरुवात. इतक्या
मस्तच झालीये सुरुवात.
इतक्या वर्षांनंतरही फोटो अजून व्यवस्थित दिसतायत.
किरण अडफडकर साप पकडण्यातही एक्सपर्ट आहेत कां?
जबरदस्त लेख! या चढाईविषयी,
जबरदस्त लेख!
या चढाईविषयी, प्र.के. घाणेकरांच्या 'साद सह्याद्रीची, भटकंती किल्ल्यांची' या पुस्तकात वाचले होते.
विजय पुस्तक अद्यापही उपलब्ध
विजय
पुस्तक अद्यापही उपलब्ध आहे का???
त्रिवार मुजरा या शिलेदाराना !
त्रिवार मुजरा या शिलेदाराना !
अजुन पुर्ण भाग वाचुन नाही
अजुन पुर्ण भाग वाचुन नाही झालेत.
सुरवात केली आहे.
त्यावेळची परिस्थिती कशी असेल ह्याची फक्त कल्पना करु शकतो.
जे काही धाडस केल आहे ते अफाट अफाट अफाट आहे.
खूप मस्त
खूप मस्त
सुनटुन्या >> सह्याद्रिच्या
सुनटुन्या
>>
सह्याद्रिच्या रौद्रभिशण कड्याला साद घालण्यात तुमचा हातखंडा तर आहेच ....
पण तुमच्या लेखणीला ही तितकीच नाजुक किनार लाभली आहे.... अप्रतिम वर्णन....
किरण काकांच्या अंगभुत कौशल्याचा व त्यांच्या नोंदवहिचा खजिना उघडुन आम्हाला त्या व्यक्तिची खरी ओळख करुन दिल्याबद्द्दल मी तुमचे खरच आभार मानतो...
विजय- सुनटुन्या, जबर्र्दस्त,
विजय- सुनटुन्या,
जबर्र्दस्त, त्यावेळची परिस्थिती अनि हे साहस अप्रतिम. प्र.के. घाणेकर 'साद सह्याद्रीची, भटकंती किल्ल्यांची' पुस्तक उपलब्ध आहे. पन पुस्तकात असा उल्लेख नहि.
मस्त ! वाचताना अगदी काटा येते
मस्त ! वाचताना अगदी काटा येते अंगावर !
काय म्हणाव या धाडसाला...
काय म्हणाव या धाडसाला...
निव्वळ अफाट
निव्वळ अफाट
व्वा खुपच मस्त.. सलाम तुम्हा
व्वा खुपच मस्त..
सलाम तुम्हा सगळ्यांना...
आम्हा सामान्य ट्रेकर्सच्या
आम्हा सामान्य ट्रेकर्सच्या विचारांच्या कक्षेतही येवू नये, अशी कल्पनातीत मोहीम!
ब्लॉगच्या रूपाने जबरदस्त दस्तऐवज खुला केलाय.. धन्यवाद!!!