वॉटर प्रूफिन्ग बाथरुम्स आणि त्या लगतच्या भिंतींसाठी

Submitted by mansmi18 on 16 November, 2014 - 04:16

नमस्कार,

घरातील बाथरुम लगतच्या भिंतीमधे ओल आलेली आहे. एका वॉटरप्रूफींग मधल्या माणसाकडुन वॉटर प्रुफिंग करुन घेतले. त्याने बाथरुममधल्या फ्लोअर मधे दोन होल्स पाडुन त्यात एक केमिकल टाकले जवळपास ५० लिटर..(र, २५०/लि. प्रमाणे.)पण नंतरही ओल कायम आहे. (जवळपास २० हजार खर्च झाले आहेत.. त्या माणसाला विचारले तर तो काहीतरी सबबी देत आहे) काही प्रश्नः
१. वरील प्रोसेस बरोबर वाटते का?
२. डॉ. फिक्सिट कोणी वापरले आहे का? ते इफेक्टीव आहे का?
३. (पुण्यात) कोणी वॉटरप्रुफिंग करुन घेतले असेल आणि चांगला अनुभव असेल तर त्या काँट्रॅक्टर/कंपनीचे नाव शेअर कराल का.
४. साधारण एका बाथरुम साठी (८ X 10) किती खर्च येतो?
५.बाथरुमलगत वुडन फ्लोरिंग असणे आणि नॉर्मल फ्लोरिंग असणे यामुळे काही फरक पडतो का?

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे इतका खर्च ? हा प्रोब्लेम बर्याच घरांमध्ये असतो. बाथरूमच्या जवळची भिंतीला बरेचदा ओल येतेच येते आणि ओल काढण्याच काम खुपदा करून घ्याव लागत अस मी ऐकलय .मी मात्र त्या जागी टाईल्स बसवून घेतल्या आहेत. Happy

१. त्या भिंतीमधे प्लंबिंग आहे का?
२. फ्लॅट आहे, की घर?
३. तळमजला की वरचा?

-डॉ. फिक्सिट टाकले तरी गुळ-चुन्याचे मिश्रण आमच्याकडचे कारागीर नक्कीच मिक्स करतात त्या गिलाव्याच्या सिमेंटमधे.

आतील संपूर्ण फरशी काढून टाकून, चायना-मोझॅक टाईप वॉटरप्रूफिंग करणे, व त्यावर नंतर फ्लोअरिंग करणे अशी योग्य रीत आहे. कन्सिल्ड पाईप असतील तर ते सरळ बंद करून वेगळ्या जागी नवे टाकणे.

वुडन फ्लोरिंगने फरक पडायला नको.

मनस्मि१८, आमच्या वरच्यांच्या वरच्या बाथरुममधून, वरच्यांच्या बाथरुमलगतच्या भिंतीला भरपूर प्रमाणात ओल आली होती. त्यांनी आधी वरच्यांची बाथरुम केमिकल लावून सील करुन घेतली तेव्हा ते काही काळापुरते थांबल्यासारखे झाले. त्यानंतर ह्यावर्षी परत ओल यायला लागली. ती वरच्यांच्या भिंतीतून आमच्या घरातही बर्‍यापैकी झिरपली.

आमच्या ओळखीत एक सिव्हील इंजिनियर आहे जो आपल्याच एरियातल्या आदित्यच्या नव्या प्रोजेक्टवर साईट इंजिनियर आहे. आमच्या बाथरुम्सचे बरेच मोठे काम त्याने केले होते ( इंडियन स्टाईलचे कमोड करणे आणि त्याचबरोबर बाथरुमची पूर्ण रचनाच बदलणे ) तो काम एकदम शिस्तीने करतो पण पैसे जरा जास्त आकारतो ( त्याचे स्टेपवाईज कोटेशनही देतो ) आमच्या वरच्यांच्या कामासाठी त्याने पंचेचाळीस हजारांचे कोटेशन दिले होते ( गॅरेंटीसह- ज्यात तो बाथरुम फ्लोअर, डक्टची भिंत, नळांतून लीकेज आहे का ते चेक करणे असे सगळे करणार होता ) पण ते त्यांना पटले नाही. ह्यात आम्ही काहीच करु शकत नव्हतो ( कारण मूळ लीकेज वरच्यांच्या घरात होते )
शेवटी सोसायटीच्या नेहेमीच्या माणसाने बाथरुममधल्या दोन टाईल्स काढून तिथे ड्रील करुन केमिकल घातले ( तुम्ही सांगताय त्याच्याशी सिमिलर प्रोसेस असावी ) त्याचा सहा हजार खर्च आला.
सध्या लीकेज थांबले आहे असे वाटते. वरच्यांनी आणि आम्ही दोघांनी नुकताच नवीन रंग दिला तेव्हा आता फिंगर्स क्रॉस्ड !!!

ह्या मोठ्या पोस्टचे तात्पर्य म्हणजे तुम्ही आधी काम करुन फेल गेले आहे तर त्या सिव्हील इंजिनियरचा नंबर तुम्हाला हवा असल्यास संपर्कातून पाठवेन.

ऐकीव माहिती :

जे केमिकल आतमध्ये पम्प करतात ते एक प्रकारचे रबर कम्पाउन्ड असते. ते आतमधल्या क्रॅक्स आणि गॅप्स मध्ये जाते जेणेकरुन झिरपुन होणारी ओल थांबेल.
प्लम्बिन्ग मध्येच लिकेज असेल आणि हे केमिकल टाकले तरी फायदा नाही होणार.
म्हणजेच कोणीही ह्या कामाची गॅरन्टी देत नाहीत. त्यामूळेच मला ते काम माझ्या घरी करावसं वाटलं नाही.

आमच्याही घरी प्रॉब्लेम आहेच.
लाखोनी रुपये घेवु,न ग्राहकांना क्वालिटीत चुना लावण्याच्या बिल्डरच्या प्रव्रुत्तीमुळे हा ल्फडा.
कन्सिल्ड प्लम्बिन्ग मुळे लिकेज कुठे आहे हे लवकर कळत नाही.
डोकेदुखी आहे. स्वस्तात मस्त हमखास उपाय प्रतिसादातुन मिळाल्यास मीही खुश होइन.

अन्यथा इब्लिस म्हणतात तसे टाइल्स फोडा प्लम्बिन्ग नवीन करा वै वै प्रोसेस मध्ये जावे लागणार आहे.

इब्लिस, अगो, झकास
धन्यवाद.

इब्लिस..
१. त्या भिंतीमधे प्लंबिंग आहे का? - हो आहे..गीझर त्या भिंतीवर आहे त्याचा इनलेट.
२. फ्लॅट आहे, की घर? फ्लॅट
३. तळमजला की वरचा? पहिला.. खाली पार्किंग

डॉ. फिक्सिट चे केमिकल मिक्सिंग वगैरे आपल्याला पहावे लागते का? Sad
पुर्ण बाथरुमच्या टाईल्स काढुन नवीन बसवायला किती खर्च येउ शकतो?

अगो,,माहिती पाठवाल का? बोलुन पाहिन.
हल्ली लोकाना २५-३०-४०००० खर्च सांगायला काही वाटत नाही.
मला वाईट याचे आहे की समजा पैसे खर्च केले तरी काम नीट होण्याची गॅरंटी घ्यायला कोणी तयार नाही.

झकासराव,
आमच्या बाथरुमच्या फ्लोअर ला होल पाडुन आत पाहिले असतात नुसती वाळु टाकली आहे असे दिसले..सिमेंटचा लवलेशही नाही. आता ४ वर्षे झाली. आता बिल्डर कसली दाद देणार.. सगळे आमच्याच माथ्यावर बसले. Sad

मला वाईट याचे आहे की समजा पैसे खर्च केले तरी काम नीट होण्याची गॅरंटी घ्यायला कोणी तयार नाही. >>> हा माणूस देतो गॅरेंटी.
मी पाठवते नंबर

आमच्या बाथरुमच्या फ्लोअर ला होल पाडुन आत पाहिले असतात नुसती वाळु टाकली आहे असे दिसले..सिमेंटचा लवलेशही नाही. >>> टाईलच्या खाली वाळूच असते. त्या वाळूच्या खाली वॉटरप्रूफिंगचा लेयर असतो. निदान आमच्याकडे तसेच आहे. त्याच्याखाली स्लॅब.

सध्या भिंतीला ओल येतेय पण लिकेज नाहिये.
रंग उडालाय भिंतीचा.
म्हणुन रंग द्यायच काम सुरु आहे.
पेन्टर बोल्ला एक केमिकल आहे अशा त्रासासाठी.
ते लावुन मग रंग दिला की रंग लगेच उडणार नाही.

सध्या तरी हा उपाय अमलात आणतोय.
बघु कितपत्ब यश येइल.

mansmi18
हा प्रॉब्लेम वरवर गिलावा करुन सॉल्व्ह होत नाही.
बाथरुम आणि टॉईलेट शेजारील भिंतीवर आलेली ओल प्रामुख्याने बाथरुम टाईल्सचे खाली वॉटरप्रूफिंग व्यवस्थित न झाल्यामुळे होते. ब-याचदा बांधकाम करतेवेळी वॉटरप्रूफिंग न करताच टाईल्स आणि टॉईलेट पॉट वसविले जाते.

मी याच क्षेत्रात काम करत असल्याने माझ्या माहितीप्रमाणे ओल पुर्णपणे घालवण्यासाठी बाथरुममधील संपुर्ण टाईल्स काढून टाका त्यात वीटाच्या तुकड्याने किंवा पुर्ण विटाने ( किमान दोन थराने ) वॉटरप्रुफींग करुन घ्या ३ ते ४ दिवस त्यात पाणी भरुन ठेवा व त्यानंतर टाईल्स बसवून घ्या. सहसा भिंतीना वॉटरप्रुफिंगची गरज पडत नाही मात्र शक्य झाल्यास डॅडो लेव्हलपर्यंत ( तळापासून साधारण ४ फूट उंचीपर्यंत) करुन घ्या.

८ बाय १० चे बाथरुमसाठी २५ ते ३० हजारापर्येंत खर्च जातो मात्र तो एकदाच केलेला कधीही परवडतो अन्यथा आपण केलेल्या इंटेरिअर किंवा पीओपी/ पेंट यांचा खर्च वारंवार वाया जाईल.

१. आमच्या ही संपुर्ण घरात स्कर्टींग च्या २-३ इंच वर बुरशी सारखे पांढरे स्पाईक्स आलेत.. त्याने पेंट चा पोपडा पडतोय.
हे आधी बाथरुम लगतच्या भींतीना.. आणी आता पुर्ण घरातच आहे.

ही बुरशी असेल का? की हार्ड वॉटर मुळे आलेले क्षार असतील?

२. ३ वर्ष जुनं बांधकाम आहे
सर्वात वरचा मजला, वर गच्ची.(४)
छ्ताला आधीच क्रॅक्स आहेत जोरदार, तर छताचंही वॉटर प्रुफींग चाल्लय.. कमीत कमी ५-६ वेंडर कडुन बील्डीर नेच करवुन घेतलं, पण तरी ह्या क्रॅक्स काही दाद देत नाहीत.
त्यात आता हे, मला हे घरच नकोसं व्हायला लागलंय! Sad

आता बाथरुम चं करुन घ्यावं का वॉटर प्रुफींग?
त्याने तो बुरशी सद्रुष रोगट पणा जाइल का?
आणि बील्डींग चं अतोनात नुकसान नाही का? असं पाणी झिरपणं म्हणजे? Sad

कुणी तरी काही तरी सुचवा!

जसे रोगाचे निदान झाल्याशिवाय उपचाराला अर्थ नाही तसेच लीकेज किंवा ओल कशामुळे आली आहे हे समजल्याशिवाय रिपेअरिंग करण्यात अर्थ नाही. घर बांधताना करण्यात येणा-या दुर्लक्षामुळे नंतर असे खर्च निघत राहतात.
ओल किंवा लिकेजबाबत काही तांत्रिक बाबी अशा आहेत.

१)पुर्वी वापरात असलेल्या मातीच्या वीटाऐवजी आता सिमेंटच्या वीटा वापरल्या जातात. मातीची वीट जवळपास आलेले पाणी शोषून घेते मात्र सिमेंटची वीट पाणी भिंतीचे बाहेर ढकलते किंवा प्लास्टरचे आतून पुढे सरकवत राहते. त्यामुळे भिंतीपर्येंत पाणी पोहचू न देणे हा एकमेव उपाय आहे.

२) वीट बांधकाम झाल्यानंतर नदीच्या वाळूत प्लास्टर करणे ही अत्यावश्यक बाब आहे. आजकाल बहुतेक बिल्डींग बांधताना त्या पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरीस) करुन मग त्याचा ताबा दिला जातो. बांधकामावर डायरेक्ट पीओपी चढवले असेल तर पहिल्या पावसाळ्यातच जगाचे नकाशे भिंतीवर दिसतील. चांगली गुणवत्ता देणारे बिल्डर सहसा असे करत नाहीत मात्र त्यांच्या हाताखाली काम करणारे ठेकेदार कामाची टाळाटाळ करण्यासाठी प्लॅस्टर टाळणे, प्लास्टरसाठी नदीची वाळू न वापरणे या गोष्टी करु शकतात.

३) भिंतीमधून पाईपलाईन असल्यास त्याचे जाँईंट्स प्रॉपर सील करणे, पाईप चांगल्या गुणवत्तेचे वापरणे क्रमप्राप्त आहे.

४ ) वॉटरप्रूफींगबाबत पुर्वापार चालत आलेली पध्दत (वीटांच्या थराने) ही चांगली आहे. सध्या त्याचे प्रमाण कमी झाले आहे. बाजारत मिळणारी केमीकल्स चांगले वॉटरप्रुफ करतात असा समज आहे, मात्र आतापर्येंतच्या माझ्या अनुभवात फक्त केमीकल्स वापरुन केलेले वॉटरप्रूफींग १०० % यशस्वी ठरलेले नाही. (याबाबत तज्ञांचे मत वेगळे असू शकते.). केमिकल्सबरोबर पारंपारिक पध्दतीने वॉटरप्रुफींग केल्यास कायमस्वरुपी असे प्रॉब्लेम्स सॉल्व होतात.

प्रथम लिकेज किंवा ओलीचे उगमस्थान शोधा प्रत्येक ठिकाणे ट्रीटमेंट वेगळी करावी लागेल.
१) बाथरुम /टॉईलेट च्या आणि जवळील भिंती
२) बाल्कनी/टेरेस च्या भिंती
३) छ्त ( सीलींग/ सेलींग)
४) हॉल, बेडरुम किंवा इतर ठिकाणी आलेली ओल

बाथरुम आणि छत सोडले तर इतर ठिकाणी वीट बांधकामापर्यंत प्लास्टर /पीओपी काढून घ्यावे आणि बाजारात उपलब्ध असणा-या केमिकल्समध्ये पुन्हा प्लास्टर करावे.

टॉप फ्लोअर असल्यास छतातून होणारे लिकेज काढण्यासाठी गच्चीवर वॉटरप्रुफींग करावे लागेल.

हॉल बेडरुम सारख्या ठिकाणी कदाचित शेजारील फ्लॅटमधून किंवा यांच्या भिंतीच्या लगत असणा-या पाईपलाईनमधून लिकेज असू शकते.ते शोधावे.

आमच्या ही संपुर्ण घरात स्कर्टींग च्या २-३ इंच वर बुरशी सारखे पांढरे स्पाईक्स आलेत.. त्याने पेंट चा पोपडा पडतोय.
हे आधी बाथरुम लगतच्या भींतीना.. आणी आता पुर्ण घरातच आहे.

आता बाथरुम चं करुन घ्यावं का वॉटर प्रुफींग?..
तेच योग्य राहील. आपण लिहील्याप्रमाणे बांधकाम ३ वर्षे जूने आहे. ही बाब बिल्डरच्या नजरेस आणा त्याने वॉ.प्रु. , प्लास्टर केले का याची विचारणा करा आणि त्यालाच करायला लावा.

ही बाब बिल्डरच्या नजरेस आणा त्याने वॉ.प्रु. , प्लास्टर केले का याची विचारणा करा आणि त्यालाच करायला लावा>>> एक वर्षात बिल्डर हात वर करतोय.
अजुन किती हाव असणारे पैशाची काय माहिती.
लाखोनी रुपये घेतात फ्लॅटचे आणि बांधकाम हे असं.

बील्डर छतचं करतोय!
तो आतलं करेल का देव जाणे!

दहशत झालीय हे पाणी अन ओल प्रकाराची Sad

नवर्याशी बोलुन वॉटर प्रुफींग करवावं लागेल बाथरुम चं..

वरील सर्व प्रतिक्रिया वाचुन काही टीप्स नक्की द्याव्याशा वाटतात.
बाथरुमच्या भिंती, आणि बाथरूमच्या वरच्या भागात होणारी लिकेज : याच मुळ कारण
१. फ्लोरींग टाइल्स उभ्या टाइल्स यांच्या मध्ये असणारी ग्याप.
२.फ्लोरींग टाइल्स, उभ्या भिंतीच्या टाइल्स या मागील मटेरीयल्सची गडबड, रेती जास्त,कमी सीमेंट, टाइल्स/ फ्लोरींग चे सांधे नीट बसणे , त्यात असणारी एयर
३.वरील कारणांमुळे झिरपणारे पाणी , संपुर्ण स्ल्याब वर पसरते आणि , ज्या ठिकाणी स्ल्याबमध्ये हलक्या ग्याप्स, एयर बबल्स असतील तेथुन भिंतीवर पसरायला, उतरायला लागते.
वरील कारणे कशी शोधावीत
१. ज्या भागात लिकेज/ ओल दिसतो त्या ठिकाण च्या टाईल्सचा तुकडा / भिंतीच्या एखादा भाग , थोडासा तोडुन पाहीला तर ओल कुठुन झिरपते ते लगेच कळेल.
विशेषतः बाथ्रुम टाइल्स आणि बाथरुम फ्लोरींग च्या बाब्तीत हे लगेच कळेल.हाच प्रकार टॉयलेट्स्च्या बाबतीत ही लागु होतो.
बरेचदा भारतीय टॉयलेट्स्च्या प्रुफींचे काम नीट झालेले नसते, तिथल्या स्लोप मुळे, कावळ्यांच्या सदोष जोडण्यां यांमुळे, आजुबाजुच्या लिकेजचे पाणी,पॉट्खालच्या रेती, भींतींखाली भागात जमत राहाते आणि काही काळानंतर, जसा स्लोप, एयर ग्याप मिळेल तसे झिरपत.
अशा कांमासाठी , काही स्टेप्स
१. मुळ पाणी कुठुन झिरपते आणि कुठे पर्यंत पसते किंवा जमा होते , याचे लोकेशन समजुन घेणे.
या साठी २/३ दिवस लागतात आणि तोड्फोडही टप्याटप्याने होते.
एकदा लोकेशन समजले के , तिथले जमा असलेले पाणी काढुन टाकाणे , त्यां संपुर्ण मार्गावर सिमेंट , डॉ. फिक्स इट सारखी सोल्युशन मिसळुन थर करणे . हा थर पुर्ण वाळयावरच, त्यावर पाणी मारुन परत ओल चेक करणे , मगच फायनल प्लास्टर किंवा टाइल्सचे काम करणे ,
या सगळ्या प्रोसेस ला किमान ४/ ५ दिवस लागतात ... काम वेळ खाउ वाटते पण नक्के खात्रीचे होते...
मी स्वता: किमान ४ घरी हिच प्रोसेस केली आहे गेल्या दोन वर्षात , अजुन काही कंप्लेटं आलेल्या नाहीत....

माझ्याही घरात छतावरुन पाणीगळतीचा प्रॉब्लेम होता. वॉटरप्रुफिंग करुनही जैसे थेच. शेवटी वर पत्रे घातले. नव्या मुंबईत ब-याचश्या इमारतींच्या डोक्यांवर आता पत्रे घातलेले दिसतात. बाजुने तडेही गेलेले दिसतात. लाखांचे फ्लॅट्स आता इथे करोडमध्ये गेलेत पण मजबुत, दणकट, न गळणारे, तडे न जाणारे घर देणे कुठल्याही बिल्डरला जमत नाही असे एकुण वाटते.

भिंतीवर बुरशीसारखे दिसते ती ओल नसुन वाळूमधले क्षार असण्याची शक्यता आहे. पार्ल्याला माझ्या भावाच्या घरात आणि त्याच्या बिल्डिंगमध्ये खुपजणांच्या घरात हा प्रॉब्लेम आहे. परत ठपका बिल्डरवरच Happy

लाखांचे फ्लॅट्स आता इथे करोडमध्ये गेलेत पण मजबुत, दणकट, न गळणारे, तडे न जाणारे घर देणे कुठल्याही बिल्डरला जमत नाही असे एकुण वाटते. >>> लाखाची गोष्ट सांगितलीस, साधना.

मामा राहत असलेली ७० वर्षापूर्वीची चाळ अजून दणकट आहे कुठेही टिपूसभरही ओल नाहीये आणि हल्लीच्या २ वर्षे वयाच्या इमारतीत ओलच ओल दिसते - अगदी नावाजलेल्या बिल्डरच्या इमारतीतही. प्रगती म्हणजे नक्की काय हेच समजत नाही कधी कधी.

माझ्याकडे आता लवकरच घराचे आणि बाहेरचे रिनोवेशन चालु करायचेय, दहा वर्षांपुर्वी केलेले प्लॅस्टर आता भिंतीला कंटाळून खाली पडायच्या नादात आहे... Happy काँट्रक्टर्स आणि त्यांची कोटेशन्स जमवायचे काम सध्या जोरात सुरू आहे. शनवारी एक काँट्रक्टर आलेले ते सांगत होते की नव्या मुंबईत लोकल लोकांची गुंडागर्दी आहे. बेलापुरची वाळू अतिशय फालतु, खुप सिल्ट असलेली आहे पण बिल्डरने त्यांच्याकडुन अमुक इतकी क्वांटीटी उचलावीच अशी जबरदस्ती असते. या सगळ्या प्रकरणाला राजकिय वरदहस्त असल्याने बिल्डरला ती घेतल्याशिवाय गत्यंतर नसते. मग अशी सिल्टवाली वाळू न धुता वगैरे वापरली की दोन वर्षातच नव्वी कोरी बिल्डींग गळायला लागते. त्यात माझे घर साक्षात सिडकोने बांधलेले, त्यामुळे त्याचा दर्जा बांधला तेव्हाच फालतु होता, आता केवळ आहे ते टिकवायचे म्हणुन दुरुस्ती करत राहायचे. हे विकुन दुसरीकडे घ्यायचे म्हटले तरी याच्या विक्रितुन नविन घर येणार नाही आणि जरी नविन घर घेतले तरी तिथेही हे गळतीचे त्रास असणारच. निदान इथे आपल्या जे करायचे ते आपले आपण करता येते, सोसायटीवर अवलंबुन राहण्याची कटकट नाहीय.

साधना, हो हे पत्रे प्रकरण खूप पाहिले ह्यावेळी मुंबई-ठाण्यात.
अर्थात माहेरच्या घरात ते ही शक्य नाही कारण एअरपोर्ट जवळ !!! काही इंच सुद्धा वाढवायचे तर सिव्हील एव्हिएशनची परवानगी लागते. मुळात गच्च्यांना कठडेच नाहीत.

किरणकुमार, घारुआण्णा, चांगल्या पोस्टस .

मनस्मि
एवढी चांगली माहिती नंतर धाग्यांच्या गर्दीत हरवेल, तेव्हा या धाग्याचा प्लीज ग्रूप बदलून घर पहावे बांधून हा ग्रूप करा. तिथे घरासंबंधित सगळ्या चर्चा एकत्र असल्या की पुढच्यावेळी शोधायला सोपे जाईल.